बालपणी माझ्या बऱ्याच आठवणीत असणारा आमचा वालक्या... माझ्यापेक्षा साधारण 10-15 वर्षे मोठा असेल. नक्की सांगता येणार नाही. सर्वांसाठी फक्त वालक्याच. त्याच्याही नजरेत कधीही कुणासाठीही दुजाभाव दिसला नाही. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे एक अजब रसायन. बहुधा देवाला दुर्लक्षून जन्मला असावा. त्यामुळेच ईतर कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष देतांना पहाण्यात आले नसावे.
सकाळी सकाळी शाळेच्या समोर, रस्त्याकडेला हा उभा. अंगात काळसर, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि खाकी विजार. ती हि अर्धी. पायात चप्पल असल्याची कधी पहिलीच नाही. पाय सतत चालते, पण जागीच. एक हात छातीशी मुडपून दुसर्या हाताने केस कुरवाळत, उगाचच पुढे-पाठी हलत छानसं हसणारा. मी जेव्हा केव्हा त्याला पहिला, तो असाच. अगदी त्याच्या नातेवाईकांकडे शुभ-अशुभ कार्यात सुद्धा त्याच्यात काहीही बदल दिसला नाही. बोलण्याबद्दल म्हणावे तर त्याच्याकडे फक्त दोनच शब्द. "अ: ह:". ते ही अगदी हळुवार. कधी तारस्वरात किंचाळणे नाही वा पळापळ नाही. त्याच्या सर्व लकबी या फक्त त्याच्या होत्या. इतरांनीही कधी त्याची फारशी दाखल घेतली नाही वा त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. राग, लोभ, दु:ख, ईत्यादि कसल्याही शापापलीकडे पोहोचलेला. अखंड भिरभिरणारे डोळे, त्या डोळ्यांत कमालीची निरागसता. सगळ्यांवर जणू कौतुकाचा वर्षावच करताहेत.
गावातल्या गल्ली-बोळातून हिंडताना त्याला नेहेमीच पहात होतो. कधी मधी कोणीतरी त्याच्या हातावर काहीबाही खाऊ किंवा भाकर तुकडा ठेवी. तो हि त्याच्या नेहेमीच्या खाक्या प्रमाणे लाजत, हसत घेई. अर्थात हातातच. मग थोडा वेळ त्याचे परीक्षण होई. ते हि डुलत डुलतच. भूक असेल तर स्वारी ते तोंडात कोम्बे नाही तर तसेच हातात-मुठीत ठेऊन पुढे... गावकुसाबाहेर माळावर दगडांच्या रांगेत कुठेतरी तो बसायचा. मग सगळा खाऊ तिथेच एखाद्या दगडावर ठेवायचा. चिमण्या कावळ्यांची मजा बघत डूलायचा. नंतर नंतर गावात जसे मारवाडी आले तसा हा खाऊ पैश्यातहि दिसू लागला, पण पैसा असो वा खाऊ, वासलात तीच. या मारवाड्यांनीच पुढे शोध लावला कि वालक्याला पैसा दिला कि दिवस चांगला जातो. मग काय सक्काळी सकाळी वालकयाच्या हातात सुट्टे पैसे खुळखुळू लागले. तो हि सगळे पैसे त्या दगडांवर उधळायचा थांबला नाही. माळावर बकर्या, बैल, म्हैशी चारणारी पोरं टोरं जाम सुखावायची. त्यांच्यामध्ये पण हुशार लोक होतेच. एकाने दिली पुडी सोडून. वालक्याने टाकलेले पैसे तसेच रात्रभर पडून दिले तर दुसऱ्या दिवशी दुप्पट होतात. थोडे दिवस या हुशार पोराने मजा करून घेतली, पण लवकरच सगळे सुरळीत झाले. खरं तर कुणाला याविषयी काहीही वाटत नव्हते/नाहीये. आणि काय म्हणून वाटावे? गावाच्या लोकांचे कायदे वेगळे असतात. मी तरी वालक्याकडून कुणी पैसे हिसकून घेतलेले पहिले वा ऐकले नाही. पहिले फक्त त्याच्या हातावर काहीबाही टेकणारे हात.
वालक्याचा भाऊ त्याच्या कामात नेहेमीप्रमाणे व्यस्त असायचा. माय बिचारी घरचे काम सांभाळून दोन्ही लेकरांची चिंता वाहायची. शेती भाती पोटापुरती होती पण त्यापलीकडे काही नाही. वालक्याची चिंता करायला लागली कि तिच्या डोळ्यांच्या कडा भरून येत. कोणी तरी नात्यागोत्यातले ओळखीपाळखीचे घरी आले कि रडारड ठरलेली. त्यातलेच कुणीतरी मुंबई दर्शन करून आलेला. मग वेड्यांच्या इस्पितळाची माहिती द्यायचा. पण त्याची बोळवण व्हायची. कधी मधी उद्धारहि. त्याची माय त्याला वेडा समजतच नसे. गम्मत म्हणजे, गावातले कुणीही वालक्याला वेडा समजतच नव्हतं. जणू तो आमच्या घरातलाच.
आताशा आम्हाला मिसरूड फुटायला लागलं होतं. पण वालक्या तसाच होता. जणू वय त्याच्यासाठी थिजून गेलं होतं. चिरंजीव जसा.
मी शिक्षण - नोकरी निमित्ताने मुंबईची वाट धरली होती. घरी आठवड्या - पंधरवड्यातून चक्कर असायची, पण वालक्याला मुद्दामहून भेटायला जाण्याची बुद्धी सुचली नाही. तसा तो मधून मधून महिन्या दोन महिन्यांनी का होईना दिसायचा एव्हढेच. बरं त्याचं दर्शन शकुनाचे होते असा सर्वांचा विश्वास. पण त्याचे अप्रूपहि नव्हते. त्यामुळेहि असेल ... भेटायला जाणे काही जमले नाही. नंतर कामाचा व्याप वाढला तसा त्याचा विचारही दुर्लक्षित झाला. फार नाही तरी दोनेक वर्षे तरी झाली असतील, वालक्या दिसलाही नाही. मी सुद्धा कोणाकडे विचारपूस केली नाही. तशी सवयच नव्हती. कामात पूर्णपणे विरघळून गेल्याचा परिणाम माझ्या आजारपणात झाला. डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट लादली. एक दोन दिवस ठीक होते, मग उगाचच जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. आठवणींच्या कप्प्यात वालक्या सुद्धा होताच. मग मित्राला फोन करून विचारले वालक्या बद्दल. तो थोडा वेळ शांत होता, मग म्हणाला, "दोन वर्ष झाली तो जाऊन. रस्त्यावरून दुडकत चालतांना कुठल्या तरी गाडीने उडवला. त्यात त्याचे पाय अधू झाले. बाकी मार नव्हता. काही महिने घरी पडून राहिला, मग गेला तो... सुटला रे एकदाचा." पुढे काही बोलणेच झाले नाही. डोळ्यात वालक्याची दुडकत चालणारी मूर्ती अंधुक होत गेली.
वाचन संख्या
2530
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यक्तिचित्र छान उभं केलयत .
गुलजारच्या एका भाषांतरित
सुरेख
छान व्यक्तिचित्र
काय छान आठवण करून दिलीत हो.
In reply to छान व्यक्तिचित्र by हारुन शेख
तुमचे वालक्याशी ऋणानुबंध कसे
In reply to छान व्यक्तिचित्र by हारुन शेख
मस्त!
खुप सुंदर लिहिलयत.........
अप्रतिम
व्यक्तिचित्रण आवडलं, धन्यवाद.
छान लिहलंय!
चपखल शब्दात उभे केलेत
सुंदर !
वाचता वाचता डोळ्यासमोर उभा
धन्यवाद
किल्लेदार
छान व्यक्तिचित्र