✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निरक्षर

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 01/17/2013 - 18:23  ·  लेख
लेख
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते. अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार? चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?) चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं. त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची! आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच. सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ). अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय? तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्‍या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना) आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्‍याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो. अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे) येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?) माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून. काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!) नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल) आनंद देणार्‍या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे) स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय) तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस. ‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला..... मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार, चिपकाले सैंय्या फेविकॉल से! ....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली! आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच! तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही. निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं. आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28915 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

अरे वा!

पैसा
गुरुवार, 01/17/2013 - 18:31 नवीन
हे पण बरंय की. विडंबन म्हटलं तरी काहीतरी महत्त्वाचं लिहून गेलातच!
  • Log in or register to post comments

पहिला प्रतिसाद संपादकांचा, लेखनाच्या निर्वैयक्तितेची पोच !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/17/2013 - 18:41 नवीन
काहीतरी महत्त्वाचं लिहून गेलातच!
आभार! आतापर्यंतच्या सर्व लेखनाचा आशय हाच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फार अवघड असत तोल सांभाळन.

स्पंदना
गुरुवार, 01/17/2013 - 18:37 नवीन
फार अवघड असत तोल सांभाळन. कुणा जमतो बहुतेकांना नाही जमत्.गैरसमज तर कुणा गैरालाही उपड पाडायचा आवेश देउन जातो. त्यात अहंकार भरीवर भर घालत जातो. तरीही चालायच तिरस्काराच्या गर्तेत खोल खोल रुतण्यासाठी.
  • Log in or register to post comments

ते काहीसं भारत-पाकिस्तान सारखं आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/17/2013 - 19:48 नवीन
आपण कधी कुणाची खोडी काढत नाही पण त्यांनी आगळीक केली आणि आपण गप बसलो तर कसं वाटतं? तिथे निरहंकारितेची भाषा केली तर चालेल का? एकदम उदाहरणाच्या टोकाकडे पाहू नका. आशय लक्षात घ्या. सामंजस्य सर्वांनी राखायची गोष्ट आहे. ती एकावर लादून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अगदी अगदी

अन्या दातार
गुरुवार, 01/17/2013 - 21:17 नवीन
सामंजस्य सर्वांनी राखायची गोष्ट आहे. ती एकावर लादून उपयोग नाही.
हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही "गैरसमज" या शब्दाकडे

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 03:15 नवीन
तुम्ही "गैरसमज" या शब्दाकडे लक्ष दिलेले दिसत नाही आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गैरसमज असेल तर दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 10:25 नवीन
जिच्याबद्दल तो झालाय ती व्यक्ती करते. केवळ नांवात थोडाफार बदल करून केलेलं लेखन आणि त्यावर `हाण तेज्या आयला' असे प्रतिसाद हेतू उघडपणे दर्शवतात. त्याला गैरसमज कसं म्हणता येईल? तरीही हे लेखन पूर्णपणे विचारांवर केलेलं वक्तव्य आहे. (ग्लिफ या सदस्याचा प्रतिसाद पाहा. त्यानं पोस्ट पूर्वग्रहरहित वाचलीये कारण त्याला मागे घडलेलं काहीही माहिती नाही). तुम्ही दृष्टीकोन बदलला तर तुम्हालाही मुद्दा कळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एकदम सहमत !

जेनी...
Sat, 01/19/2013 - 04:09 नवीन
एकदम सहमत ! लगे रहो कक्काजान हम आप्के साथमेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फक्त वाचणच ठरवलं होतं... पण थोडंस विचीत्र भासलं म्हणुन...

अग्निकोल्हा
गुरुवार, 01/17/2013 - 23:02 नवीन
आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही..............................................कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
कल्पना हीच एक अतीशय गुंतागुंत असताना त्याला पॉवर म्हणन्याने (नंतर) गोंधळ उडणार नाही काय ?
  • Log in or register to post comments

दुतोंडी प्रतिसादकर्ते पाहुन

शिल्पा ब
गुरुवार, 01/17/2013 - 23:31 नवीन
दुतोंडी प्रतिसादकर्ते पाहुन गंमत वाटते. नैतर हातात चुकुन कुर्‍हाड मिळाली की तोडातोडी करताना डोळे उघडे ठेवलेलं बरं असतं. बरं, नेमकं कशाचं विडंबन म्हणायचं हे?
  • Log in or register to post comments

मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय

अर्धवटराव
गुरुवार, 01/17/2013 - 23:46 नवीन
असलेल्याला पास नसलेला करुन कल्पनेच्या विडीकाडीला पुरणपोळी म्हणत पोटभर जेवायला लावणारी मूळ प्रेरणाअ कुठुन आलि असावी?? सध्यातरी मिपावर पाकिस्तान, बलात्कार समस्या, वेगवेगळ्या व्यक्ती-संघटनांचे असलेले-नसलेले द्वेष.. असले विषय गाजताहेत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

विडंबन ओढून ताणून म्हणजे,

किसन शिंदे
गुरुवार, 01/17/2013 - 23:45 नवीन
विडंबन ओढून ताणून म्हणजे, करायचं म्हणजे करायचंच याच भावनेतून केलेलं वाटलं. असो.
  • Log in or register to post comments

तंतोतंत!!!

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 00:13 नवीन
तंतोतंत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

किसनश्री, ही पोस्ट देव या भ्रामक कल्पनेतली व्यर्थता दर्शवते

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 10:04 नवीन
`तो' असा कुणी नाही. मूळ पोस्टमधे `तो' आहे आणि त्याचा ध्यास घेऊन अनंत चालायचय असा सूर आहे. माणूस विचार करतो असं म्हणतात पण `तो' म्हटल्यावर वातावरण इतकं भावूक होतं की `तो' आहेच असं समजून आपण काहीही विचार न करता पुढे जातो. (तिथले प्रतिसाद पाहा). जो नाही तो कितीही चाललं तरी कसा भेटेल ? इतका साधा विचारसुद्धा मनात येत नाही. वाळूत अक्षरं काय, पानापानात `तो' काय, वार्‍याच्या झुळकेत आणि पावलापावलागणिक `तो' काय, काय वाट्टेल ते चालू होतं. पुढे तर आरसा काय, आरश्याच्या पलिकडे काय..... मूळ पोस्टवर प्रतिसाद देऊन त्यातली व्यर्थता दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तो अप्रकाशित झाला. पण त्यापूर्वी बहुदा तो वाचला गेला असावा. कारण मग प्रतिसादातून बाजू सावरायचा प्रयत्न करत `तो' `कधीही न भेटणारा जीवलग मित्र' झाला! आता परिस्थिती आणखीच फनी झाली. `तो कधीही भेटणार नाही' हे मान्य केल्यावर त्याला भेटण्याचा सगळा प्रयत्नच वेडेपणा झाला. पुढे आणखी मजा झाली, जीवलग मित्र संपर्काशिवाय कसा होऊ शकतो? त्यामुळे ती निव्वळ एकतर्फी कल्पना आहे हे पुन्हा उघड झालं. ही पोस्ट म्हणजे विडंबन किंवा अहंकाराच्या भावनेतून केलेलं तिरकस लेखन नाही. शांतपणे वाचलं तर लक्षात येईल की एका भ्रामक कल्पनेतून कायकाय होऊ शकतं,... भ्रम ही काय चीज आहे. कारण शेवटी विचार ही कृतीची दिशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पटत नाय.

पैसा
Fri, 01/18/2013 - 10:57 नवीन
:( मूळ लेखिकेच्या मनात काय होतं हे फक्त तीच सांगू शकते. इतर कोणी अंदाज करून दुसर्‍याला चूक ठरवणं बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

"आण्णा, आज दुपारुन मला दत्त

धन्या
Fri, 01/18/2013 - 11:28 नवीन
"आण्णा, आज दुपारुन मला दत्त दिसलेत उंबरामदी. दत्त म्हणजे दत्तच. डायरेग." "चांगलंय. साक्षात्कार होत असतात. निसर्गात देव आहेच. तू चांगला माणूस आहेस. भगवंताने तुला दर्शन दिलं. पण बरं का केशव, ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ती स्वतःपुरती ठेवावी. इतरांचा त्यावर विश्वास बसेलच असं नाही. पण म्हणून त्यांना खोटं ठरवायचं कारण नाही. ज्यांना देव हवा आहे, त्यांनी तो आपापला शोधावा. ज्यांना नकोय त्यांनी तो शोधू नये. हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे." हा संवाद आहे गिरिष आणि उमेश कुलकर्णींच्या देऊळ चित्रपटातील कुलकर्णी आण्णा आणि केशव या पात्रांमधील. आण्णांचं भाष्य खुपच बोलकं आहे. मी असं गृहीत धरलं आहे की हा लेख म्हणजे संक्षींनी इनिगोयच्या "अक्षर" या लेखाला दिलेलं प्रतिउत्तर आहे, ज्याला मिपाच्या भाषेत आपण विडंबन म्हणतो. मुळात इनिगोयनी त्यांच्या लेखावरील प्रतिसादात असा खुलासा केला होता की "एकमेकांना कधी न भेटणार्‍या पण एकमेकांचे निव्वळ 'व्हर्च्युअल स्नेही' असणार्‍यांचं मनोगत आहे हे.". लेखिका म्हणून त्यांनी केलेला हा खुलासा थोडा वेळ बाजूला ठेवला तर त्या लेखातला "तो" म्हणजे देव हे अध्याहृत (इम्प्लिसीट) आहे. हे निदान हिंदूंच्या बाबतीत तरी लहानपणापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ठसवलं गेलेलं असतं. आणि म्हणूनच "देव" न मानणार्‍या संक्षींनीसुद्धा "तो" म्हणजे "देव" असाच अर्थ घेतला. बिकॉज, वुई हॅव बीन प्रोग्राम्ड दॅट वे. एक सामान्य वाचक म्हणून मला इनिगोयनी लिहिलेलं मुक्तक आवडलं. असेलही शब्दांचा भुलभुलैया, पण हा शब्दांचा भुलभुलैया हळव्या मनाचा ठाव घेतो हे मात्र नक्की. मग ते देवाबद्दल लिहिलेलं असो वा व्हर्च्युअल मित्राबद्दल. त्याचवेळी संक्षींनी लिहिलेलं "निरक्षर" मात्र मला पोरकटपणा वाटला. प्रतिउत्तर दयायचं म्हणून त्यांनी केलेली शब्दांची कसरत केविलवाणी आहे. "मरुन रोब" सारखी नितांत सुंदर कथा लिहिणार्‍या व्यक्तीने केवळ पलटवार करण्यासाठी इतकं टोकाला जावं हे माझ्यासारख्या चांगल्या साहित्याचा आस्वाद घेणार्‍या सामान्य वाचकासाठी त्रासदायक आहे. तरीही, इनिगोय आणि संक्षी या दोघांनाही आपापली मतं व्यक्तं करण्याचा हक्क आहेच. कोण चूक, कोण बरोबर हे व्यक्तीसापेक्ष असेल. माझं मत मी वरच्या परिच्छेदात मांडलं आहे. आता मुळ मुद्दयाकडे वळतो. "अक्षर" वर संक्षींनी जो प्रतिसाद टाकला होता, त्याला उपप्रतिसाद म्हणून मी एक चित्र डकवलं होतं. हे दोन प्रतिसाद आणि त्यानंतरचे आमचे दोघांचे सारे प्रतिसाद संमंने उडवले. शनिवार होता, कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. देव आणि धर्म हे विषय पुर्णपणे वैयक्तिक असून सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याचे विषय नक्कीच नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. पण आता मात्र मला त्यावर चर्चा कराविशी वाटत आहे. अर्थात चर्चा निकोप व्हावी, इतर मंडळींनी केवळ पॉपकॉर्न खात चर्चेचा आस्वाद न घेता चर्चेत भाग घ्यावा अशी ईच्छा आहे. ते चित्र मी पुन्हा एकदा इथे डकवतो. Image removed. त्यानंतर संक्षींनी मला "मी कोण आहे? आस्तिक, नास्तिक की बावळट?" असा प्रश्न विचारला होता. तेव्हा शब्दाला शब्द वाढवण्याची ईच्छा नसल्याने मी माघार घेतली होती. मी पुर्णपणे धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो. देव आहे, जे काही घडतं ते त्याच्या ईच्छेनेच असा घरातल्या सार्‍यांचा दृढ विश्वास आहे. लहानपणीच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, योगवासिष्ठ हे "आत्मा - परमात्मा - पुनर्जन्म" थिअरी मांडणारे ग्रंथ चाळायला मिळाले. मी ही कटटर देववादी होतो. मी ही लहान असताना आमच्या घराच्या बाजूलाच असणार्‍या मारुतीशी आणि थोडा मोठा झाल्यावर नदिकाठी स्मशानाच्या बाजूला असणार्‍या शंकराशी तासनतास गप्पा मारायचो, त्याच्याशी भांडायचो, सु:ख - दु:खं सांगायचो. पुढे वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. चौकसबुद्धी वाढली. आणि माझी मतं बदलायला लागली. ग्रंथांमधल्या कॉन्ट्रव्हर्सीज दिसायला लागल्या. काही प्रश्नांची कुठुनच समाधानकारक उत्तरे मिळेनाशी झाली. आणि मग एकेकाळचा माझा जीवाचा जिवलग असणारा देव माझ्यासाठी केवळ एक संकल्पना बनला. त्यानंतर मी वाचनाचा ट्रॅक बदलला. डार्विनचा उत्क्रांतीवाद, रिचर्ड डॉकिन्सचं "द गॉड डील्युजन", सिग्मंड फॉईडचं "द फ्युचर ऑफ अ‍ॅन इल्युजन" अशी पुस्तकं वाचल्यानंतर मला आधी पडलेल्या प्रश्नांची बुद्धीला पटतील अशी उत्तरं मिळू लागली. अर्थात ही जी दुसरी बाजू आहे, तीसुद्धा केवळ एक थिअरी आहे. फक्त ती थिअरी माझ्या बुद्धीला पटत आहे म्हणून मी ती स्विकारली आहे. देव आहे की नाही हे यावर मी ठामपणाने काहीच बोलू शकत नाही. विश्वाच्या अफाट पसार्‍यातील मी नगण्य ठीपका आहे. माझ्या बुद्धीची झेप एव्हढी नक्कीच नाही की मला विश्वाचं ज्ञान व्हावं. पुन्हा एकदा वरचाच संवाद लिहितो.
(देव) ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ती स्वतःपुरती ठेवावी. इतरांचा त्यावर विश्वास बसेलच असं नाही. पण म्हणून त्यांना खोटं ठरवायचं कारण नाही. ज्यांना देव हवा आहे, त्यांनी तो आपापला शोधावा. ज्यांना नकोय त्यांनी तो शोधू नये. हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.
माझ्या मते देव नाही असं मानणार्‍यांनी देव आहे असं मानणार्‍यांवर तुटून न पडता त्यांना त्यांची मतं, श्रद्धा जोपासू दयावात. जोपर्यंत या श्रद्धा मानवी जीवनावर विपरीत परीणाम करत नाही तोवर बुद्धीवादयांनी त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुस्पष्ट अन समर्पक

सस्नेह
Fri, 01/18/2013 - 11:49 नवीन
सुस्पष्ट अन समर्पक प्रतिसादासाठी अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बापरे

स्पा
Fri, 01/18/2013 - 11:55 नवीन
माझ्या मते देव नाही असं मानणार्‍यांनी देव आहे असं मानणार्‍यांवर तुटून न पडता त्यांना त्यांची मतं, श्रद्धा जोपासू दयावात. जोपर्यंत या श्रद्धा मानवी जीवनावर विपरीत परीणाम करत नाही तोवर बुद्धीवादयांनी त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही.
चायला हेच मुद्दे जर शाकाहार - मांसाहार , स्त्री - पुरुष , निवासी - अनिवासी , कांग्रेस- बीजेपी , मुंबई - पुणे ई. ई लागू केले , तर चायला मिपा बंद पडायचं असो चान चान अपेक्षा धन्याजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आपला हा प्रतिसाद वाचून खुप

धन्या
Fri, 01/18/2013 - 12:01 नवीन
आपला हा प्रतिसाद वाचून खुप मोठया तरंगलांबीचे विचारतरंग मनात तरळून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मूळ धाग्याचा संदर्भ

बाळ सप्रे
Fri, 01/18/2013 - 12:39 नवीन
मूळ धाग्याचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद..
माझ्या मते देव नाही असं मानणार्‍यांनी देव आहे असं मानणार्‍यांवर तुटून न पडता त्यांना त्यांची मतं, श्रद्धा जोपासू दयावात. जोपर्यंत या श्रद्धा मानवी जीवनावर विपरीत परीणाम करत नाही तोवर बुद्धीवादयांनी त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही.
अशा वादविवादात "वैचारीक पातळीवर" तुटून पडायलाही हरकत नाही.. मुद्द्यापुरत वेगळेपण सांगितल्याशिवाय वेगवेगळे काय विचार असु शकतात ते कसे समजणार.. तुटून पडणे म्हणजे आपला मुद्दा/ विचार हिरिरीने मांडणे.. त्यामुळे तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडता येतो.. फक्त आपला मुद्दा एखाद्याला पटला नाही तर वैयक्तिक रोष नसावा इतकच.. विचाराच्या कक्षा रुंदावणे म्हणजे तरी काय.. तुम्ही जी पुस्तक वाचलीत त्यातले विचार प्रभावीपणे मांडलेले असल्यामुळे कुठेतरी जुन्या विचारांना धक्का दिला गेला ना?? त्यामुळे नुसते श्रद्धा जोपासू देणे (आस्तिक/नास्तिक दोन्हींच्या) हे पटत नाही.. फक्त हे सर्व "वैचारीक पातळीवर" ठेवणे महत्वाचे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमचं म्हणणं पटलं.

धन्या
Fri, 01/18/2013 - 12:50 नवीन
चर्चा खेळीमेळीत आणि पुर्णपणे वैचारिक पातळीवर व्हायला हवी. परंतू वरचे काही प्रतिसाद वाचल्यावर तसं होत नाहीये हेच दिसतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

+१०००% सहमत

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/18/2013 - 14:05 नवीन
इतर काही लिहीण्याची गरज नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रतिसाद आवडला

सुधीर
Fri, 01/18/2013 - 15:10 नवीन
प्रतिसाद आवडला. खास करून देऊळ या चित्रपटातल्या संवादाचा दाखला आवडला. मूळ लेखातलं संक्षीचं फक्त शेवटच वाक्य काहीसं कळलं आणि पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मरुन गाउन नाही हो "मरुन रोब"

पियुशा
Fri, 01/18/2013 - 15:24 नवीन
मरुन गाउन नाही हो "मरुन रोब" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अवांतर ठरु नये म्हणून वांतरः

गवि
Fri, 01/18/2013 - 15:28 नवीन
अवांतर ठरु नये म्हणून वांतरः हो. मरुन रोब असं मूळ लेखाचं नाव आहे.. अवांतरः मरुन गाऊन ही रचना क्रॉनॉलॉजिकली चुकीची वाटते. मरणाने सर्वच संपते. गाऊन मरुन हे जास्त योग्य. गाऊन मग मरणे हा हा घटनाक्रम जास्त नैसर्गिक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

गविकाका, तेव्हढा शब्द दुरुस्त

धन्या
Fri, 01/18/2013 - 15:31 नवीन
गविकाका, तेव्हढा शब्द दुरुस्त करता का? आमचं खेडयातलं बालपण कधी कधी असं दगा देतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल

धन्या
Fri, 01/18/2013 - 15:28 नवीन
चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. स्व-संपादन सुविधा नसल्यामुळे मी तरी तो बदल करु शकणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अयोयो! एव्हढ चांगल लिखाण

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 16:26 नवीन
अयोयो! एव्हढ चांगल लिखाण प्रतिसादात वाया गेल की. एक सुरेख लेख झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वा . आवडला प्रतिसाद

जेनी...
Sat, 01/19/2013 - 04:24 नवीन
वा . आवडला प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

परफेक्ट.

यशोधरा
Tue, 01/22/2013 - 21:25 नवीन
परफेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पैसाताई, अपर्णाताई आणि

कवितानागेश
Fri, 01/18/2013 - 00:20 नवीन
पैसाताई, अपर्णाताई आणि शिल्पाताई, तिघींशीही सहमत. :)
  • Log in or register to post comments

ताईदीन!!

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 03:26 नवीन
ताईदीन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आमच्या वेळी नव्हते हो असले

धन्या
Fri, 01/18/2013 - 09:55 नवीन
आमच्या वेळी नव्हते हो असले काही मदर्स डे, फादर्स डे, एल्डर सिस्टर्स डे. आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करायला एक विशिष्ट दिवस कशाला हवा? तसं केलं तर मग बैल पोळा आणि हे डे यांमध्ये फरक तो काय राहीला. आजची पीढी पाश्चात्यांचं अंधानुकरण करत आहे, आणि पाश्चात्यांना आपली उत्पादनं असे नवनवे डे निर्माण करुन पौर्वात्यांच्या गळी मारायचे आहेत. असो. शेवटी काळाबरोबर बदलायला हवं म्हणून आमच्याही ताईदीनाच्या मिपावरील समस्त तायांना हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आमच्या वेळी नव्हते हो असले

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 16:30 नवीन
आमच्या वेळी नव्हते हो असले काही हे वाक्य पुण्यातल्या आठ वर्षाच्या पोरापासुन ऐंशी वर्षाच्या म्हातार्‍यापर्यंत कोणीही म्हणु शकतं. इति. पु.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

दीन

पैसा
Fri, 01/18/2013 - 10:47 नवीन
हे हीन-दीन मधलं की दीन-दीन मधलं? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

माझ्यातर्फेही!!

सूड
Fri, 01/18/2013 - 12:02 नवीन
माझ्यातर्फेही ताईदिनाच्या सर्व मिपाकर तायांना शुभेछा ....अगदी मीनाक्षीताईसकट !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@अगदी मीनाक्षीताईसकट>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/18/2013 - 13:46 नवीन
@अगदी मीनाक्षीताईसकट>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दोन्हीतल गो बाय. पन 'दिन'मधल

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 16:27 नवीन
दोन्हीतल गो बाय. पन 'दिन'मधल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धनाजीराव!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 13:19 नवीन
माझ्या मते देव नाही असं मानणार्‍यांनी देव आहे असं मानणार्‍यांवर तुटून न पडता त्यांना त्यांची मतं, श्रद्धा जोपासू दयावात. जोपर्यंत या श्रद्धा मानवी जीवनावर विपरीत परीणाम करत नाही तोवर बुद्धीवादयांनी त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही
याविषयी `देवाला रिटायर का करा?' या क्लिंटनच्या पोस्टवर सविस्तर चर्चा झाली आहे. कुणावरही तुटून पडण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. मूळ लेखनात दुहेरीपणा जाणवला. एकतर देव आहे म्हणा आणि तुमच्या मस्तीत (किंवा भ्रमात राहा). सावरासावरी करायला 'व्हर्च्युअल स्नेही' वगैरे कशाला हवं? इफ यू बिलीव देन देअर इज नो वर्च्युअ‍ॅलिटी, इट इज रिअ‍ॅलिटी फॉर यू. पराच्या तिथल्या प्रतिसादातला हा भाग मस्त आहे:
व्यक्त होताना ते विचर कोणी खपवून घेईल का ? कोणी त्याला वाह वाह करेल का? असले विचार माझ्या मनात येतच नाहीत.
मूळ लेखनात तफावत आहे (आणि प्रत्येक भक्तीच्या मनात ती असतेच) तेवढी दाखवून दिलीये.
  • Log in or register to post comments

मला तर "व्हर्च्युअल स्नेही"

गवि
Fri, 01/18/2013 - 13:49 नवीन
मला तर "व्हर्च्युअल स्नेही" हीच थीम स्पष्टपणे समोर आली असं वाटलं. देव ईश्वर हे निरुपणात्मक किंवा विचाराअंती काढलेलं अन्य इंटरप्रिटेशन वाटलं. प्रथम वाचनात माझ्या मनात विचार आला होता की "हे आंतरजालीय मैत्रीवर आहे असं दिसतंय, त्यामुळे कोण बुवा हा आंतरजालीय मित्र असे सूचक चवकशीवजा प्रतिसाद येतात की काय?!" पण देवाचं मुळातच काही आहे वाटलं नाही. केवळ अक्षरांमधे घडणारा संवाद देवाशी रिलेटेड वाटत नाही. निदान प्रथम अर्थ तरी तसा नसावा. त्यामुळे सारवासारव म्हणून व्हर्च्युअल मैत्री हा मुद्दा नंतर पुढे आला हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गवि,

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 14:53 नवीन
मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!
या ओळींचा अर्थ तुला काय वाटतो? चिन्मय कुणाला म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

च्यायला

चाणक्य
Fri, 01/18/2013 - 15:41 नवीन
मला तर मृण्मय कोणाला म्हणतात ते पण नाही माहिती? (ईनिगोय ताई, ह्.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हेच काय दोघ

स्पा
Fri, 01/18/2013 - 15:52 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

असावेत!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 16:24 नवीन
पण त्यांच नातं `रिअल' असेल, वर्च्युअल किंवा अक्षर वगैरे नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाळ सप्रेजी, बहोत खुब!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 13:24 नवीन
त्यामुळे तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडता येतो.. फक्त आपला मुद्दा एखाद्याला पटला नाही तर वैयक्तिक रोष नसावा इतकच.. विचाराच्या कक्षा रुंदावणे म्हणजे तरी काय.. तुम्ही जी पुस्तक वाचलीत त्यातले विचार प्रभावीपणे मांडलेले असल्यामुळे कुठेतरी जुन्या विचारांना धक्का दिला गेला ना?? त्यामुळे नुसते श्रद्धा जोपासू देणे (आस्तिक/नास्तिक दोन्हींच्या) हे पटत नाही..
हे अत्यंत खास आहे
  • Log in or register to post comments

संक्षी धन्यान बरच काही लिहिलं

स्पंदना
Fri, 01/18/2013 - 16:24 नवीन
संक्षी धन्यान बरच काही लिहिलं आहे. मलाही थोडफार तसच वाटतं. तरीही काही सांगायचा प्रयत्न. धन्याने उल्लेखलेला "मरून रोब", मलासुद्धा उल्लेखायचा होता. ज्या एका लेखाने तुमची ओळख झाली. काहीतरी वेगळा विचार मांडणे, त्यावर हिरीरीने चर्चा करणे. बहुतेकदा त्याचा अतिरेकही जाणवला.पण तो मुद्दा इथे नाही. तुमचा विश्वास, तुमची मते तुम्ही मांडणे इथवर सगळ ठिक. पण मग अचानक तुम्ही तुटुन पडलात कश्यावर तरी. ते ही राहुदे. होतय काय तर जे "तुम्ही" होतात ते बदललात. नुसतेच कुठेतरी एक "वाईट" भावना घेउन "धुइइल्ल्या" सुरु झाला. लक्षात येतय का मी काय म्हणतेय ते? "तुम्ही" राहिला नाहीत. डु नॉट लुज युऑर सेल्फ. मला विचाराल तर दुसर्‍यान आपल्याला कस पाहिलं या पेक्षा मी मला कसा पाहतो हे जास्त महत्वाच. अन तुम्ही आज स्वतःला पाहाल तर ओळखु नाही शकणार.
  • Log in or register to post comments

अपर्णा!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 17:17 नवीन
तुझी ओळख झाली ती `मरून रोब' वरच्या प्रतिसादानं! कथेनं निर्माण केलेल्या माहौलवर तू प्रतिसाद दिला होतास (आणि अन्फॉरच्युनेटली..त्याच प्रतिसादात तिथल्या माहौल बदलवणार्‍या प्रतिसादाला श्रीफल आणि शाल अर्पण केली होतीस) अध्यात्मात एक बेसिक फंडा आहे. स्वतःची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका! त्यामुळे मी स्वतःची व्याख्या करत नाही (आणि कुणी केली तर तो त्याचा प्रश्न आहे म्हणून सोडून देतो). सो आय वोंट चेंज! `मरून रोब' ते `बुद्ध' हा एकच माहौल आहे त्यात काहीही बदल नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार...

धन्या
Fri, 01/18/2013 - 17:29 नवीन
अध्यात्मात एक बेसिक फंडा आहे. स्वतःची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका!
"स्वतःची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका" हेच जर "मी कोण आहे याची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका" असं वाचलं तर "मी कोण?" याचं उत्तर हिंदु किंवा वैदिक अध्यात्म "अहं ब्रम्हास्मि" किंवा "चिदानंदरुपो शिवोहम" असं देतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

'अक्षर' हे नेमकं काय आहे,

इनिगोय
Fri, 01/18/2013 - 16:29 नवीन
'अक्षर' हे नेमकं काय आहे, याबद्दल इथे चर्चा चाललीय म्हणून हा खुलासा. अक्षर हे संपूर्णपणे एकमेकांचे व्हर्च्युअल स्नेही असणार्‍या दोन लोकांचं मनोगत आहे. निव्वळ शब्दांच्या माध्यमातून, व्हर्च्युअली कनेक्टेड राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात ते असावं. माझ्या शैलीप्रमाणे ते काहीसे काव्यात्म झाले आहे, तेच अपर्णा अक्षय यांनी नेमक्या शब्दांची निवड करून गद्यात मांडले आहे. रणजित चितळे यांच्यापासून दादा पेंगट यांच्यापर्यंत सगळ्यांनाही त्यात हाच अर्थ दिसला. दादांच्या प्रतिक्रियेत तर 'कधीही भेट न झालेल्या पण जीवाभावाच्या' मित्राचा उल्लेख आहे. इथे ही दोन नावं मुद्दाम घेते आहे, कारण या दोन मंडळींचा माझ्याशी मिपाकर या पलीकडे परिचय नाही, सो मी सोयिस्कर प्रतिक्रिया उचलल्या, हे कोणी म्हणू नये. त्यामुळे इथे चर्चेत असलेला मुद्दा, तो लेख देवाबद्दल आहे, आणि म्हणून मी 'देवभोळी' आहे याचा. कुठेसं कुणीसं (!) म्हटल्याप्रमाणे "लेखनाचा अर्थ हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे. एकाच वेळी काही लोक प्रशंसा करतात, त्यांना ते उपयोगी वाटतं आणि काही लोक लेखन निरर्थक आहे म्हणतात यावरनं ते सिद्ध होतं." माझ्या लेखनात उठसूट देव पाहणार्‍यांनी तो दृष्टीकोन बहुधा आपणच आपल्या डोक्यात घट्ट बसवून घेतला आहे, या शक्यतेचा विचार करावा. देव कोणी मानावा, आणि कोणी नाही "ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ती स्वतःपुरती ठेवावी. इतरांचा त्यावर विश्वास बसेलच असं नाही. पण म्हणून त्यांना खोटं ठरवायचं कारण नाही. ज्यांना देव हवा आहे, त्यांनी तो आपापला शोधावा. ज्यांना नकोय त्यांनी तो शोधू नये. हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे." हेच माझंही मत आहे. देव, धर्म, अध्यात्म याबद्दल आपली मतं दुसर्‍यावर लादत राहणं मला सयुक्तिक/शहाणपणाचं वाटत नाही. आणि माझं लेखन ज्यांनी वाचलंय त्यांना हे नक्कीच माहीत आहे, की मी अशा कोणत्याही भूमिकेचा प्रचार/पाठपुरावा करण्यासाठी लिहित नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अन्य भूमिकेचा विरोध करण्यासाठीही नाही. दुसरा मुद्दा, लिहिलेल्या 'जीवलग मित्र संपर्काशिवाय कसा होऊ शकतो?' या विधानाबद्दल. 'संपर्काशिवाय मैत्री' असं कुठेही अक्षर मध्ये म्हटलेलं नाहीय. 'प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री' असं ते सूत्र आहे. तो लेख 'पूर्वग्रहदुषित' मनाने वाचायचे टाळले असते, तर कोणत्याही साक्षर माणसाला या आणि अशा इतर मौलिक प्रश्नांची उत्तरं सापडली असती. शिवाय अशी मैत्री करता येते, असा अनुभव मिपाकरांच्यातच अनेकांनी घेतलाय. अगदी गविंनीही त्यांच्या एका लेखात अशा घट्ट मैत्रीचा उल्लेख केलाय. त्यामुळे केवळ क्षीरसागरांना तसा अनुभव आला नाही, म्हणजे तो अनुभवच खोटा आहे, असं होत नाही. स्वतःच्या मर्यादित अनुभवांवरून तिथे त्या धाग्यातल्या सगळ्याच्या सगळ्या प्रतिसादकांना मोडीत काढण्यासारखं आहे हे! सहसा पोस्ट टाकून झाल्यावर प्रतिक्रिया वाचणे आणि त्यात नवे काही दिसेल ते समजून घेणे असा माझा त्या पोस्टशी संबंध उरतो. त्यामुळे इतरजण जी चर्चा/वादावादी/आणि आपल्या कुवतीनुसार चिखलफेकही करतात, त्यात माझी भूमिका केवळ वाचकाची. आणि त्याचं मी काही वाटून घेत नाही. लेख/पुस्तक/अन्य कोणतीही कलाकृती प्रत्येकच आस्वादकाला समजावून सांगत राहणे, हे मला त्या आस्वादकाच्या समजून घेण्याच्या कुवतीवरच बोट रोखण्यासारखे वाटते. त्यामुळे आजपर्यंत कधीच माझे लेख आपणहून स्पष्ट करत राहावे, हा प्रकार मी केला नाही. मात्र हे जे होतं आहे, त्यातून मिपावरचं वातावरण दुषित होणं हे मला माझ्या घरचं वातावरण गढूळ होण्याइतकं अप्रिय आहे. त्यामुळे हे सगळं लिहिणं आवश्यक वाटलं. वर बाळ सप्रे यांनी 'आपला मुद्दा एखाद्याला पटला नाही तर वैयक्तिक रोष नसावा' असा अतिशय वाजवी मुद्दा मांडला आहे. पण दुर्दैवाने आकस, किंवा दुसर्‍याला तुच्छ लेखणे, हीच जर कोणाच्या लेखनाची प्रेरणा असेल आणि त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारायची तयारी असेल (जिज्ञासूंनी अवश्य तपशील जाणून घ्यावेत) तर त्याला काय करता येईल? आपल्या मतांशी असहमती दर्शवणार्‍यांना मत्सरी, मूर्ख, भ्रमिष्ट अशी विशेषणं वापरणं ही सवय असेल, तर त्याचं काय करावं? सत्य गवसलेल्या व्यक्तींना ही परिपूर्णता कशी, आणि हे कोणतं अध्यात्म, हे सांगता येईल का? माझ्या या प्रतिक्रियेवर उत्तर काय असणार आहे, याची पूर्ण कल्पना आहे. तरीही शेवटी फक्त एकच सांगावंसं वाटतं, केवळ मी गुडघ्यावर डोकं टेकून बसल्याने सिद्ध किंवा बुद्ध झालो, असा भ्रम किती काळ बाळगणार?
  • Log in or register to post comments

तुमचा अतीदीर्घ प्रतिसाद निर्वैयक्तिक होऊ शकला असता

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 16:42 नवीन
आणि मला ही उत्तर द्यायला आनंद झाला असता ....पण शेवटी घोळ झाला !
माझ्या या प्रतिक्रियेवर उत्तर काय असणार आहे, याची पूर्ण कल्पना आहे. तरीही शेवटी फक्त एकच सांगावंसं वाटतं, केवळ मी गुडघ्यावर डोकं टेकून बसल्याने सिद्ध किंवा बुद्ध झालो, असा भ्रम किती काळ बाळगणार?
तेच विचारावस वाटतं, ही स्वाक्षरी देवभोळेपणाशिवाय काय दर्शवते?
पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे. प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच! कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा