मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्रीस श्रद्धांजली

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या.. या सर्व अंधारातल्या अभागिनींना या कवितेद्वारे श्रद्धांजली !! नाविका, आले रे मी चुकून जन्माया गुन्हेगार मी, धरती होऊनी, कळली ना माया ......||धृ|| कोण आपुले, परके कोणी कुपी विषाची, कुठले पाणी पारख चुकता पारध होते जीव लागे भ्याया ...........................................|१| निर्भया ती लढली होती प्रत्येकीची वेदना होती अंधाराला वाचा फुटते थरथरते काया.. .............................................|२| रान कळी एक पुन्हा खुडली गावाबाहेर, भोळी इवली आज ना जळते, बत्ती कोठे ना होतो धावा..................................................|३| आक्रोशाचा, भोग कुणाचा जीव कुणाचा, न्याय कुणाचा रोग म्हणू का, स्त्री जन्माचा दोष ना तुज द्याया.............................................|४| - संध्या

वाचने 2389 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by सांजसंध्या

@अस्वस्थतेत लिहीली गेली आहे. >>> वाचतानाच तसं जाणवत होतं,म्हणून फक्त ''यथायोग्य रचना'' एवढेच म्हणतो.

रेवती 16/01/2013 - 23:26
चांगली झालीये कविता. गेल्या महिनाभरात बरच घडलं, त्या विचारानेही आपल्याला दुखलं आणि दमून गेल्यासारखं वाटलं. पारख चुकता पारध होते कसंसच झालं वाचून. आता कुठं आपण सगळे सावरतोय.

किसन शिंदे 16/01/2013 - 23:42
छानच जमली आहे, अस्वस्थता नेमकी बाहेर पडलीय कवितेतून. याच विषयावर करूण रसाच्या अगदी विरूध्द अशा रौद्र रसात लिहलेल्या माझ्या एका मैत्रिणीच्या कवितेची आठवण झाली. :) या त्यातल्याच चार ओळी.. उमा हू मै शक्ती भी हू है मेराही एक रूप दुर्गाभी अन्याय के सामने डंट के खडी महाकाली भी.

In reply to by किसन शिंदे

इन्दुसुता 17/01/2013 - 00:43
किसनभौ, मला तुमच्या मैत्रिणीची रौद्र रसातली कविता वाचायला आवडेल. शक्य असेल तर येथे द्यावी. सांजसंध्या, कवितेतून तुमची अस्वस्थता जाणवतेच, एक स्त्री म्हणून मी काय करू शकते ह्या विचारानी सध्या ग्रासीत आहे. पारध शब्द भेदून गेला जीवाला...

सांजसंध्या 17/01/2013 - 12:24
@रेवती खरंय. मनात आलं आता सारं शांत झालं. यांना न्याय तर सोडा एखादी मेणबत्ती तरी कुणी लावेल का आता ? धन्यवाद सर्वांचे.

गवि 17/01/2013 - 17:19
कवितेचा मूड वेगळा आहे. तरीही एकदाच सुरुवातीला नाविकाचं प्रयोजन लक्षात आलं नाही. पार्श्वभूमीवर किंवा पुढे नाविकाला उद्देशून संवाद केल्याचा काहीच दाखला / योजना दिसली नाही. बाकी चांगले.

सांजसंध्या 17/01/2013 - 20:48
@ गवि नाव चालते या माझ्या कवितेचा संदर्भ आहे. नावेतल्या प्रवाशांना पैलतीरावर पोहोचवणारा नाविक आणि जीवनाच्या पैलतीरावर घेऊन जाणारा मार्गदर्शक या अर्थाने ती प्रतिमा मी वापरलीये. हे गा-हाणं कुणाकडे न्यायचं ? परिस्थिती इतकी भयाण आहे कि आत्यंतिक निराशेतही नायिकेचं म्हणणं आहे कि रोग म्हणू का, स्त्री जन्माचा दोष ना तुज द्याया "त्या" ला दोष द्यायची तिची इच्छा नाही. शेवटच्या कडव्यात त्याचा उल्लेख आहे. पटतेय का ? सर्वांचे मनःपूर्वक आभार. - संध्या

कलंत्री 18/01/2013 - 22:14
स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंधांना क्वचितच चांगले स्वरुप प्राप्त झाले आहे,कृष्ण आणि द्रोपदीचे नाते मला स्त्री पुरुष संबंधातील उत्कटता आणि परमोच्च विकास कसा असावा आणि कसा हवा हे दर्शवते. अस्वस्थता अथवा रौद्र रुपापेक्षा वरील संबंधांचा परीसस्पर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी यावा.