पुणे ५२
रात्रीची नीरव शांततेची वेळ. मुसळधार पाऊस पडतोय. झाडांवरून, इमारतींवरून झरझर कोसळणारा पाऊस सगळं कसं ओलंचिंब करून टाकतोय. जमिनीवर पडणार्या पावसाच्या थेंबाचा लयबद्ध आवाज घुमतोय. एक माणूस हातात विजेरी घेऊन पाठमोरा जातांना दिसतोय. त्याची नजर शोधक. डोक्यापासून पायांपर्यंत घातलेला त्याचा काळा रेनकोट पावसाच्या पाण्यात चमकतोय. झाडांची ओली पाने चंद्रप्रकाशात चंदेरी दिसत आहेत. तो चोरपावलांनी हळूहळू काहीतरी शोधत फिरतोय. एका बंगल्याचे एक दार उघडून तो आत शिरतो. एका खोलीच्या दाराजवळ येऊन थबकतो आणि पटापटा फोटो काढायला सुरुवात करतो...
ही आहे 'पुणे ५२' ची सुरुवात! खुर्चीवर सरसावून बसलो. मनातच म्हटलं अब आयेगा मजा! कोण आहे तो? काय करतोय इतक्या रात्री? कुणाच्या घरात शिरलाय? आणि कुणाचे इतके फोटो काढतोय? इतक्या पावसात हा उद्योग करायला सांगीतलाय कुणी याला?
हळूहळू (अक्षरशः) चित्रपट पुढे सरकतो. १९९२ सालातलं पुणे. सहवास सोसायटी किंवा डहाणूकर कॉलनी अशा भागात राहणारा अमर आपटे (गिरीश कुळकर्णी) हा खाजगी गुप्तहेर आपल्या व्यावसायिक अपयशावर मात करण्याचा आटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसतो. त्याची बायको प्राची (सोनाली कुळकर्णी) त्याचा संसार सांभाळता सांभाळता मेटाकुटीला येते. घरात पैसे नाहीत, बिले थकलेली. घराची अवस्था अत्यंत वाईट, भिंतींचा रंग उडालेला, जागोजागी भिंतींचे पोपडे उडालेले, फुटके नळ, अस्वच्छ स्वयंपाकघर, मोडक्या खुर्च्या, रिकामे डबे असे दारिद्र्याच्या खुणा मिरवणारे घर प्राचीच्या दु:खाचे मुख्य कारण असते. अपयशी नवरा हे तिच्या खचलेल्या मनाचे कारण असते. दिवस असे निराशेने ग्रासलेले असतात. प्राचीची आई प्राचीला घटस्फोट घेण्याचा आग्रह करते. प्राचीच्या आई-वडिलांच्या पैशावर अमर-प्राचीचे दिवस कसेबसे साजरे होत असतात. प्राची आणि अमर यांच्यात अर्थातच भावनिक दुरावा आलेला असतो. प्राची सततच्या दारिद्र्याला आणि आई-वडिलांसमोर पत्कराव्या लागणार्या लाचारीमुळे अस्वस्थ असते. आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध हट्टाने अमरशी प्रेमविवाह केल्याने प्राचीची मानसिक कुचंबणा होत असते. ती अमरला जबाबदारीने वागायला सांगते परंतु मनस्वी स्वभावाच्या हळव्या आणि सरळमार्गी अमरला त्याच्या कामात काहीकेल्या मनासारखे यश मिळत नाही. तो ही भयंकर अस्वस्थ असतो. बायकोची होणारी तारांबळ आणि सासू-सासर्यांसमोर तिला सावरावी लागणारी त्याची लंगडी बाजू याची त्याला पूर्ण जाण असते; पण काहीतरी बिनसलेलं असतं. त्याला गुप्तहेरगिरी सोडायची नसते परंतु कामात हवे तसे यश देखील मिळत नाही. त्याचे घर ज्या भागात असते त्या भागाचा पिन कोड असतो ५२. राहत्या घराखेरीज आणि एका जुनाट स्कुटरखेरीज अमरकडे काहीच नसते.
असेच तणावग्रस्त दिवस जात असतांना त्याला एक काम मिळते. एका माणसाला त्याच्या विवाह्यबाह्य संबंध असणार्या पत्नीचे अप्रशस्त अवस्थेतले फोटो पुरावा म्हणून हवे असतात. अमर पैशाची निकड असल्याने तयार होतो पण काम पूर्ण करत असतांना पकडला जातो आणि पैसे गमावून बसतो. नंतर नेहा (सई ताम्हणकर) अमरला तिच्या नवर्याच्या बाहेरख्यालीपणाचे पुरावे गोळा करण्याचे कंत्राट देते. अॅडवान्स म्हणून ती अमरला घसघशीत रक्कम देते. अमर कामाला लागतो. काम करत असतांनाच तो नेहाकडे आकर्षिला जातो आणि अचानक असे काहीतरी घडते ज्यामुळे अमर नखशिखांत हादरतो. त्याचे आयुष्य एकदम बदलून जाते. नंतर सुरु होतो एक थरारक खेळ, एक अनपेक्षित प्रवास! अमर, प्राची, नेहा सगळेच त्यात ओढले जातात. अनपेक्षित घटनांच्या अतर्क्य चक्रात सगळे गरागरा फिरत राहतात. असे काय आक्रीत घडते? अमर त्याच्या व्यवसायात यशस्वी होतो का? प्राचीला सुख मिळते का? नेहाला नेमकं काय मिळतं? सगळा गुंता सुटतो का? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर एकदा बघायला हरकत नाही निखिल महाजन दिग्दर्शित, अरभाट निर्मित 'पुणे ५२'.
आधी 'पुणे ५२' च्या जमेच्या बाजू. कथा एकदम वेगळी आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारी आहे. पुढे काय होईल हा प्रश्न मनात सारखा रुंजी घालत राहतो. गिरीश कुळकर्णीचा अभिनय खूप प्रगल्भ आणि संयत आहे. एका कफल्लक, सरळमार्गी, मध्यमवर्गीय विवाहित पुरुषाची व्यक्तिरेखा त्याने खूप चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. त्याची होणारी घुसमट, तगमग त्याने योग्य प्रकारे सादर केली आहे. सोनाली कुळकर्णीने अमरला चांगली साथ दिली आहे. सई ताम्हणकर एका भन्नाट आणि बिनधास्त भूमिकेमध्ये चमकली आहे. तिचे गिरीशसोबतचे प्रणयप्रसंग मराठी चित्रपटांमधला 'वरणभात'पणा पार पुसून टाकतात. इतकी गरमागरम प्रणयदृष्ये मराठी चित्रपटात आधी कधीच दाखवली नसावीत. चित्रपटात या दृष्यांची खरच गरज होती का? म्हटलं तर होती, म्हटलं तर नाही. हे ज्याने-त्याने चित्रपट पाहिल्यावर ठरवायचं. चित्रपट 'फक्त प्रौढांसाठी' आहे हे लक्षात ठेवून मगच चित्रपट बघायला जावे हे उत्तम.
बाकी श्रीकांत यादव, किरण करमरकर, भारती आचरेकर यांच्या भूमिका चोख आहेत. चित्रीकरण खूपच छान आणि सफाईदार आहे. चित्रपटाची रहस्यमय आणि थरारक बाजू खुलवण्याचे काम चित्रीकरणाने आणि पार्श्वसंगीताने (ह्युंग जंग शिम) चोख केले आहे.
१९९२ सालचे पुणे दाखवतांना कलादिग्दर्शन योग्य झाले आहे. डेक्कन टॉकीजचा परिसर, अमरचे घर, नेहाचे घर, हॉटेल्स असे सगळे व्यवस्थित दाखवले आहे. निखिल महाजनचे दिग्दर्शन चित्रपटाची प्रेक्षकांवरची पकड कायम ठेवण्यात किंचित कमी पडते. पण एकंदरीत दिग्दर्शन चांगले झाले आहे. पात्रांच्या मनाची अवस्था चित्रपटात नेमकेपणाने बाहेर येते. 'पुणे ५२' हे शीर्षक देण्यामागचे कारण तसे फारसे स्पष्ट होत नाही परंतु त्या काळातल्या त्या भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांची ओढाताण प्रातिनिधिकपणे दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणून 'पुणे ५२' या शीर्षकाकडे बघता येईल असे एकंदरीत चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दाखवलेल्या दृष्यांवरून वाटते. अर्थात हा माझा कयास आहे.
आता जरा दोष. सगळ्यात मोठा दोष म्हणजे चित्रपट बर्यापैकी संथ वाटतो. अशा चित्रपटांमध्ये जो एक वेग आवश्यक असतो तो थोडा कमी पडलाय. पटकथा जर अजून बांधेसूद असती तर चित्रपट अधिक सरस झाला असता. अधून मधून येणारा रटाळपणा कमी करण्यास निश्चितच वाव होता. संकलन थोडे अधिक विचारपूर्वक केले असते तर बराचसा अनावश्यक भाग काढून टाकता आला असता.
एकदा बघावा असा हा 'पुणे ५२' काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान देतो हे मात्र खरे. चित्रपट सर्वत्र जोरात सुरु आहे. असे वेगळे चित्रपट आवडणार्यांना हा चित्रपट बर्यापैकी आवडेल. बाकी 'दबंग' प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेलच असे ठामपणे सांगता येत नाही. एकदा बघूनच ठरवा आवडतोय की नाही ते, काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आधी समिक्षण वाचल. मग पुन्हा
हम्म
बर्याच दिवसांनी परीक्षण
पुणे ५२ म्हणजे डहाणुकर किंवा
1 बोंबलेला शिनूमा - पुणे 52.
अआ
बुवा तुमी बी लिवा समिक्षान
नकोच....! इतका त्रास डोक्याला
पिक्चर कसा का असेना, अआ तुमच्या प्रतिसादावर खूष होऊन
च्यायला, हे राहिलंच -
रोचक दिसतोय चित्रपट. जमेल
छान समिक्षन
गिरीश कुळकर्णीचा चित्रपट म्हणजे
आतिशय भंगार चित्रपट आहे!!!
काय राव ?
ओह
कथेवरुन हे
उत्तम परीक्षण, चित्रपट एकदा
निकड
सस्पेन्स कथा आवडत असल्यामुळे
हळूहळू (अक्षरशः) चित्रपट पुढे
एकदम बकवास चित्रपट. कशाचा
काय बोल्ता ?
तेवढ्या साठी अख्खा शिनेमा सहन
कठीण होणारच आहे म्हणून तर जायच.
जेया अंगि मोठेपन तेला यातना कठिण
मराठी लोकांचे बोल्डसीन म्हणजे
हो ना!
जरा वाट पहा यूट्युबावर अपलोड
बरोबर
अरे! म्हणजे निवांतपणे चार सहा
परीक्षण आवडले.
तांत्रिक बाबींवर चित्रपट
एक सांगायचे राहिले
पण बावन्नची काय भानगड आहे?
५२
मग पुणे १३ का नाही?
स्पाशी सहमत....थोडं हात राखून