✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

आ
आनंद घारे यांनी
Tue, 01/15/2013 - 22:52  ·  लेख
लेख
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते. रक्ताच्या गुणधर्मांचे हे नियंत्रण केंव्हा आणि कसे केले जाते याबद्दल ढोबळ स्वरूपाची सर्वसाधारण माहिती या लेखात दिली आहे. पूर्वीच्या म्हणजे माझ्या आधीच्या पिढीच्या काळात रक्ताची तपासणी करणे सहजसाध्य नव्हते आजकाल शहरात राहणार्‍या लोकांच्या मुलांच्या रक्ताची तपासणी त्या मुलांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होते. मुलाची माता आणि पिता यांचे रक्तगट वेगवेगळे असतील आणि ते गट एकमेकांचे शत्रू असतील तर त्या मुलाच्या आईच्या शरीरातच मुलाच्या रक्ताच्या अँटीबॉडीज तयार होऊ लागतात आणि त्या मुलाला गर्भामध्येच त्रास सुरू होतो. त्यांचे रक्तगट माहीत असले किंवा तपासणीमधून समजले तर त्या संभाव्य धोक्याच्या निवारणासाठी आधीपासून उपचार सुरू केले जातात. पूर्वीच्या काळात ही चिकित्सा ठाऊक नसल्यामुळे काही कुटुंबांमधली मुले जन्माला येण्यापूर्वीच दगावत असत, काही वेळा मातेचाही जीव जात असे आणि त्याचा सगळा.दोष त्या दुर्दैवी मातेला दिला जात असे. गर्भामधील बाळाची वाढ होत असतांना त्याच्या हृदयाचे ठोके पडणे सुरू झाले की आजकालच्या तंत्राने ते मोजले जाऊ लागतात आणि त्यावरून त्याच्या आरोग्याची माहिती मिळते. त्या बाळाच्या शरीरात होत असलेल्या रक्ताभिसरणाची माहिती डॉपलर सोनोग्राफीमधून मिळते आणि आवश्यक असल्यास त्यावर औषधोपचार केले जातात. लहान मूल असो की मोठा माणूस, कोणालाही आलेला ताप, खोकला, अशक्तपणा वगैरेसारख्या व्याधी जास्त रेंगाळल्या तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्यात कधी हिमोग्लोबिन कमी निघते, तर कधी इसोनोफिलिया काउंट जास्त निघतो, थायरॉईडमधून निघणारे हार्मोन्स कमी किंवा जास्त सापडतात, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम वगैरेंची उणीव असते. असे अनंत दोष रक्तात सापडू शकतात. रक्तामधला अशा प्रकारचा असमतोल एक दोन दिवसात सुधारत नाही. त्यासाठी महिनाभर किंवा काही महिने औषधोपचार, पथ्यपाणी वगैरे सांभाळावे लागते. या उपचाराने रक्तामधल्या कमतरतेत सुधारणा झाली तरी आपल्याला ती थेट जाणवत नाही आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा रक्ताची तपासणी करून पहावी लागते. सुरू केलेल्या औषधाचा डोस बदलायचा किंवा औषध थांबवण्याचा निर्णय रक्ताची तपासणी करून त्यावरून घेतला जातो. काही मुलांना जन्मापासूनच असलेल्या थायरॉइड्सच्या काही आजारांत किंवा एका प्रकारच्या मधुमेहात जन्मभर औषध घ्यावे लागते. थॅलेसेमिया या आजारात जन्मभर बाहेरून रक्त द्यावे लागते. ज्यांची दोन्ही मूत्रपिंडे कामातून गेली आहेत अशा रुग्णांच्या रक्ताचे डायालिसिस करून ते शुध्द करून घ्यावे लागते. अशा प्रकारचे काही रोग पूर्वी असाध्य समजले जात. आता त्यांच्या रुग्णांच्या रक्तावर नियंत्रण ठेऊन त्या रोगांचे मॅनेजमेंट केले जाते. आजकालची सुखासीन जीवनशैली आणि वाढता मानसिक ताण यामुळे उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) या व्याधींच्या प्रमाणात असंख्यपटीने वाढ झाली आहे. मधुमेहामध्ये शरीरात तयार होणारे इन्शुलिन कमी पडल्यामुळे रक्तामधल्या साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही. यामुळे इंद्रियांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. बैठे काम करतांना ही गोष्ट कोणाच्या लक्षातही येत नाही. पण यामुळे डोळे, पाय, मूत्रपिंडे वगैरे निकामी झाल्यानंतर ते समजले तर तोवर फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आता सर्वच वयाच्या लोकांनी अधून मधून आणि चाळिशी उलटून गेल्यानंतर निदान वर्षातून एकदा रक्तशर्करेची तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात. साखरेचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे या तपासणीत दिसून आले तर मधुमेहाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसतांनासुध्दा खाण्यावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही गरज असल्यास औषधोपचार घेऊन ते कमी करणे आवश्यक असते. यामुळे मधुमेह कायमचा बरा झाला किंवा शरीरात तयार होणारे इन्शुलिन वाढले असे कदाचित होणार नाही, पण रक्तामधले साखरेचे प्रमाण मर्यादेत राहिले तर त्यामुळे शरीरामधल्या सर्व इंद्रियांना होणारा अपाय आपण टाळू किंवा कमीत कमी करू शकतो. शरीराची होणारी झीज भरून काढण्याची मर्यादित क्षमता निसर्गाने त्याला दिलेली आहे. वाढत्या वयाप्रमाणे ती कमी कमी होत जाते. त्यामुळे आधी फक्त व्यायामानेच रक्तामधील साखरेवरील नियंत्रण होत असले तर काही काळाने त्याला पथ्याची जोड द्यावी लागते, त्यानंतर नियमितपणे औषध घेणे आवश्यक होऊन बसते. या औषधांमुळे रोग बरा होत नाही, फक्त तो नियंत्रणाखाली राहतो. यामुळे रक्तामधली साखर तपासल्यावंतर ती लिमिटमध्ये दिसत असली तरीसुध्दा ही औषधे घेत रहावे लागते. एकदा सुरू केल्यानंतर बहुधा ती कायमची मागे लागतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काही रुग्णांच्या बाबतीत याच्या पलीकडली अवस्था येते. औषध घेऊनसुध्दा त्यांचे शरीर जास्त इन्शुलिन तयार करू शकत नाही. अशा रोग्यांना थेट त्यांच्या रक्तात इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घुसवावे लागते. नियमितपणे तपासणी करून आहार आणि इन्शुलिन यांचे प्रमाण आणि वेळा ठरवून त्या पाळाव्या लागतात. त्यात हयगय झाली की शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था होते. त्यामुळे मधुमेह झालेले बहुतेक लोक रक्तातल्या साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेऊन एरवी मात्र आपले आयुष्य सुखेनैव जगत असतात. मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब हासुध्दा दुसरा गनिमी शत्रू (सायलंट किलर) आहे. लहान मुलांचे सर्व शरीरच खूप लवचिक असते. माणसाचे वय जसजसे वाढते तसा हा लवचिकपणा कमी होऊन ताठरपणा वाढत जातो, त्याची हाडे ठिसूळ होतात, मांसल भाग ताठर होतात आणि रक्तवाहिन्यासुध्दा निबर होतात. त्या लवचिक असतांना त्यातल्या रक्ताचा दाब वाढताच त्या किंचित फुगल्या की आपोआपच तो दाब कमी होत असतो. पण हा लवचिकपणा कमी झाल्यानंतर त्यांचे प्रसरण आणि आकुंचन पावणे कमी प्रमाणात होते. यामुळे उतार वयात रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता जास्त असते आणि तो आपोआप बरा होत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातला रक्तदाब सारखा नसतो आणि तो क्षणोक्षणी बदलत असतो. त्यामुळे त्यात पडलेला लहान सहान फरक कोणाला समजतही नाही. तो फारच जास्त वाढला तर मात्र अस्वस्थ वाटू लागते आणि त्या वेळी डॉक्टरने तपासणी केल्यास तो समजतो. फार काळ तो जर तसाच राहिला तर त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे लहानसहान तक्रारी न उद्भवता शरीरातल्या एकाद्या भागातल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि थ्राँबॉसिसचा मोठा धोका उद्भवतो. यामुळे मेंदूमधला रक्ताचा पुरवठा थांबला तर पक्षघाताचा (स्ट्रोक किंवा पॅरॅलिसिस) झटका येतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळाले नाही तर त्याची क्रिया बंद पडते. हे धोके टाळण्यासाठी रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे लागते. याचे नियंत्रण हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे आणि यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. त्यातले कोणते निवडायचे आणि ते किती प्रमाणात घ्यायचे हा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरच देऊ शकतात. ही औषधेसुध्दा उच्च रक्तदाबा हा रोग बरा करत नाहीत, त्यावर नियंत्रण ठेवतात. यामुळे ही औषधेसुध्दा सुरू झाल्यानंतर बहुधा ती कायमची मागे लागतात. पाण्याचा प्रवाह नळामधून वाहण्यासाठी त्याला पंपाने दाब द्यावा लागतो, हे प्रेशर पुरेसे नसेल तर नळाचे पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही किंवा तोटीमधून अगदी कमी जोराने येते हा अनुभव आपल्याला असतो. आपल्या शरीरात पसरलेल्या असंख्य रक्तवाहिन्या आणि त्यांच्या सूक्ष्म अशा शाखा, उपशाखा वगैरेंमधून रक्ताचा पुरेसा प्रवाह वाहण्यासाठी हृदयाला जोर लावून रक्तावर दाब द्यावा लागतो. रक्त जर दाट असेल तर जास्त दाब द्यावा लागतो आणि ते पातळ असेल तर कमी दाब पुरतो. सशक्त माणसाचे हृदय जे काम सहजपणे करू शकते ते दुर्बल झालेले हृदय करू शकत नाही. याचा विचार करून ज्या लोकांना मेंदू किंवा हृदयाचे विकार होऊन गेले आहेत किंवा होण्याची दाट शक्यता आहे असा लोकांना विशिष्ट औषधे देऊन त्यांचे रक्त पातळ ठेवले जाते. त्यायोगे रक्तावरला दाब कमी होतो. शरीरातले रक्ताभिसरण सतत चालत राहिलेले असले तरी काही रोग्यांच्या हृदयात किंवा इतर एकाद्या भागातले रक्त काही काळ स्थिर (स्टॅग्नंट) राहते की काय अशी शंका डॉक्टरांना येते. शरीरात किंवा बाहेर कोठेही रक्त स्थिर राहिले की ते गोठायला सुरुवात होते. अशा प्रकारे तयार झालेली रक्ताची गाठ एकाद्या अरुंद जागेत अडकली तर तिथला रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. असे झाल्यास अनवस्था प्रसंग उद्भवतो. हे होऊ नये यासाठी रक्ताचे गोठणे (कोअॅग्युलेशन) कमी गतीने करणारी औषधे घेऊन रक्ताचा गोठणे हा गुणधर्म जाणूनबुजून बदलला जातो. मात्र या दोन्ही औषधांमुळे ती घेणा-या रोग्यांना रक्तस्त्राव झाला तर तो लवकर थांबत नाही. तो होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास ही औषधे काही काळ थांबवावी लागतात. रक्तामध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण कमी केले तर त्यामुळेही रक्ताची व्हिस्कॉसिटी कमी होते. म्हणून रक्तदाब असलेल्या रोग्यांना कमी मीठ असलेले अळणी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, तसेच त्यांच्या रक्तातले जास्तीचे मीठ शक्य तितक्या लवकर रक्ताच्या बाहेर काढणारी औषधे दिली जातात. रक्तामधल्या स्निग्धपदार्थांचे प्रमाण आवश्यकतेहून जास्त झाले तर त्याचे कण शरीरातल्या काही ठिकाणच्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला चिकटून बसतात. त्यामुळे त्या अरुंद होतात. पाण्याच्या पाइपांमध्ये गाळ साठला तर त्यातून वाहणार्‍या पाण्याला अडथळा निर्माण होतो, तसेच रक्ताच्या बाबतीत होऊन त्याचा प्रवाह कमी होतो. हे होऊ नये यासाठी रक्तामधल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणारी औषधे दिली जातात. .तरीही त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेजेस) निर्माण झाले असावेत असे वाटले तर अँजिओग्राफी करून ते शोधले जातात आणि अँजिओप्लास्टीने ते काढले जाणे आता शक्य झाले आहे. ही खूप खर्चिक आणि कष्टदायक उपाययोजना असली तरी अनेक लोकांचे आयुष्य त्यामुळे वाढते. हृदयामधून निघालेले रक्त शरीरामधील दूरपर्यंतच्या भागात जाऊन पोचण्यासाठी त्यावर पुरेसा दाब द्यावा लागतो, पण तो दाब प्रमाणाबाहेर गेला की त्यातून धोके निर्माण होतात. यामुळे औषधोपचार करून तो कमी करावा लागतो हे आपण पाहिले. पण अशा रीतीने कमी केलेल्या दाबामुळे रक्ताचे अभिसरण कमी प्रमाणात होते. त्यामुळे हाताची किंवा पायाची बोटे सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात, मेंदूला कमी रक्त मिळाले तर तो तल्लखपणे काम करत नाही, असेसुध्दा होते. याकडे लक्ष ठेऊन हलकासा व्यायाम, प्राणायाम, जीवनसत्वांचे सेवन वगैरेंच्या मार्गाने त्या अवयवांपर्यंत जास्त प्राणवायू पोचवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात. शरीरातले रक्त सगळीकडे खेळवत रहावे लागते. आयुर्वेदिक उपचार आणि योगासने यांनी उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) हे दोन्ही रोग पूर्णपणे नाहीसे होतात असा दावा केला जातो. काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित तसे होत असेलही. पण अशा आश्वासनावर विश्वास ठेऊन औषध घेणे थांबवले आणि त्यानंतर जास्तच कठीण परिस्थिती उद्भवली असा अनुभव आलेले लोकही भेटतात. शरीरामधील पेशींना आवश्यक तेवढा प्राणवायू रक्ताभिसरणामधून पुरवला जातो. शारीरिक श्रम करतांना जास्त प्राणवायूची गरज भासते. ती भागवण्यासाठी फुफ्फुसामधून जास्त वेगाने आणि जोरात श्वास घेतला जातो आणि हृदयही अधिक वेगाने काम करून दर मिनिटाला जास्त वेळा रक्ताचा पुरवठा करते. आपल्या शरीरामधल्या विशिष्ट ग्रंथी आपल्या नकळत हे काम करवून घेत असतात. धावत असतांना आपल्याला दम लागतो आणि नाडीचे ठोके जास्त पडत आहेत एवढेच पाहिल्यास समजते. थोडा वेळ विश्रांती घेताच दोन्ही क्रिया पुन्हा पूर्ववत होऊन जातात. पण या क्रियांवर नियंत्रण ठेवणार्‍या ग्रंथींमध्ये बिघाड झाला किंवा संसर्गजन्य रोग किंवा अॅलर्जिक रिअॅक्शनसारख्या कारणांमुळे कोणाकोणाला कारण नसतांना दम लागतो तर कोणाकोणाच्या नाडीचे ठोके जलद किंवा हळू पडू लागतात. ते फार वेळ जलद पडले तर हृदयाच्या स्नायूंना थकवा येऊ शकतो आणि फार हळू पडले तर मेंदूसहित कुठलेच इंद्रिय व्यवस्थित काम करू शकत नसल्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडतात. या कारणाने नाडीचे ठोके म्हणजेच हृदयाचे स्पंदन सुव्यवस्थितपणे चालत राहणे अत्यंत महत्वाचे असते. यात घोटाळा झाला तर त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करून औषधोपचार करावे लागतात आणि काही रोग्यांच्या बाबतीत ते उपचार जन्मभर चालू ठेवणे आवश्यक असते. जास्तच गरज असल्यास कोणाला ऑक्सीजन सिलिंडरमधून कृत्रिम रीत्या जास्त प्राणवायू देतात, तर कोणाला पेसमेकर बसवून त्यात्या हृदयाला ठराविक वेगाने संदेश (इम्पल्सेस) देतात. रक्तप्रवाह आणि श्वासोच्छ्वास यात सुधारणा घडवून आणण्यासाठी फिजिओथेरापीचा उपयोगही केला जातो. क्वचित काही रोग्यांच्या हृदयाचे ठोके कधी संथ तर कधी जलद अशा अनियमित गतीने पडू लागतात. त्यावरही इलाज केले जातात. अशा रीतीने आपल्या शरीरामधील रक्तामधले घटक आणि त्याचे अभिसरण यांचेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे बहुतेक काळ आपले शरीर स्वतःच हे काम चोख रीतीने करत असते. त्यात होणारे किरकोळ बदल आपोआप ठीक होऊन जातात आणि आपल्याला ते समजतही नाहीत. पण हे ठीक करणे शरीराच्या क्षमतेच्या बाहेर गेले तर मात्र ते बदल वाढत जातात आणि त्यातून होणारे परिणाम घातक रूप धारण करू शकतात. त्यापूर्वीच ते कळणे आता वैद्यकीय तपासण्यांमधून साध्य झाले आहे. आवश्यकतेनुसार त्या करून घेतल्या आणि नियमित आहार, व्यायाम, प्राणायाम आणि औषधोपचार घेऊन रक्त आणि त्याचे अभिसरण नियंत्रणाखाली ठेवले तर आपले आयुरारोग्य वाढायला त्याची चांगली मदत होते. टीप - मी व्यवसायाने डॉक्टर किंवा वैद्य नाही आणि कधीही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. मला स्वतःला आणि माझ्या संपर्कामध्ये असलेल्या लोकांना आलेल्या अनुभवाच्या आधाराने हा लेख लिहिला आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
5942 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

खुप छान माहिती आहे . थँक्स

जेनी...
Tue, 01/15/2013 - 23:45 नवीन
खुप छान माहिती आहे . थँक्स :)
  • Log in or register to post comments

खूप चांगली आणि उपयुक्त माहिती

मनीषा
Wed, 01/16/2013 - 08:58 नवीन
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती .. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

छान माहिती.

विटेकर
Wed, 01/16/2013 - 10:02 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 01/16/2013 - 10:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Wed, 01/16/2013 - 10:24 नवीन
निष्कारण भांडाभांडी, शेरेबाजी, काड्या लावणे, आगीत तेल ओतणे, आपला धागा शतकी होण्यासाठी नैतिक-अनैतिक क्लृप्त्या वापरणे इत्यादी निरुत्साही आणि क्लेषकारक वातावरणात हा लेख म्हणजे उत्साहवर्धक आणि मिसळपाव उघडल्याचे सार्थक करणारा आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब ह्या दोन्हींशी संघर्ष करीत आयुष्याचा आनंद घेणार्‍या माझ्या सारख्यासाठी माहितीपूर्ण आहे. धन्यवाद आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

छान आणि उपयुक्त माहीती

अमित
Wed, 01/16/2013 - 10:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Wed, 01/16/2013 - 10:43 नवीन
माहितीपुर्ण लेख अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments

अतिशय माहितीपुर्ण लेख,

५० फक्त
Wed, 01/16/2013 - 11:14 नवीन
अतिशय माहितीपुर्ण लेख, धन्यवाद. पेठकर काकांना +१००० अशा प्रकारचे माहितीपुर्ण किंवा तांत्रिक लेख,जे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडुन लिहिले जातात त्यासाठी एक वेगळा विभाग करावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

अशा लेखांसाठी 'आरोग्य' नावाचे

सस्नेह
Wed, 01/16/2013 - 15:16 नवीन
अशा लेखांसाठी 'आरोग्य' नावाचे नवीन सदर सुरू केल्यास संदर्भ पाहण्याचीही चांगली सोय होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चान्गली माहिती

एकुजाधव
Wed, 01/16/2013 - 11:40 नवीन
thronboisis बद्दल माहिती देउ शकता का? ईमेल eknathj687@gmail.com
  • Log in or register to post comments

मस्त

रणजित चितळे
Wed, 01/16/2013 - 14:26 नवीन
छान. मस्त माहिती.
  • Log in or register to post comments

वाचला

मीनल
गुरुवार, 01/17/2013 - 01:21 नवीन
लेख संपूर्ण वाचला. रक्ता बद्दल फारसे काहीच माहिती नव्हते. ही माहिती मला समजण्याजोगी आहे.
  • Log in or register to post comments

चांगला लेख.

रेवती
गुरुवार, 01/17/2013 - 01:35 नवीन
चांगला लेख.
  • Log in or register to post comments

अतिशय माहीतीपूर्ण लेख

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 02:01 नवीन
अतिशय माहीतीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंद घारे
गुरुवार, 01/17/2013 - 20:30 नवीन
सर्व प्रतिसादांसाठी मी अत्यंत आभारी आहे. रक्ताचे गुणधर्म, त्याचे परीक्षण, रक्ताभिसरण, त्यांचे नियंत्रण वगैरेंबद्दलची माहिती मी चार लेखांच्या मालिकेत संकलित केली आहे. अशा रुक्ष स्वरूपाचा लेख या स्थळावर द्यावा की नाही असे मला वाटत होते. अखेर त्यामधला शेवटचा लेख मिपावर दिला आहे. इतर माहिती माझ्या ब्लॉगवर मिळू शकते. त्याचा दुवा असा आहे. http://anandghan.blogspot.in/
  • Log in or register to post comments

चांगले संकलन

पैसा
Fri, 01/18/2013 - 23:08 नवीन
कोणा डॉक्टरने या सर्वांवर काही टिप्पणी केली असती तर आवडली असती. पण असो.
  • Log in or register to post comments

मुलाची माता आणि पिता यांचे

शैलेन्द्र
Sat, 01/19/2013 - 00:34 नवीन
मुलाची माता आणि पिता यांचे रक्तगट वेगवेगळे असतील आणि ते गट एकमेकांचे शत्रू असतील तर त्या मुलाच्या आईच्या शरीरातच मुलाच्या रक्ताच्या अँटीबॉडीज तयार होऊ लागतात आणि त्या मुलाला गर्भामध्येच त्रास सुरू होतो. त्यांचे रक्तगट माहीत असले किंवा तपासणीमधून समजले तर त्या संभाव्य धोक्याच्या निवारणासाठी आधीपासून उपचार सुरू केले जातात. पूर्वीच्या काळात ही चिकित्सा ठाऊक नसल्यामुळे काही कुटुंबांमधली मुले जन्माला येण्यापूर्वीच दगावत असत, काही वेळा मातेचाही जीव जात असे आणि त्याचा सगळा.दोष त्या दुर्दैवी मातेला दिला जात असे.
या विषयी थोडी जास्त माहिती. हा सगळा घोळ "Rh (Rhesus) factor" या रक्त वर्गीकरण प्रणालीशी संबंधीत आहे. ABO प्रणालीनंतर रक्त वर्गीकरणाची ही सर्वात महत्त्वाची प्रणाली. जर लाल रक्तपेशीच्या बाह्यावरणावर Rh (Rhesus) factor असेल तर तो Rh + नसेल तर Rh - . लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा धोका जर पती Rh + व पत्नी Rh - असेल तर उदभवतो. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी जर झालेले मूल Rh +असेल तर बाळाच्या शरीरातील काही रक्तपेशी बाळंतपणाच्या वेळी नाळेतुन आईच्या शरीरात जातात. या रक्तपेशींच्या बाह्यावरणावर Rh (Rhesus) factor असतो. आईचे शरीर या रक्तपेशींना शत्रु पेशी समजते व त्या विरुद्ध " IgG anti-D antibodies" तयार करते. या "शत्रुसैन्याची" आठवण आईचे शरीर जपुन ठेवते. जर दुसर्‍या बाळंतपणात परत मूल Rh +असेल तर आईचे शरीर त्या मुलाच्या रक्तपेशींना शत्रु समजुन त्यावर हल्ला चढवते व बाळाला "hemolytic disease of the newborn" म्हणजेच नवजात अर्भकाच्या रक्त विघटणाचा रोग होतो. रक्तगट तपासण्याचा आग्रह करतात तो यासाठीच.. पण जर समजा तुम्ही प्रेमात पडलाय, तुमची प्रेयसी आर एच निगेटीव्ह आहे आणि तुम्हाला दोन मुल हवी आहेत, तर? दोन हजार रुपये तयार ठेवायचे.. उपाय असा आहे.. पहिल्या बाळातपणात जर मुल आर एच + आढळल तर लगेच, म्हणजे IgG anti-D antibodies जास्त तयार व्हायच्या आतच anti-D antibodies शरीरात टोचायच्या, यातुन अस होत की शरीराला या D antigen चे स्मरण राहत नाही व दुसरे बाळंतपणही निर्वेध पार पडते.
  • Log in or register to post comments

चांगली माहिती

आनंद घारे
Sat, 01/19/2013 - 21:43 नवीन
खूपच माहितीपूर्ण प्रतिसाद. आरएच प्रॉब्लेमवरचा उपाय फक्त दोन हजार रुपयात होत असेल तर हा फार मोठा प्रॉब्लेम राहिलेला नाही असे दिसते. लग्न जमवतांना कोणी रक्तगटाची चौकशी करतांना मी अजून तरी पाहिले नाही.
  • Log in or register to post comments

चान चान!

अग्निकोल्हा
Sat, 01/19/2013 - 22:22 नवीन
हा लेख वाचल्यानंतर मिसळपावने हॉटेलासोबत स्वतःचा मराठी विकीपेडीयाही सुरु केला तर जाम धमाल येणार अस वाटतयं. व्यवस्थापनाने खरोखर याबद्दल गांभिर्याने विचार करावा. सुरुवातीला फार तांत्रिक कष्टही नाहीत. हळुहळु जसे कारभार(?) वाढेल तसं स्केलेबलिटी एक्सटेंड करता येइल. समाजाचि, मराठीची मोठी सेवा घडेल... व मिसळपावचे प्रस्थही वाढेल.
  • Log in or register to post comments

मिसळपावच्या सर्व्हरची क्षमता

आनंद घारे
Mon, 01/21/2013 - 23:07 नवीन
मिसळपावने हॉटेलासोबत स्वतःचा मराठी विकीपेडीयाही सुरु केला तर..... मिसळपावची लोकप्रियता पाहता तो उपक्रम चांगला ठरेलच, पण यासाठी मिसळपावच्या सर्व्हरची क्षमता खूप वाढवणे आवश्यक आहे. हा लेख मिपावर देण्यापूर्वी आणि त्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी मी रोज निदान दहा वेळा प्रयत्न करतो आहे. त्यातल्या निदान नऊ वेळा 'सर्व्हर नॉट अ‍ॅव्हेलेबल' असा संदेश येतो आणि एकाद्या वेळी इथपर्यंत पोचायला मिळते असा अनुभव येतो आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा