आदिजोशीने दिलेला 'आँखो देखा हाल' फक्त चर्चगेटहून आलेल्या मिपाकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएम) कडून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती, पण त्यातल्या कुणीच काही लिहिले नाही आणि बहुधा त्यांनी आदीला 'फीडबॅक' दिला नसेल म्हणून त्यानेही त्यांच्याबद्दल फारसे लिहिलेले दिसत नाही. त्यामुळे मीच पुढाकार घेऊन चार ओळी लिहायचे ठरवले. हे जर प्रतिसादात दिले असते तर कुणी वाचले नसते असे मला वाटले म्हणून वेगळा लेख लिहिला आहे.
मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते. त्यांच्या पाठीवरील हॅवरसॅकमुळे ते एमार किंवा आयटीवाले वाटत होते आणि मिपाचे सदस्य असण्याची दाट शक्यता होती. त्यातला एकजण कानाला मोबाईल लावून बोलत होता आणि दुसरा ते लक्षपूर्वक ऐकत होता. ते बहुधा त्यांच्या मिपाकर मित्रांना ते केंव्हा पोचणार असे विचारत असतील असे मला वाटले. पण अचानक तो बोलणारा गृहस्थ एका दिशेला आणि दुसरा त्याच्या विरुध्द दिशेला चालले गेले. बहुधा त्यांना हव्या असलेल्या दिशा त्यांना फोनवरून मिळाव्या असाव्यात. मी बृ.मुं.म.न.पा.पासून तिथे येणार्या भुयाराच्या दारापर्यंत फेर्या मारत असतांना माझा भ्रमणध्वनी खणाणला. त्यावर किसनने माझी चौकशी केली. आणखी दोघांसह तो स्टेशनवर उतरला होता आणि लवकरच 'मीटिंग पॉइंट'ला पोचणार होता. आम्ही एकमेकांना पाहिलेले नसल्याने कसे ओळखणार हा एक प्रश्न होता. येतांना प्रत्येकाने पावाचा तुकडा सोबत आणावा आणि उंच धरावा असा एकादा आदेश किंवा एकादा कोडवर्ड दिलेला नव्हता. मग आम्ही एकमेकांच्या शर्टांचे रंग विचारून घेतले. त्यांची वाट पहात मी भुयाराच्या दारापाशी उभा राहिलो. किसनच्या सोबत रामदासही होते. मी त्यांना पूर्वी दोन वेळा भेटलेलो असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना लगेच ओळखले. मग शर्टांच्या रंगांकडे पहाण्याची गरज उरली नाही.
किसनला आणखी फोन येत होते. मिपाच्या 'आयडी'ज दुसरी तुकडी स्टेशनवर उतरली होती आणखी कोणी कोणी गाड्यांमध्ये प्रवासात होते वगैरे. त्यांना आपण लगेच दिसावे म्हणून आम्ही फिरोजशा मेहतांच्या पुतळ्यापाशी जाऊन उभे राहिलो, पण ऊन सहन करण्याची त्या पुतळ्याला जितकी सवय होती तेवढी मला नसल्यामुळे मी बृ.मुं.म.न.पा.च्या मुख्यद्वारापाशी सावलीची जागा पाहिली. माझ्या सुदैवाने तिथे बसायला एक अगदी पिटुकला कट्टाही मोकळा मिळाला. तिथे एकटाच पेपर वाचत बसलो. आमचे शूरवीर साथीदार उन्हाची पर्वा न करता उभे होते, पण काही वेळानंतर ते नजरे आड झाले. आणखी काही नव्याने आलेल्या सदस्यांसह ते भुयाराच्या दारापाशी जाऊन सावलीला उभे राहिले होते. त्यांच्यातल्या तीन चारजणांनी मिळून एक वर्तमानपत्र धरले होते आणि ते त्यात काही तरी पहात होते. ती इतकी इंटरेस्टिंग बातमी किंवा लेख पाहण्यासाठी मीही आपले डोके त्यात खुपसले तर त्यात माझ्या पूर्वीच्या ऑफीसचा लोगो दिसल्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. लोगो पाहून ओळखण्याचे ते एक कोडे आहे असे समजले आणि त्यातले एक उत्तर तर मला पाहताक्षणी मिळाले होते. इतर कोड्यांची उत्तरे रामदास सांगत होते. त्यातल्या '3M' मधल्या तीन शिलेदारांची नावे त्यांनी सांगितली, ती माझ्या कानावर पडली खरी, पण मेंदूपर्यत पोचून त्यांची नोंद काही झाली नाही. माझ्या आयुष्यात मला त्यांची कधी गरज पडली नव्हती आणि पडण्याची शक्यताही नव्हती. मी त्यांच्या उपयोगी पडण्याची शक्यता त्याहून कमी होती. कोडे असलेला तो लेखच रामदास यांनी लिहिला होता असे समजले आणि कट्ट्याची आठवण म्हणून मी ते वृत्तपत्र लगेच खरेदी करून पिशवीत ठेवले.
साडे अकरा वाजेपर्यंत आणखी काही 'आयडी'ज आल्या. चर्चगेटपाशी जमलेले लोक तिकडेच येणार असल्याचे आधी कळले होते, पण त्यांनी पुनर्विचार करून हुतात्मा चौकात येऊन भेटायचे ठरवल्याची बातमी मिळाल्यावर आम्हीही प्रस्थान केले. भुयारातून रस्ता ओलांडून पलीकडे जाताच तिथे मुंबईतला सर्वोत्तम 'काला खट्टा' मिळतो तो प्राशन करून पुढे जायचा बेत रामदास यांनी सांगितला. माझ्यासकट सगळेजण दूरदूरच्या ठिकाणांहून आलेले होते. पदयात्रा सुरू करायच्या आधी सगळ्यांनाच एका 'वेलकमड्रिंक'ची नितांत गरज होती. त्यामुळे कोणीही त्यावर उपसूचना मांडली नाही. ते पेय पिऊन आम्हाला थोडी तरतरी येईपर्यंत आणखी काही 'आयडी'ज येऊन आम्हाला मिळाल्या. त्यातल्या चिमुकल्या आर्याने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तिथून आमचा 'हेरिटेज वॉक' सुरू झाला. अर्थातच रामदास हे आमचे मार्गदर्शक होते. बोरीबंदर स्टेशनच्या इमारतीवर असलेले तीन चार घुमट कसे निरनिराळ्या वास्तुशिल्पांच्या शैली दाखवतात ते त्यांनी विशद केले. इंग्लंडमध्ये न सापडणारा भारताचा राष्ट्रीय मयूरपक्षी तिथल्या खिडक्यांवरल्या जाळ्यांमध्ये कोरलेला असल्याचे दाखवले. या इमारतीचे बांधकाम चालले असतांना मध्येच त्याचा आर्किटेक्ट बदलला गेला असावा असा शेरा कोणीतरी मारला. इमारतीच्या मोठ्या कळसावरल्या मूळच्या लाइटनिंग अरेस्टरवर एकदा खरोखरच वीज कोसळल्यामुळे तो नष्ट झाला होता. त्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या खाली असलेल्या पुतळ्यासकट नवा विद्युतनिरोधक तयार करून तिथे बसवला ही माहिती दिली. त्या चौकामधून मी हजारो वेळा गेलेलो असूनसुध्दा त्या इमारतीच्या शिखरावर एक बाई हातात विजेच्या तारा घेऊन उभी आहे हे यापूर्वी माझ्या ध्यानात आले नव्हते.
आमचा दहा पंधरा जणांचा घोळका तिथून निघून गजगतीने हुतात्मा चौकाच्या दिशेने चालत राहिला. रविवार असल्यामुळे रस्त्यात फारशी वाहतूक नव्हती. फुटपाथ तर ओस पडले होते, पण त्यावरून चाललो असतो तर आजूबाजूच्या इमारती दिसल्या नसत्या आणि 'हेरिटेज वॉक'चा उद्देश सफळ झाला नसता. त्यामुळे आम्ही रस्त्याचा थोडा भाग अडवून त्यावरूनच चालत राहिलो. आमची संख्या आणखी मोठी असती तर तो कदाचित एकादा मोर्चा वाटलाही असता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या प्रत्येक इमारतीचे नाव, त्याचा मूळ मालक कोण होता, ती इमारत कधी आणि कशासाठी बांधली गेली होती, त्या काळात कोणत्या कामासाठी तिचा उपयोग केला जात असे, आता तिथे काय चालते वगैरे इत्थंभूत माहिती रामदास सांगत होते आणि माझ्यासह काही लोक श्रवणभक्ती करत होते. काही लोक तत्परतेने त्या इमारतींचे किंवा त्यात दाखवलेल्या वैशिष्ट्यांचे सटासट फोटो घेत होते. काही जणांनी आपापले उपगट बनवून वेगळ्या चर्चा चालवल्या होत्या. काही मिनिटांच्या चालण्यानंतर आम्ही हुतात्मा चौकात येऊन पोचलो. चर्चगेटकडून आलेला प्रवाह आमच्या प्रवाहात मिसळला. पुढला वृत्तांत आदीने त्याच्या खुसखुशीत शैलीमध्ये दिला आहेच.
मिपावर रोजच्या रोज अक्षरे, विरामचिन्हे, स्मितके आणि छायाचित्रे यांचा जो मुसळधार पाऊस पडतांना दिसतो तो पाडणारे कोण आहेत याची मला उत्सुकता वाटते. त्यातल्या काही मुंबईकर लोकांना पहायला मिळावे एवढी माझी माफक इच्छा होती ती सफळ झाली. ही मंडळी याहून जास्त संख्येने येतील अशी माझी अपेक्षा होती, तसे झाले नाही, ते का झाले नाही याच्या कारणांच्या गवताचा ढीग झालेला आहेच. 'चालताफिरता कट्टा' म्हणजे काय असतो हे पाहण्याची उत्सुकता होती. सर्वांबरोबर घोळक्यात चालतांना मला मजा आली, माझ्या ज्ञानात भर पडली, पण तो 'कट्टा' वाटला नाही. अर्थातच हा अनुभव प्रातिनिधिक नसणार. इतर वेळी याहून वेगळा अनुभव येत असेल. मी पहिल्यांदाच मिपाच्या कट्ट्यावर गेलो असल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. आता पुढच्या कट्ट्याला बोलावले तर यायचे असे मी ठरवले आहे.
याद्या
4235
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहा!
पुरवणी छान !! पण फोटो??
घारे काका, अप्रतिम पुरवणी.
आणि लोगो ओळखण्याचे ते कोडे
पुरवणी सुद्धा आवडली.
खुसखुशीत लेखाची पुरवणी
मी पण आलो होतो.. काही पुणे करांसह पण....
चौरा
In reply to मी पण आलो होतो.. काही पुणे करांसह पण.... by चौकटराजा
हशा आणि टाळ्या!!
In reply to मी पण आलो होतो.. काही पुणे करांसह पण.... by चौकटराजा
वा वा चौरीचौरा!!! एकच नंबर
In reply to मी पण आलो होतो.. काही पुणे करांसह पण.... by चौकटराजा
मस्त!
हे काही सीएसटी वाल्यांचे फोटु
छान छान
In reply to हे काही सीएसटी वाल्यांचे फोटु by नानबा
आनंदकाका आणि प्रथम, आम्ही
मस्त.
आनुमोदन
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लिहिलं आहे घारेकाका.
वा! हा वृत्तांतही आवडला.
+१
In reply to वा! हा वृत्तांतही आवडला. by रेवती
थँक यू
मस्त!!! फोटो तर खल्लास छान.
जबरदस्त...