✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

स
सृष्टीलावण्या यांनी
गुरुवार, 01/31/2013 - 08:25  ·  लेख
लेख
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- (राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.) संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
42648 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

त्या त्रुटी हि नाहीत...त्या गाढवचुका आहेत

मालोजीराव
Sun, 02/03/2013 - 01:25 नवीन
वल्ली त्या त्रुटी हि नाहीत आणि घोडचुका हि नाहीत...त्या गाढवचुका आहेत.शिवाजी महाराज-अफजलखान प्रकरणात शिवाजी राजांना खुनी ठरवणे ,शिवाजी महाराज आणि मराठे लुटारू होते असा निष्कर्ष काढणे या काही ठळक गाढवचुका होत. बाकी सर जदुनाथ सरकार वर्ल्ड क्लास इतिहासकार होते यावर दुमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दुसर्‍या दुव्यात

विकास
गुरुवार, 01/31/2013 - 21:23 नवीन
शिवाजीने रामदासांकडून पण सल्ला घेतला होता असे म्हणलेले दिसले. हे पहील्यांदाच ऐकले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सल्ल्याचं म्हैती नै पण आशिर्वाद घेतल्याचे सर जदूनाथ म्हणतात:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/31/2013 - 23:27 नवीन
सर जदूनाथ लिहितात काढा 'शिवाजी अ‍ॅन्ड हिज टाइम' पान नंबर २०२. ''जैसा की अंग्रेज राजदूत हेनरी ऑक्सिनडन ने कुछ व्यथापूर्वक लिखा है कि प्रतिदिन धार्मिक संस्कार और ब्राह्मनओ से परामर्श के पश्चात शिवाजी को अन्य कार्यो की देखभाल के लिए समय नही मिल पाता था | शिवाजी ने सर्वप्रथम अपने गुरु रामदास स्वामी और अपनी माता जिजाबाई की वन्दना की और उनके आशिर्वाद प्राप्त किये'' -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आणि पुढे तर he touched feet

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/01/2013 - 13:13 नवीन
आणि पुढे तर he touched feet of his mother Jijabai and Teacher Samarth Ramdas असे पण लिहीले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

-

अमोल केळकर
गुरुवार, 01/31/2013 - 10:37 नवीन
नवीन माहिती मिळाली अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments

गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 10:38 नवीन
गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या "शिवाजी-हिज लाईफ अँड टाईम्स" या पुस्तकात आत्ताच राज्याभिषेकाचे प्रकरण पाहिले. त्यात ब्राह्मणांनी विरोध केल्याचे कुठे दिसत नाही. शिवाय गागाभट्टांशी महाराजांचा कमीतकमी १६६४ पासूनचा परिचय होता हे सिद्ध करणारा पुरावाही त्यात दिलेला आहे. त्यामुळे अचानक गागाभट्ट राज्याभिषेक करायला का आले वगैरेचा उलगडा होतो. काही लोकांनी बोंबा मारल्या आणि मग शिवाजीराजांनी घाईघाईत गागाभट्टांना बोलाविले असे नसून जुना जाणता परिचयाचा पंडित म्हणून बोलाविले आहे. राज्याभिषेक १६७४ ऐवजी नंतर किंवा आधी झाला असता तरी तेच आले असते असेही यावरून वाटते. हे झाले अस्सल साधनांच्या आधारे केलेले कथन. मुळात ही विरोधाची कथा कुठल्या बखरीत आलीये ते पाहिले पाहिजे. समजा कुणी विरोध केलाही असेल, पण वर काहींनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी अशा फालतू अडथळ्यांना जुमानणारा पुरुष कधीच नव्हता. प्रत्येक प्रश्नावर तोडगा तयार असे त्यांच्याकडे- हे असले कर्मकांडाचे भंपक अडथळे त्यांना कधीच बांधून ठेवणे शक्य नव्हते.
  • Log in or register to post comments

एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/01/2013 - 09:17 नवीन
शिवाजी अशा फालतू अडथळ्यांना जुमानणारा पुरुष कधीच नव्हता. प्रत्येक प्रश्नावर तोडगा तयार असे त्यांच्याकडे- हे असले कर्मकांडाचे भंपक अडथळे त्यांना कधीच बांधून ठेवणे शक्य नव्हते. राजेंच्या काळात समाजमनावर धर्मशास्त्राचा प्रचंड पगडा होताच. राज्याभिषेकासाठी राजे शिवाजी क्षत्रीय असण गरजेचं होतं. आणि हे क्षत्रीयपण सिद्ध करायला धर्मशास्त्राच्या पुस्तकाचे पठण करणार्‍या विद्वानांची आवश्यकता होती. भोसल्यांचं कूळ क्षत्रीय नव्हतं, शूद्र जातीत जन्मलेला माणूस एवढा अधिकारी कसा होऊ शकतो ही खूळचट कल्पना तत्त्कालीन काळातील विद्वानांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि कर्मकांडाचा नाही म्हटला तरी राजेंवर चांगलाच पगडा दिसून येतो. गागाभट्टच एक असा विद्वान होता की राज्याभिषेकाच्या बाबतीत ब्राह्मण विद्वानांमधे राजे क्षत्रीय असण्याबद्दल एकमत होत नव्हतं. (एकमताचा अर्थ विरोध नव्हता असं म्हणायला इथे वाव आहे) तेव्हा राजे क्षत्रीयच आहे हे तत्त्कालीन पंडितांना ठासून सांगणारा एकमेव विद्वान गागाभट्टच होता. गागाभट्टचा आणि राजेंचा परिचय होताच. गागाभट्ट यांचे गुरुबंधू पैठणचे तेव्हा त्यांचं येणं जाणं इकडे होतंच. पण या गागाभट्टाला खरं पटवलं ते चतूर चिटणीस बाळाजी आवजी (विकिपिडियावर भर घालायची बाकी आहे) यांनीच. भोसल्यांची वंशावळ तयार करुन ते क्षत्रीय कसे आहे हे कागदोपत्री गागाभट्टांसमोर मांडले आणि त्यांनी राजे क्षत्रीय आहेत त्यांची कुळपरंपरा उदयपूरच्या राजपूत कुळामार्गे श्री प्रभूरामचंद्र यांच्या सूर्यवंशी कुळापर्यंत जाते. आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे एकमेव म्हणजे राजे श्री शिवाजी. गागाभट्टांनी क्षत्रीय असल्याची प्राथमिक घोषणा केल्यानंतर त्यांचा सन्मानही करण्यात आला. गागाभट्टांना राज्यभिषेकाला येण्याचं निमंत्रण दिलं गेलं आणि गागाभट्टांनी पुढे राजे कसे क्षत्रीय ठरतात ते येथील विद्वानांना सांगितलं, थोडक्यात येथील विद्वानांना त्यांनी गप्प केलं आणि मग राज्याभिषेकाचा सोहळा पुढे गेला. बखरकाराचं आणि इतिहासकाराचं काही वर्णन वाचून मला मोठी मौज वाटते. भारतातल्या विद्वान ब्राह्मणांना या सोहळ्यास निमंत्रण देऊन बोलावण्यात आलं आणि रायगडावर अकरा हजार ब्राह्मण आपल्या सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला हजर झाले त्याची संख्या तुम्ही म्हणता तशी पन्नास हजाराच्या पुढे गेली. चार महिने विद्वान ब्राह्मणांचा रायगडावर मुक्काम होता काय मिष्ठांन्नाच्या पंगती, द्रव्य, अहाहा. असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भोसल्यांचं कूळ क्षत्रीय

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 11:03 नवीन
भोसल्यांचं कूळ क्षत्रीय नव्हतं, शूद्र जातीत जन्मलेला माणूस एवढा अधिकारी कसा होऊ शकतो ही खूळचट कल्पना तत्त्कालीन काळातील विद्वानांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि कर्मकांडाचा नाही म्हटला तरी राजेंवर चांगलाच पगडा दिसून येतो.
मुळात माझा मुद्दा असा आहे, की निव्वळ काही पंडित म्हणतात म्हणून महाराजांनी राज्याभिषेक केलेला नाही. पंडितमन्य धर्माविरुद्ध जाऊन आपले म्हणणे त्यांनी खरे केलेले आहे, उदा. त्या काळात धर्मांतर म्हणजेच अब्रह्मण्यम् असूनही त्यांनी धर्मांतर करून घेतलेच ना नेतोजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांचे! आता सभासद बखर वाचावी लागेल, पण प्रस्थापित मुखंड मराठा घराण्यांचे तोंड बंद करण्यासाठीच त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला असण्याची शक्यता जास्त वाटते.
बखरकाराचं आणि इतिहासकाराचं काही वर्णन वाचून मला मोठी मौज वाटते. भारतातल्या विद्वान ब्राह्मणांना या सोहळ्यास निमंत्रण देऊन बोलावण्यात आलं आणि रायगडावर अकरा हजार ब्राह्मण आपल्या सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला हजर झाले त्याची संख्या तुम्ही म्हणता तशी पन्नास हजाराच्या पुढे गेली. चार महिने विद्वान ब्राह्मणांचा रायगडावर मुक्काम होता काय मिष्ठांन्नाच्या पंगती, द्रव्य, अहाहा. असो.
लै लोक आले होते इथपर्यंत ठीक आहे, पण रायगडाचा साईझ पाहता पन्नास हआर लोक, तेसुद्धा ४ महिने राहणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरा असाही विचार करुन बघा....

योगप्रभू
Fri, 02/01/2013 - 12:46 नवीन
क्षत्रियत्वाच्या किंवा खानदानीपणाच्या मुद्यावरुन भोसले कुळाला कमी लेखण्याचा उगम कुठून सुरु झाला, याचाही एकदा विचार झाला पाहिजे. देशमुख पाटलांना आपल्याहून हलके समजतात, हे अगदी आजही दिसून येते. वेरुळची पाटीलकी मिळाल्यानंतरही बाबाजी पाटील यांच्या वारसांना हाच अनुभव आला. मालोजीराजांच्या पराक्रमावर खूश होऊन निंबाळकरांनी आपखुशीने मालोजीराजे भोसलेंशी सोयरीक केली तरी इतर देशमुखांनी मात्र भोसले घराण्याशी अढी ठेऊन वागण्याचे सोडलेले नव्हते.शहाजीराजेंची सोयरीक जाधवांशी जमवताना भोसल्यांना पुष्कळ त्रास झाला होता आणि अखेर आपल्या सरदारांत दुही माजू नये म्हणून अहमदनगरच्या निजामशहाने आणि त्याच्या दरबारातील मुत्सद्द्यांनी राजकीय गरजेपोटी त्यांचे मनोमीलन घडवले. मात्र पुढे दोन्ही घराण्यातील वैराग्नी उफाळून आलाच. त्याचे पडसाद शिवाजीराजेंच्या काळापर्यंत सुरु होते. भोसल्यांच्या पराक्रमाचा सूर्य तळपत असताना जाधवांनी बादशहाची चाकरी करणे पसंत केले. जातीच्या या हेव्यादाव्याला कंटाळून शहाजीराजेंनी बंगळुरु हे कायम वास्तव्याचे ठिकाण म्हणून पसंत केले. पुणे-सुपे जहागीर हक्काची असतानाही शहाजीराजे महाराष्ट्रात क्वचित आले. याचे कारण कधी तरी शांतपणे समजून घेतले पाहिजे. जो अनुभव शहाजीराजेंना, तोच शिवाजीराजांना आला. गावोगावचे देशमुख-इनामदार शिवाजीराजांना मानायला तयारच नव्हते. जावळीच्या मोर्‍यांनी शिवाजीराजांचा अपमान करताना 'तुम्ही काल राजे झाला आहात. स्वतःला राजे म्हणवून घेतल्याने कुणी राजा होत नसतो. आमचे तसे नाही. आम्ही पिढ्यानपिढ्याचे राजे आहोत.' अशा शब्दांत त्यांना दुय्यम लेखले. शिवाजीराजांनी आपल्या हयातीत हा उच्च-नीचपणाचा वाद मिटवण्याची शर्थ केली. कधी धाक दाखवून, कधी गोडीगुलाबीने मन वळवून तर कधी घरच्या सोयरीकी करुन त्यांनी 'मराठा तितुका मेळवावा' धोरण चालवले, पण त्याला यश आले नाही म्हणूनच अनेक मराठा घराणी आदिलशहापासून मोगलांपर्यंत महाराजांच्या विरोधात लढत राहिली. इतपर्यंत तर ब्राह्मण विद्वानांच्या आगावपणाचा संबंधही नव्हता. स्वतःचा पराक्रम सिद्ध करुनही महाराजांना राज्याभिषेकाची तीव्र गरज का भासत होती? शिवाजीसारखा व्यवहारी राजकारणी मुघल-रजपुतांसारखा डामडौलापोटी कोट्यवधी होनांची उधळपट्टी करणारा होता का? त्याचे कारण म्हणजे महाराजांच्या एक गोष्ट पक्की लक्षात आली होती, की भोसल्यांचे नेतृत्व मराठे आणि रजपुतांनी मानायचे असेल तर त्यांना अभिषिक्त राजा होण्यावाचून पर्यायच नव्हता. पुन्हा हा अभिषेक काशीच्या ब्राह्मणांनी केल्यास एकाचवेळी सगळ्यांचीच तोंडे बंद होणार होती. ब्राह्मणाला शिक्षा सुनावण्याचा अधिकार अभिषिक्त राजाला असतो. म्हणजे राज्याभिषेकाच्या एकाच कृतीमुळे शिवाजीराजे ब्राह्मण वतनदार, देशमुख मराठा व रजपूत अशा आपले नेतृत्व मानण्यास खळखळ करणार्‍या उच्चवर्णियांना स्वतःच्या हुकुमाखाली आणू पाहात होते. लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे याला ब्राह्मणांचीही संमती होती कारण असे होणे, हेच हिंदूधर्माच्या रक्षणासाठी काळाची गरज होती. रामदास-मोरोपंत पिंगळे-अनंतभट्ट कावळे व गागाभट्ट या ब्राह्मणांच्या भूमिकांकडे त्यासाठीच पाहिले पाहिजे. शिवाजीराजांना ब्राह्मण शूद्र समजत होते, असा गलका केला जातो. राज्याभिषेकाच्या निमित्ताने हा मुद्दा मांडला जातो. एखाद्या गोष्टीचे स्वतःला हवे तसे इंटरप्रिटेशन कसे करावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शिवाजीराजांना राज्याभिषेक करायचा, अशी कल्पना गागाभट्टाने मांडल्यानंतर ब्राह्मणांनी धर्मशास्त्रातील शंका उपस्थित केली होती. त्याकाळी मुंजीचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना होता. राजांची मुंज झालेली नव्हती. उपनयन संस्कार झाला नसेल तर ब्राह्मणाचे पोरही शूद्रच ठरते, असल्या समजुतींचा तो काळ. त्यामुळे जर शिवाजीराजांवर हा संस्कार झाला नाही तर त्यांना क्षत्रिय मानायचे कसे? राज्याभिषेक करायचा कसा? पुढे जाऊन राज्याभिषेकात राजाचा विवाह पुन्हा एकदा राणीशी लावला जातो. मुंज झालेली नसताना सोडमुंज करायची कशी? अशा शंका ब्राह्मणांनी गागाभट्टांना विचारल्या. गागाभट्ट हे 'वेदोनारायण' होते. त्यांनी ब्राह्मणांच्या शंकांचे धर्मशास्त्राच्या आधारेच निरसन केले. राजांचे कुळ शिसोदिया रजपुतांपर्यंत जाते आणि लग्नात मुंज-सोडमुंज एकाचवेळी करता येते, असा पर्याय असल्याने राज्याभिषेकात काहीही धार्मिक त्रुटी नाहीत, हे गागाभट्टाने पटवून दिले. बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेतानाही असाच खल झाला होता, परंतु धर्मशास्त्रात शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताचा पर्याय असल्याचे एका ब्राह्मणाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जास्त खल केला नाही. एक चांगला पायंडा पडला, ज्याचा फायदा पुढे नेताजी पालकरांच्या वेळी झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा राजाला राज्याभिषेक होतो आणि तो छत्रपती होतो त्यावेळी असे प्रायश्चित्त देऊन सदर व्यक्तीला धर्मात घ्यावे, अशी आज्ञा तो देऊ शकतो. त्यासाठी धर्मशास्त्राची संमती घेण्याची गरज नसते. या अधिकाराचा वापर शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला आहे. एका बाटलेल्या ब्राह्मणाला प्रायश्चित्त देऊन स्वधर्मात घेण्यासाठी त्यांनी राजाज्ञा काढली होती व त्यानुसार घडलेही. तत्कालीन समाज हा रुढी-परंपरा-धर्मशास्त्र-उच्च नीचता-सामाजिक चालीरीती यांना मानूनच चालत होता. शिवाजीराजे काय किंवा तेव्हाचा ब्राह्मण समाज काय, सगळे या मर्यादित परीघातच जगून गेले आणि त्यांनी जमेल तितक्या, जमेल तिथे सुधारणाही घडवल्या आहेत. चुकाही बर्‍याच झाल्या आहेत, पण मागच्या चुकांमधून शिकत पुढे जाण्याचा हा प्रवासही दुर्लक्षता येणार नाही. त्यामुळे ब्राह्मण विद्वानांवर भलत्याच बाबतीत जाळ काढणेही अप्रस्तुत ठरावे. विज्ञानाने डोळे उघडल्याने आपल्या पिढीला तर्कनिष्ठ विश्लेषणाचे शिस्तबद्ध शिक्षण मिळाले असले तरी आपण आजच्या काळाच्या कसोटीवर इतिहासातील घटना घासून बघणे अनुचित असते, इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

आजानुकर्ण
Fri, 02/01/2013 - 22:15 नवीन
सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

योगप्रभूजि खुप छान विचार

अधिराज
Fri, 02/01/2013 - 22:16 नवीन
योगप्रभूजि खुप छान विचार मांडले हायेत तुम्ही, तेही कोणत्या एका बाजूची टीमकी न वाजवता. तुमचा इथला प्रतिसाद म्हंजे चिख्लात उगव्ल्यालं कमळ च जणू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सुंदर प्रतिसाद. यातल बरचस मी

स्पंदना
Sat, 02/02/2013 - 07:52 नवीन
सुंदर प्रतिसाद. यातल बरचस मी वाचलय. मुख्य म्हणजे जाधव घराण हे माझ्या माहेरचं. त्यामुळे बराचसा घराण्याचा इतिहास हेळव्यांकडे ऐकला आहे. हो हे खर आहे की जाधवांनी कायम कधी आदिलशहा, कधी बादशहा यांचीच चाकरी केली. जिजाउंच्या एकटं पडण्याचे कारण हे घराण्याचे एकमेकाला खाली दाखवण्याचे प्रकारच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मान गये प्रभूजी

किसन शिंदे
Sat, 02/02/2013 - 08:46 नवीन
व्वा!! काय सुंदर प्रतिसाद दिलाय.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

जबरदस्त प्रतिसाद!

फारएन्ड
Sat, 02/02/2013 - 13:09 नवीन
कोणत्याही काळात एवढ्या मोठ्या गोष्टींभवती क्लिष्ट राजकारण असतेच. राज्याभिषेकाबद्दल ते येथे खूप चांगले उलगडून दाखवलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

कै च्या कै....विचार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/03/2013 - 08:59 नवीन
आपल्या सोयीनं आपला विचार कसा गोलगोल लिहुन रेटता येतो त्याचा उत्तम नमुना म्हणजे वरील प्रतिसाद. 'शिवाजीराजांना ब्राह्मण शूद्रच समजत होते' हे सोडून महाराजांवर उपनयन संस्कार केल्यामुळे क्षत्रीय समजले जाणार होते हे वाक्य वाचून तर माझी खूपच करमणूक झाली. उपनयन संस्कार करुन एखादा 'शूद्र' 'क्षत्रीय' ठरला मला वाटतं जगाच्या इतिहासातले एकमेव उदाहरण असेल असे म्हणायला हरकत नसावी. आमच्याकडे वर्ण व्यवस्थेने ज्यांना 'शूद्र' ठरवले त्यांच्यावर उपनयन संस्कार करुन समस्त नागरिकांना योग्य त्या दरात योग्य त्या वर्णात प्रवेश दिल्या जाईल, अशा जाहिराती तेव्हा दिसल्या असत्या. असो. गागाभट्टाने राजांना राज्यभिषेकाची कल्पना सूचवली हे वाचून तर काय बोलावे काही समजत नाही. मल्हारराव चिटणीस श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकराणात्मक चरित्रात लिहितात. [काही तरी संदर्भ असावा म्हणून लिहितो] ''राज्य करण्यास अंगे सात. राजा व प्रधान, राष्ट्र, दुर्ग व कोशबल, सुर्हुद्रूल, व सेना ही सात अंगे तशी सिद्ध झाली'' तेव्हा राजे शिवाजींनीच आपलं मनोगत आपल्या आईजवळ व्यक्त केलं. नंतर आईने आशिर्वाद दिला. रामदासांकडे तसा निरोप पाठविला. ''सर्व राज्यातील मोठे पंडित, विद्वान बोलावून व शिबिकादि याने पाठवून आणिले. सर्व सरकारकून व सरदार जमा केले. आप्त-सृह्त्त्संबंधी, इष्टमित्र यांस आणून, सभा करुन आपले मनोगत '' या उपरि या अन्वयें. छत्रसिंहासन करावे ऐंसे आहे, याचा विचार कसा करावा ?'' म्हणून स्वतः प्रश्न केला आणि सर्वांचे अनुमोदन घेतले. ''राज्यभिषेक करावा' ऐसे सिद्ध झाले. आणि मग पुढे काय घडले ते पूर्वीच्या प्रतिसादात मी लिहिले आहेच. ''तत्कालीन समाज हा रुढी-परंपरा-धर्मशास्त्र-उच्च नीचता-सामाजिक चालीरीती यांना मानूनच चालत होता'' इतकेच वाक्य एवढ्या प्रतिसादातील पटण्यासारखे आहे. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

विचार स्वीकारण्याचा आग्रह नाही...

योगप्रभू
Sun, 02/03/2013 - 13:16 नवीन
कुणावर आपले विचार लादण्यासाठी किंवा विशिष्ट अजेंडा रेटण्यासाठी मी या संस्थळावर येत नाही कारण मुळात मीच आजवर माझ्यावर विशिष्ट विचार लादून घेतलेले नाहीत. कुठल्याही कंपू आणि कळपात सामील न होण्याचे दुष्परिणाम सहन केले आहेत त्यामुळे 'आपल्या सोयीने' किंवा 'विचार रेटणे' हे शब्दप्रयोग मी माझ्याकडून नाकारतो. इतरांना काहीही म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे. असो. केवळ इतकेच सांगावेसे वाटते, की इतिहास, बखरी, संदर्भसाधने मी लिहिलेली नाहीत आणि त्यावर अभ्यासपूर्ण लिहिण्याइतकी कुरुंदकर परंपरेची पात्रताही माझ्या अंगी नाही. शेकोटीला चारजण जमतात, शिळोप्याच्या गप्पा होतात, 'कुछ अपनी सुनाओ, कुछ मेरी सुनो', इतकेच माफक महत्त्व माझ्यालेखी. जे विचार करमणूक करणारे असतात, ते गांभीर्याने घ्यायचे नसतातच. :) इतरांना चालू देत. मी मात्र थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी,

मालोजीराव
Mon, 02/04/2013 - 12:17 नवीन
सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी, जावळीच्या मोर्यांचे उदाहरण हेच सांगते कि प्रस्थापित वतनदार सुरवातीच्या काळात शिवरायांना जुमानत नव्हते, अफझलखानवधा नंतरच सगळ्या वतनदारांच्या मनात शिवरायांविषयी विश्वासाची भावना निर्माण झाली.
बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेतानाही असाच खल झाला होता, परंतु धर्मशास्त्रात शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताचा पर्याय असल्याचे एका ब्राह्मणाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जास्त खल केला नाही. एक चांगला पायंडा पडला, ज्याचा फायदा पुढे नेताजी पालकरांच्या वेळी झाला.
हा निर्णय सर्वस्वी शिवछत्रपतींनी घेतला त्यासाठी आधीच्या कोणत्याही घटनेचा दाखला घेण्याची गरज पडली नसावी.बजाजीराजे नाईक-निंबाळकर यांना स्वधर्मात घेतलेच नव्हते, कारण त्यांचे कधी धर्मांतर झालेच नव्हते.हि दंतकथा आहे त्यामुळे या कथेचा ऐतिहासिक संदर्भ म्हणून दाखला देणे उचित वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

राजे! मी लक्षात ठेवीन.

योगप्रभू
Mon, 02/04/2013 - 13:08 नवीन
बजाजीराजेंना धर्मात घेतल्याचा प्रसंग हा दंतकथा आहे, हे मी यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

क्या बात है sir जी..

योगेश कोलेश्वर
Mon, 01/03/2022 - 17:05 नवीन
क्या बात है sir जी...वस्तुनिष्ठ विश्लेषण...अप्रतिम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

हम्म

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/31/2013 - 10:47 नवीन
प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब... ओक्के !
  • Log in or register to post comments

हो

सृष्टीलावण्या
गुरुवार, 01/31/2013 - 12:29 नवीन
मला इतिहास तज्ज्ञ न म्हणता केवळ इतिहास संकलक म्हणा असेच श्री. अप्पा परब ह्यांचे म्हणणे आहे. मला त्यात विनयशीलता जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शिवाजी महाराजांना कुणी विरोध

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/31/2013 - 11:47 नवीन
शिवाजी महाराजांना कुणी विरोध केला, महाराजांनी कुणाला विरोध केला.. आता कोणं कुणाला विरोध करतय ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही.. मला महाराजांविषयी नितांत आदर आहे.. आणि माझ्या मुलाला एकवेळ "देव" म्हणजे काय हे माहिती नसेल पण महाराज नक्की माहिती असतील...
  • Log in or register to post comments

"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक

गवि
गुरुवार, 01/31/2013 - 12:25 नवीन
"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक बोभाट झालियाउपरी , नित्यवादांस कारण धागा आणिक प्रतिसाद ऐसे जाणोन वाचनमात्र नतीजा पावेल..." अशी शंका का बरे येत आहे?
  • Log in or register to post comments

खरे आहे...

सृष्टीलावण्या
गुरुवार, 01/31/2013 - 12:46 नवीन
वाचनमात्र नतीजा पावेल...
काही प्रतिसाद 'वाचा आणि विसरा' ह्याच प्रकारात मोडत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मार्मिक प्रतिसादु!! ऐसेचि

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 12:53 नवीन
मार्मिक प्रतिसादु!! ऐसेचि म्हणितो. ट्रोलावळीचा पुंडावा खंडेल ते करणे, बहुत काय लिहिणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 01/31/2013 - 12:30 नवीन
ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला विरोध केला होता. कारण ब्राह्मणी धर्मानुसार क्षत्रिय अस्तित्वात नाहित, अशी कंडी ब्राह्मण पिकवत होते .असाच विरोध शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात केला गेला. परब सायेबांचा इतिहासाचा नको तेवढा जास्त अभ्यास झालेला असावा. :-P
  • Log in or register to post comments

वेदोक्त प्रकरणाला भक्कम

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 12:38 नवीन
वेदोक्त प्रकरणाला भक्कम पुरावा आहे तसा शिवाजी महाराजांना विरोध केल्याचा अस्सल पुरावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ब्याटिंग मॅनास हणुमोदण्ण...!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 13:16 नवीन
ब्याटिंग मॅनास हणुमोदण्ण...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

मालोजीराव
Fri, 02/01/2013 - 10:53 नवीन
वेल ब्याटिंग रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 01/31/2013 - 13:39 नवीन
बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला विरोध केला हे सर्वश्रुत आहे, फक्त पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करावी असाच चर्चेचा सुर दिसतोय. चालुद्या
  • Log in or register to post comments

तुमची विधाने कुठल्या

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 13:55 नवीन
तुमची विधाने कुठल्या पुराव्यावर आधारित आहेत ते सांगा आधी. बाकी बकवास बाजूला राहूदे. कुठले तरी विधान वदवून घेण्याचा बालिश अट्टाहास स्पष्टच दिसतोय वरती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

कै च्या कै बरळून झाल्यावर

आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 22:10 नवीन
कै च्या कै बरळून झाल्यावर पुरावे मागितले कि लोक्स "चालुद्या" म्हणून पळून जातात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हसू की रडू कळत नाहीये

पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 14:18 नवीन
शिवाजी महाराज महाराष्ट्रात होऊन गेले हीच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो. महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
गुरुवार, 01/31/2013 - 14:20 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!
प्रचंड बाडीस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पण

सृष्टीलावण्या
गुरुवार, 01/31/2013 - 14:33 नवीन
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते. महाराजांनी सोन्याच्या नांगराऐवजी लाकडी नांगर चालवला असता तरी 'काही फरक पडला' नसता पण जनमानसाला प्रेरित करण्यासाठी काही वेळा काही पावले उचलणे आवश्यक असते. स्वतः लिएँडर पेसने म्हटले आहे की एकदा हरत असताना त्याला एक प्रेक्षक तिरंगा फिरवताना दिसला आणि त्याचा आत्मविश्वास जागा झाला. असो. राजांना अभिषेक, सम्राट्पद मिळावे की नाही हा लेखाचा विषय नसून जातीद्वेष्ट्या खोडसाळ प्रचाराला उत्तर देणे हा मुख्य हेतु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काही अंशी सहमत

पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 18:04 नवीन
काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते.
याच्याशी सहमत आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला. महाराजांच्या सैन्यात फक्त सर्व जातींचेच नव्हे तर मुस्लिम धर्माचे सरदार सुद्धा मोठ्या पदांवर होते. माणसे पारखताना महाराजांनी जातधर्म काही पाहिला नाही आणि कार्यसिद्धीसाठी कोणत्याही विरोधाची तमा बाळगली नाही. अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

+१०,०००

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/31/2013 - 21:05 नवीन
अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे. +१०,०००... कारण लाखमोलाचा विचार ! इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया दोन्ही ठिकाणी +१००,०००...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/31/2013 - 21:13 नवीन
गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया वरील दोन्ही ठिकाणी "+१००,०००" असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शिवाजी महाराजांनी स्वतःच्या

प्रचेतस
गुरुवार, 01/31/2013 - 23:34 नवीन
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला.
ही सोन्याच्या अथवा गाढवाच्या नांगराने जमीन नांगरायची प्रथा फार प्राचीन आहे आणि तिचा संबंध गधेगाळ आणि अश्वमेध ह्या दोन प्राचीन प्रथांशी आहे. कलिगाधिप खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखात ' खारवेला हा दुष्ट राजाची बाजारपेठ गाढवाच्या 'पृथुल' नांगराने नांगरतो असे लिहिले आहे. हा सुमारे २२०० वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. मेडे च अवराजनिवेसिंत पीथुड गदभनंगलेन कासयति! पृथ्वी हे मातेचे रूप आणि गधेगाळीतील गाढव हे गर्दभ नांगराचे रूप. एकंदरीत अमंगलाचे, अप्रतिष्ठतेचे आणि मानहानीचेही प्रतिक. याउलट सूर्य हे सोन्याचे प्रतिक. सूर्याला वेदांमध्ये हिरण्यगर्भ असे म्हणले गेले आहे. अश्वमेधात मृत अश्वाला सोन्याच्या चकतीवर ठेवले जाते. एकंदरीत सोने हे मांगल्यतेचे प्रतिक. तेव्हा गाढवाच्या नांगराने अपवित्र झालेली जमीन सोन्याच्या नांगराने नांगरणे म्हणजे तिचा अधम पुरुषाशी झालेला अपवित्र संयोगाचा परीणाम पुसून काढण्यासाठी तिचा पुन्हा दिव्यत्वाशी संबंध येऊ देणे पर्यायाने अपवित्र झालेल्या पृथ्वीला परत पवित्र करणे हा उद्देश. एकंदरीत आदीलशाही सरदार मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त करून गाढवाच्या नांगराने भूमी नांगरली होती. तीच जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून शिवाजीराजांनी तिला पुन्हा आपलेसे करून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

राज्याभिषेकाची गरज

सुनील
गुरुवार, 01/31/2013 - 18:22 नवीन
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही
असे आज म्हणता येते. पण तत्कालीन सामन्य जनतेसाठी आपल्या स्थावर मालमत्तेवर "अधिकृत" राजसत्तेची मोहोर असावी असे वाटणे स्वाभाविक होते. आणि महाराजांचा राज्याभिषेक त्या सामान्य जनतेला विश्वास देण्यासाठी होता. त्याची गरज होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्र.....चं...........ड..........स......ह........म.........त

बाळकराम
Sun, 02/03/2013 - 02:06 नवीन
असले निरर्थक वाद कशाला काढत बसायचं म्हणतो मी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते नसते तर आज आपण सगळे

काळा पहाड
Sun, 02/03/2013 - 21:48 नवीन
ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो.
कवी भूषण ची वाक्ये अशी आहेतः चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि । सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

महाराज साहेब आणि

मालोजीराव
गुरुवार, 01/31/2013 - 14:28 नवीन
महाराज साहेब आणि विश्वेश्वरभट्ट (गागाभट्ट) यांचा स्नेह बराच जुना आहे.याला कारण महाराजा शहाजी महाराज असावेत, शहाजीराजेंचा बंगळुरात सुमारे ६० पंडितांचा दरबार भरत असे.त्यातील काही पंडित हे स्थायी तर काही निमंत्रित असत.वेदशास्त्र चर्चा, संस्कृत कोडी,पुराणावर उहापोह,वाद-विवाद हि या दरबारात होत असे.गागाभट्ट यांचे वडील दिनकरभट्ट आणि काका कमलाकर हि या दरबाराचे निमंत्रित, शहाजीराजे बंग्ळूरास असताना त्यांनी शिवाजी महाराजांना शिक्षणासाठी बंग्ळूरास बोलावून घेतले होते.हि ओळख कदाचित तेव्हाची असू शकते.
  • Log in or register to post comments

माहितीत भर...

योगप्रभू
गुरुवार, 01/31/2013 - 15:49 नवीन
मालोजीराजेंच्या माहितीला काही शेपूट जोडू इच्छितो. पूर्वी पैठणला दक्षिणकाशी असे म्हणत. पैठण आणि काशीतील सांस्कृतिक संबंध घट्ट होते. क्वचित पैठणच्या धर्मपीठाने अपुरा अर्थ काढल्याची भावना झाल्यास विद्वान काशी धर्मपीठाकडे दाद मागू शकत. हे थोडेसे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयासारखे होते. पैठण व काशीत लिंकिंग असण्याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक विद्वान ब्राह्मण घराणी काशीत स्थाईक झाली होती. देवगिरीच्या यादव राजांची सत्ता संपल्यानंतर राजाश्रय गेला म्हणून असेल, नव्या मुसलमानी राजवटीकडून धर्मांतराची भीती असेल, किंवा वेद, ज्योतिष, व्याकरणाचा गाढा अभ्यास करायचा असेल, कारणे काहीही असली तरी मराठी ब्राह्मणांनी काशीत अत्यंत आदर आणि विद्वत्तेच्या दृष्टीने अग्रपूजेचा मान संपादन केला होता. यात भट्ट, शेष व मौनी ही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची घराणी प्रख्यात होती. यातील भट्ट घराणे हे पैठणचे. या घराण्याचा लौकिक असा होता, की त्यात ओळीने ३० पुरुष नामांकित ग्रंथकार झाले. त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध व मान्यताप्राप्त झाले. या घराण्यातील रामेश्वर भट्ट यांनी काशीविश्वेश्वराचे पाडलेले देऊळ बादशहाकडून पुन्हा बांधून घेतले. (नंतर पुन्हा नासधूस झाल्यावर पुढे साध्वी अहल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला) या रामेश्वरभट्टांचा नातू म्हणजे निर्णयसिंधुकार कमलाकर भट्ट. (हेच गागाभट्टांचे काका का?) देवगिरीच्या यादव राजांचा पराभव झाल्यानंतर हिंदू राजांनी मुसलमानी सत्तेपुढे सबुरी पत्करली. नंतर कुठल्याही राजाला हिंदू पद्धतीने अभिषेक झाला नाही. ही परंपरा जवळपास २०० वर्षे खंडित झाली होती. परकी सत्तेच्या दहशतीमुळे वैदिक पद्धतीने शास्त्रशुद्ध राज्याभिषेक कसा करावा, याची प्रक्रिया ब्राह्मणही विसरुन गेले होते. गागाभट्टांचे पणजोबा नारायणभट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोगम् हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्या आधारे गागा भट्टांनी उत्तरेकडील काही राजांना राज्याभिषेक केला असू शकेल. गागा भट्टांचा आणि शहाजी राजांचा जुना परिचय असू शकेल. शिवाजी महाराजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांचा आणि गागाभट्टांचाही गाढ स्नेह होता. त्यामुळे शिवाजी राजांना गागाभट्ट फार पूर्वीपासून परिचित होते. त्यांचा संबंध नंतर आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

स्पष्टपणे लिहिलं असतं तर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/03/2013 - 09:54 नवीन
महाराष्ट्रातील अनेक विद्वान ब्राह्मण घराणी काशीत स्थाईक झाली होती.देवगिरीच्या यादव राजांची सत्ता संपल्यानंतर राजाश्रय गेला म्हणून असेल, नव्या मुसलमानी राजवटीकडून धर्मांतराची भीती असेल, किंवा वेद, ज्योतिष, व्याकरणाचा गाढा अभ्यास करायचा असेल, कारणे काहीही असली तरी मराठी ब्राह्मणांनी काशीत अत्यंत आदर आणि विद्वत्तेच्या दृष्टीने अग्रपूजेचा मान संपादन केला होता. राजाश्रय संपला आणि येथील विद्वान ब्राह्मण घराणी मुसलमान राजवटीच्या भीतीने काशीला पळून गेले, असे स्पष्ट लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं. उगाच गाढा अभ्यास वगैरे जोड्ण्यात काही मतलब नाही. सामाजिक परिस्थितीच अशी होती की अनेक लोक पळून गेले, अनेकांनी धर्म बदलला, अनेकांनी आपले आडनावं बदलून घेतली. बाकी, आपण काहीही लिहिलं तरी इतिहासात जे आहे ते बदलू शकत नाही. फक्त चूकीचे लिहिल्याने लिहिणा-याबद्दल विश्वास कमी होतो. ओसाड गाव बंद दिसतं तिकडे डकवलेला प्रतिसाद इथे डकवायचा होता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

खरं आहे तुमचं...

योगप्रभू
Sun, 02/03/2013 - 13:30 नवीन
इतिहासात लिहिलेले आपण बदलू शकत नाही, तसेच कुणाचे घट्ट समज/गैरसमजही बदलू शकत नाही. मीही लिहिताना 'जे लिहीन ते ब्रह्मवाक्य (किंवा काळ्या दगडावरची रेघ') अशा आत्मविश्वासाने लिहीत नाही. त्यामुळे चुकीचे लिहिले असेल तर मी नम्रभावाने माफी मागतो आणि माझे लेखन फारशा गांभीर्याने घेऊ नये, असेही आवाहन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजाश्रय संपला आणि येथील

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 13:43 नवीन
राजाश्रय संपला आणि येथील विद्वान ब्राह्मण घराणी मुसलमान राजवटीच्या भीतीने काशीला पळून गेले, असे स्पष्ट लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं. उगाच गाढा अभ्यास वगैरे जोड्ण्यात काही मतलब नाही.
पूर्वार्ध बरोबरच आहे, पण एक लहानसे डीटेल चुकलेय असे मला वाटते. इस्लामिक अत्याचार सगळीकडेच होते, फक्त त्यांची तीव्रता सगळीकडे सारखी नव्हती. गाढा अभ्यास किंवा आवडीच्या विषयाचे अध्ययन जवळपास न होणे हेही एक कारण आहे. १७-१८व्या शतकात भारतात संस्कृत विद्येची ४ महत्वाची केंद्रे मानली जातातः काशी, मिथिला, तंजावुर, वाई-सातारा. यांपैकी प्रत्येक केंद्र वेगवेगळ्या ब्रँचसाठी फेमस होते. पण काशीमध्ये सर्वच ब्रँचचे लोक बहुसंख्येने होते. त्यामुळे गेलेलेही बरेच लोक आहेत. निव्वळ अत्याचारामुळे पळाले असते तर सर्व संस्कृत पंडित पश्चिम महाराष्ट्रातच नसते का आले? काशी तर ऐन मुस्लिम पट्ट्यातच आहे तसे पाहिले तर. आणि हे अत्याचार वगैरे नेहमी एकाच रंगात रंगवायचे कारण दिसत नाही. काही राजांनी लै त्रास दिला संस्कृत विद्येला हे खरंय, पण अगदी मोगलाईतसुद्धा संस्कृत विद्येची केंद्रे चांगली फोफावती होती. अवांतरः एक मजा. बघा. गझनीच्या महमूदाची काही एका बाजूला अरबीफारसी तर दुसर्‍या बाजूला संस्कृत मजकूर असलेली नाणी मिळाली आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर होतंय पण लिहिलं पाहिजे म्हणून शेवटचा प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/03/2013 - 19:01 नवीन
महाराष्ट्रावर जेव्हा सुलतानी संकट यायला लागले अंदाजे १३०० पासून म्हणतो (चुभुदेघे) अल्लाद्दिन खिलजी, मलिक काफूर, महमद तुघलक वगैरेंच्या स्वार्‍यामुळे देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य संपूष्टात आले. हिंदू राज्य नष्ट होऊन मुसलमानी राजवट इथे नांदायला सुरुवात झाली तेव्हाच इथे भयंकर दुष्काळही सारखे पडत होते. सुल्तानी आणि नैसर्गिक संकटांनी सामान्य माणूस होरपळून गेला होता. तसाही देवगिरीच्या काळात धर्मग्रंथ, साहित्य संपदा यांना प्रोत्साहान मिळत असेलही परंतु सामान्य माणसांचे प्रचंड हाल होते. देवगिरीच्या राज्यात एक गरीब आणि एक श्रीमंत असे दोनच वर्ग होते. राजा कोणताही असूदे उच्च-निच्च अशा भेदभावामुळे सामान्य जनता वैतागून गेली होती, ही अवस्था अडीचशे तीनशे वर्ष होती. किरकोळ मवाळपणा मुस्लीम राजांमुळे आलाही असेल परंतु महाराष्ट्राच्या माणसाला वाचवायला राजे शिवाजीपर्यंत एकही थोर पुरुष जन्माला आला नाही, असे जे म्हटले जाते ते सत्यच आहे. इस्लामिक अत्याचार सर्वत्रच होते परंतु अत्याचारामुळे पळाले असे म्हणतो त्याचे कारण असे की हिंदु राजांच्या दप्तरी विद्वान ब्राह्मणांना स्थान होते परंतु मुस्लीम राजांच्या राजदरबारी विद्वान ब्राह्मणांना कोणतेही स्थान नव्हते त्याचे कारण असे की त्यांचा राजदरबार हा फारशी आणि उर्दू भाषेत चालणारा होता, तिथे संस्कृतचे काहीच काम नव्हते, म्हणून त्यांना काशी, प्रयाग, विजयनगर गाठावे लागले. एकतर मुसलमान राजवटीचा प्रचंड त्रास आणि पोटाचे कोणतेच साधन उपलब्द्ध नव्हते तेव्हा महाराष्ट्र सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अर्थात हा त्रास काही फक्त ब्राह्मणांनाच नव्हता तो मुस्लीमेतर असा सर्वांनाच होता. बरेचशे शूद्र जे होते ते धर्मांतर करुन मोकळे झालेले होते. क्षत्रीयांनी नांगर धरायला सुरुवात केली. व्यापारी लुटले जात होते त्यांनी आपला धंदा सोडून दिला. एकूणच प्रचंड वाताहात झाली सर्वांनीच आपली अस्मिता गमावली होती. अर्थात अस्मिता टीकवण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे काही नाही, विविध संप्रदायांनी हिंदूधर्म टीकवण्यासाठी प्रयत्न केले. तो वेगळा विषय. आपण दिलेल्या चित्रावरुन मला असे वाटते की समर्थ रामदासांच्या काळापर्यंत हिंदू समाज भ्रष्ट झालेला होता. आपला स्वाभिमान सर्वांनीच गमावला होता. आपले ब्राह्मण विद्वान मुस्लीम राजवटीत कोणा राजाच्या दरबारी किरकोळ कारकोळ काही तरी कारकुनी करु लागले होते आणि त्याचमुळे भाषा, कपडे, रितीरिवाज यांचे आदानप्रदान झाले त्यामुळे तो आलेला मजकूर असावा असे वाटते. (चुभुदेघे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/03/2013 - 19:07 नवीन
=)) =)) प्रा. डॉ. अहो एका मतावर ठाम रहा की. कितीवेळा स्वसंपादन वापरता आहात ? दोन मीनिटात तिसर्‍यांदा संपादन केलेत बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/03/2013 - 19:09 नवीन
मतावर ठाम असतो पण, प्रतिसाद लिहिल्यावर तीनदा तरी दुरुस्त करावे लागते. :) वाक्य, शब्द, पुन्हा पुन्हा पाहावे लागते. [हल्कत] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा