Skip to main content

नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण

लेखक विकास यांनी बुधवार, 03/04/2013 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते. तर झाले असे: ९० च्या दशकात (९३ साली) नोव्हार्टीस या स्विस कंपनीने ल्युकेमियाच्या विशिष्ठ प्रकारांवर चमत्कार वाटावा असा उपाय ठरणारे औषध शोधून काढले. त्याला जगभरातून पेटंट मिळाले. भारतात २००५ साला पर्यंत औषधांसाठी पेंटंट हा प्रकारच नव्हता. २००५ साली भारताने तसे पेटंट देणे मान्य केले पण ते केवळ १९९५ सालानंतरच्या औषधांसाठीच. तो पर्यंत ज्या औषधांची पेटंटस कालानुसार संपली असतील त्यांचे जगभरातील कायद्याने मान्य असलेले अनुकरण करणे ज्याला "जेनेरीक ड्रग्ज" म्हणले जाते अशी औषधे करणे चालू होते. या खटल्यासंदर्भात चर्चेत असलेले नोव्हार्टीसचे ब्रँडनेम औषधासाठीचा वार्षिक खर्च हा $७५,००० इतका होता तर तेच औषध त्याच क्वालीटीने तयार केलेले भारतात वर्षाला $२५०० इतक्यालाच पडत होते /पडते. अर्थात हा फरक केवळ गरीबांसाठीच महत्वाचा नव्हता तर मध्यमवर्गिय/उच्च मध्यमवर्गियांसाठी पण महत्वाचा आहे. पण जेंव्हा जेनेरीक ड्रग्ज बाजारात असतात तेंव्हा ब्रँड नेम औषधांचा तोटा होतो. मग त्यावर उपाय म्हणून ते थोडाफार बदल करून नवीन औषध तयार करतात आणि पेटंट फाईल करतात जेणे करून जेनेरी़क ड्रग बंद करावे लागते. असे पेटंट अमेरीकेत मान्य झाले. कदाचीत इतरत्र देखील विकसीत राष्ट्रांमधे मान्य झाले असेल. पण आपल्या पेटंट ऑफिसने ते मान्य केले नाही. त्याचा परीणाम म्हणून खटला चालू होता. आज निकालात आपल्या सुप्रिम कोर्टाने असले लहानसहान फेरफार केलेल्या औषधास परत पेटंट (एव्हग्रिनींग) करायची संमती मिळणार नाही असे सांगितले. अर्थातच त्यामुळे नोव्हार्टीसचे धाबे दणाणले आहे. कारण भारतीय कंपन्या कदाचीत ते औषध भारत आणि इतर विकसनशील/अविकसीत राष्ट्रात विकू शकतील. त्यामुळे त्यांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे संशोधनास कमी वाव मिळू शकेल... मला वरकरणी असलेल्या माहीतीवरून हा निकाल योग्य वाटला. पण आपल्यालादेखील सुप्रिम कोर्टाचा निकाल योग्य वाटतो का? मला जरी योग्य वाटला असला तरी त्याचे कारण सामाजीक आहे. पण त्यामुळे आपण कॉपीबाजच रहातो याची खंत देखील आहे. त्या संदर्भात नोव्हार्टीस जे म्हणते ते बर्‍याच अंशी खरे वाटते. एखादे औषध संशोधन करून, त्याच्या ट्रायल करून, बाजारात आणण्याचा कालावधी बराच मोठा असतो, त्यात नुसताच एखाद्या कंपनीचा आणि सरकारचा पैसा गुंतलेला नसतो तर अनेकांची अनेक वर्षांची (कधी कधी खरेच १२+ वर्षांची) तपश्चर्या असते. त्यातून फायदा निर्माण करून ते परत त्या गुंतवणु़कीचा उपयोग नवीन संशोधनासाठी करतात... पण मग जे जेनेरीक ड्रग्ज तयार करतात ते मात्र या कसल्याच भानगडीत पडत नाहीत. फक्त धंदा करणे हाच उद्देश असतो. त्यातून (विशेष करून या विशिष्ठ उदाहरणात) अनेकांना फायदा होऊ शकतो हे खरे आहे, पण बाकी डेव्हलपमेंटच काय?

वाचने 31995
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by विकास

ओके . आपला मुद्दा लक्षात आला एक छोटीशी शंका :
माहिती जर अस्तित्वात असली तर त्याला कितीकाळ नवीन म्हणावे याला मर्यादा आहेत. सर्वसामान्य पणे २० वर्षांचा कालावधी सर्वांनीच ग्राह्य धरला आहे.
>>>हेच इतर बाबतीतही लागु पडते का ? उदाहरणार्थ समजा मला कोण्या साहित्यिकाचे २० वर्षापुर्वील काही साहित्य मिळाले तर मी ते माझ्या नावावर खपवु शकतो का ? किंव्वा मला कोण्या गणतितज्ञाचा / संशोधकाचा एखादा २० वर्ष जुना प्रबंध मिळाला तर मी तो थोडेफार फेरफार करुन माझा म्हणुन चालवु शकतो का ? किंव्वा कोण्या प्रशिध्द संगीतकाराच्या जुन्या चालीत थोडेफार फेर्बदल करुन ती आपण लावलेली चाल आहे असे केलेले चालते का ??

In reply to by नितिन थत्ते

पुस्तकावर नाव दुसर्‍याला लावता येत नाही. पण पुस्तकाचे उत्पादन दुसरा करू शकतो (रॉयल्टी देऊन).

In reply to by नितिन थत्ते

पेटंटचा कालावधी संपला, याचा अर्थ त्याचा संशोधक बदलता येत नाही. केवळ त्या पेटंटच्या अंतर्गत जे काही प्रॉडक्ट असेल (येथे औषध) त्याचे उत्पन्न हे त्या संशोधनकर्त्यास (अर्थात येथे कंपनीस) पैसे / रॉयल्टी न देता करता येऊ शकते. पुस्तकाच्या बाबतीत नितिन यांनी म्हणल्याप्रमाणे कॉपिराईटच्या काळात रॉयल्टी देऊन प्रकाशन करू शकेल पण एकदा का कॉपिराईटचा कालावधी (मला वाटते साधारण ४० वर्षे) संपला की कोणिहीते प्रकाशीत करू शकते अथवा आजच्या काळात संस्थळावर ठेवू शकते. जसे गुगलबुक्सने केले आहे.

In reply to by विकास

कन्फ्युजन क्लीयर केल्याबद्दल धन्यवाद विकास , थत्तेजी ! :) ( केवळ त्या पेटंटच्या अंतर्गत जे काही प्रॉडक्ट असेल (येथे औषध) त्याचे उत्पन्न हे त्या संशोधनकर्त्यास (अर्थात येथे कंपनीस) पैसे / रॉयल्टी न देता करता येऊ शकते. >>>हे काही कन्विन्स होत नाहीये , न्याय्य वाटत नाहीये ...असो ...इथे अवांतर आटोपतो )

In reply to by प्रसाद गोडबोले

कुणी कितीही परिणामकारक औषध संशोधित केले अन त्याचे पेटंट घेतले तरीही त्या संशोधनासाठी जे ज्ञान वापरले जाते ते पूर्वापार चालत आलेल्या संशोधनापासून मिळालेले असते. असे ज्ञान मुक्तपणे उपलब्ध असते. त्यामुळे २० वर्षांपर्यंत रॉयल्टीद्वारे उत्पन्न व नफा मिळाल्यावर सदर संशोधन इतरांसाठी खुले होणे हे संयुक्तिकच आहे. अनेकदा असेही होते की एकाच विषयावर एकापेक्षा अधिक संस्था संशोधन करीत असतात. कुणाचे संशोधन अधिक काळ चालले अन पेटंट इतर कुणी मिळवले तर उशिराने संशोधन संपवणार्‍या नेहमीसाठी अन्याय व्हायला नको असेही काहीसे असेल. हे सर्व नियम असे का असतात यावर मिपावर पूर्वी लिखाण झाले नसल्यास त्या क्षेत्रातील जाणकारांना विनंती आहे की त्यांनी वेळात वेळ काढून यावर लिहावे.

चांगली चर्चा आणि उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्स. (फार्मा सेक्टर पेटंटपासून पेटंटपर्यंत लोकसत्ताच्या एका लेखाचा दुवा धाग्यात डकवून ठेवतो) -दिलीप बिरुटे

चांगला विषय आणि चर्चा. धन्यवाद. एकीकडे एव्हरग्रीनिंग रोखणे, आणि दुसरीकडे मर्यादित मुदतीचे पेटंटचे संरक्षण या दोहोंचा समतोल हवा, खरे.

नुकतीच खालिल बातमी वाचली अन या मतप्रदर्शनामागे भारतीय धोरणकर्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असावा अशी शंका वाटली. यूस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे मत - गुंतवणूकीवर परिणाम http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=0&section=videsh

In reply to by श्रीरंग_जोशी

त्या बातमीतील खालील वाक्य रोचक आहे: 'नोव्हार्टिस'च्या कॅन्सरविषयक औषधाला चीन, रशिया, तैवान यासारख्या ४० देशांनी पेटंट दिले असून, भारतामध्ये याला विरोध होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असेही मत सोमर्स यांनी व्यक्त केले. जर खरेच या (revised) औषधास ४० देशांचे पेटंट मिळाले असेल तर विचार करायला हवा.
नुकतीच खालिल बातमी वाचली अन या मतप्रदर्शनामागे भारतीय धोरणकर्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असावा अशी शंका वाटली.
दबाव कुणावर आणता येतो? ज्याला गरज असते त्याच्यावर असमर्थ असल्याने... दबाव कोण आणते? - जो गरज भागवू शकतो तो, स्वतःचे सामर्थ्य वाढवण्यासाठी... त्यामुळे ह्यात नवीन काही नाही. आपण जर आपले सामर्थ्य वाढवले तर कुणाची हिंमत आहे? पण सामर्थ्याची गंमत अशी असते की ते स्वतःचे स्वतः वाढवायचे असते, केवळ अनुकरण करून वाढवता येत नाही. थोडक्यात या संदर्भात, जो पर्यंत आपण मुलभूत आणि व्यावहारीक (practical/applide) संशोधन हे आपल्या धंद्यातील धोरणाचा भाग करत नाही, तो पर्यंत असेच चालणार.

In reply to by विकास

प्रतिसादातल्या (दबावाचे राजकारण) मुद्द्याबरोबर पूर्णपणे सहमत. यावरून आठवले - स्व. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांना एका पत्रकारपरिषदेमध्ये एका पत्रकाराने जरा अडचणीत आणणारा प्रश्न विचारला होता. तो असा की पाकिस्तान इतर राष्ट्रांच्या मदतीन क्षेपणास्त्र व इतर लष्करी शस्त्रास्त्रांमध्ये जोरदार प्रगती करत असताना भारताची प्रगती मंदावलेली दिसत आहे. त्यावर रावांनी उत्तर दिले या बाबतीत पाकिस्तान व आमच्या मुलभूत फरक असा आहे की त्यांचे तंत्रज्ञान उधार उसनवारी ने इकडून तिकडून आणण्यात आले आहे जे प्रत्यक्ष गरजेच्या वेळी परिणामकारकपणे काम करेल की नाही याची कसलीच खात्री नाही. याऊलट भारताचे या प्रकारच्या संशोधनाबाबतीत स्वयंपूर्ण बनण्याचे धोरण आहे. गरज पडेल तेव्हा स्वतः संशोधित केलेल्या शस्त्रात्रांचा आम्ही नक्कीच परिणामकारक वापर करू शकू. इतरांच्या मदतीवर अवलंबून रहायची गरज पडणार नाही.

