✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्करोग स्तनांचा

स
सुबोध खरे यांनी
Wed, 02/13/2013 - 12:39  ·  लेख
लेख
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ------------------------ हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो.स्तनात येणाऱ्यागाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे काळ असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी दर महिन्याला करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल? मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी आणि आपल्या घराच्या कैंलेन्डेर वर ओम किंवा बाण किंवा श्री अशी दुसर्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे कि नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरला तर जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा ती करावी.मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. Breast self examination www.slideshare.net/nashua_08/breast-self-examinationhttp://www.metacafe.com/watch/1310242/how_to_do_a_breast_self_examination/ स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती -- १) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते. २) गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे. ३) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये. MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण ३०टक्क्यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर नक्कीच करावी. यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी काराने आवश्यक आहे. कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे. अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता १० पटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता १०० पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी. हे ज्ञान आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात वाटावे आणि कर्करोगावर विजय मिळवण्यात आपले सह्कार्य करावे हि विनंती. आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे. आपला कृपाभिलाषी सुबोध खरे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
48268 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

नियमीत वापरानं सगळं ठीक राहतं

संजय क्षीरसागर
Wed, 02/13/2013 - 12:44 नवीन
याविषयी आपलं काय म्हणणय?
  • Log in or register to post comments

महत्त्वाचा विषय.

कवितानागेश
Wed, 02/13/2013 - 12:49 नवीन
महत्त्वाचा विषय. धन्यवाद. स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो. ही टक्केवारी जगातली आहे की भारतातली? भारतात cervix च्या कर्करोगाची जास्त टक्केवारी आहे, असे मध्ये कुठेतरी वाचलं होते. त्याबद्दलही माहिती येउ दे.
  • Log in or register to post comments

जागतिक आकडेवारी

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 13:16 नवीन
हि आकडेवारी जागतिक आहे. आपण म्हणता ते मान्य आहे कि भारतात गर्भाशयाच्या तोंडाचा cervix चा कर्करोग जास्त आहे पण आपले वाचक ज्या गटात मोडतात (मध्यम आणि उच्च वर्ग ) त्यात cervix च्या कर्करोगाचे प्रमाण बरेच कमी आहे म्हणून हि जागतिक आकडेवारी दिली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माहिती पुर्ण आणि महत्वाचा विषय..

अक्षया
Wed, 02/13/2013 - 13:13 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

use it or loose it

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 13:13 नवीन
use it or loose it इतके साधे नाही साहेब अन्यथा आपल्या मुसलमान बांधवानी १५०० वर्षे न वापरलेली त्वचा (सुन्नत) नाहीशी झाली असती. पण तरीही हा संदर्भ कळला नाही
  • Log in or register to post comments

मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट

गवि
Wed, 02/13/2013 - 13:19 नवीन
मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट या न्यायाने "कॅन्सर" होत नसावा. सांधे, स्नायू यांचा वापर / व्यायाम अजिबात न केल्याने शक्ती नष्ट होणं, आखडणं, निकामी होणं असे इफेक्ट होताना दिसतात. पण वापर केला नाही म्हणून "रोग" होऊन तो भाग गमावणं अशी "शिक्षा" निसर्ग करताना दिसत नाही. बाकी बाळांसाठी दीर्घकाळ स्तनपान चालू ठेवणार्‍या स्त्रियांत हा कर्करोग कमी प्रमाणात दिसत असला तर कल्पना नाही. तुमच्यासारखे डॉक्टरच ते सांगू शकतील. तरीही कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे हा नवीन काळात तरी व्यवहार्य उपाय नव्हे कर्करोग टाळण्याचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कमी शक्यता

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 13:32 नवीन
कमी शक्यता म्हणजे ० नव्हे आणि सतत मुले जन्माला घालून स्तनपान करीत राहिल्याने शक्यता एका विशिष्ट पातळी च्या खाली येत नाही. तसे असते तर गर्भारपणात कर्करोग झाला नसता. मुल न झालेल्या स्त्रीच्या तुलनेत हि शक्यता कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो आश्चर्यम ! माझा प्रतिसाद पुन्हा प्रकशित केला?

संजय क्षीरसागर
Wed, 02/13/2013 - 15:23 नवीन
आता सगळं पुन्हा वाचणं आलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बहूदा

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/13/2013 - 15:29 नवीन
तुमचा प्रतिसाद mammography साठी नेला असावा. असो.. डॉक माहितीबद्दल धन्यवाद. महत्वाची माहिती अतिशय सोप्या शब्दात दिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या प्रतिसादाची mammography करून काय मिळणारे?

संजय क्षीरसागर
Wed, 02/13/2013 - 16:00 नवीन
करणार्‍यांचा जीव टांगणीला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून

शुचि
Wed, 02/13/2013 - 13:26 नवीन
एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून केलेला आहे पण अनुभव हा की निकाल यायला आठवडा लागतो आणि मधल्या वेळेत मन पोखरले जाते. खरं तर दर वर्षी चेक-अप केलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments

mammography चा निकाल त्याच

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 13:29 नवीन
mammography चा निकाल त्याच दिवशी मिळतो एक आठवडा का लागला ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अमेरीकेत

शुचि
Wed, 02/13/2013 - 13:35 नवीन
अमेरीकेत मला १ आठवडा लागला. का ते माहीत नाही :( ..... डिस्टिन्क्ट्ली रिमेंबर द टेन्शन!!! खरं पाहता मी जी ई हेल्थ्केअर मध्ये काही वर्षे मॅमोग्राफी मॉड्युलवर काम करत होते. रोज ते काम केल्याने इतका परीणाम व्हायचा की ४० वर्षाच्या जरा आतच मी घाबरुन टेस्ट करुन घेतली. पण जास्त सखोल आठवण ही नंतरच्या टेन्शनची असल्याने आता खरं तर गरज असतेवेळी हयगय होते आहे. पण आपला लेख वाचून परत प्रकर्षाने जाणीव झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत

गवि
Wed, 02/13/2013 - 13:32 नवीन
वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत, कारण जवळच्या सर्कलमधे उदाहरणं पाहिली आहेत. केवळ वेळेत डिटेक्ट झाल्याने पुढे पंधरावीस वर्षं नॉर्मल जगून अन्य कारणाने निधन पावलेल्या व्यक्ती एकीकडे आणि केवळ दुर्लक्ष केल्याने कॅन्सर स्तनातून अन्यत्र पसरुन तीनचार वर्षांतच मृत्यू आलेल्या व्यक्ती दुसरीकडे असं स्पष्ट चित्र आहे. मला वाटतं की हा कॅन्सर मूळ जागेववर असताना काढून टाकण्याजोगा आणि एकदा का अन्य भागात शिरला की पूर्ण नियंत्रणाबाहेर जात असावा. निदान या कॅन्सरबाबत. इतर टाईप्सविषयी वेगळं असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

गविंशी बाडिस

jaypal
Wed, 02/13/2013 - 14:06 नवीन
>>>> केवळ वेळेत डिटेक्ट झाल्याने पुढे पंधरावीस वर्षं नॉर्मल जगून अन्य कारणाने निधन पावलेल्या व्यक्ती एकीकडे आणि केवळ दुर्लक्ष केल्याने कॅन्सर स्तनातून अन्यत्र पसरुन तीनचार वर्षांतच मृत्यू आलेल्या व्यक्ती दुसरीकडे असं स्पष्ट चित्र आहे. १०००% सहमत. कर्करोगात लवकर निदान हा अत्यंत मह्त्वाचा मुद्दा ठरतो. डॉ.साहेब खुप खुप धन्यवाद. अवांतर १)या लेखामुळे डॉ.अरविंद बावडेकर यांच्या केन्सर माझा सांगाती या पुस्तकाची आठवण झाली. २) माझ्या जवळच्या मीत्राची आई ब्रेनट्युमरने ३ते४ महीन्यात गेली. काही वर्षांनंतर सख्खा मोठा भाउ अन्ननलीकेच्या कर्करोगाने ४ते५ महीन्यात गेला. दोघांचाही कर्करोग थर्ड स्टेजला लक्षात आलाहोता. निद्रानाश आणि नैराश्यासाठी सध्या त्याला मनोरुग्ण डॉ.ची ट्रीट्मेंट चालु आहे. त्याला सारख वाटत की कर्करोग अनुवंशिक असल्याने मला पण तो (आज ना उद्या) होणारच. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद डॉक्टर!

पैसा
Wed, 02/13/2013 - 13:28 नवीन
माझ्या आईला १९९० सालात ती ५३ वर्षांची असताना स्तनाचा कर्करोग लक्षात आला. लगेच त्यावर सर्जरी होऊन केमोथेरपीनंतर ती पूर्ण बरी झाली. यात तिचा प्रचंड आत्मविश्वास आणि एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन याचाही मोठा हात असावा असे वाटते. आत्मविश्वास इतका की २ वर्षांनंतर तिने डॉक्टरांकडे तपासणीसाठी जायचे सुद्धा सोडून दिले. नंतर कधी भेटले की डॉक्टरच तक्रार करत असत, "तुझी आई तपासायला येत नाही" म्हणून! आज ती ७६ वर्षांची आहे. वृद्धापकाळामुळे येणारे किरकोळ आणि नेहमीचे प्रकार आहेत. पण कर्करोगाचे नावसुद्धा नाही. अर्थात, नंतर तपासण्या करणे आवश्यक आहे हे मला माहिती आहे आणि कोणीही असे डॉक्टरांकडे न जाण्याचे धाडस करू नये असेच मी म्हणेन. तिच्या म्हणजे माझ्या आईच्या अगदी जवळच्या नात्यातल्या १० एक लोकांना वेगवेगळे कर्करोग झाले आहेत. माझे आजोबा सुद्धा कर्करोगाने गेले. कर्करोग आनुवंशिक आहे हे तुम्ही सांगितलेच, आणि रत्नागिरीतील सर्जननी पण तेव्हाच मला काळजी घे हे सांगितले होते. पण कर्करोगाच्या प्रकारांमधे स्तनाचा कर्करोग लवकर लक्षात आला तर इतर प्रकारांपेक्षा सर्वात कमी धोकादायक आहे का?
  • Log in or register to post comments

follow up

सुबोध खरे
Fri, 02/15/2013 - 10:35 नवीन
ज्योती ताई , आपले लेखन नजरचुकीने निसटून गेले क्षमस्व. रुग्णाला एका विशिष्ट कालावधी पर्यंत परत तपासणी साठी बोलावले जाते याची काही करणे आहेत. शस्त्रक्रिये नंतर जर कर्करोगाचा छोटासा कण एखाद्या कोपऱ्यात राहून गेला असेल तर तो परत वाढू लागतो. तो जितका लहान असेल तितके त्यावरील उपचार सोपे असतात.केमोथेरेपी देण्याचा हेतू सुद्धा हाच असतो कि जो सूक्ष्म डोळ्यांना न दिसणारा भाग राहू न गेला असण्याची शक्यता असते तो कर्करोग सुद्धा त्यात अंतर्भूत होऊन जातो. दुर्दैवाने कर्करोगाच्या काही पेशी मुळात केमोथेरेपीला दाद न देणाऱ्या असू शकतात त्यामुळे ज्या पेशी केमोथेरेपीचा प्रभाव होऊन मरतात त्या निघून जातात पण ज्या पेशी दाद न देणाऱ्या असतात त्या त्यात जिवंत राहतात (survival ऑफ fittest). तेंव्हा ज्या पेशी जिवंत राहतात त्या पुढे वाढून कर्करोग केमोथेरेपीला दाद न देणारा होतो.म्हणूनच रुग्णाची परत परत तपासणी करणे आवश्यक असते. प्रत्येक तर्हेचा कर्करोग हा किती कालावधीत दुप्पट होतोTUMOUR DOUBLING TIME त्यावरून रुग्णाला किती काळ पर्यंत तपासनीस बोलवायचे ते ठरते. सर्वसाधारणपणे स्तनाच्या कर्करोगास ५ वर्षे हा कालवधी पुरतो. या कालावधीत जर रोगाचा पुनरुद्भव झाला नाही तर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असे समजता येते.पण पहिला अवसर हा सगळ्यात चांगला असतो. लष्कराच्या तोफखान्याचे बोध वाक्य कर्करोगासाठी जसेच्या तसे वापरले जाते HIT FIRST,HIT HARD, KEEP HITTING. रुग्णाच्या आत्मविश्वासाचा आणि कर्करोगाच्या परत येण्याचा काही संबंध नाही.त्यांचा कर्करोग बहुधा पूर्णपणे मारला गेला होता म्हणून परत उद्भवला नाही हे सुदैव. आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवून न चावता निघालात या बद्दल परमेश्वराचे आभार मानावेत. आपल्या मातोश्रींना शतायुष्य लाभावे हि परमेश्वर चरणी प्रार्थना. कर्करोगा बद्दल मी हेच म्हणेन कि साप म्हणू नये धाकला आणी नवरा म्हणू नये आपला. स्तनाच्या कर्करोगामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात आणी त्यात सुद्धा काही ANAPLASTIC TYPE इतक्या जलद वाढतात कि रुग्ण ६ महिन्यात दगावतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद!

पैसा
Fri, 02/15/2013 - 10:38 नवीन
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या आणि इतर सामान्यपणे होणार्

नगरीनिरंजन
Wed, 02/13/2013 - 14:02 नवीन
या आणि इतर सामान्यपणे होणार्‍या कर्करोगांचे मूळ कारण काय? म्युटेशन की अन्युप्लॉइडिटी (aneuploidity)? अन्युप्लॉइडिटी असेल तर ती कशाने होते?
  • Log in or register to post comments

पहिला अचूक प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Wed, 02/13/2013 - 15:31 नवीन
लेखकाकडून उत्तराच्या अपेक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तपासणी अवेअरनेस ?

चौकटराजा
Wed, 02/13/2013 - 14:03 नवीन
आपण आज स्त्री कितीही सुधारली असे म्हणालो तरी तिच्या प्रायॉरिटी फेशीयल, लिप्स्टीक, दागिने, साड्या, मंगळसूत्राची डिझाईन्स, भजनी मंडळ, हलदीकुंकाचे कार्यक्रम, उपास तापास हे आहेच.आरोग्याच्या बाबतीत स्वतः चे तिचे काही प्रेफरन्सेस असतात की नाही हा प्रश्नच आहे. याचा परिणाम अनिमिया, कर्करोग यांचा उदभव दिसून येतो.
  • Log in or register to post comments

राजांना त्रिवार मुजरा

jaypal
Wed, 02/13/2013 - 14:09 नवीन
हायला राष्ट्रपती पुत्रा सारख्या कॉमेंट नका देऊ. उगा वाद वाढुन धाग्याचा ऊद्देश भरकटतो :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सुधारणा

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 14:31 नवीन
साहेब , आपण आपल्या कारचा महिन्याचा हप्ता भारत असतो म्हणून त्याची वेळेवर तेलपाणी इ.(सर्विसिंग) केले जाते. आपल्या शरीराचा कोणताही हप्ता न भरल्याने (किंबहुना आपल्याला शरीर परमेश्वरा कडून फुकट मिळाल्यामुळे) त्याबद्दल चालढकल होत असते. मग स्त्रिया, ज्यांच्याकडे कोणतेही आर्थिक अधिकार नसल्याने स्वतः वर खर्च करणे हे त्याना संकोचाचे किंवा अडचणीचे वाटते. आणि आपल्या संस्कृतीने त्यांना त्यागाची मूर्ती बनवल्याने बोलणेच संपले. रोग जेंव्हा हाताबाहेर जातो तेंव्हाच त्या घरी सांगतात किंवा डॉक्टर कडे जातात. पूर्ण स्तनात पू भरलेल्या किंवा कर्करोग स्तनाबाहेर गेल्याने हात पूर्ण सुजलेल्या अवस्थेत किती रुग्ण दिसतात.समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत येत नाही तोवर आपली खरी प्रगती होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

१००%

NiluMP
Wed, 02/13/2013 - 15:06 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विचारप्रवर्तक व महितीपूर्ण लेख.

तर्री
Wed, 02/13/2013 - 14:16 नवीन
लेखकाची आरोग्य विषयक "कळकळ" शब्दा-शब्दातून दिसते आहे. मि.पा. वर एक वेगळा विषय अधिकाराने प्रस्तुत केल्याबद्दल सुबोध रावांचे आभार. अमेरिकेमध्ये "पिंक रिबीन " ही स्तनाच्या कर्करोगाचे प्रतिक आहे. भारतातही तशी मोहीम असावी. माझ्या मित्राच्या पत्नीला स्तनाचा केंसर झाला तेंव्हा ती ३६ वर्षांची होती. स्तन काढून टाकावा लागला. त्या ऑपरेशन नंतर तीची मनोवस्था कमालीची खालावली आहे. शारीरिक रोगा बरोबर "मानसिक" खच्चीकरण करणारा हा रोग आहे, सावधानतेचा इशारा पोहोचला.
  • Log in or register to post comments

मानसिक धक्का

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 14:50 नवीन
कोणतीही स्त्री केवळ स्तनाचा कर्करोग हे ऐकले तरी घाबरून जाते त्यातून स्तन हा एक स्त्रीत्वाचे लक्षण असल्याने तिला तिच्या मूळ स्त्रीत्वावर आघात झाल्याची भावना येते. मुलीला आपल्या वाढत्या वयात वाढणाऱ्या स्तनाबद्दल (जसा रुपाबद्दल) एक अभिमान निर्माण होत असतो. म्हणूनच ज्या मुलीचे स्तन लहान असतात तिला एक न्यूनगंड निर्माण होतो. ज्यावेळी स्त्रीला सांगितले जाते कि आता स्तन काढून टाकायला लागेल तेंव्हातिला धक्काच बसतो. ती आपोआप निराशेच्या गर्तेत जाते या वेळी तिचे मानसिकदृष्ट्या पुनरुत्थान करणे आवश्यक आहे. आता दोन्ही तर्हेचे इम्प्लांट मिळतात (implant and explant ) implant हा त्वचेच्या आत शस्त्रक्रियेद्वारा घातला जातो (जेंव्हा कर्करोग त्वचेपर्यंत पोहोचलेला नसेल तेंव्हा किंवा शस्त्रक्रियेमध्ये जास्त त्वचा गेली नसेल तर. अन्यथा ब्रा च्या आत घालण्यासाठी explant मिळतो.डॉक्टर बरोबर चर्चा करून या सर्व शक्यता पडताळून पहिल्या तर हा आघात बराच कमी करता येतो. पण त्यात कुटुंबियांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

एक प्रश्न

तिमा
Wed, 02/13/2013 - 14:20 नवीन
खरे यांना हा प्रश्न गंभीरपणे विचारत आहे. स्त्रियांना जसा स्तनांचा कर्करोग होऊ शकतो तसा तो पुरुषांनाही त्याच जागी होऊ शकतो का ? अशा केसेस मेडिकल हिस्टरीमधे आहेत का ?
  • Log in or register to post comments

रोचक. हीच शंका कधीकाळी

बॅटमॅन
Wed, 02/13/2013 - 14:21 नवीन
रोचक. हीच शंका कधीकाळी मलादेखील आली होती. उत्तराच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

होय होतो

शुचि
Wed, 02/13/2013 - 14:25 नवीन
होतो. म्हणजे मॅमोग्राफी मॉड्युलमध्ये पेशंट लिंग - स्त्री/पुरुष दोन्ही होते व आम्हाला सांगीतले होते की होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ईंटरेस्टिंग! आणि तितकेच

बॅटमॅन
Wed, 02/13/2013 - 14:28 नवीन
ईंटरेस्टिंग! आणि तितकेच भयावहही. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पुरुषांना स्तनाचा कर्करोग

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 14:36 नवीन
होय साहेब पुरुषांना पण हा रोग होतो आणि वाईट म्हणजे तो फार लवकर पसरतो कारण पुरुष स्तन फार लहान असल्याने हा कर्करोग लगेचच छातीत पसरतो आणि रुग्णाचा घास घेतो.साधारण २ वर्षात पुरुषाला मृत्यू येतो.त्यामुळे पुरुष स्तनात गाठ दिसली तर ताबडतोब डॉक्टर कडे जाने आवश्यक आहे. सुदैवाने पुरुष रोगाचे प्रमाण १:१०००० आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

धन्यवाद

बॅटमॅन
Wed, 02/13/2013 - 15:07 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एका महत्वाच्या पण दुर्लक्षित

५० फक्त
Wed, 02/13/2013 - 14:23 नवीन
एका महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयाकडं लक्ष वेधल्याबद्दल अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण लेख!

दादा कोंडके
Wed, 02/13/2013 - 15:11 नवीन
धन्यवाद खरे साहेब. वर चौकटराजांचं मतसुद्धा पटलं. आठवणः एकदा कटींगच्या दुकानात एक (गरीबच दिसणारा) माणूस दोन-चार लोकं पकडून लेक्चरबाजी करत होता. "दर सहा म्हैन्याला थोडं-थोडं, आर्धा-येक ग्राम का होइना सोनं घ्यायाचं. सोन्याचा भाव लै होणाराय. पब्लीकला काय आक्कल नाय. खाउन गांडीला हात पुसतं. वगैरे वगैरे." मी त्याला म्हणालो, "त्यापेक्षा तू आरोग्य विमा का उतरवत नाहीस बाबा. तेच पैसे तिथे भर. आजारपणात उपयोगी येतील." लै खवळला होता माझ्यावर. वर म्हणाला, "खूप खर्च येणार असेल तर पेप्रात दिल्यावर पब्लीक मदत करतं" आता बोल! :)
  • Log in or register to post comments

तहान लागल्यावर विहीर

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 20:13 नवीन
तहान लागल्यावर विहीर खणायला घेणारे काय कमी आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

धन्यवाद!

पांथस्थ
Wed, 02/13/2013 - 18:56 नवीन
डॉ. साहेब समर्पक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! कॅन्सर विषयी माहितीसाठी (वैद्यकिय नाही) हे एक अप्रतिम पुस्तक आहे - The Emperor of All Maladies: A Biography of Cancer. मी सध्या वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

माहितीबद्दल धन्यवाद

रेवती
Wed, 02/13/2013 - 19:40 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब! चाळीशीनंतर मॅमोग्राफी करण्याबद्दल डॉक्टर आग्रही असतातच पण स्त्रीयांनीही यात चालढकल करू नये हेही तितकेच खरे! आमच्या ओळखीच्या बाईंना त्यांच्या डॉ. नी मॅमोग्राफी करण्याचा आग्रहाचा सल्ला दिला. त्यांनी फारसे लक्ष दिले नाही पण बाईंच्या नवर्‍याने आग्रहाने तपासणी करवून घेतली आणि बरे होण्याच्या टप्प्यातला कर्करोग लक्षात आला. त्यांची ट्रीटमेंट केली गेली, त्या बर्‍या झाल्या पण आम्ही सगळ्या ओळखीच्या बायका चाळीशी येण्याच्या आतच घाबरून गेलोय. माझे डॉक्टर तर चाळीशीनंतर पॅप स्मीअर तपासणीही दर वर्षी करून घेण्यायला साम्गतात. चाळीशीपेक्षा लहान स्त्रीयांना मात्र एक आड वर्षाने किंवा दोन वर्षांनी. त्याबद्दलही लिहिण्याची विनंती करते.
  • Log in or register to post comments

नवीन MBI चाचणी

अमित दळवे
Wed, 02/13/2013 - 20:32 नवीन
http://www.ted.com/talks/deborah_rhodes.html वरील दुव्यावर mammography पे़क्षाही अधिक परिणामकारक चाचणीची माहिती दिली आहे. यात क्ष किरणा ऐवजी गामा किरणाचा वापर होतो. ही भारतात उपलब्ध आहे अथवा नाही या बद्दल जाणकार मंडळीनी माहिती पुरवावी.
  • Log in or register to post comments

MBI चाचणी

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 23:10 नवीन
MOLECULAR BREAST IMAGING याबद्दल खालील दुवा वाचावा.त्यात या चाचणीच्या बद्दल आतापर्यंत च्या स्थिती बद्दल चांगली माहिती आहे http://www.breastcancer.org/symptoms/testing/types/mbi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित दळवे

MBI

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 23:16 नवीन
हि चाचणी भारतात करणे शक्य आहे परंतु ती सर्वाना खरोखरच गरज आहे असे वाटत नाही. ज्या स्त्रियांचे स्तन घन (DENSE) असतात आणि ज्यांना कर्करोगाची शक्यता (जवळच्या नातेवाईकाना कर्करोग असल्याने) जास्त आहे अशा स्त्रियांना जेंव्हा mammography मध्ये निदान होत नाही केवळ अशांनाच याचा आत्ता तरी फायदा आहे असे वाटते. अजून जास्त अभ्यासानंतरच या गोष्टी सिद्ध होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित दळवे

चांगला विषय आणि माहिती

विकास
Wed, 02/13/2013 - 20:35 नवीन
गंभीर, महत्वाच्या विषयावर येथे सोप्या भाषेत लिहील्याबद्दल धन्यवाद. असेच आरोग्यासंदर्भात लेख येऊंदेत असा विनंतीवजा आग्रह. तुम्ही जे कर्करोग अनुवंशीक असतो असे म्हणालात, ते स्तनांच्या कर्करोगासंदर्भातच आहे असे वाटते. (अजून देखील काही असतील, पण सगळे नाही.) अमेरीकेत दरवर्षी प्रत्येकाला (म्हणजे ज्याच्या कडे इन्श्यूरन्स आहे अशा प्रत्येक व्यक्तिस) स्वतःची वार्षिक चाचणी करता येते आणि बहुतांशी लोकं ती करतात. आता तर ओबामाच्या हेथ केअरने ती मोफत देणे कम्पल्सरी केले आहे, जेणे करून माणसे जायला टाळाटाळ करणार नाहीत. त्यात कदाचीत फुकट नसेल पण मॅमोग्राम आणि पॅस्पस्मिअर करायला लावतात हे ऐकलेले आहे. तसे काही भारतात आहे का? हा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही येथे लिहून आणि अनेकांनी अनेक ठिकाणि लिहून सतत लोकशिक्षण करायचा प्रयत्न केला आहे. पण आपल्याकडील फॅमिली डॉक्टर्स संकल्पनेतील डॉक्टर्सना याची कितपत माहिती असते आणि ते त्यांच्या नेहमीच्या पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या करायला उत्तेजन देतात का? (मला दुर्दैवाने तसे होत नसावे असे वाटते. पण मी चूक असलो तर चांगलेच आहे). अजून एक प्रश्नः काही कॅन्सर होण्यामागे प्रदुषण हे देखील कारण असते. तसे स्तनांच्या कॅन्सरच्या मागे काही (इतर) कारण असते का? पुलेशु
  • Log in or register to post comments

प्रदूषण

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 23:03 नवीन
काखेत वापरायचे दुर्गंध विरोधक किंवा घामरोधक स्प्रे स्तनांच्या कर्करोगास जबाबदार आहेत कि नाहीत हि गोष्ट अजून पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. हि रसायने काखेतून स्तनात जाऊन तेथे कर्करोग निर्माण करतात हे गृहीतक अजून सिद्ध झालेले नाही परंतु ALARA (AS LOW AS reasonably achievable) तत्वाप्रमाणे त्या रसायनांचा/ स्प्रे चा वापर कमीत कमी करावा असा सल्ला शास्त्रज्ञ देतात. बाकी कोणत्याही प्रदुशकाचा स्तनाच्या कर्करोगाशी संबंध अजूनतरी आढळलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर

नगरीनिरंजन
गुरुवार, 02/14/2013 - 06:38 नवीन
हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर होतो हे कधी पूर्णपणे सिद्ध होईल़ काय? एखाद्या विषाणूवर सगळा दोष ढकलता आला तर बरे म्हणून बरेच प्रयत्न केले गेले आहेत. युनिव्हर्सिटि ऑफ कॅलिफोर्नियामध्ये रिट्रोव्हायरस आणि सेल बायॉलॉजीवर संशोधन करणार्‍या पीटर ड्यूसबर्ग या शास्त्रज्ञाने राऊस सार्कोमा नावाच्या रिट्रोव्हायरसचा शोध लावला तेव्हा सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला आणि त्या शास्तज्ञाला अनेक पुरस्कार मिळाले. पण पुढे त्याच शास्त्रज्ञाने अशा विषाणूंच्या घातकपणाबद्दल शंका व्यक्त केली तेव्हा तो एकदम नावडता झाला. कर्कजनक द्रव्यांमुळे अन्युप्लॉइडी पेशी निर्माण होतात आणि त्यास्टेबल झाल्या की पुनरुत्पादन करून कॅन्सर नावाचा एक परजीवी सजीव तयार होतो असा त्यांचा नवा सिद्धांतही दुर्लक्षिला गेला कारण त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये तयार होणार्‍या, केल्या जाणार्‍या कर्कजनक द्रव्यांवर थेट आरोप येईल आणि ते किती गैरसोयीचे असेल नाही? आईच्या दुधापासून नदीच्या पाण्यापर्यंत चराचरात भरून राहिलेले डायॉक्सिन, बायस्फिनाल सारखी प्लॅस्टिकजन्य विषारी द्रव्ये, गाड्यांच्या आणि कारखान्याच्या धुरातून हवेत मिसळणारे हायड्रोजन सायनाईड सारखे कर्कजनक वायू वगैरे आवश्यकच आहेत. दे मेक अवर लाईफ बेटर, यू नो? अमेरिकेत १९०० मध्ये प्रत्येक १०० मृत्युंपैकी फक्त ३ कॅन्सरने व्हायचे, आता २५ होतात. "छे छे! पूर्वी यापेक्षा वाईट होतं, आता फक्त जास्त प्रमाणात डिटेक्ट होतात" असं संख्याशास्त्री ठासून सांगतीलच. काय करणार? "इट्स द इकॉनॉमी, स्टुपिड!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

स्पंदना
गुरुवार, 02/14/2013 - 07:00 नवीन
निव्वळ नगरी! तसाही १९७० च्या सुमारास डायरेक्ट कॅन्सर टारगेट करणारी, अन केमो रेडीओ शिवाय अमलात येणारी एक उपचारपद्धती संशोधनात होती, हीचे पेपर्स त्यावएळच्या मेडीकल कॉम्फरन्समध्ये सादरही झाले होते, पण त्यावरच्या पुढच्या संशोधनाला फार्मास्युटीकल्स कंपन्यांनी फायनान्शीयल मदत नाकारुन ती उपचारपद्धती दाबुन टाकली. कारण? केमो अन रेडीओ जरी पेशंटला धोकादायक अन त्याची उरलेली शक्तीही खच्ची करत असले तरी फार्मास्युटीकल कंपनींना फायदेशीर आहेत. अरांउंड २०००ला फिरुन हा पेपर वाचण्यात आला, अन ज्या शास्त्रज्ञाने तो लिहिला होता त्याला वयाच्या ७५व्या वर्षी पुन्हा तोच पेपर सादर करायला बोलावले गेले. तो म्हणतो फार्मास्युटीकल्सचा हा अ‍ॅटीट्युड अन ही ताकद्(बिनफायद्याचे उपचार दाबुन घालायचे ) त्याला खरच विनाशकारी वाटते. मला संदर्भ अन नावे आठवत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हा प्रतिसाद जो पर्यंत अनुत्तरित आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 10:13 नवीन
या आणि इतर सामान्यपणे होणार्‍या कर्करोगांचे मूळ कारण काय? म्युटेशन की अन्युप्लॉइडिटी (aneuploidity)? अन्युप्लॉइडिटी असेल तर ती कशाने होते?
तोपर्यंत `डिटेक्शन झाल्यावर करायचे उपाय' असंच चर्चेच स्वरूप राहिल. आणि त्याचा न झालेल्यांना उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

Aneuploidyगुणसूत्रात संख्यात्मक बदल आणि उत्परिवर्तनmutation

सुबोध खरे
गुरुवार, 02/14/2013 - 10:36 नवीन
साहेब, हा फार मोठा विषय आहे कर्करोग का होतो जगभर यावर फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. माझ्यासारख्या सामान्य वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्याच्या आवाक्याबाहेरचा आहे. कदाचित अजून ३० वर्षांनी मी याचे उत्तर देऊ शकेन असे वाटते. http://www.nature.com/nature/journal/v432/n7015/full/nature03099.html http://www.nature.com/nrc/journal/v5/n10/full/nrc1714.html http://www.cancer.org/cancer/cancercauses/geneticsandcancer/oncogenesandtumorsuppressorgenes/oncogenes-tumor-suppressor-genes-and-cancer-mutations-and-cancer मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

डॉक्टरसाहेंबांनी

शैलेन्द्र
गुरुवार, 02/14/2013 - 11:11 नवीन
डॉक्टरसाहेंबांनी सांगितल्याप्रमाणे कर्करोग का होतो याचे नक्की कारण आज माहित नाही. म्युटेशन.. हो, ते एक कारण आहे पण सगळेच म्युटेशन कर्करोगात बदलत नाहीत. म्युटेशनचे अनेक प्रकार आहेत, मानवी शरिरात आजच्या घडीला साधारण ५००००० माहीत असलेले single nucleotide polymorphisms आहेत, माहीत नसलेले अजून लक्षावधी असतील. दर सेकंदाला कित्येक डिएनए बेसेस चुकीचे गुंफले जातात, त्यातले बरेचसे लगेच विकरकाकडुन दुरुस्त होतात. काही तसेच पुढे जातात पण त्यातही बर्‍याचशा चुकांचा प्रथिनांच्या जडणघडणीत काही फरक पडत नाही, जर तो फरक पडत असेल तर तो कुठे पडतोय तेही महत्त्वाचं असतं. थोडक्यात, कॅन्सरच्या बाबतीत अनुवंशिकता हाच सर्वात मोठा फॅक्ट्र आहे हे हळु हळु लक्षात येत चाललय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आहो, तुम्ही `साहेब' वगैरे म्हंटलं की ऑकवर्ड होतं

संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 12:39 नवीन
एक साधा मुद्दा आहे. ज्यांना झालाय त्यांचा डेटाबेस घेऊन एक समान सूत्र नाही का काढता येणार? डायबेटीसचा हाच प्रकार आहे. सतत चेकींग, त्याचा धसका आणि नंतर इन्शुलीन घेतल्यानं पँकरीअस निकामी होणं (कारण त्यांना कामच रहात नाही). त्यापेक्षा ग्रंथी अकार्यक्षम का होतात आणि त्या होऊ नयेत यासाठी काय करता येईल, अशी वैद्यकाची दिशा असू शकत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

एक साधा मुद्दा आहे. ज्यांना

गवि
गुरुवार, 02/14/2013 - 12:47 नवीन
एक साधा मुद्दा आहे. ज्यांना झालाय त्यांचा डेटाबेस घेऊन एक समान सूत्र नाही का काढता येणार?
अशा मार्गाने संशोधन होत नसेल असं का वाटतंय? माझ्यामते अशाच पद्धतीने बरीच संशोधनं होत असावीत. सध्याच्या पेशंटसचा डेटा, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधला संचित रिट्रोस्पेक्टिव्ह डेटा वगैरे यांचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध होताना दिसतातच. तरीही त्यातून ठोस उपचार होईल असं मूळ कारण सापडलेलं नाही, किंवा सापडलं असलं तरी ते उपचार व्यावहारिक नाहीत यापैकी एक काहीतरी निश्चित..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वैद्यकीय संशोधन

सुबोध खरे
गुरुवार, 02/14/2013 - 13:18 नवीन
साहेब तुम्ही म्हणाल्या प्रमाणेच वैद्यकीय संशोधन चालते कर्करोग म्हणाल तर सर्व तर्हेच्या शक्यता पडताळून पहिल्या जातात. मुंबईत टाटा रुग्णालयात आत्तापर्यंत उपचार झालेल्या सर्व रुग्णांचा पूर्ण तपशील उपलब्ध आहे त्या सर्वांचे वरीलप्रमाणे सर्व तर्हेची माहिती मिळवून त्या आजाराचे मुल कारण काय असू शकते असे संशोधन तेथील डॉक्टर करीत असतात. पण जसे जसे ज्ञान वाढत जाते त्यात्या प्रमाणे ते आपल्याला सल्ला देत असतात. या संख्याबलावरच गुटखा खाल्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो हे सिद्ध करून सरकार वर त्याला बंदी घालण्याचा दबाव आणला गेला. ता.क. इन्सुलिन घेतल्यामुळे स्वादुपिंड निकामी होत नाही तर स्वादुपिंड निकामी झाल्यामुळे इन्सुलिन घ्यावे लागते. ज्यावेळी गोळ्यांचा पूर्ण डोस घेऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही तेंव्हा नाईलाजाने इन्सुलिन चालू करावे लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा