✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वर्तुळ-कोन सिद्धांत

श
श्रावण मोडक यांनी
Fri, 03/08/2013 - 17:57  ·  लेख
लेख
" 'वर्तुळ-कोन सिद्धांत' हा एक नव्याने पुढे आलेला विषय आहे. गेल्या साधारण सहा-एक वर्षांतील (माझ्या) अनुभवांवरून तो मला समजला. मग मी एक प्रयोग केला. त्या प्रयोगातून हा सिद्धांत शाबीत होतो, असे ध्यानी आले. तेव्हा त्या प्रयोगाची वारंवारिता वाढवली. काही प्रमाणे बदलली, आणि प्रयोग केले. याचवेळी माझ्या असेही ध्यानी आले की, काही जण (बहुदा अजाणता) असा प्रयोग करत असतातच. माझे प्रयोग आणि त्यांचे प्रयोग यातून असे दिसले की हा सिद्धांत शाबीत होत आहे. त्यामुळे मी असे ठरवले की माझ्या या निरिक्षणांना अधिक ठोस स्वरूप येण्यासाठी त्याची मांडणी करावी, आणि इतरांनी जाणीवपूर्वक हा प्रयोग करून तो शाबीत होतो का हे पहावे. हा माहितीपर चर्चाप्रस्ताव त्यासाठीच मांडतो आहे. प्रयोग: ध्येय: वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते, हे मानवजातीने स्वीकारावे यासाठी वाद करता यावा. साध्य: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल(च) असते, हे शाबीत करणे. साधने: एक वर्तुळ, एक कोनाकृती (कोन, त्रिकोण, चौकोन, पंचकोन वगैरे, अर्थात प्रत्येक आकृतीनुसार प्रयोग वेगळा होतो). कृती: कोनाकृतीच्या कोणत्याही एका भुजेला आधार मानून तेथे वर्तुळ ठेवावे. वर्तुळ असे ठेवले पाहिजे की ते कोनाकृतीच्या सर्व भुजांना त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजेच ते कोनाकृतीच्या आतमध्ये आले पाहिजे. निरिक्षण: असे दिसते की, वर्तुळाच्या आत किंवा बाहेर कोनाकृतीचे कोन येतात. म्हणजे, ते वर्तुळ त्या कोनाकृतीला सामावून घेऊ शकत नाही, किंवा ती कोनाकृती वर्तुळाला सामावून घेऊ शकत नाही. थोडक्यात, असे दिसते की कोन स्वतंत्र दिसतात. (माझ्या प्रयोगातील काही बाबी: मी वर्तुळाचा व्यास ज्या मापाचा आहे त्याच लांबीच्या भुजा असलेल्या कोनाकृती घेतल्या, त्यांचे कोन वेगवेगळे घेतले. पण सिद्धांत शाबीत होत गेला.) निष्कर्ष: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल असते. सिद्धांत: कोनाकृतीचे कोन वर्तुळाच्या बाहेर राहतात, याचा अर्थ वर्तुळ गोल असते आणि वर्तुळ गोल असल्याने कोनाकृतीच्या संदर्भात ते 'वृथा' आहे. त्यामुळे कोणत्याही संदर्भात या वर्तुळाचा विचार करणे, त्याची कृती करणे किंवा त्यावर कृती करणे हेही 'वृथा' आहे. तेव्हा माणसाने कोणत्याही संदर्भात वर्तुळाचा नाद सोडला पाहिजे. माणसाच्या मर्यादित उर्जेचा यात क्षय तर होतोच, शिवाय त्याच्याकडील विचार करण्याच्या आणि विवेकाच्या क्षमतेचाही तो उपयोग करत नसल्याचे दिसते. या वर्तुळाने त्याला होत असलेले लाभ हेही 'वृथा'च आहेत, मग ते रंजनात्मक असोत वा ज्ञानप्राप्तीचे असोत वा अन्य काही. लाभ: आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात असाच एक प्रकार आहे. अॅपल टू ऑरेंज कम्पॅरिझन असं त्याला म्हणतात. पण तेथे दोन फळं आहेत, आणि चवीसंदर्भात ती खाल्ल्याशिवाय तुलना होत नाही, आणि एकदा खाल्ली की पुन्हा तुलनेची संधी संपते. वर्तुळ आणि कोनाकृती खाता येत नसल्याने एकाने एक वर्तुळ आणि एक कोनाकृती यावर केलेला प्रयोग दुसराही करू शकतो, आणि त्यातून वर्तुळ हे कोनाकृतीच्या संदर्भात वृथाच असते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध करता येते. येथील वाचकांनी हा प्रयोग करून पहावा आणि त्यांची निरिक्षणे मांडावीत ही नम्र विनंती. याच प्रयोगाचा पुढे विस्तार करून तेथे वर्तुळाच्या जागी एक आणि कोनाकृतीच्या जागी दुसरी अशी एकेक कल्पना (ही कल्पना म्हणजे विचारप्रणाली, जीवनप्रणाली, उपचाराचे मार्ग, ज्ञानक्षेत्रातील विविध विषय असे काहीही असू शकते) ठेवून हा प्रयोग करता यावा. तेथही 'वर्तुळ-कोन सिद्धांत' शाबीत व्हावा अशी अपेक्षा आहे. सध्या मी त्यावर काम करतो आहे. माझी निरिक्षणे कालौघात मांडेन. (या प्रस्तावासाठी येथे मला सर्व लेखनप्रकार आणि सर्व लेखनविषय निवडता आले. कोणत्याही विषयाला हा सिद्धांत लागू होणे शक्य असल्याने अशा कोणत्याही आणि कितीही विषयांची मला निवड करता आली हे महत्त्वाचे.) "
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51099 वाचन