प्रिंटाऔट काढुन ठेवावी एवढी उत्तम चर्चा. सर्वांनाच खुप खुप धन्यवाद. माझा एक मित्र या क्षेत्रात आहे, पुढच्या आठवड्यात त्याला भेटणार आहे, त्यानंतर मला जे काही समजेल ते इथं लिहिन पुन्हा.

न्यायालयाचा निर्णय काही बरोबर वाटत नाही. भारतीयांना सर्व काही फुकट पाहीजे. दुसर्‍यांनी डोके चालवायचे, कष्ट करायचे आणि भारतीयांनी ते फुकटात वापरायचे. सर्व तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेच आहे.

In reply to by सुबोध खरे

EU, Australia, Canada may follow India's Patent Law
चांगली बातमी आहे.
भारताने जे केले ते आता इतरांना का करावेसे वाटते ?
चर्चा प्रस्तावात तसेच माझ्या आणि इतर अनेकांच्या प्रतिसादात आल्याप्रमाणे, दोन बाजू असलेले नाणे आहेत... मुद्दा इतकाच आहे की केवळ बहुराष्ट्रीय म्हणून, एव्हरग्रिनिंग म्हणून अथवा अजून कशामुळे, पेटंट रिव्हिजनला मान्यता न देणे हा एक मुद्दा झाला आणि या संदर्भात योग्यच निर्णय आहे (असे माझे मत आहे). पण दुसर्‍या बाजूचा भारतीय म्हणून विचार करणे महत्वाचे आहे - ते म्हणजे कंपन्यांनी आर अँड डी मधे खर्‍या अर्थाने उतरणे, नुसतेच "रीलॅक्स अँड डिस्कस" नको... :)

बौद्धिक संपदा बद्दल गळा काढणार्यांचे वास्तव प्रत्यक्ष किती खर्च नोव्हारटीस ने संशोधनासाठी केला त्याचा लेखाजोखा. फक्त १० टक्के पैसे संशोधनात त्यांचे खर्च झाले आणि ९०% हे वेगवेगळ्या अमेरिकी सरकारी संस्थांचे आहेत. WHO PAID FOR GLIVEC R&D? Funding source for Brian Druker's lab 50% National Cancer Institute — public 30% Leukaemia and Lymphoma Society — public 10% Oregon Health and Science University — public 10% Novartis — private Novartis bore cost of three Phase II trials with 1,028 patients Estimated cost of these trials — $38mn to $96mn The $96mn includes hefty overheads and the cost of capital Novartis sales for Glivec in 2012 — $4.7bn or $390mn per month — over $100mn every 13 days http://timesofindia.indiatimes.com/home/stoi/special-report/Busting-the…?

एक शंका आहे. अ नावाचे औषध पूर्वी पेटंट केले गेले होते. समजा त्याची मुदत उद्या संपणार आहे. त्याचे थातुरमातुर व्हेरिएशन ब नावाने कंपनीने काढले. त्या ब औषधाला पेटंट दिले तरी अ हे औषध उद्यापासून पेटंटमुक्त होईल ना? मग अ हे औषध जेनेरिक उत्पादक स्वस्तात बनवून विकू शकतील ना?

In reply to by नितिन थत्ते

रक्त दाबावर इलाज म्हणुन एक औषध (एनालाप्रील?) असच विकण्यात येतं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तसं असेल तर "एव्हरग्रीनिंग" हा शब्द का वापरला जातो? आणि अ मुक्त होणार असेल तर एनजीओजना काय प्रॉब्लेम होता? कंपनीचा क्लेम जर अ पेआ ब हे वेगळे आहे असा असेल तर अ मुक्त व्हायला हवे. कंपनीचा क्लेम ब हे अ सारखेच आहे असा असेल तर मग पेटंट मिळू नये.

In reply to by नितिन थत्ते

मला संपूर्ण माहिती नाही, पण जालावर डोकावून वघितले त्यावरूनः थोडक्यात "एव्हर्ग्रिनिंग म्हणजे पेटंट संपायच्या आधीच त्यात केलेल्या काही सुधारणा. फार्मा कंपन्यांसाठीच्या पेटंट्स साठी हा शब्द वापरलेला दिसला. त्यावरून असे असावे की एव्हर्ग्रिनिंगमुळे नव्याने पेटंट न करता, आहे तेच पेटंट परत नवीन (रिन्यू) होत असावे. आणि हे कायद्याने शक्य असावे. (जरी एव्हर्ग्रिनिंग म्हणून संकल्पना कायद्यात नसली तरी).

In reply to by विकास

फार्मा क्षेत्रात पेटंट दोन प्रकारचे असते - औषधी रेणूंचे (ड्रग पेटंट) आणि उत्पादन पद्धतीचे (प्रोसेस पेटंट). इथे आपण ड्रग पेटंटचा विचार करू. समजा, मी चहा या पेयाचे पेटंट घेतले*, तर मला मिळणारे पेटंट "चहा, दूध, साखर योग्य प्रमाणात मिसळून बनणारे पेय" याचे असेल. आता उद्या हे पेटंट संपणार आहे हे जाणून मी "चहा, दूध, साखर आणि आलं योग्य प्रमाणात मिसळून बनणारे पेय" असे पेटंट घेतो. म्हणजे मूळ "चहा, दूध, साखर मिश्रण" याचं पेटंट शाबूत राहिले. कोणत्याही संशोधनक्षेत्रात ज्ञानाचे आधुनिकीकरण होत असते. अद्ययावत ज्ञान हा अगोदरच्या ज्ञानावर चढवलेला इमला असतो. त्यामुळे पेटंट संरक्षण संपूर्ण इमारतीला (मूळ ज्ञान अधिक इमला) देणं हे योग्य होय. हे कायदाही जाणतो - म्हणून एव्हरग्रीनिंग - म्हणजे इमला अधिक पाया - अशा तरतुदी आहेत. पण कायदा आला की तरतुदींची चौकट वापरून कायद्याचा दुरुपयोग करणारे (abuse of law) महाभाग पण येतात. त्यासाठी सरकारी राखणदार (regulators) असतात. वाद विकोपाला गेले की न्यायव्यवस्थेला राखणदाराची भूमिका बजावावी लागते. वरच्या उदाहरणात मी चहामध्ये काही थातुरमातुर गोष्टी वाढवल्या आणि पेटंटचे पुनर्हरितीकरण करायचा प्रयत्न केला. हा सरळसरळ दुरुपयोग आहे. पण कधीकधी थोड्याफार बदलाने मोठा फरक पडतो. उदा. दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या इथाईल अल्कोहोलमध्ये काहीतरी मिसळल्यावर त्याचे मिथाईल अल्कोहोल होते जे विषारी असते.* म्हणून या बाबतीत छोटा बदल हा खरोखर महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचे आणि काय नाही या राखणदाराच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि सद्सद्विवेकबुद्धीचा प्रश्न असतो. *पेटंट मिळणार नाही, पण उदाहरणादाखल

In reply to by विकास

कन्सेप्ट कळला पण प्रश्न पडला. एक इमारत बांधल्याबद्दल बांधणार्‍याला २५ वर्षे त्या इमारतीची मालकी दिली आहे. २५ वर्षांनी ती सार्वजनिक होणार. (आताच्या बीओटी रस्त्यांसारखे). २४ व्या वर्षी बांधणार्‍याने इमारतीला रंग वॉटरप्रूफ रंग लावला (इमारतीत सुधारणा झाली). म्हणून पुन्हा/आणखी २५ वर्षे त्या इमारतीची मालकी द्यायची? किंवा तुमच्या उदाहरणात ... इतके दिवस तुम्हाला चहाचे पेटंट मिळाले होते. चहा दुसरे कोणी बनवू शकत नव्हते. ते पेटंट लॅप्स होणार होते. आता तुम्ही आले घालून चहा बनवला. त्याचे पेटंट तुम्हाला द्यायला हरकत नाही. पण ते "आले घातलेला चहा" या उत्पादनाचे असू शकेल. "आले न घातलेल्या चहा"ला पेटंट चालूच ठेवण्याचे काही कारण नाही.

In reply to by नितिन थत्ते

"आले घातलेल्या चहा" बरोबरच चहाचे पेटंट चालूच ठेवले तर "गवती चहा घातलेला चहा" "तुळस घातलेला चहा" सुद्धा दुसरा कोणी बनवू शकत नाही हा सुद्धा आक्षेप आहे.

In reply to by नितिन थत्ते

याचं उत्तर Intellectual Property Life Cycle या अर्थशास्त्रीय संकल्पनेत आहे. आयपी मधून मिळणार्‍या उत्पन्नाचा ग्राफ काळानुरूप मांडला तर "तिरक्या ठेवलेल्या आजोबांच्या काठी" सारखा दिसतो. जेव्हा संशोधन होऊन एखादी पेटंटयोग्य मालमत्ता तयार होते, तेव्हा ती परिपूर्ण असतेच असं नाही. त्यावर संशोधन चालूच रहातं. त्याची सुधारित आवृत्ती येणार अशी अपेक्षा असते. सुधारित आवृत्ती आली आणि मूळ आवृतीचं संरक्षण काढून घेतलं, तर मूळ संशोधनकर्त्यावर अन्याय होतो. अशाने त्याला पुढील संशोधनासाठी काही प्रेरणा (incentive) रहाणार नाही. आजोबांची काठी अर्ध्यातच मोडेल. पेटंट संरक्षण ही "उबवलेली एकाधिकार पद्धती" (induced monopoly) असते. हे उबवण्याचं कार्य किती लांबवायचं हा प्रत्येक देशाचा निर्णय आहे. चहावरचं पेटंट "गवती चहा" आणि "तुळस घातलेला चहा" यालाही लागू होईल. पण "गवती चहा"ला "चहा या पेयाचा प्रकार" म्हणण्याच्या ऐवजी "सर्दीवरचं औषध" म्हणलं तर कदाचित पेटंट मिळूनही जाईल... :)

नोव्हारटिस चे व्य. संचालकाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ९५ % लोकांना फुकट ग्लिव्हेक पुरवतो. प्रत्यक्ष वस्तुस्थिती दुसरेच सांगते. Over 16,000 patients in India use Glivec, the vast majority of whom receive it free of charge, Novartis says. By contrast, generic Glivec is used by more than 300,000 patients, according to industry reports.सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया २ लाख ८४ हजार लोकानी काय केले असते?विचार करा यातील एखादा आपला नातेवाईक असेल तर?

In reply to by सुबोध खरे

नोव्हार्टीस कसे पैसे मिळवते आणि कसा धंदा करते ह्या बद्दल येथे कुणाचे दुमत आहे असे वाटत नाही. चर्चा प्रस्तावात देखील कोर्टाचा निर्णय बघायचा आधी देखील, मी वरकरणी कोर्टाचाच निर्णय योग्य वाटतो असे म्हणले आहे. त्यामुळे त्याबाबतीत सर्वच एका बाजूने बोलत आहेत. पण मुद्दा वेगळा होता: सामाजीक म्हणून निर्णय जितका योग्य आहे तितकेच केवळ या संदर्भात नाही तर एकंदरीतच कॉपिबाज असणे हे धोरण म्हणून अथवा who cares म्हणत रहाणे हे देश आणि उद्योगांसाठी किती योग्य आहे? याबद्दल आपले मत काय? नोव्हार्टीसच कशाला इतर अनेक (अथवा सगळ्याच) फार्मा कंपनींचे नफेखोरी तत्व तुम्हा-आम्हाला मान्य होणार नाही. पण त्यांच्यासारखे संशोधन करून जो पर्यंत आपण औषधे शोधणार नाही तो पर्यंत त्यांच्यावरच अवलंबून रवाहे लागणार हे कटू सत्य आहे. त्या व्यतिरीक्त अजून एक प्रश्न आहे, व्यक्तीगत नाही अथवा तुम्ही डॉक्टरी पेशाचे आहात म्हणून नाही: कृपया खरेच गैरसमज नको पण आपल्या कडे किती डॉक्टर्स अशा कंपन्यांच्या मदतीने परदेश दौरे करतात? मी पाहीलेले आहेत...अर्थात त्याला सन्मान्य अपवादही पाहीले आहेत. आता मला सध्याची स्थिती माहीत नाही, पण इंडीयन मेडीकल असोसेशनने (आणि तत्सम संस्था)नी अशा संबंधांवर बंदी आणली आहे का? किती लोकांना अनावश्यक औषधे दिली जातात? (अमेरीकेत, असे कायदे केले आहेत. मॅसॅच्युसेट्स मधे कॉन्फरन्समधे साधे चहा देणे पण चालत नाही). पण तरी देखील मला वाटते की आपले (सगळे अर्थातच नाही पण) डॉ़क्टर्स हे अनुभवी असतात, निष्णात असतात. मग ते असे का वागत असावेत? त्यांना पैसा कमी मिळतो असे म्हणायचे आहे का? हे लिहायचा उद्देश इतकाच की कंपनीची नफेखोरी आणि एखाद्या व्यक्तीची आणि पेशानुरूप समुहाची नफेखोरी यात फरक करायचा नाही असे ठरवले तर आपल्याकडील चित्र फार वेगळे दिसणार नाही. - हे केवळ डॉक्टर्ससाठीच नाही, तर आयटी तंत्रज्ञान, इंइनिअरींग, वकील सर्वत्रच दिसेल.

In reply to by विकास

एकंदरीतच कॉपिबाज असणे हे धोरण म्हणून अथवा who cares म्हणत रहाणे हे देश आणि उद्योगांसाठी किती योग्य आहे? याबद्दल आपले मत काय?
कायको फज्जरके टाईम मूंह खुलवाते हो, सुलेमान? तुमने पहेले बार पूछा तो हमने टाल्या, दूसरे बार पूछा तो काणाडोळा किया, लेकिन तुम तो छोडनेकू तैयारच नही!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

मेरा नाम सुलेमान नही, विक्रमादीत्य है और विक्रमादीत्य कभी हट्ट छोडताच नहीनां ! ;) (ह्या वाक्यातील हिंदी हे मेल्टींग पॉट मध्ले असल्याने त्याचे योग्य मरठीकरण केले गेले आहे असे समजावेत. :) )

साहेब डॉक्टरांचे भ्रष्टाचार आणि एखाद्या कंपनीचे लोकांना वेठीस धरणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कंपनीने आपला नफा कमावून झाल्यावर सुद्धा अनैतिकपणे आणि बेकायदेशीर रित्या कोणत्याही मार्गाने पैसा मिळवण्यासाठी सर्वसामान्य रुग्णाला वेठीला धरणे हे वेगळे.रुग्णाला एखादा डॉक्टर जर फसवीत असेल तर त्याला दुसर्या डॉक्टरकडे जाता येते किंवा पोलिसात तक्रार करता येते किंवा ग्राहक मंचात जाता येते. पण एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या पैशाच्या बळावर वेगवेगळ्या सरकारी नियमांचा दुरुपयोग करीत नफ्यासाठी रुग्णांना वेठीस धरत असेल तर त्याविरुद्ध सर्वसामान्य माणसाने काय करावे?हि गोष्ट लक्षात आल्यामुळे आता कॅनडा युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात कायद्यात काय सुधारणा करता येईल याचा विचार आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चालू झालेला आहे येथे या गोष्टीचा विचार आहे

In reply to by सुबोध खरे

पण एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या पैशाच्या बळावर वेगवेगळ्या सरकारी नियमांचा दुरुपयोग करीत नफ्यासाठी रुग्णांना वेठीस धरत असेल तर त्याविरुद्ध सर्वसामान्य माणसाने काय करावे?हि गोष्ट लक्षात आल्यामुळे आता कॅनडा युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात कायद्यात काय सुधारणा करता येईल याचा विचार आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने चालू झालेला आहे. येथे या गोष्टीचा विचार आहे
पण हे सुरवातीपासून मला वाटते सर्वच जण या चर्चेत म्हणत आले आहेत. त्यात नवीन काहीच नाही. पण केवळ तेव्हढ्याने आपण प्रश्नाच्या मुळाशी जात नाही. कारण देणारे ते आहेत आणि आपण नुसतेच घेणारे. हे चित्र जो पर्यंत बदलत नाही, बदलावे असे वाटत नाही तो पर्यंत सुप्रिम कोर्टावरच अवलंबून रहावे लागणार.

In reply to by विकास

विकास, तुला आणखी एक अ‍ॅन्गल देतो चल (साला, तू भी क्या याद करेगा!!!!) कोर्टाने काय तो निर्णय दिला, जेनेरीक ड्रग मेकर्स आणि काही एन्जीओजनी सेलेब्रेट केलं... मिडिया तर बेभान होऊन नाचतंय!!! पण भारत सरकारने संयमित प्रतिक्रिया दिल्यायत, ते फार सेलेब्रेट करतांना दिसत नाहियेत असं का? :) (या प्रश्नाचे उत्तर जर तू दिले नाहीस तर तुझ्या मस्तकाची हजार शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील, विक्रमा!!)

In reply to by पिवळा डांबिस

भारत सरकारला फार्मा संशोधन क्षेत्रातली परकीय गुंतवणूक कमी व्हायची भीती वाटते आहे बहुतेक. अजून एक कारण असावं: सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारताचं "पेटंट संरक्षण" या क्षेत्रातलं नाव बद्दू होईल. मग फार्मा कंपन्या भारतात पेटंट रजिस्टर करण्याऐवजी स्वित्झर्लंड किंवा हॉलंड अशा ठिकाणी पेटंट रजिस्टर करतील, चीन किंवा बांगलादेशात कमी खर्चात उत्पादन करतील आणि भारतात फक्त विक्री करतील. अशाने मूल्यसाखळी (value chain) मधलं भारताचं महत्त्व कमी होईल. पर्यायाने कररूपी उत्पन्न, कारखान्यांतली आणि संशोधन आस्थापनांमधली नोकरभरती सुद्धा कमी होईल. बरोबर आहे का पिडांकाका?

In reply to by पिवळा डांबिस

आदूबाळ यांनी वास्तवीक खूप व्यवस्थित उत्तर दिले आहे आणि त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. पण "विकास" चा तो ड्युप्लिकेट आयडी नसल्याने मला थोडे अधिक उत्तर देणे भाग पडत आहे. :-) अगदी सोपे उत्तर देयचे तर, भारत सरकार आहेच मुळी संयमित, त्यामुळे ते संयमित प्रतिक्रीया देत आहे. ;) पण थोडे अधिक म्हणायचे तर, ते मेहम्मूदचे गाणे आठवते का? ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैय्या, द होल थिंग इज दॅट के भैय्या सबसे बडा रुपय्या! तसेच काहीसे येथे आहे. त्यात जसा राज्यकर्ते देशाचा स्वार्थ बघत असतील तसेच स्वतःचा पण स्वार्थ बघत असणारच... कुणाला कोर्टाचा निर्णय आवडो-न आवडो, बरोबर-चूक वाटोत, काही वाटले तरी त्यात गैर नाही. पण एक नक्की चांगले आहे, की भारतीय न्यायव्यवस्था वतंत्र आहे हा संदेश यातून सर्वांनाच गेला आहे. बरं या निर्णयात उगाच अ‍ॅक्टीव्हिजम आहे असे वाटत तरी नाही. इतके उत्तर दिल्यावर गाडी मुळ पदावर आणण्यासाठी मला सोपानदेव चौधरींच्या "विज्ञानयोगी" कवितेतील ओळी आठवल्या (येथे आधीपण सांगितल्या आहेत). कविता सगळी पाठ आहे, पण शेव॑टच्या ओळीच लिहीतो. तसेच त्यांनी ती जेंव्हा लिहीली असेल त्यावेळेपेक्षा माझ्यालेखी भारताची आणि भारतीयांची प्रगती आणि वृत्ती खूपच चांगल्या अर्थाने बदलली आहे, असे मनापासून स्पष्ट करतो, तरी देखील...सरकारी पातळीवर हे जास्त चांगले झाले आहे असे वाटते. पण खाजगी उद्योगांना, सर्वच शिक्षणसंस्थांना अजून बरेच काही शिकायचे आहे. नुसतेच प्रायव्हेटायझेशन म्हणत सरकारी अंमल नको म्हणायचे आणि तसा तो नसावाच, पण दुसरीकडे सन्मान्य पण दुर्मिळ अपवाद वगळता स्वतःच्या धंद्यात उपयुक्त ठरण्यासाठीच्या मुलभूत संशोधनात काहीच गुंतवणूक नाही की इनोवेशन नाही ... म्हणून ते यंत्रकार, आम्ही दुरूस्तीकार त्यांचा संचार आंतराळात, दृष्टी आंतर्गोलपटावर आणि आम्ही मात्र उभे या पृथ्वीच्या सालपटावर सर्व प्रमुख शोधांचे धनी, पाश्चिमात्य विज्ञानयोगी आम्ही? आम्ही फक्त उपभोगी संशोधक, निर्माते, सारे तिर्‍हाईत आम्ही मात्र राहीलो फक्त गिर्‍हाईक :(

In reply to by विकास

वर श्री. आदूबाळ यांनी दिलेली कारणं बरोबर आहेत. अनेक कारणांपैकी काही ती आहेत. बाकी तुमच्या प्रतिसादात तुम्हाला काय म्हणायचे तेच कळलं नाही... :) तुमच्या प्रतिसादातील दुसर्‍या भागाशी (विज्ञानयोगी वगैरे कविता) अंमळ असहमत. हा भारतात फार पॉप्युलर असलेला आत्मताडनाचा प्रकार असला तरी तो सत्य आहेच असे नाही. भारतातही सक्षम, हरहुन्नरी, धडाडीचे लोक खूप आहेत. पण त्यांना मोकळेपणाने काम करू दिलं जात नाही, कधी नकळत, बर्‍याचदा मुद्दामहून! हा खरा प्रॉब्लेम आहे. असो.
भारत सरकार आहेच मुळी संयमित, त्यामुळे ते संयमित प्रतिक्रीया देत आहे. पण एक नक्की चांगले आहे, की भारतीय न्यायव्यवस्था वतंत्र आहे हा संदेश यातून सर्वांनाच गेला आहे.
न्यायसंस्थेचे काम हे तिच्यापुढे सादर केला गेलेला पुरावा, फिर्यादी आणि आरोपी पक्षांची आर्ग्युमेंटस, त्या देशाचे संविधान आणि कायदा (आणि फारफारतर कॉमन लॉ) यांचाच विचार करून निर्णय देणं हे असतं. ते या न्यायसंस्थेने चोख केलं आहे. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं. ज्युडिशियल ब्रान्चला असलेली ही लग्झरी एक्झिक्युटिव्ह ब्रान्चला (पक्षी सरकारला) नसते. सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये न्यूटनचा तिसरा नियम हा फिजिक्सइतकाच लागू पडतो. :) प्रत्येक घटनेचे, प्रत्येक निर्णयाचे प्रतिसाद उठतातच. आता हे ग्लीव्हेकचं मधाचं पोळं भारतीय जेनेरीक ड्रग इंडस्ट्रीच्या हातात पडलंय न्यायसंस्थेच्या निर्णयामुळे, ग्रेट! पण यातून उठलेल्या मधमाशा या कशा, कुठे आणि कधी येऊन चावणार आहेत ही चिंता सरकारला करावी लागणार आहे. माझ्या मते सरकारच्या संयमित प्रतिक्रियेचं ते कारण आहे. आदूबाळ यांनी दिलेली कारणं ही खूप महत्वाची असली तरी ती ऑबव्हियस आहेत. पण या निर्णयाचे पडसाद हे नोव्हार्टिसच्या, फार्मा इंडस्ट्रीच्या, फार काय भारत-स्विस संबंधांच्या पलीकडे उमटण्याची शक्यता आहे आणि माझी खात्री आहे की सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य हे सगळं फिगर आऊट करण्यात गुंतलेले असणार...

In reply to by पिवळा डांबिस

या प्रतिसादातील तर्क पटले.

In reply to by पिवळा डांबिस

>>फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं. ज्युडिशियल ब्रान्चला असलेली ही लग्झरी एक्झिक्युटिव्ह ब्रान्चला (पक्षी सरकारला) नसते. सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच. हॅट्स ऑफ

In reply to by नितिन थत्ते

+१ पांडित्यपूर्ण विश्लेषण 'करणारी' दहाएक संपादकीयं या वाक्यावरून ओवाळून टाकायाला हरकत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

( वास्तवीक वेताळाला एकाच मुद्यावर उत्तर देण्यास विक्रमादीत्य बांधील असतो पण येथे आपण त्या नियमास अपवाद करूयात. ;) )
पण त्याचबरोबर हेही खरं आहे की फक्त वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सच्या मर्यादेत राहूनच निर्णय देण्याची लिमिटेड जबाबदारी असल्याने बर्‍याच वेळेला न्यायसंस्थेला स्वतंत्र आणि परखड रहाणं परवडू शकतं.
माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणले आहे त्या प्रमाणे: "बरं या निर्णयात उगाच अ‍ॅक्टीव्हिजम आहे असे वाटत तरी नाही." थोडक्यात ते पॅरॅमिटर्स वगैरे सर्व समजून घेतले तरी लोकशाही देशात अ‍ॅक्टिव्हिस्ट कोर्ट असतात, ते त्याला साजेसे निर्णय देतात. ते ह्या निर्णयात अ‍ॅक्टीव्हिझम म्हणून झालेले नाही. त्यामुळे किमान कोर्टापुढे तरी आपले काही चालू शकणार नाही इतका संदेश परदेशी कंपन्यांना गेला आहे हे महत्वाचे असे म्हणले होते. या विषयावर जे काही परदेशी माध्यमात लिहून आले आहे त्यात कोर्टावर कुठलाही संशय घेतलेला दिसत नाही, हे देखील त्या अर्थाने महत्वाचे आहे.
सरकारला प्रत्येक निर्णयाचे कुठे, काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करावाच लागतो. सरकार बर्‍याचवेळेला बोटचेपी भूमिका घेतंय असं आपल्याला वाटतं ते यामुळेच.
हा मुद्दा मान्यच आहे. पण आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, "त्यात जसा राज्यकर्ते देशाचा स्वार्थ बघत असतील तसेच स्वतःचा पण स्वार्थ बघत असणारच... " थोडक्यात तुम्ही ज्याला बोटचेपी भुमिका म्हणत आहात त्याला मी स्वार्थी भुमिका म्हणले इतकेच. किंचित फरक असलाच तर तुम्हाला ती कदाचीत केवळ आंतर्राष्ट्रीय राजकारणाच्या होऊ शकणार्‍या दबावामुळे घेतली इतकेच वाटते तर मला तो केवळ एक भाग वाटतोय. दुसरा भाग अर्थातच राजकारण्यांना मिळणारे पैसे. आंतराष्ट्रीय कंपन्या केवळ भारतातच नाही तर सर्वत्रच कसे राजकारण्यांना सांभाळतात ह्यावर भरपूर माहिती मिळेल. त्या व्यतिरीक्त भारतातील सध्याच्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहीली, राजीव गांधींसंदर्भात विकीलिक्सने अगदी सत्तरीच्या दशकातील त्यांच्या "उपयोगा"बद्दल काय म्हणले आहे ते पहाता, नोव्हार्टीस काय अशीच कंपनी चालू करायचे पेपर्स घेऊन नंतर लॅब उघडून काम करत बसली असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण तो वेगळा विषय होऊ शकेल.
पण या निर्णयाचे पडसाद हे नोव्हार्टिसच्या, फार्मा इंडस्ट्रीच्या, फार काय भारत-स्विस संबंधांच्या पलीकडे उमटण्याची शक्यता आहे आणि माझी खात्री आहे की सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य हे सगळं फिगर आऊट करण्यात गुंतलेले असणार...
"सरकारमधले अनुभवी आणि बुद्धिमान चाणक्य" ह्या शब्दांवर माझा देखील विश्वास आहे. ते त्यांचे काम नक्कीच करत असतील. पण बोटचेपेपणा करण्यासाठी नोव्हार्टीस, स्वीस वगैरेची काळजी करण्याचे कारण नाही असेच वाटते.. ६५ चे युद्ध असोत, ७१ चे युद्ध असोत, (इंदीरा गांधींनी सातव्या आरमारावरून निक्सनला लिहीलेले पत्र माहीत आहे ना?), पोखरण १ असोत, पोखरण २ ला तर काय वाजपेयी नुसते पत्रकारांसमोर आले - प्रकल्प यशस्वी झाला म्हणाले आणि सरळ आत निघून गेले... या प्रत्येक वेळेस आंतर्राष्ट्रीय दबावाचा काय परीणाम काय होणार ह्यावरून चर्विचर्वण झाले होते, पण ते ते नेतृत्व आणि त्यांचे चाणक्य असल्या दबावाला बळी पडले नाहीत. त्या व्यतिरीक्त मला व्यक्तीगत याचे काही फार मोठे परीणाम होणार आहेत असे वाटत नाही. नोव्हार्टीसने तर आत्ताच जाहीर केले की काळजी घेऊ पण येथे धंदा पण करू आणि पेटंट पण फाईल करत राहू. एकच अपवाद होऊ शकतो, तो म्हणजे आपली सध्याची अर्थव्यवस्था... असे म्हणतात की ती १९९१ च्या काळाच्या जवळ जाऊ लागली आहे. तसे झाले तर काळजीचे कारण आहे. आता त्यातील दुसर्‍या मुद्याबद्दल (जो माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे कारण ते फाउंडेशन आहे).
तुमच्या प्रतिसादातील दुसर्‍या भागाशी (विज्ञानयोगी वगैरे कविता) अंमळ असहमत. हा भारतात फार पॉप्युलर असलेला आत्मताडनाचा प्रकार असला तरी तो सत्य आहेच असे नाही. भारतातही सक्षम, हरहुन्नरी, धडाडीचे लोक खूप आहेत.
मी भारतीयांमधे सक्षमता, हरहुन्नरी वृती आणि धडाडी नाही असे कुठे म्हणतोय? ते म्हणजे आरशासमोर उभे राहून नावे ठेवण्यासारखे होईल. "माझ्यालेखी भारताची आणि भारतीयांची प्रगती आणि वृत्ती खूपच चांगल्या अर्थाने बदलली आहे,.." असेच आधी म्हणले आहे. मुद्दा वृत्तीसंदर्भात अजिबातच नाही पण त्या वृत्तीच्या वापरासंदर्भात आहे. म्हणूनच तुम्ही जे म्हणालात, "पण त्यांना मोकळेपणाने काम करू दिलं जात नाही, कधी नकळत, बर्‍याचदा मुद्दामहून! हा खरा प्रॉब्लेम आहे." याला जबाबदार कोण आहे?

In reply to by विकास

त्यात कोर्टावर कुठलाही संशय घेतलेला दिसत नाही,
संशय कुणीच घेत नाहीये, तुम्हीही नाही आणि आम्हीही नाही. त्यावर आपलं एकमत आहेच.
दुसरा भाग अर्थातच राजकारण्यांना मिळणारे पैसे.
नो कॉमेन्ट! त्या कचर्‍यात मी उतरू इच्छित नाही!! :)
त्या व्यतिरीक्त मला व्यक्तीगत याचे काही फार मोठे परीणाम होणार आहेत असे वाटत नाही.
गुड! तुम्हारे मूंहमें घी-शक्कर!
...हा खरा प्रॉब्लेम आहे." याला जबाबदार कोण आहे?
ते सगळ्या सूज्ञ माणसांना माहिती आहे, त्यावर आणखी चर्चा काय करणार?

रविवारच्या स्वामीनॉमिक्स मधील खालचा परिच्छेद या केसचा सारांश सांगतो. Many NGOs hailed the judgment for the wrong reason. The Cancer Patients Aid Association, which led the fight against Glivec, declared: “We are happy that the apex court has recognised the right of patients to access affordable medicines over profits for big pharmaceutical companies through patents.” False: no such right was recognized by the court. It simply said Novartis had not proved that the new variation was innovative enough. The court clarified that it would grant patents for variations that were more efficacious, but set a higher standard for proof than many western courts do.