✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 03/28/2013 - 12:37  ·  लेख
लेख
हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता. एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता. आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा. यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला. यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली. आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत) शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते. माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत. हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २
  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

Book traversal links for सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
52876 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

शीर्षक..

उपास
Sat, 03/30/2013 - 08:36 नवीन
वरचे प्रतिसाद वाचता शीर्षक पुन्हा एकदा उद्धृत करावसं वाटलं - 'सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात' :) लोभ आहेच!
  • Log in or register to post comments

पटले नाही

प्रसाद गोडबोले
Sat, 03/30/2013 - 09:01 नवीन
डॉक्टर (,वकील आणि सद्गुरु ह्या तीन )माणसांशी कधीच खोटं बोलु नये असे लहान पणापासुन ऐकत आलोय ... आता हीच माणसे (किमान डॉक्टर तरी नक्कीच ) असे हातचे राखुन "नरो वा कुंजरो वा " करतात असे पाहुन धक्का बसला !! एकवेळ क्यॅन्सर बाबत समजुन घेण्यासारखे आहे पण त्या बाईबाबत सहानभुतीने/ तीचा संसार वाचवायचा म्हणुन खोटे बोलणे तिच्या नवर्‍याला फसवणे हे अजिबातच पटले नाही. असो. (अवांतर : खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत ...)
  • Log in or register to post comments

खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत

सुबोध खरे
Sat, 03/30/2013 - 10:03 नवीन
गिरीजा ताई वर सांगितलेले आमच्या सरानी केले होते आणि त्यात सुद्धा त्यांनी स्पष्टपणे असे म्हटले होते कि मि जे करतो आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही आणि तुम्ही करावे किंवा नाही हे तुम्ही ठरवा. यात मी नावाला जागलो नाही हा प्रश्न कुठे आला. मी जर तिच्या नवर्याला हि "बातमी"तुमची बायको तुमच्या "शस्त्रक्रियेनंतर गरोदर" आहे हे सांगणे नीतिमत्तेच्या विरुद्ध(UNETHICAL) झाले असते कारण तो रुग्ण सरांचा होता आणि मी तो हमाल (भारवाही) होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सॉरी सॉरी

प्रसाद गोडबोले
Sun, 03/31/2013 - 08:48 नवीन
वर सांगितलेले आमच्या सरानी केले होते >>> चुकुन वाचता वाचता हे नजरेतुन सुटले ... चुकलो .... माफी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ

कवितानागेश
Sat, 03/30/2013 - 11:31 नवीन
हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ यांचा प्रतिसाद वाचून हसावं की रडावं कळेना. १. एकमेकांशी कसे वागायचं आणि एकमेकांना काय सांगायचे हा एक तर त्या नवराबायकोचा प्रश्न आहे. त्या बाईला 'धडा' वगरै शिकवायचा अधिकार कुणलाही नाही. २. तसंच नवर्‍याच्या मनात विनाकारण संशय पेरण्याचं कारणही नाही. ऑपरेशन झालेले असले तरी एक शक्यता होतीच हे मूल त्याचेच आहे. (नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात.) त्यामुळे तसेही नक्की काय ते माहित नसताना आणि समजा तसे नसले तरीही त्यासाठी तिला छोट्याश्या चुकीसाठी आयुष्यभराची शिक्षा का? माणसाचे आयुष्ञ महत्त्वाचे की धारदार 'सत्य'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माऊताय, तुमचं म्हणणं बरोबर

आदूबाळ
Sat, 03/30/2013 - 15:19 नवीन
माऊताय, तुमचं म्हणणं बरोबर आहे. "धडा" शिकवणं हा शब्दप्रयोग योग्य नाही. मला म्हणायचंय ते असं: बहुतांश सेवादात्यांच्या व्यवसायात हा तिढा नेहेमी येतो. "अशिलाच्य/रुग्णाच्या नीतिमत्तेशी मला काहीही देणंघेणं नाही" हे एक टोक आणि "अशिलाची/रुग्णाची नीतिमत्ता माझ्या कंट्रोलमध्ये नसली तरी माझ्या कार्यकक्षेत येते" हे दुसरं टोक. प्रत्येक वकील/डॉक्टर/सीए या दोन टोकांपैकी कुठल्यातरी एका बाजूला झुकतं माप देतो. इथे डॉ खरे आणि डॉ मुखर्जींनी दुसर्‍या टोकाला झुकतं माप दिलं आहे. माझा मुद्दा एवढाच होता, की ते करूनही हा असला प्रकार (घडलाच असेल तर) पुन्हा घडू नये म्हणून डॉक्टरसाहेबांनी केलेला उपाय तोकडा नाही का? (या संदर्भात "धडा" हा शब्द होता.) त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मला पटतं. "एखादेवेळी चूक झाली असेल" हा शेवटी त्या त्या व्यावसायिकाचा अनुभवसिद्ध अंदाज (judgement call) असतो. त्याचं समर्थन करता येत नाही बर्‍याचदा. तुमचा कल अर्थातच पहिल्या बाजूकडे आहे. नथिंग राँग इन दॅट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ओके

प्रसाद गोडबोले
Sun, 03/31/2013 - 08:53 नवीन
माणसाचे आयुष्ञ महत्त्वाचे की धारदार 'सत्य' ? >>> हा खरच महत्वाचा प्रश्न आहे ... पण डॉक्टर (वकील अन सद्गुरु ह्या तीन ) व्यक्तींनी पेशंटशी खोटे बोलु नये ....सत्यच बोलावे मग ते कितीही कटु अन धारधार असले तरीही ...(कारण इथल्या असत्यावर उभारलेले आयुष्य फारकाही सुखद असेल असे वाट्त नाही ) . असे माझे वैयक्तिक मत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

छोट्याश्या चुकीसाठी

प्रसाद गोडबोले
Sun, 03/31/2013 - 09:29 नवीन
हे एक विचारायचे राहिलेच ... "ही" "छोटटीशी चुक " आहे काय ? (ह्या विषयावर एक द्विशतकी काथ्याकुट होवु शकेल काय ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गिरीजा

निनाद मुक्काम …
Sun, 03/31/2013 - 11:57 नवीन
गिरीजा त्यांना कदाचित ही छोटीशी चूक वाटत असेल बडे बडे शहरोमे ,छोटी छोटी बाते .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

