Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Tue, 11/20/2012 - 11:49
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
यकुविषयी ती घाणेरडी बातमी इथूनतिथून पहिल्यांदा कानावर आली तेव्हापासून सुरुवातीला डिनायलमधे जाणं पसंत केलं. नंतर वर्तमानपत्राची लिंक आणि त्यातला स्पष्ट उल्लेख.. आणि सगळीकडून येणारी कन्फर्मेशन्स यामुळे एकदम लटपटायलाच होत होतं. आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय. पण अजूनही उजव्या कॉलममधे "हजर सभासद" मधे यकु दिसेल म्हणून नजर तिथे जातेच आहे. अजूनही संदेश (१ नवीन) असं पाहून क्लिक करु आणि "गवि.. हे वाचलंत का?" अशा टायटलने एखाद्या अत्रंग धाग्याची लिंक यकुने दिली असेल म्हणून डोळे तिथे फेरी मारुन येताहेत. यकुच्या युजींबद्दलच्या लेखांनी मी माझे सर्व स्केप्टिक गंड सोडून युजींच्या विचारधारेवर मनापासून विचार करायला लागलो होतो आणि स्वतःच्या अशा धारेला लागल्यासारख्या वागण्याने दचकलोही होतो. मुंबईत लोकलने प्रवास करताना एक छोटीशी भिकारी मुलगी यकुला दिसली. आपल्यालाही अशी भिकारी पोरं रोज दिसतात. पण तिला बघून यकु मात्र ढसाढसा रडला. असह्य होऊन त्याने मला फोन लावला आणि श्वास कोंडेपर्यंत रडला. समोरच्या क्षणाशी पूर्ण भिडून जगणारा आपला यकुच आहे.. यकुची मैत्रिण इजिप्तमधेही होती. इतक्या दूर असलेल्या आणि भेट शक्य नसलेल्या तिच्याशी असलेल्या अनाम नात्याची हुरहुर मला जाणवली होती. वाळूत यशवंत असे शब्द रेखाटत बसलेली तिची मुद्रा फोटोंमधे पाहून मला गलबललं होतं. जेव्हा माझी आई इजिप्तला टूरवर जाणार होती तेव्हा त्या मैत्रिणीला भारतीय साडी बांगडी आणि काय काय पाठवणार होता. ते आणूनही ठेवलं होतं बहुतेक. इजिप्तमधे सिव्हिल वॉर होऊन ते जाणं कॅन्सल झालं तेव्हा यकु काहीच बोलला नाही. मी मात्र मनात आणखी जास्त कळवळलो. त्या इजिप्तच्या अराजकामधे इंटरनेटसह तिचे सर्व काँटॅक्ट्स बंद झाले.. यकु काहीच बोलला नाही. मीही विचारायला धजावलो नाही. मिपामधे यकुचा बहि:स्थ प्राण आहे. मिपावरुन त्याचा आयडी ब्लॉक झाल्यावरही जुन्या आयडीने येऊन पहिल्या दमातच "मी मिपाशिवाय राहू शकत नाही" असं दिल खोल के कबूल करणारा यकुच आहे. रात्री दोन वाजता जडावल्या डोळ्यांनी मोबाईलवर मिपा लोड करणार्‍या माझ्यासारख्या व्यसनींना त्यावेळी मिपावर हमखास जर दिसणारा यकुच आहे. कोणताही लक्षवेधी धागा आला की त्याविषयी व्यनि करुन मला ढोसकलून जागं करणारा, निगुतीने इकडच्या तिकडच्या लिंका पेस्टवणारा यकुच आहे. मिपावरच्या धाग्यांमधे इतका दिलो जान से इन्व्हॉल्व होणारा यकुच आहे. "गुंजग्रामीचे दिवस" मधून गावाच्या धुळीत घेऊन जाणारा आणि रात्रीच्या भजनात गुंगी आणून देवळाच्या मंडपातच सर्वांना झोपवणारा यकुच आहे. "आमचा पाव एक गाव" मधे मिसळपावला शब्दशः एक गाव बनवून सर्वांच्या कल्पनेत उभं करणारा यकु आहे. शब्दाशब्दात किती प्रचंड ताकद असते ते जाणून किंवा न जाणता जबरदस्त ताकदीने शब्द लिहीणारा यकु आहे. मधेच एक सरकलेली पोस्ट लिहायला घेणारा यकु.. नव्यानव्या विचारसरणींना उत्कटपणे भिडणारा यकु.. हे काय सालं कोडं आहे ते उलगडलंच पाहिजे असं पोटतिडकीने म्हणणारा यकु.. आणि हो.. इतक्या सगळ्यानंतरही मला आजपर्यंत समोरासमोर कधीही न भेटलेला यकु.. यकुने मला मिपावर आणलं. मी प्रवासात होतो म्हणून माझ्या एका शब्दाखातर यकु माझ्याऐवजी "ब्लॉग माझा" स्पर्धेचा पुरस्कार घ्यायला त्याच्या गावापासून पूर्ण प्रवास करुन मुंबईत आला आणि माझ्याजागी शूटिंगला गेला, दिवसभर ताटकळूनही संध्याकाळी फ्रेश मनाने लोकलला लटकून केवळ माझं पुस्तक शोधायला मुंबईच्या दुसर्‍या टोकाला भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात गेला. यकुच्या प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगच्या वेळेपासून आत्तापर्यंत मला सर्वात जास्त आवडणार्‍या प्रतिक्रिया आहेत. मला आलेला पहिला स्वागताचा व्यनि यकुचा आहे आणि मला आलेले सर्वात जास्त व्यनि यकुचे आहेत. यकुच्या मिपा होमपेजवर आवडत्या लिखाणात पहिलं नाव माझ्या पुस्तकाचं आहे. माझ्या कोणत्याश्या लिखाणावर बेहद्द खूष होऊन यकुने मला एक आख्खी आरसी बॉटल लागू केली आहे. ती त्याच्यावर पेंडिंग आहे. यकु माझ्यासोबत मासे खायला सुरुवात करणार आहे. यकुला आधी इंदोरमधे आणि आता औरंगाबादेत माझ्यासोबत आणि इतर मिपामित्रांसोबत कट्टा करायचा आहे. त्याचे रिमाईंडर तो नेहमी नवे व्यनि काढून उत्साहाने पाठवतो. मी पुन्हा तीच चूक करतोय. लिखाण करण्याच्या भरात मी वर्तमानकाळावर उतरलोय. नुसतं वर्तमानकाळात लिहून आमचा तिकडचा यकु इकडे थोडाच येणार आहे ? ... एकदम भान येतं आणि यकुच्या जाण्याच्या धाग्यावर आलेल्या आणखी प्रतिक्रिया वाचतो. त्यात दिसतं की प्रत्येक मिपाकराला यकु अगदी तस्साच आणि तितकाच भिडला आहे. प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली.. . A यकुच्या पिकासावर चढवलेली ही एक कविता सापडली.. : B
  • Log in or register to post comments
  • 23070 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Tue, 11/20/2012 - 11:53

Permalink

.............................

.......................................................
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 11/20/2012 - 11:59

Permalink

प्रत्येकाशी असंख्य धागे

प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली..
नका लिहू हो असं काही. प्रचंड त्रास होतोय वाचताना..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत on Tue, 11/20/2012 - 12:10

In reply to प्रत्येकाशी असंख्य धागे by किसन शिंदे

Permalink

:(

:(
  • Log in or register to post comments

Submitted by हरिप्रिया_ on Tue, 11/20/2012 - 12:01

Permalink

(No subject)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 11/20/2012 - 12:11

Permalink

हे वाचुन असं वाटतंय की आपणच

हे वाचुन असं वाटतंय की आपणच चुकतोय समोरच्याला समजुन घ्यायला, त्याच्या प्रत्यक्ष्य दिसणा-या रुपावर भाळतोय आपण, त्या देखाव्यामागं एक अनाम भिती, आकर्षण, दुरावा, दुस्वास, हट्ट असं काही असेल याचा विचारच करत नाही, जेवढे आहोत त्यापेक्षा अजुन थोडं जास्त संशयी व्हायला हवंय. उपाय नाही त्याशिवाय दुसरा. नाहीतर ही अशी लोकं आपल्याला फसवत राहतील आणि आपल्या आयुष्याचे धागे उसवत राहतील, मग ते आवरता आवरता आपल्या नाकी दम येईल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/20/2012 - 15:46

In reply to हे वाचुन असं वाटतंय की आपणच by ५० फक्त

Permalink

तंतोतंत

तंतोतंत :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 11/20/2012 - 12:16

Permalink

मूर्ख

मूर्ख होता तो. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/20/2012 - 13:02

In reply to मूर्ख by श्रावण मोडक

Permalink

+१^n

+१^n
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 11/20/2012 - 13:22

In reply to +१^n by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मीही तसंच म्हणून पाहिलं

मीही तसंच म्हणून पाहिलं खूपवेळा. फरकच पडत नाहीये. :(
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 11/20/2012 - 13:59

In reply to मूर्ख by श्रावण मोडक

Permalink

कितने आसानी से कह दिया ...

अगर वोह बेवकुफ था, लेकीन हम और आप तो समझदार थे ना जनाब ? उसे जिंदगी से ताअरुफ करवाने के लिए नाकामियाब रहें हैं हम लोग ... :-( कैसी दोस्ती निभाई हमलोगोंने :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 11/20/2012 - 15:47

In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा

Permalink

भावना

भावना समजू शकतो. बाकी येथे बोलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 11/20/2012 - 21:43

In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा

Permalink

असहमत

असहमत
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Tue, 11/20/2012 - 12:18

Permalink

संवेदनशीलता हे पाप आहे

आताच्या काळात इतके संवेदनशील राहणे हेच मुळात पाप आहे असे वाटू लागलंय. कितीही भावना मनात आल्या तरी व्यक्त न करता येणे किंवा लोक आपल्याला काय म्हणतील ह्या विचाराने त्या मनातच दाबल्या जातात आणि मग त्यांचा असा नको तेव्हा उद्रेक होतो. यकुचे तेच झाले असावे. अशी माणसे कितीही चांगली असली तरी त्यांना काळाबरोबर जुळवून घ्यायला अवघडच जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Tue, 11/20/2012 - 12:32

Permalink

वेगळी श्रध्दांजली

यकुच्या आतापर्यंत मिपावर प्रकाशीत झालेल्या लेखांची यादी / दुवे एका नवीन धाग्यावर प्रकाशीत करता येतील काय ? त्यानिमित्ताने नवीन सदस्यांना त्यांची ओळ्ख होईल आणी जुन्या सदस्यांना त्यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 11/26/2012 - 13:33

In reply to वेगळी श्रध्दांजली by धर्मराजमुटके

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 11/26/2012 - 13:40

In reply to +१ by शिद

Permalink

यकुचं समग्र लिखाण एकत्र खालील

यकुचं समग्र लिखाण एकत्र खालील लिंकवर वाचता येईल: http://www.misalpav.com/user/9247/authored
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Tue, 11/20/2012 - 12:39

Permalink

जगताना सगळ्यांचा होऊन

जगताना सगळ्यांचा होऊन मनापासून जगला आणि मरताना एकटा एकटा होऊन मेला आपला यकु. यार यकु, तेव्हा तुला फोन करून बोलता यायचं, वेड्यासारखा वागू नको, सांगता यायचं. आता काय करू? पुन्हा बोलू तेव्हा हे बोलू, नवं वाचलं तर तुला कळवू, त्रास होतोय का अजून हे विचारू.. आणि एकदम सगळं ठप्प. संपलंच. हे सगळं वाचून आता तरी परत यावंसं वाटतंय का तुला? पोचतंय का काही?? का केलंस असं? प्रत्येकातलं काहीतरी मरून गेलं तुझ्यासोबत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 11/20/2012 - 12:46

In reply to जगताना सगळ्यांचा होऊन by इनिगोय

Permalink

एकदा व्यक्ती गेली कि गेली ..

एकदा व्यक्ती गेली कि गेली .. कितीही हाक मारा.. काहीही करा :(
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 11/20/2012 - 12:45

Permalink

(No subject)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 11/20/2012 - 12:46

Permalink

माझा त्याचा व्यनी-मनीच्या

माझा त्याचा व्यनी-मनीच्या गोष्टीं करण्या इतका घनिष्टं संबंध नव्हता. पण यक्कु अधुन मधुन खवतुन, चेपुवरुन डोकावून जायचा. त्याचं हे असं अचानक जाणं माझ्या मनाला इतका चटका लावून गेलय तर तुम्हा सर्वांची काय अवस्था असेल हे मी पुरेपुर जाणतो. :(
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Tue, 11/20/2012 - 14:34

In reply to माझा त्याचा व्यनी-मनीच्या by गणपा

Permalink

अगदी असेच!

अगदी असेच माझ्या बाबतीतही झाले. १-२ खरडी आणि धाग्यावरचा संवाद याखेरीज जास्त संबंध नसूनही यकुबद्दल कळकळ वाटायची. त्याचं लिखाण अस्वस्थ करून जायचं. मनात आशा होती की त्याच्या मनातलं हे वादळ लवकरच शमेल आणि तो शांत होईल. पण त्यानेच स्वतःला शांत करून टाकलं. काल ही दुर्दैवी बातमी कळल्यापासून कश्यात मन लागत नाहीये :( ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 11/20/2012 - 12:46

Permalink

............

भाड्याने जिवाचे पाणी केले आज!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 11/20/2012 - 12:50

Permalink

चीड..

आज अत्यंत चीड येतेय स्वतःची.. त्याच्या भरकटलेल्या धाग्यांवर त्याची खिल्ली उडवणार्‍या प्रतिक्रीया वाचून करमणूक व्हायची, त्याची.. हळूहळू त्याचाशी होणार्‍या खव-गप्पा कमी केल्या/झाल्या, ह्याची.. कशाला, त्याच्या भरकटलेपणावरुन सुचलेल्या कवितेची.. सगळ्याचीच.. सॉरी दोस्ता, तूला समजून घेण्यात आमचीच संवेदनशीलता कमी पडली असेल कदाचित. तू तर साला, "एकदा मरण्याचा अनुभव घेऊन बघूयात" म्हणूनही कदाचित त्याच्या कुशीत झेपावला असशील.. :-( असो, आहेस तिथे तरी सुखात, आनंदात रहा..
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 11/20/2012 - 12:53

Permalink

सॉरी दोस्ता, तूला समजून

सॉरी दोस्ता, तूला समजून घेण्यात आमचीच संवेदनशीलता कमी पडली असेल >>. हेच आणि असेच !!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 11/20/2012 - 12:56

Permalink

मन उदास झाले सारे वाचुन......

मन उदास झाले सारे वाचुन.............
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Tue, 11/20/2012 - 12:57

Permalink

प्रत्यक्ष ओळख जरी नसली

प्रत्यक्ष ओळख जरी नसली तरी हे वाचून खूप त्रास झालाय... त्याचे लेख वाचताना काहीतरी वेगळेपणा जाणवायचा पण तो असे काही करून बसेल असे वाटलेसुध्दा नाही जेव्हा पासून ही बातमी समझली तेव्हापासून मन उदास आणी खिन्न झाले आहे :(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/20/2012 - 13:20

Permalink

फार त्रास होतोय जीवाला.

फार त्रास होतोय जीवाला.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 11/20/2012 - 13:23

Permalink

मिपावर आल्यापासुन

हा दुसरा सदस्य. पहिले भोचक अपघातात गेले. ह्याने स्वतःला अपघात केला.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Tue, 11/20/2012 - 13:35

Permalink

पण हा काही पर्याय होऊ शकतो का

:( पण हा काही पर्याय होऊ शकतो का ? प्रत्येकालाच आपले दुख्ख खुप जास्त आहे असे वाट्त असते. जाणारा फक्त एकदाच जातो आणि मागे राहिलेले आप्तस्वकीय मात्र क्षणाक्षणाला रोजच मरत असतात त्यान्च्या आठवणीन्नी.........:(
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 11/20/2012 - 13:56

Permalink

हसास दिल ...

मिपा के जरिये एक हसास तेहरीर लिखने वाले शख्स से मुलाकात होती रहीं .. हम अक्सर अपनी धुनमें गलत नजरियात किसी के बारेमें कायम कर लेते हैं .. 'मुर्ख होता तो' बडे आसानी से मोडक साहब ने कह दिया :-( काश खुदा उसका दिल पलट देता .. जिंदगी से तो वोह भी प्यार करता था ..बडा अजीब था वोह मगर जिंदगी के गहराईंकों समेंटें हुए था ..अगर वोह बेवकुफ था तो क्या हम में से कोई समझदार उसे समझाने में नाकामियाब न रहा ? :-( खुदा जिसको हसास दिल अता करता हैं, वोही यह सोच रख सकता हैं, आंसुओंका खिराजभी वही देता हैं .यकु, एक भिकारी बच्ची को देख कर फुट-फुट कर रो सकता था. खुदा हम सबकी सोचको पॉसीटिव्ह बनाये रखें ! MAY HIS SOUL REST IN PEACE ! Aameen !! (हसास दिल : Sensitive heart , तेहरीर : लेख ) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by नक्शत्त्रा on Tue, 11/20/2012 - 14:05

Permalink

ही बातमी समझली तेव्हापासून मन

ही बातमी समझली तेव्हापासून मन उदास झाले आहे...आताच्या काळात संवेदनशील राह नये. यकुच्या आतापर्यंत मिपावर प्रकाशीत झालेल्या लेखांची यादी / दुवे एका नवीन धाग्यावर प्रकाशीत करता येतील काय ? त्यानिमित्ताने नवीन सदस्यांना त्यांची ओळ्ख होईल आणी जुन्या सदस्यांना त्यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देता येईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 11/20/2012 - 14:06

Permalink

... !!!

काय बोलू... काहीच सुचत नाहीये :( :( :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Tue, 11/20/2012 - 14:07

Permalink

(No subject)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Tue, 11/20/2012 - 15:06

Permalink

मरण्यापेक्षा जगण्यासाठी अधिक

मरण्यापेक्षा जगण्यासाठी अधिक धैर्य लागावं असं का होतं कधी कधी.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Tue, 11/20/2012 - 15:07

Permalink

श्रध्दांजली

यकु ला श्रध्दांजली.सद्गती मिळो.
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Tue, 11/20/2012 - 16:31

Permalink

.....

यकु, आता तरी शांत हो बाबा...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/20/2012 - 16:36

Permalink

वाईट वाटले

वाईट वाटले मनापासून वाईट वाटले माणसाने ह्या जगात मनस्वी ,असूच नये निबर होऊन जगणे सर्वथा योग्य
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 11/20/2012 - 17:05

Permalink

नको झालाय स्वतःचा विवेक. नको

नको झालाय स्वतःचा विवेक. नको झालाय भिडस्तपणा . कुणी बोलो न बोलो, एक आई म्हणुन कळा सोसलेली मी इथुन पुढे कुनी फरफटतय अस वाटल तर जरुर बोलणार. यशवंतलाही सांगत होतेच, पण त्यान नका सांगु म्हण्टल म्हणुन दुरावा केला. पण काय्म त्यच्या खरडी वाचल्या. कायम त्याच काय चाललय ते पाहिल. समजत होत उमजत होत पण हरामी इगो मध्ये आला का काय कुणस ठाउक. शेवटचा संवाद दसर्‍याच्या शुभेच्छा अन त्याच आलेल ठसकेदार "ठ्यँक्यु" वर एक जोडीला हसरी स्मायली. जास्त कुणाच्या खवत नसते मी, पन तेव्हढी सेन्सिइटीव्हीटी आहे समजुन घ्यायची. सगळ्या तरुण पोरांना एकच साम्गण वयाच्या चाळीसाव्य वर्षी साधारण तुमचा तुमच्या जगण्यावर हक्क आहे. तोवर तुमच जगण हे आईबापासाठी. एव्हढ मोठ करुन घेतल्यावर, अशी त्यांच्यावर पाठ नका फिरवु. हेअसक्ल ओझ नका उचलायला लाउ. प्लिज.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/20/2012 - 18:40

In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना

Permalink

आपाताई,

आपाताई, प्रत्येक व्यक्तीचं एक प्रारब्ध असतं. जेवढी वेळ लिहीलेली असते ना त्या उप्पर एक क्षण देखील 'जेल'मध्ये राहू नाही शकत. लगेचच दुसरीकडं रवाना व्हावंच लागतं. वाईट एवढंच की स्वतःच्या हातांनी असं मातेरं करुन घ्यायची गरज नाही. येणारा क्षण येतोच... तुम्ही हो म्हणा अथवा कितीही पळण्याचा प्रयत्न करा. जावं लागणार आहेच. मात्र असं 'पळण्याचा' प्रयत्न केला तर 'परत यावं' लागतंच. असो. हा वेगळा विषय आहे. सांगायचं एवढंच की स्वतःला अपराधी मानू नका...! ज्या त्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार जी ती गोष्ट घडत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Tue, 11/20/2012 - 19:05

In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना

Permalink

कुणी बोलो न बोलो, एक आई

कुणी बोलो न बोलो, एक आई म्हणुन कळा सोसलेली मी इथुन पुढे कुनी फरफटतय अस वाटल तर जरुर बोलणार.
अपर्णा, अगदी हेच. यकुला एवढंतरी देणं लागतोय आपण. कोणी कितीही नाराज झालं, गप्प बस म्हणलं तरी आपण बोलायला हवं. यकुच्या बाबतीत बहुतेकांना हेच वाटतंय, थोडं आणखी सांगायला, बोलायला, खडसावायलाही, पाहिजे होतं. आपण सगळेच त्याला नॉर्मलला आणायला प्रयत्न करत होतो. अजून थोडा केला असता, तर याही वेळी सावरला असता. असता, नसता, निदान आपली बोच कमी झाली असती. याला सांभाळलं पाहिजे, असं जरा जरी कोणासाठी वाटलं, तर प्लीज बोला, तुम्हाला नाही जमलं तर कोणाला तरी सांगा. पण गप्प राहू नका. हसत हसत एखाद्याला 'वेडा आहे हा..' असं म्हणताना तो कदाचित खरंच कोणत्या तरी टोकावर उभा असेल या शक्यतेचाही विचार करा.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Tue, 11/20/2012 - 17:26

Permalink

वाईट्ट

वाईट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 11/20/2012 - 18:04

Permalink

(No subject)

:(
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 11/20/2012 - 18:08

Permalink

हम्म...

हम्म...
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Tue, 11/20/2012 - 18:15

Permalink

थोडा अंदाज येतोय

पण नक्की काय झाल हे कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Tue, 11/20/2012 - 18:18

Permalink

यशवंता..

काय केलंस रे हे यशवंता...
  • Log in or register to post comments

Submitted by अशोक पतिल on Tue, 11/20/2012 - 18:28

Permalink

फार वाइट बातमी ....

फार वाइट बातमी .... शेवटी मानवी मनाचा थांगच लागत नाही . एक उमदं व्यक्तिमत्व गेलं ... यकुच्या आत्म्याला शांती लाभो !
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Tue, 11/20/2012 - 18:30

Permalink

समाधी

मनाचा रोग आधी आहे, शरीराचा रोग व्याधी आहे, पदाचा रोग उपाधी आहे आणि या तीनही रोगांवर औषध समाधी आहे. ज्ञानवंतांचा विश्वास आधी, व्याधी, उपाधी यावर नसतो, तर समाधीवर असतो. समाधी म्हणजे आपण स्वत: मृत्यूला दिलेले निमंत्रण असते. मृत्यू आणि समाधी यात फरक आहे. जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणे म्हणजे मृत्यू आहे आणि जीर्ण वस्त्र टाकणे; पण नंतर नवीन वस्त्र धारण न करणे म्हणजे समाधी आहे. दिवंगत पत्रकार व सक्रिय मिसळपाव सदस्य श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी हे खर्‍या अर्थाने ज्ञानवंत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Tue, 11/20/2012 - 19:13

In reply to समाधी by चेतन सुभाष गुगळे

Permalink

हे वाचा -

इथे पहा : http://www.misalpav.com/comment/437625#comment-437625
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 11/20/2012 - 18:47

Permalink

वाईट बातमी

फारच दुर्दैवी घटना. :( मृतात्म्यास श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 11/20/2012 - 20:08

Permalink

अरे काय रे हे...

यक्या, अरे असं कुठलं सुख-दु:ख असह्य झालं तुला, असली कसली घाई होती, कि इतक्या सगळ्या सुहृदांच्या मनाची हाक तुला थांबवु शकली नाहि... अरे फार थोड्यांना मिळतं रे असं भाग्य. लिमाऊजेटचा काहि पत्ता?? तिची हालत पण फार वेगळी नसेल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com