Skip to main content

चाळ नावाची वाचाळ संस्कृती

यश पालकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल म्हणूनच ही मत बनली असतील. तसचं काहीस बाकी लोकांच असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील . त्याबद्दल मला तरी कधी वाईट वाटल नाही उलटपक्षी चाळीतल जीवन त्यांना उलगडून सांगताना एक वेगळा आनंद मिळतो.... लालबाग-परळ सारख्या ठिकाणी असणारी अनेकमजली चाळ किंवा उपनगरात वसलेल्या हजारो बैठ्या चाळी असोत, चाळ म्हणजे एकमेकाला लागून असलेली घरे आणि सर्वांनी वाटून घेतलेली common gallery. मी घरे म्हटले पण इथे सामान्यपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे खोली होय. चाळीत सर्वात कमी गोष्ट म्हणजे इथे असणारी privacy कारण इथल्या घरांची दार सकाळपासून जी सताड उघडी असतात ती रात्री सरळ दहा वाजेपर्यंत अपवाद मात्र दुपारच्या अनेक साऱ्या गृहिणीची वामकुक्षीची वेळ असते . चाळीतल्या अनेक साऱ्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त बिऱ्हाड राहत असतात.त्यामुळेच adjust करण हे भागच पडत. मी तर म्हणेन कि जसा अभिमन्यु युद्धाच शास्त्र त्याच्या आईच्या पोटातच शिकून आला होता तसच इथे जन्माला येणार प्रत्येक मुल हे adjust करण्याच बाळकडू शिकूनच आलेलं असत.कित्येक साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला चाळीत adjust कराव लागत हे चाळीत राहिल्याशिवाय नाही समजणार आणि काही काही वेळा त्यात खूप आनंदही मिळतो.आजकाल मी पाहिलं आहे की कित्येक साऱ्या तरुणांची चाळीत राहण्यावरूनच लग्न रखडली आहेत. काही काही तरुण मुली मुलगा चाळीत राहतो ह्या कारणावरून नाक मुरडतात आणि मुलाचे शिक्षण, नोकरी इत्यादी गोष्टी चांगल्या असूनही नकार देतात.प्रत्येकच्या काही अपेक्षा असतात हे मी समजू शकतो पण आमच्या चाळींमध्ये जसे काही तोटे आहेत तसेच इथे प्रत्येक हाकेला धावून येणारी माणसेही आहेत.फक्त थोडीसी adjustment करावी लागतेच कारण चाळीत राहण्यासाठी हेच पहिले आवश्यक असत. लहानपणापासून जर घरी नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन यायचो.जे मी अजूनही करतो .पण आजकाल साऱ्या भाज्या आवडू लागल्या हा भाग थोडासा वेगळाच आहे. दरवर्षी दिवाळीच्या पहिल्यादिवशी आपल्या घरातला फराळ संपूर्ण चाळीत वाटून यायचा ह्याची आम्हा साऱ्या लहान मुलांमध्ये जणू काही स्पर्धाच लागायची.मला अजूनही आठवत आहे काही वर्षापूर्वी घरातील सर्वजण गावी गेले होते माझ बारावीच वर्ष क्लासेस चालू असल्या कारणाने मला जाता आल नाही. वडलांनी बाहेर जेवणाकरता थोडे फार पैसे देऊन ठेवले होते.पण त्या आठ दिवसामध्ये मला एकही दिवस मला बाहेर जेवावे लागेल नाही कारण त्या आठ दिवसांची माझी जेवणाची सारी जबाबदारी आमच्या चाळीतल्या साऱ्या काकींनी वाटून घेतली होती.चाळीतल कोणी गावावरून आलाच कि फणसाचे गरे ,आंबे ,शेंगदाण्याचे लाडू इत्यादी सार आपल्या घरी कधी आणून देतात ह्याची आतुरतेने वाट पाहतात.काहीना थोडासा हावरेपणा वाटेल हा पण आम्ही चाळकरी हक्काने सार काही वाटून घेणारे मग ते सुख असू देत किंवा दुखहि असू देत. चाळीत सारे काही असे सुखाने नांदतात अस नाही तर काही क्षुल्लक कारणावरून भांडतील आणि एकमेकांच्या मागच्या पिढीचा उद्धारही करतील.मात्र जेव्हा कधी गरज असते तेव्हा हीच माणस सार काही विसरून पहिले धावून येतील. चाळीमध्ये आजही सालाबादप्रमाणे होळी,गणेशोत्सव आणि सत्यनारायणाची पूजा हे खूप धुमधामामध्ये साजरे केले जातात.काही दिवसापूर्वी मी भारतात येउन गेलो तेव्हा आमच्या चाळीत सत्यनारायणाच्या पूजेची तारीख ठरली. तसा एक महिन्याचा अवकाश होता पण तिथल्या चिल्लर पार्टीमध्ये जो काही उत्साह होता तो तर एकदम वाखाणण्याजोगा होता. कारण स्वतच्या अंगातील कला लोकांपुढे सदर करण्याच एक हक्काच अस व्यासपीठ त्यांना पूजेच्या करमुणकीच्या कार्यक्रमांमधून मिळत असत. महाराष्ट्रातील अनेक सारे कलावंत असाच साऱ्या प्रोत्साहनाने पुढे आले आहेत. कधीही कुठेही तुमच कौतुक होऊ देत पण घरच्या आपल्या माणसांकडून मिळालेली कौतुकाची थाप हि खूप जास्त महत्वाची वाटते.आमच्या चाळीतील अनेकांच्या मध्यमवर्गीय प्रवासाने त्यांना आज चांगली आर्थिक सुबत्ता दिली.चाळीची लागलेली सवय मात्र ह्या चाळीतील रहिवाशांना एकमेकांपासून दूर घेऊन जात नाही . काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथे मोठे मोठे tower उभे राहत आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या जाणाऱ्या राजकारणामुळे इथल वातावरण ढवळून निघत आहे. सारी काही समीकरण बदलत आहे .काही पैशांच्या लोभापायी माणस दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुनर्विकासाच्या नावाखाली पडून त्या जागी tower दिसतील पण "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू देत हेच नेहमी वाटत आहे. यशवंत http://dhyanimani.blogspot.ca/
जेनी...

मस्त :) सविस्तर प्रतिक्रिया ब्रेक के बाद :) कारण आता भुक लागलिय :( जेवुन येते :)
22/01/2013 - 00:05 Permalink
संपादक मंडळ

In reply to by अग्निकोल्हा

ज्येष्ठता किंवा अन्य निकषांवर संपादन चालत नाही. ते धोरणानुसार चालतं. कृपया व्यक्तिगत टीका टाळावी. असे प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत. ते मूळ लेखकांनी पुन्हा नव्याने प्रकाशित करु नयेत. यापुढे हे प्रकार सुरू राहिल्यास धागा वाचनमात्र करण्यात येईल. -संपादक मंडळ.
24/01/2013 - 07:48 Permalink
किसन शिंदे

जवळ जवळ २४-२५ वर्षे चाळीत राहिल्यामुळे तुम्ही लिहलेलं सगळं जवळचं वाटलं. अजूनही भरपूर लिहीता आलं असतं.
22/01/2013 - 08:03 Permalink
स्पंदना

असच काहीस वातावरण कोल्हापूरच्या "वाड्यातः असायच. फार छान लिहिल आहे पालकर. पु.ले.शु.
22/01/2013 - 08:41 Permalink
अमोल केळकर

छान लेख . चाळ नावाची वाचाळ वस्ती आठवली :) अमोल केळकर मला इथे भेटा
22/01/2013 - 10:10 Permalink
यश पालकर

In reply to by अमोल केळकर

धन्यवाद!!!!! मी सुद्धा "चाळ नावाची वाचाळ वस्ती " चे आतरजालावर शोधत होतो पण नाही सापड्ले. सापडल्यास दुवा द्या...
22/01/2013 - 11:21 Permalink
गवि

छान. चाळीत राहिल्याने म्हटलेलं बरंच काही जाणवत आणि आठवत होतं. बाकी खंत वाटणं साहजिक असलं तरी तशी ती खंत करण्याची काही आवश्यकता नाही. जे टिकण्यायोग्य असतं ते टिकतंच. आवर्जून टिकवावं लागेल असं काही टिकवत बसण्याचा आटापिटा आणि न टिकल्याची खंत करु नये. आता वासुदेव अंगणात येत नाही. उत्तम.. दारोदार भटकण्याच्या आणि संस्कृती टिकवण्याच्या ड्यूटीतून त्याची पुढची पिढी मुक्त झाली असावी अशी सदिच्छा.. कल्हईवाले कमी झालेत.. कल्हईची गरजही कमी झालीय. जात्यावर ओव्या ऐकू येत नाहीत.. ठीकच.. दळण एका मिनिटात गिरणीतून मिळतंय.. पुन्हा बायकांवरच असलेली व्यायामाची सक्ती संपली.. चाळी संपल्या.. उत्तम.. संपायच्याच होत्या.. :) दीड खोल्यात दोन संसार कोंबलेले.. यापेक्षा ती बंद दारं ठेवणारी फ्लॅट संस्कृती परवडली.. प्रायव्हसी (सामाजिक वीण ढिली करुनही ) लोकांना आवडतेय. चाळीतले लोक टॉवरमधे जाऊ इच्छिताहेत. त्यात चार पैशांसाठी असा भागच फक्त असेल असं नाही. प्रगती सर्वांनाच हवी असते.. त्या दृष्टीने दादा कोंडके यांचं विधान तीव्रपणे किंवा किंचित कडवट मांडणीने म्हणलेलं असलं तरी त्यातला व्यक्तिगत भाग काढला तर ते पूर्ण तथ्यहीन नाही.. आपण पुढे सरकता सरकता स्मरणरंजन चालू ठेवावे हे उत्तम..!!
22/01/2013 - 10:42 Permalink
यश पालकर

In reply to by गवि

प्रतिसादाबद्दल धन्यवाद कवि !!!! तुमच्या मताशी सहमत आहे... बदल हा काळाचा महिमा आहे आणि साऱ्यांनाच होणाऱ्या बदलासोबत जुळवून घ्यावे लागते. चाळीत राहणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे आज नाही तर उद्या पण कधी तर होणार आहे प्रत्येकाने हे स्वीकारलं आहे पण आज ह्या चाळ संस्कृतीतले काही चांगल्या गोष्टी माणसामध्ये राहू देत असाच वाटत आहे ....
22/01/2013 - 11:33 Permalink
अभ्या..

In reply to by यश पालकर

चाळ संस्कृतीतले काही चांगल्या गोष्टी म्हण्जे एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहणे, दुसर्‍याच्या अडीअडचणीला धावून जाणे हेच ना? ते त्या राह्ण्याच्या पध्दतीनुसार केलेली अ‍ॅडजेस्ट्मेंट असते हो. आता तीच नाही तर कुठल्या त्या गोष्टी राहणार? बाकी: 'कवि' नाहीत हो ते,:( गवि आहे त्यांचा आयडी. गनविहारी आहेत ते. :)
22/01/2013 - 11:44 Permalink
योगप्रभू

In reply to by गवि

गविंशी सहमत... चाळीतील सहजीवनाच्या स्मृती सुखद वाटल्या तरी त्याचे तोटेही होतेच. विशेषतः स्त्रियांना त्याचे फटके बसलेले आहेत आणि अ‍ॅडजस्टमेंटच्या नावाखाली जुन्या पिढीतील स्त्रियांच्या आकांक्षांचा बळी गेला आहे. आपल्या आई-बहीण-बायको-मुलींचे मन न ओळखता, त्यांची प्रायव्हसीची गरज न ओळखता, अट्टाहासाने 'आहे असे चालवून घ्या' असे जीवन जगायला भाग पाडल्याबद्दल पुरुष दोषी आहेतच. दीड खोल्यांमध्ये एकत्र कुटूंबात राहणे, पुरुषांनी बाहेरच्या खोलीत आणि बायकांनी स्वयंपाकघरात झोपणे, आपल्या हालचालींवर आणि वावरावर सतत कुणाची तरी नजर असणे, सार्वजनिक नळावरती बादलीभर पाण्यासाठी झालेले उद्धार, सहानंतर सार्वजनिक संडासापुढे पुरुषांचा वावर सुरु होत असल्याने संकोचास्तव पहाटे उठून जाण्याची लावलेली सवय, पहिल्या शिफ्टवर जाणार्‍या नवर्‍यांची तैनात सांभाळणे. शरीर सुखाचा कोंडमारा किंवा इच्छा नसताना होणारी बळजबरी (तो आणखीन वेगळा विषय) घरी कुणी आले किंवा कुणाला घेऊन आले, की वर्‍हांड्यात कुणी तरी बसलेले रिकामटेकडे हटकणार 'पाव्हणे वाटतं. कोणच्या गावचे म्हणायचं?' घरात कुजबुजत बोला नाहीतर मोठ्याने, शेजार्‍यांचे कान टवकारलेलेच. बायकोची आयुष्यभर हौस मारायची आणि ते पैसे गावाकडे शेती, घरदुरुस्ती, पाठच्या भावंडांचे शिक्षण, यात्रा-जत्रा असल्या गोष्टींत उधळायचे. हे सगळे चित्रण कथा-कादंबर्‍या आणि चित्रपटांतून आलेले आहेच. असो. ज्यांच्या नशिबातील चाळ सुटली ते भाग्यवान खरे. अपार्टमेंटमुळे घरातच संडास-बाथरुम आले आणि किमान शहरातील बायकांची कुचंबणा संपली, हेही नसे थोडके.
22/01/2013 - 12:33 Permalink

खूपच स्पष्ट आणि तरीही संयत शब्दांत विस्तार केला आहेत चाळकर्‍यांच्या जीवनपद्धतीचा. अगदी शब्दशः खरा आहे एकेक मुद्दा. कोणीही पाहुणे आले की सारी चाळ कामधाम सोडून प्रदर्शन पाहिल्यासारखी गॅलरीत, आणि मग उलटसुलट चर्चा. मग लग्न होऊन गेलेली मुलगी परत आलेली असो किंवा एकच नातेवाईक महिन्यात दोनदा आलेला असो.. प्रत्येक गोष्टीची तपशीलवार नोंद ठेवणारे भोचक लोक.. हा चाळीचा मुख्य पैलू आहे. फक्त लहान मुलांनाच चाळ मजेची वाटते कारण त्यांना भरपूर मित्र, खेळणे, मुक्त संचार हे मिळतं. पण पोरं पोरी जरा वयात येऊदेत, की चाळ त्यांच्यावर कावळ्यासारखी नजर ठेवून असते. यामधे पालकत्वाची जाणीव नसते, तर केवळ गॉसिपिंगची संधी शोधणं असतं असा व्यापक अनुभव आहे. चाळकर्‍यांना ते सुखद असेल पण त्या पोरांनाही हेही सुखद वाटत असेल तर पसंद अपनी अपनी.. -(चाळ, बंगला, सिंगलरुम, कॉट बेसिस,पेइंग गेस्ट, लॉज, आणि फ्लॅट अशा सर्व निवासांचा रहिवासी)
22/01/2013 - 12:44 Permalink
जेनी...

In reply to by गवि

गवि प्रतिसाद बाकी भारी लिवता , सगळं पटलं पण म्हणुन दादानी उलथायची भाषा करायची का?? लोकं दुसर्‍या देशात करमनुक म्हणुन जात नाहित ... करीअर प्लस नोकरी टिकावी हा हेतुहि असतो ... मग आम्हि उलथलो का ??? असो तुम्हालाहि तसच वाटत असेल तर आपाप्ली विचारसरणी समजुन चालायचं दुसरं काय करु शकतो आपण .
22/01/2013 - 20:46 Permalink

+१००००००००००००००००००. कोणी बाहेर जाऊदे नैतर आत राहूदे, किरकिर कशाला? शेवटी पोटासाठीच ना हे सगळं?
22/01/2013 - 20:49 Permalink

वरुन चोप्य पस्ते:
प्रगती सर्वांनाच हवी असते.. त्या दृष्टीने दादा कोंडके यांचं विधान तीव्रपणे किंवा किंचित कडवट मांडणीने म्हणलेलं असलं तरी त्यातला व्यक्तिगत भाग काढला तर ते पूर्ण तथ्यहीन नाही..
22/01/2013 - 22:01 Permalink
बॅटमॅन

In reply to by गवि

पैशासाठी माणसे एकमेकांपासून दुरावताहेत.
हाही एक नॉस्टॅल्जियाचा प्रकार म्हटला तर? जुन्या काळी माणसे एकमेकांना धरून असायची त्याचे कारणही बर्‍यापैकी चीपर बाय दि डझन अशा थाटातले होते असे मला वाटतेय. चूभूद्याघ्या.
22/01/2013 - 22:26 Permalink
गवि

In reply to by जेनी...

