Skip to main content

होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 01/03/2013 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक बोधकथा… कोणे एके काळी एका होस्टेल मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एक कॉलेज होते. कॉलेज होते म्हटल्यावर तिथे हॉस्टेल्स पण होती. एक होते मुलांचे आणि एक मुलींचे. ही दोन्ही हॉस्टेल्स बाजूबाजूला होती. मध्ये एक भिंत होती. एकदा एक मुलगी मुलींच्या होस्टेलच्या रेक्टर कडे तक्रार घेऊन आली. तक्रार होती की बाजूच्या होस्टेल मधील मुलगा आपल्या खोलीत केवळ एक चड्डी घालून वावरतो आणि तिच्या खिडकीतून हे तिला सतत दिसल्याने तिचा विनयभंग आणि मानसिक छळ होतो आहे. तक्रार गंभीर असल्याने रेक्टर तडकाफडकी शहानिशा करायला खोलीवर आली. "कुठे आहे तो मुलगा, दाखव मला खिडकी" "बाई, ती बघा खिडकी" "अगं पण समोर तर भिंत आहे" "बाई तो मुलगा असा नाही दिसणार. ती भिंत फार उंच नाही काही. तुम्ही एक काम करा, खिडकीखाली टेबल आहे. त्यावर उभे राहा आणि टाचा उंच करून भिंतीपलीकडे पहा. आणि बघा, कसा तो निर्लज्ज केवळ एका चड्डीवर फिरतो आहे ते" ही कथा काल्पनिक आहे, पण या सारखीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या ऑफिसात घडली. एका मुलीने सहज बोलता बोलता मला सांगितले की जवळच बसणाऱ्या एका मुलाला सतत सर्दी झालेली असते आणि त्यामुळे तो श्वास घेतो तेव्हा एक विचित्र आवाज होतो आणि सतत येणाऱ्या त्या आवाजामुळे तिला त्रास होतो ("It bothers me"). मी म्हटले, "अगं पण तो तसा लांब आहे तुझ्यापासून, इतक्या बारीक आवाजाचा त्रास कसा होतो तुला". त्यावर ती अत्यंत निरागसपणे म्हणाली, "हो, पण तुम्ही जर अत्यंत लक्षपूर्वक ऐकाल, तर तुम्हालापण त्याचा त्रास होईल (If your listen carefully, it will bother you)". शंभर टक्के सत्य घटना आहे, काडीची अतिशयोक्ती नाही. आता तुम्ही म्हणाल की याचा आणि मिपाचा काय संबंध. तर तो असा आहे की मिपावर नियमितपणे ओरड होत असते. कधी ब्लॉगवरचे शिळे लेखन टाकले म्हणून तर कधी एकाच विषयावरचे धागे येतात म्हणून. मुंबई-पुणे, फलज्योतिष, नाडीविद्या, देशस्थ-परदेशस्थ किंवा अजून काही. कधी दिवट्यान्च्या adult लेखनावर आक्षेप तर कधी कुणा विशिष्ट लेखकाचे लेखन आवडत नाही म्हणून शंख. कधी मदत मागणाऱ्या धाग्यान्बद्दल त्रागा तर कधी कोण नवीन आयडी मिपाचे डस्टबीन करतो आहे असा आरोप. खरेतर या सगळ्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. इतका सोपा की तो कुणालाही करता येइल. तुम्ही मालक, सल्लागार, संपादक नसाल तरी. हा अत्यंत खास उपाय म्हणजे, जे धागे (किंवा विषय /लेखक) आपल्याला आवडत नाहीत ते उघडू नयेत. बास, इतकाच उपाय आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की जे लोकं एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचा कंटाळा आला आहे असे दर वेळी त्या धाग्यांवर लिहितात ते मुळात असे धागे उघडतातच का? मुळात उघडतात ते उघडतात, वर पूर्ण वाचतात. इतकेच नाही तर आवर्जून प्रतिसाद देऊन त्याला वर पण आणतात. उदा ओक काकांचे नाडीचे धागे. असा धागा आला की लेखकाचे नाव आणि धाग्याचे नाव वाचूनच कळायचे की आत काय असणार. तरीही लोकं दर वेळेला प्रतिसाद देत असत, की आता बास करा, या धाग्यांचा कंटाळा आला आहे, वगैरे वगैरे. दिवटे जेव्हा फॉर्मात होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या लेखावर खच्चून टीका व्हायची. पण नवीन लेख आला की तास दोन तासात अर्धशतक झळकायचे. बरेचसे प्रतिसाद "तुमचा लेख वाचून शरम वाटली" छापाचे. अगं बाई, मागील लेखाच्या वेळेस पण शरम वाटली होती ना, मग परत हा लेख वाचालासच का ?? फालतू धाग्यांमुळे मिपाची क्वालिटी खालावत चालली आहे अशी ओरड करणारे नित्यनेमाने दिसतात. पण मज्जा म्हणते त्या तथाकथीत फालतू लेखावर प्रतिसाद देणारे पहिले लोक हेच असतात. एक नेहमीची तक्रार म्हणजे "अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात बोर्डवरून नाहीसे होतात". मान्य, पण मग लेका, पार खाली गेलेल्या फालतू लेखाला प्रतिसाद देऊन वर तूच आणलास ना रे. वानगीदाखल अकुंचे हल्ली आलेले धागे पहा. परवाच एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. तो म्हणाला, मायबोलीवर असे धागे आले की कुणी प्रतिसाद देतच नाही. आपोआप ते धागे जातात खाली. त्यामुळे चांगले लेख पटकन वाचायला मिळतात. मी म्हटले की लेका, त्यालाच प्रगल्भ संस्थळ म्हणतात. (दुसऱ्या संस्थळाचे कौतुक सहन करण्या इतपत मिपा प्रशासन प्रगल्भ आहे असे वैयक्तीक मत आहे. शिवाय अल्याड आणि पल्याड असे लिहिण्यापेक्षा थेट लिहिणे आवडते मला) लोकशाही बद्दल एक नेहमी म्हटले जाते की "People get the government they deserve". माझ्यामते, संस्थळाचे पण तसेच आहे. "सदस्य get the संस्थळ they deserve". आपल्याला दर्जेदार आणि सकस कंटेंट असलेले संस्थळ हवे आहे, पण आपले(मी पण यात येतो) इथले वागणे तसे आहे का? ते तसे नसेल तर त्या होस्टेल मधील मुलीचे वागणे जितके हास्यास्पद होते, तितकेच आपले पण आहे.

वाचने 37642
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

उपमा झोंबली हे मात्र खरय . याला कारण म्हणजे मला इथल्या लोकांसारखं लिहिता येत नाहि पण वाचायला आवडतं . साधारण सहा महिन्यांपूर्वी मिपा वाचायला सुरुवात केली . बरेच लोक लिखानातुन , त्यांच्या प्रतिसादातुन ओळखीचे वाटतात . पण गटार , कचर्‍याचा डबा हे शब्द जिभेच्या शेवटच्या भागाला जिथे मिरचीची तिखट चव कळते त्या भागालाहि झेपले नाहित . याला आपूलकि म्हणा नाहितर मी ज्या वातावरणात वाढलिय त्याचा परिणाम म्हणा .. तसाहि लौंगी मिरचीचा तडका असलेले प्रतिसाद इतक्यातच कशाला ;) म्हणुन शक्यतो टाळते .

इथे एक मुद्दा परत अधोरेखित करू इच्छितो. टीका करू नये असे मी कुठेही म्हटले नाही. टीका करावी, प्रसंगी टिंगलही करावी. अवांतर पण करावे अधूनमधून. या सर्व प्रकारांनी मजा वाढते. साधारण जेवणातील मिठासारखे आहे. मिठाने कशी जेवणाला चव येते, तसेच. पण म्हणून कुणी बचकभर मीठ घेऊन बसत नाही जेवायला. तद्वत हे प्रकार चविपुरतेच करावेत. आणि त्याच बरोबर अजून एक मुद्दा हा की हॉस्टेल मधील मुलीने कधीमधी टाचा उंच करून उघड्या मुलाला पाहावे, ते निसर्गाला धरून आहे. पण मग विनयभंग झाला अशी तक्रार करू नये.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुमचं म्हणणं असं आहे :
परवाच एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. तो म्हणाला, मायबोलीवर असे धागे आले की कुणी प्रतिसाद देतच नाही. आपोआप ते धागे जातात खाली. त्यामुळे चांगले लेख पटकन वाचायला मिळतात. मी म्हटले की लेका, त्यालाच प्रगल्भ संस्थळ म्हणतात.
आणि आता तुम्ही म्हणताय :
टीका करू नये असे मी कुठेही म्हटले नाही. टीका करावी, प्रसंगी टिंगलही करावी. अवांतर पण करावे अधूनमधून
आणि पहिल्या प्रतिसादात मी नेमकं तेच म्हटलंय :
चांगल्याला चांगलं म्हणणं आणि जे आवडलं नाही ते आवडलं नाही सांगणं म्हणजे प्रतिसाद. `दुर्लक्ष हा सर्वात मोठा अपमान आहे' हे जरी खरं असलं तरी त्यातनं लिहीणार्‍याला `काय चूक झाली किंवा काय सुधारणा हवी' ते कळत नाही त्यामुळे लेखकात सुधारणा होण्याची शक्यता शून्य होते

माणसाचं वय वाढतं तसं त्याच्यात जरा जास्त शहाणपण यावं अशी अपेक्षा असते. कुटुंब वाढत जातं तसे घरातल्या सगळ्यांनाच थोडीफार तडजोड करावी लागते आणि स्वभावाला मुरड घालावी लागते. ते झालं नाही तर एकत्र कुटुंबाचे तुकडे होतात. तेच संस्थळांनासुद्धा लागू आहे. असेच एका सदस्यापासून सुरुवात होऊन मिपा २२००० पर्यंत पोचले आहे तर मायबोली ४५००० च्या आसपास आहे. आता एवढे लोक एका जागी आल्यानंतर प्रत्येकाने मी मला पाहिजे तसेच वागणार्/लिहिणार म्हटले की मग वाद सुरू होतात. समाजात वावरायचे असेल तर आपल्याला बेटासारखे रहाता येणार नाही. अर्थात इथे येऊन फक्त स्कोअर सेटल करायचे एवढाच कोणाचा उद्देश असेल तर मग त्यातून विधायक काहीही होणार नाही.
प्रत्येक गोष्टीकडे स्कोर सेटलींग म्हणूनच बघीतलं तर नाडीपासनं परिक्रमेपर्यंत कशाच्याच बाबतीत दुसरा विचार असू शकतो हे सांगता येणार नाही. टिका व्यक्तिगत असेल तर सं.मं. प्रतिसाद लगेच उडवतं त्यामुळे मुद्दा लेखनाशी संबंधित असतो, सदस्याशी नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे.
टीका विधायक असेल तर ठीक आहे. पण खुशीताईंचा उल्लेख आला म्हणून सांगते, की त्या मध्यमवयीन बाई आहेत. वैद्यकीय व्यवसायातल्या आहेत. एक वेगळा अनुभव घेतला तो सगळ्यांबरोबर शेअर करावासा त्यांना वाटला त्यासाठी त्यांनी एवढे लिखाण करणे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांची तुलना "शेजार्‍याचा बोका माझ्या सीटचे कव्हर फाडतो" अशा धाग्यांबरोबर करणे चुकीचे आहे तसेच रामदासकाकांच्या एखाद्या धाग्याबरोबर करणे हेही चुकीचे आहे.
सर्व प्रतिसाद परिक्रमा या संकल्पनेविषयी होते हे नमूद करतो. सदस्याचा व्यावसाय काय यापेक्षा `लेखनाचा विषय काय' हे लक्षात घेणं आगत्याचं आहे.
परवा काळेबैंच्या नावावर जो धागा आला होता त्याचा उद्देश फक्त दंगा करणे एवढाच होता. तिथे कोणी गोंधळ घातला तर साहजिकच आहे. पण गंभीरतेने लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍याला टिंगलीचा विषय करणे अजिबात पटत नाही. काही दिवसांपूर्वी कवितावर इतके भयंकर प्रतिसाद येत होते की गणेशा आणि पाभेसारख्या चांगल्या कवींनी इथे लिहिणे जवळपास बंद केले आहे. प्रतिक्रिया देताना आपल्यामुळे कोणी इतका दुखावला जातोय का याचा सगळ्यांनी जरा विचार करा
लिली काळेला मी स्वतः व्य. नि. करून, गोंधळाचं महत्त्वाचं कारण आयडीमागे नक्की कोण आहे हा (नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे) सदस्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम आहे, हे सांगितलंय. आता विषय निघालाच आहे तर माझ्या लेखनावर (किंवा त्यावर केलेल्या विडंबनांवर) खुद्द संपादक सदस्यांचे प्रतिसाद पाहावे!
माणूस बदलू शकतो तसा संस्थळाचा स्वभाव बदलू शकतो. शेवटी हा स्वभाव कोण ठरवतो? इथे लिहिणारे सदस्य. आयुष्यात वर्षांचा आकडा नुसता वाढत गेला तरी "हम नहीं सुधरेंगे" असं कोणी म्हणत असेल त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापलिकडे माझ्या हातात काही नाही
माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही घेतला तसा अजिबात नाही. मला इतकंच म्हणायचंय :
संकेतस्थळावर चांगलं लेखन येणं (किंवा करणं) हे संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करतं. निव्वळ पोस्टसच्या खालीवर होण्यानं काहीही फरक पडत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजयबाबू, लिली काळे, खुशी , गिरिजा हे सगळे राहू द्या थोडावेळ. तुमचे किती प्रतिसाद अप्रकाशित झालेत याची आपण नोंद जरी ठेवली नसली तरी ते बरेच होते हे तरी मान्य आहे का? इथे प्रतिसाद अप्रकाशित करताना जेवढे असतील तेवढ्या संपादकांचं मत घेण्याचा प्रयत्न असतो पण कधीकधी तसं करण्यास वेळेच्या फरकामुळे कोणीही अ‍ॅव्हेलेबल नसतं. यावरून मनात आलं आणि अप्रकाशित केलं असं नसण्याची शक्यता असते हे तरी मान्य आहे का? कितीतरीवेळा बरेच तासांनंतर एखादा प्रतिसाद खाली गेलेल्या धाग्यातला पुन्हा प्रकाशित होतो. तो कोणाच्या फारसा लक्षातही येत नाही पण आमचं काम शक्य तेवढ्या चांगल्या पद्ध्तीने करण्याचा प्रयत्न असतोच पण अनेक फालतू प्रतिसादांमुळे अपुरा पडतो. सरासरी १० संपादक रोज काम करत असतात असे अंदाजे धरले तर रोज कामाच्या व्यापातून किती प्रतिसाद एकजण अप्रकाशित करू शकेल? तेही प्रत्येक प्रतिसादावर चर्चा करून! कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही या नादात संपादकांवर (जे सदस्यही आहेत) किती अन्याय होतोय हे लक्षात घ्यावे. आपले कावळा शिवणे, स्तनांच्या कर्करोगाच्या धाग्यावरचे प्रतिसाद, जे अप्रकाशित झाले ते अत्यंत हीन दर्जाचे होते. बाकीच्या सदस्यांचे जाऊ द्या, संपदकांचेही जाऊ द्या, तुम्ही या संस्थळावर येऊन काय हवं ते लिहून जाताय याची जाणीव म्हणून तरी प्रतिसाद देताना विचार करा. मिसळपाव किंवा कोणत्याही संस्थळावर वावरणे हा तुमचा आमचा जसा अधिकार असल्यागत आपण वावरतो, प्रतिसाद देतो, तसाच अधिकार आजारी, अगदी अंथरुणाला खिळलेल्या लोकांचाही आहे. किंबहुना त्यांच्यासाठी हे मोठे मनोरंजनाचे साधन आहे. त्यांना असे प्रतिसाद वाचायला लावून किंवा आम्हाला अप्रकाशित करायला लावून तुम्हाला काय मिळते? हे फक्त तुम्हालाच लागू आहे असे नाही तर असे वागणार्‍या प्रत्येक सदस्याला लागू पडते. यापुढे तुमचे हीन दर्जाचे कोणतेही प्रतिसाद ठेवणार नाही पण सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर आहे ही सूचना. सध्या या संस्थळाचे मालक सतत हजर आहेत त्यामुळे तेही हे सर्व वाचत आहेत.

In reply to by रेवती

प्रथम या प्रतिसादाबद्दल आभार! तुम्ही विषय बोर्डावर आणलाय म्हणून लिहीतो :
आपले कावळा शिवणे, स्तनांच्या कर्करोगाच्या धाग्यावरचे प्रतिसाद, जे अप्रकाशित झाले ते अत्यंत हीन दर्जाचे होते.
तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो. स्तनांकडे केवळ दुग्धपानासाठी असलेला अवयव म्हणून बघण्याचा दृष्टीकोन तो अवयव शरीराच्या दृष्टीनं निकामी करत जातो. सुप्तवज्रासनात स्त्रियांच्या स्तनांना केलेला ऑइल मसाज, पुरूषानं केलेलं स्तनाग्रांचं उद्दिपन, भस्रिका आणि कपालभातीसारखे प्राणायाम स्तनांना रक्त आणि प्राणवायु पोहोचवतात. याशिवाय स्त्रीदेहाच्या सक्षमतेवर तिच्या इंडोक्राईन (अंत:स्त्रावी) ग्रंथी मोठ्याप्रमाणावर परिणाम करतात. स्रीमधे प्रणयकामना जितकी दीर्घकालीन असेल तितक्या त्या ग्रंथी अधिक कार्यक्षम राहतात आणि परिणामी तिचे स्तन सुडौल राहतात. जितका स्त्रीला स्वतःच्या स्त्रित्वाचा गौरव तितकी तिच्या स्तनांची आंतरिक प्रतिकार क्षमता जास्त कारण सर्व देह हा मनोकायिक क्रियांवर चालतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता शून्य होते. केवळ भयभित होऊन केलेल्या रेग्युलर चाचण्या फक्त `अजून कॅन्सर झाला नाही' इतकंच दर्शवतात. तिथे एकदम सॅड मूड होता त्यामुळे मी हे सर्व लिहलं नाही. `कावळा शिवणे' याचा अर्थ फक्त `पिंडाला कावळा शिवणे' इतकाच असेल आणि एका साध्याश्या पोस्टवर देखील तो तितक्याच गंभीरतेनं घेतला जावा अशी अपेक्षा असेल याची कल्पना नव्हती.
मिसळपाव किंवा कोणत्याही संस्थळावर वावरणे हा तुमचा आमचा जसा अधिकार असल्यागत आपण वावरतो, प्रतिसाद देतो, तसाच अधिकार आजारी, अगदी अंथरुणाला खिळलेल्या लोकांचाही आहे. किंबहुना त्यांच्यासाठी हे मोठे मनोरंजनाचे साधन आहे. त्यांना असे प्रतिसाद वाचायला लावून किंवा आम्हाला अप्रकाशित करायला लावून तुम्हाला काय मिळते?
बाप रे! तुम्ही काय कुणालाही मी आव्हान देतो की माझ्या प्रतिसादामागे विचार नाही आणि ते हिणकस आहेत हे दाखवून द्यावं. तुमच्या एका आक्षेपाला मी सविस्तर उत्तर दिलंय आणि दुसर्‍याच्या बाबतीत माझी भूमिका मांडलीये. बहुदा माझे प्रतिसाद पुरेश्या विचारा आभावी अप्रकाशित केले गेलेत या विषयी मला आता काहीही संदेह नाही.
यापुढे तुमचे हीन दर्जाचे कोणतेही प्रतिसाद ठेवणार नाही पण सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर आहे ही सूचना.
तुम्हालाही एक सांगावंस वाटतं की हा प्रतिसाद एक संपादक म्हणून (आणि संकेतस्थळाच्या धोरणाचं सोडा) पण निव्वळ एटिकेट म्हणून तुम्ही इथे द्यायला नको होता. एनी वे, सं. मं.चा निर्णय कळवावा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही विषय बोर्डावर आणलाय माफ करा, तो विषय कारण नसताना तुम्ही त्या धाग्यावर चालू केला होता. मी फक्त गप्प बसले, बोलण्याच्या पलिकडे आहात तुम्ही. तुमचा एकही प्रतिसाद आजवर मी अप्रकाशित केला नाहीये तर सगळ्या संमंने निर्णय घेऊन केलेले आहेत. तिथे एकदम सॅड मूड होता त्यामुळे मी हे सर्व लिहलं नाही. उलट तिथच हे सगळं लिहायला हवं होतं. तो धागा त्यासाठीच होता पण तुमच्या प्रतिसादांमध्ये तसा मूड दिसला नाही. बहुदा माझे प्रतिसाद पुरेश्या विचारा आभावी अप्रकाशित केले गेलेत या विषयी मला आता काहीही संदेह नाही. तुम्हाला संदेह नाही म्हणता मग बहुदा कश्याला? इथं आम्हाला आमचं काम वाढवून ठेवायचं नाहीये तुमचे प्रतिसाद अप्रकाशित करून. `कावळा शिवणे' याचा अर्थ फक्त `पिंडाला कावळा शिवणे' खुद्द लेखिकेचाच नव्हे तर अनेक स्त्रियांचा समज आहे तो. अर्थात पुरुषांचाही योग्य समज झाला असेल पण त्याबद्दल माहित नाही. महिलांना मात्र जे वाटायचं ते वाटलय. उगीच वेड पांघरून पेडगावला जाण्यात अर्थ नाही. निव्वळ एटिकेट म्हणून तुम्ही इथे द्यायला नको होता. एटिकेट? हा हा हा. तुम्हीच प्रतिसाद देताना ते किती पाळता हे मी सांगायला नकोय.

In reply to by संजय क्षीरसागर

`कावळा शिवणे' याचा अर्थ फक्त `पिंडाला कावळा शिवणे' इतकाच असेल
पिंडाला कावळा शिवण्यात "नवर्‍याचा " काय संबंध हो? वेड पांघरुण पेडगावला जाणे म्हणतात ते हेच.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही काय कुणालाही मी आव्हान देतो की माझ्या प्रतिसादामागे विचार नाही आणि ते हिणकस आहेत हे दाखवून द्यावं. खंतमंडळाच्या धाग्यामागे काय विचार होता हो..?

In reply to by रेवती

सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर आहे ही सूचना. सध्या या संस्थळाचे मालक सतत हजर आहेत त्यामुळे तेही हे सर्व वाचत आहेत.
When you have to shoot, shoot. Don't talk. असंच गुड बॅड अग्ली मधलं वाक्य आठवलं

In reply to by संजय क्षीरसागर

साहेब, माझा प्रतिसाद एका संजय क्षीरसागर या आयडीसाठी नव्हता, तर २२००० मिपाकरांसाठी होता. तुम्ही तो वैयक्तिक करून घेऊ नका प्लीज. आता मी हे बोलणार नव्हते, पण तरी बोलते. खुशीच्या लेखनावरून प्रतिसाद लिहिले असे म्हणणे असेल तर गिरीजाला पण तोच न्याय लावावा ना! त्याच्यावर काय कारवाई करायची ती व्यवस्थापन करीलच. अशा गोष्टींना जरा वेळ लागतो कारण त्याने अ‍ॅडमिन्सचे नाव घेतले म्हटल्यावर सगळ्यांना संपर्क करून विचारणे हे हजर संपादकांचे काम होते आणि ते त्यांनी केलेच आहे. मुद्दा फसवणुकीचा असेल तर जुन्या सदस्यांकडून शरदिनीतैंचे प्रकरण माहित करून घ्या! मनोगतवर प्रत्येक प्रतिसाद संपादित होतो. इथे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे तर त्याचा जबाबदारीने वापर करणे हे सदस्यांनी केले पाहिजे. संपादक म्हणजे शाळा मास्तर नव्हेत. असलेच वर्गातले मॉनिटर्स आहेत एवढेच.

In reply to by पैसा

...तर २२००० मिपाकरांसाठी होता.
या लेखावरच्या प्रतिसादांत २२००० आकडा अनेक वेळा आलाय म्हणून लिहितो. पैसातै, त्यावर खरंच विश्वास ठेवू नका हो. रिकामे आयडी, डूआयडी, मिपावर काही काळ रमून गेलेले आयडी, एकदाच जॉइन होऊन पुन्हा कधी न फिरकणारे आयडी वगैरे सगळे वजा केले तर सध्या, म्हणजे गेल्या काही महिन्यांत ऍक्टिव्ह असणारे आयडी (लेखन करणारे, प्रतिसाद देणारे) वगैरे २०० च्या आसपास असतात. वाचनमात्र अजून थोडे असतील. पण १००० जेमतेम. मराठी आंतरजालाला इतका मोठा टीआरपी नाहीये हो...

In reply to by राजेश घासकडवी

लिहिलेले जेवढे आजी, माजी, भूत, दुभंग पर्सन्यालिटी वगैरे जे काही असतील त्यांच्या सगळ्यांसाठी आहे ते. माबोवर सुद्धा ४५००० आयडी दिसतात, त्यातले थोडेच नेहमी लिहिणारे असतात. पण ते १९९६ पासून आहेत म्हटल्यावर एवढा आकडा होणारच. तसाच सगळ्याच संस्थळांवर होणार. याशिवाय चर्चेतल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुमचे विचार वाचायला आवडतील.

In reply to by राजेश घासकडवी

सदस्यसंख्या मोजण्यापेक्षा प्रतिसादसंख्या, प्रतिसादामागची सरासरी शब्दसंख्या मोजल्यास सांख्यिकीदृष्ट्या अधिक माहितीपूर्ण विदा जमा होईल असं वाटतं. अर्थातच त्या माहितीमधे मूळ धाग्यात विमेंनी ज्या प्रकारच्या प्रतिसादांना विरोध दर्शवला आहे तसे आणि धाग्याचं खरोखरच महत्त्व वाढवणारे असे वेगळे काढता येणार नाहीत.

धाग्याच्या मथितार्थाशी सहमत. मात्र काही धागे हे रंजकतेत कमी आहेत/नाहित किंवा मला आवडतात/पटतात हा मुद्दा नसून ते समाज विघातक असतात. जसे ओकांचे नाडीविषयक धागे. अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अंधश्रद्धा पसरतेय - कोणीतरी खुलेआम पसरवतोय - त्याकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अश्या धाग्यांवर मी शक्त तितक्यावेळा माझा स्पष्ट आणि प्रसंगी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आलोय.. करेनही. (या धाग्यांना उत्तर दिले नाहि तर "राजा घाबरला माझी टोपी दिली" ची बोंब पुढच्या धाग्यात निघेल याची खात्री बाळगा. त्यापेक्षा ती समाजविघातक टोपी आहे त्यामुळे ती जप्त करावी लागेल असे -"राजा भिकारी.. " या गाण्याकडे दुर्लक्ष करूनही- वेळोवेळी सांगून उंदरांना पुढील गोंधळ रोखण्यासाठी अडवणे योग्य वाटते) अन्यथा, इतर धाग्यांसंबंधीच्या तुमच्या भावनेशी सहमत आहे हे आधी म्हटले आहेच!

In reply to by ऋषिकेश

अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अंधश्रद्धा पसरतेय - कोणीतरी खुलेआम पसरवतोय - त्याकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अश्या धाग्यांवर मी शक्त तितक्यावेळा माझा स्पष्ट आणि प्रसंगी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आलोय.. करेनही.
फुल सपोर्ट!

विमे: मी मालकांकडे तुम्ही अपेक्षाभंग केल्याची तक्रार कारयचा विचार करत आहे (ह्.घ्या.) तसेही सदस्यांनी प्रतिसाद नाही दिला तरी सदर लेखक महाशय स्वतःच तो लेख प्रतिसाद देऊन वर आणतात याची भरपूर उदाहरणे आहेत... सबब : जे जसे आहे तसे राहु द्या. एका लेखाने मिपाकर बदलतील हे केवळ स्वप्नरंजन आहे...

मेल्या, ८६ पैकी फक्त ३ प्रतिसाद तुझे? काड्या टाकून पळायची सवय तुला पण लागली काय? :D :P

In reply to by पैसा

नाही नाही, धाग्यावर बारीक लक्ष ठेऊन आहे मी. तेवढ्यासाठी सकाळी सकाळी मिपा वर येतो. (पहिले अपत्य आहे ना, म्हणून इतके लाड चालू आहेत ;-) ) प्रतिसाद मुद्दाम मोजके देतो आहे. आणि जितके दिले त्यातून माझे बरेचसे म्हणणे स्पष्ट आहे. त्यापेक्षा जास्त बोलून काही फरक पडेल का ते माहित नाही. काही ठिकाणी फुकट वाद नकोत म्हणून हाताला आवर घातला. शिवाय तुमच्या स्वाक्षरीताला पावलो कोएल्हो पण दिसतो सारखा सारखा. तो बरेच काही शिकवून जातो :-) आता तुम्ही म्हणाला आहात तर एक काडी टाकतो. काही विशिष्ट मंडळींची या धाग्यावरची अनुपस्थिती लक्षणीय आहे. जाणकारांना कळले असेलच कोण ते ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

(पहिले अपत्य आहे ना, म्हणून इतके लाड चालू आहेत )
विमे.. या आणि या दोन अपत्यांचं पितृत्व नाकारतोस? हे योग्य नाही. स्वीकार त्यांच्या जन्माची जबाबदारी... ;)

In reply to by गवि

या दोन्ही अपत्यांना अनेक माता पिता होते. जन्मदाखल्यावर माझे नाव आले इतकेच ते काय कर्तृत्व. आणि त्यातले एक अपत्य तर स्पा-सूड चे होते. वैद्यकीय complications मुले मी सरोगेट बाप बनलो होतो. विसरलात की काय ?? ;-)

स्त्री स्तनांविषयी मी दिलेला प्रतिसाद, ज्या लेखासंदर्भात तो दिलाय आणि तिथले सर्व प्रतिसाद यापेक्षा विधायक आहे. माझ्या मनात स्त्रीत्वाचा नि:संशय गौरव आहे आणि कोणत्याही सूज्ञ स्त्रीला कॅन्सरच्या धसक्यातून तो आयुष्यभरासाठी मुक्त करू शकेल याचा मला विश्वास आहे. अँड दॅट इज इनफ फॉर मी. प्रतिसाद आता दिला काय आणि तेंव्हा दिला काय, माझ्या मनात जे होतं ते एकच आहे. विदा वगैरे गोळा न करता प्रतिसाद दिलाय ही एक गोष्ट हेतू सिद्ध करायला पुरेशी आहे. अर्थात एकदा मतं बनवल्यावर वेगळा विचार करण्याची अपेक्षा करून उपयोग नाही. `कावळा शिवणे' या वाक्प्रचारावरनं माझ्या सदस्यत्वाविषयी निर्णय होतोय. आणि का तर प्रतिसादातनं दुसरा अर्थ इंडिकेट होतो! संकेतस्थळाच्या धोरणांविषयी मी लिहू शकत नाही पण :
लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.
यात पुढे फक्त इंग्रजीत आणि स्टार टाकून स्पष्टीकरण लिहीलंय आणि `सांस्कृतीक वारसा' या प्रश्नाच्या अनुरोधानं ते लिहीलीय इतकंच ...पण ही वाक्य संकेतस्तळावरच्या कुणाला अणखर वाटली नाहीत. ______________________________
खुशीच्या लेखनावरून प्रतिसाद लिहिले असे म्हणणे असेल तर गिरीजाला पण तोच न्याय लावावा ना!
गिरीजा हा पुरूष सदस्यानं घेतलेला स्त्री आयडी आहे आणि ती इतर सदस्य आणि संकेतस्थळाची शुद्ध फसवणूक आहे. माझे सर्व प्रतिसाद एका पुरूषाला उद्देशून होते. तुम्हाला कल्पना असेलच, सं.मं.नं मला व्य. नि. करून माझ्या म्हणण्याची दखल घेतल्याचं नमूद केलंय. खुशीनं लिहीलेल्या `परिक्रमा' या अध्यात्मिक साधनेबद्दल माझी स्वतःची मतं आहेत आणि त्यांनीच काय खुद्द जगन्नाथ कुंट्यानी सुद्धा साधनेच्या सार्थकतेबद्दल चर्चा केली असती तर मला मतं मांडता आली असती. त्यामुळे दोन्ही विषय भिन्न संदर्भात आहेत. असो, तुमचा निर्णय झालाय म्हटल्यावर मलाही आता प्रतिवादात रस नाही. माझ्या प्रतिसादांचे, (माझा उद्देश लक्षात न घेता), तुम्हाला हवे तसे अर्थ लावून आणि माझी मतं मांडायची एकही संधी न देता, तुम्ही परस्पर निर्णय घेऊन मोकळे झालात त्यामुळे मला कोणतंही वैषम्य नाही. आणि ही चर्चा ओपनली झाली याचा सर्वात मोठा आनंद आहे .

In reply to by संजय क्षीरसागर

साहेब आता तुम्ही मौन व्रत धारण करा,काय असत ना व्यक्तीगत अहं वाढला की होत कधी कधी

In reply to by संजय क्षीरसागर

या गंभीर धाग्यावर इतके विनोदी प्रतिसाद वाचायला मिळतील असं वाटलं नव्हतं! :D

आता मिपा वर पुरुषां साठी राखिव कोपरा हा कॉलम ठेवा अशी विनंती,जेणे करुन स्त्री आयडी त्यात शिरकाव करु शकणार नाही.

हं एकंदर मजेशीर चर्चा झाली तर.. असो. तर मी काय म्हणत होतो एकदा आपण कालीदासाच्या मेघदुतावर चर्चा करावी का दोस्तांनो... :)

१००

ताज्या घडामोडींच्या धाग्यावर अनेकांना असलेल्या आक्षेपामुळे का कोण जाणे या १२ वर्षे जुन्या धाग्याची आठवण झाली.