Skip to main content

मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 26/04/2013 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत. याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात. त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो. मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो. इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे. आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे. आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ? पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या. इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे. खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला. तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्‍यापैकी मराठीकरण झाले होते. याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे. पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत. या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत. या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो. काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल. अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार इंग्लिशमधून अभ्यास करतात. गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही. आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले. म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते. बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते. इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत. पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते. आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो. यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत. अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती. याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली. ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे. त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत! तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.

वाचने 55365
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

ज्ञानप्रबोधिनी हिंदी माध्यमाची शाळा आहे (असं ऐकून आहे). त्यामुळे ये आपका प्रतिसाद धागे को किसी और ही मोड पे लेके जायेगा :)

In reply to by अभ्या..

अभ्या , तुमचा ह्यो फलंदाज कन्च्या यत्तेत हाय म्हनायचा ! न जलमलेली पोरं बी त्या साळंत घेत्यात म्हनं !

In reply to by बॅटमॅन

>>> बायदवे पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी शाळा कशी आहे? चांगली आहे असे ऐकून आहे. ज्ञानप्रबोधिनी ही उत्तम शाळा आहे. शाळा फक्त ५ वी ते १० वी साठीच आहे. चवथीतून पाचवीत जाणार्‍या इतर शाळेच्या विद्यार्थ्यांची फेब्रु-मार्चमध्ये प्रवेशपरीक्षा घेऊन त्या आधारे ४० मुले व ४० मुली ५ वी साठी निवडले जातात. शाळेचा अभ्यासक्रम हा सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे गणित, शास्त्र व इभूना हे विषय संपूर्ण इंग्लिशमध्ये आहेत. याव्यतिरिक्त इंग्लिश, मराठी, हिंदी व संस्कृत ५ वी पासून आहे. मराठी फक्त ८ वी पर्यंत आहे. जरी इंग्लिश माध्यमाची शाळा असली तरी शाळेत संपूर्ण मराठी वातावरण आहे. शाळेत ५ वीत प्रवेश घेणार्‍या ८० विद्यार्थ्यांपैकी अंदाजे २०-२५ विद्यार्थी हे मराठी माध्यमाच्या शाळेतून आलेले असतात. ५ वी पासून सर्व विषय अचानक इंग्लिशमध्ये सुरू झाल्याने ही मुले गांगरतात. पण या मुलांना इंग्लिश माध्यमात सामावून घेण्यासाठी शाळा मदत करते व पुरेसा वेळही देते. साधारणपणे ७ वीत गेल्यावर हे विद्यार्थी इंग्लिश माध्यमाला सरावतात. शाळेत सर्व हिंदू व मराठी सण साजरे केले जातात. गीता पाठांतर, गणेशोत्सव इ. मुख्यत्वः हिंदू उपक्रम शाळा चालविते व त्यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते. शाळेच्या संचालक मंडळात अविनाश धर्माधिकारींसारखे नामवंत आहेत. शाळा सुटल्यावर रोज दीड तास सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा दलात सहभागी व्हावे लागते. एकंदरीत शाळा उत्तम आहे, पण शाळेचे वेळापत्रक व उपक्रम विद्यार्थ्यांना दमविणारे आहेत. शाळेत फक्त ८० विद्यार्थी घेतले जात असल्याने प्रवेश मिळणे खूप अवघड आहे.

मी शाळेत पहिली ते १० वी प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. मराठी माध्यम. मला कॉलेजात गेल्यावर प्रोफेसरांचे काही समजत नसे.मी त्याही विषयात पहिला होतो तरी. पुढे कालक्रमाने अनुभवाने इ़ग्रजी सुधारत गेले पण अजूनही शब्दसंग्रह वाचन करण्याच्या दृष्टीने मर्यदितच.मला ग्रामर उत्तम येते उत्त्म रित्या शिकवताही येते. पण मी स्वता: ला एकूण ईंग्रजी भाषेच जेमतेमच दर्जाचा विद्यार्थी मानतो. कारण त्या भाषेत अफाट शबदसंचय आहे. अनावश्यक एवढा. बालवाडी पासून परके माध्यम सुरू करणारा शिक्षण तज्ञ मजसमोर आलाच तर मी त्याच्या थोबाडीत मारेन मग मला दोन दिवसाची कैद झाली तरी चालेल. हे माझे मत या बाबत आहे. आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. पण त्याविषयी येथेच थांबतो कारण तो वेगळा धागा ठरू शकतो. परकीय भाषेत शिकलेली सर्वच मुले असंवेदनक्षम असतात असे नाही. पण बरीच असतात असे माझे निरिक्षण आहे. जगात कोणतीच भाषा परिपूर्ण नाही. उच्चारानुसार लेखन हा कोणत्याही भाषेचा महत्वाचा गुण मी मानतो. सबब स्पेलिंग ही कल्पना मला किळसवाणी वाटते. त्यात कर्नल लेफ्टनंट हे प्रकार तर भयानक आहेत.इंग्लीश बरी अशी फ्रेच भाषा आहे . ते त्या भाषांना चिकटून आहेत कारण स़ंस्कृत भाषा जननी असलेल्या भाषा या आदर्श भाषेच्या जवळ कशा जाउ शकतात याचा विचार कदाचित झाला नसावा. मला इंग्रजी येते हा माझ्या अभिमानाचा विषय आहे पण मराठीची लज्जत अजोड !

In reply to by चौकटराजा

चौरा यांच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत. माझ्या स्वतःच्या शिक्षणप्रवासाबद्दल इथे लिहिले आहे. मी स्वतः ७वी पर्यंत पूर्ण मराठी व ८वी पासून सेमी इंग्रजी माध्यमात शिकलेलो आहे. विद्यार्थीदशेत असताना इतरांसारखे फाडफाड इंग्रजी बोलता येत नव्हते पण त्याबद्दल फार वाईट कधी वाटले नाही. कारण हेच की हळू हळू का होईना आपल्याला जमतय हे कळत होतंच. आज काम करताना कधी कधी माझ्या इंग्रजीचे कौतुक होते व काही वेळा मी थोडा कमी पडतो हे मला स्वतःला कळते. बाकी मराठी माध्यमात शिकल्याने माझ्या करियरमध्ये कसलेही नुकसान झाले नाही. मला खंत याची वाटते की निम्न मध्यमवर्गीय असल्याने चांगले गूण मिळाल्याखेरीज आपली काही खैर नाही याचे सततचे दडपण व ८वी पासून शिक्षण संपेपर्यंत आवडीच्या व व्यावहारीक उपयोगाच्या विषयांखेरीज अनेक नावडीचे विषय व व्यावहारीकदृष्ट्या बिनकामाचे विषय शिकण्यात उमेदीचा काळ वाया गेला. शिकत असताना माझा लहरी स्वभाव व आळशीपणा या दुर्गूणांमुळेही वैयक्तिक नुकसान झालेच. मला त्या सह-विद्यार्थ्यांचे असुयारूपी कौतुक वाटायचे जे अभ्यासासोबत खेळ, कला यामध्यही पारंगत असायचे. एकाच वेळी त्यांना अभ्यास व खेळ / कला कसे झेपायचे हे माझ्यासाठी आजही कोडेच आहे. आता माझा वैयक्तिक अनुभव बाजूला ठेवला तरी भारतीय शिक्षणव्यवस्थेतील बहुतांश गोष्टी जसे अभ्यासक्रम, परीक्षापद्धती या विद्यार्थ्याला तो जे काही चांगले शिकू शकतो त्यापासून दूर ठेवण्यात मोठा हातभार लावतात. संगणकशास्त्रांत शिकणार्‍यांनासुद्धा अनेक जुनकट तंत्रविषय शिकावे लागतात. प्रत्यक्ष कामाच्या वेळी कराव्या लागणार्‍या गोष्टींपेक्षा दर वर्षी वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांमधून ते त्रिकोण, चौकोन, फिबोनाकी सिरीज, क्वाड्रॅटीक इक्वेशनचे प्रोग्राम लिहायला लावतात. यातून मुलभूत बाबी शिकायला मदत होत असेलही पण पहिले एक दोन वर्षे हे करून झाल्यावर अधिक व्यावहारिक अप्लिकेशन प्रोग्राम्सचे कोड लिहायला लावले पाहिजे. बरं संगणकशास्त्रात नोकरी / व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्याने त्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असतो तर त्यातही संख्याशास्त्र, अकौंटन्सी वगैरेचा अभ्यास करायला लावून अभ्यासक्रमापलिकडे प्रोग्रामिंग वगैरेमध्ये विद्यार्थीदशेत नैपुण्य मिळवण्याची संधी हिरावून पंखच कापले जातात. भविष्यात माझ्या मुलांनी कोणत्या माध्यमांतून शिक्षण घ्यावे यापेक्षा ८वी पासून वगैरे त्यांच्या आवडीनुसार हव्या त्या विषयांमध्येच झोकून देऊन मेहनत करावी व नावडत्या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यापूरते गूण मिळवण्याच्या धोरणाला मी प्रोत्साहन देईन. अभ्यासच नाही तर खेळ व कला क्षेत्रांत त्यांना शिकायचे असेल तर त्यासही मी प्रोत्साहन देईन. मी विद्यार्थीदशेत असताना मला माझ्या पालकांनी चांगले गूण मिळवण्यासाठी सतत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दडपणात ठेवले असेल व त्यामागची भावना जरा असुरक्षिततेची असली (आपल्याला शिक्षणाशिवाय कोण विचारणार) तरी त्याबाबत मी त्यांना कधीही दोष देणार नाही. त्या आर्थिक परिस्थितीत बहुधा तोच सर्वोत्तम पर्याय होता. त्यांनी खालेल्या खस्तांमुळे निम्न-मध्यमवर्गीय ते मध्यम-मध्यमवर्गीय प्रवास होऊ शकला अन देवाची कृपा राहिली तर उच्च-मध्यमवर्गीयतेकडे प्रवास होईलच पण माझी मुले अभ्यास व परिक्षांचे दडपण घेणार नाहीत यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन.

In reply to by चौकटराजा

इ़ग्रजी सुधारत गेले पण अजूनही शब्दसंग्रह वाचन करण्याच्या दृष्टीने मर्यदितच.मला ग्रामर उत्तम येते उत्त्म रित्या शिकवताही येते.
इंग्रजी माध्यमात शिकलेले शब्दसंग्रहात काय उजेड पाडत असतात हे ठाउक आहे का ?! तिथे आनंदच असतो. त्यापेक्षा मराठी माध्यमातली मुलं जास्त संपन्न असतात शब्दसंग्रहात. आणि व्याकरणात इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांनी लावलेले दिवे बघतोच आपण जिथेतिथे. अहो इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मराठी मुलांची अवस्था 'धड इथलं नाही धड तिथलं नाही' अशी असते.... समजलं?

In reply to by चौकटराजा

आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. मग उरलं काय ??थोड्या प्रमाणात स्पून फिडींग विषयाच्या सुरुवातीला गरजेचेच आहे. त्या शिवाय आवडतं काय कळणार तरी कसं??आवडी आठवी वगैरे मध्ये कळत नसाव्यात, कारण डिग्री झाल्यावर पण आख्खा ट्रॅक बदलणारं भरपूर पब्लिक असतंय..इंजिनिअरिंग घ्यायच्या आधी मेक काय सिव्हील काय कॉम्प काय हे पण बऱ्याच पब्लिकला बारावी नंतर माहिती नसतं. अन् प्रत्येक गोष्ट रिझल्ट ओरियन्टेड असावी असं हट्ट का ?? तसं म्हणायला या शिक्षणापेक्षा एखादी गोष्ट कशी शिकावी हे जरी इतक्या वर्षाच्या शिक्षणातून शिकलो तरी लै झालं. प्रत्येक पुस्तकी गोष्ट वापरली जातेच असं नाहीये.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

>>> आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांची परीक्षा घेऊ नये. माहिती म्हणून हे विषय शिकवावेत. खरं तर अभ्यासक्रमातून हे विषय काढून टाकले तरी हरकत नाही. पण ते शक्य नसेल तर निदान या विषयांची परीक्षा तरी टाळावी. त्याचबरोबरीने फक्त इंग्लिश व मराठी या दोनच भाषा सक्तीच्या असाव्यात. त्रिभाषासूत्राने महाराष्ट्राचे व मराठीचे खूप नुकसान केले आहे. हिंदीभाषिक राज्यात हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त तिसरी भाषा सक्तीची नाही. दाक्षिणात्य राज्यात हिंदी सक्तीची नाही. फक्त महाराष्ट्र व इतर काही राज्यात विनाकारण हिंदी सक्तीची केली आहे. हिंदी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. इतर भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असाव्यात.

In reply to by चौकटराजा

आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत.
या विषयाला पूर्णविराम दिलेला असला तरी मला हे वाक्य पटलेले नाही. विज्ञानाचं मला माहीत नाही. पण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ. विषय ह्युमॅनिटीस मधे करियर करणार्‍या मुलांसाठी अत्यावश्यक आहेत.

In reply to by पिशी अबोली

विषय सगळेच महत्वाचे अगदी भंगीकाम सुद्धा पण ते ज्याला आकडेमोडीत रस आहे आहे त्याला कशाला शिकवायचे ?

In reply to by चौकटराजा

पाठांतरावर भर न देता या सर्व विषयांची माहिती असावीच. सध्या दहावीपर्यंत जे कंपल्सरी समान शिक्षण आहे त्याच्या घटकांमध्ये तर नक्कीच काहिच चूक आहे. आठवीतल्या मुलांना आपल्याला नक्की कशात रस आहे हे माहीत असतं / समजत असतं ( थोड्या मुलांना नाही तर किमान ७०-८०% मुलांना.. शाळेतल्या ८ तुकड्यांमध्ये ५-१० मुलांना माहीत असणं नक्कीच पुरेसे नाही.) तरच विकल्प असावेत. ते नाहीत हे सत्य आहे त्यामुळे इतिहास भूगोल शिकवूच नये हे तर बरोबर नाही. म्हणजे कोणी भूगर्भशास्त्र / हवामान खाते / इतिहास संशोधन / पुरातत्व आणि इतर अनेक विभागात जाऊच नये. शाळेत किमान माहितीच नसेल तर काय मुलांना आपोआप स्फूर्ती येणार आहे का नंतर ? परीक्षार्थी बनवू नये इतकंच खरं..

In reply to by मैत्र

बारावीत मुलाला आपल्याला काय व्हायचे आहे याची जाणीव फक्त व्यावहारिक व भावनिक पातळीवर झालेली असते. त्याही वयात त्याला आपली बौद्धिक क्षमता काय खरे तर इंटलेक्च्यल अ‍ॅप्टीट्यूड कळलेली नसते. बाजारात कशाला भाव आहे व राहील या विषयी पालक व मित्र यांच्या मतांच्या भडीमाराने त्याचे एक मत बनत जात असते. व्यवसायात वा नोकरीत खरेच यशस्वी होण्यासाठी कुटील राजकारण , चिकाटी, पी आर ओ, गटबाजी हे ही यावे लागते. तसेच प्रत्येक व्यवसायाची काही मजबूरी असते. उदा डोक्टरना संध्याकाळचे टीव्हीचे कार्यक्रम पहाता येत नाहीत. अनिमेटरना रात्र रात्र जागून चिकाटीने काम करावे लागते. मरीन करीयर मधे रोजचे कौटुम्बिक जीवन लाभत नाही,. ई. हे सारे माध्यम, बुद्धी यांच्या पेक्षाही ही व्यापक आहे. इतिहासाची भूगोलाची तोंड ओळख ठीक आहे पण हे विषय सातवी नंतर रॅपिड रिंडिंग साठी देखील नकोत. मुलांची तीच वाचलेली उर्जा त्यांचा कल असलेल्या दिशेतील महत्वाच्या संकल्पना ( उदा . डेबिट दे रिसिव्हर क्रेडेट द गिवर ही कॉमर्ससाठी, कॉझर्वेशन ऑफ एनर्जी हे सायन्स साठी,प्रपोर्शन सिमेट्री हे फाईन आर्ट साठी ई) अधिक ठळकपणे मनात रुजविण्यासाठी करता येईल.

जोशी साहेब आपला लेख वाचला त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया हि वाचल्या. लोकांबद्दल वाईट हि वाटले. क्लिंटन यांचा १४ वर्षाचा"वनवास" सुद्धा वाचला. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि माझ्या शाळेत माझ्या १० वीत व्यवसाय मार्गदर्शन चाचण्या झाल्या होत्या त्यात माझा काळ वैद्यकीय व्यवसायाकडे आला होता. दहावी नंतर मी कॉमर्स ला जावे असे माझ्या आई वडिलांचे मत होते तरीही मी सायन्स ला गेलो आणी त्यानंतर मेडिकल ला. परंतु माझ्या वडिलांनी तेंव्हा जवळजवळ ७५ वेगवेगळ्या CAREER व्यवसाय मार्गाचे फॉर्म आणी माहिती आणून ठेवली होती. आपल्याला कोणता मार्ग हवा आहे यात गल्लत होऊ नये म्हणून १ ९८२ साली त्यांनी यावर जवळ जवळ २ हजार रुपये खर्च केले.जवळ फार पैसे नव्हते तरीही. पण मेडिकल ला जायच्या निर्णयावर मी ठाम होतो ( माझ्या आईचा त्याला विरोध होता कारण डॉक्टरचे खाजगी आयुष्य संकुचित होते म्हणून) परंतु माझ्या स्वतःच्या निर्णयाला त्यांनी पूर्ण पाठींबा दिला. आज या व्यवसायात मी ३० वर्षे आहे परंतु एकदाही मला असे वाटले नाही कि मी डॉक्टर का झालो? आजही माझ्या मुलांना काय करायचे आहे याचे मी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे माझी मुलगी कॉमर्स ला गेली आहे आणि मुलगा अभियांत्रिकीला. आम्ही दोघे हि डॉक्टर असूनहि आणि मुलांनी काय आणि केंव्हा अभ्यास करावा हे मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. वर्गात पहिल्या दहात यावे इत्यादी अपेक्षा माझ्या नाहीत फक्त पास व्हा नाहीतर पुढचे एक वर्ष तोच अभ्यास परत करावा लागेल एवढेच माझे म्हणणे आहे. पुस्तकी शिक्षणातील यश हे आयुष्यात यशस्वी होण्यात जास्तीत जास्त १० टक्के जबाबदार असते असे माझे मत आहे. त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्त्व देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे( हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा प्रकार नाही)

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्त्व देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे( हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा प्रकार नाही
) सहमत, आणि तुम्ही अधोरेखित स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती असे वाटते. इथे कोणी तुमच्यावर तसा संशय घेईल असे वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

सुबोधराव, तीन दशकांपूर्वी आपल्या पालकांनी दाखवलेल्या औदार्याचे व दुरदृष्टीचे कौतुक वाटत आहे व आपणही त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली आहे. माझा लेख वाचून त्यावर विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.

भाषेचं माध्यम कुठलंही असू द्या पण पोरांचा इ क्यू (इमोशनल कोशंट) स्ट्राँग व्हावा याची काळजी घ्या. नुस्ता आयक्यू जास्त असून उपयोग होत नाही. (आमच्या प्रतिसादांना पंख लागत आहेत हल्ली. काय भानगड आहे कळेना ब्वा!)

In reply to by प्यारे१

बुद्धी = ईंटेलिजन्स कोशंट (आयक्यू), जाण = ईमोशनल कोशंट (ईक्यू) हे व्यक्तीगणिक कमी जास्त असू शकतात. आपल्या आयक्यू आणि ईक्यूची नेमकी जाणिव असणारे आयुष्यात खुप सुखी असतात. जरी हे दोन कोशंट सरासरीच्या थोडेफार खाली असले तरी.
इथंच मिपावर एका लै भारी माणसाकडून मिळालेली, लै भारी वाक्ये. बाकी माझ्या होणार्‍या मुलांना प्राथमिक शिक्षण मी स्वतःच घरी शिकवावं म्हणतो. ते होमस्कूलींग चे वाचले होते कुठेतरी.

In reply to by प्यारे१

इ क्यू हा अतिशय कमी समजलेला पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एक साधे उदाहरण मी नेहेमी देतो. आय आय टी तील मुले आत्महत्या का करतात? ती लौकिकार्थाने अतिशय हुशार असतात आणि चार वर्षानंतर सहा आकडी पगार सुरु होणार असतो तरीरही ती मुले आत्महत्या का करतात याचे कारण तेथे असणारे तणावपूर्ण वातावरण मानसिक दृष्ट्या त्यांना हाताळण्याच्या पलीकडे असते आणि अपयश पचवणे हे त्यांना अशक्य असते. आयुष्यभर केवळ यश हातात लागल्यावर अपयश पचवण्याची ताकद नसल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या कोलमडून जातात यासाठी हा इ क्यू काय आहे हे समजणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

आमचं आख्खं आयुष्य इक्युवरच तोलुन धरलंय. अभ्यासातली हुशारी मेहनतीनेसुद्धा वाढवता येते.

In reply to by सुबोध खरे

इ क्यू हा अतिशय कमी समजलेला पण अतिशय महत्त्वाचा विषय आह पण मग मराठीवाल्यांचा इ क्यू चांगला असतो असे म्हणायचे आहे का ..

पाचवीपासून सायन्स, गणित हे विषय इंग्रजीतून होतात आणि इतर विषय मराठीतून चांगले समजतात. अर्थात त्यासाठी सायन्स शिकवणारा शिक्षक मराठी माध्यमाचा नसावा. फार लहान वयात मुलांचा कल समजणे अवघड असते.त्यामुळे पुढे सायन्सला जायचे झाल्यास त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. मला खरं तर मुलाने व्यवसायात पडू नये असे मनापासून वाट्ते. पण त्याच्या पणजोबांपासून घरात तेच वातावरण आहे. आठ्वीची परीक्षा झाल्यावर तो मला विचारतोय, आई दुकानात बसायचे असेल तर कुठली साईड घेऊ? अर्थात त्याचा मार्ग त्यानेच निवडायचा आहे. पण आत्तापासून तो वेगवेगळ्या कंपन्याच्या प्रॉडक्ट्सची माहिती घेऊन त्यावर बाबांशी चर्चा करत असतो.

ह्या धाग्यावर अनेकांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली , त्यांच्यामते त्यांनी मराठीमध्ये शिकून त्यांचे घोडे कुठे अडले नाही असा आशयाचा प्रतिसाद लिहून प्रतिसादाच्या शेवटी मात्र सध्या इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही असे लिहितात. त्यांना लेखाचे शीर्षक व त्यांचा हेतू कळला आहे का की कळून न कळल्यासारखे करत आहेत. माझ्यामते सध्यस्थितीत पाल्याला इंग्रजी किंवा मराठी मीडियम मध्ये घालावे असा सरळ प्रश्न आहे. त्यांचे उत्तर अनेकांनी सध्या इंग्रजी माध्यम योग्य आहे असे लिहितांना आपल्या वेळी आपण मराठीतून शिकलो ,आपल्याला त्रास झाला नाही ही मखलाशी करण्याची काय गरज आहे , त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची काय संबंध आहे , लेखाचा विषय मराठीतून का इंग्रजीतून शिकावे असा नाही आहे. मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम हे तर सार्‍या जगाला माहिती , पण ह्या देशात १५ वर जास्त राष्ट्र भाषा व कितीतरी अनेक उपभाषा आहेत , म्हणूनच शिक्षणात समानता आणण्यासाठी सरकारने दहावी नंतर शिक्षण इंग्रजीतून फार पूर्वी केले. सध्या सी बी एस इ व राज्य सरकारांच्या शिक्षण मंडळांची साठेमारी होते, त्यात गुणांची खैरात केली जाते. आता आय बी शाळा सुद्धा भारतात आल्या आहेत , पुढील दशकात त्यांचा प्रभाव वाढणार आहे. माझ्या मते लेखकाने मराठी का इंग्रजी माध्यम असा प्रश्न विचारण्यापेक्षा सी बी एस सी बोर्ड कि राज्याचे बोर्ड स्वीकारावे असा असावा. आठवी पर्यंत परीक्षा नसणे अश्या प्रकारांचे अनेक प्रयोग शिक्षण मंत्री करतात. त्यात वावगे असे काहीच नाही मात्र ह्या प्रयोगात सातत्य राखले जात नाही , नियम बनवले जातात , त्यात वारंवार बदल केले जातात. माझ्या मते येथे अनेकांनी त्याकाळाच्या ते मराठी भाषेतून शिकले ह्यांचा आवर्जून उल्लेख केला, माझ्या वेळी म्हणजे १९९६ साली मी मराठीतून शालांत परीक्षा पास झालो त्यावेळी ह्या मराठी माध्यमात शिकून घोका आणि परीक्षेत ओका थोडक्यात गुणवंत होऊ नका ,गुण मिळवणारे मशिन निर्माण व्हा असा तो काळ होता. बोर्डात येणे , मेरीट मध्ये येणे ह्या प्रकाराला अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होते. सारे कोचिंग क्लासेस च्या अधीन गेले होते. चाटे क्लासेस हा शिक्षणाच्या बाजाराचा व व्यापारीकरण ह्याचा आदर्श नमुना राज्यभर ओळखला जाऊ लागला. गुणवत्ता सोडून गुण वाढण्यासाठी पॅटर्न निर्माण झाले. उदा लातूर पॅटर्न संस्कृत वर परदेशात संशोधन होते, आमच्यासाठी संस्कृत म्हणजे १०० मार्काचे ज्याचा प्रमुख उपयोग टक्के वाढवण्यात होतो असा व्यवहारिक ,व्यापारी अर्थ होता, बिचारे इंग्रजी माध्यमातील मुले ५० चे हिंदी घेतल्याने त्यांना टक्के मिळवता येत नसत. मग ह्याचे उट्टे ते ११ वीत काढत. उच्च शिक्षण संपूर्णतः परकीय भाषेत घेणे असा अजब कारभार मराठी माध्यमातील मुलांच्या नशिबी असायचा . आज परदेशात मुलांना शाळेत लहानपणापासून परकीय भाषा म्हणून इंग्रजी म फ्रेंच ,रशियन शिकवल्या जातात.म्हणून जर त्यांना ह्या परकीय भाषेत उच्च शिक्षण घेण्यास त्यांचे सरकार सक्ती करत नाही. इंग्रजीतून उच्च शिक्षण घ्यायचे तर सुरवातीपासून ते इंग्रजीतून घेण्यास काहीच हरकत नसावी, मात्र राज्य व केंद्र सरकारने असा कायदा केला पाहिजे की सर्व प्रकारच्या बोर्डांना त्यांच्या शाळेत पहिलीपासून त्या त्या राज्याची स्थानिक भाषा शिकवली पाहिजे. भारतात सगळ्याच मुलांनी पहिलीपासून इंग्रजीतून शिक्षण घेणे व त्याचवेळी आपापल्या मातृ भाषेतून शिक्षण घेतले हा पर्याय मला योग्य वाटतो , सध्यातरी इंग्रजीला पर्याय नाही. डोंबिवलीतील मराठी माध्यमाची प्रख्यात शाळा. आमची मुले नेहमीच गुणवत्ता यादीत यायची , आचार्य अत्रे सुवर्ण पदक आमच्याकडे अनेकदा आले , मात्र आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाला त्या शाळेत घालायची वेळ आली तेव्हा शाळेतील आमच्या शिक्षकांनी तसे करण्यास परावृत्त केले. आता शेवटी आता पूर्वीची शाळा राहिली नाही तिचा दर्जा राहिला नाही, तेव्हा इंग्रजी माध्यमांची कास धरा असा सल्ला मराठी शाळेतील बाईंना द्यावा लागला.

इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत!
माहित नाही. पण मराठीचे महत्व फार वाढणार अशी चिन्हे नाहीत, अगदी राजसाहेब सत्तेवर आले तरी. थोडक्यात... कंच्याबी शाळेत घाला हो हिथं आता पैलीपासुन इंग्रजी असतं सायड बाय सायड.

माझ्या मते हा त्या त्या आईवडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनीच त्यावर निर्णय घ्यायचा आहे..

मूलांची शेती....भाग ४...संस्कार या विषयात रस असणार्‍या सदस्यांनी विषयाशी संबंधित लेखमालिका अवश्य वाचा. लेखक आहेत - मुक्त विहारि.

हि बातमी वाचा................ ------------------------ मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौरानी म्हटलयं. मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.मराठी शाळामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.सहा वर्षात तब्बल ५६ हजार विघार्थ्यांनी पालिकेच्या शाळा सोडल्या आहेत.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौर आणि शिक्षणधिकारीनी म्हटलयं. विघार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर सकस आहार मिळण्यासाठी पालिका १४० कोटी रूपये खर्च करते.शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.मात्र पालिकेच्या शाळांमधील गळती कमी होऊ शकलेली नाही.यात मराठी शाळा बंद होत असल्यान मराठीवर राजकारण करणारे सत्ताधारी शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक मूक गिळून गप्प आहेत.

In reply to by अविनाशकुलकर्णी

बातमी वाईट वाटायला लावणारी असली तरी अनपेक्षित नक्कीच नाही. बाकी शालेय शिक्षण धोरण आखणे व त्याची अंमलबजावणी हा पूर्णपणे राज्यसरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. महापालिकेचे काम केवळ शाळा चालवणे हे आहे. आघाडी सरकार आल्यापासून प्रत्येक शालेय शिक्षण मंत्री स्वतंत्र संस्थानिक असल्यासारखे धोरण राबवतोय. त्यात कसलीही सुसूत्रता, तारतम्य नसल्याने अगोदर अवघड परिस्थितीतून जात असलेल्या या क्षेत्राला खोल गर्तेत ढकलले आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे विद्यार्थ्यांना नव्हे ठेकेदारांना आकर्षित करण्यासाठी...

एवढी सोन्या सारखी पोरं आहेत काञ त्यांच्या मागे लागायचं... मी अगदी १००% अनुभवतुन सांगतेय.. तुमचं मुलं तुमच्यापाशी धडधाकट, हसत खेळत आहे.. बास झालं.. आता प्रश्न माध्यमाचा.. १. मला वाटत नाही की काहीही फरक पडतो. मराठी माध्यमात घातलं तर संस्क्रुती टिकेल आणि ईंग्रजी मध्ये घातलं तर बुडेल.. असं मला वाटत नाही. मुलं त्या संस्क्रूती मध्ये वाढतिल जी त्यांच्या घरात आहे. २. मराठी माध्यम पाया पक्का करण्याच्या दृष्टीने उत्तम. पण जर तुम्ही फिरतीवर असाल / किंवा पुढे मागे स्थलांतर केलेत तर इंग्रजी बरे... ३. मुलांना त्रास होइल पुढे जाऊन म्हणुन आताच इंग्रजी मध्ये घाला हि पालकांची पळवाट आहे. शाळांवरच सगळं शिक्षण सोडलं तर कुठल्याही माध्यमात घाला.. काही उपयोग होणार नाही.. ४. घरात नाही तर शाळेत इंग्रजी येणं महत्वाच आहेच.. ते जर मुल घरात शिकणार असेल तर घरात.. पण शिकवाव जरुर.. कारण सध्यातरि इंग्रजीला पर्याय नाही.. कुठेना कुठे भिडावं लागतच..

आपल्या भवतालच्या भाषेच्या मध्यमातून आपण जगणे जाणून घेउ लागतो. त्या भाषेचे पुरेसे ज्ञान आल्यानंतरच परकीय भाषा शिकणे योग्य आहे. आता कोणी म्हणेल गणित व विज्ञान हे इंग्रजीतून शिकणेच योग्य आहे कारण पारिभाषिक शब्दांची प्रचंड संपत्ती तेथे आहे. कबूल पण प्रगत गणित व प्रगत विज्ञान आपणसर्वानीच शिकायचेच कशाला ? जनरल गणित व जनरल विज्ञान यात कितीशा पारिभाषिक शब्दांची आवश्यकता आहे ???? समाजातील एकूण रोजगारात इतिहास, भूगोल, चित्रकला, संगीत , प्रगत विज्ञान ( उदा . फायलम, नॉन सेक्सुअल प्रोपागेशन्,ओहम लॉ. बॉईल्स लॉ, थिअरी ऑफ रिलेट्व्हेटी, सुपर कंडक्टीव्हिटी,मेंडेल्स लॉ, पिरिऑडीक टेबल) प्रगत गणित ( सर्डस, कॅल्क्यलस, सेट थेरी, ट्रीग्नॉमेंट्री, इडायसेस, को ऑर्डीनेट जॉमेट्री ) ई चे गुणोत्तर काय. मग हे सारे शिकवणे कशासाठी.... मी म्हणतो सरसकट कशासाठी ... ?

Friends, How I met your mother, Two and half men, Prison Break, Heroes, The big bang theory आणि असंख्य इंग्रजी चित्रपट, एवढे जर नियमित पणे पहिले तर इंग्रजी नक्कीच चांगले सुधारते. (स्वानुभावाने सांगतो) राहिता राहिला माध्यमाचा प्रश्न, कोणतेही मध्यम असू दे काही फरक पडत नाही कारण आपल्या शिक्षण पद्धतीचाच ह्रास होत चालला आहे. म्हणून माध्यम कोठलेही असो, घरीच व्यवस्थित शिकवा .. मग जरी आपल्या पाल्याचे शिक्षण मराठी माध्यमात झाले तरी आपला पाल्य उच्च शिक्षण स्वताहाच समजून घेईल.

इंग्रजी शाळेत शिकलेली मुले मोठी झाल्यावर अत्यंत गचाळ इंग्रजी बोलतात,लिहितात. बाकी आपापल्या पोरांटोरांना कोणत्या शाळेत पाठवायचे तो प्रत्येकाचा खाजगी मामला झाला.

नावाला जागलात साहेब (ह.घ्या.) ! अहो यासाठी एवढा का.कु. का करायचा ? तुमचे लग्न झाले आहे का ? असेल तर बायकोलाच विचारायचा हा प्रश्न व निर्णय घ्यायचा. जेवढे तुमच्या बायकोला कळेल तेवढे कुण्णाला कळणार नाय बगा ! लग्न नसेल झाले तर झाल्यावर विचारा !

मी संपूर्ण मराठी माध्यमातूनच शिकलो - पहिली ते दहावी. नंतर एखाद वर्ष त्रास झाला असेल भाषेचा....पण नंतर काही नाही. आणि हे मखलाशी म्हणून सांगत नाहीये...मी फार काही जुन्या काळातला नाही. माझ्या स्वतःच्या मुलांनाही मराठी/सेमी-इंग्रजी माध्यमातच घालावं अशी माझी तरी इच्छा आहे...पण ह्यात बेटर हाफला काय वाटतं ते पाहून, चर्चा करून मगच ह्यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल. (ह्या सगळ्या खूपच भविष्यकाळातल्या गप्पा आहेत पण माझे विचार तेव्हाही असेच असतील असं वाटतं म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)

भरत जाधव मराठी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत 10 लाख. अमीर खान हिंदी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत 30 ते 35 करोड. टाॅम क्रुझ इंग्रजी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत अंदाज नाही. येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत. शिक्षण इंग्रजी घेउन (अर्थात नुसत शिक्षण असून काय चालत नाही यशस्वी होण्यासाठी इतर गुणाचीही आवश्यकता असते) मराठी संस्कृती, मराठी भाषा जपता येतेच.

In reply to by NiluMP

येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत.
या वाक्यात तर्काचा इतका अभाव आहे की प्रतिवाद करायला पण मन धजत नाही.
शिक्षण इंग्रजी घेउन मराठी संस्कृती, मराठी भाषा जपता येतेच.
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पण उत्तम इंग्रजी बोलता/लिहिता/वाचता/ऐकता येते.

बरं, पण माझया तुलनात्मक तक्त्याला तुम्ही सोयईस्करपणे बगल दिलीत. असो मराठीचा सार्थ अभिमान असावा फाजिल नव्हे.

In reply to by NiluMP

१ पौंड= ८० रुपये. १ रियाल=१४० रुपये. या तुलनेला बगलच नाही, तर कंप्लीट साईड द्याल असे वाट्टे, पण स्टिल...असो. तेव्हा ठरवा इंग्रजी श्रेष्ठ की अरबी. इंग्रजीचा सार्थ अभिमान असावा फाजिल नव्हे.

In reply to by NiluMP

त्या तक्त्याला सदर चर्चेत काडीची किंमत नाही म्हणून बगल दिली. यात रजनीकांत चे मानधन पण टाका आणि उद्यापासून "एप्पडी इरकिंगा...नल्ला इरुकेन" सुरु करूया... काय म्हणता?? मराठी बोलणारी माणसे किती, हिंदी बोलणारी किती, इंग्लिश बोलणारी किती, किमान याचा काही अंदाज. चित्रपटसृष्टीतील मानधनाचे आकडे हा काय निकष झाला काय?? इंग्रज होऊन इतकी प्रगती होते ना. नाव बदलून मिस्टर ब्लू वगैरे ठेवा, लगेच पगार दसपट करतील तुमच्या नोकरीत.
येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत.
मी मराठीचा अट्टाहास करतो असे तुम्ही समजत असलाच. मी संगणक शास्त्रात उच्चशिक्षण घेतले आहे आणि एका नामवंत आयटी कंपनीत काम करतो. ना माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात मराठीचा काही फायदा होता ना माझ्या नोकरीच्या ठिकाणी. काहीतरी बादरायण संबंध जोडायचे आणि विधाने करायची याला काही अर्थ नाही. दर वेळेला प्रतिवाद करण्यात वेळ नी शक्ती वाया घालवणार नाही

वास्ताविक इथे नुसत्या चिंतनांपेक्षा आपले अनुभव सांगावेत जे मार्गदर्शक ठरतील.

अफूवर ज्याप्रमाणे बंदी आणली गेली, त्याप्रमाणे इंग्रजी भाषेच्या शाळांवर बंदी आणली पाहिजे, अशी रोखठोक मागणी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी येथे केली. इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास साम, दाम, दंड पद्धतीने विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. साभार लोकसत्ता: इंग्रजी शाळांवर बंदी आणावी - भालचंद्र नेमाडे

In reply to by आयुर्हित

म्हणण्यामागची भावना योग्य असली तरी हे टोकाचं झालं त्यामुळे याचं हसं जास्त होईल. आणखी एक गोष्ट त्यांनी या भाषणात सांगितली. म्हणे ब्राह्मणी वर्चस्ववाद मराठीच्या शिक्षणात नको. याचा तीव्रतम निषेध नोंदवू इच्छितो. मुळात यात जातीला आणायची गरजच नाही. शाळेत शुद्ध मराठी शिकवावी यात गैर काहीच नाही. बोली भाषा या घरात शिकाव्यात; पण प्रमाण मराठी जी आहे तीच शाळेत शिकविली गेली पाहिजे. उगीच निरर्थक वळण या ईष्ट मुद्द्याला देऊन नेमाडे यांनी काय साधलं किंवा सुचवलं हा चर्चेचा मुद्दा आहे. उद्या शाळेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असं शिकवलं जाणार असेल तर त्यापेक्षा महाराष्ट्रात इंग्रजीची सक्ती झालेली परवडेल.

In reply to by वेल्लाभट

'भाषेतून शिक्षण' आणि 'भाषेचे शिक्षण' यात आपला घोळ झालेला दिसतोय. मराठी 'भाषा' म्हणून इंग्रजी शाळेत शिकवली जातेच की. प्रश्न मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आहे. मग त्या मातृभाषेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असलं काही असेल तरी विद्यार्थ्यास अर्थाचे आकलन होणे, त्याला विचार करता येऊन तो समर्थपणे मांडता येणे हे जास्त आवश्यक आहे. जे इंग्रजी सद्यस्थितीत करत आहे म्हणजे 'अभिजात'तेचा, 'उच्चभ्रू'पणाचा दबाव आणून कनिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांना न्यूनगंडग्रसित करणे, तेच मराठी करू लागली तर फरक काय राहीला? 'अभिजात'तेचा, 'उच्चभ्रू'पणाचा शिक्का आपल्यावर बसावा म्हणून जनता उरस्फोड करून आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत अव्वाच्या सव्वा फिया भरून शिकवायला मरमर करत आहे. शिक्षणाचा हाच अर्थ सर्वत्र प्रस्थापित झाला आहे. माझा मावसभाऊ पार खेड्यातला, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिविल इंजिनीअरींगचं उपजत ज्ञान भन्नाट होतं. लहान असल्यापासून त्याच्या ह्या खटपटी चालूच असायच्या. न्यूनगंडामुळे बारावीत इंग्रजी भाषेचा चक्रव्यूह ३-४ वेळा प्रयत्न करूनही भेदू शकला नाही. आता गावी शेती करतो. तो जात्याच हुशार असल्याने पैसा कमावतो बर्‍यापैकी. पण पात्रता असून इंजिनीअर होऊ शकला नाही. माझे तर स्पष्ट मत आहे की इंग्रजीचा हा अडसर जाणून बुजून निर्माण करून मागास भागातल्या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा काहीतरी कट आहे. कारण मुंबई सोडून इतर विद्यापीठांमधे पदवीपर्यंतचे शिक्षण संपेपर्यंत इंग्रजी भाषा अनिवार्य आहे. त्याची काहीच गरज नसतांना. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी. जर्मन इंजिनीअरींगचे, जॅपनीज तंत्रज्ञानाचे गोडवे जगभर गायले जातात. ती लोकं आपल्या मातृभाषेतच शिकतात. एवढी भक्कम उदाहरणे समोर असतांना पुन्हा भाषेच्या शुद्धीकरणाचा मुद्दा पुढे करून मूळ विषयाला बगल दिली जाते हे बरोबर नाही. नेमाड्यांसारखे लोक मुद्दा बरोबर असला तरी भावनेच्या भरात भलत्याच पद्धतीने मांडून गांभिर्य कमी करतात.

In reply to by संदीप डांगे

माझे तर स्पष्ट मत आहे की इंग्रजीचा हा अडसर जाणून बुजून निर्माण करून मागास भागातल्या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा काहीतरी कट आहे.
हे फार चुकीचे वाक्य आहे...

In reply to by टवाळ कार्टा

ते वाक्य अतिशयोक्ती असेलही. पण खेड्यापाड्यातल्या मुलांवर इंग्रजीची दहशत स्वतः बघितली आहे. शालेय शिक्षणात इतिहास भूगोलाइतकेच इंग्रजीचे महत्त्व असते तर समजू शकले असते. पण ही 'साहेबी' भाषा 'नेटीव्ह' पोरांस झेपणार नाही असा माहोल तयार केला गेलेला आहे. इंग्रजीस अवास्तव महत्त्व देऊन 'तीच्यावर प्रभुत्व मिळवणे येरागबाळ्याचे काम नाही' असा काही भ्रम आहे. त्याचबरोबर त्यांना शिकवणारे शिक्षकही दर्जेदार नाहीत. कारण तेही याच व्यवस्थेतून शिकले आहेत. त्यामुळे इंग्रजी हे काहीतरी भयंकर प्रकरण असल्याचे या मुलांमधे रूजलेले असते. (इथे अपवादांबद्दल बोलून उपयोग नाही.) माझे स्वतःचे शिक्षण आधी ३ वर्षे (केजी) कॉन्वेंटमधे, नंतर झेडपीत चौथीपर्यंत, नंतर बर्‍यापैकी मराठी शाळेत उर्वरीत दहावीपर्यंत सेमी-इंग्रजीमधून झाले. माझ्या इंग्रजीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात आणि इतर मुलांच्या दृष्टीकोनात बराच फरक होता. नववीमधे मी इंग्रजीतून कविता करू लागलो होतो तर सोबतच्या मुलांचे व्याकरण, स्पेलींग पक्के झाले नव्हते. त्याचे कारण त्यांना इंग्रजी ही कठीण भाषा आहे असे वाटायचे. बर्‍याचदा खुद्द शिक्षकांपेक्षा माझे इंग्रजीचे आकलन चांगले आहे असे मला जाणवायचे. त्याबद्दल आगावूपणा करून कानही शेकून घेतला आहे. यात कॉन्वेन्टची भलामण करण्याचा हेतू नसून एखादया गोष्टीचा संस्कार मनावर कसा केल्या जातो हा मुद्दा मांडणे आहे. आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून शिक्षण देणार्‍या कॉन्वेंट्सना माझा कायम विरोध आहे. उदा.: रेन रेन गो अवे, बा बा ब्लॅकशीप, वैगेरे. पण कॉन्वेंटची इंग्रजीचे शिक्षण देण्याची पद्धत आणि इतरांची पद्धत यात फरक आहे हेही तितकेच खरे आहे. पुढे पहिलीपासून इंग्रजीचा चांगला उपक्रम सुरू झाला. पण त्यात काही चांगले घडायची वाट बघेपर्यंत पालकांनी इंग्रजी शाळांची वाट धरायला सुरुवात केली. या सर्व अनुभवावरून मला असे वाटते की भाषेचा बागुलबुवा निर्माण करून मुलांना पुढे येण्यापासून वंचित ठेवले जात आहे किवा त्यांना जास्त महाग अशा इंग्रजी शाळांकडे पिटाळले जात आहे किंवा इंग्रजांच्या कारकून तयार करण्याच्या व निवडण्याच्या पद्धतीलाच शिक्षण समजून बसल्यामुळे हे सगळे होते आहे.

In reply to by संदीप डांगे

असे असते तर मत मराठी मिडियम मध्ये शिकलेले प्रत्येक पोर किमान १ कादंबरी लिहायला हवे होते...मी स्वतः पुर्णपणे मराठी मिडियम मध्ये शिकलेलो आहे आणि शाळेतून कॉलेजात गेल्यावर कशी काशी होते याचा स्वतः अनुभव घेतला आहे...पहिली नोकरी लागून २ वर्षे झाल्यावर मला थोडेफार ईंग्लिशमध्ये बोलणे जमत होते आपल्या देशात जौदे...राज्यात शिक्षणासाठी २ मिडियम आहेत हेच मुळात चुकीचे आहे...आणि इतकी वर्षे महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये आहे यात कट वगैरे काही नाही...ते तसे होणारच होते कारण मातृभाषेत महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी ते सगळे ज्ञान आधी मातृभाषेत आणले पाहिजे...आणि भारतात किती मातृभाषा आहे याचा विचार केल्यास (इथे राष्ट्रभाषा कोणती यावरच किती वाद होतात) कोणत्या भाषेत शिक्षण असावे याला किती गोंधळ घातला गेला असता...परत ज्या राज्यात शिकलो तिथेच रहावे लागणार...म्हणजे प्रगत राज्यातले डॉक्टर दुसर्या राज्यांत जाउन औषधे सांगूच शकणार नैत वर परत गोर्यांचे ते सगळेच चांगले (हे असे वाटण्यात सगळ्याच जाती येतात) त्यामुळे जर सगळ्यांना समान शिक्षण हवे असेल तर भारतासारख्या अठरापगड जातींच्या देशात इंग्लिशला पर्याय नाही...जर शिक्षण घ्यायचेच नसेल तर ती प्रवृत्ती कोणत्या जातीची मक्तेदारी नै

In reply to by टवाळ कार्टा

तू म्हणालास तो भाग व्यक्तिसापेक्ष आहे बर का. मी सुद्धा १००% मराठी माध्यमातून शिकलो. गणित आणि विज्ञान सुद्धा. कॉलेजमधे मला एक कणही अडसर झाला नाही त्याचा. मी शाळेत असतानापासून इंग्रजी गाणी ऐकत आलो. आणि माझे काही मित्र आजही 'तुला कळतं तरी का ते काय गातायत?' असं विचारणारे आहेत. इच्छेचा भाग आहे, आणि प्रोत्साहनाचा. शिवाय घरी त्यास पूरक वातावरण असेल तर अजून उत्तम. त्यामुळे मराठीत शिकून पुढे कॉलेजात काशी बिशी होतेच असं मुळीच नाही.

In reply to by वेल्लाभट

मी जे लिहिले ते व्यक्ती सापेक्ष आहेच पण मला माझ्यासारखी परिस्थिती असणारी मुले बहुसंख्येने दिसली...जो तुझा अनुभव आहे तो सुध्धा व्यक्तीसापेक्षच आहे पण "१००% मराठी माध्यमातून शिकलो. गणित आणि विज्ञान सुद्धा. कॉलेजमधे मला एक कणही अडसर झाला नाही त्याचा." हे असे बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत नाही होत...आणि त्याचे मुख्य कारण "शाळेत इंग्रजी व्यवस्थित न शिकवणे" हे सुध्धा असू शकते "इच्छेचा भाग आहे, आणि प्रोत्साहनाचा. शिवाय घरी त्यास पूरक वातावरण असेल तर अजून उत्तम." हा नशिबाचा भाग झाला...सगळ्यांच्या घरात सारखीच परिस्थिती असेलच असे नै... "मराठीत शिकून पुढे कॉलेजात काशी बिशी होतेच असं मुळीच नाही." काशी व्हायलाच हवी असेही नाही...तरीसुध्धा ती होते...तेसुध्धा बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत...असे का?

In reply to by टवाळ कार्टा

मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत नाही होत...आणि त्याचे मुख्य कारण "शाळेत इंग्रजी व्यवस्थित न शिकवणे" हे सुध्धा असू शकते
दोन्ही शक्यता. न शिकवणे आणि न शिकणे (स्वतःहून). कुणाच्या बुद्धीवर मी काहीही म्हणत नाहीये हं. उदाहरण देतो. आमच्या शाळेत काही इंग्रजी भाषापंडित नव्हते शिकवायला. मला एकदा 'अ‍ॅन इंजिनियर' असं उत्तर चूक देऊन 'अ इंजिनियर' असं लाल पेनाने लिहून दिलं होतं सरांनी. म्हणून मी ते नाही शिकलो. मी अ‍ॅन इंजिनियरच शिकलो. घरचं वातावरण पूरक असणं नशिबाचा भाग. ठीक आहे मी कुठे म्हटलं असायलाच हवं? मी म्हटलं असेल तर उत्तम.
तरीसुध्धा ती होते...तेसुध्धा बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत...असे का?
पुन्हा तेच. इच्छाशक्तीचा अभाव म्हटलं तर आवडणार नसेल तर मग काय म्हणावं? मित्रांशी मुद्दाम इंग्रजीतून बोललं संध्याकाळी जरा वेळ तरीही प्रचंड फायदा होतो. स्वानुभवातून सांगतो. असो.

In reply to by वेल्लाभट

दोन्ही शक्यता आहेतच
आमच्या शाळेत काही इंग्रजी भाषापंडित नव्हते शिकवायला. मला एकदा 'अ‍ॅन इंजिनियर' असं उत्तर चूक देऊन 'अ इंजिनियर' असं लाल पेनाने लिहून दिलं होतं सरांनी. म्हणून मी ते नाही शिकलो. मी अ‍ॅन इंजिनियरच शिकलो.
हेच्च म्हणतोय...तुला शाळेत चुकीचे शिकवले गेले तरी तुला "शाळेत शिकवलेले चुकीचे आहे असे सांगणारे दुसरे भेटले"...सगळ्यांच्या बाबतीत हे लागू पडत नै...विशेषतः खेड्यांत...त्यांनी काय करावे
इच्छाशक्तीचा अभाव म्हटलं तर आवडणार नसेल तर मग काय म्हणावं?
हा ईच्छाशक्तीचा अभाव सुध्धा असू शकतो किंवा शाळेत इंग्रजीची गोडी लावण्यात शिक्षक कमी पडले असे सुध्धा असू शकते...कारण सगळ्याच शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्याची क्वालिटी सारखी असू शकत नाही...
मित्रांशी मुद्दाम इंग्रजीतून बोललं संध्याकाळी जरा वेळ तरीही प्रचंड फायदा होतो.
कचकून सहमत

In reply to by टवाळ कार्टा

अगदी सहमत. इंग्लिश शिकून शेक्सपिअरवर पिएचडी करायला सांगत नैये कुणी तर बेसिक शिकणं अभिप्रेत आहे. इतकेही श्रम घ्यायची तयारी नसेल आणि आपल्या असमर्थतेचं तुणतुणंच वाजवायचं असेल तर त्याला कै अर्थ नाही. अलीकडे अशा रडारडीला भाव मिळायचे दिवस संपलेत ते बरंच आहे. गावाकडचे असा नैतर शहराकडचे, न्यूनगंडाच्या ओझ्यांचा अहंगंड वाहण्याची ही प्रेरणा मिळते कुठून तेच कै कळत नाही. याचा अर्थ मी इंग्लिशचा चाटू पुरस्कर्ता आहे असा कोणी काढू नये. मुद्दा इतकाच आहे की सध्याच्या काळातली बळजोर भाषा जी अख्खे जग वापरते-समजते ती शिकण्यात आळस दाखवला तर स्वतःसाठी संधी कमी होतात. त्याबद्दल व्यवस्थेला श्या घालत बसणे आणि इंग्लिश शिकणे यांपैकी कुठला मार्ग तुलनेने सोपा वाटतो ते पाहणं गरजेचं आहे.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी शिकणे आणि अरबी शिकणे यात माझ्यामते अरबी जास्त कठीण असेल. पण इंग्रजी येण्याभोवती जो ग्लॅमरवजा गवगवा आहे त्याचं बर्‍याच लोकांना दडपण येतं. त्यामुळे ती शिकायला मन कचरतं. मनोबल कमी पडलं की सगळंच बोंबलतं. इतर विषयांबाबत (गणित, विज्ञान) कुठलाच असा त्रास होतांना दिसत नाही. भाषेपेक्षा हे विषय जास्त कठीण आहेत तरी यात आपली पोरं कुठेच कमी पडत नाहीत. शत्रूकडे भयंकर अस्त्रे आहेत, त्यांना जिंकणे कठीण आहे असा प्रचार सैन्यात झाला की पुढे १००:१ अशा प्रमाणात शत्रु आला तरी हरतात. कारण मनोबल, प्रतिमा. तशीच 'प्रचंड हुशार लोकांची भाषा' म्हणून इंग्रजीचे महत्त्व चुकीच्या पद्धतीने वाढवून आपल्याच लोकांनी 'जिंकण्यास अशक्य' अशी तीची प्रतिमा बनवली आहे. ज्यांना सत्य कळतं ते चटकन सुटतात. तेव्हा इंग्रजीचे दडपून टाकणारे वातावरण हटवले तर खेड्यापाड्यातला लुंग्यासुंग्यासही सुपारी चघळल्यासारखं इंग्रजी बोलता येइल. पण मग उच्च्भृ शाळेत दण्दणीत फिया देऊन फाडफाड इंग्रजी बोलणारे कशाच्या जिवावर मिरवतील?

In reply to by संदीप डांगे

हुच्चभ्रूपणा सर्व काळी सर्व ठिकाणी आढळतो. बाकी इंग्लिश माध्यमाच्या सर्वच शाळांत असे वातावरण असते असे नाही. खेडोपाड्यातले लोकही इंग्रजी नीट शिकले तर हुच्चभ्रू मिरवायला अजून दुसरे काहीतरी शोधून काढतील. तो खेळ अनादिसिद्ध आणि न संपणारा आहे.

In reply to by टवाळ कार्टा

सगळ्यांना समान शिक्षण हवे असेल तर भारतासारख्या अठरापगड जातींच्या देशात इंग्लिशला पर्याय नाही समान शिक्षण आणि समान भाषेत शिक्षण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चीनपासून जापानपर्यंत, जर्मनीपासून स्पेनपर्यंत भाषा किती वेगळ्या असल्या तरी डॉक्टरला डोकेदुखीवर औषध देतांना भाषेचा अडसर येत असावा असे वाटत नाही किंवा रोग्याच्या हृद्याचे ठोके विशिष्ट भाषेतच ऐकू येतात असेही नसावे. शिक्षकांना पायथागोरसचा नियम आपआपल्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवायला अडचण येत नसावी. इतिहास भूगोल आपल्याच भाषेतून शिकले तरी मूळ संकल्पनांचा गोंधळ होत नसावा. इथे जातीचा विषय नव्हताच मुळात. भाषेच्या शुद्ध असण्याचा अट्टाहासाचा आहे. केळाच्या सालीपासून प्लास्टीक बनवण्याचा प्रयत्न करणाराला त्या प्रयोगाच्या कौतुकापेक्षा तो केळाला 'क्याळं' म्हणतो म्हणून हिणवलं जाणार असेल तर अशा देशात प्रगतीची स्वप्नं पाहणारांनी सरळ झोपून जावं. काही मूठभर लोकांना (पक्षी: नेहमीप्रमाणे सरकार आणि गळेकाढू विचारवंतांना) मेहनत करायचा कंटाळा येतो म्हणून कोट्यावधी जनतेने पिढ्यान् पिढ्या अनावश्यक मेहनत करावी आणि न्यूनगंडाखाली आयुष्य कंठावे हे बरोबर वाटत नाही. पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य, कुठल्याही ज्ञानशाखेचे असले तरी ते प्रमाण मराठीत उपलब्ध करावे. त्याचे सोप्या सामान्य भाषेत रुपांतर करावे. ते ज्ञान मुलांना त्यांच्या मातृभाषेतून त्यांच्या रोजच्या जिवनातल्या घटनांचा संदर्भ देऊन प्रदान करावे. हे वाटते तितके सोपे काम नसल्याने टाळल्या जात आहे. पण याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. अजून भोगणार आहोत. लाखो लोक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे असतील तर त्यातून काही हजार शास्त्रज्ञ मिळतात. त्या हजारोंमधून मूठभर अलौकीक बुद्धीमत्तेचे मिळतात. मूठभरांमधून कुणी न्यूट्न, आईंन्स्टाईन निपजतो. आपल्याकडे भाषेच्या अडचणींमुळे विज्ञान म्हणजे काहीतरी रॉकेट्सायंस आहे. ते इंग्रजी येणार्‍यांनाच कळते असा भ्रम आहे. त्यामुळे मुळातच मूठभर शास्त्रज्ञ मिळतात. न्यूटन, आईन्स्टाईन तर अप्राप्यच. इंग्रजी ही जागतिक पातळीवर आंतराष्ट्रीय व्यवहारांसाठी आवश्यक आहे हे ठीक आहे पण जागतिक पातळीवर आवश्यक असणारी इंग्रजी गावखेड्याच्या पातळीवरही का आवश्यक ठरते हे कुणी सांगत नाही. प्रत्येकालाच तीची सक्ती करून काय साधते? त्यामुळे इंग्रजीचा अट्टाहास हा ज्ञानभाषेसाठी होणे देशासाठी मारक आहे. ज्या वेगाने प्रगती व्हायला हवी तीला प्रचंड अडथळे आले आहेत. सोबतचः इंग्रजी येत नसणार्‍यांची खिल्ली उडवण्यामागे फक्त भारतीयच असतात असा अनुभव आहे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून न्यूनगंड वाटून घेणार्‍यांमधेही भारतीयच असतात असाही अनुभव आहे. बाकीचे लोक मोडके तोडके इंग्रजी येत असेल तर बोलतात व दुसरे त्यांना हसत नाहीत. हे इतके नैसर्गिक असते जसे मला बंगाली येत नाही तर कुणी बंगाली माझी खिल्ले उडवत नाही किंवा कुणाला कन्नड माणसाला मराठी येत नाही म्हणून मी त्याची खिल्ली उडवत नाही. कारण त्याचा आपण हुशारीशी संबंध लावत नाही. जे इंग्रजीच्या बाबतीत आपल्याकडे सर्रास होते.

In reply to by संदीप डांगे

यातील काही मुद्द्यांबाबत सहमत असलो तरी चर्चा एका विशीष्ठ विशयाकडे जात आहे त्यामुळे माझा पास अवांतर - चीनचा डॉक्टर स्पेनमध्ये जाउ शकत नाही कारण भाषा वेगळी....जे जातात त्यांना इंग्रजी येते अती अवांतर -
इंग्रजी येत नसणार्‍यांची खिल्ली उडवण्यामागे फक्त भारतीयच असतात असा अनुभव आहे
अतिशय सहमत

In reply to by संदीप डांगे

आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून शिक्षण देणार्‍या कॉन्वेंट्सना माझा कायम विरोध आहे.
तुम्ही विरोधाचं म्हणताय, मराठी बोलला म्हणून एका मुलाला पुण्यात एका कॉन्व्हेंट शाळेत झोडपला शिक्षकाने. काय आणि कसं करायचं यांना? विरोध हा फार सौम्य शब्द झाला. हे जे चालू आहे ना त्याचं गांभीर्य कळंत नाहीये इंग्रजीप्रेमात वेड्या झालेल्या मराठी माणसांना, आणि शासनाला. हे बघा

In reply to by वेल्लाभट

हे जे चालू आहे ना त्याचं गांभीर्य कळंत नाहीये इंग्रजीप्रेमात वेड्या झालेल्या मराठी माणसांना, आणि शासनाला.
सहमत. हे असं करू धजतात कारण खोट्या प्रतिष्ठेसाठी पालक आंधळे झाले आहेत म्हणून. अफूच्या धुंदीसारखी इंग्रजीची धुंदी चढली आहे लोकांना. त्याचे परिणाम बिचारी मुलं भोगतायत.

In reply to by संदीप डांगे

माझा मुळीच गोंधळ झालेला नाही.
मराठी 'भाषा' म्हणून इंग्रजी शाळेत शिकवली जातेच की. प्रश्न मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आहे. मग त्या मातृभाषेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असलं काही असेल तरी विद्यार्थ्यास अर्थाचे आकलन होणे, त्याला विचार करता येऊन तो समर्थपणे मांडता येणे हे जास्त आवश्यक आहे.
हे जरा नीटपणे बघू..... नंबर १. मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य, महत्व देण्यास मुळीच हरकत नाही. मी त्याच मताचा आहे. नंबर २. आता आला मुद्दा जी 'मराठी' भाषा शाळेत शिकवली जावी तिचा. तर ती शुद्ध असावी इतकीच अपेक्षा आहे. नेमाड्यांच्या म्हणण्यानुसार हा ब्राह्मणी वर्चस्ववाद आहे. आणि इतर बोलीभाषांनाही महत्व आहे. या आरोपाचा नक्कीच निषेध आहे. तेच मी प्रतिसादात म्हटलं की यात जातीला आणण्याची गरज नाही. नंबर ३. अर्थाचे आकलन होणे महत्वाचे आहे हे जरी मान्य असलं, तरीही ज्या माध्यमातून; म्हणजेच मराठीतून तो अर्थ पोचतो आहे, ते माध्यम उत्तम दर्जाचं असावं, ती भाषा शुद्ध असावी यात काय चुकीचं आहे? तेंव्हा माझ्या मते माझा घोळ झालेला नाही. आणि पेन भेटत नाही :)

In reply to by वेल्लाभट

तुमचे पहिले दोन्ही मुद्दे संपूर्णपणे मान्य आहेत. प्रश्न तिसर्‍याबद्दलच आहे. माध्यम 'उत्तम दर्जा'चे असावे हा जो आग्रह आहे त्यामुळे माध्यम महत्त्वाचे की ज्ञान असा प्रश्न उभा राहतो. 'भाषा शुद्ध असावी' या अपेक्षेत कुठेतरी वर्गसंघर्ष जाणवतो. 'आमची भाषा शुद्ध, तुमची अशुद्ध' असा कलह जाणवतो. जातीचा प्रश्न तर अजिबात येत नाही कारण शुद्ध भाषेचा आग्रह धरणार्‍यांच्या भाषेवरही भौगोलिक भाषावैविध्याचा प्रभाव जाणवतोच. त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध असण्यापेक्षा 'प्रमाण' असावी अशी माझी धारणा आहे. बोलीभाषांमधून जे काही ज्ञान संकलीत होईल ते मराठी प्रमाणभाषेत रुपांतरीत करून सर्वांना समान पातळीवर उपलब्ध करून देण्यास मदत होईल. तेच प्रमाणभाषेतलं ज्ञान आपआपल्या बोलीभाषेत पुन्हा रुपांतरीत करून वापरता येइल. गाडगेबाबा हे याचं एक उत्तम उदाहरण आहेत. ते उच्च तत्त्वज्ञान सामान्य बोलीभाषेत, सामान्य लोकांच्या आकलनक्षमतेप्रमाणे मांडून त्यांच्या विचारात बदल घडवत असत. हीच पद्धत इतर वैज्ञानिक, तांत्रिक विषयांसोबत वापरता येइल. पण भाषा 'शुद्ध किंवा विशिष्ट असावी' म्हटले की आधी त्या माध्यमाचा पूर्ण अभ्यास आणि आकलन होण्यातच अर्धा मेंदू थकून जातो. त्यानंतर त्यातून सांगितलेलं ज्ञानाचे आपल्या भाषेत विश्लेषण करून विषयाचे समग्र आकलन होईस्तोवर मेंदूचा पार भुगा होतो. त्यापेक्षा मातृभाषेत थेट विचारविनिमय करता येत असल्याने पूर्ण लक्ष संकल्पना समजून घेण्याकडेच राहील. यास्तव ज्ञानग्रहणाचे माध्यम मातृभाषा असावी, 'शुद्ध भाषा' असू नये असे मत आहे. असो. चला, एक किस्सा सांगतो. मी मूळ विदर्भातला. भाषेवर हिंदीचा प्रभाव. जेजेमधे अगदी सुरवातीच्या १०-१५ दिवसांतली घटना. एका कारकुनाकडून काहीतरी पत्र/पावती घ्यायला गेलो. बोलता बोलता त्याला म्हटले, 'ठीक आहे, जसे असेल तसे देऊन द्या'. तो बहुधा कोकण भागातला पण जन्म मुंबईत गेलेला, पावती हातातच ठेवून मला चिडवत म्हणाला, "अरे, तुला देऊन परत काय देऊ". मला काही समजला नाही त्याचा रोख. तसा तो बोलला, "अरे जरा 'शुद्ध' बोलत जा, 'देऊन द्या' काय?". मग माझी ट्युब पेटली. म्हटले, ""महाशय, जसे तुम्ही मुंबईत शुद्ध भाषेत देऊन टाक, घेऊन टाक म्हणता तशाच शुद्ध भाषेत आम्ही देऊन द्या म्हणतो." असेच भाषेवरून शिक्षकांकडून चिडवल्या गेल्यामुळे आमच्या एका सिनिअरने 'जांगळबुत्ता' ह्या अस्सल वर्‍हाडी शब्दावर आपले जाहिरात कॅम्पेन बनवून ते असाइन्मेंट म्हणून सबमिट केले होते.

In reply to by संदीप डांगे

त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध असण्यापेक्षा 'प्रमाण' असावी अशी माझी धारणा आहे
यू सेड इट. मी तेच म्हणतोय. प्रमाण भाषेवर एकमत का होऊ नये हे मला कळत नाही. यात जात-पात, प्रांत, प्रदेश येतच नाहीत; आणि न येवोत. पण मग पुण्याचं मराठी प्रमाण, की विदर्भाचं, की खांदेशचं, की कोकणचं... हे व्हायला लागलं तर मग अंतच नाही या गोष्टीला. A logic can be agreed to. A consensus can be arrived at. Hopefully in an unbiased way and with no pre-conceived notions. असो. हा आपला प्रश्न नव्हे. मराठी कुठली, आणि कशी शिकवावी हे शिक्षण मंत्रालय ठरवणार... तुम्ही आम्ही फक्त मिपावर बोलू शकतो. पण नेमाड्यांप्रमाणे सुरुवातच हे ब्राम्हणी हे कोकणी हे वैदर्भीय अशा जनरलायझेशन्स नी झाली की विषयच संपला मग.

In reply to by वेल्लाभट

म्हणून मी आधीच म्हटलं की भावनेच्या भरात टीनपाट प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे लोक काहीबाही बरळतात आणि मुद्द्याला नको ते फाटे फुटतात. याच भाषणात त्यांनी समोर शेतकरी आहेत हे पाहून अट्टल राजकारण्यासारखं शहरी नागरिकांवर 'शेतकरी कर' लावावा सारखे मुक्ताफळे उधळली. मला नेमकं नेमाडेंचं प्रोफेशन कळलेलं नाही. ते नक्कीच लेखक आहेत की राजकारणी. हे लोक बोलून जातात, ऐकणार्‍याच्या मनात ठिणगी टाकून. असो. मराठीची स्वत:ची अशी 'प्रमाण' भाषा आहे. ती टिकवलीच पाहिजे. प्रांतांनी आपापले अहंकार बाजूला ठेवले तर ती सगळ्यांना विना-अडथळा समजण्यासारखी आहे. निदान इंग्रजीसारखी डोकेफोड आणि न्यूनगंडाचा प्रादुर्भाव करणारी तरी नक्कीच नाही. तरीसुद्धा बोलीभाषेवरून कुणाचीही हेटाळणी करणे याला तीव्र विरोध आहे. पेन भेटलं काय किंवा दगडं मारली काय, आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले नसले की वेगळे वाटते पण ते चूक नसते. आपल्यासारखे नाही म्हणून इतरांना हिणवणे हे माणुसकीहीन वर्तन आहे. मला व्यक्तिशः मराठीच्या सगळ्या बोलीभाषा खूप आवडतात. एकाच शब्दाचे वेगवेगळे उच्चार, लय, हेल, एकाच वस्तूला वेगवेगळी नावं, अर्थ, संदर्भ हे सगळं गोड वाटतं. त्यामुळेच मराठी भाषेचा अभिमान वाटतो कारण एवढं वैविध्य आपल्याला मिळालंय. केळी म्हणो वा केळं वा क्याळं, हे शुद्ध ते अशुद्ध अशी लेबलं लावू नये. कारण प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला काळाचा शाप आहे. बाराशे वर्षाआधी एखादा शब्द कसा उच्चारला जात होता याचा आपल्याकडे कोणताच पुरावा नाही. त्यामुळे आमचाच उच्चार पूर्ण शुद्ध आहे हा निव्वळ अहंकार वाटतो. त्यामुळे ब्राह्मणीवर्चस्व सारखे आरोप करायला नेमाड्यांसारख्यांना कारण मिळतं.

In reply to by संदीप डांगे

तरीसुद्धा बोलीभाषेवरून कुणाचीही हेटाळणी करणे याला तीव्र विरोध आहे.>> ह्याला फार अनुमोदन. नुसते मराठीच काय सगळ्या जगात असेच आहे. अगदी इंज्राजाच्या देशातच इंग्लंड सोडला तर स्कॉटिश आणि वेल्श भाषा पण वेगळ्या आहेत. जसे उत्तरेला जाऊ तशी इंग्लिश बरीच बदलते. फाईलला फील आणि फाईन ला फिन म्हटलेले स्कॉटलंडमध्ये आईकलेले आहे. कोणी हसत नाही. स्कॉटिश लोक बोलायला लागली आणि सवय नसेल तर ३०% संभाषण डोक्यावरून जाते.