✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तिच्या मनातून.....................

क
कवितानागेश यांनी
Wed, 04/06/2011 - 14:37  ·  लेख
लेख
आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय... त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ... असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच. आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच. पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची! पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही. मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का? मला तरी आता आठवत नाही. होती ती फक्त आग, प्रचंड आग! माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग. जन्मापासून माझ्या सोबत असलेली सूडाची आग. खरें तर मला कधी कळले नाही, त्या जगद्म्बेनी कशासाठी मला जन्माला घातले. माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता. पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले? या शेवटच्या क्षणांमध्ये मी या मूळ कारणांचा विचार करतेय, हे किती विचित्र आहे. किती अलगद रहात होते मी लहानपणी..... पुढच्या सगळ्याच गोष्टी कल्पनातीत घडल्या... इतकी वर्षे झाली, अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, भीतीनी, आश्चर्यानी.... असा अपमान होऊ शकतो, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते मला. ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही. राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली, भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या! तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता. सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते.... 'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले. लहानपणापासून ऐकत आले होते, की आता कलियुग सुरु होणार आहे, घोर कली पसरणार आहे, अंध:कार येणार आहे,... हेच का ते कलीयुग? खरोखरच तेंव्हा असे भासत होते, माझ्या सभोवताली काळाकभिन्न धुरासारखा कली मला कोंडून टाकत होता, आणि मी एकटीच धगधगत त्याला जाळू पहात होते. त्या क्षणी मला स्वत:लादेखील माहित नव्हते, की या आगीत पुढे काय काय होरपळून निघणार आहे! ...................................................... पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर. माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य. त्याच्या नजरेतूनच मला जाणावले, हे सगळे मला भोगावच लागणार होते,... दुसरा इलाजच नव्हता! जणू काही तो सांगत होता, कणखर हो, अलिप्त हो! बास्स.......इतकीच एक मौल्यवान गोष्ट आहे माझ्या उभ्या आयुष्यात..... आज इथे हे शेवटचे श्वास मोजत शांतपणे मृत्यूची वाट बघतेय........ खरें तर हे विचारही नको वाटतायत... खरें तर जगणे कधीच संपले होते, माझी मुले, माझा भाऊ काळानी ओढून नेले, त्याच क्षणी मीदेखील संपले. ज्याच्या करुणेवर पुढची ओझी ढकलली, तो तर असा अचानक, ना सांगताच निघून गेला. माझ्या संपूर्ण जगातलाच प्राणच संपला. आम्ही सगळेच हतबल झालो. केवळ त्याचे एक हसू, एक नजर, एक शब्द, आम्हाला जगण्याची ताकद देत होते. एरवी माझ्यावर सतत कसल्या ना कसल्या नात्यांचे ओझे होते, कन्या, बहीण , पत्नी,सून, आई, सम्राज्ञी,....संपतच नाहीत अपेक्षा कुठल्या नात्यांच्या. फक्त त्याच्यासमोर असल्यावरच जाणवायचे, की मी मी आहे, एक अस्तित्व. या अथांग विश्वासमोर जरी क्षूद्र भासले, तरीही, एक एकमेवाद्वितीय सुंदर अस्तित्व. जगदंबेची निर्मिती! आता तो नाहीसा होणे ही कल्पना देखील इतकी सैरभैर करते मनाला. त्याच्या आठवणीन्वरच आतापर्यंत तग धरला जीवानी. त्यानंतर फक्त सावली वावरत होती माझी.... आता काही वेळात ती सावली देखील संपेल. बास्स.. याचीच वाट पहात होते मी कितीतरी वर्षे. आपलेच आयुष्य असे ओझे होऊ शकते हे मला कधी माहीतच नव्हते. आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला. ...आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास. आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल.... हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे. मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
20055 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

काहीच न कळल्यामुळे प्रतिसाद

अप्पा जोगळेकर
Sat, 04/30/2011 - 16:46 नवीन
काहीच न कळल्यामुळे प्रतिसाद देता येत नाही.
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे.

जयंत कुलकर्णी
Sun, 05/01/2011 - 11:06 नवीन
स्वर्गद्वार ! या दरवाजातून सगळे त्यागून बाहेर पडायचे. अर्थात मनातून काही सगळे जातच नसते. या पुढे रस्त्यावर नाही पाणी प्यायचे आणि नाही अन्न. सगळीकडे बर्फ आणि डोळ्यात घुसणारे सुर्याचे किरण. रस्त्याच्या बाजूला हाडाचे सापळे, कदाचित नुकतेच या रस्त्यावर आलेल्या पांथस्तांचे देह. अशावेळी मनातले विचारच साथ देतात, पण काहीच काळ. नंतर त्याचाही फोलपणा कदाचित कळत असावा. हे आठवणींचे मुडदे बाजूला सारून आपण पुढे जायचे असते. असे हे स्वर्गदार. प्रत्येकाच्या नशिबात ते असतेच. त्यासाठी हिमालयात जावे लागतेच असे नाही. खरे तर स्वर्गद्वार ही एक मला वाटते मनाची अवस्था असावी. हे लिहीतांना डॉ. झिवॅगोच्या हॅम्लेट या कवितेतील पहिले कडवे आठवले. त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ? ही चौकट बहुदा स्वर्गद्वाराचीच असावी ....असे मला क्षणभर वाटून गेले. स्वर्गद्वारात शिरल्यापासूनचा प्रवास हा खास स्वतःचा असा असतो. तो संपतो तेव्हा ना तो रस्ता उरत, ना ते द्वार उरत.
  • Log in or register to post comments

माऊ, हे कसं कोण जाणे वाचायचं

इनिगोय
Mon, 01/07/2013 - 17:44 नवीन
माऊ, हे कसं कोण जाणे वाचायचं राहून गेलं होतं! सुरेख लिहिलंयस. ही आणि हिचा तो सखा सुहृद.. दोघंही विलक्षणच!
  • Log in or register to post comments

मीपण फार दिवसांनी वाचतेय हे.

कवितानागेश
Tue, 01/08/2013 - 00:36 नवीन
मीपण फार दिवसांनी वाचतेय हे. :)
  • Log in or register to post comments

नुसतचं

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 02/06/2013 - 18:08 नवीन
आपलच जुन लेखन नुसतचं वाचा. नविन काही लिहू नका. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ब्वॉर्र.

कवितानागेश
Wed, 02/06/2013 - 20:44 नवीन
ब्वॉर्र. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

अरे! मी तर प्रतिसादपण दिलाय?

स्पंदना
Wed, 02/06/2013 - 17:25 नवीन
अरे! मी तर प्रतिसादपण दिलाय? असो पुन्हा एकदा.. काय लिहिलय माऊ?
  • Log in or register to post comments

माऊ लयच भारी!!! नमस्कारिले

बॅटमॅन
Wed, 02/06/2013 - 17:33 नवीन
माऊ लयच भारी!!! नमस्कारिले तुवां _/\_
  • Log in or register to post comments

सुंदर !!

प्रसाद गोडबोले
Wed, 02/06/2013 - 18:07 नवीन
अहाहा ! मस्तच लिहिले आहे ...
  • Log in or register to post comments

हे काय सुरेख लिहिले होतेस तू

यशोधरा
Wed, 02/06/2013 - 18:11 नवीन
हे काय सुरेख लिहिले होतेस तू :) आत्ता पुन्हा हे वाचताना मला सरस्वती उगमाच्या इथल्या भीमपुलाची, सरस्वतीच्या अथक, अफाट नादाची, स्वर्गारोहिणी शिखराची आणि तिथल्या पायवाटेची आठवण आली बघ खूप :)
  • Log in or register to post comments

मुक्त्तक छान लिहीले आहे.

दीपा माने
गुरुवार, 02/07/2013 - 00:10 नवीन
मुक्त्तक छान लिहीले आहे. मला वाटतं, परिस्थितीजन्य वास्तव्यातुन झालेली मनोरचना आणि व्यवहार धारण केलेला मानवीदेह सर्व युगांत सारखाच असतो. ह्याला अपवाद फक्त ब्रम्हांडाचे दर्शन घडविणारा महायोगी श्रीकृष्णच.
  • Log in or register to post comments

आव्डले. पटलेच असे नाही. पण

मृत्युन्जय
गुरुवार, 02/07/2013 - 10:59 नवीन
आव्डले. पटलेच असे नाही. पण आवडले.
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
गुरुवार, 02/07/2013 - 21:05 नवीन
असेच असेल असे नाही पण एक वास्तवाला स्पर्श करणारी शक्यता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ज्याची सुरुवात तिने केली...

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 19:27 नवीन
त्याच्या अंताबद्दल वाटलेली खंत खरोखर अंतर्मुख व्हायला लावणारी आहे...
  • Log in or register to post comments

लिमाउलि _/\_

अद्द्या
Wed, 02/24/2016 - 12:38 नवीन
लिमाउलि _/\_
  • Log in or register to post comments

माउ

सविता००१
Wed, 02/24/2016 - 13:03 नवीन
परत कित्ती दिवसांनी वाचलं. मस्तच
  • Log in or register to post comments

वामा असताना वाचले होते

नूतन सावंत
Wed, 02/24/2016 - 21:04 नवीन
वामा असताना वाचले होते,प्रतिसाद आता टंकायला मिळतोय. सुरेख मुक्तक.द्रौपदीच्या मनातली तळमळ अशी असेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा