हझारो ख्वाहिशे ऐसी...समाप्त
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154
भाग तीन : http://www.misalpav.com/node/23248
....आम्ही तळजाईची वाट चढत होतो आणि मी मनात खूप वर्षांपूर्वी उतरलेली सिंहगडाची वाट पुन्हा उतरत होतो...सोसायटी मधली आम्ही सगळी पोरंसोरं मिळून सकाळी सहाची पीएमटी विश्व हॉटेलपासून पकडून गडावर गेलो होतो. सिंहगड वॉज माय टर्फ. अख्खी कल्याण, अवसरवाडी तरफ आमच्या घरातल्या सगळ्यांना नावानिशी ओळखत असे. आम्ही खेडेबार्याचे एके काळचे इनामदार, त्यात आमच्या आजोबांची पुण्याई मोठी. माझी आज्जी सांगायची कि गांधीवधानंतरच्या जळीतात, पंचक्रोशीतली ब्राम्हणांची घरं जळाली पण आमच्या वाड्याभोवती तीन साडेतीनशे कातकरी आणि रामोशी हातात तीर कामठे आणि काठ्या घेवून आठवडाभर पहारें देत होते...
असो, तर सांगत काय होतो कि गडावर सगळे दुकानवाले मला ओळखत असत, पंडित काकांचा नातू म्हणून. सुमीवर इम्प्रेशन मारण्याची इतकी भारी संधी मला आपटून सुद्धा मिळाली नसती. फुल सगळ्यांना 'वळख' देत आम्ही माझ्या शाळेतल्या मित्राच्या हाटीलात जावून बसलो. सर्वांना अगदी पेश्शल जेवण घालून आणि मित्राच्या हातात बळच पैसे कोंबून आम्ही हिंड हिंड हिंडलो. गडावरचा दगड आणि दगड ओळखीचा असल्याने मीच गाईड होतो. कारण घरात लहानपणी कोणताही पाहुणा आला कि सिंहगड वर जाण असायचंच.
शिवचरित्राचं पारायण आमच्या घरात नेहमीच चालू असे. अफझल वधाचा अज्ञानदासाचा पोवाडा आणि जाणता राजा मधला औरंगजेबाचा शेवटचा मोनोलॉग मी पाहुण्यांसमोर घडाघड म्हणून दाखवत असे. तीच केसेट तेव्हाही गडावर वाजवली आणि काय विचारता ! जो भाव वाढलाय म्हणून सांगू...खल्लास. सुमी मधूनच 'बास आता' वाली एक्स्प्रेशन देवून माझ्याकडे बघून ग्वाड हसत होती. उतरताना आम्ही दोघंच सगळ्यात पुढे माकडासारखे पळत होतो. आणि शेवटच्या पठाराच्या आधी एका टप्प्यावर सुमी सडकून आपटली. मी मागे वळून तिच्याकडे पळत आलो. तिला उठवताना जो हात धरला तो गाडीपर्यंत तसाच धरूनच राहिला होता...नकळत. त्यावेळेस जाणवलं नाही पण त्या हाताची ऊब, धपापलेले तिचे श्वास, मधूनच खाली बघून तिचं ओढणी सावरणं आत्ता जसंच्या तसं स्लो मोशनमध्ये तळजाई चढताना आठवत होतं.
तिलाही हे सगळं तसंच आठवत असेल का असा विचार माझ्या मनात आला आणि जाणवलं कि सुमी भयानक शांत आहे... मी हात सोडवून घेतला. सुमे…सुमे जावूदे यार...मला हे सगळं विसरायचय ! …सुमीने चमकून मागे पाहिलं आणि लक्षात आलं कि मी हे प्रत्यक्षात बोलून गेलोय...विचाराची तंद्री तुटली आणि पुन्हा शांतता येवून मी भानावर आलो. मी अस्वस्थपणे सुमीकडे पाहिलं तर हि वळून पुन्हा चालायला लागली होती. सुमे, सांगणार आहेस का? काय झालंय? …बसुयात कुठेतरी, सुमी म्हणाली. तिला आज वेळेची फिकीर न्हवती. नाहीतर नेहमी ठरल्या वेळेत घरी जाणारी सुमी इतका अंधार झाल्यावर एव्हाना मनगटाकडे बघायला लागलीही असती.
पुन्हा काही वेळ चालून आम्ही एकेक दगड पाहून बसलो.
सुमे, इथे का? किती अंधार आहे...कृष्णावर बसलो असतो ना....
सुमी काही न बोलता एकटक माझ्याकडे काही वेळ बघत राहिली आणि अचानक उठून माझ्याकडे आली. मी उठून उभा राहिलो. सुमीच्या डोळ्यात संताप दिसत होता. …..तुला तीन वेळा संधी होती. एकदाही का विचारलं नाहीस रे? सारसबागेत नुसताच सगळं घडाघड बोललास, तू मोकळा झालास. नंतर काय झालं? मी बावळटासारखी नुसतीच स्वतःशी काही दिवस हसत राहिले, खुश होत राहिले आणि पुढे तू अचानक वेगळा झालास, तुझ्या विश्वात रमून गेलास. तुला बोलता करण्यासाठी मी त्या समीरला मध्ये आणलं तर तू अजूनच लांब गेलास. नंतर कृष्णा मध्ये आपण भेटलो तेव्हा शेवटी मीच बोलण्याची तयारी करून आले होते. पण अर्थात मीही कचरत होतेच. माझा एक 'पण' तुला जिव्हारी लागला आणि तू सलग दहा मिनिटे बोलून माझा पुतळा करून ठेवलास. मी मोठी आहे, कायम समजुतदारपणे वागले आहे हि माझी चूक? आणि सगळ्यात मीच पुढाकार घ्यायचा हा हट्ट का? थोडाही भांडला नाहीस माझ्याशी. यु नेव्हर फॉट फॉर मी ! हे सगळं तुझ्यासाठी आणि आणि तुझ्याच बरोबर घडतंय अशी गोड समजूत करून घेवून सगळं स्वतःवर घेत राहिलास तू. कृष्णाच्या भेटीपर्यंत मला वेळ होता पण जेव्हा आरोहीचं मला समजलं तेव्हाही तुझी हीच अपेक्षा होती कि मीच पुढे यावं ? तुला ते शक्य आहे असं वाटलंच कसं रे? बाईला आत्मविश्वास भावतो पुरुषातला! पण तू माझ्यासाठी कधीच पुरुष झालाच नाहीस. आपल्यातली दोन वर्ष तशीच राहिली, नाही तू ती तशीच ठेवलीस. तुला कदाचित दाई हवी होती, प्रेयसी नाही. आणि आज हे सगळं अशा कुरूप बोलण्यातून बाहेर येतंय....मी इतकी दोलायमान कधीच न्हवते. इट हॅज कम टू धिस नाऊ.
एव्हाना सुमीच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. मी तिचा हात धरला...ती कसल्याशा भाराने असहायपणे खाली वाकली आणि मी तिला आवेगाने उठवत मिठीत घेतलं. सुमी हमसत होती…. 'मी माझा' च्या गारूडात असताना मी नववीत पाडलेली एक चारोळी मला आठवली....
'जीवनात' एकच इच्छा उरली आहे,
तीही सुखावह मरणासाठी....
तुझा खांदा मिळावा,
दोन अश्रू ढाळण्यासाठी.
त्याही अवस्थेत मला हसू आलं. मी मोठा झालोय याचीही जाणीव झाली. सुमीही असहाय होवू शकते हे मला नव्याने कळत होतं. पण मध्ये बराच काळही गेला होता. सुमी माझ्यामध्ये इतकी अडकून पडली असेल याची मला सुतराम शक्यता आत्ताही वाटत न्हवती. नक्की काय झालंय हेच समजत न्हवतं.
सुमे आपण सोसायटीत असताना मी तुझ्यावर कविता करायचो माहितीये का तुला? सुमी तशीच गळ्यात पडून होती. मग मी तिला हीच चारोळी ऐकवली. ती ऐकून सुमी हसली हे मला तिच्या उत्छ्वासामुळे लक्षात आलं. मी तिला अजून एक दोन अशाच सोपान छाप कविता ऐकवल्या. सुमीने स्वतःला मिठीतून सोडवून घेतलं आणि डोळे पुसत हसत म्हणाली कि किती चीजी लिहाय्चास रे. या तेव्हाच ऐकवल्या असत्यास तर आज इथे भेटायची गरजच राहिली नसती. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो. सुमी थोडी शांत झाली होती. खोल श्वास घेऊन ती म्हणाली कि, हेच ! तुला हे कसं जमतं? किती सहज मला बदलून टाकतोस तू...दुर्दैव हेच आहे कि मला हे सगळं खूप उशिराने कळतंय. तुझं असणंच मी माझ्या दृष्टीने संपवून टाकल्यानंतर…. हे बघ, मी तुला इथे कुठल्याही कल्पना द्यायला किंवा काही विचारायला बोलावलं नाहीये. खरंतर मला नक्की सांगता येणार नाही कि मी तुला इथे का बोलावलंय. पण एका मोमेंटला मला हेच बरोबर वाटलं आणि मी तुला मेसेज केला.
सुमे, सगळं नीट पहिल्यापासून सांगशील का?
समीरने मला नकार कळवलाय. घरचे साखरपुड्यासाठी मुहूर्त शोधत आहेत आणि आजच दुपारी त्याने मला फोन करून सांगितलं. अजून घरी माहित नाहीये. लग्नाची फायनल बोलणी सुरु झाल्यापासून मी 'वेगळी' झालीये असं तो म्हणाला. मी तशी होते, तुझ्यामुळे. मी आल्टरनेट फ्युचरला नाकारू नाही शकले, नाकारू शकत नाहीये. मी भयानक कन्फ्युज्ड आहे.
सुमीला मधेच थांबवून मी बोलायला सुरुवात केली. आता मला संधी होती, सगळं बोलून टाकायची...सुरुवातीपासून.
सुमे, तुझ्यामुळे मला पहिल्यांदा माझ्या हृदयाची धडधड पूर्ण सराउंड साउंड मध्ये जाणवली. तिचा अनुभव मी तू दिसलीस, तुझा आवाज ऐकला कि प्रत्येक वेळेस घेत आलो आहे. टोटल कन्फ्युजन म्हणजे काय हे मला तुझ्या भोवती असताना जवळजवळ प्रत्येक वेळेस जाणवलय. तुझी एकनएक हालचाल, भाव, प्रतिक्रिया हे सगळं अनुभवण्यासाठी मला प्रत्यक्ष तू समोर नसलीस तरी चालतेस. तुझे विचार डोक्यात घेवून मी तीस तीस किलोमीटर अंतर सहज सायकल केलं आहे...तेही भर उन्हात, पावसात. तू भेटशीलच याची खात्री नसताना ! त्याची मला फिकीर नसायची कारण तुझ्या आसपासचा एक दोन किलोमीटरचा एरियाही माझ्यासाठी गंधाळलेला असायचा.
सुमे, तुझी मला दिलेली प्रत्येक प्रतिक्रिया हि माझ्यासाठी 'साईन' असायचीही आणि नसायची सुद्धा. तू कायमच माझ्यासाठी एक मिस्टरी राहिलीस सुमे....मला तुझा अंदाज कधीच लागला नाही. नंतर मला सवय झाली तू नसण्याची. त्रास खूप झाला. मला वाटायचं कि का? प्रत्येक भावनेला अंत का असावा? पण त्याचं उत्तर मी माझ्यापुरतं शोधलेलं होतं कि एकतर्फी भावनेला अंत हा असावाच लागतो. नाहीतर त्याचं मातेरं होवू शकतं.
खूप छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या सुमे. आणि मग त्या गोष्टींचा डोंगर माझ्या डोक्यावर बसला. त्या बोलायच्या राहून गेल्या कारण, तुझ्याबाबतीत प्रतिसादाची कायमच भीती होती. आपल्यातल्या विसंगत गोष्टीही मातब्बर होत्या, आहेत.
याच्या उलट अरुच्या बाबतीत गोष्टी खूप सोप्या होत्या, आधीच ठरवून ठेवल्या सारख्या. मी तिथे सुखावलो. आपला मध्ये संपर्कही नावाला राहिला होता. तुझ्याकडून पुढाकाराची अपेक्षा मी कायम ठेवली कारण तुला नैसर्गिक एडवांटेज होतंच. तू नेहमीच कमांडिंग पोजिशन मध्ये होतीस सुमे....वेडा मी होतो तुझ्यामागे. तू माझ्या रुसण्याची जागा होतीस. सुमे विचार कर कि आज, आज तू अशी आहेस...याआधी तुला मी असं बघेन हे तुलातरी कधी वाटलं होतं का? तू पुढे आली नाहीस हे मी आज समजू शकतो, ते किती अवघड होतं हेही ! पण तेव्हा...तेव्हा मी या लेव्हललाच न्हवतो.
जसा तू समीरला उभा केलास तसंच मलाही वाटत होतं कि मी अरुला ढाल बनवतोय. पण सुमे, मला आज खात्री आहे आणि उद्याही राहील कि अरु असणार आहे कायमची. फक्त गोष्टी सोप्या होत्या म्हणून नाही तर त्या तिच्या बरोबर सोप्या वाटतात म्हणून. अरुबरोबरही मी या सर्व प्रेशर मधून गेलोय, पण हे वेगळं होतं...त्यात प्रेशर पेक्षा जास्त आनंद होता, प्रतिसादाच्या धसक्यापेक्षा उस्तुकता जास्त होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी तू माझ्यासाठी आहेस तो मी तिच्यासाठी आहे सुमे. मी तिची सुमी आहे. फरक इतकाच कि मी आपल्यातलं क्लोजर शोधलं...तुला ते असं मिळवावं लागतंय....मला खात्री आहे सुमे कि हि तुझी तात्पुरती अवस्था आहे. कारण यु मूव्हड अवे लाँग अगो....आपल्या रेषा कायमच समांतर होत्या, तशाच जाणार आहेत. आपण एकमेकांना बघू शकू पण ठराविक अंतरावरून.
आणि तसंही तू मला प्रत्यक्षापेक्षा कल्पनेतलीच जास्त आवडायला लागली आहेस. माझीना त्या गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यासारखी गत होती सुमे....गाडी थांबल्यावर काय करायचं असतं हे मला तेव्हाही माहित न्हवतं आताही नाहीये.
मला आता कळतंय कि तू मला मेसेज का केलास...तुही माझ्यासारखी छोट्या छोट्या गोष्टी त्या कपाटात टाकत राहिलीस. त्याची अडगळ झाली आणि तू त्यात समीरला बसवायचा प्रयत्न करत होतीस. आपल्या दोघांनाही क्लोजर हवं होतं सुमे. आपण दोघांनीही कपाट उचकटून सगळ्या आठवणींचे गुंडाळे बाहेर काढले. आता गरज आहे त्यांच्या नीट घड्या घालून ठेऊन द्यायची. एकदा त्या कप्प्यांच अस्तित्व वेगळं काढलं न कि त्याचा खजिना होईल बघ. अजून वीस वर्षांनीही तू माझ्यासाठी अकरावीतच राहशील आणि जेव्हा जेव्हा मी तुझा विचार करेन तेव्हा मीही अलगद नववीत जाईन...
सुमी माझ्याकडे मंद हसत बघत होती. मला ती तेव्हाही तशी वाटली...मोठी ! समंजस...आधीसारखीच. आम्ही शांतपणे न बोलता पुन्हा उतरायला लागलो. हातात हात पुन्हा गेले....निरोपाचे अंदाज मागे ठेवून.....
....पुढे सुमीने समीरला फोन करून गोष्टी क्लियर केल्या. त्यांचा साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी वाजलं. सुमी खुश होती कि तिने पुन्हा स्वतःला एडजस्ट करून घेतलं याचं उत्तर मला मिळणार न्हवतं, नकोही होतं. कारण वुई लेफ्ट दि स्टोरी ऑन दि सेम पेज. त्यादिवशी मात्र मी माझ्यापुरतं मळभ दूर केलं होतं....खात्री होती कि आठवणींचा वारा आला कि ते पुन्हा मनावर येईल, येत राहील....
रमणा गणपतीपाशी येऊन आम्ही एकमेकांना टाटा केला आणि मी गाडीला किक मारली आणि निघालो अरुकडे सर्वस्वी माझ्याच अरुकडे.
पहिली जखम हि नेहमी सगळ्यात जास्त खोल असते असं म्हणतात....ती तशी असते का नाही ते माहिती नाही, पण कदाचित ती तिच्या पहिलेपणामुळे तशी वाटत असावी....
समाप्त !
Book traversal links for हझारो ख्वाहिशे ऐसी...समाप्त
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अक्षरशः नि:शब्द!!!
अप्रतिम कथा.
सॉल्लिड ... केवळ कातिल..
मस्त.. मस्तच..! एकदम
मस्त.. मस्तच..! एकदम
१ नंबर
ऐच्यान्!!!!!!!!! एकच नंबर कथा
शेवटचा भाग नाहि जमला
अर्धवटराव,
ओके.
अर्धवटराव,
जियो मेरे यार
मस्त !
पराभौ,
कातिल..
अपेक्षित अखेर
आपण दोघांनीही कपाट उचकटून सगळ्या आठवणींचे गुंडाळे बाहेर काढले. आता गरज आहे त्यांच्या नीट घड्या घालून ठेऊन द्यायची. एकदा त्या कप्प्यांच अस्तित्व वेगळं काढलं न कि त्याचा खजिना होईल बघ.यासारखे खूपसे वाक्प्रयोग आवडले.लै लै झकास लिहिलय
लै लै झकास लिहिलय
आवडली.
लै भारि लिहिलंय हो, वाचताना
जबरी!!
आवडली एकदम मस्त .........!
शेवटची अॅडिशन पण भारीच, मूळ
गम्मत म्हणजे,
शेम टु शेम हिअर. दुनियादारी
+१००
स्पष्ट
आवडली
सुंदर...
सुंदर, आवडली
सुमी अन् अरु
अप्रतिम!
खूप मस्त.
छोटंसं
मस्त ....
मस्त.
लाजवाब
आज एका झटक्यात कथा पूर्ण
सुप्परक्लास लेखन!
आता तुमची पूर्ण करा हो साहेब.
पुर्ण करण्याचं काम चालूच आहे
....
जब्बरदस्त...
छान
कथा तर उत्तमच आहे...पण
आज परत एकदा (कितव्यांदा ते
काय प्रतिक्रिया देउ??