💬 प्रतिसाद (116)

प्रतिक्रिया

चौकटराजा ...

चौकटराजा
Sat, 03/09/2013 - 11:36 नवीन
मी चौकटचा राजा आहे. बदामचा राजा असतो तर वर्तुळाविषयी बोललो असतो. सबब पास ......
  • Log in or register to post comments

बरोबर, बदामात दोन अर्धी

५० फक्त
Tue, 03/12/2013 - 08:46 नवीन
बरोबर, बदामात दोन अर्धी वर्तुळं आणि एक कोन असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कठीण लेख लिहीणार्‍याच्या

रामदास
Sat, 03/09/2013 - 11:45 नवीन
वर्तुळाला कोन. (श्रावण मोडकांच्या बैलाला ---असे सैध्दांतीक स्वरुपात म्हणण्याइतपत विदा अजून जमा झालेला नाही )
  • Log in or register to post comments

वर्तुळ आणि कोन ?

सुहास..
Sat, 03/09/2013 - 12:44 नवीन
वर्तुळ आणि कोन ? अश्लील अश्लील ;)
  • Log in or register to post comments

अश्लील ?

तिमा
Sat, 03/09/2013 - 13:06 नवीन
वर्तुळ आणि कोन, आमच्या डोळ्यासमोर फक्त कोन आईसक्रीमच येते. (उन्हाळ्याच्या दिवसांत तर जास्तच) त्यातही एका वर्तुळाला एका कोनाने आधार दिलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

तिघांसाठी

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 13:02 नवीन
धन्या, चौकटराजा, रामदास यांच्यासाठी माझ्या लेखनातील करड्या रंगातील मजकूर पुन्हा पहावा. त्यानुसार या सिद्धांताचा प्रयोग करावा. आपल्याला निश्चितपणे लगेच कळेल, आणि आपली निरिक्षणे येथे मांडलीत तर प्रयोगाला हातभार लागेल. सुहास, अश्लीलता या प्रांतातही हा सिद्धांत लागू करता यावा. बाईंडरसारख्या नाटकासंबंधात तसे झालेले अंधूकसे आठवते.
  • Log in or register to post comments

आकृतिबंध

नंदन
Sat, 03/09/2013 - 13:19 नवीन
आकृतिबंध ह्या संज्ञेची शब्दश: व्याख्या उलगडून सांगणारा लेख.
आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात असाच एक प्रकार आहे. अॅपल टू ऑरेंज कम्पॅरिझन असं त्याला म्हणतात. पण तेथे दोन फळं आहेत, आणि चवीसंदर्भात ती खाल्ल्याशिवाय तुलना होत नाही, आणि एकदा खाल्ली की पुन्हा तुलनेची संधी संपते.
शेवटी कुठलीही तुलना निष् - फळच :)
  • Log in or register to post comments

शब्दश:

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 13:38 नवीन
शब्दशः हे विशेषण व्याख्येला लावलेले दिसते आहे. पण ते उलगडून या शब्दाचे असावे का, असा पेच पडला. इथं पुन्हा वर्तुळ-कोन सिद्धांत लागू झाला. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्ही म्हटलेले आहे, तरीही माझी कल्पना चालवून मी त्या वाक्याचे पोस्टमार्टेम करू लागतोय. म्हटले तर तुमचा मुद्दा वर्तुळाकार, माझी कल्पना कोनाकृती, किंवा तुमचा मुद्दा कोनाकृती, आणि माझी कल्पना वर्तुळाकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हे ब्येस!

सोत्रि
Sat, 03/09/2013 - 13:52 नवीन
हां, हे आता कसे झकास झाले! :) - (वर्तुळाकार) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ज्या ज्या ज्या

नंदन
Sat, 03/09/2013 - 13:57 नवीन
ज्या ज्या ज्या* आणि त्रिज्या आपण मर्यादित परीघाच्या संदर्भचौकटीत विचारात घेऊ, त्या त्या परिप्रेक्ष्यात कोनांचा साहित्यकृतीय सबगोलंकारपणा आणि वर्तुळांचे समीक्षासदृश टोकदारपण निराळ्या आंशिकतेतून** जाणवू लागते, हे खरेच. जाणीवक्षितिजेच्या टोकावर असंख्य कोन आणि वर्तुळ यांच्यातला अद्वैताभास मान्य करूनही चर्चेच्या संदर्भात मर्यादित अवकाशाचा विचार करणे, हे एकाच वेळी या खटाटोपाचे बलस्थान आणि मर्यादाही, असं म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. *हे James while John had had had had had had had had had had had a better effect on the teacher या धर्तीवर विस्कटून वाचावे. ** आ वर अनुस्वार आहे. आशिकतेची संदर्भचौकट निराळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नाही

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 14:14 नवीन
या म्हणण्याला प्रत्यवाय नाही. दोन्ही तारे ध्यानी घेतले. सबगोलंकारपणा आणि टोकदारपण यासंदर्भात दोन-ताऱ्यांचे स्पष्टीकरण कसे आवश्यक असते हे यातून दिसून आले. यालाच बहुदा निःसंदर्भपणा म्हणत असावेत. तो अशा प्रयोगांमध्ये अनेकदा होत असतो. येथे तसा धोका आपण दोन-तारे टाकून वेळीच टाळलात, वाचकासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बाप रे

सुबोध खरे
Sat, 03/09/2013 - 13:26 नवीन
चार मडरासी(मद्रासीची वरची पायरी ) एकत्र बोलत असताना जेवढे कळते तेवढेच कळले. बरे झाले मी बारावीत गणित सोडून मेडिकल ला गेलो. नाहीतर बारावी पास वर ४ वर्षे काढून कोलेज ला रामराम ठोकावा लागला असता. आपला ढ सुबोध
  • Log in or register to post comments

गणीत

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 13:44 नवीन
गणिताचा तसा काही संबंध नाही, डॉक्टर. हा सिद्धांत स्तनपान विरुद्ध मातेच्या दुधासम उत्पादने अशा मांडणीतही दिसू शकतो. आपण पहा. त्यातला गोल कुठला आणि कोनाकृती कोणती, हे आपण ठरवायचे. या विषयाच्या लेखनप्रकारात (फलज्योतीष, अर्थकारण, विज्ञान असले तरी) गणीत नाही. लेखनविषयातही (समीक्षा, माहिती, संदर्भ) असले तरी गणीत नाही. त्यादृष्टीने सिद्धांत आणि त्यासाठीचा प्रयोग अत्यंत सुरक्षीत आहे. तसे माझेही गणीत आणि विज्ञान कच्चेच आहे. याच लेखनात पहा ना, मी मारे प्रयोग मांडतोय, पण गृहितक नावाची बाब तेथे नाहीच. अर्थात, मला ही मांडणी अशा निरिक्षणांती सुधारून घ्यायची संधी आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपलं गृहितक तर असं दिसतं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 13:50 नवीन
>>> मी मारे प्रयोग मांडतोय, पण गृहितक नावाची बाब तेथे नाहीच. आपल्या प्रयोगात ''वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते'' हे गृहितक आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हो, पण

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 13:53 नवीन
हो. ते आहेच, म्हणूनच तो प्रयोग आहे. पण प्रयोगाची शास्त्रशुद्ध (किंवा वैज्ञानिक) संशोधनपद्धतीची मांडणी करावयाची म्हटले की गृहितक हे स्वतंत्र पोटशीर्षक आणि त्याखाली त्याची मांडणी असली पाहिजे. ती येथे नाही, असे माझे निरिक्षण आहे, इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं निरिक्षण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 13:59 नवीन
>>> संशोधनपद्धतीची मांडणी करावयाची म्हटले की गृहितक हे स्वतंत्र पोटशीर्षक आणि त्याखाली त्याची मांडणी असली पाहिजे. ती येथे नाही, असे माझे निरिक्षण गृहितक आणि त्याची मांडणी इथे आहे, असे माझे निरिक्षण आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शक्य आहे

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 14:06 नवीन
हे शक्य आहे. अशा परस्परविरोधी शक्यतांना चिकित्सेच्या चरकीतून काढल्यानंतरच गृहितकाचा सिद्धांत होत असतो. त्यामुळे, आता आधी मला माझे निरिक्षण सिद्ध करावे लागेल. ते मी कालौघात करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती काळ लागेल निरिक्षण सिद्ध

कवितानागेश
Sat, 03/09/2013 - 15:16 नवीन
किती काळ लागेल निरिक्षण सिद्ध करायला? शिवाय नक्की कुठल्या कोनातून केलेले निरिक्षण सिद्ध करणार? :) कारण तुम्हीच म्हणालत की, निरिक्षणांची खासीयत अशी की, ती चुकीची असू शकतात, आणि म्हणून आजच्या निरिक्षणांती मांडलेले तथ्य उद्याच्या निरिक्षणांती बदलेल, असे आधीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काळ

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 17:43 नवीन
या निरिक्षणांना किती काळ लागेल हे आत्ताच सांगणे मुश्कील आहे. अनेकानेक परिस्थिती कवेत घेणारी निरिक्षणे समोर यावी लागतील. त्यानंतर आणखी विभिन्न परिस्थितीची शक्यता नाही, असे स्पष्ट झाले की तो विदा पुरेसा ठरावा. मग त्याचा पडताळा करून घ्यावा लागेल. तोही वेगवेगळ्या व्यक्तींकडून. पडताळ्यात जी निरिक्षणे चुकीचीच आहेत त्यांच्याबाबतही ती चुकीची असल्याचेच सिद्ध करावे लागेल. तो विदाही पुरेसा असणे आवश्यक आहे. आता हे सारे तर्कानुसार झाले. विवेक असे सांगतो की या प्रक्रियेत कुठं थांबायचं हे ठरवता आलं पाहिजे. पण विवेक म्हटला की माणसागणिक त्याची शक्ती बदलणार. म्हणजे पुन्हा त्यातही अधिकाधिक सर्वमान्यता असावी हे तर्कानुसार आलेच. आत्ताच पहा ना, प्रा. डॉ. दिलिप बिरुटे यांना हा सारा निरर्थक शब्दांचा खेळ वाटतोय. हा निरर्थक शब्दांचा खेळ आहे हे सिद्ध होण्याआधीच ते असे बोलताहेत, असे म्हणता येते. ही तर्काची बाजू झाली. कुठं थांबायचं याविषयीचा त्यांचा विवेकी निर्णय हा रास्त आणि वाजवी आहे हे मान्य करावयाचे, असेही म्हणता येते. ही विवेकाची बाजू झाली. या दोहोंतील कशाचा स्वीकार करावयाचा असतो, हे पाहता यावे हाही या सिद्धांताच्या वापराचा एक हेतू आहे. त्यामुळे तिथंपर्यंतची निरिक्षणे आणि त्यातून विदा मिळणे आवश्यक आहे. तूर्त मी एकटाच संकलनाचे काम करतो आहे, प्रयोगही करतो आहे. त्यात अधिकाधिक मंडळी सहभागी झाली (लोकसहभाग) तर हे काम वेगाने होईल, आणि किती काळ लागेल या प्रश्नाचे उत्तर नजरेच्या टप्प्यात येईल, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

उत्तम प्रकल्प आहे.

कवितानागेश
Sat, 03/09/2013 - 18:20 नवीन
उत्तम प्रकल्प आहे. मी काही आभ्यासू वगरै नाही. त्यामुळे मी वैयर्थ प्रश्न विचारण्याखेरीज योगदान देउ शकत नाही. पण शाबीत उत्तर मिळाले की कळवा. मी अत्यानंदानी 'गोऽऽऽऽल!!' असा चित्कार काढेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वर्तुळा (वर तुळा) सुद्धा करु

नाना चेंगट
Sat, 03/09/2013 - 18:30 नवीन
वर्तुळा (वर तुळा) सुद्धा करु ;).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

प्रश्न

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 18:37 नवीन
प्रश्न विचारत रहा. अशा प्रश्नांतूनच चिकित्सेचा आरंभ होत असतो. त्यामुळे, असे प्रश्न करणं हाच तुमचा या प्रयोगातील सहभाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एक दोन दिवसात आपला फार दगदगीचा प्रवास झाला काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 18:43 नवीन
आमचा सहभाग आहेच. विदा लागला तर आम्ही पुरवू कितीही काळ लागू द्या. पण, या वर्तुळाच्या कानाचा सॉरी कोनाचा शोध लागलाच पाहिजे. 'तुम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करु' (तुकोबा क्षमा करा हं) असं आपलं शब्दांचं गाव तेव्हा 'शब्दांचे मोल असे निरर्थक जाऊ नये असे वाटल्यामुळे आम्ही बोललो. सिद्धता होईल तेव्हा होईल म्हणून आम्ही थांबलो. मनातल्या मनातः आज अशा नसत्या उठाठेवी का चालू आहेत बरं... कुठं गेले आपले गुप्तहेर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

पुन्हा

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 18:54 नवीन
नसत्या उठाठेवी असं आपण म्हणताहात. पुन्हा तेच झालं. त्याचं कारण आहे. आपण माझा चर्चाप्रस्ताव नीट वाचलेला नाही. चर्चाप्रस्ताव नीट वाचला तर ही नसती उठाठेव किंवा निरर्थक शब्दांचा खेळ नाही हे आपल्याला समजून येईल. थोडे इतरत्रचे संदर्भही पाहिलेत तर त्याची खात्री पटेल. हेरगिरीपेक्षा हा असा थोडा अभ्यास अधिक कामी येईल, हे नक्की. न वाचताच शिकवायला जाण्याचा प्रघात आहे, असं एक निरिक्षण यानिमित्तानं नोंदवावं लागेल असं दिसतंय. जो गंभीर प्रयोग आहे, त्या प्रयोगाला तो नीट वाचलेला नसल्याने न कळल्याने 'नसती उठाठेव' किंवा 'निरर्थक शब्दांचा खेळ' म्हणणे म्हणजेच न कळलेले आपले कोन त्याला लावू पाहणे. अर्थात, ही अशी टिप्पणी करून आपण या प्रयोगातच भर टाकली आहे, हे निश्चित. त्यामुळे आपल्या अशा आणखी टिपण्यांचे स्वागत. त्या वरकरणी अज्ञानमूलक असतील, पण या प्रयोगासाठी अत्यंत मौलीक असतील याची खात्री बाळगावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा, काही तरी कर रे, हे असे नव्हते पूर्वी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 19:03 नवीन
>>> न वाचताच शिकवायला जाण्याचा प्रघात आहे, असं एक निरिक्षण यानिमित्तानं नोंदवावं लागेल असं दिसतंय. हाहा. हाना. तद्मताय. च्यायला, कुठून गळ्यात शिवळं गुंतवून घेतली आणि कशाला टीपनं पुरवत बसलो कोणास ठाऊक. आपला प्रयोग गंभीर आहे, आपण गंभीर आहात, आपले विचार गंभीर आहेत, आपलं संशोधन गंभीर आहे, आणि आपल्या वर्तुळाचे कोनही गंभीर आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काळजी नको

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 19:25 नवीन
मी पूर्वी कसा होतो आणि आज कसा आहे याची आपण करीत असलेली काळजी पाहून भरून आलं. पण ती काळजी करू नये. हा चर्चाप्रस्ताव जेव्हा आपल्याला नीट समजेल तेव्हा आपली ही काळजी संपलेली असेल याची खात्री बाळगा. अर्थात, आपली ही स्थिती समजू शकतो. ध्येयानं पछाडलं गेलं की माणसाच्या प्रतिमेचं असं काही-बाही होत असतंच म्हणा. या दरम्यान आपल्या भावना दुखावणारे काही लिहिले गेले असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे बाप रे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 13:47 नवीन
वर्तुळाला कोन ? च्यायला, अवघडच आहे, वाचतोय. काही निष्कर्षा-बिष्कर्षाला गेल्यावर किंवा काही शाबीत-बिबीत झाल्यावर इथं अंतिम सिद्धांत मांडला जाईल अशी अपेक्षा आहे. -दिलीप बिरुटे (शाबीत)
  • Log in or register to post comments

अवघड काही नाही

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 13:50 नवीन
अवघड काही नाही प्रा.डॉ. यात. पण तुम्ही प्रा.डॉ. असल्याने सारंच अवघड करत असता, तसं हेही केलेलं दिसतंय. आता पहा, निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्षही येतात तेव्हा वर्तुळाला कोन असले पाहिजेत, असे म्हणता येते. त्याचबरोबर शाबीतच्या जोडीने बिबीत येते तेव्हा कोनाला वर्तुळाकार असला पाहिजे, असे म्हणता येते. नव्हे, अनेकदा अशा प्रयोगांमध्ये ते म्हटले जातेच. त्यातूनच हा सिद्धांत शाबीत होतो (बिबीत नाही) अशा निष्कर्षाप्रत (बिष्कर्ष नाही) मी पोचलो. म्हणून तर इथे चर्चाप्रस्तावाच्या स्वरूपात ही मांडणी केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/09/2013 - 14:05 नवीन
>>> निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्षही येतात तेव्हा वर्तुळाला कोन असले पाहिजेत अहं घोळ करत आहात. माती बिती म्हटल्या जाते तेव्हा माती ही अगदी मातीच असते पण बिती म्हटले की त्यात बारीक खडे, थोडे मोठे खडे येतात. म्हणजे माती सोडून जे जे येते ते बिती. तसं निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्ष येतील तेव्हा वर्तुळाला कोन आहेत हे सिद्ध होणारच नाहीत. बाकी बिनअर्थांचे नुसते शब्दांचे खेळ मस्त चालले आहेत, लगे रहो. -दिलीप बिरुटे (प्रा.डॉ.असल्याने सर्वच सोपं करणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हे असं आहे...

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 14:18 नवीन
घोळ नाही काहीच. बिती म्हटले जाते तेव्हा मातीच्या जोडीने खडे वगैरे येतात. थोडक्यात मातीत भेसळ असते. तसेच येथे आहे. बिष्कर्ष जेव्हा असतो तेव्हा त्यात भेसळ असते. भेसळ असते म्हणूनच वर्तुळाला कोन असले पाहिजेत, असे म्हणता येते. तसे अनेक प्रयोगात म्हटले जाते. यासंबंधी माझ्या लेखनातील करड्या रंगातील मजकूर वाचलात तर ते ध्यानी येण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म...

दादा कोंडके
Sat, 03/09/2013 - 14:20 नवीन
लेखातल्या शब्दांचा अर्थ कळाला पण वाक्य आणि त्यामुळे लेख कळला नाही. या आधी फक्त धनंजय यांच्याबाबतीत असं व्हायचं. :)
  • Log in or register to post comments

माणूस आहे.

प्यारे१
Sat, 03/09/2013 - 14:40 नवीन
माणूस नि त्याची विचारशक्ती रबरबॅन्ड सारखी असायला काय हरकत आहे? त्याला सरळ रेषेत नसणार्‍या कोणत्याही तीन बिंदूंवर बसवला की त्रिकोण दिसतो, मिठाई अथवा तत्सम कुठल्याही बॉक्स वर चौकोन होतो तर पदवीच्या सुरळीवर वर्तुळाकार, लंबगोलाकार होतो.... अरे हाय काय अन नाय काय! आपल्याला सगळ्यात सोयिस्कर (फायदेशीर म्हटलं की आर्थिक विषय येतात म्हणून सोयीस्कर) काय आहे त्यानुसार माणूस तसं तसं बनणं पसंत करतो. स्वगतः .............. !
  • Log in or register to post comments

सिद्धांताचे काय माहिती नाय बॉ

सस्नेह
Sat, 03/09/2013 - 15:41 नवीन
सिद्धांताचे काय माहिती नाय बॉ ! पण करेक्ट 'कोन' साधला तर बाण बरोब्बर 'वर्तुळात' बसतो एवढे माहिती आहे !
  • Log in or register to post comments

अनंत भुजा असलेली आकृती म्हणजे

नाना चेंगट
Sat, 03/09/2013 - 18:21 नवीन
अनंत भुजा असलेली आकृती म्हणजे वर्तुळ असे मानून त्या भुजांचे होणारे कोन तपासतांना भुजा म्हणजे अनंत बिंदूची आकृती अर्थात पुन्हा वर्तुळच अशा प्रकारे एक वर्तुळ पूर्ण होते याविषयी आपण कशा पद्धतीने विश्लेषण करणार आहात याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

तूर्त

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 18:41 नवीन
तूर्त मी त्या सूक्ष्म स्तरावर जात नाही. स्थुलाचाच विचार करतो आहे. कारण त्या सूक्ष्म स्तरासाठी स्थुलातील स्थितीची मांडणीही करावी लागेल. कारण सूक्ष्मात जाऊ तेव्हा बिंदूचा आकार वर्तुळ आहे की तो कोनाकृती असतो, असा एक भेद करावा लागेल. त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळे त्याकरता थोडी प्रतीक्षा करावी लागेल, आणि तुम्हाला थोडी मदतीची तयारीही ठेवावी लागेल. त्या स्तरावर जायचे असेल तेव्हा आपल्याशी चर्चा करावी म्हणतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

>>>बिंदूचा आकार वर्तुळ आहे की

प्यारे१
Sat, 03/09/2013 - 18:50 नवीन
>>>बिंदूचा आकार वर्तुळ आहे की तो कोनाकृती बिंदूची आणखी चिरफाड करता येत नाही म्हणूनच त्यास बिंदू (हा गणिती पुल्लिंगी बिंदू आहे) म्हणतात. उद्देश सफल होतो आहे... आन दो आन दो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बिंदू

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 19:09 नवीन
बिंदूविषयीचे आपले मौलीक मत वाचले. ते मान्य आहेही. पण आधी ते पडताळ्यातून सिद्ध व्हावे लागेल. अन्यथा, माझी त्याला असलेली मान्यता ही केवळ श्रद्धा ठरते. त्यामुळे आपण त्याविषयी अधिक तपशील द्यावा ही विनंती. येथे बिंदूची चिरफाड करण्याचा हेतू नाहीही. फक्त बिंदूचा आकार काय आहे हे पाहायचे आहे. आकार पाहण्यासाठी चिरफाड करावी लागेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

An exact location. It has no

प्यारे१
Sat, 03/09/2013 - 20:28 नवीन
An exact location. It has no size, only position. a point has no size. No matter how far you zoomed in, it would still have no width. Since a point is a place, not a thing, it has no dimensions. आता ही गणिती श्रद्धा आहे आणि आमचा तिच्यावर विश्वास आहे. एकाला एक म्हणायचं दोनाला दोन, ए ला ए का नी बी ला बी ही देखील श्रद्धाच. (वर्तुळात त्रिकोण) तिला न तपासणंच कधी कधी फायदेशीर असतं.असो. बिंदू बिंदू शेजारी, रेखा बने क्षणोक्षणी... (हे असंच र ला ण) बाकी पुरेसा विदा गोळा झालाय ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तपासणी

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 20:38 नवीन
श्रद्धा न तपासणं कधी कधी फायदेशीर असतं, हे बरोबर. तुम्हाला ओळखत असल्याने त्याचा मी स्वीकार करेन. पण त्याचा पडताळा घेता आला नाही इतरांना तर? तर त्याची चिकित्सा करावी लागेल ना. त्याशिवाय त्या श्रद्धेचा सिद्धांत होणार कसा? माझा प्रयोग त्यासाठी चाललाय. म्हणूनच मी लेखनात करड्या रंगात काही स्थिती दिल्या आहेत, त्या समजून घ्याव्या ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एकदा विश्लेषण सुरु केले की

नाना चेंगट
Sat, 03/09/2013 - 18:55 नवीन
एकदा विश्लेषण सुरु केले की स्तरांचा भेद उरत नाही. स्तर हे केवळ प्राथमिक सोईस्कर वर्गीकरणासाठी असतात त्यांचा अंतिम निष्कर्षासाठी आणि उपायासाठी उपयोग नसतो. सत्व, रज आणि तम अथवा वात, पित्त आणि कफ याचा दाखला इथे लागू पडावा. आम्ही मदतीला केव्हाही तयार आहोत. चर्चेला सुद्धा नक्की... बसुच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तत्वतः

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 19:05 नवीन
तुमचा मुद्दा तत्वतः अगदी बरोबर आहे. चिकित्सा म्हटली की, स्तरीकरणाला महत्त्व येते. कारण त्याशिवाय चिकित्सेचे मापदंड मांडणे मुश्कील. मग स्तरांनुसार मापदंड असल्याने निष्कर्षावर त्याचा परिणाम होणारच. म्हणजे, उदाहरण म्हणून, सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूकडे क्रिकेटपटू म्हणून न पाहता जेव्हा फलंदाज म्हणून पाहिले जाते तेव्हा वेगळे मापदंड, गोलंदाज म्हटले की वेगळे मापदंड आणि त्यानुसार त्याची त्या-त्या भूमिकेतील, आणि म्हणून अंतिमतः क्रिकेटपटू म्हणून, असलेली महानता वगैरे ठरते. त्याच्याच संदर्भात त्याचे शतक आणि भारताचा पराभव असे एक नाते पूर्वी मांडले गेले होते, हे आठवते. तो यातलाच प्रकार होता. आणि हे असे विश्लेषण आपल्या मुद्याच्या पुरस्कारासाठी उपयुक्त असते, म्हणून तर हे असे प्रयोग केले जातात, सिद्धांत मांडले जाता, हे तुम्हाला मान्य व्हावे. असो, आपण चर्चा करूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

याला

विकास
Sat, 03/09/2013 - 19:11 नवीन
आपल्या संशोधनाला कदाचीत इंग्रजीतील, "reinventing the wheel" म्हणता येईल असे वाटले. आता हा माझा दृष्टी"कोन" आहे आणि wheel हे वर्तुळाकृती असते हा योगायोग असू शकेल. अजून एक गणितातील असल्याने आपल्यासाठी अवांतर, पण "द्वैत-अद्वैत एकच" ठरवण्याचा अनोखा सिद्धांत उगाचच आठवला... (डिसक्लेमरः यातील द्वैत-अद्वैताचा भारतीय तत्वज्ञानातील द्वैत-अद्वै सिद्धांताशी काडीचाही संबंध नाही.) गृहीतक : x=y म्हणून x (वर्ग) = xy म्हणून x (वर्ग) –y(वर्ग) = x(वर्ग) – xy म्हणून (x+y) (x-y) = x(x-y) म्हणून x+y =x म्हणून 2x = x म्हणून तात्पर्य 2 =1 (अतिअवांतरः श्रामोंचे असे लेख जर कोणी सतत वाचले तर डोके फिरून नक्की नक्षलवादी होऊ शकतील. ;) )
  • Log in or register to post comments

गणीत

श्रावण मोडक
Sat, 03/09/2013 - 19:30 नवीन
हे शुद्ध गणीत झाले. त्याविषयी मी उगाच काही करणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. म्हणून मी माझ्या लेखनातच करड्या रंगात काही स्थिती टाकून ठेवल्या आहेत. त्या वाचल्या तर आपल्या हे ध्यानी येईल की इथे गणीत नाही, आणि म्हणूनच रिइन्व्हेंटिंग द व्हीलही नाही. आपण मांडलेला गणितातील सिद्धांत हा अगदी मार्मीक आहे. माझ्या प्रयोगाच्या सिद्धांताची अंतिम मांडणी करताना मला त्याचा संदर्भ म्हणून नक्की उपयोग होईल. खरे तर तो असूनही मला ही मांडणी करावी लागलीये यामागील कारण त्या करड्या रंगातील मजकुरातून व्यक्त व्हावे, आपल्याला ते लगेच कळावे. बहुदा ते कळले आहे म्हणूनच आपण केलेल्या अतिअवांतर या टिप्पणीने माझ्या सिद्धांताला पोषक सामग्री दिली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शुद्ध गणीत नाहि हो...

अर्धवटराव
Sun, 03/10/2013 - 01:51 नवीन
ते टाईमपास गणीत आहे. विकासराव फिरकी घेत आहेत ;) (x - y) = 0 त्यामुळे (x - y)/(x - y) इज नॉट इक्वल टु १. अशा वेळी (x - y)/(x - y) लिमीट्स च्या सिद्धांतानी सोडवावे लागतात. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

फिरकी

श्रावण मोडक
Sun, 03/10/2013 - 11:18 नवीन
विकासराव फिरकी घेत असावेत याचा त्या २=१ यावरून अंदाज आला होता. ०/० हे मात्र गवसलेच नाही. एकूणच गणीत हा माझा प्रांत नसल्याने मला विकासराव फिरकी घेत आहेत याची खात्री नव्हती. अशा स्थितीत मी त्याला शुद्ध गणीत ठरवून टाकले. आपल्याला धन्यवाद. अनायासे येथे पुन्हा सिद्धांत लागू झाला. मी केलेल्या लेखनात करड्या रंगात ज्या शक्यता मांडल्या आहेत तसा प्रयोग माझ्याकडून झाला. जो माझा प्रांत नाही, त्या विषयातील आपल्याच कुवत-अभावाच्या आधारे काहीही कल्पना लावून मी विकासरावांच्या मांडणीला शुद्ध गणीत ठरवले आहे, म्हणजे तेथेही वर्तुळाला नसलेले कोन मला दिसले. येथे पहा, कुवतीचा अभाव हे बलस्थान ठरते आहे. अर्थात काही चुकीच्या गोष्टींसाठी. तरी बरं, मी जालीय बुवा/बाबा नाही. नाही तर माझे जे अनुयायी, भक्त असते त्यांना विकासरावांनी केलेली मांडणी शुद्ध गणीत वाटून ते २=१ असे मानू लागायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

>>> ध्येय: वर्तुळ गोल आहे,

श्रीगुरुजी
Sat, 03/09/2013 - 20:54 नवीन
>>> ध्येय: वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते, हे >>> मानवजातीने स्वीकारावे यासाठी वाद करता यावा. >>> साध्य: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल(च) असते, हे शाबीत करणे. वर्तुळाला कोन नसतात असे नसते. तर वर्तुळाला अनंत कोन असतात असे मानले जाते. एक अनंत बाजू असलेला रेग्युलर पॉलिगॉन (ज्याच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे व सर्व कोन एकाच मापाचे आहेत) घेतला, तर त्याच्या भुजा व वर्तुळाचा परीघ समान होतात.
  • Log in or register to post comments

सिद्धांत

श्रावण मोडक
Sun, 03/10/2013 - 00:29 नवीन
वर्तुळाला कोन नसतात असे नसते. तर वर्तुळाला अनंत कोन असतात असे मानले जाते.
हो. हा मुद्दा याआधीच धनंजय यांनी अन्यत्र निदर्शनास आणला होता. त्याची मी येथे नोंद घेतली आहे. हा मुद्दा या सिद्धांताचा पोटभाग आहे, असेही मी नोंदवले आहे. कदाचित, तो अपवाद ठरू शकतो. अर्थात, तुम्ही ज्याविषयी 'मानले जाते', असे म्हटले आहे तेही सिद्ध व्हावे लागेल. कारण ते मानणे किंवा न मानणे हे सापेक्ष आहे. ते सिद्ध व्हावे लागेल. ते सिद्ध झाले की, मग त्याचा सार्वत्रिक स्वीकार होऊ शकतो. हे सारे प्रयोगाच्या पुढच्या भागात समाविष्ट करेनच. गणितातही मानले जाते याला वाव असावा का, असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ओ नीलकान्त साहेब ,

चौकटराजा
Sun, 03/10/2013 - 04:25 नवीन
या धाग्याला " वर्गणी" चालू करा. वर्तुळाकार नाणी चालतील किंवा चार कोन असलेल्या नोटा ही !
  • Log in or register to post comments

काहो राजे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/10/2013 - 09:26 नवीन
चौकटाला किती कोन असतात ? आता तुम्ही म्हणाल दहा तर ते दहा कोन कोणते ते कसे शोधाल ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी असाचा धागा काढीन पण ..

चौकटराजा
Sun, 03/10/2013 - 16:05 नवीन
मी असाचा धागा काढीन पण धागाकर्त्याला व प्रतिसादाला एका बाईटास एक रुपया.( वर्तुळ आकाराचा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा