तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....
असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये न्हाऊन निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!
मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....
असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक. कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव. कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही आध्यात्मिक साधना.
"लौकिक जीवनात राहणार्या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."
कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.
छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....
ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.
गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्यां कपार्यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात... ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही, उलट, तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली!
मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!
इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...
जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!
क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....
शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...
तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..
किंवा,
केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....
हृदयातून उमाळत, उसासत येणार्या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ
आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.
तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...
तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..
प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...
तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...
शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...
सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरते तर खरीच, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?
तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...
आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे. अर्थात, जगाला विटून, संसाराचा उद्वेग, उबग येऊन, वैतागून आलेले हे वैराग्य नव्हे. नाही म्हणायला जगाचे अनुभव, बर्या वाईटाचे संचितही आता गाठीशी भरपूर जमा झालेत. तिला कधीचे बरेच काही उमजले आहे.. जरी सगळ्यांत अजून ती रमते आहे, तरीही त्यातून दूरही होते आहे.
कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?
हळूहळू सगळ्यांत असूनही नसण्याची मजा तिला उमगली आहे, सगळ्यांत नसूनही असता येते हेही लक्षात आलेय. तिला उमजलेय की आज जे असेल ते उद्या असेलच असे नाही, आयुष्याचं कोडं उलगडेलच असंही नाही. काही अक्षत टिकेल असंही नाही. स्वतःच्याच मनाचा भरवसा देता येत नाही, मग दुसर्यांचा कोणी द्यावा?
मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....
ज्ञात अज्ञाताचा पाठशिवणीचा खेळ आता तिच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, त्या अफाट पसार्याची कळत नकळत पुसटशी जाणीव झालीये आणि आपल्या अट्टाहासांच्या मर्यादाही जाणवल्यात. आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी हे जाणवून सारं कसं लख्ख समोर आलं आहे...
शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...
तिची काही तक्रार नाही, आता काही मागणी नाही, इच्छा नाही. जे काही आयुष्य पुढ्यात आले, जसे काही दान पदरात पडले त्यात सर्वांतच लावण्याची जत्रा शोधणारी ही कविता. आता तिला अलौकिकाची कळा चढली आहे. ती शेवटचे ऋण व्यक्त करते आहे. अंतर्बाह्य शब्दसौंदर्याने सजून झाल्यावर आता उरले तरी काय?
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
उमलल्या शब्दी नवीन पहाट
पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ
श्वासी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे....
वाचन संख्या
10090
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय उत्कट रसपान
सहमत
In reply to अतिशय उत्कट रसपान by शुचि
सुरेख लेखन आहे यशो.
रसग्रहण वगैरे असे नाही रेवती.
In reply to सुरेख लेखन आहे यशो. by रेवती
__/\__
अहाहा..
बोरकरांच्या कवितेला उलगडण
In reply to अहाहा.. by उपास
दिव्यत्वाची प्रचिती
निव्वळ अप्रतिम!!
उत्कट
उस्फुर्त, दाट, आणी आशयघन.
सलाम __/\__
वाह! अप्रतिम लिहिले आहे
अप्रतिम लेखन !!
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
मस्त आवडले लेखन.
सुरेख रसग्रहण
अतिशय सुंदर यशो, फार आवडलं
तू आहेस कुठे गं?
In reply to अतिशय सुंदर यशो, फार आवडलं by पुष्करिणी
तुझ्याकडे कवितांचा अक्षय्य
किती गं सुंदर !
खूपच दिवसांनी पाहिले तुला
In reply to किती गं सुंदर ! by मितान
नितांत सुंदर
छान
अर्धवट लिहिले होते आधी, इथे
In reply to छान by महाबळ
आहा!
अहाहा..
अहाहा !!
सर्वांचे मनापासून आभार.
आभार आम्ही तुमचे मानले
मर्मबंधातली ठेव
हे वर्णन गोव्याबिव्यातल्या
In reply to मर्मबंधातली ठेव by राही
अरेरे
फोनवरचे पुढले सगळे स्पष्टीकरण
In reply to अरेरे by राही
(No subject)
In reply to फोनवरचे पुढले सगळे स्पष्टीकरण by यशोधरा
ह्ये यास फ्यास हुश्शारगिरी
In reply to (No subject) by आजानुकर्ण
हा हा
In reply to अरेरे by राही
हे म्हणजे मान न मान झाले की!
In reply to हा हा by आजानुकर्ण
हो पण काय लिहिले आहे
In reply to हे म्हणजे मान न मान झाले की! by यशोधरा
आजानुकर्णांशी सहमत.
In reply to हो पण काय लिहिले आहे by आजानुकर्ण
तरी इथे अनेक सदस्य एकमेकांची
In reply to हो पण काय लिहिले आहे by आजानुकर्ण
धाग्याशी संबंध आहे
In reply to तरी इथे अनेक सदस्य एकमेकांची by यशोधरा
राही आणि यशोधरा
माझा वैयक्तिक वाद काहीच
In reply to राही आणि यशोधरा by पैसा
मला मुद्दा समजलेला नाहीये
In reply to राही आणि यशोधरा by पैसा
मला पण कळले नाही
In reply to मला मुद्दा समजलेला नाहीये by आजानुकर्ण
कारण
तुमच्याशी माझा काहीच वैयक्तिक
In reply to कारण by राही
सुंदर रसग्रहण!!
अप्रतीम!