Skip to main content

चिक्कू हलवा.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 26/09/2012 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
Chikku-Halwa साहित्यः पिकलेले चिकू १/२ किलो. खवा १५० ग्रॅम साखर १०० ग्रॅम वेलची पूड १ लहान चमचा. साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून) बदामाचे काप सजावटीसाठी तयारी: चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या. कृती: कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता. साखर घातल्यावर मिश्रण जरा पातळ होईल. ते जरा घट्ट होईपर्यंत आणि त्याला तुप सुटेपर्यंत परतत राहा. मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली की एखाच्या चांगल्या सटात काढून जरा थंड होऊ द्या. चिकू हलवा बदामाच्या कापांनी सजवा. गणपती बाप्पा मोरया!

वाचने 59747
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

वाह.. काका कसला भारी दिसतोय.. एकदम नवीन पाकृ आहे हि मातोश्रींना सांगायला हवी , करायला :)

वाह ! घरी ढिगाने चिक्कू पडलेली असतात, पण हे असं करायचं कधी सुचलं नाही. आई बाबांना मेल करतो ही पाककृती. मी गेल्यावर मीच ट्राय करणारे.

चिक्कू हलवा कसला जबरी दिसत आहे :) धन्यवाद काका

गृहमंत्र्यांना सांगायला हवी हि पाककृती. :)

In reply to by किसन शिंदे

@किसन, कुणाच्या ग्रुहमंत्र्यांना?? ;-) काका, पाक्रु जबरीच. :-)

स्पा, गणपा, वल्ली, मेघवेडा, सानिकास्वप्निल, Mrunalini, किसन शिंदे, अन्या दातार, रेवती. सर्वांचे मनःपूर्वक आभार. हिच पाककृती वापरून आंब्याचा, केळ्याचा, पेरूचा इ.इ. हलवा करता येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिक्कूंना हलवण्याची (पाक)कॄती भारी आहे. :) पेरुचा हलवा करतांना पेरुंची साले आणि बिया काढायच्या का? -सूर्यपुत्र.

मस्त पाकृ.

छान आहे पाकृ इथे चिक्कु मिळाले तर नक्की करणार.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआ................! नीट जेवण झालेलं आहे,रात्रीचा गार वारा खात गच्चीत बसल्रेलो आहे,विविधभारतीवर नॉस्टॅलजिक करणारं असं काहि ऐकू येतय,आणी अश्या वेळी हा चिक्कू हलवा, कोणताही मारवाडीपणा न करता निवांतपणे खाण्यासाठी चांगला पातेलंभर कुणितरी* आणून द्यावा........! बा........................स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स! आणखि आयुष्यात काहिही नको..... :) *>??? >>> कोण ते अजुनं(ही) नक्की नसलेले ;-)

इथे अमेरीकेत चिकु ताजे मिळत नाहीत :-(

In reply to by आश

चिकू, मँगो, पेरू हे फ्रोजन पल्प वापरले तरी चालेल. चवीत जरा उणेपणा येईल परंतू 'नाही मामा पेक्षा काणा मामा बरा'.

झकास दिसते आहे पाकृ

मस्त पाकृ. चिक्कूपासून अशी टिकाऊ मिठाई बनते हे नवीन समजले.

मस्त :)

In reply to by निखिल देशपांडे

चिकूचा गर, मिक्सर मध्ये, एकजीव करताना पाणी घातलं होतं का? आवश्यकता नसते. तसेच, गर शिजवताना (तसा शिजतो लवकर) त्यातील जास्तीचे पाणी जरा आटू द्यायचे. खवा मिसळल्यावर आणि साखर घातल्यावरही हलवा पातळ होतो तो सतत परतत राहून पाणी आटवून घ्यायचं. गरम असताना थोडा पातळ असतो पण जस जसा थंड होईल तस तसा तो जरा घट्ट होतो. पण हा फ्रिजमध्ये ठेवायचा नाही. रुम टेंपरेचरलाच खायचा. उरलेला फ्रिज मध्ये ठेवला तरी खाताना जरा गरम करूनच खायचा.

सदेह वैकुंठगमन !!

आहे. पण इतकी सुंदर पाककृती बघून त्रास झालेला आहे. आता कधी काळी भारतात गेल्यावर शंभर टक्के प्रयत्न करण्यात येईल.. ती वाचनखूण कुठे गेली उर्ध्व श्रेणीकरणा नंतर?

करून पहायला हवा. कमी कटकटीचे काम आहे. जमेल मला बहुधा !!

जास्त गोडघाश्या नसल्याने दुसर्‍याला सजेस्ट करण्यात येईल ! ( पण पर्‍याने पाजलेल्या मस्तानीचा फॅन ! )

चिक्कू हलवा. नुसतेच शीर्षक दिसतय.मजकूर काहीच नाहिय्ये. बहुधा "चिक्कू हलवा" असा प्रदेशाध्यक्षांचा आदेश दिसतोय. हलवतो...........

तांत्रिक कारणामुळे आणि मिपाचे बांधणीचे काम चालु असल्यामुळे काही लेख प्लेन एचटीएमल मोड्मधे गेले आहेत. असे काही लेख असल्यास संपादकांना हाक मारा. तात्पूरती सोय करुन देण्यात येईल. -दिलीप बिरुटॆ (संपादक)

काका ही पाककृती जबरदस्त झाली आहे.