Skip to main content

किनारे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/02/2013 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल] मज दोन आसवांना हुलकावता न आले हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी उपटून यातनांचे तण काढता न आले निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले मरणासवे कितीदा फसवे करार झाले जगणे नकोच होते, पण टाळता न आले अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे कवटाळले उराशी, भिरकावता न आले जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
लेखनविषय:

वाचने 5255
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

अप्रतिम आहे एकेक कडवं.
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले
हे आणि
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले
क्या बात है!

सुरेख जमलीय एकदम. आवडली. :)

गझल अत्तिशय आवडली. "निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले " आतवर पोचले.

जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
हे लै भारी झालंय

जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता न आले ! इथे साष्टांग स्विकारा क्रांतीताई!

अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले
वा, वा!

वाह!! प्रत्येक कडवं सुंदर आहे.

क्रांतिकडून जसे अपेक्षित तसेच. कोणीतरी मला हे तरही गझल काय आहे जरा उलगडून सांगा बघू. मायबोलीवर अशा खूप रचना मी नेहमी बघते.

समस्त वाचक आणि प्रतिसादक मिपाकरांना शतशः धन्यवाद! ज्योति, तरही गझल म्हणजे एखाद्या गझलमधल्या कोणत्याही ओळीला आपल्या खयालात गुंफून लिहिलेली गझल. ही तरहीची ओळ किंवा मिसरा नव्या गझलमध्ये कोणत्याही स्थानावर घेता येते/येतो. इथे अधिक माहिती मिळेल.

असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !

आज आता काही दुसरं वाचायला नाही मिळालं तरी हरकत नाही. दिन बन गया. धन्यवाद.

'प्रतिकूल आर्जवांना' आणि 'जुळवून काफिये मी'... फार सुंदर!

वा! बर्‍याच दिवसांनी क्रान्तीतैंची गझल वाचली!
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले
हे पाठोपाठचे शेर कमाल आहेत!!! अतिशय आवडली

मला गझल फारशी क्ळत नाही. पण तरीही,
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले
या ओळी चर्रर्रर्रर्र करून गेल्या...

खतरनाक ! जामच भारी ! वाह वाह वाह वाह ! क्या बात है ! एक अन एक शेर भारी.

खचून गेलो मीही अन उध्वस्तही झालो दुवे जीवांचे तेव्हा सांधता न आले.. उलथून गेल्या भिंती, कलथून खांब गेले छप्पर दोन घरांचे मज बांधता न आले.. अगायाया.. मेंदूच्या वळ्या सरळ झाल्या माझ्या यवढसं लिहिताना... पण तुम्ही मात्र कमाल केलीत...