✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम

व
विश्वनाथ मेहेंदळे यांनी
Fri, 03/01/2013 - 01:32  ·  लेख
लेख
एक बोधकथा… कोणे एके काळी एका होस्टेल मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एक कॉलेज होते. कॉलेज होते म्हटल्यावर तिथे हॉस्टेल्स पण होती. एक होते मुलांचे आणि एक मुलींचे. ही दोन्ही हॉस्टेल्स बाजूबाजूला होती. मध्ये एक भिंत होती. एकदा एक मुलगी मुलींच्या होस्टेलच्या रेक्टर कडे तक्रार घेऊन आली. तक्रार होती की बाजूच्या होस्टेल मधील मुलगा आपल्या खोलीत केवळ एक चड्डी घालून वावरतो आणि तिच्या खिडकीतून हे तिला सतत दिसल्याने तिचा विनयभंग आणि मानसिक छळ होतो आहे. तक्रार गंभीर असल्याने रेक्टर तडकाफडकी शहानिशा करायला खोलीवर आली. "कुठे आहे तो मुलगा, दाखव मला खिडकी" "बाई, ती बघा खिडकी" "अगं पण समोर तर भिंत आहे" "बाई तो मुलगा असा नाही दिसणार. ती भिंत फार उंच नाही काही. तुम्ही एक काम करा, खिडकीखाली टेबल आहे. त्यावर उभे राहा आणि टाचा उंच करून भिंतीपलीकडे पहा. आणि बघा, कसा तो निर्लज्ज केवळ एका चड्डीवर फिरतो आहे ते" ही कथा काल्पनिक आहे, पण या सारखीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या ऑफिसात घडली. एका मुलीने सहज बोलता बोलता मला सांगितले की जवळच बसणाऱ्या एका मुलाला सतत सर्दी झालेली असते आणि त्यामुळे तो श्वास घेतो तेव्हा एक विचित्र आवाज होतो आणि सतत येणाऱ्या त्या आवाजामुळे तिला त्रास होतो ("It bothers me"). मी म्हटले, "अगं पण तो तसा लांब आहे तुझ्यापासून, इतक्या बारीक आवाजाचा त्रास कसा होतो तुला". त्यावर ती अत्यंत निरागसपणे म्हणाली, "हो, पण तुम्ही जर अत्यंत लक्षपूर्वक ऐकाल, तर तुम्हालापण त्याचा त्रास होईल (If your listen carefully, it will bother you)". शंभर टक्के सत्य घटना आहे, काडीची अतिशयोक्ती नाही. आता तुम्ही म्हणाल की याचा आणि मिपाचा काय संबंध. तर तो असा आहे की मिपावर नियमितपणे ओरड होत असते. कधी ब्लॉगवरचे शिळे लेखन टाकले म्हणून तर कधी एकाच विषयावरचे धागे येतात म्हणून. मुंबई-पुणे, फलज्योतिष, नाडीविद्या, देशस्थ-परदेशस्थ किंवा अजून काही. कधी दिवट्यान्च्या adult लेखनावर आक्षेप तर कधी कुणा विशिष्ट लेखकाचे लेखन आवडत नाही म्हणून शंख. कधी मदत मागणाऱ्या धाग्यान्बद्दल त्रागा तर कधी कोण नवीन आयडी मिपाचे डस्टबीन करतो आहे असा आरोप. खरेतर या सगळ्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. इतका सोपा की तो कुणालाही करता येइल. तुम्ही मालक, सल्लागार, संपादक नसाल तरी. हा अत्यंत खास उपाय म्हणजे, जे धागे (किंवा विषय /लेखक) आपल्याला आवडत नाहीत ते उघडू नयेत. बास, इतकाच उपाय आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की जे लोकं एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचा कंटाळा आला आहे असे दर वेळी त्या धाग्यांवर लिहितात ते मुळात असे धागे उघडतातच का? मुळात उघडतात ते उघडतात, वर पूर्ण वाचतात. इतकेच नाही तर आवर्जून प्रतिसाद देऊन त्याला वर पण आणतात. उदा ओक काकांचे नाडीचे धागे. असा धागा आला की लेखकाचे नाव आणि धाग्याचे नाव वाचूनच कळायचे की आत काय असणार. तरीही लोकं दर वेळेला प्रतिसाद देत असत, की आता बास करा, या धाग्यांचा कंटाळा आला आहे, वगैरे वगैरे. दिवटे जेव्हा फॉर्मात होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या लेखावर खच्चून टीका व्हायची. पण नवीन लेख आला की तास दोन तासात अर्धशतक झळकायचे. बरेचसे प्रतिसाद "तुमचा लेख वाचून शरम वाटली" छापाचे. अगं बाई, मागील लेखाच्या वेळेस पण शरम वाटली होती ना, मग परत हा लेख वाचालासच का ?? फालतू धाग्यांमुळे मिपाची क्वालिटी खालावत चालली आहे अशी ओरड करणारे नित्यनेमाने दिसतात. पण मज्जा म्हणते त्या तथाकथीत फालतू लेखावर प्रतिसाद देणारे पहिले लोक हेच असतात. एक नेहमीची तक्रार म्हणजे "अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात बोर्डवरून नाहीसे होतात". मान्य, पण मग लेका, पार खाली गेलेल्या फालतू लेखाला प्रतिसाद देऊन वर तूच आणलास ना रे. वानगीदाखल अकुंचे हल्ली आलेले धागे पहा. परवाच एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. तो म्हणाला, मायबोलीवर असे धागे आले की कुणी प्रतिसाद देतच नाही. आपोआप ते धागे जातात खाली. त्यामुळे चांगले लेख पटकन वाचायला मिळतात. मी म्हटले की लेका, त्यालाच प्रगल्भ संस्थळ म्हणतात. (दुसऱ्या संस्थळाचे कौतुक सहन करण्या इतपत मिपा प्रशासन प्रगल्भ आहे असे वैयक्तीक मत आहे. शिवाय अल्याड आणि पल्याड असे लिहिण्यापेक्षा थेट लिहिणे आवडते मला) लोकशाही बद्दल एक नेहमी म्हटले जाते की "People get the government they deserve". माझ्यामते, संस्थळाचे पण तसेच आहे. "सदस्य get the संस्थळ they deserve". आपल्याला दर्जेदार आणि सकस कंटेंट असलेले संस्थळ हवे आहे, पण आपले(मी पण यात येतो) इथले वागणे तसे आहे का? ते तसे नसेल तर त्या होस्टेल मधील मुलीचे वागणे जितके हास्यास्पद होते, तितकेच आपले पण आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37234 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

तालियाँ...

आदूबाळ
Fri, 03/01/2013 - 01:36 नवीन
तालियाँ... शब्दा-शब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments

तालियाँ!!!! पूर्ण सहमत.

बॅटमॅन
Fri, 03/01/2013 - 01:38 नवीन
तालियाँ!!!! पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

आशयाशी सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 03/01/2013 - 01:40 नवीन
विमे - या लेखनाबद्दल दंडवत स्विकारा. मागे मी हिच चर्चा खफवर छेडली होती की असे सतत आक्षेप घेणारी माणसे एखाद्या मोठ्या शहरात (जेथे वाहतूकीची समस्या जटील आहे) कशी राहत असतील? याचा अपमान कर, त्याला शिवीगाळ कर, तुमच्यासारख्यांमूळेच आमचे शहर बदनाम होत आहे असली संवादफेक कर असे काही करत असतील की गपगुमान आपापल्या रस्त्याला लागत असतील? जर शहरातून चालताना सहनशक्ती दाखवत असतील तर मग इथे ती सहनशक्ती कुठे लुप्त होते?
  • Log in or register to post comments

अगदी मनातलं..

उपास
Fri, 03/01/2013 - 01:47 नवीन
विमें अगदी मोजक्या शब्दात (टू द प्वांईट). वाचणार्‍याला नीरक्षीर विवेक नसेल किंवा नुसताच टाईमपास करायचा असेल तर असं होणारच. मला वाटतं ही प्रगल्भतेपर्यंत जाणारी एक पायरी आहे, जे आहे त्याचा आनंद घ्यायचा.. दुसरं म्हणजे, टीपी करणर्‍यांसाठी (वाहाते) हक्काचे कुरण असेल तर जिथे तिथे पिंक टाकणारे कमी मिळतील कारण ते त्या कुरणात व्यस्त राहतील, तस़ काहीसं करता आलं तर उत्तम! ;)
  • Log in or register to post comments

हे ते लेखन होय...

धन्या
Fri, 03/01/2013 - 02:00 नवीन
तुमचं म्हणणं पटलं. तुमची बोधकथा आम्हालाही लागू होते. एका ज्योतिषाच्या धाग्यावर तुम्ही आमची कानउघाडणी केलीत तेव्हा आम्हालाही पटलं. असो. रच्याकने, त्या विहीरीतलं पाणी पिऊन नंतर समुद्राच्या दिशेने उडून गेलेल्या काकबनातल्या कावळ्यांचं पुढे काय झालं? ;)
  • Log in or register to post comments

चांगले विवेचन

अभ्या..
Fri, 03/01/2013 - 02:16 नवीन
मलापण तुमचे म्हणणे पटले मेहेंदळेसाहेब. मलाही लागू होते हे. यापुढे केवळ वाचनमात्र राहून प्रगल्भ होण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माझाही संकल्प....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/02/2013 - 09:23 नवीन
आमचा अभ्या बोलला म्हणजे देव बोलला. मीही आता प्रगल्भ होईन म्हणतो. महाराष्ट्रातला अतिशय पारंपरिक सण शिमगा होईपर्यंत (कब है होली) माझा संकल्प असा. लेखन देऊ ते जागतिक दर्जाचं आणि उच्च दर्जाचं देऊ, शिळ लेखन देणार नाही, ब्लॉगवरुन कै च्या कै लेखांचा रतीब घालणार नाही, फाल्तू लेखांना प्रतिसाद देणार नाही, एकेक ओळींत प्रतिसाद संपवणार नाही, मिपावर पडीक आहे म्हणून प्रतिसाद ओतणार नाही. सदस्य म्हणून लिहिण्यात अधिकाधिक सभ्यपणा आणण्याचा प्रयत्न करीन. फ्रीज घ्यायचा आहे, कोणता घेऊ अशा चौकशांचे धागे काढणार नाही. स्त्री आयडी डू असला तरी ''यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता'' या थोर सुभाषिताला डोळ्यासमोर ठेवून आलेल्या लेखाला 'छान लिहिता, लिहित चला' असं म्हणेन. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. :) देवा, पूर्वजन्मात काही पुण्य कमी पडले असेल तर आता कोंबडं, बकरं माग पण त्याचा राग मिपावर नको काढू राव -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हॅ हॅ

स्पा
Sat, 03/02/2013 - 09:34 नवीन
हॅ हॅ अर्थाचा अनर्थ करून डायरेक्ट टोकाचा निर्णय कसा घ्यावा , याच उत्तम उदाहरण म्हणजे वरील प्रतिसाद चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं टोकाचा नै निर्णय...माझा संकल्प आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/02/2013 - 09:44 नवीन
अर्थाच अनर्थ नै हो. आज सकाळी एक जटाधारी बाबा माझ्या स्वप्नात आले. हातात कमंडूल,कपाळावर भस्म, चेहर्‍यावर ऋषि मुनिचं तेज, अगदी स्वच्छ पितांबर, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि अतिशय गोड आवाजात ते मला म्हणाले ''बेटा, ऐसा कब तक सोते रहोगे, जागो... उधर मिपाका दर्जा इंचा इंचाने खालावत चालला आहे,ऐसे लोग बोल रहे है. ऐसा कबतब हातोपे हात धरके बैठोगे. उठो, ए लो. एक जादूकी छडी इसको घुमावो...सब ठीक हो जायेगा.'' आणि बाबा स्वप्नातून पाढर्‍या शुभ्र घोड्यांच्या रथातून आकाशाकडे जातांना दिसले. म्हणून माझा प्रतिसाद हा एक संकल्प.... देवा, पूर्वजन्मात काही पुण्य कमी पडले असेल तर आता कोंबडं, बकरं माग पण त्याचा राग मिपावर नको काढू राव -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

विमे - या लेखावर जे जे लोक

मोदक
Fri, 03/01/2013 - 02:07 नवीन
विमे - या लेखावर जे जे लोक सहमती दर्शवतील ते लोक आत्तापर्यंत "तू वरती म्हणतो तसेच वागले असतील का..?" याचा विदा गोळा करायला सुरूवात करूया का..? ;-) (हा प्रतिसाद लेख आल्या आल्या टाईप केला होता परंतु त्या दरम्यान लॅपटॉप हॅंगला. उपास, श्रीरंग, बॅटमॅन, आदूबाळ आणि प्रतिसाद छापून होईपर्यंत प्रतिक्रिया अपडेट झालेल्या कुणालाही हे उद्देशून नाहीये! कळावे, लोभ असावा.)
  • Log in or register to post comments

हे का वापरत नाही?

श्रीरंग_जोशी
Fri, 03/01/2013 - 02:28 नवीन
# मोदक - या प्रतिक्रियेबद्दल सप्रेम भेट. Image removed. टिप - वरील सप्रेम भेट केवळ एक उदाहरण म्हणून आहे मूळ लेखात वर्णिलेल्या प्रवृत्तीचे. अशी प्रतिक्रिया देणे हा हेतू नाहीये! कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ह्म्म..

मोदक
Fri, 03/01/2013 - 02:33 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

माझी सहमती आहे , व अनेक

निनाद मुक्काम …
Mon, 03/04/2013 - 23:01 नवीन
माझी सहमती आहे , व अनेक धाग्यावर मी प्रतिसाद देणे टाळतो , नवीन होतो तेव्हा सर्वच विषयांवर माझी मते मांडायचो. अजून एक निरीक्षण म्हणजे इस्पिक चा एक्का ह्यांचे मागचे व ह्या वेळचे चालू असलेले प्रवास वर्णन वाचले , कुणीही सांगेन की ते टाकाऊ ह्या सदरात अजिबात मोडत नाही , त्यांना नियमित प्रतिसाद देणारे मिपाकर पहिले की त्यांच्या वाचनाचा चाहता वर्ग आहे असे दिसून येते , पण खटकते हेच की अनेक नामवंत ,लोकप्रिय मिपाकर जे विमे म्हणतात तसे इतर सवंग धाग्यांवर शरम वाटली असे सांगून परत परत लिहितात त्यांनी मात्र इस्पिक च्या ऐक्याच्या धाग्यावर नियमितपणे गैरहजेरी लावली , तुम्हाला त्यांचे लिखाण आवडले किंवा नाही आवडले किंवा काही सूचना ,सल्ले असतील तर ते मांडावे असे मला वाटते , टोटल दुर्लक्ष करण्यामागे ह्या नामवंत मिपाकरांची काय बरे भूमिका असू शकेन. येथे एक नमूद करतो की माझ्या धाग्यांवर टीका व कौतुक करण्याच्या निमित्ताने अनेक मिपाकर मंडळीनी भरभरून प्रतिसाद दिले आहे तेव्हा इस्पिक च्या एक्यांचे उदाहरण देऊन मी माझी मळमळ व्यक्त करत नाही आहे , मी माझे नुसते निरीक्षण नोंद्विण्यापेक्षा मत मांडले इतकेच. अनेक चांगल्या लेखांवर प्रतिसादाचा दुष्काळ हे चांगले लक्षण खचितच नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

मालोजीराव
Wed, 03/06/2013 - 15:19 नवीन
हॉल ऑफ फेम च्या लायकीची लेखमाला वाटली मला ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

विमे, यु टू ??

अर्धवटराव
Fri, 03/01/2013 - 02:12 नवीन
हाय रे दुर्दैवा. विमे सारख्या मिसळीत मुरलेल्या सदस्या कडुन असल्या जिलब्या पडाव्या ना... कि माझच काहि चुकतय... म्हणजे मला वाटायचं कि भंगार धाग्यांवर तेव्हढ्याच भंगार टिका करणारे, बोधामृत पाजणारे प्रतिसाद हे धाग्याच्या साहित्यरसास्वादसौष्ठववृद्धी करता म्हणुन मुद्दाम दिलेले असतात. त्यातलं वेधक साहित्यमुल्य मला किती किती म्हणुन रोचक वाटायचं. आणि का हो... असेल ते मायबोलीवाले प्रगल्भ का काय ते... पण मिपावर येऊन मिपाकरांचीच हजामत करायला तुम्हाला एखादा मिपाकरी वस्तरा नाहि का गावला? भुगोलाच्या तासाला दंगा होतो म्हणुन पिटी मस्तरांना कशाला पठवायचं वर्गावर... बळच आपलं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

लगे रहो

निमिष ध.
Fri, 03/01/2013 - 02:42 नवीन
लगे रहो विमे !!! अतिशय सुरेख बोधकथा आहे.
  • Log in or register to post comments

खरय विमे . जे धागे आवडत नाहित

लौंगी मिरची
Fri, 03/01/2013 - 03:28 नवीन
खरय विमे . जे धागे आवडत नाहित ते उघडु नयेत . फालतू धागा अनुल्लेखनाने मारावा . तुमच्या मताशी सहमत .
  • Log in or register to post comments

अशी टीकादेखील एक अभिव्यक्ती

शुचि
Fri, 03/01/2013 - 03:36 नवीन
अशी टीकादेखील एक अभिव्यक्ती असते हो विमे.
  • Log in or register to post comments

खरय विमेकाका..प्रतिसादसंख्या

आनन्दिता
Fri, 03/01/2013 - 04:34 नवीन
खरय विमेकाका..प्रतिसादसंख्या जास्त आहे म्हणून एखादा धागा उघडायला जावं तर त्यात शाळेतली मुलं शोभावी अशाप्रकारची चिखलफेक चाललेली असते. आधी यामुळे करमणुक होत असली तरी आताशा कंटाळा येतो. फुटकळ धाग्यांवर होणारी गर्दी नक्कीच चिंताजनक आहे. अशा धाग्यांवर टिका आणि टाईमपास करणार्यांची कारणे कितीही खरी असली तरी त्यात त्यांचा वेळ आणि अभिव्यक्ती दोन्ही वायाच जात असतात. जे काम अन्नुलेखाने होउ शकतं तिथे मिपावरच्या दिग्गजांनी आपले शब्द वाया का घालवावेत?
  • Log in or register to post comments

भल्या पहाटे धाग्याचं शीर्षक

गवि
Fri, 03/01/2013 - 05:48 नवीन
भल्या पहाटे धाग्याचं शीर्षक वाचून तातडीने अन धडधडत्या हृदयाने धागा उघडला. हुश्श.. हे आहे होय... मेल्या विम्या.. संपादकांना मारशील हो एक दिवस हार्ट अ‍ॅटॅकनी.. असो . मुद्दे पटनीय...
  • Log in or register to post comments

जे बात इम्या

स्पा
Fri, 03/01/2013 - 06:39 नवीन
जे बात इम्या बाकी हात फारच आखडता घेतलास ब्वा. बोधकथा तर सहीच, बघुया काही फरक पडतोय का, कठीणच आहे, but lets hope for the best. :-)
  • Log in or register to post comments

मी तसा नवाच आहे या संस्थळावर.

खटासि खट
Fri, 03/01/2013 - 07:28 नवीन
मी तसा नवाच आहे या संस्थळावर. मत द्यावं कि न द्यावं असा विचार करत होतो, मात्र लिखाणातली कळकळ जाणवल्याने प्रतिसाद द्यावासा वाटला. लेखातले विचार पटण्यासारखेच आहेत. पण दुसरी बाजू म्हणून विचार केला तर प्रत्येक संस्थळाची, गावाची, देशाची खास अशी संस्कृती, ओळख असते. ती ओळख किंवा युएसपी यासाठीच पर्यटक (इथे संस्थळ पर्यटन असा अर्थ घ्यावा) अशा गावांना भेटी देतात. इंग्लंड म्हटलं कि कडक इस्त्रीचे चेहरे आणि अतिसभ्यपणा जपणारे लोक. ही संस्कृती माहीत असल्याने आपणही तिथे तसेच वावरतो. काही दिवसांनी त्याचा वीट येऊ लागतो, मग अमेरिकन संस्कृतीतला मोकळेढाकळा खुणावू लागतो. अमेरिकेत सर्वत्र हा मोकळाढाकळा वावर शोभून दिसतो. त्याचाही कंटाळा आला कि स्विस लोकांच्या शांत जीवनाची भुरळ पडते मग जपानी लोकांच्या कष्टाळूपणाची ! लांब कशाला पुणेरी आणि मुंबईकर संस्कृतीतला फरक देखील ठळक आहेच.
  • Log in or register to post comments

सुपारी कुणी दिलिय ? नविन की

५० फक्त
Fri, 03/01/2013 - 07:35 नवीन
सुपारी कुणी दिलिय ? नविन की जुने, अ‍ॅडल्ट की स्युडोअ‍ॅड्ल्ट, विहिरितले की झाडावरचे, ओ की डु, एक की अनेक, बरेच प्रश्न उभे राहिले.
  • Log in or register to post comments

मुद्दा बरोबर आहे!

नगरीनिरंजन
Fri, 03/01/2013 - 08:29 नवीन
मुद्दा बरोबर आहे! वाढती सदस्यसंख्या आणि वेगाने येणारे लेख पाहता अनेक चांगलेचांगले लेख झपाट्याने खाली जातात आणि चांगल्या विषयांवर चर्चा होण्याऐवजी बाष्कळ किंवा भडकाऊ धाग्यांवरच पब्लिक गोंधळ घालत बसतं. संमंने जरा जास्त ताठर भूमिका घ्यायला पाहिजे आणि आधीच झालेल्या विषयांवर कोणतीही नवी भर न घालणारे धागे एक-दोन दिवसांतच वाचनमात्र केले पाहिजेत असं मला वाटतं. स्वयंशिस्त हा कितीही चांगला प्रकार असला तरी ती येईपर्यंत काही उपाय करणे आवश्यक असतेच. अन्यथा त्याच त्याच विषयांवरचे म्हणजे सालाबादप्रमाणे गांधी पुण्यतिथीला गांधी,सावरकर वगैरे. स्त्रीदिनाला स्त्री-पुरुष वगैरे टुकार धागे येतच राहतात. त्याच विषयांवर कोणी वेगळी मांडणी केली असेल आणि मेहनत घेऊन लेख लिहिला असेल तर तो मात्र झटक्यात दुसर्‍या पानावर जाऊन दिसेनासा होतो.
  • Log in or register to post comments

आम्ही आहोत ते असे आहोत....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/02/2013 - 09:04 नवीन
आज सकाळी सकाळी आमच्या वॉलकंपाउंडच्या गेटवर सकाळपासून कावळे काव काव करत होते. कोण पाहुणे येणार बॉ ? अशा धास्तीने (पाहुणे येणे हल्ली मला धास्तीच झाली आहे) जीव नुसता घाबरा घुबरा व्हायला लागला होता. दोनेक तास झालेत अजून काही पाहुणे आले नाही. मिपा उघडले आणि पाहुणे नव्हे तर ''शीर्षक वाचून गार पाडायला लावणारा काथ्याकूट येणार होता'' कावळ्यांच्या कावकावाचा उलगडा झाला तो असा. मनातल्या मनात 'पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये..सांगताहे' लावला आणि काथ्याकूट वाचायला सुरुवात केली. शीर्षक वाचून कोणा मिपाकराने कोणत्या मूलीचा विनयभंग केला असेल अशा काळजीने 'काथ्याकूट' जीव मूठीत धरुन वाचायला सुरुवात केली. कोणा मिपाकराने एखाद्या सुंदरीला आपण समुद्राच्या काठावर कोळीनृत्य करु या अशी विनंती केली आणि तिने विनंती नाकारुन पोलिसात तक्रार दिली तर नसेल असे काथ्याकूट वाचतांना वाटू लागले. समारोपाला पोहचलो. आणि जीव भांड्यात पडला. शीर्षक कसे जीवघेणे असले पाहिजे. पब्लिकला वाचायला प्रवृत्त कसे करायचे त्याचा हा उत्तम नमुना. पेड न्युज. बसमधे बसल्यावर सायंदैनिक विकणारा पोरगा जसा भडक बातम्या 'ध चा मा' करुन सांगतो तसा हा प्रकार. च्यायचे... असो. काथ्याकूटाच्या समारोपाला गेल्यावर बदड बदड हात कपाळावर मारुन घेतला. जागतिक स्तरावरील परिसंवादात मराठी संकेतस्थळासमोरील आव्हाने यातील एका गहन प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी जगभरातील विद्वानांना अनेक वर्ष, महिने विचार करुन, संशोधन करुन जे सुचले नाही, असा एक प्रश्न आणि त्याचे एक उत्तर जे की 'मराठी माणसांना संस्थळावर नको असलेले लेख वाचायचे नसेल तर लेखाला क्लीक करु नये' आणि 'संस्थळाचा दर्जा सुधारायचा असेल तर आपली जवाबदारी नाही का' हा निष्कर्ष वाचून एक वाचक म्हणून माझ्या संगणकाची जाग्यावर माती का झाली नाही, अशा विचाराने डोळ्यातून झ-यासारखे सारखे पाणी यायला लागले, होष्टेलच्या काही टार्गट पोरांना रेक्टर पाठीशी घालतात, त्यावर काहीच कार्यवाही करत नाही, असा एक जो सप्तकात सूर का स्वर असतो तो जर लावला असता तर आमच्या पाझरणा-या डोळ्यांना एक वाचक म्हणून अजून चार चांद लागले असते. असो, थोडं सावरल्यावर उरलेला प्रतिसाद लिहितो. देवा, पूर्वजन्मात काही पुण्य कमी पडले असेल तर आता कोंबडं, बकरं माग पण त्याचा राग मिपावर नको काढू राव -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बहुतांशाने सहमत

पैसा
Sat, 03/02/2013 - 09:48 नवीन
पण नव्या लेखकांच्या धाग्यावर प्रतिसाद दिले नाहीत की नव्याना प्रोत्साहन देत नाहीत म्हणून काही लोक रडू लागतात, तर नवे लोक हतोत्साहित होतात. जरा वाचा, थांबा म्हटले तर काही लोक "आम्ही काय कमी आहोत का" म्हणून बोंबा मारतात. परवा एका आयडीने आपण नवीन म्हणत एक धागा काढला आणि त्यावर इतक्या उद्धट प्रतिक्रिया दिल्या की ती माझी मुलगी असती तर एक आवाज काढला असता. टीका खिलाडूपणाने घेऊन तात्काळ सुधारणा करणारे लोक सुद्धा हल्लीच पाहिले आहेत आणि त्यांचं जरूर कौतुक आहे. एखाद्या धाग्यावर दंगा करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ऊठसूट तेच करत रहाणे ही वेगळी. इथे नगरीनिरंजन, शरद आणि अरुण मनोहर सारख्या उत्तम लिहिणार्‍यांना कधी कधी इतके कमी प्रतिसाद मिळतात की आम्हाला लाज वाटते. बेकार धाग्यांवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडू नका हे म्हणणे एकदम पटले. त्याचबरोबर चांगल्या धाग्यांना आवर्जून "आवडले" एवढा एक शब्द तरी लिहा ही कळकळीची विनंती. मायबोलीशी तुलना केल्याबद्दल अजिबात राग नाही. मलाही ते संस्थळ आवडते. तिथे काही धाग्यांवर दंगे होतात, नाही असं नाही. पण बहुतांशी फालतू प्रकार इतक्या वेगाने तिसर्‍या चौथ्या पानावर जातात की बघून कधी कधी कौतुक वाटते. प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते हे खरेच. पण हल्लीच एका लेखकाला लेखाची विनंती केली तर तसे लिखाण मिपाला जड होईल असे ते म्हणाले. अनेकदा उत्तमोत्तम चर्चा होऊनही मिपाची ही प्रतिमा होत असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. संपादक म्हणून बोलायचे झाले तर असल्या धाग्यांवर लक्ष ठेवण्यात एवढी एनर्जी फुकट जाते की दुसरे काहीही करता येत नाही. हे सगळे बहुतेकांना पालथ्या घड्यावर पाणी असण्याची बरीच शक्यता आहे. पण मी सांगायचे काम केले. सगळ्यांना आरसा दाखवण्याबद्दल आणि "विमे फक्त वाद ओढवून घेतो आणि करतो" अशा प्रतिमेला छेद दिल्याबद्दल विमेचे खास आभार!
  • Log in or register to post comments

प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/02/2013 - 09:58 नवीन
>>>>> मायबोलीशी तुलना केल्याबद्दल अजिबात राग नाही. मला तर आता कोणत्याच संस्थळाचा तुलनेचा राग येत नाही. (नावं ठेवतो तो भाग वेगळा) आता मी खूप बदललो आहे. आमचा एक मित्र म्हणायचा आपलं भांडन हलवायाशी त्याच्या जिलेबीशी नाही. :) >>>"विमे फक्त वाद ओढवून घेतो आणि करतो" अशा प्रतिमेला छेद दिल्याबद्दल विमेचे खास आभार! वाद,प्रतिमा,छेद, निष्कर्षाला पोहचायली तुम्हाला बॉ लै घाई. :) देवा, पूर्वजन्मात काही पुण्य कमी पडले असेल तर आता कोंबडं, बकरं माग पण त्याचा राग मिपावर नको काढू राव -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...???

स्पा
Sat, 03/02/2013 - 10:07 नवीन
प्रा.डॉ
एकाच फलाटावर थांबा कि वो , दोन्ही कडून बोलताय , आम्ही हिथ कान्फुस झालो न राव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/03/2013 - 09:03 नवीन
पैसा मॅम बरोबर असतात आणि त्यांचा स्थळावरील वावर 'बोले तैसा चाले....' असतो. म्हणून त्यांच्या प्रतिसादाला सहमती. कन्फ्युस होऊ नका. शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक (धाग्याकर्त्यास उद्देशून नाही) सालं आमच्या डोक्यात जातात. संत तुकाराम म्हणूनच म्हणाले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>शंभर प्रतिसादात काड्या

सूड
Sun, 03/03/2013 - 18:39 नवीन
>>शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा हे बाकी खरं !! इथल्या काहीजणांना ते अगदी सहज जमतं. अधूनमधून रडतकण्हत राहणं ही तर खासियत. अशा लोकांना आपल्या पुढ्यातला ग्लास हा अर्धा रिकामा आणि दुसर्‍याच्या पुढ्यातला अर्धा भरलेला दिसत असतो. त्याला कोणी काही करु शकत नाही. विमेंच्या धाग्याबद्दल वेगळा प्रतिसाद खाली देतोच आहे, हे आपलं तुमच्या प्रतिसादातलं जे पटलं त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंभर प्रतिसादात काड्या

धन्या
Sun, 03/03/2013 - 18:59 नवीन
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक (धाग्याकर्त्यास उद्देशून नाही) सालं आमच्या डोक्यात जातात.
या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून मलाही हेच वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण नव्या लेखकांच्या धाग्यावर

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/03/2013 - 02:36 नवीन
पण नव्या लेखकांच्या धाग्यावर प्रतिसाद दिले नाहीत की नव्याना प्रोत्साहन देत नाहीत म्हणून काही लोक रडू लागतात, तर नवे लोक हतोत्साहित होतात. जरा वाचा, थांबा म्हटले तर काही लोक "आम्ही काय कमी आहोत का" म्हणून बोंबा मारतात.
नव्यांना प्रोत्साहन द्या ऐवजी निरुत्साही करू नका हे जास्त योग्य आहे. कुणी चांगले लिहिले तर इथली जनता वाखाणणी करतेच की. पण टिंगल करण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा ती केलीच पाहिजे असे नाही. अनेकदा सोडून द्यावे. मी आजवर अनेक प्रतिसाद लिहून मग ते पोस्ट न करता सोडून दिले आहेत. राहिला प्रश्न स्तुती करण्याचा. मी व्यक्तिश: ते फार करत नाही आणि त्याबद्दल खाजगीत शिव्या पण खाल्ल्या आहेत (इतर वाचकांकडून, लेखकांकडून नाही). पण बरेचदा आपल्याला जे म्हणायचे आहे ते अनेकांनी लिहिलेले असते. अशावेळेला साचेबद्ध +१ किंवा "आवडले" इतकेच लिहायला मला बरे वाटत नाही. कधी कधी असे धागे पटकन खाली जातात आणि त्यावर काही उपाय केले पाहिजेत. डोक्यात आहेत काही, त्यांना मूर्त रूप देऊन तशा सूचना करेनच. मालकांना आणि तांत्रिक समितीला आवडले तर ते राबवतील.
परवा एका आयडीने आपण नवीन म्हणत एक धागा काढला आणि त्यावर इतक्या उद्धट प्रतिक्रिया दिल्या की ती माझी मुलगी असती तर एक आवाज काढला असता.
तुम्ही म्हणता त्या धाग्याचे उदाहरण माझ्या वरील लेखातील मताला जोरदार पुष्टी देते. तो धागा दंगा घालण्यासाठीच काढला होता आणि तो आयडी पण बहुधा डू च असणार. तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असते आपण तर तो डाव टोटल फसला असता. ठिणगी दिसल्यावर फुंकणी सरसावली आपण तर आग पेटणारच की हो.
अनेकदा उत्तमोत्तम चर्चा होऊनही मिपाची ही प्रतिमा होत असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
आहेच, आणि ती काळजी वाटते म्हणून वरील लेख लिहिला आहे. काही जण उगाच नको ते रीडिंग बिटवीन लाईन करत आहेत. पण त्यांचा इगो सुखावत असेल त्याने तर जाऊ देत. लेट देम एन्जॉय :-)
"विमे फक्त वाद ओढवून घेतो आणि करतो" अशा प्रतिमेला छेद दिल्याबद्दल विमेचे खास आभार!
टू सून, डीअर पैसाताई, टू सून टू कमेंट दॅट !!! इथे पण वाद होण्याची शक्यता जोरदार आहे. नाही झाला तर बरेच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त लेख..

मुक्त विहारि
Sat, 03/02/2013 - 22:10 नवीन
आवडला..
  • Log in or register to post comments

मस्त लेख

नीलकांत
Sun, 03/03/2013 - 08:25 नवीन
लेखकाच्या भावनेशी सहमत आहे. आपली व्यवस्था आपणच ठरवायची असते.
  • Log in or register to post comments

लसिकरण आवडले,

पप्पु अंकल
Sun, 03/03/2013 - 08:40 नवीन
भावले पण...
  • Log in or register to post comments

छान.

परिकथेतील राजकुमार
Sun, 03/03/2013 - 13:02 नवीन
बोधकथा आवडली.
  • Log in or register to post comments

लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो

संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 13:31 नवीन
चांगल्याला चांगलं आणि जे आवडलं नाही ते आवडलं नाही सांगणं म्हणजे प्रतिसाद. `दुर्लक्ष हा सर्वात मोठा अपमान आहे' हे जरी खरं असलं तरी त्यातनं लिहीणार्‍याला `काय चूक झाली किंवा काय सुधारणा हवी' ते कळत नाही त्यामुळे लेखकात सुधारणा होण्याची शक्यता शून्य होते. शिवाय फालतू धाग्यांवर अनेक वेळा उत्तम प्रतिसाद आणि विनोदांची बरसात असते (इथे अजरामर झालेला `मोकलाया दाही दिशा'). काही वेळा तर प्रतिसाद धाग्याच्या कंटेंटचं मूल्यवर्धन करतात (यशोधन वाळिंबेच्या पोस्टस). इथे खुशी नांवाच्या आयडीनं ५२ का ५४ धागे काढून माझ्यासारख्यांना वात आणला होता (सध्या परत परिक्रमेला गेलेल्या दिसतायंत). `सकाळी उठलो, नाष्टा केला, आज यांच्याकडे जेवलो, आणि त्यांच्याकडे झोपलो, आज इतकं चाललो आणि उद्या तिकडे जायचंय' या व्यतिरिक्त कोणत्याही लेखात काहीही नव्हतं. पराचा त्या वेळचा अत्यंत बेस्ट प्रतिसाद आठवतोय : `एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबं झेलू!' आणि अन्या दातार म्हणाला होता `नाष्टा आणि जेवण फुकट असेल तर नुसतं चालायला काय जातंय? हौशी लोकांनी (स्वतःच्या पैश्यानं) केलेले ट्रेक आणि परिक्रमा यात नक्की फरक काय आहे?' थोडं अवांतर होईल, पण मी जितके बिघडलेले वैवाहिक संबंध पाहिलेत त्या प्रत्येकात एकच गोष्ट प्रकर्षानं दिसली `संवादाचा आभाव!' त्यामुळे `दुर्लक्ष ही फार मोठी चूक ठरू शकते'. वी नीड टू स्पिक अँड क्लॅरिफाय. वाद झाला तरी चालेल पण अबोला कायमची वाट लावतो हे नक्की. इन द सेम वे, प्रतिसादाचा आभाव संवादच ब्लॉक करतो.
  • Log in or register to post comments

खुशीताईंविषयी असहमत.

सस्नेह
Sun, 03/03/2013 - 20:38 नवीन
बाकी सर्व मुद्दे +१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तिथं मंडळानं जाहिर तंबी दिली म्हणून

संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 20:48 नवीन
नाय तर परिक्रमेबरोबर आमच्या प्रतिसांदाचीही मजा तुम्हाला घेता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुमचा नक्की उद्देश काय आहे?

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 03/05/2013 - 00:21 नवीन
तुमचा नक्की उद्देश काय आहे? Constructive (मराठी?) टीका करणे की आपल्या जिभेची धार जगाला दाखवून देणे? टीका आणि टिंगल यातले अंतर फार पटकन पार करता येते. तुम्ही वरती संवादाचा अभाव वगैरे म्हणत आहात आणि अगदी लग्नाचे उदाहरण देत आहात म्हणजे तुम्हाला Constructive टीका करणे अभिप्रेत असावे असे वाटते. मुळात प्रत्येकाला अशी टीका समजून घेता येतेच असे नाही. त्यातून तुम्ही एकदा सांगाल, दोनदा सांगाल फार तर तीनदा सांगाल. त्यानंतरही समोरच्याने ऐकले नाही तर तो त्यांनी घेतलेला चॉइस आहे असे समजून थांबले पाहिजे. समोरच्याने माझी टीका ऐकून बदललेच पाहिजे हा हेका टीकाकाराने धरू नये. तुमच्या टीकेशी सहमत न होण्याचा पर्याय आहेच की लेखकाला. मुळात तुम्ही किंवा मी कोण क्वालिटी ठरवणारे ? जे तुम्हाला आवडत नाही ते इतर शंभर जणांना आवडत असेल तर त्यांना वाचू देत की. खुशी ताइंचे धागे आपल्याला आवडत नाहीत असे तुमच्या लक्षात यायला ५-६ धागे पुरेसे होते, मग उरलेले ४६ उघडायचे कशाला? टिंगल करण्यासाठी?? "प्रतिसांदाचीही मजा" मधून तोच अर्थ प्रतीत होतो आहे. टिंगल करणे म्हणजे संवाद का? तुमच्या आधीच्या प्रतिसादाचा आणि नंतरच्या प्रतिसादाचा एकमेकांशी फार संबंध नाही हे तुम्हाला पटते आहे का? संपादकांनी तिथे जाहीर तंबी देऊन उत्तम केले. काही मुठभर दंगेखोरांनी आपली आवडनिवड सगळ्या वाचकांवर लादु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मुळात तुम्ही किंवा मी कोण क्वालिटी ठरवणारे?

संजय क्षीरसागर
Tue, 03/05/2013 - 00:30 नवीन
नाही तर कोण ठरवतं क्वालिटी? सदस्यच.
टिंगल करणे म्हणजे संवाद का?
पराचा प्रतिसाद वाचा. ती एका दृष्टीनं टिंगल आहे आणि दुसर्‍या अँगलनं धाग्यातला तोचतोपणा दर्शवते. अन्या दातारचा प्रतिसाद पाहा. अत्यंत बुद्धिमान प्रश्न आहे.
समोरच्याने माझी टीका ऐकून बदललेच पाहिजे हा हेका टीकाकाराने धरू नये. तुमच्या टीकेशी सहमत न होण्याचा पर्याय आहेच की लेखकाला.
अर्थात! पण दुर्लक्ष करून धागा आवडला नाही हे दाखवून देण्यापेक्षा नक्की काय आवडलं नाही ते सांगणं जास्त विधायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सहमती एका स्टेटमेंटला

५० फक्त
Tue, 03/05/2013 - 00:54 नवीन
अर्थात! पण दुर्लक्ष करून धागा आवडला नाही हे दाखवून देण्यापेक्षा नक्की काय आवडलं नाही ते सांगणं जास्त विधायक आहे. हे थोडंसं ' दु:ख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावतो ना' या चालीत वाचुन पाहिलं, बरं आणि बरोबर वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाही पटल..

उपास
Mon, 03/04/2013 - 19:58 नवीन
संजय, तुमची वैवाहिक जीवनाची इथे केलेली तुलना नाही पटली. तिथे खरीखुरी माणसं असतात, त्यांना एकवेळ समजवता येऊ शकेल पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही त्यांच्यावर वेळ आणि शक्ती खर्च करण व्यर्थ नाही काय? अशा धाग्यांना सगळ्यांनी मिळूनच अनुल्लेखित केलं तर दंगा होण्याचा प्रश्न नाही, तो धागा आणि असे धागे काढणारा आयडी त्याच्या कर्माने मरेल, हा जेव्हा सुदिन येईल तेव्हाच 'प्रगल्भ झालो' असं म्हणायला वाव आहे असं वाटतं. तसंही, प्रतिसाद धाग्यावर न देता खव मध्ये देता येतातच त्यामुळे तुम्हाला अपेक्षित 'संवाद' साधता येईलच, त्यासाठी धागा शंभरीला पोहोचवायची गरज नाही असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही

संजय क्षीरसागर
Mon, 03/04/2013 - 22:42 नवीन
त्यांच्यावर वेळ आणि शक्ती खर्च करण व्यर्थ नाही काय?
= तो प्रशासनचा विषय आहे. दे हॅव टू टेक केअर माझा निर्देश लेखनाच्या गुणवत्तेकडे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

सदस्य उपास किंवा आपल्या

रेवती
Mon, 03/04/2013 - 23:49 नवीन
सदस्य उपास किंवा आपल्या प्रतिसादाचा रोख थोडा वेगळा आहे संजयबाबू, तरीही सांगते की मिपाचे सगळे प्रश्न हे प्रशासनाचे नाहीत. वीस ते बावीस हजार सदस्यांना जेमतेम बारा पंधरा संपादक पुरे पडू शकत नाहीत. प्रत्येकाने थोडीतरी जबाबदारी उचलायलाच हवी (सगळे सदस्य रोज हजर नसतात तसे सगळे संपादकही रोज काम करीत नाहीत). निदान एक जाणीव (माझ्यासकट) प्रत्येकाला हवी की येथे मी माझे लेखन प्रकाशित करू शक्ते/ शकतो, मत मांडू शकते/ शकतो तेही विनाशुल्क! निदान आपापल्यापुरती जबाबदारी उचलायला काय हरकत आहे? विना शुल्क प्रवेश देण्यात मिपामालकांना जसा आनंद आहे तशी सदस्यांवरची जबाबदारी वाढते. संपादक मंडळ हे मिपाच्या प्रमापोटी काम करतात. इथे आम्हाला वेतन मिळत नाही. तशी आमची अपेक्षाही नाही पण सदस्यांनी याची जाणीव ठेवावी. आपले प्रतिसाद दहादा अप्रकाशित झाल्यावर काही मिनिटे थांबून, विचार करून काहीतरी चुकतय्/मिपा नियमांना अनुसरून नाही एवढा विचार प्रत्येकजण करू शकतोच. एवढे करून थोडेफार वाद आणि मतभेद होतील त्यासाठी मिपाप्रशासन काम करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाही..

उपास
Mon, 03/04/2013 - 23:53 नवीन
हा प्रशासनासह मिपा सदस्यांचा विषय आहे. ते जशी केअर घेतील तशी आपणही केअर (उदा. अनुल्लेख) घेऊ शकतो की. जितके जास्त सदस्य अशा फालतू धाग्यांवर पिंक टाकण्याचे थांबवतील तितके फटाफट ते आटोपणार नाहीत का? विमेच्या ह्या धाग्याचा उद्देश असा दिसतोय की प्रशासनापलिकडे आपण काही करु शकतो का आणि काय, त्यामुळे फालतू धाग्यांवर दंगा टाळणे आणि प्रोत्साहनपर किंवा माहितीपर प्रतिसाद देऊन संवाद साधणे इतकं तरी आपण करु शकतो. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भले शाब्बास!

रेवती
Mon, 03/04/2013 - 23:55 नवीन
भले शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

त्यामुळे फालतू धाग्यांवर दंगा टाळणे आणि

संजय क्षीरसागर
Tue, 03/05/2013 - 00:08 नवीन
प्रोत्साहनपर किंवा माहितीपर प्रतिसाद देऊन संवाद साधणे इतकं तरी आपण करु शकतो.
मला वाटतं चांगलं लेखन करणं आणि चांगल्या लेखनाला दाद देणं हा पॉजिटीव अप्रोच आहे. फालतू धाग्यांवर दंगा होत राहणार कारण तो या संकेतस्थळाचा स्वभाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्वभाव...

अर्धवटराव
Tue, 03/05/2013 - 04:06 नवीन
>>फालतू धाग्यांवर दंगा होत राहणार कारण तो या संकेतस्थळाचा स्वभाव आहे. -- सदस्यांनी थोडा समजुतदारपणा दाखवला तर या स्वभावाला मवाळ करता येईल, सुसह्य करता येईल... असा रेवतीचा पॉईण्ट आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१

पैसा
Tue, 03/05/2013 - 09:29 नवीन
माणसाचं वय वाढतं तसं त्याच्यात जरा जास्त शहाणपण यावं अशी अपेक्षा असते. कुटुंब वाढत जातं तसे घरातल्या सगळ्यांनाच थोडीफार तडजोड करावी लागते आणि स्वभावाला मुरड घालावी लागते. ते झालं नाही तर एकत्र कुटुंबाचे तुकडे होतात. तेच संस्थळांनासुद्धा लागू आहे. असेच एका सदस्यापासून सुरुवात होऊन मिपा २२००० पर्यंत पोचले आहे तर मायबोली ४५००० च्या आसपास आहे. आता एवढे लोक एका जागी आल्यानंतर प्रत्येकाने मी मला पाहिजे तसेच वागणार्/लिहिणार म्हटले की मग वाद सुरू होतात. समाजात वावरायचे असेल तर आपल्याला बेटासारखे रहाता येणार नाही. अर्थात इथे येऊन फक्त स्कोअर सेटल करायचे एवढाच कोणाचा उद्देश असेल तर मग त्यातून विधायक काहीही होणार नाही. टीका विधायक असेल तर ठीक आहे. पण खुशीताईंचा उल्लेख आला म्हणून सांगते, की त्या मध्यमवयीन बाई आहेत. वैद्यकीय व्यवसायातल्या आहेत. एक वेगळा अनुभव घेतला तो सगळ्यांबरोबर शेअर करावासा त्यांना वाटला त्यासाठी त्यांनी एवढे लिखाण करणे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांची तुलना "शेजार्‍याचा बोका माझ्या सीटचे कव्हर फाडतो" अशा धाग्यांबरोबर करणे चुकीचे आहे तसेच रामदासकाकांच्या एखाद्या धाग्याबरोबर करणे हेही चुकीचे आहे. परवा काळेबैंच्या नावावर जो धागा आला होता त्याचा उद्देश फक्त दंगा करणे एवढाच होता. तिथे कोणी गोंधळ घातला तर साहजिकच आहे. पण गंभीरतेने लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍याला टिंगलीचा विषय करणे अजिबात पटत नाही. काही दिवसांपूर्वी कवितावर इतके भयंकर प्रतिसाद येत होते की गणेशा आणि पाभेसारख्या चांगल्या कवींनी इथे लिहिणे जवळपास बंद केले आहे. प्रतिक्रिया देताना आपल्यामुळे कोणी इतका दुखावला जातोय का याचा सगळ्यांनी जरा विचार करा माणूस बदलू शकतो तसा संस्थळाचा स्वभाव बदलू शकतो. शेवटी हा स्वभाव कोण ठरवतो? इथे लिहिणारे सदस्य. आयुष्यात वर्षांचा आकडा नुसता वाढत गेला तरी "हम नहीं सुधरेंगे" असं कोणी म्हणत असेल त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापलिकडे माझ्या हातात काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा