Skip to main content

अनोळखी नाते

Published on सोमवार, 04/03/2013
नेहमी प्रमाणे चर्चगेट वरून लोकल पकडली, पण डब्ब्यात चढताच एक चर्र होऊन गेले मनात. नेहमी सारखी आज ती डोळ्यासमोर नव्हती. असे कधी होत नाही म्हणजे मी इथे चर्चगेटला कामाला लागल्यापासून आणि विशेषता हि लोकल पकडण्याची चालू केल्यावर नेहमीचा दिसणारा चेहरा होता तिचा. काय झाले असावे? कारण एक रविवार सोडला तर ती कधी दिसली नाही असे झालेच नाही. बरे नसेल किवा काही काम असेल म्हणून आली नसेल असे मी उगाचच माझ्या मनाला सांगितले. तशी आमची तोंड ओळखच म्हणजे कधी कधी बाजूला बसून हि गप्प असायचो आम्ही. देवाण घेवाण व्हयाची ती फक्त स्मितहास्याची. काही न बोलता हि आमचे एक अबोल नाते झाले होते. पण असे पुढचे ४ दिवस गेले ती दिसली नाही. ती बरी तर असेल ना, काही झाले तर नसेल ना नको तेवढे प्रश्न मनात. मी का एवढा तिचा विचार करत होते माझे मलाच ठाऊक नव्हते. आणि पाचव्या दिवशी दिसली ति. पण मलूल चेहरा, एका डोळ्याखाली काळा निळा व्रण, डोळ्यात साखाळलेले रक्त. पोटात गोळाच आला माझा तिला असे पाहुन. रोज तिचा निरागस चेहरा पाहून होणारी प्रसन्नता कुठे आणि आज तिचा असा चेहरा. मला पाहून नेहमीच्या ठेवणीतले हास्य दिले तिने. उत्तरादाखल मी पण हसले. तिच्या बाजूची सीट रिकामी होती, जाऊन बसले बाजुला. काय आणि कसे बोलू तेच सुचेना. गप्पच रहिले. माझ्या मनात होणार्या प्रश्नाच्या वादळाचे काहूर कदाचित कळले होते तिला. मग तीच बोलू लागली. सुंदर गोड आवाजात तिने मला हाक मारली " ताई". मी पण दचकून पहिले. मी ताई म्हटले तर चालेल ना. अग हो त्यात काय चालेल मला. " मी नाही आहे उद्यापासून या ट्रेन मध्ये ती हसत बोलली. का ग? मी इकडचा जॉब सोडला आहे. घरा जवळच एक जॉब मिळाला आहे. मी म्हटले हो का… मग छानच आहे न. प्रवासाची दगदग नाही. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली ताई हा प्रवासच माझा विरंगुळा होता. कोणी नसताना पण सर्व माझे होते. आता ते पण नाही. हा एक तास मी माझ्या साठी जगत होते. न बोलता कुणाशी सर्वांशी मिसळून होते. आता उद्यापासून नसणार ते. घरापासून ५ मिनटाच्या अंतरावर नवीन ऑफिस आहे. मी चार दिवस का नव्हती हा विचार करत असाल ना. घरी येण्यास अर्धा तास उशीर झाला म्हणून नवऱ्याने खुप मारले. नको नको ते आरोप केले. ट्रेन खूप वेळ थांबली होती म्हणून उशीर झाला पण तो काही ऐकेनाच. ऑफिस मध्ये फोन करून नको नको ते विचारू लागला. प्रेमविवाह माझा. पहिले जिव्हाळा चे वाटणारे प्रेम आता घातक झाले आहे. त्याच्यासाठी आईवडिलांना सोडले आणि आज तोच माझा नाही आहे. संसार करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे हे फक्त मलाच समजते म्हणून काम करते आहे. या ट्रेन मध्ये आल्यापासुन मला एक जिव्हाळाचा चेहरा वाटला तो तुमचा. आज आपली हि शेवटची भेट. पण तुम्हाला मी कधीच विसरू शकणार नाहि. न जाणो का मी हे सर्व तुमच्याशी बोलत आहे पण आज खरंच माझे मन खूप हलके झले. Thanks मला ऐकल्याबद्दल. एवढे म्हणून तू उतरून गेलि. मी अशीच निशब्द तिचे सर्वकाही ऐकत रहिले. काय प्रतिक्रिया देऊ तेच कळले नाही. जाताना तिचे मागे वळून दिलेले ते गोड स्मितहास्य अजूनही आठवते मला. आणि माझ्या डोळ्यात तरळलेले ते अश्रू .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2420
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जॉब सोडण्याऐवजी नवरा सोडायला हवा होता. (परत भेटली तर नक्की सांगा).

घरी येण्यास अर्धा तास उशीर झाला म्हणून नवऱ्याने खुप मारले.
मुंबईत मारण्यासाठी इतर असंख्य कारणं असतील पण अर्धा तास उशीर होणं हे कारण पटत नाही. उलट बस आणि ट्रेन चुकून वेळेवर आल्यामुळे लवकर घरी पोचलेल्यांना नको नको ते दिसलं असेल. ;) -(लोकलखाली येउन मेलेल्या माणसाला 'अबे, इसको भी इसी गाडी के निचे आके मरना था' असं सहज पणे म्हणत घड्याळ पाहाणारी अनेक माणसं बघितलेला) दादा

मान्य आहे दादा, पण जगात अजूनही अशी काही माणसे आहेत जे आपल्या पत्नीकडे कामावरून यायला ५ मिनटे जरी उशीर झाला तरी अर्वाज्य शिव्या आणि मारहाणीने उत्तरे काढायचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्या नजरेत सर्व वाईट गोष्टीच असतात आणि त्यांना हे जग आणि माणसे पण तशीच वाटतात. मी लहानपणी चाळीमध्ये राहत असताना अशी कितीतरी उदाहरणे पहिली आहेत, तशी हि कथा काल्पनिक आहे, पण जे अनुभव आले आजपर्यंत जीवनात ते डोळ्यासमोर ढेवून लिहिली आहे. अर्थात याला आजकाल भरपूर जण अपवाद असतीलच. पण अजूनही रोजच्या ट्रेनच्या प्रवासात असे अनुभव ऐकू येतातच.

काल्पनीक म्हणून ठीक आहे. भावनेला हात वगरे घातला गेला नाही.

तुमचा आयडी नक्की काय आहे ते कळत नाही. वाचायला अवघड आहे. तरी उच्चार कसा करायचा ते सांगता येईल का ? लेख ठीक वाटला. तरी लिहित राहा.

धन्यवाद, अपर्णा. मलाही तेच वाटले होते. बहुतेक भावनांची कुचंबणा झाली असणार टायपिंग करताना, म्हणून मग ते ' भव्नकल्लोल' झालं असावं.