Skip to main content

यशोमति मैयासे बोले नंदलाला

लेखक शरद
सोमवार, 05/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
यशोमती मैयासे बोले नंदलाला " श्रीकृष्ण हा जगद्गुरू खरा, त्याने गीतेमधून सर्व उपनिषदांची सार काढले हेही खरे पण भारतातल्या निम्या लोकांना, स्त्रीवर्गाला, त्याचे काही कौतक नाही. त्यांना ते माहितही नसेल. त्याने कंसाला मारले, पांडवांना मदत करून कौरवांना हरवले हे त्यांना माहीत असले तरी "ते देवाचे कामच आहे" अशी संभावना केली जाईल. त्यांच्या दृष्टीने कृष्ण एकच, "बाळकृष्ण". रांगत रांगत येऊन वडीलांच्या ताटातला घास त्यांनाच भरविणारा, मडके फोडून लोणी पळवणारा, गोकुळातील सर्वांचा लाडका, सावळा बाळकृष्ण. आपल्या घरांत रांगणार्‍या मुलाकडे कौतकाने पाहणार्‍या आईला तिथे दिसत होता तो बाळ्कृष्णच. शेकडो वर्षे आसेतुहिमाचल भारतातील आयांना ही भुरळ पडलेली आहे. त्यामुळे या बाळकृष्णाच्या गोष्टी सर्वत्र सांगितल्या/ऐकल्या जातात. कवींनीही याच्या लीला मोठ्या प्रेमाने वर्णिल्या. प्रत्येक भाषेत तुम्हाला त्या आढळतील. आता कृष्णासारखाच श्रीरामही विष्णूचा अवतार. मग त्याच्या वाट्याला हे भाग्य कां आले नाही ? असे तर नव्हे ना की कृष्ण खेडेगावात सर्वसामान्य घरांत वाढला व राम राजवाड्यांत म्हणून असे झाले ? बाळकृष्णाच्या अनेक गाण्यांच्या तुलनेत मला बाल रामाचे एकच गाणे आठवते.. "ठुमकी चलत रामचंद्र " (तुलसिदासांचे हे पद आपण बघणार आहोतच, पुढे केंव्हातरी) पण आज एक निनांतसुंदर पद सांगावयाचे आहे " यशोमती मैयासे बोले नंदलाला " एक दिवस बाहेरून बाळकृष्ण फुणफुणत आला व यशोदेच्या कुशीत शिरून त्याने एकदम प्रश्न विचारला "यशोमती मैयासे बोले नंदलाला, राधा क्युं गोरी, मै क्युं काला ?" आईला एकदम हसूच फुटले. पण मामला गरम आहे असे पाहून तिने त्याला कुरवाळत शांत करावयाचा प्रयत्न केला व सांगावयास सुरवात केली "बोली मुसकाती मैया, ललनको बताया कारी आंधियारी आधी रातमे तू आया लाडला कन्हैया मोरा, काली कंबलीवाला, इस लिये काला." "अरे, तू आलास तेव्हा काळीकुट्ट अर्धी रात्र झाली होती. आणि हे बघ, लाडोबा, तुझी घोंगडीही काळीच आहे की नाही ? म्हणून तू काळा." पण एव्हढ्याने काही भागले नाही. याची भुणभुण चालूच "राधा क्युं गोरी, मै क्युं काला ? आता आईच्या ल्क्षात आले राधेनेच याला भडकावले आहे. आता बाजू पलटावयाची तर राधेला खेचले पाहिजे. ती म्हणाली "बोली मुसकाती मैया, सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधाके नैन कजियारे काळी नैनोवालीने ऐसा जादू डाला, इस लिये तू काला." अरे लाडक्या, त्या गोर्‍या गोर्‍या राधेचे डोळे किती काळेकुट्ट आहेत , पाहिलेस का ? या बाया अश्याच. त्या काळे डोळीवालीने जादू घातली म्हणून तू काळा. गोर्‍या राधेच्या काळ्याभोर डोळ्यांचा असा शिताफीने उपयोग करून व काळा रंग व जादूटोणा यांचा संबंध असतो या लोकसमजुतीचा आधार घेत आई आपल्या सावळ्या बाळाची समजूत घालत आहे ! संपूर्ण भजन (हो, या गोड भावगीताला भजन म्हणावयाची पद्धत आहे) बघा : यशोमती मैयासे बोले नंदलाला राधा क्युं गोरी, मै क्युं काला !! बोली मुसकाती मैया ललनको बताया कारी आंधियारी आधी रातमे तू आया लाडला कन्हैया मोरा, काली कंबलीवाला इस लिये काला !! यशोमति मैयासे बोले नंदलाला, राधा क्युं गोरी, मै क्युं काला !! बोली मुसकाती मैया, सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधिकाके नैन कजरारे कारी नैनोवालीने ऐसा जादू डाला, इस लिये काला !! सत्यं शिवं सुन्दरं या सिनेमात लताने गायलेले हे अप्रतिम गाणे ऐका. एकदा ऐकून समाधान न होणार्‍या गाण्यांपैकी एक. गाणे इथे ऐका.http://www.youtube.com/watch?v=jea1dqq3gis शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6938
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

रसग्रहण फारच सुंदर उतरले आहे. बाकी जयदेव कवीने कल्पना तरी केलेली असेल काय की आपण लिहित असलेले हे राधेचे पात्र इतके गाजून शेकडो वर्षे या काल्पनिक पात्राचा पगडा जनमानसावर अखंड राहील.

In reply to by प्रचेतस

कृष्णासोबत राधा देखील जनमानसात खोलवर रुजली याचं कारण म्हणजे कॄष्णचरित्राला राधेची भरभक्कम बैठक लाभली. कॄष्णाचा जीवनपट लोकविलक्षण. तो सतत दॄष्टी समोर ठेऊन आपलं कार्य करत राहिला, कधीच कुठे गुंतला नाहि व आपल्यातर्फे १००% प्रयत्न करण्यापासुन चुकला नाहि. सदासर्वदा तृप्त असा कॄष्णाचा पिण्ड दोन स्त्रियांनी घडवला, एक यशोदा आणि दुसरी राधा. कॄष्णाचा हृदयकुंभ यशोदेच्या ममतेने काठोकाठ भरला गेला. हे तहानलाडु-भूकलाडु कॄष्णाला आयुष्यभर पुरले. सर्व प्रकारच्या सुख-दु:खांचे विषामृत पचवायची ताकत याच भरणपोषणातुन कॄष्णाला मिळाली. दुसर्‍या बाजुने राधेच्या प्रेमाने कॄष्णाला विरक्त बनवलं. या अतिउत्कट प्रेमाविष्काराने पौगंडावस्थेतच आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याचं कॄष्णाला जाणवलं. पुढे अनेकदा श्वास कोंदवुन टाकणारे, गुदमरायला लावणारे, विषारी वायुंचे लोट अंगावर येऊनही कॄष्ण एका आल्हादकारी स्वच्छ मोकळ्या वातावरणात असल्याप्रमाणे आनंदाचे श्वसन करु शकला कारण राधेचे प्रेम आल्हादिनी शक्ती बनुन सतत त्याच्या मनात वावरली. ममतेने भरवलेले उदर आणि प्रेमाने भरवलेले उर या दोन शिदोरींना जोड लाभली इतर गोपजनांच्या विशुद्ध मैत्र भावनेची, गायी-वासरांच्या मुक्या प्रेमाची आणि निसर्गाच्या मनोहर सान्निध्याची...यासर्वांच्या परिपाकातुन घडला पूर्ण्पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण...(असं मला वाटतं... :) ) अर्धवटराव

त्याचे तिसरे कडवे देखील छान आहे... इतने में राधा प्यारी आई इठलाती मैं ने न जादू डाला बोली बलखाती मैया कन्हैया तेरा जग से निराला इसी लिए काला

In reply to by विकास

वा, विकासराव; भले भले. आपण तिसरे कडवे देऊन मजा आणली. आता त्यातली गोडीही सांगितली पाहिजे. इठलाना... नखरे करणे. बलखाना...लचकणे, मुरडणे. राधेने खट्याळपणा तर केला होताच तेव्हा आता पुढे काय होणार याची उत्सुकता तिलाही होतीच. तेव्हा हे माय-लेकाचे बोलणे चालू असतांनाच ती तेथे हजर झाली. आली, पण कशी आली ? नखरे करतच. आपल्यावरचे बालंट झटकून टाकत, ती मी नव्हेच; मी काय जादू वगैरे केलेली नाही अशी सारवासावर करतांना तिचे लचकणे-मुरडणे चालूच होते. तिचा दावा काय ? ती म्हणते," बाई ग, तुझा मुलगा, कान्हाच जगावेगळा, म्हणून तो काळा. उगिच माझे नाव कशाला ?" व्वा व्वा; बहुत बढीया ! शरद

In reply to by शरद

अजून या कडव्याचे रसग्रहण (नुसताच अर्थ नाही) सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुर्तास खूप व्यस्त असल्याने लिहायला कमी वेळ मिळत आहे. असो.

मायलेकराच्या या गोजीरवाण्या स्नेहाला तोड नाहि. या पुढे जगातील सर्व सुख फिके. फारच सुंदर रसग्रहण. जय गोवींद. अर्धवटराव

सर, रसग्रहणासाठी गाणं चांगलं निवडलं. आवडलं आहे. राहीलेलं तिसरं कडवंही तितकंच छान आहे. बाकी, तुमचे दोन्ही दुवे गंडल्यामुळे सत्यम शिवम सुंदरम चा दुवा देत होतो पण ते टाळलं. शशीकपुर आणि झीनतअमानला पाहतांना कृष्ण आणि यशोदा डोळ्यासमोर येईना. पेक्षा हा दुवा बरा वाटतो. :) -दिलीप बिरुटे

अप्रतिम रसग्रहण.

एका नितांत सुंदर गाण्याचे तितकेच सुंदर विवेचन. वाचून मन शांत झाले. अवांतरः यावरून कृष्ण-यशोदा या मायलेकरांचा आणखी एक गीत-संवाद आठवला. तो म्हणजे महाभारत मालिकेत असलेलं बालकृष्णाने खट्याळपणे म्हटलेलं, 'मैया मोरी, मे नही माखन खाओ...' याचंसुद्धा रसग्रहण येऊ द्या एकदा.

साधेसे गाणे. अनेकदा ऐकलेले. साधासाच अर्थ.पण छान लिहिले आहे. खरा प्रसंग (सिनेमातील नव्हे) डोळ्यासमोर आणलात. अर्धवट राव आणि शरद यांचे ही लेखन आवडले आणि पटले. "ठुमकी चलत रामचंद्र " वाचण्यास आतुर आहे.

In reply to by मीनल

गाणेच वाचायचे असेल तर हे घ्या.... ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियां .. किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय . धाय मात गोद लेत दशरथ की रनियां .. अंचल रज अंग झारि विविध भांति सो दुलारि . तन मन धन वारि वारि कहत मृदु बचनियां .. विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर . सुभग नासिका में चारु लटकत लटकनियां .. तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद . रघुवर छबि के समान रघुवर छबि बनियां .. बाल रामाचे अत्यंत सुंदर वर्णन तुलसीदासानी केले आहे. गाण्याची ही लिंक http://www.saavn.com/popup/psong-GSYYKw5b.html?q=thumak+chalat+ramchand… रसग्रहण - मेरे बस की बात नही |

या गाण्याचा आणखी दुवा खाली देत आहे. फक्त audio . सुरवातीला वडीलांच्या आवाजासाठी मन्ना डे आणि नंतर मुलीच्या आवाजासाठी लताताई. http://mio.to/#/search/clips/global!q=yashomati+maiyyako+bole+nand+lala…

In reply to by रमेश आठवले

मन्ना डे यांचाही आवाज क्या कहने. चित्रपटाच्या प्रसंगासाठी आवश्यक असेलच पण खोकल्याच्या आवाजामुळे थोडा रसभंग होतो. पण, चालायचंच. अवांतर : शाम तेरी बन्सी पुकारे हेही एक सुंदर गाणं. -दिलीप बिरुटे

खुप दिवसांनी काही लिहिलत शरद सर. अर्थात सुरेखच. कृष्णाच्या आयुश्यात राधा नव्हती अस म्हणणारे, वा तीला एक बालंट असल्यासारखे वागवणारे लोक पाहिले की मला त्यांची दया येते. प्रेमा सारख नितांत सुंदर अस त्याच्या आयुष्यातुन ते हिरावुन घेताहेत अस वाटत मला.

In reply to by स्पंदना

>>कृष्णाच्या आयुश्यात राधा नव्हती अस म्हणणारे, वा तीला एक बालंट असल्यासारखे वागवणारे लोक पाहिले की मला त्यांची दया येते. कृष्णाच्या आयुष्यात राधा म्हटले तर होती, म्हटले तर नव्हती. महाभारतात तिचा उल्लेख नाही, भागवतात पण नाही. माझ्या माहितीप्रमाणे पद्मपुराणात येतो आणि तिला प्रसिद्ध केले जयदेवाच्या गीतगोविंदने. आता महाभारत संपूर्ण काल्पनिक मानले तर राधा पण काल्पनिक आणि कृष्ण पण. मग काय फरक पडतो. पण तरीही मूळ लेखकाने ते पात्र लिहिले नाही हे खरे. तशी मृत्युंजय मध्ये पण ढीगभर काल्पनिक पात्रे आहेत. त्यांना मूळ महाभारतात नेऊन मूल्यमापन करणे शक्य आहे का? >>प्रेमा सारख नितांत सुंदर अस त्याच्या आयुष्यातुन ते हिरावुन घेताहेत अस वाटत मला. पण मी वाचलेल्या माहितीप्रमाणे राधेचे लग्न झाले होते, अनयाबरोबर. म्हणजे कृष्णाचे नितांत सुंदर प्रेम हे परस्त्रीगमन* होते आणि राधेने केला तो व्यभिचार* होता. * शारीरिक की मानसिक ते विचारू नका मला. माझा तेवढा अभ्यास नाही. (माझी पण दया येणार बहुतेक आता ;-) )

खुप सुंदर. राधाचा अर्थ युगंधर मध्ये छान दिला आहे. राधा म्हणजे मुक्तिसाठी तळमळणारा जीव. काल चेपु वर वाचलेले एक आठवले. कृष्ण राधेला विचारतो :- राधे एक अशी जागा दाखव कि ज्यात मी नाही. राधा हसुन म्हणते :- माझ नशिब, त्यात तु नाहिस....

परवीन सुलताना यांनी गायलेली एक सुरेख बंदिश ( बहुधा पिलु रागात) ऐकली आहे. बंदिशीची सुरवात आहे - तुम राधे बनो श्याम-. या मुखडयातच सर्व काही आले.

सत्यं शिवं सुंदरं मधे हे गाणं २ वेळा आहे. पैकी छोट्या पद्मिनी कोल्हापुरेवर चित्रित झालेलं बघायला जास्त छान आहे. लहान मुलीसाठी म्हणून लताने ते म्हटलंही आहे थोडं जास्त लाडाने.