Skip to main content

जामखंडीचे उप्पीट

लेखक पंचम यांनी शनिवार, 19/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
शक्यतो मी हिवाळ्याचा रात्रीचा प्रवास टाळतो. त्यात सोलापूर-बेळ्गाव म्हणजे खाच-खळग्यांचा.. पण आमचे काका नुकतेच बेळ्गाव शहरी Shift झाल्याने आणि माझ्या दैवाने एक अत्यंत खडूस प्रजातीचा बॉस मला लाभल्याने हा प्रवास क्रमप्राप्त होता..म्हणतात ना 'जर नशीबच असेल पाजी तर काय करेल काजी?' त्या टिकीट देण्यार्या माणसाला पण काय हुक्की कोणास ठाऊक? त्याने बरोबर विंडोव्ह सीट दिली. बर म्हटल की शेजारील सहप्रवाश्याला विनंती करुन त्याच्या जागेवर बसावे तर त्या सहप्रवाश्याने मी काही बोलायच्या आत पिशवीतून पांघरुन काढले आणि पांढरा झेंडा दाखविला. आता पुढे त्याला 'ईथे बसता का?' असे विचारणे म्हणजे निर्लज्जपणा होईल. कोण रीस्क घ्या सहप्रवासी जर पुणेरी असला तर? नुसता कल्पनेने काटा आला. मी खिडकी बंद करण्याचे २-४ असफल प्रयत्न केले पण शेवटी ती पण 'सरकारी खिडकी' समोरच्या माणसाला प्रतिसाद न देण्याचा गुण तिच्याही अंगात (की नसां-नसात? जाणकाराने योग्य शब्द निवडावा) भिणला होता. शेवटी ती मोहीम अर्ध्यावर सोडून मी पेपर वाचण्याचा असफल प्रयत्न करु लागलो. काही वेळातच गाडीने गळा खाकरला आणि मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात थंडीने आपला बडगा दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक सेकंदागणिक वरच्या दाताची खालच्या दातांशी गाठी-भेठी होऊ लागल्या. आमच्या ड्राईव्हरच्या वाहन चालविण्याच्या कौशल्य पाहता तो रीटयर पायलट असावा अशी माझी आधीच समजूत झाली होती. माझा शेजारचा शाहीस्तेखान (ही उपमा देऊन मला तो गनिम असल्याचे सुचवायचे आहे हे जाणकार वाचकांनी ताडले असेलच) केव्हाच गाढ झोपला होता. त्याला झोप लागणारच कारण 'उत्तरेकडून' येणारे गार वारे थांबवणारा मी 'हिमालय' होतोच ना? असो काही वेळानंतर मी ही डोळे बंद करुन झोपायचा प्रयत्न करु लागलो. माझ्या प्रयत्नाला यश आले की नाही हे निश्चित सांगणे कठीण तोच काचेवर ट्क-ट्क असा आवाज आला. बहुदा कुठलेसे स्टॅंड आले असावे मी ईकडे-तिकडे पाहू लागलो तोच कंडक्टर जोरात ओरडला 'जामखंडी गाडी १० मिनीटं थांबेल.’ माझ्या खिडकीवर पुन्हा ट्क-ट्क. मी डोळे चोळत पाहीले एक म्हातारा हातात गरमागरम उप्पीट घेऊन उभा होता. 'ऊप्पीट लेंगे क्या साब?' मी प्रवासात सहसा काही खात नाही(बायकोचा धाक दुसर काय?) पण आजची परीस्थिती वेगळी होती. थंडीने आधीच नसंनस गोठली होती शिवाय पोटात भूकेने आधीच थैमान घातले होते.(शिवाय मी काय करतो हे बघायला 'बायको' नावाचा प्राणी नसल्याने मी धाडसाने त्याला विचारले 'कितीला?' तो 'सात रुपये'. मी एक प्लेट घेतली.. पहीला घास खाल्ला आणि एकच शब्द म्हणावा वाटला.. 'वा!!!' त्या गरमागरम उप्पीटामुळे माझी थंडी कुठल्या कुठे पळून गेली. 'साब ओर एक प्लेट दू क्या?' कदाचित माझा चेहरा ती असाहाय्य भूक लपवू शकला नाही. मी 'हो' म्हटल्या बरोबर त्याने हॉटेलाकडे धुम ठोकली त्याला आधीच्या प्लेटचे पैसे घ्यायचेही लक्षात आले नाही. ईथे गाडीत ड्राईवर आणि कंडक्टर आल्याने मला धडधडू लागले. त्या गरीबाचे नुकसान होऊ नये असे मनापासून वाटत होते. 'सगळे आले का?' कंडक्टरने पुन्हा आरोळी ठोकली. मी हातात वीस रुपये तयार ठेवले होते. आत सुट्टे पैसे शोधायला वेळ नव्हता. ईतक्यात घामानं निथळलेला तो धावत खिडकीपाशी आला. दुसरी उप्पीट प्लेट समोर धरली आणि म्हणाला 'वो गरम नही था तो लेट हुआ' एवढ्यात गाडीने पुन्हा गळा खाकरला. मी गडबडीने वीस रुपये त्याच्या हातात कोंबले आणि उप्पीट घेतले. वीस रुपये पाहून भांबावला आणि सुट्टे शोधण्यासाठी खिश्यात हात घातला. ईतक्यात गाडी सुटली तो सहा रुपये देण्यासाठी गाडीमागे धावला पण मीच दुर्लक्ष केले. त्याने माझी थंडी पार पळवून लावली होती आणि कधी कधी काही नुकसान आनंदही देऊन जाते हो ना? आपले अभिप्राय व अनुभव जरुर कळवा !!!!! - पंचम ता.क. हा माझा पहीलाच लेख आहे.. जमला का नाही ते जरुर कळवा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6813
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

