Skip to main content

गाथा 'टायटन' ची - टायटन एज्

लेखक मोदक यांनी शनिवार, 09/03/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.

गाथा टायटनची - टायटन एज्

टायटन.

हे नांव ऐकले की ती सुप्रसिद्ध ट्यून डोक्यात वाजू लागते. ती प्रेमळ आजीबाई आणि तो मुलगा...

आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनगटावर 'टायटन' मानाने विराजमान झालेले असेल. सोनाटा, फास्टट्रॅक, रागा, रिगालिया, नेब्युला ही याचीच भावंडे!

जगातली पाचव्या क्रमांकाची मनगटी घड्याळाची कंपनी, भारतीय बाजारपेठेमधले प्रचंड हिस्सा, ९००० कोटीचा टर्नओव्हर, आणि २०११ मध्ये Favre-Leuba या जवळपास ३०० वर्षे जुन्या स्विस कंपनीला विकत घेणे या अचाट गोष्टी केवळ २५ वर्षात घडल्या आहेत यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही पण या अविश्वसनीय गोष्टींमुळे मनगटी घड्याळांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये टायटनने आपले व पर्यायाने भारताचे नाव मानाने कोरले आहे.
"घड्याळांच्या विश्वामध्ये परंपरा न लाभलेल्या भारतासारख्या देशामधील एक नवखी कंपनी हे सगळे अल्पावधीत साध्य करते" ही वस्तुस्थिती टायटनच्या यशाला एक विशेष आयाम प्राप्त करून देते.

या घडामोडींमागे एक द्रष्टा माणूस आहे.

झेरसेस देसाई.

.

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण सुरू असताना सुट्टीवर भारतात आलेले देसाई (शिक्षण सोडून!) १९६१ साली टाटा ग्रूपमध्ये सहभागी झाले. टाटा केमीकल्स, टाटा इंडस्ट्रीज, इंडीयन हॉटेल्स (ताज) आणि टाटा प्रेस अशा वेगवेगळ्या टाटा कंपन्यांसोबत काम केल्यानंतर १९८५ साली टाटा आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या एकत्रीत पुढाकारातून स्थापना झालेल्या टायटन मध्ये त्यांची रवानगी केली गेली, तिथून पुढे १५ वर्षे देसाई आणि टायटन ही नावे एकत्र घेतली गेली.
(झेरसेस देसाई जरी २००२ मध्ये रिटायर झाले असले तरी टायटनच्या आजच्या यशामध्येही त्यांचे योगदान आहे!)

१९८५ साली एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने टाटांनी घड्याळाच्या क्षेत्रात पाऊल टाकले ते टायटन या नावाने! सुरूवातीला घड्याळाच्या मशीन पासून संपूर्ण घड्याळ तयार करण्यापर्यंत सर्व तंत्रज्ञान फ्रेंच कंपनीने पुरवले. मे १९८७ पासून टायटनने व्यावसायीक उत्पादन सुरू केले व उण्यापुर्‍या पाच वर्षांमध्ये संपूर्ण तंत्रज्ञान, सर्व बारकावे इत्यंभूत अवगत करून घेवून फ्रेंच तंत्रज्ञानापेक्षा उत्तम प्रतीची घड्याळे आपण बनवू शकतो हा आत्मविश्वास कमावला. यानंतर दोन वर्षे अविरत संशोधन करून टायटन ने आपले स्वतःचे पहिलेवाहिले मशीन (Watch Movement) बनवले. जागतीक मानांकनाच्या सर्व चाचण्या या मशीनने पार पाडल्या. आता टायटन घड्याळे भारतीय प्रमाणवेळ "भारतीय" मशीनने दाखवू लागले. हे साल होते १९९३-१९९४. यादरम्यान आलेली टायटनची घड्याळे जर कोणाला आठवत असतील तर हे सहज लक्षात येईल की ही घड्याळे बटबटीत व आजच्या तुलनेने बेढब असली तरी हळूहळू लोकप्रिय होत होती. एचएमटी व त्या दरम्यानच्या बाकीच्या घड्याळांच्या तुलनेमध्ये टायटनचे नाव अल्पावधीमध्ये वेगाने घोडदौड करत होते.
(१९९३-९४ च्या दरम्यान टाटा ग्रूपने नवीन अध्यक्ष रतन टाटांच्या नेतृत्वाखाली एकसंधतेकडे वाटचाल सुरू केली होती. टाटा ग्रूप अजून एकसंध झाला नसल्याने टायटन च्या डोक्यावर असलेला टाटांचा हात जाहिरातींमधून दिसावा तितका दिसला नव्हता. त्यामुळे "टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी" - हा माझा अंदाज आहे!)

घड्याळांच्या विश्वामध्ये काही ठोकताळे आहेत, कित्येक वर्षे यांमध्ये काही बदल झाले नाहीयेत. जगातल्या कोणत्याही क्षेत्रात कितीही सुधारणा झाली व कोणत्याही देशाने कितीही प्रगती केली तरी घड्याळांच्या विश्वामध्ये अंतीम शब्द हा 'स्विस' घड्याळांचा. स्विस डिझाईन्स, स्विस तंत्रज्ञान आणि स्विस दबदबा. या दबदब्याला आजपर्यंत आव्हान मिळालेले नव्हते. जगातली यच्चयावत सर्व घड्याळे स्विस घड्याळांवरून प्रेरीत असतात आणि लेडीज घड्याळे ही जेंट्स घड्याळांची छोटी आवृत्ती असते. हा अलिखीत नियम वर्षानुवर्षे चालत आला होता. टायटनची सुरूवातीची घड्याळे याला अपवाद नव्हती. सुरूवातीची घड्याळे,

१९९४ झेरसेस देसाईंना एक नवीन कल्पना सुचली.

एक शक्य तितक्या कमी जाडीचे घड्याळ तयार करायचे. हे घड्याळ इतके पातळ हवे होते की संपूर्ण घड्याळाची अपेक्षीत जाडी होती ३.५ मिलीमीटर, अगदी काचेपासून ते क्राऊन (ज्या गोलाच्या सहाय्याने आपण पूर्वी घड्याळाला किल्ली द्यायचो व सध्या वेळ ठीकठाक करतो) आणि मागच्या कव्हरपर्यंतचा सर्व भाग ३.५ मिलीमीटर मध्ये बसतील इतके पातळ घड्याळ व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट हवे होते. जगभरातल्या या प्रकारच्या घड्याळांचा आढावा घेतल्यानंतर 'टीम टायटनच्या' एक गोष्ट लक्षात आली की या मोजमापाचे घड्याळ आत्तापर्यंत बनले नाहीये, तसेच अशी घड्याळे एकतर अल्ट्रास्लिम असतात किंवा वॉटर रेझिस्टंट. दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र उपलब्ध नसतात.
"अल्ट्रास्लिम" याप्रकारात जी घड्याळे बनतात ती फक्त "कन्सेप्ट वॉच" असतात. कल्पनेतल्या वस्तूंप्रमाणे ही घड्याळे बनतात व लगेचच घड्याळांच्या म्यूझीयममध्ये किंवा एखाद्या घड्याळ तयार करणार्‍या कारखान्याच्या शोकेसमध्ये जावून बसतात. रोजच्या वापरासाठी, वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अशी घड्याळे बनत नाहीत आणि टायटनला नेमके हेच करायचे होते.
"काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन, काहीतरी अशक्य" या आपण घेतलेल्या ध्यासाने "टायटन" आपली छाप जगावर सोडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. अगदी टीम टायटनला ही नसेल!

या टीम टायटन मध्ये होते बी.जी. द्वारकानाथ (चीफ टेक्नॉलॉजी ऑफीसर), सुब्रमण्य भट्ट (हेड ऑफ वॉच मूव्हमेंट अँड R&D) बी.व्ही. नागराज (हेड ऑफ प्रॉडक्ट इंजीनीयरींग), हरी राव (चीफ मॅन्युफॅक्चरींग ऑफीसर), रफीक अहमद (जनरल मॅनेजर - केस मॅन्युफॅक्चरींग) आणि झेरसेस देसाई.

त्यावेळच्या परंपरेप्रमाणे ही टीम स्वित्झर्लंडमध्ये; घड्याळांच्या भूमीमध्ये गेली, "Slimmest Water Resistant Watch" इतकीच कल्पना डोक्यात ठेवून. तिथून त्यांना नि:संदिग्ध उत्तर मिळाले, "कोणतेही घड्याळ एकतर अल्ट्रास्लिम असेल किंवा वॉटर रेझिस्टंट. दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र शक्य नाही" आणि जी मोजमापे टायटनला हवी होती ती आजपर्यंत कुणीही कल्पनेमध्ये सुद्धा विचारात घेतली नव्हती. एका वेगळ्या कल्पनेवर निरूत्साही उत्तर मिळाल्याने निराश झालेली टीम भारतात परतली पण याच मुद्द्यावर देसाईंची लढावू वृत्ती जागी झाली. "स्विस हे करू शकत नाहीत म्हणजे आपणसुद्धा हे करू शकणार नाही" या विचारधारेला त्यांनी उत्तर दिले..
"स्विस एखादी गोष्ट करू शकत नसतील तर तीच गोष्ट आपण करून दाखवूया!" या विचारधारेने.
अजाणतेपणे 'टीम टायटन' ने स्विस घड्याळांच्या दबदब्याला आव्हान द्यायचे, सर्व अलिखीत नियम बदलण्याचे ठरवले. मात्र कोणताही गाजावाजा न करता. अगदी स्वतःच्याही नकळत!!

झेरसेस देसाईंचा अनुभव, टायटनकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, टायटनचे वेगवेगळ्या विभागातले तज्ञ आणि सर्वांचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्यांनी पहिले लक्ष्य ठेवले "एक अल्ट्रास्लिम घड्याळाचे मशीन(Watch Movement) तयार करणे" या मशिनचे वैशिष्ट्य..? संपूर्ण मशीनची जाडी फक्त १.१५ मिलिमीटर.

अशा प्रकारचे मशीन बनवणे हे एक अशक्य कोटीतले काम होते.

टायटनसाठी तर हे जबरदस्त आव्हान होते, कारण..?? कंपनीचे वय फक्त नऊ वर्षे (त्यातही उत्पादनाचे वय सात वर्षे), जगातल्या 'व्हूज व्हू' च्या तुलनेमध्ये कंपनीचे नाव दूर दूरपर्यंत दृष्टीक्षेपात नाही. कंपनीकडे घड्याळांच्या उत्पादनाचा कोणताही मोठा अनुभव पाठीशी नाही. घड्याळांच्या जगातले कोणतेही मोठे नाव कंपनीसोबत जोडले गेलेले नाही आणि हे सर्व घडते आहे अशा देशामध्ये ज्या देशाचा तंत्रज्ञानाबद्दल फारसा नावलौकीक नाही. आर्थिक संकटातून सावरणारा देश अशीच आपली प्रतिमा होती १९९४ च्या दरम्यान.. अशा देशातून एक नवखी कंपनी जिने अजून स्वतःला कोणत्याही आघाडीवर सिद्ध केलेले नाहीये ती कंपनी असा विचार करत होती की "जे आत्तापर्यंत कोणालाही जमले नाही ते आम्ही करू" थोडेसे हास्यास्पद, थोडेसे अतिआत्मविश्वासाचे, बरेचसे अतिशयोक्तीचे विचार वाटत असतील.
पण या विचारांमागेसुद्धा एक हुषार विचार होता. जगातल्या आघाडीच्या कंपन्यांसोबत जर टायटनचे नाव घेतले जावे असे वाटत असेल तर फक्त बाजारपेठेतील हिस्सा, विक्रीचे अधिक्य वगैरे गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट असेल "तंत्रज्ञान!" तंत्रज्ञानातील आघाडी टायटनला मानाचे स्थान मिळवून देईल व बाकी सर्व गोष्टीं सहजरीत्या साध्य होतील!!

पण तंत्रज्ञानामध्ये मदत कोण करणार..? टायटनने हे भलेमोठे आव्हान अगदी जोषात स्वीकारले असले तरी त्यांच्या पाठीशी आत्तापर्यंत केवळ एक मशीन बनवण्याचा अनुभव होता. दुसरे मशीन बनवताना त्यांना तोच अनुभव वापरावा लागणार होता. पण या दोन मशीनमधला फरक लक्षात घेता त्यांना शून्यापासून सुरूवात करावी लागली. स्विस कंपन्यांकडून मदत मिळण्याची शक्यता संपुष्टात आली असताना त्यांना सर्व गोष्टी इथेच उपलब्ध साधनांमध्येच तयार कराव्या लागणार होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम टायटन अशा गोष्टीबाबत विचार करत होती जी यापूर्वी कधीच घडली नव्हती. झेरसेस देसाईंनी मशीनचे मोजमाप दिले, मशीनची जाडी १.१५ मिलीमीटर. आत्तापर्यंत बनलेले सर्वात स्लिम मशीन होते ३.४ मिलीमीटरचे. नवीन मशीनची जाडी उपलब्ध मशीनपेक्षा अर्ध्याहून कमी हवी होती. घड्याळाच्या मशीनला लागणार्‍या सर्व किचकट भागांचे अनेकवेळा मूल्यमापन केले गेले. सर्व छोटे भाग आणखी छोटे करणे व अपेक्षीत मोजमापांमध्ये बसवणे कागदावर शक्य दिसत होते.
मुख्य अडचण सामोरी आली ती बॅटरी / सेलची. घड्याळाचे चलनवलन सुरू ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सेलच्या बाबतीत एक साहजीक गोष्ट होती की सेल जितका लहान तितका त्याचा पॉवर बॅकप कमी. टायटन एज् ला वॉटर रेझिस्टंट ठेवण्यामागे सेलचा मोठा वाटा होता. जर सेल बदललण्यासाठी बॅक कव्हर वारंवार काढावे लागणार असेल तर घड्याळ वॉटर रेझिस्टंट राहिलच याची खात्री नव्हती. लहान सेलमुळे ही अडचण भेडसावणार होती. खूप शोधाशोध करून अमेरीकेतील एक पुरवठादार सापडला, त्याने एक लहान परंतु थोडाफार जास्ती पॉवर बॅकप देणारा सेल डिझाईन केला. टीम टायटन तरीही खुष नव्हती, घड्याळाच्या मशीनमध्ये सर्वात जास्ती पॉवर खाणारी गोष्ट म्हणजे 'स्टेप मोटर' सरतेशेवटी अथक प्रयत्नांनी त्यांनी स्टेप मोटरसाठी एक सिलीकॉन चीप विकसीत केली व हा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी ठरला. त्या लहान परंतु थोडाफार जास्ती पॉवर बॅकप देणार्‍या सेलची क्षमता तितकीच असूनही पॉवर बॅकप दुप्पट झाला.

अथक परिश्रमाने तयार केलेले मशीन होते १.१५ मिलीमीटर जाडीचे! टायटनने एक मोठा टप्पा गाठला होता. आता त्यांना दुसरा तितकाच मोठा टप्पा खुणावत होता. घड्याळाची केस तयार करणे. केसींगचे तंत्रज्ञान जरी साधे वाटले तरी ते खूप किचकट असते. घट्ट बसणारे बॅक कव्हर, काच आणि केसींग मधली अत्यंत कमी परंतु आवश्यक जागा, डायल, काटे आणि क्राऊन यांचा समतोल वगैरे बाबींमध्ये काम करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते कारण हव्या त्या प्रमाणात जागा उपलब्ध नसते. क्लीअरन्स खूप कमी असतो. एज् च्या बाबतीत क्लीअरन्स होता १०० मायक्रॉन्स. (एका मानवी केसाइतका फरक)

हे मशीन घेवून टीम पुन्हा स्वित्झर्लंडला गेली. Basel येथे भरणार्‍या जगप्रसिद्ध वॉच फेअर मध्ये त्यांनी या अल्ट्रास्लिम मशीन साठी अल्ट्रास्लिम केसची शोधाशोध सुरू केली. "हे तुम्ही तयार केले आहे..?" या प्रश्नाला टीम टायटनला अनेक ठिकाणी सामोरे जावे लागले. मोठया कंपन्याच्या मोठ्या लोकांनी हा प्रश्न विचारताना त्यातून डोकावणारा अविश्वास टीमला सुखावत होताच! मातब्बर घड्याळ कंपन्यांचा 'एज्'च्या कल्पनेवर याआधी विश्वास बसला नव्हता, आता मात्र त्यांनी आपली असमर्थता उघडपणे व्यक्त केली. त्यांनी या प्रकारच्या घड्याळासाठी केस बनवणे हे आपल्या क्षमतेबाहेर आहे हे कबुल केले.

टीम टायटन पुनश्च: नकार घेवून भारतात परतली. ओघानेच त्यांनी घड्याळाची केस भारतात बनवण्याचा निर्णय घेतला.

टायटन एज् च्या नाही पण घड्याळाच्या मशीनचा एक फोटो.

केस बनवण्याची सुरूवात करण्याआधी टीम टायटनला प्रमुख समस्या भेडसावत होती ती घड्याळाच्या काचेची. सर्वसाधारणप्रमाणे घड्याळाच्या काचेची जाडी १.३ मिमी असते, टायटन ला गरज होती ०.३ मिमी काचेची. काचेची जाडी जितकी कमी असेल तितकी ती नाजूक होणार याची जाणीव ठेवून, या मोजमापामध्ये बसणार्‍या, घड्याळाला शोभणार्‍या परंतु दैनंदिन वापरायोग्य अशा काचेचा शोध सुरू झाला. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात काचेने तग धरला पाहिजे ही घड्याळ वापरणार्‍यांची अत्यंत वास्तव अपेक्षा असणार होती. ही काच इतकी पातळ असूनही तितकीच मजबूत हवी होती. घड्याळाची केस व काचेमधून पाणी पाझरणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक होते. सेल प्रमाणे प्रचंड शोधाशोध करून एक उपाय सापडला "सफायर काच". ही विशिष्ट काच स्वित्झर्लंडमधून आयात केली गेली.

एकदा काचेचा प्रश्न सुटल्यानंतर दुसरा प्रश्न समोर आला घड्याळाच्या क्राऊनचा. कारण इतक्या कमी जाडीच्या केसमध्ये क्राऊनसाठी छेद करणे / ड्रिल करणे हे ही अवघड काम होते. ०.१ मिमीच्या मेटलमध्ये ड्रिल करण्यासाठी टायटनने खास उपकरणे बनवली.

घड्याळाच्या पट्ट्याच्या बाबतीतही हीच कथा. खूप स्लिम परंतु तितकाच पातळ असा चामड्याचा पट्टा तयार करण्यासाठी जगभरचे पुरवठादार आपली असमर्थता व्यक्त करत असताना शेवटी भारतातला एक जण तयार झाला. आज जगभरामध्ये या प्रकारच्या घड्याळांना पट्टे पुरवण्याचे काम त्याच्याकडे आले आहे.

सरतेशेवटी एकूण जाडी ३.५ मिमी असलेले टायटन एज तयार झाले. मशीनमधल्या सेलपासून काचेपर्यंत सर्वच बाबींमध्ये नवे शोध लावून टायटन ने जे साध्य केले त्याचा आजपर्यंत कधीही विचार झाला नव्हता. आजपर्यंत कुणालाही असे घड्याळ तयार करणे जमले नव्हते

.

स्वित्झर्लंडमधल्या "Fleurier Quality Foundation" या Indipendent Horological Testing Agency कडे ही घड्याळे रवाना केली गेली. अतीउष्ण तापमान, अतीथंड तापमान, तापमानातील अचानक बदल अशा अनेक चाचण्यांसोबत शॉक टेस्ट, बंप टेस्ट, ड्रॉप टेस्ट अशा अनेक चाचण्या यशस्वीपणे पार पाडून टायटन एज् ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले, वापरण्यायोग्यतेच्या प्रमाणपत्रासह टायटन एज् 'वॉटर रेझिस्टंट' आहे असेही प्रमाणपत्र मिळाले. या चाचण्या लीलया पार पाडण्यामागेही टीम टायटनची एक हुषारी कारणीभूत होती. टेस्टसाठी घड्याळे पाठवण्याआधी 'इन हाऊस टेस्टींग सेंटर' मध्ये त्यांची अत्यंत खडतर प्रकारे परिक्षा घेतली गेली होती. आणि त्या परीक्षा यशस्वी पार पाडल्यानंतरच पुढची पाऊले उचलली गेली. वॉल टेस्ट (घड्याळ भिंतीवर फेकून मारणे), फ्लोअर टेस्ट (वेगवेगळ्या दिशेने घड्याळ जमिनीवर पाडणे), पूल टेस्ट (घड्याळ एका स्विमींग पूलमध्ये बुडवून ठेवणे) आणि बेंगलोर-होसूर रोड टेस्ट (गाडीच्या मागच्या शॉक अ‍ॅब्सॉर्बरला घड्याळ बांधून बेंगलोर-होसूर मधला २०० किमीचा खड्ड्यांचा रस्ता अनेकदा पार करण्यात आला) या चमत्कारीक टेस्ट करण्यामागे बी.जी द्वारकानाथांचा साधा विचार कारणीभूत होता. एजन्सीमध्ये केल्या जाणार्‍या टेस्ट्मध्ये "रिअल लाईफ सिच्यूएशन" तयार करता येत नाही.
मजेदार गोष्ट म्हणजे टायटन एज् ने याही चाचण्या व्यवस्थीत पार पाडल्या.

अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता बाजारपेठेमध्ये आलेल्या या "Slimmest Water Resistant Watch" ने भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला.

टायटन एज्

.

टायटन एज् ची दुसरी पिढी..

.

१७ व्या शतकापासून सुरू असलेल्या या घड्याळांच्या विश्वामध्ये प्रवेश करून, स्थापनेपासून पंचविशी दरम्यान 'जगातली पाचव्या क्रमांकाची घड्याळ उत्पादक कंपनी' ही टायटनने मारलेली मजलही एज् च्या कथेप्रमाणे अचाटच!

पुढील भागात पाहूया टायटनने भेट दिलेली अशीच एक सुंदर कलाकृती..

*****************************************************************
ओमेगा आणि इतर कंपन्यांनी टायटन एज् इतकीच किंवा त्याहूनही स्लिम घड्याळे तयार केली आहेत, परंतु ती घड्याळे वॉटर रेझिस्टंट नाहीयेत आणि ती दैनंदिन वापरायोग्य नाहीयेत.
*****************************************************************
लेखातली बरीचशी माहिती "Making Breakthrough Innovation Happen" या पुस्तकातून, ही प्रताधिकारीत माहिती लेखामध्ये वापरण्यासाठी दिलेल्या परवानगी बाबत लेखक 'पोरस मुन्शी' यांचे आभार.

पुस्तकातील मूळ लेखाचे सर्व हक्क "EREHWON Innovation Consulting" या कंपनीकडे. EREHWON Innovation Consulting चे श्री राजीव नारंग यांचेही आभार.

सर्व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार.

*****************************************************************

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26309
प्रतिक्रिया 70

प्रतिक्रिया

इंग्लिश वर्तमानपत्रात, मॅगझीनमध्ये रोलेक्स, टिस्सो च्या फुल पेज कलर अ‍ॅड दिसायच्या. नंतर त्याच्या किंमती कळल्यावरच ती घड्याळे जाहिरातीतच राहायची. टायटन सोनाटा टायमेक्स फास्टट्रॅक निदान आमच्या आवाक्यातले तरी.
शेवटी इडीयट आमीरबाबाचंच पटतं. "मेरी ढाईसौ की है पर वक्त तो वही दिखाती है यार"
असो. छान आणि माहितीपूर्ण लेख मोदकराव.


लेख आवडला.

आता झैरातः

माझ्याकडे एक टायटन, एक टाइमेक्स आणी एक स्वीस मिलीटरी क्रोनो(वर्जिनल स्वीसमधुन घेतलेले) असे तीन घड्याळे आहेत.


खुप सुंदर. लेखाबद्दल धन्यवाद.

टायटन बद्दल नेहमीच अभिमान वाटत आला आहे. सध्या टायटनचे एक नितांत सुंदर घड्याळ वापरतो आहे (बायकोने भेटे दिलेले). ते घातल्यावर अनेकांनी (गोरे इन्क्ल्युडेड) नाइस वॉच अशी टिप्पणी केली. आणि परदेशी बनावटीचे असेल अशीच त्यापैकी बहुतेकांची धारणा होती. घड्याळ टायटन या भारतीय कंपनीचे आहे हे ऐकुन त्यांना कौतुकही वाटले. त्यापैकी बर्‍याचदा मी टायटन कशी ऐ भारी आहे हे लोकांना सांगितले.

टायटनचे एक अतिशय सुंदर घड्याळ माझ्याकडे १९९५ पासुन आहे. अतिशय स्टायलिश. तु जे म्हणालास की त्या सुमाराची त्यांची घड्याळे बटबटीत होती त्या विधानाला छेद देणारे. ते अल्ट्रास्लिम नसले तरी बरेच स्लिम आहे. आणि तेही असेच बर्‍याच जणांना आवडते. अजुन उत्तम टिकुन आहे.

हे सगळे सांगण्याचा उद्देश हाच की टायटन फक्त एक नाव नाही आहे तर तितकाच उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देखील आहे. आणि हे सगळे महागड्या परदेशी बनावटीच्या घड्याळ्यांच्या अर्ध्या किमतीत.


मोदकराव, (नेहेमीप्रमाणेच) झकास लेख!

टायटन एज, नॅनो असे प्रकल्प करणार्‍या टाटा उद्योगसमूहाचा मला भारतीय म्हणून अभिमान वाटतो. आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घेणं कशाला म्हणतात हे टाटा ग्रूपच्या एका कंपनीत वर्षभर नोकरी केल्यावर समजलं.

सायरस मिस्त्रींच्या अध्यक्षतेखाली टाटा समूह नवीन पावलं टाकतो आहे. भारतात नव्याने आलेलं स्टारबक्स "टाटा टी"च्या भागीदारीत आलं आहे. कालपरवाच्याच पेपरमध्ये एअर एशिया या मलेशियन कंपनीबरोबर टाटा समूह विमानसेवा क्षेत्रात येत आहे अशी बातमी आहे.

अवांतरः
एअर इंडिया ही मूळची जेआरडी टाटांनी काढलेली कंपनी. राष्ट्रीयीकरणाच्या समाजवादी उन्मादात जेआरडींकडून अत्यंत अपमानास्पद पद्धतीने एअर इंडिया हिसकावून घेतलं गेलं. आता टाटा पुनश्च विमानक्षेत्रात आल्यावर एक वर्तुळ पूर्ण होईल.


लेख आवडला..
पूर्वी टायटनचे घड्याळ म्हणजे लै भारी.. असेच वाटायचे.
मी ९० साली पहिल्या पगारातून टायटनचे एक सोनेरी डायल आणि पट्ट्याचे घड्याळ घेतले होते.
आता अगदी फॉसिल्स,टीसॉ पासून सगळ्या प्रकारची घड्याळे असूनही ते घड्याळ मनाच्या खूप जवळ आहे.
स्वाती


माझ्या आवडीचा विषय.

दोनशे स्विस फ्र्यांक्स देउन घेतलेल्या घड्याळ्याएव्हडाच फास्ट ट्र्याक जास्त रोबस्ट आहे असा वयक्तीक अनुभव आल्यानं, चार वर्षापुर्वी फॉसिल, डिझल, पोलिस, सिको यांच्यागर्दीतून 'रोव्हर्स अँड लेक्स' घेतला होता. अजुनही तोच वापरतोय.


मस्त लेख, ट्यं ट्यं टं ट्यं टंय टं ट्यं, छे, ती धुन लिहुन देता येणारच नाही निदान मलातरी, कुणाकडं त्याची रिंगटोन आहे का ? लई भारी जाहिराती होत्या, विशेषतः मुलीच्या लग्नातली.

बाकी मोदकराव, धन्यवाद तुम्ही सोडुन आम्हाला अशी माहिती कोण देणार नाहीतर. एवधी विंग्रजी पुस्तकं वाचुन समजावुन घेण्याचं काम करणारा मेंदुचा भाग आम्ही फक्त पासबुकं अन फॉर्म १६ वाचायला वापरतो. खरंच धन्यवाद.


In reply to by ५० फक्त

धन्यवाद..

माझ्याकडे आहे ती रिंगटोन.

( लाईफबॉयची पण होती. परवा एक अ‍ॅप्लीकेशन डिलीटताना एक आख्खा फोल्डर गेला त्यात ती गेली :-( )


In reply to by ५० फक्त

ती नितांतसुंदर रिंगटोन म्हंजे मोझार्ट या जगप्रसिद्ध संगीतकाराच्या २५ वी सिंफनीमधील एक पार्ट होय.

यूट्यूब दुवा.

साधारण १ मिनिट ३० सेकंद झाले की मग ती चिरपरिचित ट्यून येते. एंजॉय!!


In reply to by बॅटमॅन

टायटनच्या पहिल्या टीव्ही कमर्शिअलमध्ये एक ऑर्केस्ट्राच ही सिंफनी वाजविताना दाखवला होता. प्रियकर प्रेयसीला सरप्राइज गिफ्ट म्हणून टायटन देतानाची ती ब्लॅक न व्हाईट अ‍ॅड लैच भारी होती. विशेषतः त्यातली ती लिरीन असे काहीतरी नाव असलेली लै भारी डोळ्याची सावळी मॉडेल. ती परत दिसलीच नाही. :(


In reply to by बॅटमॅन

श्री ब्याटम्याना,

टायटनच्या अ‍ॅड चिकटवता का इथे..?

तूनळीचे दुवे चिकटवा जमले तर.


In reply to by इरसाल

हो. त्याहून महत्त्वाचे, एज् मध्ये सेकंदकाटा सुद्धा नाहीये. ;-)

घड्याळाची जाडी कमी करताना ज्या ज्या गोष्टींना वगळण्यात आले त्या या सर्व!


एकदम मस्त माहितीपूर्ण लेख. आमिर खानच्या टायटनच्या सर्व जाहिरती एकदम आवडत्या आहेत...!!
असेच अजून छान माहितीपूर्ण लेख लिहीत राहा. :)


आमचे टायटनचे हाय . तक्राद येकच की त्यात फकस्त २४ कलाकच हायत. जादात जादा सात वार हायत आन येकतीस तारका हैत. जरा वाईच वाडावून द्या ना राव !
मो भौ , लेख उत्तम !


लेख छान झालाय. टायटन प्रकरण नेहमी झोकात जाहिराती करायचे. मला नवर्‍याने दोन टायटन घड्याळे दिली. एक रोजच्या वापराला तर एक ब्रेसलेटसारखे दिसणारे. नंतर आणखी प्रकार घेतले पण टायटन ते टायटन! मैत्रिणीला कशाचे तरी बक्षिस म्हणून तिच्या वडीलांनी चौकोनी आकाराचे मरून रंगाचे घड्याळ दिले होते (शंकरपाळीसारखे मनगटावर बसणारे). त्यावेळी भयंकर भारी वाटलं होतं. तीही सगळ्यांना दाखवत होती. तुझ्या लेखामुळे आठवण आली.


मोदका, मस्त प्रेझेंटेशन रे!! घड्याळद्वेष्ट्या मलाही एखादे टायटन घड्याळ घालावे असे आता वाटू लागलेय.


मनोरंजक आणि ज्ञानवर्धक धाग्याबद्दल मोदकरावांचे आभर.
"स्विस हे करू शकत नाहीत म्हणजे आपणसुद्धा हे करू शकणार नाही" या विचारधारेला त्यांनी उत्तर दिले..
"स्विस एखादी गोष्ट करू शकत नसतील तर तीच गोष्ट आपण करून दाखवूया!" या विचारधारेने.

जबरदस्त मानसिकता जी आभावानेच आढळते. टिम टायटनला मानाचा मुजरा.

अवांतरः- माझ्या लग्नात भेट मिळालेल टायटनच घड्याळ मी गेली १६ वर्षे वापरतो आहे.
बायको अधुन मधुन बिघडते, वर्शातुन एक दोन वेळा माहेरी सर्वीसिंग साठी/ ब्रेन वाशिंग साठी पाठवाव लागत.कधी कधी जास्त चावी भरल्याने जोर जास्त असतो. ;-) त्या मुळे आपलीच वेळ भरते पण अश्या बाका प्रसंगातुन वेळ मारुन न्यायला अनुभवातुन शिकलो आहे. घड्याळ अद्याप एकदाही बिघडल नाही की सर्वीसिंग नाही. केवळ सेल बदलले की काम चालु. बायकोचे नव्या नवलाईचे नवरंग उडाले पण घड्याळाच प्लेटींग अजुनही टकाटक आहे.


माझ्याकडे ची चार घड्याळे आहेत चारही भेट मिळालेली.एक वडिलांनी एक बायकोने एक भावाने आणि एक हिरानंदानी रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाने.मला सुद्धा टायटन एज घड्याळे फारच आवडली होती पण त्यात सेकंद काटा नाही( डॉक्टर असल्याने ती एक आवश्यक गोष्ट आहे- नाडी चे ठोके पाहण्यासाठी). शेवटी मी सासर्यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर भेट देऊन ते विकत घेण्याची हौस भागवून घेतली. टायटन ची घड्याळे फारच छान आहेत आणि त्यामुळे मी स्विस वगैरे च्या नादाला कधीच लागलो नाही.
मी आयुष्यात फक्त एक घड्याळ स्वतः च्या पैशाने विकत घेतले casio चे क्रोनोग्राफ इलेक्ट्रोनिक (४०० रुपये फक्त) ते सुद्धा फार वर्षे ( १० वर्षे झाल्यावर) नौदलात राहून आपल्या मनगटावर काळे घड्याळ असावे हि इच्छा पूर्ण करण्यासाठी (पांढऱ्या गणवेशावर चांगले दिसते म्हणून).गमतीची गोष्ट अशी कि ते घेण्यासाठी मी फार वर्षे विचार केला आपल्याकडे २ घड्याळे आहेत( वडिलांनी आणि भावाने दिलेली) तर उगाच का पैसे घालवा. पण एक दिवस बायकोने साडी घेण्याचा आग्रह केला तेंव्हा मी विचार केला आपल्या बायकोकडे ४०-५० साड्या आहेत तरी तिला अजून एक साडी नको असे वाटत नाही तर मी फक्त ४०० रुपयासाठी एवढा विचार का करीत आहे? त्याच दिवशी जाऊन मी वरील घड्याळ (casio चे) विकत घेतले .


खूपच मस्त झालाय लेख. HBR ची एखादी केस मराठीत वाचलल्यासारखा आनंद मिळाला.
टायटन बद्दल बोलायचं तर Real value for money म्हणतात तशी उत्पादनं असतात सर्व.


"टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी"

असहमत.
टायटन हा टाटाचा ब्रँड आहे हे आधी जरी ओरडून सांगत नसले तरी बर्‍याच ग्राहकांना कल्पना होती. एचेमटी ची भारतीय नावाची मॉडेल (कैलास, प्रकाश, निशांत) ज्यावेळी चांगली खपत होती त्यावेळी बाजारात एलसीडी वाली डिजीटल वॉचेस अवतरली. बघता बघता त्याच्या किंमती शाळकरी मुलांना सुध्दा परवडतील एवढ्या झाल्या (तोपर्यंत वडीलांचे फावरल्युबा नायतर एचेमटी घालूनच मुले दहावीची परीक्षा देत) डीजीटल घड्याळांच्या या चीप आणि किलोकिलोनी येणार्‍या गोंधळात टायमेक्स आणि टायटन आले. कमी रेटमधल्या गोल्डप्लेटेड आणि स्टील फिनेशेसनी टायटन ब्रँड सेट झाला. मध्येच मॅक्सिमा ट्रेन्डी(टायमेक्स) सारख्या ब्रँडने पण वॉटरप्रुफ स्पोर्ट्स घड्याळानी मार्केट मारले. आता तो फास्टट्रॅकचा ग्राहक आहे.
टायटनच्या सगळ्या कमर्शिअल पहिल्यापसूनच प्रथितयश जाहिरात कंपन्यानी तयार केल्या आहेत. आधी टायटनच्या अ‍ॅड सामान्यांना घेऊनच होत्या. सिनेसेलिब्रिटीला ब्रॅन्ड अँबेसेडर घ्यायची पहिल्यापासून वॉच कमर्शिअल्स ची क्रेझ आहे. आमीर खान, रानी मुखर्जी, कॅट्रीना फार नंतर आले.


In reply to by अभ्या..

यापण माहितीबद्द्ल धन्यवाद ! बाकी सेलेब्रेटीपासून लांब रहाणारे म्हणजे बजाज आटोच ! ( अपवाद सचिन )


परीक्षेचे दिवस सोडले तर मनगटी घड्याळ (ते ही बाबांचं जुनं) फारसं वापरलं नाही. मनगटी घड्याळाविषयी पॅशन (ओढ) नसल्यामुळे भेट मिळालेलं टायटनचं एक चांगलं घड्याळ असंच पडून राहतं.


In reply to by सुधीर

टायटन मधल्या गुंतवणुकीमुळे आपल्याला खूप फायदा झाला असं राकेश झुनझुनवाला यांनी मागे एकदा वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं. अंदाज होताच, लेख वाचल्यावर अधिक माहिती कळली.


माहितीपूर्ण आणि सुरेख लेख. आवडला
अवांतरः प्रत्येक घड्याळाच्य जाहिरातीत १० वाजून १० मिनीटे हिच वेळ का असते? याचे काही कारण आहे का?


In reply to by लाल टोपी

धन्यवाद..

१० वाजून १० मिनीटे

या गोष्टीला मार्केटींगची एक युक्ती इतकेच कारण असावे. लोगो व्यवस्थीत दिसणे, दोन्ही काट्यांच्या व सेकंद काट्याच्या (७ वर असलेल्या) सहाय्याने एक हसरा चेहरा तयार करणे वगैरे वगैरे...

तशा अनेक थिअरीज आहेत याबद्दल. परंतु वरील कारण अनेक ठिकाणी वाचलेले आठवते आहे.


सुंदर अभ्यासपूर्ण लेख...

भारतीय प्रतिमेला अनेक क्षेत्रांत जगात उंचवण्याचे काम टाटा ब्रँडने जेवढे केले आहे ते इतर कोणत्याही कंपनीला अजून तरी जमलेले नाही.


सुंदर लेख

माझे टायटन घड्याळ बायकोने जेव्हा ती गर्लफ्रेंड होती तेव्हा गिफ्ट केलेले, लग्नातही तेच घातलेले तर फोटोग्राफरने खास त्या घड्याळाची तारीफ करत मुद्दाम ते घड्याळ उठून दिसेल अश्या पोजमध्ये १-२ फोटो काढले. आजही तीन वर्षांनी कोणाचीही त्या घड्याळावर पहिली नजर पडते तेव्हा तारीफ करतातच करतात.

आमच्या घरात माझेच नाही तर सर्वांचेच टायटन.
नुकतेच बायकोच्या बहिणींना वाढदिवसाचे गिफ्ट सुद्धा टायटनचे घड्याळच दिले.
तर आम्ही टायटन फॅमिली आहोत बोलायला हरकत नाही.


ध्न्यवाद मोदक. तुझ्या अभ्यासपुर्ण लेखांमुळे बरिच नविन माहिती कळते. टायटन अजुन वापरलं नाहिये पण आता नक्कि विकत घेईन. ईकडे वेस्टर्न कंपनीची पण अशीच घड्याळे (स्लीम) मिळतात त्यांनी पण टायटनची कॉपी केली असेल का?


In reply to by दिपक.कुवेत

ईकडे वेस्टर्न कंपनीची पण अशीच घड्याळे (स्लीम) मिळतात त्यांनी पण टायटनची कॉपी केली असेल का?

दिपकजी..

ती घड्याळे किती साली तयार झाली आहेत आणि त्यांची मोजमापे यावरून कळेल.

मॉडेल नंबर आणि कंपनीचे नाव दिल्यास मी शोधण्याचा प्रयत्न करेन..


आणखी एक मोदक स्पेशल! रतन टाटांच्या कारकीर्दीत टाटा ग्रुप खर्‍या अर्थाने जागतिक झाला आणि असे अनेक प्रतिष्ठित ब्रँड्स त्यांनी विकत घेतले. इंग्लंडातली Corus आणि Jaguar Land Rover घेतल्या तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध सूड पुरा झाला असे आमच्यासारख्या अनेकांना वाटले.


लेखाबद्द्ल काय बोलायचे नेहमीप्रमाणे उत्तम , माहितीपूर्ण लेख :)


सुंदर लेखन ! :)
माझ्या पगारातुन मी माझ्यासाठी विकत घेतलेली पहिली वस्तु म्हणजे याच टायटने एक घड्याळ. :)
मला रोमन आकडे नसलेल आणि स्टर्डी लुक असलेल प्लेन डायलच घड्याळ होत...आणि ते तसंच टायटनच्या शोरुम मधे मिळाले.

जाता जाता :--- हल्ली चायनीज घड्याळ्यांचा सुळसुळाट झाला आहे,जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा रेल्वे ब्रीजवर अनेक लोक असली चायनामेड घड्याळ विकतांना सहज आढळुन येतील.१००रु मिळाणारी ही चायनीज घड्याळे अनेकांना मोहात पाडतात. :)


अप्रतिम लेख!!! आणि नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण!!

त्या जुन्या जाहिरातींना शोधायला गेले आणि एक मस्त विडीओ मिळाला


माझ्या दिराने मुलीला असच अगदी स्लीम टायटन घड्याळ भेट म्हणुन दिल होतं. परवा त्याचा सेल चेंज करायला गेले तर त्या बथ्तड माणसाने बिघडवुन दिलं. असा राग आलाय ना..

मोदक अगदी सुरेख अन अभ्यासपूर्ण लेख. आवडला.


In reply to by बॅटमॅन

अतिशय धन्यवाद, आणि बॅमॅ तुला सुद्धा. खरडवहीतल्या लिकेबद्दल.


खुप छान आणि माहितीपुर्ण लेख.... धन्यवाद :) आता भारतात गेल्यावर अजुन एक टायटनच्या घड्याळाची खरेदी पक्की. ;)


अगदी टायटनच्या ट्युनसारखाच.. आवडला..
अवांतर : टायटन ट्युन गिटारवरही अत्यंत सुरेल वाटते ऎकायला..


आता खरेदीच्या यादीमध्ये टायटनची भर पडली. गेली कित्येक वर्षे घड्याळ वापरणेच सोडून दिले होते, तेव्हा आता मोदकाच्या धाग्याचा मान म्हणून एक टायटन घड्याळ खरेदी करेन.