Skip to main content

अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

लेखक बॅटमॅन
शनिवार, 25/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड : शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात. प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती. तशी आपल्या इथली लोकं अडगी ती अडगीच-मग काळ कुठलाही असो. उगीच दंगा करू लागली. मग लोकमान्यांनी सर्वांना कडक तंबी दिली आणि शांत बसवले ; शिवाय गायनकलेबद्दल छोटेसे भाष्यदेखील केले. त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले त्यात हे अवघ्या एका मिनिटाचे नाट्यदेखील कॅप्चर झाले. तर मग डॉट्ट सहा वाजता पोहोचलो. केसरीवाड्यात फुल्टू गर्दी . आयबीएन सेव्हन वैग्रे च्यानेलांचे प्रतिनिधी हजर होते. काही पोलीसपण होते. नंतर कळाले की निखिल वागळ्यांची सुधीर गाडगीळ मुलाखत घेणारेत. आधीच तिथे बसायला जागा नव्हती, म्हटलं आयच्या गावात आता २ तास उभारून पायांचा भुगा झाला की मग शेवटी ऐकवतील, पण सुदैवाने त्या मुलाखतीच्या आधीच ऐकायला मिळाली. शेवटी मग लोकमान्यांचा आवाज ऐकला आणि अंगावर एक शहारा उठला. तोच हा आवाज ज्याने "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच" हा नारा देऊन इंग्रजांना कळायचं बंद करून सोडलं होतं. निव्वळ योगायोगाने आणि सेठ नारंग यांच्या गायनप्रियतेमुळे आज हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला.एकदम ती मधली ९७ वर्षे जणू गायब झाली आणि मी २१ सप्टेंबर १९१५ ला केसरीवाड्यात पोहोचलो. " आजचा कार्यक्रम गणपतिउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणं गायनाचार्य बखलेबुवा यांचं .... गायन सुद्धा लोकांनी शांतपणे ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं.पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल, मला काही जे वाटतं, ते वाटतं म्हणजे असं, की माझ्या मते तथापी ही कला मोठी आहे, .........अन् ते काही खोटं नाही. तेव्हा त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की मी जरी मी गाणं शिकलो नाही, तथापी त्या ......बद्दल विचार करावा असं मला वाटतं आणि म्हणून भास्करबुवांसारख्यांना मी इथे ... दिली आणि बुवा जर इथे आले , अन कार्यक्रम .......झालेला आहे .....उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, तेव्हा सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं प्रत्यक्ष..... चा अर्थ लावून गावं असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो." (एकदा ऐकल्यावर परत वन्स मोर च्या गजरात ध्वनिफीत पुन्हा एकदा चालवली गेली. पुन्हा एकदा ऐकल्यावर मग सटकलो तिथून. तसेही एकदा लोकमान्यांचा आवाज ऐकल्यावर वागळे आणि गाडगीळ काय दिवे लावणारेत हे ऐकायची बिल्कुल इच्छा नव्हती.) ध्वनिफीत इथेच संपली, पण मन अजूनही भूतकाळातच वावरत होते. रत्नागिरी, पुणे, मग पितृनिधन, केसरीची स्थापना, मंडाले, जहाल-मवाळ दरी, होमरूल चळवळ, या सार्‍या घटना क्षणार्धात डोळ्यांपुढे तरळून गेल्या आणि दिसले ते अडिग, अविचल असे लोकमान्य.ध्वनिफितीसारख्या या छोट्याछोट्या गोष्टीदेखील, भूतकाळ आणि वर्तमानकाळ या संज्ञा भास आहेत हे जणू सिद्ध करतात. एक ऑडिओ लोकमान्यांपर्यंत नेतो; एखादे चिटोरे डायरेक्ट छत्रपतींपर्यंत नेते. मधला एवढा मोठा काळ जणू विरुनच जातो आणि ती काळाच्या पडद्याआडची माणसे जिवंत होऊन समोर दिसू लागतात - अगदी हरितात्यांना जसे छत्रपती दिसत तसेच. आणि मग हरितात्यांच्या वागण्यातले मर्म कळते. कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर. असो. अजून विस्कळीत होण्याआधी थांबतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6347
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

पण ते लोकमान्यांच्या भाषणातील '...' हे gaps आहेत (सलग भाषणात) की खराब audio? लेखाचा शेवटचा भागही छानच॑ ..

सुंदर लेख. शेवटचा परिच्छेद तर उत्तम जमला आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

शेवटच्या परीच्छेदातील विचार वाचून सहज ह्या चित्रफितीची आठवण झाली.

सुंदर लिहिले आहेस, पृष्ठप्रांगणापासून समारोपाच्या परिच्छेदापर्यंत. इतिहासाच्या गाठोड्यात काय ठेवलंय हे खरोखरीच सांगून समजण्यातलं नाही. सगळंच विरत चाललंय. लोकमान्यांचं हे आणि इतर रेकाॅर्डिंग पुण्याबाहेरच्या मंडळीना जालावर कुठे एेकता येईल का?

केसरीवाड्यात लोकमान्यांना ऐकलेत. अजून काय हवे. वागळेंबद्दल अवांतर फेसबुकावर वाचलं होतं:- (खास त्यांची शैली ज्यांना ठाउक आहे, त्यांच्यासाठी) एकदा वागळे साहेब आजचा सवाल संपवून घरी येतात ...घरातले वातावरण गरम दिसते श्रिमती रागावलेल्या असता त, श्रिमती : रोज रात्री 12 , 1 वाजता यायला तुम्हाला, आमची तर काही काळजीच नाही बुवा. जेव्हा बघाव तेव्हा हातवारे करत बातम्या देता रात्री झोपत पण नाही. मिनिट थांबा, चांदुलकर पुर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच ऊत्तर द्या अशी नाव घेता माणसाला झोप म्हणुन येऊ देत नाही. . वागळे(हातवारे करत) काय मागण्या आहेत आपल्या ? यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ? श्रिमती मलाही वाटते तुम्ही कधी तरीप्रेमाचे दोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमच आपल फक्त आँफिस आणिबातम्या हं हं हअअअअअअ वागळे ठिके, अहो तुम्ही रडु नका यावर उपाय आहे मला उत्तर देऊ द्या ब्रेकवर जाण्यापुर्वी माझाप्रश्न पहा घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का? होय म्हणतात 99 टक्के लोक, जनता श्रिमतीच्या बाजुने आहे ब्रेकवर जाणापुर्वी माझे ऊत्तर देखील ऐका, श्रिमतीजीँसाठी एक चारोळी, तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत ते रे तेरे तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत . . . . . . . अचुक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत. :D :D :D

In reply to by मन१

झकास किस्सा आहे वरचा. ब-याच लोकांना हे कळणार नाही म्हणुन...... वरील मन१ यांचा प्रतिसाद सिलेक्ट करुन वाचा, जाम मजा येईल.

केसरी वाड्यात लोकमान्यांना ऐकता आलं भाग्यवान आहात. लेख छान झाला. विशेषत:
कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर.
हे तर अप्रतिम... आणि भावनांशी १०० % सहमत.... असंच काहीसं पहिल्यांद्या पुण्यात आल्यावर मला शनिवार वाडा बघायचा आहे असं म्हटल्यावर मित्र म्हणायचे काही नाही तेथे.... बाहेरच्या भितीं आहेत. त्यांना कसं सांगावं तेच कळेना त्यावेळी अश्याच काहिश्या भावना मनात होत्या. - नीलकांत - नीलकांत

In reply to by नीलकांत

केसरी वाड्यात लोकमान्यांना ऐकता आलं भाग्यवान आहात. लेख छान झाला. विशेषत:
एकदम सहमत आहे. खरं तर हा ठेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिला पाहिजे.
असंच काहीसं पहिल्यांद्या पुण्यात आल्यावर मला शनिवार वाडा बघायचा आहे असं म्हटल्यावर मित्र म्हणायचे काही नाही तेथे.... बाहेरच्या भितीं आहेत. त्यांना कसं सांगावं तेच कळेना त्यावेळी अश्याच काहिश्या भावना मनात होत्या.
खरयं. मी पुण्याचा असुन गेली काहि वर्षे बेंगळूर मधे आहे. पण पुण्यात आलो की इतर ठिकाणांप्रमाणे शनिवार वाड्यावर एक चक्कर असतेच. तिथे गेल्यावर काय वाटते हे शब्दात नाहि सांगु शकणार! बादवे मी आणी माझा एक इतिहासप्रेमी मित्र इतिहासाच्या अभ्यास करायला कधी कधी शनिवार वाड्यात जाऊन बसायचो :) वातावरणनिर्मिती उत्तम व्हायची!!

In reply to by नीलकांत

शब्दाशब्दाशी सहमत.

In reply to by नीलकांत

असंच काहीसं पहिल्यांद्या पुण्यात आल्यावर मला शनिवार वाडा बघायचा आहे असं म्हटल्यावर मित्र म्हणायचे काही नाही तेथे.... बाहेरच्या भितीं आहेत. त्यांना कसं सांगावं तेच कळेना त्यावेळी अश्याच काहिश्या भावना मनात होत्या.
सहमत!!!

असंख्य धन्यवाद. इतक्या सुंदर लेखाबद्दल. अगदी हरितात्यांना जसे छत्रपती दिसत तसेच. आणि मग हरितात्यांच्या वागण्यातले मर्म कळते. होईना का मुन्नाभाईसारखा केमिकल लोचा. त्यासाठीसुध्दा तेवढ्याच सज्ञान श्रध्देने गुंतावे लागते. तूनळी लिंक बद्दल सुध्दा असंख्य धन्यवाद .

ब्याम्या, सुरेखच लिहिलंस. हे खरं मनातलं! आणि त्या युट्युबच्या दुव्याबद्दल तुला आमच दुवा!

In reply to by पैसा

ब्याम्या, सुरेखच लिहिलंस. हे खरं मनातलं! आणि त्या युट्युबच्या दुव्याबद्दल तुला आमच दुवा! +१११

अतिशय भारावलेले लेखन. वाचतानाही अंगावर शहारा आला. प्रत्यक्ष केसरी वाड्यात लोकमान्यांचा आवाज ऐकण्याचे भाग्य तुम्हाला लाभले, हेवा वाटतो. युट्यूब जोडणी बद्दल धन्यवाद. आज आखाती प्रदेशातही लोकमान्यांचा आवाज ऐकता आला.

हया मध्ये कोठे ब्राह्मण-दुरभिमान दिसतो की काय ते पाहिले भिंग घेवून ! नाही सापडला !!

सकाळच्या बातमीत लिहिले आहे की २१ सप्टेंबर १९१५ रोजी हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ उपक्रमी श्री. अरविंद कोल्हटकर यांनी त्यातील विसंगती सप्रमाण दा़खवून दिली आहे. त्यांचा प्रतिसाद इथे चोप्य पस्ते करतो.
आताच यूटयूबवर ह्या आवाजाची चित्रफीत पाहिली. ह्या कार्यक्रमाविषयीची मास्टर कृष्णरावांची 'आठवण' 'लोकमान्य टिळक ह्यांच्या आठवणी आणि आख्यायिका' ह्या सदाशिव विनायक बापट-संग्रहित तीन खंडातील पुस्तकाच्या दुसर्‍या खंडात पान ४५७ वर दिली आहे. तिचा प्रास्ताविक भाग असा: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णा [गवई, गंधर्व नाटकमंडळींतील एक प्रमुख नट, पुणें.] "सन १९१४ च्या गणपत्युत्सवांत, गायकवाडवाडयांत श्रीगजाननासमोर, बुधवार ता. २ सप्टेंबर रोजी गुरुवर्य भास्करबोवा बखले, श्रीयुत नारायणराव राजहंस आणि मी अशा तिघांचें गायन झालें होतें." (शुद्धलेखन जुन्या नियमांचें, 'उंच माझा झोका'च्या चाहत्यांना आवडावें.) सप्टेंबर २, १९१४ ह्या दिवशी बुधवारच होता हे जालावरून लगेचच शोधता आले. ह्याचा अर्थ ह्या 'आठवणी'तील तपशील बरोबर आहेत. ई-सकाळच्या ऑगस्ट २२, २०१२ च्या अंकात मात्र हीच तारीख सप्टेंबर २१, १९१५ अशी दिलेली आहे आणि ती अर्थातच चूक आहे. 'आठवणीं'मध्ये चूक असण्याची शक्यता नव्हतीच. 'आठवणी'कार सदाशिव विनायक बापट हे टिळकांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते आणि पुस्तकहि टिळकांचे अनेक निकटवर्तीय हयात होते अशा काळात निघाले आहे. टिळक मंडालेहून सुटून पुण्यास जून १९१४ च्या अखेरीस पोहोचले, म्हणजेच गाण्याच्या वेळेस ते नुकतेच पुण्यात परतले होते. मला स्वत;ला 'आठवणी' हे पुस्तक मधूनमधून चाळायला आवडते. १९२० पर्यंतच्या काळातील शेकडो व्यक्तींची नावे, तत्कालीन घटना आणि त्यांचे संदर्भ त्यामधून कळतात आणि भूतकाळात सैर करून आल्यासारखे वाटते. "टिळकांच्या 'आठवणी' आणि आठवणीकार बापट" अशा शीर्षकाचा एक लेख मी येथे लिहिला आहे.

भावना सुंदररित्या मांडल्या आहेस. तो आवाज त्या ठिकाणी ऐकताना किती थरारक वाटलं असेल याची कल्पना येतेय. काळाचा ओघ फार ताकदीचा आहे हे खरं..

सुंदर अनुभवकथन, आणि भावना अगदी अचूक मांडल्यात.. धन्यवाद. सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यांत, कृष्णाकाठाने वाई परगण्यांत, शनिवारवाड्यात, जालियनवाला बागेत, सगळीकडे फिरताना हा भारावलेला अनुभव येतो (पुस्तकी इतिहास शाळेत असताना आवडायचा नाही, पण आता खरंच ती पुस्तकं परतही वाचू शकेन)

कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही>>>>>>>>> ज्या जगात आपण आरामात जगतो त्या साठी कुणी कुणी काय काय खस्ता खाल्ल्या आहेत त्याच्याशी ह्यांना काय देणे घेणे?ते स्वयंभू आहेत ना! अशा लोकांना वर्तमानातही कितीसा रस असतो? खरं तर त्यांना स्वत: शिवाय कशात रस असतो? छान लेख.

खुपच छान मांडलेल्या भावना. अतिशय आवडलेला लेख. टाकल्या पासुन वाचतेयपण त्याला न्याय देउ शकेल असा प्रतिसाद उमटत नाही आहे. आता वेळ होइल म्हणुन ही प्रतिक्रिया.

In reply to by नितिन थत्ते

रोचक आहे. धनंजय यांनी माझ्या ब्लॉगवरती काही मुद्द्यांच्या आधारे अशीच शंका व्यक्त केली होती. याचा निकाल काय लागतो ते पाहणे रोचक ठरेल. अंतिमतः हा आवाज लोकमान्यांचा नसेल तर उपर्युक्त लेख अर्थहीन ठरेल हेवेसांनल.

कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ "गोष्टी युक्तिच्या चार" सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर.
जाहिर अनुमोदन !!!