लेख आवडला पंचमदा! एक अत्यंत फालतू प्रश्नः रिकामी प्लेट परत कशी दिली?

In reply to by आदूबाळ

प्लेटची किंमत धरून कदाचित मानसिक फायद्याबरोबर आर्थिक फायदाही झाला असेच दिसतेय ;) (ह. घ्या.) !

हा हा हा वाचकांनी प्लेट बद्दल दाखवलेली क्युरोसिटी ही गम्मतीदार आहे माफ करा पण मी ईथे नमूद करण्यास विसरलो की जामखंडीला उप्पीट केळीच्या पानातील द्रोणात देतात. प्लेट हे प्रकरण वाचकांना वाचण्यास सोपे किंबहुना मला लिहण्यास आणि हिशेबास सोपा पडावा म्हणून आहे ..

लेख आवडला.. ----------- अवांतरः >>'जर नशीबच असेल पाजी तर काय करेल काजी?>> "नशीबच गां* तो क्या करेगा पांडु" असंही काहीतरी ऐकलं होतं.. :)

रोजच्या जगण्यातले साधे पण सुंदर प्रसंग. छान लिहिलंय. लिहीत रहा.

वीस रुपये पाहून भांबावला आणि सुट्टे शोधण्यासाठी खिश्यात हात घातला. ईतक्यात गाडी सुटली तो सहा रुपये देण्यासाठी गाडीमागे धावला पण मीच दुर्लक्ष केले.
धन्यवाद गरीबाला मदत केल्याबद्दल.तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन ह्या जगात माणुसकीला वाव आहे नाहीतर काय झाल असत ह्या गरीबांच पिक्चरमधला एक सीन आठवतो साब एक रुपया दो ना कलसे भुका हु दो ना साब, आणी साब म्हणतो चल हट निकल यहांसे पुनश्च धन्यवाद मदत केल्याबद्दल आणी सांगीतल्याबद्दल

अनुभव छानच. या निमित्ताने विजापूर, जमखंडी आणि गोकाकचा डोंगर आठवला. लहानपणी खूप वेळा सोलापूर-बेळगाव प्रवास केला होता. जाउन आलं पाहिजे एकदा बेळगावला मिलिटरी महादेव बघायला.

आधी मला वाटलं, वेगळ्या उप्पीटाची क्रुती आहे!

आधिच्या थंडीच्या वर्णानाने (अन म्या सोता बेळगावची असल्याने) नंतर समोर आलेल उप्पीटाच वर्णन खरच उब देउन गेल.

चांगला लेख लिहिला आहे. जुने सभासद लेख चांगला असेल तर स्वागतच करतात. आता काही लोक आल्या आल्या फुलटॉस देतात त्याला मिपाकर काय करणार ?

पु.ले.शु. तर पळस्प्याचे कांदे पोहे , इगत्पुरीची इडली इ. सिक्वेल अपेक्षित.

लेखनशैली अतिशय आवडली. प्रवासात घडलेला एक साधा प्रसंग,तुमच्या लेखनशैलीमुळे रंगतदार झाला आहे.

जमखंडी आणि उप्पिट हे शब्द वाचून मन पन्नास वर्षे मागे गेले. मुंबईला आल्यापासून 'उपमा' हे नाव ऐकत आल्यामुळे 'उप्पिट' हा शब्द शब्दकोशामधून हद्दपार झाला होता. कधी कुणाच्या तोंडी 'तिखटमिठाचा शिरा' असे अगडबंब नावही ऐकलं होतं. पण लहानपणी जमखंडीला असतांना असंख्य वेळा खाल्लेल्या गरमागरम 'उप्पिटाची' मजा या कशालाच येत नव्हती. खूप छान लेख.

मित्रहो तसा मी जुनाच पण कधी लिहण्याचा मोका मिळाला नाही. मिपा मी नियमित वाचतो पण भिती होती की मी लिहलेले तुम्हा साहीत्य उपासकांच्या पचनी पडते का नाही?

आनंदजी मला वाटते की जेव्हा उत्तर भारतीय रसोईयाने उप्पीट करायला झार हाती घेतली आणि उप्पीटाच्या उपमा झाल्या

In reply to by पंचम

आनंदजी मला वाटते की जेव्हा उत्तर भारतीय रसोईयाने उप्पीट करायला झार हाती घेतली आणि उप्पीटाच्या उपमा झाल्या
असे नसावे बहुधा. महाराष्ट्रात ज्याला उप्पीट म्हटले जायचे त्यालाच दक्षिणेत (विशेषतः मंगळूर्/उडुपी भागात) उपमा असे नाव होते/आहे. आता मुंबईत बरीच रेस्टॉरन्टस त्याभागातील मडळींची असल्यामुळे, त्यांनी आपली नावे चालवली आणि ती सहज चालली गेली! आता मराठी घरातही उप्पीट न बनता उपमा बनतो आणि घावन न बनता नीर डोसा बनतो!! बाकी लेख चांगला झाला आहेच! अवांतर - विदर्भात साबुदाण्याच्या खिचडीला साबुदाण्याचा उपमा असे म्हणतात.

In reply to by सुनील

विदर्भात साबुदाण्याची उसळ असे म्हणतात. बाकी आपण त्या तथाकथित साबुदाण्याच्या उपम्याची पाककृती टाकल्यास कुतूहल शमेल... #पंचमराव - भावस्पर्शी अनुभवकथन आवडले.

In reply to by सुनील

घावन वेगला अणि नीरदोसा वेगळा. घावनाला नीरदोसा म्हटले जात नाही. नीरदोश्याच्या पिठामध्ये ओला नारळ वाटून घातला जातो.घावन तांदुळाच्या पिठाचे बनतात.त्यात नारळ वाटून अथवा दूध (रस) काढून घातले जात नाही.

आधी तेच करणार होतो .. पण पहील्या लेखणात जरा हात अवघडतोच ना? पुढच्या वेळेस राज रोस अशा शब्दांचा वापर करेन

लेखन छान जमले आहे. प्रसंग परिणामकारकरित्या चितारला आहे. थंडीचा गारेगार अनुभव वाचकांनाही हुडहुडी भरवित असताना आलेला 'गरमागरम उप्पीटाचा' उल्लेख फारच उबदार आहे. त्यामुळे मजा आली वाचताना आणि तुमचा हेवाही वाटला. जरा खटकला तो हिन्दी संवाद,
'ऊप्पीट लेंगे क्या साब?' 'साब ओर एक प्लेट दू क्या?' 'वो गरम नही था तो लेट हुआ'
आणि थंडीने दांतावर दांत वाजण्याच्या वर्णनानंतर 'ईतक्यात घामानं निथळलेला तो धावत...'
हे वर्णन विसंगत वाटलं.
'माझ्या प्रयत्नाला यश आले की नाही हे निश्चित सांगणे कठीण तोच काचेवर ट्क-ट्क असा आवाज आला.'
ह्या वाक्यानंतर कथेचा मूड बदलतो. इथे परिच्छेद बदलला असता तर कथेला जास्त 'समतोल' आला असता.

-साध्य्याही विषयात आशय मोठा किती आढळे- ह्या कुठेतरी वाचलेल्या ओळीची आठवण झाली. ''कोण रीस्क घ्या सहप्रवासी जर पुणेरी असला तर? नुसता कल्पनेने काटा आला". पुण्याचीच मंडळी पुण्याच्या लोकांना इतके घाबरतात हे आजच कळले. असे खरोखर असेल तर इतरेजनांची काय अवस्था होत असेल ?

कर्नाटकात उप्पीटास 'खारा भात' (किंवा खारा bath) असेही म्हणतात. शीरा + उप्पीट या काँबिनेशनला च्यांव्-च्यांव भात म्हणतात. या गावाचे नाव जमखंडी (ಜಮಖಂಡಿ)असे आहे. - ಟಿಮಕೀ

विंडोव्ह
पष्ट लिवलय.. ज ह ब ह र ह द स्त :-)

उप्पीट म्हणजे कोंकण/द.महाराष्ट्र इत्यादि भागात एस्टीस्टँडच्या कँटीनमधे, तळहाताच्या आतल्या भागाइतक्या आकाराच्या एका ताटलीला भातवाढणीसदृश उपकरणाने घासटून "पुसून" भरुन आपल्यासमोर ठेवलेला अर्धप्रवाही वाफाळता चिकट्ट पदार्थ. अतिशय चविष्ट. घरगुती उपम्याला त्याची सर नाही.

In reply to by गवि

एका ताटलीला भातवाढणीसदृश उपकरणाने घासटून "पुसून" भरुन आपल्यासमोर ठेवलेला अर्धप्रवाही वाफाळता चिकट्ट पदार्थ.
उप्पीट खायची उर्मीच मेली.

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो..पेठकरकाका.. ते चांगलं वरिजनलपणाचं लक्षण आहे हो... तसंच चविष्ट लागतं.. :)

लेख आवडला. आमच्या गावची "हॉटेले" (हो तिकडे रेस्टॉरंटना हॉटेलच म्हणतात) चविष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. आमच्या बाजूला दोशाला चक्क आंबोळी म्हणतात व उपम्याला उप्पिट्ट"! पण माझ्या गावाचे नांव "जमखंडी" आहे "जामखंडी" नव्हे. आनंद घारे यांच्यासारखेच माझेही बालपण जमखंडीत गेलेले असून मी SSC होईपर्यंत तिथल्याच परशुराम भाऊ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेले आहे.