Skip to main content

इवलेसे बीज

लेखक शुचि यांनी सोमवार, 15/04/2013 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा "ईंटरॅक्टीव्ह" रुपाचा असून, अतिखाजगी गोष्टींत संदिग्धता राखून प्रतिक्रिया देता आल्यास उत्तमच. आपल्यापैकी प्रत्येकाने आवडो न आवडो, आयुष्यात चढ-उतार अनुभवले आहेत. पैकी "लाईफ डिफायनिंग" असे कोणते क्षण आपल्याला सांगता येतील? म्हणजे काही निर्णय आपण घेतो ज्यांचा परीणाम तेव्हा जाणवत नाही पण कालांतराने खूप प्रभाव जाणवतो. आपल्या एखाद्या निर्णयाने, अन्य व्यक्तीने केलेल्या कृतीने किंवा त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेने -आयुष्याला चढती अथवा उतरती कळा लागली असे प्रसंग, निर्णय, क्षण येथे जरुर शेअर करावेत. "इवलेसे बीज लावियले द्वारी, तयाचा वेलु गेला गगनावरी" असे हे प्रसंग, बी सारखे सुप्त व अतिक्षुल्लक असतात पण संपूर्ण आयुष्यावर अतोनात परीणाम करतात. विवाह होणे, मूल होणे आदि घटना तर दूरगामी, मूलगामी परीणाम करतातच पण या झाल्या कॉमन घटना. काही तुमचे फक्त तुमचे असे प्रसंग असतीलच की. अशा प्रकारचे काही प्रसंग जरुर शेअर करावे. माझ्यापासून सुरुवात करते. माझ्या सामान्य आयुष्यात तीन असे प्रसंग आहेत. पैकी एक अत्यंत खाजगी व वेदनामय आहे. २ शेअर करते. (१) काही वर्षांपूर्वी मी खूप गंभीर आजारी होते. त्या काळात मी वेड्यासारखी मानसिक आधार शोधत होते. नवरा व आई-वडील खूप सावरत होता पण "अधिभौतिक" असा आधारही खूप निकडीचा होता. मी स्वयंप्रेरणेनेच रोज "अमोघ शिवकवच" वाचन सुरु केले आणि खूप फायदा तर झालाच, होतोच आहे पण "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" अशी काहीशी अध्यात्मिक शिस्त लागली. या वाचनाचा उत्तम परीणाम, शांती आजही मला दिसते. खरं तर आपली कोणतीही साधना चारचौघात सांगू नये (दृष्ट लागते, साधनेत कमतरता येत) असे म्हणतात पण माझा त्यावर विश्वास नाही. (२)रोहीणी डाके बाईंनी "गणित चांगले असण्याबद्दल केलेल कौतुक". त्या ४ प्रेमळ, प्रोत्साहनपर शब्दांनी मला कुठच्या कुठे पोचविले. गणिताची अतोनात गोडी लागली, ध्यास लागला. मला जे काही चांगले शिक्षक मिळाले त्यापैकी या एक.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3656
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मनुष्य आणि आयुष्य हया मध्ये मला प्रचंड कुतूहल आहे - येथे भारोघोस पिक निघणार ! वाह. माझ्या पहिल्या प्रोजेक्ट ला मी डेन्मार्क ला गेलो होतो. पहिलाच जॉब / पहिला प्रोजेक्ट / पहिला परदेश दौरा अशी सगळी नवी नवलाई होती. १ महिन्यातच घरची आठवण , हवामान , कामाचा ताण हया मुळे मी ब्रेक डाऊन झालो. ती माझी मनस्थिती एका अय्यर नावाच्या माणसाने ओळखली आणि मला सतत उत्तेजन दिले. त्या कठीण काळी "परत परदेशी यायचे नाही" हे जवळ जवळ रोज मी मनाशी घोकत असे. पण त्या रामानुजम अय्यर मुळे मी सावरलो आणि पुढे "परदेश" हा ख्याल / बंदिशितल्या परदेस इतका आवडू लागला. त्या देव माणसाने मला केलेला "सपोर्ट" मी कधीही विसरणार नाही.

In reply to by तर्री

बापरे संपूर्ण आयुष्याची घडीच बदलली होती हो. कोणीही भांबावून जाईल. हवामान, खाणेपीणे, जागा सर्वांतच फरक आला असेल. होय मानसिक स्थिती नाजूक असताना, उत्तेजन, सकारात्मक प्रोत्साहनाची अतोनात गरज असते. अय्यर हे खरच देवासारखे भेटले आपल्याला.

साठीनंतर जगलो वाचलो तर लिहूच. ;) सध्या भरपूर कामं बाकी आहेत त्यात अजून शिकणं संपलेलं नाहीच्च. उगाच मागे वळून बघायचं म्हटलं की त्रास होईल. :(

In reply to by प्यारे१

उगाच मागे वळून बघायचं म्हटलं की त्रास होईल.
:( मन मोकळं कारावसं वाटलं तरच करा. त्रास होऊ नये ही सदिच्छा.

रोहीणी डाके बाईंनी "गणित चांगले असण्याबद्दल केलेल कौतुक". त्या ४ प्रेमळ, प्रोत्साहनपर शब्दांनी मला कुठच्या कुठे पोचविले. गणिताची अतोनात गोडी लागली, ध्यास लागला. मला जे काही चांगले शिक्षक मिळाले त्यापैकी या एक. >> अरे वा. आमच्याबाबतही हेच. त्यांच्यामुळेच गणिताशी गट्टी झाली आपली. मग 'गणिताला काय डिमांड आहे?' या मित्रांच्या, सहाध्यायांच्या आणि मुख्य म्हणजे तीर्थरूपांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यातच राहिलोय आजपर्यंत. गणिताने 'एकच प्रश्न, एकच प्रॉब्लेम एकाहुन अधिक रीती वापरून सोडवता येतो. तेव्हा हीच रीत काय ती बरोबर बाकीच्या चुकीच्या.' (!!!! ;) ) हा व्यक्तिमत्त्वातला अतिरेकीपणाही काढून टाकला.

In reply to by रमताराम

गणिताने 'एकच प्रश्न, एकच प्रॉब्लेम एकाहुन अधिक रीती वापरून सोडवता येतो. तेव्हा हीच रीत काय ती बरोबर बाकीच्या चुकीच्या.' (!!!! ) हा व्यक्तिमत्त्वातला अतिरेकीपणाही काढून टाकला.
वा!!! ये हुई ना बात. मला "गणित" येते असे नाही पण भीषण आवडते. भीषण हा शब्द वापरणे डाके बाईंची सवय :) मला खूप हसू यायचे. आम्हाला एक सर होते -दातार नाही पण कोणीतरी मराठीच सर होते. त्यांनी गणितावर एक अतिशय काव्यात्मक लेख लिहीला होता. म्हणजे गणितातील काही विषय कोणालाही अतिरीक्त सलगी (फ्लर्टींग) करु देतात पण अतिशय मोहक आणी सुंदर परंतु शिष्ठ अशी "नंबर थिअरी" कोणाही ऐर्‍यागैर्‍याला जवळ फटकू देत नाही असा काहीसा आशय होता. खरं आहे. "नंबर थिअरी" चा डौल काही न्याराच , अक्षरक्षः और वाटलेला.

In reply to by शुचि

"नंबर थिअरी" चा डौल काही न्याराच , अक्षरक्षः और वाटलेला.
पूर्ण सहमत. साला कधीपासून अल्जेब्रैक नंबर थिअरीत घुसावे म्हणतोय, नीट योग यायला काही तयार नाही. साधी नंबर थिअरीसुद्धा लै बाप / आई आहे हे अर्थातच हेवेसांनल. गणिताची अजून कुठलीही शाखा इतकी इंट्यूटिव्ह आणि कलेसाठी कला वगैरेसारखी नाही. सिंप्लि लव्ह इट :)

धागाकर्ती शुचि यांसः आत्तापर्यंत घडलेल्या अशा काही घटना आहेत. पण तुमच्यासारखे व्यक्तिगत गोष्टी शेअर करण्याचे माझ्यात डेअरिंग म्हणा काही म्हणा म्हणा अज्जीच नाहीये. सबब तुमच्या डेअरिंगला आणि सकारात्मक विचार करण्याला सलाम करतो आणि माझा प्रतिसाद संपवतो. इतकेच :)

उदास..भकास..निरर्थक आणि खचलेल्या मनाने मी आयुष्य जगत होतो. अशातच मला मिपाचा आधार मिळाला आणि... उरलेल्या आयुष्याचे पण वाटोळे झाले.

आपली कोणतीही साधना चारचौघात सांगू नये (दृष्ट लागते, साधनेत कमतरता येते. ) नवीन कळले पण खरे आहे असे वाटते. ( नुकताच याचा अनुभव घेतल्याने :) )

शाळेपासुन ते कालेज संपेपर्यंत सगळ्या टीचरांनी कशातच गोडी राहणार नाही याची कसुन खबरदारी घेतली. अध्यात्माचं कै वाचायला घेतलं की प्रचंड करमणुक तरी होते नैतर वैताग वाढतो.

माझं जीवन अमुलाग्र वगैरे बदललं नाहि, पण एक क्षण असा आला कि त्यातलं मानसीक स्थित्यंतर माझ्या आठवणीत कायमचं कोरलं गेलं. खुशालचेंडु म्हणतात तसलं बॅचलर लाईफ चाललं होतं(आजही मी तसाच आहे म्हणा). लग्नानंतरही काहि फरक पडला नाहि त्यात. मग एक दिवस बायकोने गुड न्युज दिली :). आम्हि दोघंही फार खुशीत होतो... पण तरिही आमचं चेंडुत्व तसच्यातसं होतं. एका रात्री निवांत लोळत पडलो होतो.. आणि कसं काय कोण जाणे अच्यानक "अबे.. मी बाप बनणार आहे..." अशी एक खुप सिरीयस (टेन्शनवाली नाहि.... पण प्रखर, एकदम लख्ख) भावना मनात चमकुन गेली. ति भावना माझ्या खुशाल चेंडुत्वापासुन पूर्णपणे भिन्न होती. ते क्षणीक मानसीक स्थित्यंतर मला अजुनही अगदी स्पष्ट आठवतं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

सही है!!!

१.नागपूर मधील एक समाज कार्यकर्त्या बाई ( मला वाटते कामाला बाई होस्पेट ) यांनी आपल्या वैधव्याचा वाढदिवस साजरा केला होता."वैधव्य आले नसते तर मी सामाज्कार्याकडे कदापि वळले नसते , वैधव्य ही त्यांच्यासाठी इष्टापत्ती होती. " तो त्यांच्या आयुष्यामधील कलाटणी देणारा क्षण होता. २.पु.लं.देशपांडे यांचे सुरवातीचे जीवन विपरीत परिस्थितीत जात होते. बटाट्याची चाळ यशस्वी चे प्रयोग हा एक महाराष्ट्राच्या सृजनेतेचा सुंदर क्षण होता. ३. भाजप चा १९८४ साली दारुण पराभव झाला. अडवानीजी भारतभर पक्ष संघटना उभारत होते. नाशिक च्या राज्य अधिवेशनात त्यांनी "प्रमोद महाजन " नावाच्या तिशीतील फर्ड्या वक्त्याला ऐकले आणि राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली. प्रमोद महाजन त्या नंतर २० वर्षे उत्कर्ष आणि संघर्षाच्या मार्गावर चालत राहिले. ४.पं. भीमसेन जोशी घर सोडून गुरु मिळवण्यासाठी पंजाब पर्यन्त भटकले. शेवटी जवळच कुंदगोळला "सवाई गंधर्व " गुरु भेटले. हया गुरुभेटने त्यांचे आयुष्य बदलून गेले.

सात वर्षांच्या विलंबानंतर, पुन्हा शिक्षण सुरू केलं तेंव्हा यशाबद्दल मनावर प्रचंड दडपण होतं. परंतु, 'तू जर ठाम निश्चय केला असशील तर कांहीच अवघड नाही' ह्या, मित्राच्या एका वाक्याने आत्मविश्वास वाढवला. शिक्षण पूर्ण केलं. तो भावनिक आधार अत्यंत महत्वाचा, आयुष्याला वळण देणारा ठरला. क्रॉम्प्टन ग्रीव्हजची सुरक्षित नोकरी सोडून, बेभरवशाच्या आखाती प्रदेशात नोकरी स्विकारली, त्याने आयुष्याला वेगळे वळण दिले. पुढे, नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाचा कठीण निर्णय घेतला तिथून आयुष्याला अजून तिसरेच वळण लाभले. आता, निवृत्ती केंव्हा आणि कुठल्या परिस्थितीत घ्यावी? ह्या अत्यंत जीकरीच्या निर्णय प्रक्रियेच्या वळणावर उभा आहे. आयुष्यातील, आजपर्यंतचे, सर्व निर्णय उशीराने परंतु योग्य घेतले आहेत (असे वाटते आहे) त्या प्रमाणे हा निर्णयही योग्यच ठरेल अशी आशा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

तो भावनिक आधार अत्यंत महत्वाचा, आयुष्याला वळण देणारा ठरला.
आपण कर्कराशीचे लोक भावनाप्रधानच!!