व्यक्तिगत भाव काढला . आता ते तथ्यहिन कसं ते समजवुन सांगा .
गहन आहे विषय, तरी करतो प्रयत्न. -तथ्यहीन नाही असं म्हटलं आहे. तथ्यहीन आहे असं म्हटलेलं नाही, तस्मात समजावून सांगायचे काय आहे यातला गोंधळ दूर करतो. "दादा कोंडके यांच्या मूळ मुद्द्यात तथ्य आहे" हे.. - यातला वैयक्तिक + कडवट भाग, म्हणजे (सूचकरित्या) धागाकर्ता स्वतः इथली आवडती चाळसंस्कृती सोडून पैशांसाठी अन्य देशात उलथणे याचा उल्लेख. - तथ्यहीन नाही, अर्थात असा उल्लेख आणि त्याचा टोन वगळता एक उदाहरण म्हणून यात तथ्य आहे. मूळ मुद्दा म्हणजे चार पैशांसाठी माणसे दुरावताहेत किंवा चार पैशांसाठी चाळीसारख्या एकात्म, आनंददायी पद्धतीवर गदा येत आहे किंवा तत्सम पैशासाठी काहीतरी दुरित / अवांछित घडत आहे या मूळ टोनमधला विरोधाभास दाखवण्यासाठी जी अनेक उदाहरणं देता येतील त्यापैकी काही खालीलप्रमाणे: -शेतकर्‍याच्या शेतजमिनीला एसईझेडमुळे भाव येत असेल तर तो ती विकतो / विकेल, प्रोव्हायडेड, त्याला शेतीमधे फायदा तितकासा होत नाहीये. अशा रितीने पैसा गाठीस लागणे ही त्याच्या दृष्टीने प्रगती. यामधे शेती, हुरडा, गोफण, सुगी, भाकरतुकडा बांधून शेतावर येणारी बायको, देशाला अन्न पुरवणारा उदात्त व्यवसाय या सर्व गोष्टींना समाधी मिळाली. पण शेवटी शेतकर्‍याला सद्यस्थितीत "प्रगती" काय वाटते हे महत्वाचं. - मी खेडेगाव सोडून शहरात नोकरीला आलो. गाडी, फ्लॅट मिळाले. खेड्यात कौलारु घरात राहून झोळण्याने हापूस आंबे तोडणं आणि ओढ्यात मासे पकडणं गमावलं. सो कॉल्ड "शांत" लाईफ गमावलं. पण माझ्यामते माझी "प्रगती" झाली. -इथेच एका प्रतिसादात यश यांनी हा फक्त डॉलरचा / पैशाचा प्रश्न नाही, करियरचाही आहे, असं म्हटलंच आहे. याचाच अर्थ प्रत्येकजण या "प्रगती"कडे वेगवेगळ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहतो. त्याचनुसार चाळवाल्या लोकांना टॉवरमधे मोठं घर मिळणं, किंवा बिल्डरकडून घसघशीत रक्कम मिळणं ही त्यांना हवी असलेली प्रगती आहे. अशा वेळी परदेशी जाऊन "अ" जे मिळवू पाहतोय तेच "ब" चाळ विकून टॉवरमधे जाण्यात मिळवू पाहतोय. तस्मात एकाने दुसर्‍याला "चार पैशासाठी" काहीतरी नको ते करण्यविषयी बोलण्याच्या संदर्भात उदाहरण म्हणून "चार पैशांसाठी चाळसंस्कृतीला तिलांजली देणारा ब" आणि "चार पैसे (आणि हो..करियर, क्षितिज विस्तारणे, आणि काही व्यक्तिगत परसेप्शन) यासाठी परदेशी जाणारा अ" ही समांतर उदाहरणे ठरायला हरकत नसावी. पुन्हा एकदा.. त्या उदाहरण देण्यात वैयक्तिक आणि कडवट भाग न आणता.. हुश्श..
23/01/2013 - 10:25 Permalink
यश पालकर

In reply to by गवि

कोणीतरी प्रगति करत असेल तर त्यात खुप आनंदाची बाब आहे... मग ति एखाद्यला त्याच घर विकुन पैसे मिळ्वुन करत असेल ह्यालहि माझा विरोध वैगरे नाही.. पैसाच्या लोभापायी माणस दुरावाली जात आहेत हि गोष्ट कदाचित मी योग्यरित्या मांडू शकलो नसेन. बिल्डरतर्फे काही ठराविक लोकांना पैसे देऊन राजकारण खेळल जात. ह्या राजकारणामुळे मानस दुरावली जात आहेत अस मला म्हणायचं होत . कोणीही स्वताच्या फायद्यासाठी इतरांच नुकसान करू नये हे मी म्हणेन . बिल्डरची ही ठराविक लोग पैसापायी अनेक साध्या लोकांना ह्या सगळ्यातले सरकारी नियम समजू देत नाहीत. प्रश्न राहिला माझ्या डॉलर कमावण्याचा ह्यात मी कोणाचाही नुकसान न करता प्रगती करत आहे आणि पैसे कमवत आहे.
23/01/2013 - 14:02 Permalink
गवि

In reply to by यश पालकर

अगदी अगदी.. काहीही अयोग्य नाही त्यात. इनफॅक्ट परदेशी जाऊन डॉलर्सच नव्हे तर गावातून पुण्यामुंबईत येऊन तिप्पट चौपट पैसा कमावणारे / तसं ध्येय ठेवणारे आमच्यासारखे असंख्य जण वेगळ्या स्केलवर हेच करतात आणि ते योग्यच आहे. कृपया गैरसमज करुन घेऊ नका. उलट पैसा तितकासा वाईट नाही हेच मांडण्यासाठी इतका शब्दांचा आणि उदाहरणांचा खेळ केला..
23/01/2013 - 14:06 Permalink
परिकथेतील राजकुमार

'चाळ संस्कृती' वैग्रेशी विशेष परिचय नाही. हान 'वाडा संस्कृती' मात्र अनुभवली आहे, आणि प्रिय देखील आहे. मात्र 'घरी नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन यायचो' , 'दरवर्षी दिवाळीच्या पहिल्यादिवशी आपल्या घरातला फराळ संपूर्ण चाळीत वाटून यायचा' असले प्रकार मात्र कधी केले नाहीत. पोरं जास्तीत जास्त काड्यापेट्यांचे स्टँप, पोस्टाची तिकिटे ह्यांची अदला-बदल करायची आणि बायका सणावाराला हळदी-कुंकवाची.
22/01/2013 - 11:04 Permalink
अर्धवट

In reply to by परिकथेतील राजकुमार

हॅहॅहॅ.. पर्‍या.. एवढा स्फोटक पोटेंशीअल असलेला प्रतिसाद वाया जाउ नये म्हणून हे उत्तर.. ;) पर्‍या लेका तुमच्या पुण्यातल्या वाड्यात देवाणघेवाण फक्त हळदीकुंकुवाचीच होणार की... चाळ वगैरे संस्कृतीचा दानशूरपणा पुण्यात कुठून दिसणार.
22/01/2013 - 16:12 Permalink
बॅटमॅन

चाळ संस्कृतीशी परिचय नाही, त्यामुळे हा लेख किंवा पुलंची बटाट्याची चाळ काय, दुरूनच पाहून वावा म्हणतो :) लेख बाकी चांगला उतरला आहे.
22/01/2013 - 11:45 Permalink
सानिकास्वप्निल

चाळ संस्कृतीशी परिचय नाही, पण तसाच शेजार आम्हाला लाभला जरूर. नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन येणे,दिवाळीचा फराळ देणे,सार्वजनिक होळी, गणेसोत्सव, सत्यनारायण पूजा, दही-हंडी, कोजागिरी, सांस्कृतीक कार्यक्रम हे सगळेच साजरे केले आहेत. इतकेच नव्हे तर आई-वडिल दोघेही नोकरीनिमित्त बाहेर असताना शेजारच्या काकींनी आमचा सांभाळ केला आहे तो ही पैसे न घेता. कधी-कधी शाळेत घ्यायला शेजारच्या आजी आल्या आहेत, आपल्या नातीबरोबर मलाही मायेने दोन घास भरवलेले आठवतात.काही वर्षांनी दुसर्‍या ठिकाणी रहायला गेल्यावर ही सुदैवाने तिथे ही तसाच शेजार लाभला. आजही पुर्वीचे शेजारी आम्ही एक-मेकांच्या संपर्कात आहोत . चाळीसारखे बिल्डिंगमध्ये ही लोकं एकोप्याने राहू शकतात, हां फक्त तशी आपली माणसे हवीत. तुमचे लेखन आवडले :) पुलेशु
22/01/2013 - 12:54 Permalink
पैसा

लेख चांगला आहे काहीसा नॉस्टॅल्जिक. पण आपुलकी, मदतीला धावून येणे याबरोबर चाळीत बराच भोचकपणाही चालतो. नवरा बायकोच्या भांडणात पडणे इ. प्रकार चालतात. ज्यांना इलाजच नाहीये त्यांना ठीक आहे पण मी आमच्या एका नातेवाईकांना गिरगावात चाळीत रहाताना पाहिले तेव्हा हादरून गेले होते. कारण ३ खोल्यांच्या जागेत एक आजी, त्यांचे २ मुलगे, २ सुना, त्याची ५ मुले आणि शिवाय मुलगी, काम न करणारा जावई आणि त्यांची ३ मुले एवढी १५ माणसे रहात होती. कसे रहात होते याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो.
22/01/2013 - 20:34 Permalink
उपास

वरती पैसा ताईंनी गिरगावतल्य चाळीचा उल्लेख केला.. म्हटलं प्रतिसाद टंकवावाच.. चाळ सोडून १०-१२ वर्ष झाली, अजूनही चाळ खुणवते.. मी आनंदाने राहतो कधी मधी जाऊन पण पुढची पिढी तिथे व्यवस्थित वाढवता येईल याची खात्री वाटत नाही.. गविंनी / योगप्रभूंनी मांडलेले मुद्दे तंतोतंत अगदी.. मूळ लेख आव॑डला, त्यात सण-वार, भानगडी, कॉमन गॅलरी वापरण्यावरुन स्पर्धा, गच्ची आणि तेथले असंख्य उद्योग असे अनेक पैलू टाकता येतीलच. (गिरगांवतल्या चाळीत लहानाचा मोठा झालेला..) - उपास
23/01/2013 - 01:55 Permalink
श्रिया

अगदीच चाळी सारख्या नाही, पण अशाच वातावरणात लहानपणी काही वर्षे राहिल्यामुळे वरील गोष्टी अनुभवल्या आहेत.अजुन एक गोष्ट म्हणजे कोणाच्या घरी काही लग्न कार्य वगैरे असेल तर आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून मदतीसाठी सगळ्यांचा सहभाग त्यात असायचा, शिवाय बाकीच्या घरातल्या चुलीही त्यादिवशी बंदच असायच्या. लेख वाचायला खूप आवडले. पु.ले.शु.
23/01/2013 - 12:18 Permalink
अभ्या..

In reply to by यश पालकर

मी तरी अजुनही चाळ्करीच आहे.. अजुनही तिथेच राह्त आहे...
केवळ चाळलाईफच्या प्रेमाने राहात असाल तर तुम्हाला सलाम.
23/01/2013 - 15:15 Permalink
अर्धवट

स्त्री-पुरूष, निवासी-अनिवासी, आस्तीक-नास्तीक वगैरे सदाबहार मैदानी कुस्त्यांमधे, चाळकरी-फ्लॅटकरी हा नवीन वजनीगट घातल्याबद्दल धागाकर्त्याची मिपातीहासात नोंद घेतली जावी असे सुचवतो. ;)
23/01/2013 - 14:31 Permalink
चेतन माने

कितीही पाहुणे मंडळी आली तरी रहा आजच्या रात्री असं आपुलकीने म्हणण्याची चाळ "संस्कृती" होती!! flat मात्र सिस्टीम आहे, असच राहून राहून वाटत !!! (दोन्ही अनुभवलेला )
23/01/2013 - 15:21 Permalink
निनाद मुक्काम …

चाळ येथे मी आवर्जून नमूद करतो. की मुंबईत आम्ही चाळीत माझ्या पणजोबांच्या काळापासून राहतो.. सध्या आई वडील व भाऊ सध्या तेथे राहतात. माझा व माझ्या आईचा जन्म डोंबिवली चा , आई वाडा संस्कृतीत वाढलेली आणि माझे वडील व त्यांचे दोन भाऊ लग्नानंतर मुंबईच्या उपनगरात व आम्ही तर डोंबिवली मध्ये स्थाईक झालो ,. , आजोबा स्वतः पुण्यात वाडा संस्कृतीत मोठे झालेले पण चाळ संस्कृतीवर नितांत प्रेम म्हणूनच मी मेल्यावर त्या उरलेल्या खोल्या विका असा त्यांचा आग्रह आहे. चाळीतून ब्लॉक मध्ये जाण्याचे प्रमुख कारण माझ्या आजोबांच्या शब्दात गोर्‍या संडासाचे आकर्षण . चाळी मध्ये रांग लाऊन मग घाणेरड्या , कुबट जागी जी पावसाळ्यात बहुतेक वेळा तुंबलेली असते अश्या ठिकाणी प्रातर्विधी करणे हि एक गोष्ट व त्या पेक्षा ब्लॉग मध्ये चकचकीत पांढऱ्या शुभ्र संडासात निवांतपणे बसणे ही वेगळीच मौज होती , आणि बरेच कारणे आहेत. चाळीत छोट्या जागेत होणारी गैर सोय व त्याने नवीन दांपत्याला होणार त्रास व इतर समस्या व चाळीतील जीवन मुंबईचा जावई ह्या सिनेमात अत्यंत प्रभावी पणे मांडले आहे , सदर सिनेमा तू नळीवर उपलब्ध आहे. माझ्या दहावी नंतर आम्ही आमच्या चाळीत परत आलो. कारण ह्या मधल्या काळात माझ्या आई वडिलांनी ह्या चाळीत गुजराती ,मारवाडी कुटुंब येउन स्थायिक झालेले पहिले. चाळीच्या खोल्यांवर खर्च केला , तर त्याचा कायापालट होतो हे अनुभवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईत मोक्याची जागा ह्या एकाच गोष्टी साठी हे गुजराती व मारवाडी उपनगरात ब्लॉग घेण्याची ऐपत असतांना सुद्धा चाळीत नव्याने आले व स्थिरावले. पुढे माझ्या व भावाच्या शिक्षणासाठी व आई , बाबांच्या फोर्ट व दादर येथील नोकरीच्या ठिकाणच्या दृष्टीने कुर्ला हे अत्यंत मोक्याची स्थान होते , व ते आम्हाला सोडायचे नव्हते म्हणून ब्लॉग ते चाळ असा उलट प्रवास आम्ही केला , व आज ह्या निर्णयाचे आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही , चाळ संस्कृती चे आपण गोडवे गातो त्यावर बरेच लिखाण करतो पण खरे सांगायचे तर ह्या संस्कृतीचे काही फायदे होते तर काही तोटे चाळीत भांडणे , कंपू गिरी ह्याचा त्रास होता , एखाद्याचे लग्न जुळत असेल तर परस्पर पत्रे लिहून एखाद्याच्या लग्नात खोडा घालायचा. किंवा घरामध्ये संयुक्त कुटुंब राहत असेल तर त्यात भांडणे लावायची , असे अनेक प्रकार व्हायचे. मुळात चाळ संस्कृती चे वर्गीकरण दोन गटात होते गिरणगाव , गिरगाव गिरणी कामगार ते सरकारी कारकून ह्यांच्या सोयीसाठी चाळी उभारण्यात आल्या.तेव्हा डोक्यावर छत असणे ही प्राथमिकता होती , सर्वांना परवडेल अशी जागा अत्यंत स्वस्त भाड्यात मिळणे ही प्राथमिकता होती. हि नवीन चाळ संस्कृती निर्माण होण्यात त्यावेळची परिस्थिती जबाबदार होती. कारण मुंबईत नोकरी करण्याचे गिरण्या व सरकारी नोकर्‍या हे दोन प्रमुख स्त्रोत होते. चाळी मध्ये पुण्याहून माझे आजोबा कॉलेज च्या शिक्षणासाठी आले तर माझी आजी जळगाव येथील त्यांच्या प्रशस्त वाड्यातून १६ व्या वर्षी लग्न होऊन आली. आजीला चाळीमध्ये सोवळे एवढे पाळता येत नसे , तसेस तिला तिच्या अहिराणी भाषेचा लेहेजा मुंबई मध्ये येउन बदलावा लागला. मात्र मुंबईने माझ्या आजीला केवळ ५ वर्षात बदलले. आधुनिक केले जगाच्या पाठीवर हा सिनेमा तिने माझ्या आजोबांच्या सोबत ३ वेळा थेटर मध्ये पहिला . हे ऐकून तिच्या जळगावच्या वाड्यातील माहेरची माणसे चकित ,झाली होती. , असे आजोबा मिश्किलपणे सांगतात. आजोबा पुण्यातील वाडा संस्कृती ची कधीकाळी आठवण काढत चाळ संस्कृतीत रमले. पुढे माझे बाबा डोंबिवली मध्ये आले व चाळ संस्कृतीची आठवण काढून उसासे काढू लागले , आज मी जर्मनीत असलो तरी डोंबिवलीच्या उपनगरी पांढरपेशा संस्कृतीची आठवण काढत माझ्या कॉलेज जीवनातील मुंबई च्या घड्याळाशी नाते असलेल्या माझ्या जीवन शैलीची आठवण काढतो , माझ्या आईला अजून ही डोंबिवलीचे त्यांचा वाडा , समोर प्रशस्त अंगण , एक विहीर असे थोडक्यात म्हटले तर उपनगर म्हटले तर गाव अशी डोंबिवली आठवते , माझ्या मते अशी डोंबिवली रामदास काकांना सुद्धा आठवत असावी , त्यांनी झरण ह्या लेखातून ती व्यक्त केली होती. थोडक्यात आपल्या गतकाळातील आपल्या जीवनशैली बद्दल आठवणी उगाळत त्यात रमणे हा आपल्या मध्यम वर्गीय लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यात काहीच वावगे नाही आहे, महेश भट्ट च्या भाषेत शिकायत हे दिल से मुझ को दिल से यही शिकायत हे जो नही दिल को मिल सकता दिल को ,उसकी की चाहत हे .
23/01/2013 - 18:36 Permalink