Skip to main content

काळ्या वाटाण्यांची उसळ

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 29/04/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
Kale-Vatane-Usal साहित्यः काळे वाटाणे - २ वाट्या तिखट - १ लहान चमचा (टी स्पून) आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून) काळी मिरी - ५ नग लवंग - ३ नग दालचिनी - १ इंच खसखस - १ लहान चमचा जायपत्री - १ फूल हळद - १/४ लहान चमचा खवलेला नारळ - अर्धा आमसुले - ३ नग कांदा - १ मध्यम, उभा चिरुन. मीठ - चवीनुसार तेल - अर्धी वाटी. काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ७ शिट्या घेऊन शिजवून घ्या. कढईत तेल तापवून त्यात धणे, काळी मिरी, लवंग, दालचीनी, खसखस, जायपत्री टाकून मध्यम आंचेवर खरपूस तळून घ्या. मसाला जळता कामा नये. धण्यांना जरा तांबूस रंग यायला लागला की मसाला तळला गेला आहे हे समजावे. मग त्यात उभा चिरलेला कांदा टाकून परतावा. कांदा परतला गेला की त्यात खवलेला नारळ टाकून परतावे. मध्यम आंचेवर सतत परतत राहून सर्व नारळ लाल रंगावर परतून घ्यावा. आता हे वाटण ताटात काढून थंड होऊ द्यावे. हा मसाला मिक्सर मध्ये एकदम मुलायम वाटून घ्यावा. वाटाणे अगदी मऊ नाही पण व्यवस्थित शिजलेले असले पाहिजेत. जर शिजले नसतील तर अजून २ शिट्या घेऊन पूर्ण शिजवावे. ह्या शिजलेल्या वाटाण्यात हळद, तिखट, आमसुले आणि वाटलेला मसाला घालावा. उसळ जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे. एक दोन चांगल्या उकळ्या आल्या की उसळीखालील आंच बंद करावी. कोथिंबीर घालून उसळ सजवावी. ही उसळ घावन आणि लोणच्यासमवेत वाढावी. शुभेच्छा....!

वाचने 26147
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by प्रभाकर पेठकर

घावनच्या माहितीबद्दल धन्यवाद, प्रभाकरराव. बाकी मला केवळ होस्टेलच्या मेसमध्ये मिळणारी काळ्या वाटाण्यांची उसळ आवडत नसे. घरी बनवलेली काळ्या वाटाण्यांची उसळ हा आवडीचा पदार्थ आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

कॉलीफ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार अशा भाज्या, पुलावसाठी चिरतो तशा चिरुन, वाफवून वरील मसाल्यात मिसळून भाजी केल्यास मस्तं लागते. भारी आहे कल्पना! मी तश्याप्रकारे करून बघणारच. धन्यवाद काका.

काका, तुम्ही आमचे वन ऑफ द मोस्ट फेव्हरेट मिपाकर. अर्धवटराव

घावन खायची मजा एक्तर काळे वाटाणे, किंवा चहा किंवा मग मटणाबरोबर.

अतिशय आवडते. आम्ही वड्यांसोबत खातो ही. https://lh6.googleusercontent.com/-5WJb-O2yPLs/UX7VRMPBSeI/AAAAAAAAA5w/nJ_EU-NFyw0/w438-h376/kala_vatana.jpg

भाकरीसोबत तर फार आवडते. मित्राच्या घरी हमखास असायची. मागे एकदा भारतातुन येताना आणलेले पण बरेच दिवस न केल्यामुळे त्यात पोरकिडे झाले :D

कोकणात ही डिश खूप फेमस आहे. काळ्या वाटाण्याचं सांबार/उसळ, घावने किंवा वर हेमांगीके यांनी दाखविलेले वडे हा "खास बेत" असतो.

In reply to by Mrunalini

गरजेनुसार बासमती तांदूळ रात्री भिजत घालायचे. सकाळी एकदम मऊ मुलायम वाटून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं. पाणी घालून आवश्यकतेनुसार पातळ करून घ्यायचं. नॉन्-स्टीक तव्यावर घावणे करायचे. पाण्या ऐवजी नारळाचे दूधही वापरतात. ही माझी पद्धत आहे.

मस्त रेशीपी काका! कोंबडी वड्यांबरोबर बर्‍याच वेळी खाल्ली आहे. छान लागते.

काका, उसळ करुन पाहिली.. सगळ्यांना खुप आवडली.. फक्त आंबोळी काही जमली नाही.. कुणी सानिका गुरुमाते सारखं डिटेलात पाकृ देईल का? (सानिकामाय.. तुम्हीच द्या ना त्या पेक्षा!!) धन्यवाद..

कोकणात, विशेषत: तळ कोकणात मस्त मिळते. वेंगुर्ल्याला खाल्लेली आठवत आहे.

छान रेसेपी. मी अशीच ग्रेवी तयार करून पाटवडी रस्सा करते. आता उसळ पण करून बघणार.