Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आदूबाळ on Sun, 01/27/2013 - 22:24
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा
तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम. मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर". १. अं.ज.जे. (अर्थात 'अंग्रेज के जमाने के जेलर'): हे लोक म्हणजे खानदानी शास्त्रीय संगीत श्रोते. वर्षानुवर्ष मैफिलींना येतात. सवाई गंधर्वसारख्या मैफिलीत त्यांची जागा ठरलेली असते. आजूबाजूला त्यांच्यासारखेच अं.ज.जे. असतात. त्यांना ते एरवी ओळखत असतील असं नाही. फक्त सवाई-ते-सवाई भेट होते. सवाईचे सगळे अलिखित नियम त्यांना माहीत असतात आणि स्वतः मनापासून पाळतात. गाण्यातून मधूनच उठून जाणार नाहीत. सतरंजीवर यायच्या आधी चपला हातात काढून घेतील. गाणं चालू असताना आपापसात बोलणार नाहीत. वेफर्ससारखे 'नादमय' पदार्थ गाणं सुरू असताना खाणार नाहीत. मधल्या वेळेत उठून गेले तर पिशवी, पर्स बिनधास्त तिथेच ठेवून जातील - कारण आजूबाजूचे अं.ज.जे. लक्ष ठेवतील अशी खात्री असते म्हणून नाही, तर सवाईमध्ये चोरी होणारच नाही याचा विश्वास असतो म्हणून! गाण्यांच्या मधल्या वेळेत "हा बागेश्री जमला नाही - कोमल निषाद नीट लागला नाही" वगैरे चर्चा करतात. रात्रीच्या सवाईच्या आठवणी काढून रमतात. (नाचाची आवड नसेल तर) शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाला हमखास झोपतात. 'सकाळ'मध्ये 'रात्रभर रांग लावून तिकीट मिळवलं' असले जे फोटो येतात ते हेच ते. कुठलाही नवीन प्रकार त्यांच्या पचनी पटकन पडत नाही. त्यामुळे हे लोक तुम्हाला वसंतोत्सवामध्ये दिसणार नाहीत. काही जुन्या प्रकारांना सुध्दा नाकं मुरडतात. ("सुंद्रीवादन नाही यंदा ते बरंय" असा एक कुजकट शेरा एका अं.ज.जे.ने उगाचच मारला होता.) एखाद्या गायक/गायिकेने नाट्यसंगीत, भजन असं भरताड लावलं तर "ओंकारेश्वर मंदिर नाही हे" असं सुद्धा म्हणतात. थोड्या गोष्टी सहन केल्या तर त्यांचा शेजार आनंददायी असतो. पडली तर ज्ञानात भरच पडते. पण कायम शहाण्या बाळासारखं वागायचं (मला तरी बुवा) दडपण येतं. म्हणून शक्यतोवर हा शेजार मी टाळतो. २. टिपणीस: टिपणीस हे रेकॉर्डिंग करणारे लोक. आता मैफिलीला आलोय तर छान गाणं ऐकायचं सोडून जवळचा रेकॉर्डर काढतील आणि सगळं टिपून घेतील. स्पीकरच्या जवळची जागा पटकावतात. काही मैफिलीत मांडवाबाहेर स्पीकर लावलेले असतात त्याच्यासमोर रेकॉर्डर "नाझी सॅल्यूट" पद्धतीने धरून उभे असतात. आजूबाजूच्या लोकांनी मुडद्यासारखं गप पडून रहावं अशी त्यांची अपेक्षा असते. एखाद्या जागेला "क्या बात है" वगैरे दाद शेजार्याने दिली तर त्याच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पहातात. पण एखादं गाणं खूप रंगलं आणि संपूर्ण प्रेक्षागार दाद देत असेल, तर चक्क उभे राहून रेकोर्डर गोल गोल फिरवून ती दादही टिपून घेतात! पूर्वी टिपणीस लोक जरा दुर्मिळ होते - कारण फार खटपटी कराव्या लागायच्या (मोठ्ठा रेकॉर्डर संभाळणे, विजेचा पॉईंट शोधणे, वेळोवेळी कॅसेटी बदलणे वगैरे). पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे टिपणीसांची वीण वाढली आहे. गाणं कसं झालं यापेक्षा ते नीट 'टिपलं' गेलं आहे की नाही याचीच चिंता त्यांना जास्त! एखाद्या टिपणीस काकांशी तुमची दोस्ती झाली तर रेकॉर्डर कुठल्या बनावटीचा आहे, सिंगापूर किंवा दुबईहून चिरंजीवांनी/सुकन्येने कसा पाठवला, पूर्वी ग्रुंडिगचे रेकॉर्डर यायचे तेव्हापासून कसं काका टिपणीसगिरी करायचे, वगैरे सगळं ऐकून घ्यावं लागेल. टिपणीसांच्या शेजारी बसणं शक्यतोवर टाळा. चुकूनमाकून बसलातच तर आवंढा गिळण्याचा आवाजही येऊ देऊ नका. ३. कोठावळे: हे टिपणीसांचे भाऊ. टिपणीस टिपतात आणि कोठावळे साठवतात. हे लोक पट्कन लक्षात येत नाहीत. पण दोन गाण्यांच्या मधल्या वेळात गाठून "माझ्याकडे अमुक इतके जी बी गाणी आहेत" वगैरे पकवतात. मल्लिकार्जुनचा १९५६ सालचा भीमपलास आपल्याकडे कसा आला याच्या ष्टोर्या लावतात. कॅसेटींच्या सीडी कशा करून घेतल्या वगैरे सांगतात. कुठल्या ना कुठल्या टिपणीस काकांशी यांचं संधान असतं. कोठावळ्यांचा एक उपप्रकार म्हणजे "विशिष्ट कोठावळे". हे सरसकट कशाचाही साठा करत नाहीत. मला भेटलेले एक विशिष्ट कोठावळे "फक्त मालिनी ऐकतात" आणि साठवतात. एका विशिष्ट कोठावळ्यांची स्पेशालिटी "मल्हारचे प्रकार" अशी आहे. कोठावळे भेटले तर त्यांच्याशी जरूर गप्पा मारा. तुमची आणि त्यांची आवड जुळली तर न जाणो तुम्हाला खजिना सापडून जाईल. माझ्या लहानपणी रेडिओवर माणिक वर्मांचा भटियार लागायचा. तो बहुदा फक्त ऑल इंडिया रेडिओ कडेच उपलब्ध असावा. एका कोठावळे काकांनी मला तो सप्रेम भेट दिला! ४. हवाबाण: हे म्हणजे शास्त्रीय संगीताची शष्प आवड नसूनही स्टेटस सिम्बॉल म्हणून मैफिलीला हजेरी लावणारे लोक. वर त्यांना आपली रसिकता सारखी सिद्ध करायची असते. हे लोक ओळखायला एकदम सोप्पे. सिल्कचा नाहीतर फॅब इंडियाचा कुर्ता घालून वर परफ्यूम वगैरे मारून येतील. स्त्री असेल तर मेक अप वगैरे सुध्दा. सरगमच्या लयीत हात वगैरे हलवायचा प्रयत्न करतील. दर पाच मिनिटांत एकदा "क्या बात है" किंवा "वाह" सारखी दाद कंपल्सरी असते असा यांचा समज असतो. उगाचच "नाही नाही" सारखं डोकं हलवतात. एक डोळा कायम आजूबाजूच्या श्रोत्यांवर असतो. त्यात समजा कोणी हाताने सम दाखवली किंवा बोटाने ताल धरला तर लग्गेच ती लकब उचलतात! वसंतोत्सवासारख्या कार्यक्रमात हवाबाणांचा "स्वयंसेवक" असाही अवतार पहायला मिळतो. अत्यंत तापदायक शेजारी. भेटलेल्या हवाबाणांचे किस्से नंतर आठवून हसू येतं, पण त्या क्षणी त्यांना ठोसा मारावासा वाटतो. एका हवाबाणाने माझ्या एका तबला शिकणार्या मित्राला "दोनदा सम आली, नाही?" असा प्रश्न विचारला होता. मी मित्राला घेऊन काढता पाय घेतला नाहीतर तिथे रक्तपात झाला असता. ५. वाती: आपल्या भागात शास्त्रीय संगीताची मैफल 'लागली' आहे, तर तिथे जाणं हे आपलं कर्तव्य आहे अशा विचाराचे लोक. मुद्दाम उठून "तालचक्र" ऐकायला जाणार नाहीत, पण आलाच आहे तौफिक कुरेशी तर सोडायला नको, असं. मैफिलीत जाऊन आपापली कामं करतील - वाती वळायच्या असतील तर वाती वळतील, भाजी निवडतील, मोबाईलवर मेसेज मेसेज खेळतील. प्रथम मागे जरी बसायला लागलं तरी पुढच्या चांगल्या जागेकडे डोळा ठेवून असतील. थोड्या वेळाने (गाणं सुरु असतानाच) उठून बाहेर जातील आणि मित्रांशी गप्पा छाटतील. फिरायला जायची वेळ झाली की फिरायला जातील. आठ वाजले की उशीर नको म्हणून उठून जातील. गाणं रंगल्याचं सुख नाही आणि पडल्याचं दुःख नाही. वर्गातली काही मुलं असतात ना - नवनीत गाईड वाचून घोकंपट्टी करून चांगले मार्क मिळवतात, पण कुठल्याच विषयाचा धड आनंद घेत नाहीत - त्यातला प्रकार. आणि.... शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता हे फक्त ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. कामधंद्यातून वेळ काढून, त्याच वेषात. दिवसभराच्या वापराने बाहेर आलेला शर्ट. हातात हेल्मेट. त्यांच्या मोबाईलवर शास्त्रीय संगीत सोडून इतर फारसं काही नसतं. "काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या नोकरी/व्यवसायाचे नाव> मध्ये पडलोच नसतो" असं त्यांना मनापासून वाटत असतं. आवडीनिवडी असतात, तीव्र नसतात, पण कलाकाराशी एक घट्ट भावनिक नातं असतं. भीमसेन जोशींना सरळ "अण्णा" म्हणतात. त्यांचा वारसा कोण चालवणार याची उगीचच चिंता करतात. गाणं आवडलं तर खुली दाद देतात. मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत. कोणी हसेल का, याची पर्वाही करत नाहीत. तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!
  • Log in or register to post comments
  • 30495 views

प्रतिक्रिया

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Sun, 01/27/2013 - 22:34

Permalink

अग्गागा!!!!!!

जमेश!!!!!! अशक्य निरिक्षण आहे...:)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 01/27/2013 - 22:46

Permalink

मस्त!

वर्गीकरण आवडलं. यात कार्यक्रमाला धरून बांधून कोणीतरी आणलेले अशीही एक क्याटेगरी करायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Sun, 01/27/2013 - 22:54

Permalink

जबरदस्त निरीक्षण! लेखन खूपच

जबरदस्त निरीक्षण! लेखन खूपच रोचक झाले आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sun, 01/27/2013 - 23:06

Permalink

मस्त !!!

शास्त्रीय संगितातलं काही कळत नसल्यामुळे सवाईला कधी गेलो नाही. परंतू सवाईला जाणारे काही प्राणी ओळखीचे आहेत. त्यातले काही तुमच्या "हवाबाण" कॅटेगरीत येतात असं आता वाटू लागलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Sun, 01/27/2013 - 23:25

Permalink

लै भारी!! जबरदस्त निरीक्षण!!

लै भारी!! जबरदस्त निरीक्षण!!
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Sun, 01/27/2013 - 23:26

In reply to लै भारी!! जबरदस्त निरीक्षण!! by आनन्दिता

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 01/27/2013 - 23:45

Permalink

खत्रा निरीक्षण.

अं.ज.जे. आणि हवाबाण यांच्या मधला एक थिल्लर प्रकार असतो. समोरच्याला आवड आहे पण शास्त्रिय संगितातलं कमी कळतं असं दिसलं की यांना चेव येतो. आणि संगितातलं कळतं असं दिसलं की घराण्यांचा विषय काढतात. दिग्गज गायकांचे आपले किती घरोब्याचे संबंध आहेत हे सांगत असतात. कुणा उस्ताद-पंडीताचं नाव घेताना नाटकी पणानं कानाच्या पाळीला हात वगैरे लावतात. अशा मैफिलीत ब्याक स्टेजवर जाउन उगाच इकड-तिकडं करण्याची खोड असते. त्यामुळेच कळलेली 'पेट नेम्स'चा अशा चर्चेत उपयोग करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 01/28/2013 - 00:07

Permalink

जबराट!

अचूक निरीक्षणं करता राव तूम्ही. :) नाझी सॅल्युट!! अगदी नेमकी अवस्था सांगितलीय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Mon, 01/28/2013 - 11:25

In reply to जबराट! by किसन शिंदे

Permalink

+१

अगदी अगदी....निव्वळ अप्रतिम :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by हकु on Fri, 12/09/2016 - 11:54

In reply to जबराट! by किसन शिंदे

Permalink

हाहाहा !!

हाहाहा !! अगदी चित्र डोळ्यासमोर आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 01/28/2013 - 00:21

Permalink

मस्त

लेख आवडला, मार्मिक निरीक्षणं आहेत अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 01/28/2013 - 11:42

In reply to मस्त by नंदन

Permalink

+१

लेख आवडला, मार्मिक निरीक्षणं आहेत अगदी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/28/2013 - 00:34

Permalink

लै खत्रा निरीक्षणे हैत!!!

लै खत्रा निरीक्षणे हैत!!! जियो.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 01/28/2013 - 00:55

Permalink

मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत

तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!
अत्यंत रसिक अवलोकन!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 01/28/2013 - 01:14

Permalink

अप्रतिम

अत्यंत सूक्ष्म निरिक्षण आणि तेवढेच मार्मिक शब्दांत वर्णन. एकदम आवडले :)
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Mon, 01/28/2013 - 01:41

Permalink

दम है इस बंदे में...

आदूबाळ, लिखते रहना..आगे चलकर तू जरुर कुछ बनेगा... सवाई म्हणजे जत्राच असते. तरी अजुन बर्‍याच मेंटॅलिटीचे लोक उल्लेख करायचे राहिलेत. ...खुर्चीची १५०० रुपयांची मर्यादित तिकिटे तासाभरात संपतात, मग आपण त्याच्यासाठी रात्रभर फूटपाथवर कसे झोपून होतो, हे सांगणारे लोक. खुर्चीवर बसून हे भारतीय बैठकीवर बसलेल्यांकडे तुच्छतेने बघत असतात. ...काहीजणांना स्वस्थ बसवत नाही, ते थोडावेळ गाणे ऐकतात, मध्येच उठतात. स्टॉलवर चकरा मारतात. शाली पांघरुन आलेले छान छान चेहेरे न्याहाळत बसतात. ... काहीजण 'गाणे कमी-खाणे जास्त' गटातले असतात. सारखे आजूबाजूच्या खादाडी स्टॉल्सवर चरत असतात शिवाय मध्ये बसलेल्या ओळखीच्यांना इशारे करुन 'मूगभजी गरम आहेत' असे सांगत असतात. ...मित्र-मैत्रिणी भेटल्यावर त्यांच्याशी संगीतेतर विषयांवर मोठ्या-मोठ्याने गप्पा मारणारे आणि कुणी नाराजी दाखवताच त्याच्याकडे बरेचदा रागारागाने पाहणारे पुरुष व स्त्रिया. ...तुसडेपणाने अपमान करण्याची एकही संधी न सोडणारे प्रवेशद्वारावरील स्वयंसेवक
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 01/28/2013 - 16:24

In reply to दम है इस बंदे में... by योगप्रभू

Permalink

हा हा...

शिवाय मध्ये बसलेल्या ओळखीच्यांना इशारे करुन 'मूगभजी गरम आहेत' असे सांगत असतात.
असे लोक बघितलेले आहेत. :))
  • Log in or register to post comments

Submitted by वसंत क्न्या on Mon, 02/11/2013 - 11:38

In reply to दम है इस बंदे में... by योगप्रभू

Permalink

" सवाई " निरिक्षण !

आदूबाळ, निरिक्षण आणि लिहिणं दोन्ही जमलय !! लिहित रहा बाळा !!
  • Log in or register to post comments

Submitted by हकु on Fri, 12/09/2016 - 11:56

In reply to " सवाई " निरिक्षण ! by वसंत क्न्या

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/28/2013 - 01:47

Permalink

खादाड रसिक(?)

'सवाई' चा विषय आणि साबुदाण्याच्या खिचडीचं वर्णन करणारा 'रसिक श्रोता' नाही? कालच्या कार्यक्रमात कुठल्या स्टॉलवर काय होते आणि कसे हादडले ह्याचे दुसर्‍या दिवशी वर्णन करणारेही भेटतात. त्यांना 'खादाड रसिक' अशा वर्गवारीत टाकावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Mon, 01/28/2013 - 01:52

Permalink

आदूबाळ, छान लिहिलं आहेस

विषेशतः तुझ्या शेवटच्या वाक्याला - "तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!' - दिलखुलास दाद दिल्याशिवाय रहावत नाहिये - क्या बात है, व्वा !!
  • Log in or register to post comments

Submitted by अगोचर on Mon, 01/28/2013 - 11:16

In reply to आदूबाळ, छान लिहिलं आहेस by मिसळपाव

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/28/2013 - 09:35

Permalink

मस्त..

अवलोकन
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Mon, 01/28/2013 - 09:40

Permalink

एकदम आवडले!

जबरी लिहीले आहे! सुंदर निरीक्षण.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Mon, 01/28/2013 - 10:12

Permalink

टिपणीस, कोठावळे, हवाबाण, वाती

टिपणीस, कोठावळे, हवाबाण, वाती ...
:) आणि या सगळ्यांना शोधणारे संशोधक कि निरिक्षक?
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 01/28/2013 - 10:15

Permalink

भन्नाट लेख.. आवडेश..

भन्नाट लेख.. आवडेश..
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Mon, 01/28/2013 - 10:17

Permalink

लेख आवडला.

लिखाण अतिशय आवडले. सूक्ष्म तपशिलांचे नर्मविनोदी वर्णन. अगदी पु.ल. स्टाइल. "दोनदा सम आली, नाही?" आणि "मैफल 'लागली' की.." खासच. एखाद्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची शोभा वाढवली असती या लेखाने.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 02/12/2013 - 09:21

In reply to लेख आवडला. by राही

Permalink

+१

>>>एखाद्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची शोभा वाढवली असती या लेखाने. <<< हेच म्हणतो ! लेख अतिशय मनापासून आवडला. अत्यंत सुरस नि वाचनीय.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Mon, 01/28/2013 - 11:05

Permalink

कडक सलाम. अफलातून.

वाचताना मनापासून दाद गेली. मस्त हो आदू बाळराजे ! निरीक्षण , अवलोकन आणि लेखन अशी तिहाई ! टिपणीस , कोठावळे हया जमाती आणि नामकरण एकदम प्रातिनिधिक. हल्ली तेथे व्यापारी नामक जमत जाम उच्छाद आणते हो - त्यावर काही मार्मिक टिपण्णी ? अवांतर पु.लंची शैच्या शैली चा लेखनावर अती भयंकर प्रभाव आहे . नस्ती उठाठेव ते खिल्ली ची किती पारायणे झाली असतील त्याची कल्पना आली. ही कसदार शैली पु,लं च्या कॅसेटी ऐकून येणारी येणारी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 01/28/2013 - 12:02

Permalink

आता हे ही करा

मैफिलीत स्टेजवर चार पाच जणांची टोळी असते. त्यात गायक , तबलेवाला, पेटीवाला, दोन तानपुरावाले असा संघ ! निरनिराळ्या तबलजींच्या संवयी ( बसण्याच्या, हसण्याच्या, तबला डग्गा ठेवण्याच्या, गायकाला समेत गुडाळण्याचा, मला किती तोडे तुकडे न तिय्ये येतात हे दाखविण्याच्या ) गायकांच्या ( रेकण्याच्या, माईकला भिडण्याच्या, मधे तानपुरावाल्याकडे बघण्याच्या, पेटीवाल्याला खाणाखुणा करण्याच्या, मधे गद्यात लोकांशी बोलण्याच्या, ताना सुरू झाल्या की दळण दळणे दोरीला पीळ घालणे, ताक घुसळणे , तार पंचमाला भीडता आले नाही तर फक्त वर बोट करून तो लागला आहे असे समजा मायबापानो असे श्रोत्याना दर्शविणे )पेटीवाल्याच्या ही नाना तर्‍हा ( सारखी प्रेयसीला जवळ ओढल्या सारखी पेटी जवळ खेचणे, गायकाने जागा घेतली की आपण जागा घेताना " विव्हल झालो" असा चेहरा करणे) कच्चा माल दिला आहे. त्यावर कोणीतरी लिहा राव !
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 01/28/2013 - 12:12

In reply to आता हे ही करा by चौकटराजा

Permalink

तुम्हाला अजून एक फालतू

तुम्हाला अजून एक फालतू निरीक्षण सांगू का? बर्याचदा पेटीवाल्याला टक्कल असतं आणि तबलजीला जरूरीपेक्षा जास्त केस असतात!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Mon, 01/28/2013 - 13:19

In reply to तुम्हाला अजून एक फालतू by आदूबाळ

Permalink

:)

धमाल आली वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 01/28/2013 - 16:50

In reply to तुम्हाला अजून एक फालतू by आदूबाळ

Permalink

कुरळे

कुरळे केसवाले एक घराणे असते तबलजींचे व दुसर्‍या घराण्याचा " बाज " असतो मानेवर रुळणाच्या लांब केससुणीचा !
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/28/2013 - 12:05

Permalink

हवाबाणांच्या उपमा !!

ओळखीतले आपण सवाईला जाऊन काय काय आणि कसं कसं ऐकलं त्याचं दररोज फेसबूकावर स्टेटस अपडेटवणारे काही लोक हवाबाण या क्याट्यागरीत येत असावेत असं वाटून गेलं. त्यांनी एखाद्या गायनाला, बासरीवादनाला, जुगलबंदीला दिलेल्या उपमाही भयानक असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 01/28/2013 - 12:20

Permalink

अत्यंत बारीक निरिक्षण,ही सवाईची जवळजवळ ग्रेट भेट्च आहे.

@टिपणीस: टिपणीस हे रेकॉर्डिंग करणारे लोक. >>> =)) वारल्या ग्येलो आहे... =)) @तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!>>> __/\__/\__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 01/28/2013 - 12:28

Permalink

आपल्याला त्या शास्त्रीय

आपल्याला त्या शास्त्रीय संगितातले शष्प कळत नाही. त्यामुळे सवाईच्या वाटेला आजवर गेलेलो नाही. उत्सुकता म्हणुन कधी गेलोच तर फार काळ निभाव लागेल असे वाटत नाही. आणि खरे सांगायचे तर एकच "आ" कोणीतरी आवताण मारेपर्यंत ताणलेला ऐकायची सहनशक्ती माझ्यात नसल्याने आणि हे असले दळभद्री विचार रसिक श्रोत्यांसमोर बोलुन कुत्सित टोमणे ऐकुन घेऊन अपमान करुन घेण्याची इच्छाही नसल्याने सवाईला लांबुनच रामराम ठोकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 01/28/2013 - 16:47

In reply to आपल्याला त्या शास्त्रीय by मृत्युन्जय

Permalink

लांबून नको ..

रामराम लांबून नको . एकदा तरी जाच विशेशत: टिपणीस ज्ञातीला निरखा. काय समाधी लागलेली असते राव सांगू !
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 01/28/2013 - 13:16

Permalink

मस्त!!

झक्कास निरीक्षण! वर्षानुवर्षं बाहेरगावाहून नियमित पणे येणारे श्रोते / अंजजे असतात. खूप खवचट नसतील तर काही वेळा हे अंजजे बरीच उत्तम माहिती देऊन जातात. विशेषतः अगदी स्टेजसमोर खुर्च्यांच्या मध्ये जिथे भा.बै. असते तिथले दर्दी मस्त असतात. खादाड रसिक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली कॅटेगरी आहे. (आठवा: खिडकी वडा) मस्त लिहिलं आहे. अजून येऊ द्या..
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 01/28/2013 - 13:37

Permalink

आम्ही आपले असेच एक हवाबाण

आम्ही आपले असेच एक हवाबाण कॅटेगरीतले.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 01/28/2013 - 16:38

Permalink

मस्त लिहिलं आहे.

मस्त लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/28/2013 - 16:58

Permalink

मी तरी त्या चार पाच दिवसात

मी तरी त्या चार पाच दिवसात कसब्यात सुद्धा जात नाही, पुढच्या वर्षी तिथल्या खाडाडीवर एक कट्टा करायचा विचार आहे, आणि तिथं आलेल्यांना ' काय नाय, हादडायला आलेलो नुस्ता, तुम्ही पण का ?' असा प्रश्न विचारयाचा विचार आहे, काय सांगावं ' आयला तुम्हीपण आमच्याच गटातले की मग,' असा भेटेल एखादा. बाकी, सवाईमधली सौंदर्य स्थळे यावर कुणी लिहिल का ? म्हणजे लग्नसराईच्या सुरुवातीलाच असतो सवाई म्हणुन म्हणलं काय नविन फॅशन ट्रेंड बिंड पाहायला मिळतो का तिथं, म्हणजे नुसतंच खादाडीला गेलो असं व्हायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता ठाकूर on Mon, 01/28/2013 - 17:54

Permalink

पुलमहाराजांच्या साहित्यावर

पुलमहाराजांच्या साहित्यावर माझे वाङमयीन पोषण झाले असल्यामुळे, तीच शैली पुन्हा पहाताच पुनःप्रत्ययाचा आनन्द मिळाला.फारच छान!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 01/28/2013 - 18:19

Permalink

हा हा हा!

लै भारी! :) आम्ही जातीवंत औरंगजेब असल्यानं ह्या एकुणच आनंदाला मुकलोच खरं. आता हे वाचून एकदा बघायला पाहिजे ही गंमत असं वाटायला लागलंय. द्येवा, पुढच्यावेळी अशा कार्यक्रमाला जाताना मलाही सोबत घेऊन चला की. पाहिजे तर मला तुमचा शिष्य करुन घ्या! :)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 01/28/2013 - 19:23

Permalink

आदुबाळा

थोर निरीक्षणे! प्रत्येक बॉल अगदी ब्याटीच्या मध्यावर घेतला आहे. या कोठावळ्यांना 'माझ्याकडे अख्खा भीमसेन आहे' असे म्हणताना कधी निरखले आहे का ? पारलौकिक आनंद असतो त्या वेळेस त्यांच्या मुखावर! समस्त कोठावळे त्यांच्याकडील 'कलेक्शन' मधलं किती परत ऐकतात हा संशोधनाचा विषय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 01/28/2013 - 19:32

Permalink

भारी!

जातकुळींची नावं जबरदस्त! मार्मिक लेख !
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 01/28/2013 - 20:57

Permalink

_/\_

लै भारी.. मजा आली वाचताना. सही.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 01/28/2013 - 21:40

Permalink

चांगला लेख

परंतु पहिल्या तीन प्रकारात खरे/चांगले/ज्ञानी श्रोते सापडत नाहीत हे काही तितकेसे खरे नाही, आणि त्या तीन प्रकारात वर्णन केलेले गुणच फक्त त्यांच्यात आढळतात असे नाही. किंबहुना खरा श्रोता हीच एक अत्यंत हायपोथेटिकल क्याटेगरी आहे असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/28/2013 - 22:21

Permalink

मार्मिक आणि खुसखुशीत !!

मार्मिक आणि खुसखुशीत वर्णन. कानसेनांचे तुमचे निरिक्षण आणि त्याचे केलेले प्रकार एकदम चपखल आहे. शेवट तर केवळ अप्रतिम ! आवडीनिवडी असतात, तीव्र नसतात, पण कलाकाराशी एक घट्ट भावनिक नातं असतं. भीमसेन जोशींना सरळ "अण्णा" म्हणतात. त्यांचा वारसा कोण चालवणार याची उगीचच चिंता करतात. गाणं आवडलं तर खुली दाद देतात. मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत. कोणी हसेल का, याची पर्वाही करत नाहीत. तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला! हे मनाला स्पर्श करून गेलं.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 01/29/2013 - 02:07

Permalink

धन्यवाद!

सर्वांचे मनापासून धन्यवाद! मूठभर मांस अंगावर चढलं (ते योग्य ठिकाणी चढो ही ईश्वरचरणी प्रार्थना!) "कार्यक्रमाला धरून बांधून कोणीतरी आणलेले" हे पैसाताईंचं निरीक्षण बरोबर आहे! सुचलं नाही... दादांचं "अं.ज.जे. आणि हवाबाण यांच्या मधला एक थिल्लर प्रकार" हेही बरोबर निरीक्षण आहे. पण मी फार पूर्वीपासून "बॅकबेंचर" आहे, आणि असले लोक पुढे पुढे करतात. त्यामुळे माझा त्यांचा फारसा संबंध येत नाही. योगप्रभू,पेठकरकाका, मैत्र आणि ५०फक्त - सवाईतली खादाडी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कोणीतरी लिहा ना! चौकटराजा - गायक/गायिकांचे विभ्रम हे भयंकर विनोदी असतात. पण नुसत्या वर्णनावरून तो/ती विविक्षित व्यक्ती कोण आहे हे ओळखू येईल. कोणा कलाकारावर वैयक्तिक टीका करायची नसल्याने जाहीरपणे लिहीत नाही, पण आपण कधी भेटलो तर लै गमती सांगीन! घाटावरच्या भटांनो - या क्याट्यागरी "म्युच्युअली एक्स्क्लूजिव" नाहीत हो! आणि "खरा श्रोता" हायपोथेटिकल नक्कीच नाही. हे लोक "स्वान्तसुखाय" असतात. आपल्या शास्त्रीय संगीताच्या आवडीची जाहिरात करण्यात त्यांना कोणताही रस नसतो. या "खर्या श्रोत्या"ची कल्पना डोक्यात आली आमच्या इमारतीत रहाणार्या एका माणसावरून. हा इसम सिंहगड रस्ता ते सणसवाडी हे अंतर नोकरीसाठी रोज मोटरसायकलीवरून कापतो. बायको-मुलगी आहे, पॅरॅलिसीसग्रस्त आई आणि व्रूध्द वडील आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे असं नाही पण दैनंदिन आयुष्यात संघर्ष फार आहे. इतकं करूनही हा बाबा मला दर मैफिलीला भेटतो! घामेजलेले कपडे, सतत मोटरसायकल चालवून येणारा फेंगडेपणा आणि हेल्मेट यांसह! मागे कुठेतरी कोपर्यात बसतो. आमच्या इमारतीत कोणाला त्याची ही आवड माहीतसुध्दा नाही. हाच असं नाही, असे अनेक लोक भेटले: वेगवेगळ्या वयाचे, आर्थिक/सामाजिक परिस्थितीतले. पुण्यात होणार्या मैफिलींना कधी गेलात, तर स्वयंचलित व्हीलचेअरवरून गाणं ऐकायला येणारे एक आजोबा आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवा - तुम्हाला खरा श्रोता सापडून जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 02/11/2013 - 15:14

In reply to धन्यवाद! by आदूबाळ

Permalink

शेवटचे दोन परिच्छेद लेखात आले

शेवटचे दोन परिच्छेद लेखात आले असते तर जास्त भावले असते... असो. मस्त लेख! पुलं स्टाईल. (वरातीमागून घोड्याबद्दल माफ करा.)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com