Skip to main content

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- (राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.) संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43470
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

सापेक्षतावादाचा सिद्धांत - एक थोतांड हा बाप्पा जरब यांनी टंकलिखित केलेला ग्रंथ विक्रीस सिद्ध झाल्याचे समजते. काय असावें बरे या ग्रंथात ?

काही व्यक्तिमत्वे इतकी अजस्त्र असतात की पिढ्यानपिढ्या प्रयत्न करूनही त्यांना जातींच्या / धर्मांच्या बंधनात अडकवणे कोणालाच शक्य होत नाही. अशा व्यक्तीमत्वांचा वापर एखाद्या जातीच्या किंवा धर्माच्या द्वेषासाठी करणाऱ्यांचे हेतू काय असावेत हे समजण्यासाठी फार विद्वान असण्याची आवश्यकता नाही. शिवाजी महाराज हे एकटेच नाहीत. या देशात होऊन गेलेल्या जवळपास प्रत्येकच महान व्यक्तीविषयी असेच वाद होत आले आहेत. जिथे प्रत्येक जात आणि धर्म असुरक्षिततेच्या गंडाने पछाडले गेले आहेत तिथे असले वाद होणे हे साहजिकच आहे. ऐतिहासिक गोष्टींवरून वाद घालण्यात एक मोठा फायदा हा असतो की सगळ्या चुकांचे खापर इतिहासावर फोडून सर्वच जाती-धर्मांना वर्तमानात नामानिराळे राहण्याची सोय असते. उद्या जर खरोखरच ऐतिहासिक वाद संपुष्टात आले तर एक देश / समाज म्हणून एकत्र राहायचे तरी कसे असा गहन प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकेल. सर्वांना एकाच ताटात जेवायचे असेल तर निदान थोडा वाटा तरी इतरांसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे ही जाणीवच अजून जिथे नाही तिथे इतरांचा वाट्यावरचा हक्क हिरावून घेण्यासाठी इतिहासाचे दाखले परस्परांना देत बसणे हे कृत्य समर्थनीय नसले तरी समजून घेण्यासारखे आहे. इतिहास हा वर्तमानाला आधार देण्यापुरताच असावा. जेव्हा इतिहासाची छाया वर्तमानावर पडते तेव्हा वर्तमानाची वाढ खुरटते आणि अशा वर्तमानातून उज्वल भविष्य सोडून बाकी सारे काही निर्माण होऊ शकते. हे "बाकी सारे काही" निर्माण करण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घ्यायला साहजिकच कोणीही उत्सुक नसतात. तेव्हा भविष्यातील पिढ्यांनी एकमेकांना दूषणे देण्यासाठी आपला वापर करू नये अशी वर्तमान पिढ्यांची इच्छा असेल तर त्यांनी सर्वप्रथम वर्तमानात जगणे आत्मसात करणे गरजेचे आहे. खाच-खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जातांना मागे नजर ठेवून पुढे जाणाऱ्यांचे काय होऊ शकते ह्याचे भान असणे आवश्यक आहे.

>>>परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. वा ! वा ! गप्पा टप्पा व्हायलाच हव्या. विचारांची देवाण घेवाण होते त्यामधूनच. :) >>>त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. आमचेही काही मित्र आम्हाला नि:संदिग्धपणे काही बाबी सांगत असतात ब्वा ! :) >>>त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. असेल ब्वा ! आता काय आहे की कुणीही आज हयात असलेला तेव्हा जन्मला नव्हता. आणि इतिहासाचे एक असते प्रत्येकाला आपले मत मांडता येते. तेव्हा हे सुद्धा एक मत आहे असे आपण मानायला हरकत काही दिसत नाही. >>गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. काय सांगता? आम्ही तर असेही ऐकले आहे की गागाभट्टांना सुद्धा राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. त्यांनी केले होते ते राज्याभिषेक. जेव्हा त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर शिवाजीची भेट घेतली तेव्हा शिवाजी राजा नव्हता. शिवाजीचे राज्य नव्हते. जेव्हा राज्य असते तेव्हा राज्यावर कुणी आला तर राज्याभिषेक होतो. राज्य अस्तित्वात असते त्यावर राजा येतो. पण इथे राज्यच अस्तित्वात नाही. म्हणून मग राजा बनवला गेला. राजा बनल्यावर त्याने त्याचे राज्य अस्तित्वात आल्याचे जाहिर केले. तेव्हा ते राज्य अस्तित्वात आले. ही गागाभट्टांनी मांडलेली भुमिका त्यांनीच लिहिलेल्या राजाभिषेकविधी या पुस्तकात आहे. संस्कृतात आहे बर का ते. आणि त्यासाठी त्यांनी पूर्वापारचे जे काही राज्यारोहणासंदर्भातील विधी आहेत त्यांचा अभ्यास करुन मग राजाभिषेक विधी तयार केला होता. संपूर्ण भारताच्या ज्ञात इतिहासात हे केवळ एकमेव उदाहरण जिथे राज्य अस्तित्वात आले. बाकी सर्व राज्याभिषेक हे एकतर वंशपरंपरागत किंवा मु़ंडकी कापून :) हो हिंदू राजे पण एकमेकांची मुंडकी कापत अगदी अवरंगजेबाप्रमाणेच ;) आता ही सगळी आमची माहिती सांगोवागी ऐकलेली बरका ! आमचे ज्ञान समज तुटपुंजी हे बरीक खरे हो. >>>अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. तुमचा हा मुद्दा आमच्या दॄष्टीने बाद. >>>असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. अता आम्ही वरच्या मुद्याला आमच्या पध्दतीने मांडल्याने तुमचा हा दावा चुकीचा ठरतो. त्यामुळे काही ब्राह्मणांचा विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असू शकतो किंवा नसु शकतो. इतिहास त्यावर प्रकाश टाकेल. जरी टाकला नाही आणि विरोध असला तरी तो नाकारण्यात आणि बळेच तो विरोध नव्हताच वगैरे भलती तर्कटे रचण्यात काही प्वाईंट नाही असे आमचे प्रामाणिक मत आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की हो जर होता तर आज तुम्ही केवळ त्यावरुन मला गोळ्या घालणार का? कारण मी पण ब्राह्मण आहे. या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर ऐतिहासिक सत्य असे त्या घटनेचे वर्णन करुन शिवाजीचे चांगले गुण आत्मसात करु आणि जर हो असेल तर जे गेली हजारो वर्षे या देशात चालू होते ते अजून काहीशे वर्ष चालेल असे समजू या :) >>ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' :) >>खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. ही आपुलकी का आणि कशासाठी होती याचे नरहर कुरुंदकरांनी अप्रतिम विश्लेषण केले आहे. त्यामधे ब्राह्मण प्रतिपालन नव्हते की मुस्लिम विरोध नव्हता. होता तो व्यवस्थेला कल्याणकारी बनवण्याचा प्रयत्न. आमचे ज्ञान जास्त नाही त्यामुळे जास्त लिहता येत नाही. >>असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. कुठल्याही पुस्तकात असे म्हटले आहे यावर विश्वास ठेऊ नका. केवळ मी सांगितले आहे म्हणून विश्वास ठेऊ नका. तुमच्या बुद्धीला पटेल आणि मान्य होईल त्यावरच विश्वास ठेवा. - गोतम बुध्द. धन्यवाद.

प्रत्येक कंपुचा असा एक काळ असतो. नवा कंपु आल्यावर त्यांना कोणी विचारत नाही.

शिवाजीमहाराजांचे अमात्य रामचंद्रपंत [बावडेकर] यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र या पुस्तीकेमागील प्रेरणा १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या आणि पंचतंत्रावर आधारित एका नीतीशास्त्रीय ग्रंथात सापडते असं एक विधान मी अंतर्जालावर कुठे तरी वाचलं होतं पण आता ते उपलब्ध दिसत नाही. कोणास या विषयावर अधिक माहिती असेल तर कृपया ती द्यावी ही विनंती.

खूपच सुंदर व माहितीपूर्ण धागा! अनेकांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण आहेत. सद्यस्थितीत हा धागा वर येणे खूपच आवश्यक आहे.