"ब्रू " हा धातूच नको

चौकटराजा
Sat, 03/30/2013 - 09:07 नवीन
ब्रू म्हणजे संस्कृतात बोलणे असा होतो. पण व्यावसायिक क्षेत्रात विशेषता: जिथे एकाच्या अहवालावर दुसर्‍याचा निर्णय अवलंबून असतो. उदा सी ए ज्या वा वकिलाच्या वा पॅथोलिजिस्टच्या सल्यावर दुसर्‍या कोणाची तर निर्ण्यप्रक्रिया अवलंबून असते तिथे सल्याचे documentation झालेच पाहिजे. श्रेयस प्रेयस सत्य असत्य हा तात्विक घोळ त्यात कशासाठी ? माझ्या पत्नीचे प्रसूति नियोजनाचे ऑपरेशन केले त्यावेळी नातेवाईकच सर्जन होता त्याने तोंडी विचारले मी आता टाका घालणार आहे तुला मूल नको ना आणखी ? ही काय पध्दत झाली का व्यवसायाची ? त्यासाठी शिस्तीत स्वाक्षरी मजकडून घेतल्याचे मला तरी आठवत नाही.
  • Log in or register to post comments

हि बाजू आणि ती बाजू.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/30/2013 - 14:00 नवीन
मागे एकदा माझ्या वरील एका शस्त्रक्रियेवेळी २ वेळा ऑपरेशन थिएटरच्या दाराशी नेऊन मला रक्तदाब वाढला म्हणून परत आणले आहे. शेवटी डॉक्टर माझ्या खाटे जवळ येऊन म्हणाले,' काय पेठकर, घाबरताय का?' मी म्हणालो,'डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या उरावर बसून शस्त्र चालवणार आणि मी घाबरायचही नाही?' हा सर्व संवाद हसत खेळत झाला. तिसर्‍या दिवशी शस्त्रक्रिया झाली. असो. दोन्ही बाजू बरोबर वाटतात. मृत्यूच्या शक्यतेच्या बातमीने रुग्ण लवकर दगाऊ शकतो त्यामुळे त्याला अंधारात ठेवावे हे जितके योग्य वाटते तितकेच एखाद्याला शेवटची आवराआवर करायची संधी मिळावी म्हणून त्याला सत्य सांगावे हेही बरोबर वाटतं. भारतातील एक केस वाचल्याची आठवते की रुग्ण कॅन्सरच्या अंतिम अवस्थेत होता. मरण अटळ होतं. पत्नीला, वडीलांना ह्याची कल्पना दिली होती. फार पोक्त विचारांती त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की रुग्णाला कल्पना देऊ नका परंतु मृत्यू समयी त्याला वेदना होणार नाहीत, त्याची तडफड होणार नाही आणि शांतपणे मरण येईल असे पाहा. त्या रुग्णाचे मरण तसेच शांत झाले. एक उलटी झाली आणि डोळे मिटले. ह्या उलट माझ्या एका मित्राला कॅन्सरचे निदान झाले असता त्याने डॉक्टरांना थेट प्रश्न केला,' डॉक्टर माझ्याजवळ सहा महिने आहेत का?' डॉक्टर म्हणाले, 'काळजी करू नका, सहा वर्षेही असतिल नशिबात.' पुढे तो कॅनडात गेला, स्थायिक झाला. नेमाने औषधपाणी घेतले तिथल्या डॉक्टरांच्या ट्रिटमेंट मध्ये राहिला. दहापेक्षा जास्त वर्षे जगला. शेवटी जेंव्हा खरोखरचे ६ महिने राहिले तेंव्हा त्याने डॉक्टरांना विचारले,'डॉक्टर मी काय करू?' डॉक्टर म्हणाले,' प्लान फॉर युवर फ्युनरल.' आणि त्याची पाठ थोपटली. हा तिथल्या एका संस्थेत गेला. पैसे भरून सदस्यत्व घेतलं. ती संस्था मृत्यूपश्चात सर्व विधी (अगदी हिन्दू धर्मानुसार दहनविधीही) करते. सर्व परिचितांना आपण जात असल्याचे कळविले. कधी चुकून अधिकउणे बोललो असेन तर माफ करा अशा आशयाच्या इमेल्स पाठवल्या. (ती मेल वाचताना धाय मोकलून रडलो होतो). आणि शांतपणे गेला. कॅन्सरचे निदान झाल्या नंतर मुलाचे लग्न उरकण्यात आले. नातू पाहिला. आर्थिक व्यवस्था करून ठेवली. आणि प्रस्थान ठेवले. त्याला सत्य सांगितल्यामुळे तो हे सर्व करू शकला. तरीपण, तारतम्य बाळगून डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद साधावा हेच मलाही योग्य वाटते. मी स्वतः डॉक्टरांशी बोलून माझ्या आजारासंबंधी, मृत्यू संबंधी सत्य जाणून घेऊ इच्छित असेन. अशा रुग्णाशी मात्र डॉक्टरांनी सत्य आणि केवळ सत्यच कथन करावे.
  • Log in or register to post comments

अख्ख्या धाग्यावर ज्या काही

यशोधरा
Sat, 03/30/2013 - 15:33 नवीन
अख्ख्या धाग्यावर ज्या काही वाचनीय पोस्ट्स आहेत त्या वाचून दोन्ही बाजू बरोबर वाटत आहेत काही अंशी. वैयक्तिकरीत्या मला स्वतःला काही आजार असेल तर डॉ ने मला सर्व सांगितलेले मला आवडेल. माझ्या आप्तांपैकी कोणी असेल तर त्यांना न सांगता मात्र मला वा किंवा आमच्यापैकी काळजी घेणार्‍यांना कोणाला सांगावे असेही माझे मत आहे. परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावा.
  • Log in or register to post comments

कृपया सदस्यांनी कुठल्याही

संपादक मंडळ
Sat, 03/30/2013 - 17:48 नवीन
कृपया सदस्यांनी कुठल्याही प्रकारे वैयक्तिक टीका करू नये अन्यथा धागा वाचनमात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

माझा या विषयावर या धाग्यावरचा

शिल्पा ब
Sat, 03/30/2013 - 23:19 नवीन
माझा या विषयावर या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद - धागा प्रतिबंधीत होउ नये म्हणुन. मी कोणावरही ( जर्मनीवाले / दारुवाले ज्यांनी माझ्यावर वैयक्तीक हल्ला केला) वैयक्तीक टीका केलेली नाही. डॉक्टरसाहेबांनी त्यांचे अनुभव लिहिलेत त्यातही आपल्याला फारच सगळंच समजत अशा प्रकारचे नेहमीचे विनोदी प्रकार अती होउ लागल्याने मी डॉक्टर अन वेटर यांचा अधिकार या विषयी लिहिलं. आपल्या कामाची लाज वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न. संपादीत प्रतिसादात काहीही वैयक्तीक नव्हते तरी नेहमीप्रमाणेच या महाशयांनी त्यांच्या प्रतिसादात वैयक्तीक गरळ ओकलीच यात नविन काही नाही. बरं या लेखावरसुद्धा तेच ते...त्याला वर चिगो अन डॉक्टरांनी फटकारलं आहेच. यावर कडी म्हणजे आता फार सोज्वळपणाचा आव आणुन लिहिलेला खालचा प्रतिसाद. माझ्यावर जर कोणी वैयक्तीक हल्ला केलाच तर त्याला मी प्रत्युत्तर देणारच. मी जर नुसतंच ऐकुन घ्यावं असं तुमचं म्हणणं असेल तर ते शक्य नाही. या महशयांवर आधीसुद्धा प्रतिबंध घालण्यात आला होता याची आठवण करुन देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले

निनाद मुक्काम …
Sat, 03/30/2013 - 18:04 नवीन
माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले त्यांच्याशी आज माझे चांगले संबंध आहेत , किंबहुना समान मुद्द्यावर आम्ही एकमेकांना अनुमोदन करतो , माझ्यामुळे ह्या धाग्यावर संपादन मंडळाला यावे लागले ह्या बद्दल खेद व्यक्त करतो. व ह्यापुढे माझ्या तर्फे ब ह्यांना शांततेचे आव्हान करतो , एकमेकाशी वयक्तिक उणी दुणी काढणे , जुने हिशेब चुकते करणे ह्या सर्व प्रकाराला सोडून आपण नव्या दमाने ह्या मिसळपाव परिवारात एकाच कुटुंबातील सदस्याच्या प्रमाणे वागूया असे भावनिक आव्हान करत आहे , माझ्या कडून झालेल्या आधीच्या वर्तनाबद्दल दिलगिरी टाळी दोन हातानी वाजत नाही तेव्हा तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद लोभ असावा
  • Log in or register to post comments

.

दादा कोंडके
Sat, 03/30/2013 - 18:32 नवीन
माझ्यामुळे ह्या धाग्यावर संपादन मंडळाला यावे लागले ह्या बद्दल खेद व्यक्त करतो. व ह्यापुढे माझ्या तर्फे ब ह्यांना शांततेचे आव्हान करतो , एकमेकाशी वयक्तिक उणी दुणी काढणे , जुने हिशेब चुकते करणे ह्या सर्व प्रकाराला सोडून आपण नव्या दमाने ह्या मिसळपाव परिवारात एकाच कुटुंबातील सदस्याच्या प्रमाणे वागूया असे भावनिक आव्हान करत आहे ,
बस कर मामू, अब रुलायेगा क्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

दादा,

प्यारे१
Sat, 03/30/2013 - 18:40 नवीन
दादा, ड्राफ्टींग कुणी दुसर्‍यानं केलंय की काय अशी शंका येत आहे. कुणाच्या प्रतिसादाचं ते तेवढं विचारु नका. ;) कंट्रोल उदय कंट्रोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आव्हान?

आनन्दा
Sun, 03/31/2013 - 09:09 नवीन
शिल्पाताई, आव्हानाला तोंड देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

त्या अधिकार्‍यापासून,

मनीषा
Sat, 03/30/2013 - 18:56 नवीन
त्या अधिकार्‍यापासून, त्याच्या पत्नीसंबधित सत्य लपविण्याचा निर्णय मला तरी एथिकल वाटला नाही. आणि रोगासंबधी पेशंटला जर शक्य तितकी खरी माहीती दिली, तर येणार्‍या प्रसंगाला तो/ती अधिक योग्य तर्‍हेने सामोरे जाऊ शकेल असे मला वाटते. बाकी तुमचे ज्ञान आणि अनुभव पाहता, तुमचा निर्णय चूक अथवा बरोबर हे निदान मी तरी सांगू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

चान

जेनी...
Sat, 03/30/2013 - 20:32 नवीन
चान लेख आणि चर्चा रंगतदार . निनाद न शिल्पिची जुगलबंदी मसालेदार .... प्रतिसादातली बरीचशी मतं कसदार .......
  • Log in or register to post comments

चूक अथवा बरोबर

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 14:38 नवीन
मित्रहो चूक अथवा बरोबर हे मलाही माहित नाही. हा विषय मी वेगवेगळ्या ठिकाणी काढला होता. बहुतांशी वकिली पेशाच्या लोकांचे मत होते कि आपण १००% सत्य रुग्णाला सांगितले पाहिजे (कारण कायद्याच्या दृष्टीने ते तुम्हाला सुरक्षित आहे मग रुग्ण धक्क्याने मेला तरी हरकत नाही) दुसरे म्हणजे नंतर होणारे मालमत्तेचे वाद कमी होतील( विशेषतः रुग्ण श्रीमंत पुरुष असेल तर) . वरिष्ठ नागरिक विशेषतः स्त्रियांचे मत असे पडले कि प्रत्येक वेळा खरे बोलून फायदा होईलच असे नाही. आणि रुग्ण स्त्री असेल तर तिला हे सांगू नये स्त्रिया भावनाप्रधान असतात कारण आपल्याकडे अजून तरी स्त्रियांकडे फारशी मालमत्तेची मालकी नाही त्यामुळे त्यात सर्वसाधारणपणे मालमत्तेचा वाद होत नाही. डॉक्टर लोकांचे मत विभागलेले होते.त्यात काही लोक कायद्याच्या दृष्टीने जेवढे आवश्यक तेवढेच बोला असे म्हणत होते. पण जवळ जवळ सर्वच डॉक्टरांचे मत असे होते कि रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल सांगा पण तो किती जगेल याचा अंदाज मुळीच सांगू नका (कारण प्रत्येक डॉक्टरने अघटीत घडलेले पहिले आहे.पाश्चिमात्य संस्कृतीत विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टरांचे मत हे १०० % सत्य सांगण्याचे होते. कारण अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा परस्पर अविश्वासावर आधारित आहे defensive medicine तेथे प्रत्येक डॉक्टर रुग्णाकडे हा उद्या माझ्यावर खटला करणार आहे म्हणून मी आतापासूनच माझी सुरक्षा पाहायला पाहिजे या विचाराने वागत राहतो आणि रुग्ण सुद्धा डोक्तोर आपल्याला कापायला बसला आहे अशा तर्हेने वागतो. त्यामुळे तेथील वैद्यकीय व्यवसाय हा भारंभार चाचण्या वर जास्त आधारित आहे.याने रुग्णाचे बिल प्रचंड वाढते. आणि ज्या लोकांचा विमा नाही ते अक्षरशः रस्त्यावर येतात.भारतात पोटात जंत झाले तर सर्वसामान्य डॉक्टर त्याला ५ रुपयांचे जंताचे औषध देतो आणि २०० रुपयाची शौचाची तपासणी करून घ्या सांगत नाही.अमेरिकेत जर शौचात जंताची अंडी सापडली नाहीत आणि जंताचे औषध दिले तर तो रुग्ण डॉक्टर वर १० लाख डॉलर चा खटला भरण्याची भीती असल्याने डॉक्टर त्याला २ डॉलर चे जंताचे औषध देत नाही. या नंतर मला असे वाटले कि कि समाजाच्या सर्व स्तरातील/ व्यवसायातील लोकांपुढे हा प्रश्न ठेवावा आणि सर्वसाधारण समाजातील लोकांची मते काय ती जाणून घ्यावीत.त्याप्रमाणे अशी वेगवेगळी मते आली आणि मला ती जाणून घेण्यात अतिशय आनंद झाला. यात मी परत हेच म्हणतो कि ज्या लोकांना मी चूक वाटतो मला त्यांच्याबद्दल मताबद्दल आदरच आहे, कोणताही आकस नाही. किंवा ज्यांना मी बरोबर वाटतो त्यांच्या बद्दल तितकाच आदर आहे सर्वाना धन्यवाद
  • Log in or register to post comments

माफ करा पण भारंभार चाचण्या

यशोधरा
Sun, 03/31/2013 - 14:44 नवीन
माफ करा पण भारंभार चाचण्या आणि पेशंटला लुबाडणे, कारण नसताना घाबरवणे (हे स्वतः अनुभवले आहे म्हणून लिहिले) हे तर भारतातही बोकाळले आहे. डॉ. विषयीचा आदर, विश्वास कमी होत चालला आहे आणि त्याला बरेचसे डॉ ही जबाबदार आहेत. डॉ ने अगदीच उद्या तुम्ही मरणार हे रुग्णाला सांगू नये कदाचित पण योग्य शब्दांत आजारपण, त्याचे प्रमाण वगैरे रुग्णाला थोडक्यात सांगून काय इलाज करावा लागेल व तो का करावा लागेल, त्याने काय उपाय होईल वगैरे सांगण्यास काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असा धन्वंतरी...

चौकटराजा
Sun, 03/31/2013 - 15:37 नवीन
पण जवळ जवळ सर्वच डॉक्टरांचे मत असे होते कि रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल सांगा पण तो किती जगेल याचा अंदाज मुळीच सांगू नका या विधानातच मला गफलत वाटते. मी एक body at war " नावाचे पुस्तक वाचले होते. त्याचा विषय miracle of human immune system असा होता. रात्रंदिन आम्हा युद्धाचाच प्रसंग अशी आपली बॉडी लढत लढत साठ सत्तर वर्षे गाठते. असे त्या पुस्तकाचे सार. त्यात शेवटी एक प्रकरण होते. Mind - the unexplored ally . त्यात लेखकानी लिहिलेले होते की कित्येक वेळा आम्ही फिजीशियन आमच्या उपलब्ध शास्त्रानुसार एखाद्याला candidate of death ठरवतो पण अचानक त्याचे पॅरामीटर्स " फेवरेबल" व्हायला लागतात तो बरा होऊन घरी जातो. कोण करते त्याला बरे.... त्याचे मन. माझे मत - माणसाला स्थूलमानाचे मरण मुख्य कारणाने येते ते म्हणजे प्राणवायूचा पुरवठा बंद पडणे तसेच महत्वाचा अवयव ( व्हायटल ओर्गन) बंद पडणे. पण यात "नक्की कधी ?" याचे उत्तर परमेशालाच ( तो अस्तित्वात असेल तर ) ठाउक ! डॉक्क्टराना नक्कीच नाही. बाकी वकीलांच्या मताला माझा १००० टक्के पाठिंबा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा

निनाद मुक्काम …
Sun, 03/31/2013 - 20:30 नवीन
अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा परस्पर अविश्वासावर आधारित आहे defensive medicine डॉक्टर साहेब हे तुमचे व्यावसायिक मत आहे का वैयक्तिक. म्हणजे अमेरिकन वैद्यकीय व्यवसायाच्या बाबतीत असे विधान केले ह्याचा अर्थ तुम्हाला ह्या संबंधी बरीच माहिती दिसत आहेत , ह्या विधानाला पूरक असे स्पष्टीकरण आपल्याकडे असल्यास ऐकायला जरूर आवडेल. कोणताही रुग्ण हा एखादी चाचणी करतो , तेव्हा त्याचा डॉक्टर ह्यांना पहिला प्रश्न असतो , काळजी करण्यासारखे काही आहे का एनी थिंग सिरियस व गंभीर आजारी रुग्णाच्या मनात पहिले प्रश्न येतो मी आता मरणार का कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आले नाही आहे. ह्याची बहुतेक रुग्णाला कल्पना असते. एखादा रुग्ण मानसिक दृष्ट्या किती कणखर आहे हे डॉक्टरांना लगेच कळून येते. त्यानुसार त्यास सत्य सांगावे , म्हणजे सत्य कथनाचा डोस रुग्ण पाहून कमी जास्त प्रमाणात रुग्णास द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

व्यावसायिक मत का वैयक्तिक.

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 23:54 नवीन
निनाद साहेब आपले कोणी नातेवाईक जर अमेरिकेत असतील तर त्याना सत्यस्थिती बद्दल विचारा. माझे कमीत कमी २५ वर्गमित्र अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत त्यांचे अनुभव आणि माझ्या सक्ख्या नातेवाईकाचे अनुभव असेच दर्शवितात. मला भेटलेल्या अनेक रुग्णानि सांगितलेले अनुभव आणि वैद्यकीय साहित्य(literature) यावर आधारित असा माझा अनुभव आहे. यातील एक चक्शुर्वैसत्यम हकीकत खालीलप्रमाणे. मी पवई येथे हिरानंदानी रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून काम करीत असताना २००७ मध्ये एक अमेरिकन रुग्ण भरती झाला. त्याला मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला होता म्हणून तो उपचारासाठी भारतात आला होता. एक वर्षापूर्वी त्याला पोटाची काहीतरी तक्रार होती म्हणून तो अमेरिकेतील एका मोठ्या रुग्णालयात गेला तेथे त्याला एन्डोस्कोपी करण्यासाठी पाठविले.एन्डोस्कोपी मध्ये त्याला एक पोलीप(polyp मश्रूम सारखी वाढ) असल्याचे निदान झाले. पण अमेरिकन कायद्याप्रमाणे तेथे डॉक्टर ते पोलीप तसेच ठेवून बाहेर आले आणि त्याला अहवालात एक अडीच पानी पत्र दिले त्यात पोलीपचे वेगवेगळे प्रकार कशामुळे होतात त्यात अनुवांशिक,पोटाच्या विकारामुळे होणारे, कर्करोगामुळे होणारे अशा सर्व रोगांची बरीच माहिती होती हि माहिती पाहून हा रुग्ण घाबरून गेला कात करावे काय नाही या शृ न्गापत्तीत त्याने दोन महिने घालवले त्याकाळात त्याच्या रोगाची इत्यंभूत माहिती त्याच्या विमा कंपनीने मिळवली आणि त्याची विम्याची पॉलिसी नुतानिकरणासाठी आली तेंव्हा त्यांनी त्याला पोलीपचा उपचारखर्च देण्याचे नाकारले.( exclusion as preexisting illness) त्यामुळे या रुग्णाला स्वतःच्या खर्चाने त्याची परत एन्डोस्कोपी आणि बायोप्सी करावी लागली. दुर्दैवाने त्यात कर्करोग असल्याचे निदान झाले.पुढचा खर्च विमा कंपनीने नाकारल्यामुळे त्याच्या परवडण्याच्या बाहेर होता. त्याकाळात तो भारतीय रुग्णालयाच्या वेबसाईट च्या संपर्कात आला आणि भारतात येणारा खर्च परवडणारा असल्याने तो आमच्या रुग्णालयात आला. दुर्दैवाने तो भारता त येई पर्यंत त्याला फार उशीर झाला होता. त्याचा सी टी स्कॅन मीच केला होता त्यात त्याचा कर्करोग सर्वत्र पसरला होता. हा रुग्ण पुढील दीड महीना आमच्या रुग्णालयात उपचार घेत होता आणि कर्करोगाने त्याचा बळी घेतला. याच जागी त्याची एन्डोस्कोपी जर भारतात झाली असती तर भारतीय डॉक्टरने त्याच वेळी(त्याच खर्चात) त्याची बायोप्सी केली असती आणि विम्याच्या खर्चात त्याचे उपचारहि झाले असते आणि तो नक्कीच जास्त जगला असता( कदाचित बरा सुद्धा झाला असता) . असे काही बळी मी अमेरिकन पद्धती (सिस्टीम) चे पाहिले आहेत म्हणून कोणती पद्धती बरोबर आणि कोणती चूक हे ठरविणे माल कठीण जाते. अमेरिकेत आपला जर आरोग्याचा विमा( विशेषतः कंपनीने केलेला) असेल तर आपल्याला उत्कृष्ट उपचार मिळू शकतात. पण आपण वृद्ध असला आणि सामाजिक सुरक्षा पद्धतीत असलात तर आपले हाल कुत्रा खाणार नाही.जुने जीर्ण रोग असतील तर आपली विमा कंपनी आपल्याला विमा देणार नाही आणि औषधांचा खर्च आपल्याला परवडणार नाही. माझा एक मित्र अमेरिकेत सांध्यांच्या रोगाचा तज्ञ आहे त्याने सांगितलेली कहाणी हृदयद्रावक आहे त्याचे कित्येक रुग्ण वृद्ध्श्रमात राहतात शेजारच्या घरातील वृद्ध माणूस मेला तर ते प्रथम त्याच्या औषधांची पेटी उघडून आपल्याला लागणारी औषधे काढून घेतात आणि मगच पोलिसांना मृत्यू झाल्याचा फोन करतात. त्याने परत परत सांगितले कि हि १००% सत्य गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अगदी खरं आहे. विमा कंपन्या

शिल्पा ब
Mon, 04/01/2013 - 00:25 नवीन
अगदी खरं आहे. विमा कंपन्या असले प्रकार करतातच. रुग्णालयाचा खर्च प्रचंड आहे. कारण कोणतंही असो प्रचंड खर्च ठरलेलाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझी ऐकीव माहिती

चौकटराजा
Mon, 04/01/2013 - 10:25 नवीन
माझा एक मित्र अमोरिकेत दोन वर्षे रहायला होता.त्यांच्या नोकरीवरच्या मित्राला हार्ट अटॅक आल्यासारखे झाले. त्याला हॉस्पिटलात टाकताना कोण वांधे आले या सहकार्याना. अमेरिकेतील डोक्टर्स हे कायद्याच्या भयाने पार भित्रट झाले आहेत. असे माझ्या मित्राचे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

विमा

सुबोध खरे
Tue, 04/02/2013 - 00:22 नवीन
अमेरिकेत एका सर्जन चा किंवा स्त्रीरोग तज्ञाचा व्यावसायिक क्षतीपुर्ती विमा(professional indemnity insurance) १००,०००/- डॉलर्स ( एक लाख डॉलर्स)वर्षाचा आहे. हि रक्कम साधारण अभियंत्याच्या(Engineer) वार्षिक पगाराच्या दुप्पट एवढा आहे. माझा २० लाख रुपयाचा वरील विमा फक्त रुपये २२००( दोन हजार दोनशे फक्त) वार्षिक आहे. हा विमा JCI ( joint commission international ) च्या मान्यतेसाठी (रुग्णालयाच्या) करणे आवश्यक होते. यावरून वरील विधानाची सत्यता जाणवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

भारंभार चाचण्याआणि पेशंटला लुबाडणे मान्य

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 14:53 नवीन
आपले म्हणणे सत्य आहे(दुर्दैवाने) आणि हि साथ वेगाने पसरत आहे
  • Log in or register to post comments

भारंभार चाचण्याआणि पेशंटला लुबाडणे मान्य

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 14:53 नवीन
आपले म्हणणे सत्य आहे(दुर्दैवाने) आणि हि साथ वेगाने पसरत आहे
  • Log in or register to post comments

चायला....गरोदर असणे हा रोग

टवाळ कार्टा
Sun, 03/31/2013 - 14:55 नवीन
चायला....गरोदर असणे हा रोग आहे का??? ;)
  • Log in or register to post comments

होय

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 15:10 नवीन
लग्न झाले आहे कि नाही त्यावर अवलंबून
  • Log in or register to post comments

हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच

यशोधरा
Sun, 03/31/2013 - 15:14 नवीन
हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच प्रतिसाद आहे ना? तुमचा व्यवसाय आणि अनुभव वगैरेंचा मान ठेवून्ही हा प्रतिसाद खूप खटकणारा आहे, हे नमूद करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अनेक जाणकार ,माननीय

निनाद मुक्काम …
Sun, 03/31/2013 - 20:42 नवीन
अनेक जाणकार ,माननीय मिपाकरांचे सुद्धा मत जाणून घेण्यास आवडेल. अर्थात त्यानं सूचक मौन पाळायचे असेल तर त्यावर कोण कशाला आक्षेप घेईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रतिसाद

सुबोध खरे
Sun, 03/31/2013 - 23:18 नवीन
यशोधरा ताई हा प्रतिसाद फक्त विनोदी नाही तर तितकाच सत्य आहे. विवाहपूर्व गर्भारपण हे किती तर्हेने त्रासदायक होऊ शकते हे पहिले तर तो रोग म्हणावा या पातळीवर पोहोचतो. नुसतेच त्यामुलीसाठी नव्हे तर आई वडिलांसाठीही काय घोर आहे ते सर्वाना माहिती आहेच पण ज्यावेळी या मुली गर्भपात करून घेतात त्यातून त्यंच्या मनावर एक कायमचा आघात होऊन राहतो. हे सर्वसामान्यपणे लोकांना जाणवत नाही. पण जेंव्हा या मुली लग्नानंतर वंध्यत्वा साठी उपचार घेण्यास येतात तेंव्हा प्राथमिक तपासणीत हा प्रश्न विचारला जातो कि आपण कधी गरोदर राहिला होतात काय? ( म्हणजे पूर्वी गर्भपात झाला आहे काय) कारण जी स्त्री एकदाही गरोदर राहिली नाही तिला प्राथमिक वंध्यत्व म्हणतात (primary infertility) आणि जिला एक मूल आहे किंवा अगोदर गर्भपात झाला आहे तिला दुय्यम (सेकंडरी) वंध्यत्व. दुय्यम वंध्यत्व हे उपचार करण्यासाठी जास्त सोपे आहे तसेच त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. ज्या स्त्रिया याज्मानांसह येतात त्या बाहेर(यजमानांसमोर) सांगतात अगोदरचे कोणतेही गरोदरपण नव्हते पण आत तपासणी साठी आल्यावर मात्र लग्नापूर्वी गर्भपात केला होता अशी मान खाली घालून कबुली देतात.अर्थात ज्यांना विनासायास मुल होते त्यांना हा विचार मन कुरतडत नसेल नाही असे म्हणता येणार नाही. हे प्रमाण गेल्या १० वर्षात चिंता करावे इतके वाढले आहे. म्हणून जी गोष्ट लग्नानंतर अत्यंत आनंदात जाहीर केली जाते ती लग्नापूर्वी काळजीची गोष्ट आहे म्हणून हा प्रतिसाद दिला. आपणास नक्की काय खटकले ते कळले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आपणास नक्की काय खटकले ते कळले

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/31/2013 - 23:58 नवीन
आपणास नक्की काय खटकले ते कळले नाही
शी.. कित्ती कित्ती बुरसटलेले विचार आहेत तुमचे... हाव ओल्ड फ्याशण्ड... इ इ च्या पठडीतले काही वाटले असेल ;-) (ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विमे, हल्लीच ना हो तुम्ही

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 08:49 नवीन
विमे, हल्लीच ना हो तुम्ही इतरांची खिल्ली उडवू नये वगैरे लेख लिहिलात? ते तुम्हांला स्वतःला लागू होत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काय यशोधरा ताई, मी फक्त

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 04/01/2013 - 11:27 नवीन
काय यशोधरा ताई, मी फक्त मस्करी करत होतो. तुम्ही इतके मनावर घ्याल असे वाटले नव्हते. मुळात ती तुमची खिल्ली नसून "लेकी बोले सुने लागे" प्रकार होता. तुमची आजवरची वाटचाल पाहता तुम्ही इतकी टोकाची मते मांडत नाहीत, इतर काही जण मांडतात. तुम्हाला हे कळेल अशी अपेक्षा होती. पण जाऊ दे, तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. अवांतर :- माझ्या धाग्यात मी "इतरांची खिल्ली उडवू नये" असे अजिबात दुरान्वयानेही म्हटले नाही हो. माझी आजवर इथली वाटचाल गेली इतरांची खिल्ली उडवण्यात. आपलेच दुकान कशाला बंद करू मी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असे झाले काय! बरं बरं. मला

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 12:14 नवीन
असे झाले काय! :) बरं बरं. मला डायरेक बोलायची सवय, तेह्वा ते लक्षात नाही आले. आत्ता आले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे,

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 09:16 नवीन
डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे, तरीही अशा अवस्थेला रोग म्हणणे, अशा स्त्रीला रुग्ण म्हणून वागवणे मला पटत नाही. निदान भारतात तरी अजूनही बहुतांशी लग्नाआधी फसवणूक, अज्ञान, जबरदस्ती इ. प्रकारांमुळे आणि घटनांमुळे गरोदरपण स्रियांवर लादले जाते. (दुर्दैवाने लग्नानंतरही हक्काच्या बायकोवर जबरदस्ती होते, तो एक वेगळाच विषय आहे, तेह्वा इथे नको.) एकूणच ज्या सामाजिक संस्कारांचा पगडा मनावर असतो, त्यामुळे, आधीच मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेल्या अशा मुली/ स्त्रियांना डॉ च जर रोगी म्हणून वागवू लागले, कुमारी माता होणं हा एक रोग आहे अशा प्रकारे बोलू लागले तर अशा कुमारी माता बाकी काही नाही तरी मनोरुग्ण बनायला/ डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागणार नाही हे निश्चित. एखाद्याच्या आयुष्यातल्या अपघाताला रोग म्हणणं कितपत संयुक्तिक? अपघातामुळे आयुष्य खुरटून जायला नको. त्याची सावली आयुष्यभर राहून त्याने आयुष्य खुरटायची गरज नाही. डॉ तर एखाद्या व्यक्तीला किती धीर देऊ शकतात! मनोबल वाढवू शकतात! त्याऐवजी डॉ नेच लग्नाआधी गरोदर राहिलेल्या मुलीकडे रोगी आणि असे गरोदरपण रोग अशा दृष्टीने पाहणे, असा विचारही करणे मला तरी चुकीचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रुग्ण (पेशंट) आणी रोगी मन

सुबोध खरे
Mon, 04/01/2013 - 09:51 नवीन
यशोधरा ताई, आपण ज्या अर्थाने रोगी म्हणता तो माझा अर्थ नाही. डॉक्टर कडे येणारी प्रत्येक व्यक्ती हि रुग्ण(पेशंट)म्हणूनच पहिली जाते डॉक्टर आणी पेशंट (रुग्ण) या अर्थाने तो शब्द वापरला जातो.उलट डॉक्टरची कुमारी मातांकडे (ज्यांच्यावर मातृत्व लादले गेले आहे) पाहण्याची वृत्ती जास्त सहानुभूतीपूर्वक असते. पण आजच्या काळातील अति अत्याधुनिक मुलींच्या वृत्ती बद्दलचे माझे म्हणणे आहे. कारण आपण गरोदर आहोत या बद्दल त्यांना फारशी लाज नसते आणी कानात झालेला मळ काढण्यासाठी कानाच्या डॉक्टर कडे जावे तसे त्या गर्भाशयात असलेल्या गर्भाकडे पाहत असतात. आम्ही मुलांना किंवा मुलीना कोणताही अतिरिक्त( सामाजिक नैतिक किंवा बोधप्रद) सल्ला देत नाही (डॉक्टर ने दिलेला कोणताही सल्ला घेण्याकडे त्या काय पकाऊ आहे अशा नजरेने पाहत असतात) गेल्या महिन्यात माझ्याकडे आलेली एक कॉलेज मधील मुलगी हे विचारत होती कि मूल कोणाचे हे ठरविता येईल काय? माझ्या स्वागत सहाय्यीकेने विचारले कि हे तुम्हाला का पाहिजे तेंव्हा ती म्हणाली कि माझे २ बॉय फ्रेंड्स आहेत तेंव्हा त्यातील कोणाचे हे मुल आहे?हे कळले तर त्याप्रमाणे पुढची कारवाई करता येईल( बहुधा पुढचा खर्च वसूल करता येईल). माझ्या सहाय्यीकेने जगबुडी आली असा चेहेरा केला होता. केमिस्ट कडून गोळ्या घेऊन गर्भपात करणाऱ्या स्त्रिया गर्भपात पूर्ण न झाल्याने रक्तस्त्राव होतो म्हणून येतात हे फारच नेहेमीचे आहे. तेंव्हा या दोन प्रवर्गात फरक कसा करणार. २००३ साली माझ्या पत्नीने तिचा दवाखाना चालू केला तेंव्हा तिची पहिली रुग्ण मुलुंड च्या केळकर कॉलेज ची एक मध्यम वर्गीय सुशिक्षित घरातील विद्यार्थिनी (स्त्री डॉक्टर म्हणून) याच साठी आली होती. तेव्हा मला पण थोडासा धक्का बसला होता. पण आता तशा मुली फार वारंवार येतात त्याचे काही वाटेनासे झाले आहे. अतिशय वेगाने गेल्याने अपघात होतो हि वस्तुस्थिती आहे पण अपघात झाल्यावर (तरी) काळजी घेणे कि त्यात काय मोठी गोष्ट( बिग DEAL) आहे?म्हणून त्याला डच्चू देणे या वृत्ती बद्दल काय बोलावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कोणताही सहृदय आणि आपल्या

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 09:55 नवीन
कोणताही सहृदय आणि आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि पेशाचे एथिक्स पाळणारा डॉ असा प्रतिसाद लिहील ह्यावर माझा विश्वास बसत नाहीये. आत्तापर्यंत शंका आली नव्हती पण आता तुमचा आयडीही जेन्यूईनच आहे का हीही एक शंका मनात डोकावायला लागली आहे, तेह्वा मे इथेच थांबते, बाकी चालू द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१००% जेन्युईन आयडी आहे. डॉ

अमोल खरे
Mon, 04/01/2013 - 10:06 नवीन
१००% जेन्युईन आयडी आहे. डॉ खरे हे माझे लांबचे नातेवाईक आहेत. त्यांच्या वडिलांना आणि सख्ख्या भावाला मी भेटलो आहे. त्यांच्या काकांना तर अनेकवेळा भेटलो आहे. डॉ खरे बराच वेळ मुंबईबाहेर असत म्हणुन त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. माझा आयडीही जेन्युईन आहे. कोणालाही विचारा. अ‍ॅडी जोशी, परा, रामदास काका सर्वांशी माझी भेट झाली आहे. वर त्यांनी दिलेला सल्ला हा आजकालच्या मुलींसाठी आहे ज्या सारासार विचार न करता वागतात आणि त्यांच्या कुटुंबियांना घोर लावतात. आता लग्नाआधी गरोदर राहणे ही गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जेन्यूईन आहे तर उत्तम आहे

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 10:14 नवीन
जेन्यूईन आहे तर उत्तम आहे :) >>आता लग्नाआधी गरोदर राहणे ही गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. >> हे माझ्या प्रतिसादात तुम्हांला कुठे दिसलं? हां, मला हे मात्र नक्कीच म्हणायचं आहे की हा "रोग" नाही आणि अगदी लग्नाआधी गरोदर राहण्याला रोग असं संबोधू नये. मुलगी एकटीच गरोदर रहात नाही. तिला गरोदर करण्यात करण्यात पुरुषांचा/ मुलांचाही सहभाग असतोच ना? की त्यांना सारासार विचार न करण्याची मुभा आहे? टाळी एका हाताने वाजत नसते, इतके लक्षात घ्या, चूकच असेल तर ती दोन्ही बाजूंकडून असते, तेह्वा फक्त मुलींनाच नावे ठेवण्याचे कारण समजू शकले नाही आणि माझ्याही घरामध्ये डॉ. आहेत, त्यांच्या तोंडी अशी जनरलायझेशन करणारी वा इतकी एकांगी विधाने ऐकली नाहीत म्हणून खूप आश्चर्य वाटले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

गैरसमज

सुबोध खरे
Mon, 04/01/2013 - 10:25 नवीन
यशोधरा ताई, पुरुष आणि स्त्री दोघेही एकत्र मेजवानी करतात आनंदाने सुग्रास जेवतात. जेवणानंतर पुरुष हात धुवून निघून जातो आणि स्त्री मागचे खरकटे उचलत राहते आणि स्वच्छता करीत राहते.आणि जग अस्वच्छ राहिल्याबद्दल स्त्रीलाच दोष देतो. दुर्दैवाने आपला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे आणि मी तो दूर करण्यात असफल झालो आहे. असो ईश्वरेच्छा बलीयसी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>जग अस्वच्छ राहिल्याबद्दल

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 10:27 नवीन
>जग अस्वच्छ राहिल्याबद्दल स्त्रीलाच दोष देतो. >> मग ते बरोबर की चूक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमच्या दृष्टीने काय करावे ?

मैत्र
Mon, 04/01/2013 - 10:26 नवीन
यशोधरा ताई, हा प्रतिसाद वाचून तुमचाही आयडी हॅक झाला आहे असे अनेकांना वाटू शकेल. हिरानंदानी रुग्णालयाचे विभाग प्रमुख डू आयडी घेऊन नौदलातल्या दोन दशकांचे विविध अनुभव मांडतील असं विधान करणं किती वैयक्तिक आहे? मी या खरेंना अजिबात ओळखत नाही. त्यामुळे त्यांची वकिली करत नाहीये. तुम्ही चक्क त्यांचा आयडी खोटा असल्याचा आरोप करून इथेच थांबते असा मार्ग स्वीकारणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? वरच्या प्रतिसादातल्या प्रत्येक घटनेत प्रस्तुत डॉक्टर (खरेच असे नाही. कोणी असतील ते डॉक्टर) कसे वागावे म्हणजे ते पेशाचे एथिक्स पाळण्यासारखे होईल ते सविस्तर लिहावे ही विनंती. दोन पैकी कुठला बॉयफ्रेंडचे मूल आहे हे विचारणार्‍या मुलीशी सहृदय म्हणजे काय वागले पाहिजे हे नेमक्या शब्दात सांगावे. यापूर्वी या धाग्यांवर अनेकांने विपर्यस्त विधाने केली पण त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचे हे मत वाचून विचारावेसे वाटले. विचारणे चुकीचे वाटले तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गैरसमज (कसे वागावे)

सुबोध खरे
Mon, 04/01/2013 - 10:40 नवीन
यशोधरा ताई मी कोणत्याही रुग्णाशी सहृदयतेने वागत नाही असा आपला समज का झाला ते कळत नाही. माझ्या मनात काय विचार आहेत आणी मी रुग्णाशी कसा वागतो त्याचा काहीही संबंध नाही. माझ्याकडे आलेला राजकारणी ज्याने माझ्या मित्राची आयुष्य भाराची कमाई बुडविली होती( घरासाठी पैसे घेऊन न दिल्याने) अशा माणसाशी सुद्धा मी सभ्य पणे च वागलो आणी वागत आलो आहे.व्यवसाय नीती (PROFESSIONAL ETHICS) हे डॉक्टरांना शिक्षणक्रमात च शिकविले जाते आणी प्रत्यक्ष कामाच्या वेळी उदाहरणाने दाखविले जाते. जर माझ्या विचार व्यक्त करण्याने कोणाचा गैरसमज होत असेल तर मी माझे विचार प्रकट करणेच थांबवितो. नुसता काथ्याकुट घालण्यात काय हशील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

डॉ. आपण व्यावसायिक सहृदयतेने

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 11:16 नवीन
डॉ. आपण व्यावसायिक सहृदयतेने नक्कीच वागत असाल पण त्याच वेळी इतक्या सरसकट तुम्ही मुलींना/ स्त्रियांना दोषी मानत आहात हे मला खटकते आहे. सगळ्याच मुली/ स्त्रिया मज्जा म्हणून लग्नाआधी गरोदर रहात नाहीत. खरकटे साफ न केल्याबद्दल जर समाज फक्त स्त्री वर्गाला दोषी ठरवणार असेल, तर समाजाची मानसिकता - जी एकदम बदलणार नाही - बदलायची गरज आहे. त्यासाठी आपण आपल्या हुद्द्याचा, अनुभवाचा आणि सहृदयतेचा उपयोग करण्याऐवजी इअतकी नकारात्मक भूमिका का स्वीकारता आहात, हा मल प्रश्न पडला आहे. इतरांच्या मुली/ स्त्रिया ह्यांना जज करणे फारच सोपे आहे, परंतु समजा स्वतःच्या कुटुम्बात असे काही घडले तर तुमच्या सहाय्यिकेचा जगबुडी आल्यासारखा केलेला चेहा तुम्हाला कितपत आवडेल आणि मानवेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी ज्येष्ठ??

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 11:10 नवीन
मी ज्येष्ठ?? :D मैत्र, मीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वा इथे कोणीही द्याल का? :) >>दोन पैकी कुठला बॉयफ्रेंडचे मूल आहे हे विचारणार्‍या मुलीशी सहृदय म्हणजे काय वागले पाहिज>>>> ती डॉ कडे पेशंट म्हणून आली ना? मग तिच्या प्रश्नांची उत्तरे देणे, तिचे शंकासमाधान करणे हे पहिले कर्तव्य. तिच्या प्रश्न विचारण्यामुळे वा काय प्रश्न विचारला आहे ह्यावरुन तिचे कॅरॅक्टर जज करणे हे डॉ चे वा त्यांच्या दवाखान्यातल्या कोणत्याही स्टाफचे काम नाही. त्याचे पैसे घेतात का ते? डीएनए टेस्टींगवरुन अपत्य कोणाचे हे सांगता येते ना? हे कितपत सहज सोपे वा कठीण आहे/ शक्य आहे की अशक्य ह्याचा उहापोह पेशंटशी व्हावा. वाद घालायचा म्हणून मी वाद घालत नाहीये. माझा तसा काहीच उद्देश्य नाही, पण जिथे मी आयडीवरुन शंका व्यक्त केली ( डुप आहेच असे म्हटलेले नाही) - कारण तो प्रतिसाद वाचून मला खरोखर थक्क व्हायला झाले. डॉक्टर हा अजूनही भारतीय समाजातला बर्‍यापैकी आदर मिळत असलेला घटक आहे. सहाय्य्क बाईनी जेव्हा जगबुडी आल्यासारखा चेहरा केला तेव्हा डॉ नी पहिली समज त्याना देणे फार आवश्यक होते. सहाय्यक बाईना हा अधिकार कोणी दिला? त्या मुलीबरोबर नेमके काय घडले हे डॉ वा सहाय्यक बाईना ठाऊक होते काय? आणि ठाऊक असले तरी एखाद्याला असे वागवणे डॉ संहितेत बसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा