✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घरचं जेवण

म
मन१ यांनी
Sun, 09/02/2012 - 19:26  ·  लेख
लेख
आत्ता पेठकरांचा इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे आधीच हरवून बसलोय; ते घालवलय ह्याची जाणीव झाली. तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं. परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं. एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली. . गप्पा मारताना प्रथमच मला जाणवलं की "तिखट कांडायला कधी घेतेस" हे माझ्या आज्जीचं वाक्य आता दुर्मिळ होणार होतं. गरम मसाल्याचा तिखट्-तेलकट वास पुन्हा नाकात शिरणार नव्हता. माझी आई तिखट घरी बनवायची.(ते वाळक्या लाल मिरच्या आणून स्वतः दळून घेणं वगैरे.) पण अर्थातच माझी आजी आम्ही कसे मुसळानी गावाकडे हातानी कुटत असू मिरच्या(तुमच्यासारखं गिरणीतून आणत नाही) हे ऐकवायची. ते दगडफूल का तमालपत्र का काहीतरी म्हणतात ते मसाल्याचं पान घरात आणून आम्ही "काळा मसाला" घरातच बनवायचो. . हळकुंड आणून घरगुती हळदही बनवली जायची. . अजून एक कुठलं तरी काहीतरी आणून आई औषधी म्हणून ठेवायची आंबेहळ्द म्हणे. नक्की कशासाठी वापरातात ठाउक नाही. पण घरात एका छोट्या बाटलीत तो प्रकार भरुन ठेवलेला असायचा. थोडंफार मध असायचं.(हे मात्र बहुतांशी हवाबंद असलेलं खरेदी केलेलच.) . आईच्या हातच्या साध्या फोडणीलाही आणि साधे वरणालाही स्वर्गीय चव. तृप्ती मिळालीच पाहिजे खाल्ल्यावर. फोडणीही कोणती? तर नेहमी मोहरीचीच असे नाही, कधी जिर्‍याचीही असायची. क्वचित तुपाची फोडणी होइ. आई कधी मुगाची खिचडी (दाल खिचडी) करी. त्यावर नुसतं चमचाभर तूप आणि सार. व्वा. हे आनंदी जीवनाचं सार. . मागची पाचेक वर्षे दाल फ्राय खातोय. तक्रर अशी नाही. तेही अन्नपूर्णेचच दान. पण अचानक कधी घरच्या वरणाची आठवण होते. चिंचगुळाचं वरण आंबट गोड, गुळमट चवीचं वरण. कधी साधे वरणाला नुसती जिर्‍याची फोडाणी आणि हल्काशी मीठ- मिरे मिश्रण भुरभुरलेलं. टॉमॅटोचं आंबट वरण म्हणजे आमचा जीव की प्राण. . कधीकधी नुसतं "मुद्दा वरण", मुद्दा वरण म्हणजे हाटलेलं घट्ट वरण. आणी त्यावर घरी बनवलेला "काळा मसाला" मी हट्टाने घ्यायचो. तिखट लागायचं पण खायचोच. कधी कधी कच्च्या तेलासोबत मस्त लागायचं. पण हे घरी आवडायचं नाही. . लोणचं ही सुद्धा "विकत आणायची वस्तू " नव्हती. लोणचं ही "मुरवायची" कला होती. . लोणी-तूप हे विकत आणायचं असतं हे रूम वर राहू लागल्यापासून समजलं,. तोवर पिवळ्या रंगाचं "बटर" लोणी समजून खाल्लं नव्हतं. आई सायीचं दही लावायची. घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो. आम्ही सायीचं दही घुसळून लोणी काढायचो. लोणी "कढवून" तूप काढायचो. तूप कढत असतानाही, कच्चं असतानाही त्यात चमचा बुडवून खायची आमची दांडगी हौस. त्याबद्दल धपाटेही खाल्लेत. तूप बनल्यावर खाली उरते ती "बेरी" खरवडून खायची. मस्त गुळासोबत टाकलीत तर क्या केहने! माझी आवड पाहून शेजारच्या किनीकर अन वैद्य काकूही त्यांच्याकडे तूप- लोणी बनू लागलं की मला आवर्जून बोलवत. "हल्ली आमच्याकडं असं आवडिनं खाणारं कुणीच नाही" असं काहीतरी काकू म्हणायच्या. "घरी दोन दिवस कुठला जिन्नस टिकू देइल तर शपथ" असं उलट आई म्हणायची. आईचा वैताग काकूंना आनंद वाटायचा. ह्या काकूंच्या आदरातिथ्याच्या बदल्यात बाजारातून येताना त्याचं एखादं पत्र टाकणं, लगे हाथ आमच्या सामनासोबत त्यांचय खातेदारीवर त्यांचं सामान उचलणं अशी कामं करावी लागायची. घरगुती चविष्ट प्रकारांच्या मोबदल्यात ही कामं काहीच नवह्ती. . सणांना मजा असायची. पुरणाचे कणकेत उकडून तयार केलेले "दिंडे" नागपंचमीस मिळायचे. झोप येइस्तोवर हादडायचो. गौरे-गणपतीतही खाणे हे स्वर्गसुख. . चैत्र महिन्याच्या आसपास कधीतरी कैरी आणि डाळ ह्यांचं आईच्या हातून जमलेलं ओलसर मिश्रण म्हणजे यंव रे यंव. . कधी कांद्याच्या पातीचा घोलाणा होइ. कच्च्या पाती कापून त्यावर थोडीफार फोडणी आणि मीठ. बस्स. मस्त लागाय्चं. . कधी कांद्य्चाच्या पातीची "भरडा भाजी " मिळे, तर कधी ढोबळा मिरचीचा भरडा. कुठलीही भरडा भाजी खावी तर दह्यासोबतच हे माझं तेव्हापासून तत्वच ठरलं. अमराठी रुम मेट्सच्या घरातही ह्यासदृश प्रकार बनत असावा. पण त्यांना ती वस्तू explain करताना मला नाकी नौ आले होते. डाळीचे पीठ आणि इतर भाज्या ह्यांचे मुळात कॉम्बिनेशन करावेच कशाल हेच तो विचारित राहिला. मला कधीच धड त्याला सम्जावता आले नाही. . पालक, मेथी, चुका, अंबाडी ह्यातली कुठलीही भाजी किंव तशी इतर कुठलीही रानभाजी पाअनात पडली तर पूर्वी चेहरा वाकडा होइ. पण नक्की हा प्रकार कधी आवडायला लागला ते सांगता येणार नाही. परवा जाणवलेली गोष्ट म्हणजे मी चक्क चक्क अळूची भाजी आवडिने, मिटक्या मारत खात होतो! काय होतो मी, काय झालो मी. . बाहेरच्या कोशिंबीरिच्या चवीबद्दल सुरुवातीस माझी तक्रार होती. काहीतरी खटकत होतं. नंतर जाण्वलं मला ज्या कोशिंबिरीची सवय आहे, त्यात डाळ आणि दही दोन्हीही वापरलेले असतात. हाटेलात बहुतांश ठिकाणी दहि + काकडी/टोमॅटो/कांदा ह्यास कोशिंबीर म्हणतात. म्हणून मला त्रास होइ. नंतर अर्थातच त्यचीही सवय झाली. . कधी कधी मला आवडतो म्हणून भात कुकरमध्ये न करता भांड्यात शिजवला जाइ.(steam rice न करता boiled rice बने. आजही बहुसंख्य दाक्षिणाट्यांत घरी boiled riceच बनतो हे नंतर सहकार्‍याकडून समजले.) भांड्याला लागलेली खालची भाताची "खरवड" सुध्हा चविष्टच. . संक्रांतीला बाजरीच्या भाकर्‍या होत. दूध आणि गुळासोबत मस्त लागत. कधी आळूचेसुद्धा भजे बनवले जात. मला आवडत. . हल्ली हळद, तिखट्,मसाला, लोणचे,लोणी(यलो बटर),तूप सगळं खरेदीच होताना दिसतं. त्यामुळे कामातही सुटसुटितपणा येतो असा मुद्दा सहकार्‍यांशी गप्पा मारताना निघाला. . पिठलं बाहेरचं खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी दोन्ही प्रकारचं पिठलं पूर्वीपासून बने. साधं (पुण्यातल्या काही मराठी हाटेलात मिळतं; मला आवडतं) तसं आणि दुसरं म्हणजे तव्यावरचं, दह्यातलं पिठलं. ह्याचीही खरवड मस्त लागाय्ची. आख्खा तवा खरवडून फस्त केला जायचा. पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. . कढी...पिवळी कढी नि पांढरी कढी. वरती लिहिलेलं लोणी काढल्यावर उरतं ना त्या ताकाचीही कढी व्हायची. भरगच्च होइस्तोवर तीही हाणली जायची. बाहेर पडल्यावरही गुजराती-राजस्थानी थालीच्या निमित्ताने हा माझा आवडता पदार्ध मात्र मला कायम मनासारखा मिळत आला. . गह्री बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.आठवतय तेव्हापासून जेव्हा केव्हा खायला मिळालं तेव्हा साधसंच पण छान असं मिळालेलं. आता परत गेलो की भरडा भाजी, कढवलेलं तूप नि गरमागरम कढी ह्यावर तुटून पडायचं आहे. "व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते ; कधी त्याला वैविध्यपूर्ण घरचं व्हेज जेवण मिळालं नस्सावं ह्या अंदाजाने वाईटही वाटतं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
62020 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

सरळ मनातुन आलेला ओघवता..

गणपा
Sun, 09/02/2012 - 19:35 नवीन
सरळ मनातुन आलेला ओघवता.. किंचीत नॉस्टॅल्जीक करणारा लेख आवडला रे मनोबा. आमच्याकडे अजुनही मसाले, पापड, कुरड्या, तुप घरच्या घरी बनवले जातात. पण हे करणारी ती शेवटची पिढी असावी. हल्लीच्या इंस्टंट आणि धावपळीच्या जगात आम्ही हे कितपत टिकवून ठेवू शंकाच आहे.
  • Log in or register to post comments

अस्सच बोल्तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/04/2012 - 16:52 नवीन
सरळ मनातुन आलेला ओघवता.. किंचीत नॉस्टॅल्जीक करणारा लेख आवडला रे मनोबा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छान लिहीलंय. खरं म्हणजे

प्यारे१
Sun, 09/02/2012 - 19:37 नवीन
लग्नाचं वय झालं आहे....!
  • Log in or register to post comments

हेच्च म्हणतो

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 00:31 नवीन
हेच्च म्हणतो ;) <योगप्रभू मोड ऑन> नोंदणी केल्ये का ;) <योगप्रभू मोड ऑफ.>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कुणाशी करतोयस मग?

मन१
Mon, 09/03/2012 - 00:20 नवीन
लग्नाचं वय झालं आहे....! मग एखादी चांगली सुलक्षणा बघून होउन जा बरं चतुर्भुज. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तोंडाला पाणि सुट्ले.... नुसते

उगा काहितरीच
Sun, 09/02/2012 - 19:53 नवीन
तोंडाला पाणि सुट्ले.... नुसते पदार्थ वाचुनच!!!आणि डोळ्यांना पाणि आले...आठवणीने!!!
  • Log in or register to post comments

गणपा व प्यारे दोघांशी

अन्या दातार
Sun, 09/02/2012 - 19:56 नवीन
गणपा व प्यारे दोघांशी बाडीस. मी जेंव्हा घरी जातो तेंव्हा आई विचारते, काय स्पेशल बनवू? माझे एकच उत्तर असते: तु नेहमीचेच कर. मला सध्या तेच विशेष आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर

शुचि
Sun, 09/02/2012 - 20:18 नवीन
हळवे करणारा लेख.
  • Log in or register to post comments

छानच लिहिले आहे

सानिकास्वप्निल
Sun, 09/02/2012 - 20:22 नवीन
छानच लिहिले आहे घरच्या, आईच्या हातच्या जेवणाला तोडचं नाही ...
  • Log in or register to post comments

रम्य त्या आठवणी.

प्रभाकर पेठकर
Sun, 09/02/2012 - 21:18 नवीन
आमच्या मागच्या पिढीने हे सर्व केले आहे. घरच्या घरी सर्व पदार्थ बनविणं, वाळवणं करणं, वर्षभराची बेगमी करून ठेवणं वगैरे वगैरे सर्व आमच्या घरच्या महिलांनी केले आहे. ताकदीची/घरसफाईची कामे पुरुषांकडे असायची. जाडे मीठ आणून ते पाट्यावर वाटून बारीक करून घेणे, नारळ फोडून देणे, वाळवणावर लक्ष ठेवणे इ.इ. कामे मीही केल्याची मला आठवतात. पापडाच्या लाट्या कच्च्या तेलात बुडवून खाणे. उडदाच्या पापडाच्या लाट्या मला खुप आवडायच्या (पचायच्या नाहीत, ते वेगळे), तादूळाच्या पापडाचे उकडलेले पीठ, कुरडयांचे सत्व इ.इ. तेलात बुडवून खायचो. कैरीचे लोणचे, लिंबांचे लोणचे, मिरच्यांचे लोणचे, मुरंबा, छुंदा हे उन्हाळ्यातील पदार्थ. तर दिवाळीला सगळा साग्रसंगित फराळ घरी तयार व्हायचा. चकल्या पाडायला मीच पुढे असायचो. (बहिणही असायची पण पुरुषांत मी एकटाच), अनारसे तळताना म्हणे हसायचे नाही नाहीतर ते हमखास फुटतात. मला तर उगीचच हसू यायचे. मग आई, मला स्वयंपाकघराबाहेर पिटाळून लावायची. दूसर्‍या दिवसांच्या भाज्या निवडायला रात्री आम्ही सर्वजणं कंदिलाच्या प्रकाशात बसायचो. कधी कधी मोड आलेले वाल सोलायचे, तर कधी गवार. त्याहून जीवाला हुरहुर लागते ती दिवाळीच्या आठवणींनी. अंगणात मी किल्ला बनवायचो. त्यावर मेथी पेरून शेती व्ह्यायची. अंगणात शेणसडाही करायला लागायचा. ते ही पहाटेच्या थंडीत. गाई शोधून त्यांचे शेण गोळा करून आणायचे. पाणी घालून मिसळायचे आणि तांब्याने सडा घालायचा. सडा घालून झाला की आई नाहीतर ताई मस्त रांगोळी काढायची. आणि माझं दरवर्षीचे ठरावीक काम. पणत्यांमध्ये तेल भरून, वाती लावून त्या पेटवायच्या आणि सर्व पणत्या (जवळ जवळ ३०-३५ असायच्या.) व्हरांड्याच्या कडेकडेने लावायच्या, मागच्या दारी पायर्‍यांवर ठेवायच्या. आंघोळीला मोती साबण आणि डोक्याला लावायला टाटाचे सुवासिक कॅस्टर ऑइल. उटण्याचा वास. आंघोळ करताना बहिणीने ओवाळलेली फुलबाजी. त्याची फुलं अंगावर उडायची त्याचे ते सुखकारक चटके. आंघोळी नंतर नवेकोरे (कोरेपणाच्या वास आणि स्पर्शासहित) कपडे लेऊन कानात अत्त्तराचा फाया वगैरे. मग सर्वांचा एकत्र फराळ आणि मी फटाके उडवायला मोकळा. हल्ली तशी थंडी पडत नाही. बाहेरून आणलेल्या फराळाबद्दल प्रेम वाटत नाही. फ्लॅट संस्कृतीत अंगणच उरलं नाही तर सडा काय टाकणार आणि सारवणार काय. आठवायला बसलो तर एक स्वतंत्र धागा होईल. पण खुप दिवसांनी जुन्या स्मृती जाग्या झाल्या. बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी ! आठवणींना उजाळा

सस्नेह
Sun, 09/02/2012 - 22:04 नवीन
अगदी अगदी ! आठवणींना उजाळा देऊ तशा त्या घरच्या ताकच्या लोण्यासारख्या वरवर येतात . माझी आजी दिवाळीत शेणाचे 'पांडव'बनवायची. अजून कोल्हापूरच्या आसपास बनवतात. त्यात श्रीकृष्ण अन एक बळीरामही असायचा. त्यांना नैवैद्य द्यायचा शेवयांचा. साजुक तुपात खमंग भाजलेल्या अन दुधात शिजलेल्या त्या शेवयांची चव अजून मनात आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पांडव...

मस्त कलंदर
Mon, 09/03/2012 - 21:15 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

व्वा, कलंदर, फोटू मस्त

सस्नेह
Mon, 09/03/2012 - 21:35 नवीन
व्वा, कलंदर, फोटू मस्त टाकलात. आजीच्या पांडवांची सय आली... पण तो ढेरपोट्या आडवा पडलेला बळीराजा नाही दिसत त्यात. अन ज्वारीच्या दाण्यांचे डोळे पांडवांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हो ना! अन जो पेंद्या असतो

स्पंदना
Tue, 09/04/2012 - 06:02 नवीन
हो ना! अन जो पेंद्या असतो त्याच्या बेंबीत झेंडुच फुल. अजुनही अवेळी कोणी आडव पसरलेल दिसल की "तु काय बेंबीत झेंडुच फुल लावायची वाट पहातोयस/पहातेस?' अस म्हणतो आम्ही. दरवेळी खुसखुस हसु येत अन मग जो कोणी अस्ताव्यस्त पसरलेला असेल तो बिचारा उठुन बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इथे बघ.. सगळेच आहेत.

मस्त कलंदर
Tue, 09/04/2012 - 13:26 नवीन
इथे बघ.. सगळेच आहेत. www.misalpav.com/node/15260
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

गावचे अनुभव अगदी असेच!

sagarpdy
Mon, 09/03/2012 - 13:07 नवीन
गावचे अनुभव अगदी असेच! सगळ्यात जास्त आठवतात ते म्हणजे किल्ले. एका वर्षी आम्ही भावंडानी खूप काडेपेट्या गोळा केल्या होत्या . दिवाळीत किल्ला बांधून झाल्यावर उरलेली माती या काडेपेट्यात भरून, पानचुलीत टाकल्या. दुपारी चूल विझल्यानंतर भरपूर विटा मिळाल्या. मग किल्याला खरोखरची तटबंदी तयार केली. मजा आली. .. गावी दिवाळी पेक्षा जास्त मजा यायची ती मे महिन्यात. आम्ही बच्चा पार्टी सकाळी उठून छोट्या छोट्या पिशव्या घेऊन, आजोबांबरोबर गुरांकडे जात असू. त्याचबरोबर आंबे / काजू गोळा करत असू. पिशव्या भरून घरी परत आल्यावर फणस नाहीतर आंबे हा नाश्ता ठरलेला. आई-आजीची उन्हाळ्याची कामं - फणस / आंबा पोळी, आमसुलं, कोकम सरबत, तळलेले गरे - चालू असायची. नाश्त्यानंतर आम्हा पोरांची कामं ठरलेली - अंगणात पत्ते खेळणे आणि बाहेरच्या वाळवाणावर लक्ष ठेवणे. खाण्यात आणि खेळण्यात कधी महिना संपायचा ते कळायचा देखील नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

घरच्या अन्नाची आवड

सस्नेह
Sun, 09/02/2012 - 21:20 नवीन
घरच्या अन्नाची आवड बाळगणारी पिढीसुद्धा हळूहळू नामशेष होत आहे. नुसते 'चान चान' म्हणून न थांबता घरच्या जेवणाची संस्कृति टिकवण्यासाठी उपाय सुचवावेत. उदा. संध्याकाळी बाहेरचे चमचमीत खाणे कंपल्सरी वर्ज्य. फक्त घरचेच. मग वरणभात का असेना.
  • Log in or register to post comments

पोटावर पाय...

प्रभाकर पेठकर
Sun, 09/02/2012 - 21:26 नवीन
संध्याकाळी बाहेरचे चमचमीत खाणे कंपल्सरी वर्ज्य. फक्त घरचेच. काय हो... आमच्या पोटावर पाय आणताय जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नाही हो काका

सस्नेह
Sun, 09/02/2012 - 21:59 नवीन
नाही हो काका ! शनिवार-रविवारची संध्याकाळ तुमच्याच ताब्यात की हो ! जिभेची चैनी...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

छान

सुमीत भातखंडे
Sun, 09/02/2012 - 21:37 नवीन
छान लिहिलंय... पेठकर काकांचा प्रतिसाद पण मस्त
  • Log in or register to post comments

हळवे करणारे लेखन

पैसा
Sun, 09/02/2012 - 21:51 नवीन
हळवे करणारे लेखन. अशा आठवणी प्र्त्येकानेच जपलेल्या असतात. माझ्या मुलांना यापैकी फक्त घरच्या जेवणाच्या आठवणी मी देऊ शकते. १२ महिने नोकरी असल्यावर घरी हळद तिखट मसाले पापड करणे अशक्यच आहे. शिवाय पूर्वी पापड करताना शेजारच्या बायका हमखास मदतीला यायच्या. आता शेजारीण माझ्यापेक्षा जास्त वेळ बाहेर असते. महिना महिना तिच तोंड सुद्धा दिसत नाही मग मदत कसली! आणि मीही तिला परत मदत करू शकणार नाही. चालायचंच. पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त

चावटमेला
Sun, 09/02/2012 - 21:57 नवीन
पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. आमची आईसुध्दा दही घालून मस्त पिठलं बनवते. आणि हो, आईच्या हातचं थालीपीठ म्हणजे तर माझा जीव की प्राण. आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का?
  • Log in or register to post comments

खमंग थालीपीठ

प्रभाकर पेठकर
Mon, 09/03/2012 - 01:25 नवीन
आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का? चविष्ट पदार्थ कधीच नामशेष होणार नाहीत. फरक इतकाच की भाजणी घरी करण्याचे दिवस मागे पडत चालले आहेत. भाजणी सरळ तयार आणि विकतची वापरली जाते. अगदी त्याचीही आवश्यकता नाही. काही काही उपहारगृहांमधून तयार थालीपीठ मिळतं. येत्या ६ महिन्यात, खमंग थालीपीठ, मस्कतमध्येही मिळायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

औटसोर्सिंग

मराठे
Tue, 09/04/2012 - 21:42 नवीन
थालीपिठांवरून आठवलं, एकदा ऑफिसमधला एक पाकिस्तानी मित्र सहकुटूंब आला होता. त्याला थालीपिठ खिलवलं होतं. ही आमची पेशल डेलिकसी आहे म्हटलं. अजूनही कधी कधी त्याची आठवण काढत असतो ! बाकी लेखात म्हटल्याप्रमाणे घरात बनवण्याच्या कित्येक गोष्टी आता सर्रास बाजारातून आणतात .. आणाव्या लागतात. माझ्या आजीच्या पिढीत गहू विकत आणून घरी कांडून पिठ केलं जाई, आईच्या जमान्यात बाजारातून गहू आणून मग गिरणीतून दळण आणलं जायचं, आम्ही बाजारातून गहू न आणता पिठ आणतो, आमचे चिरंजीव बाजारातून डायरेक्ट पोळ्याच आणणार.. कालाय तस्मै नमः । शेवटी औटसोर्सिंगचा जमाना आहे. दुसरं काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

काळाचं घड्याळ थोडं परत फिरवता आलं असतं तर बरं झालं असतं

चैतन्यकुलकर्णी
Sun, 09/02/2012 - 22:49 नवीन
माझ्याही लहाणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही आम्ही तिखट व मसाला घरीच करतो. घरी दळणे वगैरे करण्यापेक्षा मसाल्याचे घटक आणून, त्यांना तेलात भाजून कांडप यंत्रावर दळूण आणले की मसाला तयार. फार काही कष्ट लागत नाहीत. अडचण एकच आहे, खात्रीशीर मिरच्या मिळत नाहीत (योग्य तिखटपणा व रंग असलेल्या), हल्ली निरनिराळ्या जातींच्या मिरच्या विकण्यासाठी एकत्र केल्या जातात. तयार मसाल्यातील रंग व भेसळ आणि किंमतीतला मोठा फरक यामुळे तिखट व मसाला घरीच करण्याला आई प्राधान्य देते.
  • Log in or register to post comments

मस्त आठवणी...

मोदक
Sun, 09/02/2012 - 23:33 नवीन
मला उगाचच "आयटी वाईफ आणि स्वयंपाक" हा धागा आठवतोय ;-)
  • Log in or register to post comments

अत्यंत "मनापासूनचा" धागा.

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 00:14 नवीन
अत्यंत "मनापासूनचा" धागा. वरील पदार्थांत मी हच्चिद्द आवलक्की ऊर्फ दडपे पोहे, मांडे, डिंक / हळीवाचे लाडू, थालीपीठ आणि तोक्कु, सप्पिन सारु ऊर्फ थिक रसम , चटणीपुडी , ठेचा ऊर्फ रंजका, तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे हे पदार्थ अ‍ॅड करू इच्छितो. बाकी साधे कैतरी करण्याची फर्माईश करण्याबद्दल दातारशेठशी बाडीस. अस्लं कै ना कै आठवतंय च्यायला जातोच घरला लौकर.
  • Log in or register to post comments

काळजी घे रे...

मोदक
Mon, 09/03/2012 - 00:29 नवीन
>>>डिंक / हळीवाचे लाडू... ऑ. :-o काळजी घे रे... :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठ्ठो....

मन१
Mon, 09/03/2012 - 00:32 नवीन
त्याचा मूळचा प्रतिसाद भारी आहे. पण मोदकानं षटकार मारलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

@ हळीवाचे लाडू...>>> ख्याक

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/03/2012 - 00:49 नवीन
@ हळीवाचे लाडू...>>> ख्याक :D @ पण मोदकानं षटकार मारलाय. >>>> काय आहे मनोबा,मोदक हल्ली असे विषय निघाले की हळवा होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

शालजोडीतून मस्त हाणलात

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 00:53 नवीन
शालजोडीतून मस्त हाणलात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कुणाची काळजी घेऊ रे

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 00:52 नवीन
कुणाची काळजी घेऊ रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

डिंक हळीवाचे लाडू अस्लं कै ना कै आठवून घरला लौकर जाणार्‍याची...

मोदक
Mon, 09/03/2012 - 00:54 नवीन
डिंक हळीवाचे लाडू.. तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे.. अस्लं कै ना कै आठवून घरला लौकर जाणार्‍याची काळजी घे.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

घेईन हो...तू हळवा झालास ते

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 00:59 नवीन
घेईन हो...तू हळवा झालास ते पाहून ड्वॉळे पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

लेखन आवडले. मी नेहमी घरीच

रेवती
Mon, 09/03/2012 - 03:02 नवीन
तुझे हे लेखन जुन्या दिवसात घेउन गेले.
  • Log in or register to post comments

मनोबाला आला पुलंचा झटका !

चौकटराजा
Mon, 09/03/2012 - 06:52 नवीन
हम्म्म आता ती पुण्याची थंडी राहिली नाही. मुंबईची व्हिक्टोरिया ट्राम, एखाद्या संग्रहालयातच पाहायला मिळते. असे लिहून लोकाना हळवे बनविण्याचा प्यीयेलना छंद होता.त्याचा झटका मनोबाला आलेला दिसतोय ! बाकी महाराष्ट्रीयन माणसाने खरोखरच गर्वसे कहो असे म्हणावे यात " जेवण- खाण " हा मुद्दा वरच्या क्रमांकावर. मी गेले ९ वर्षे काही उद्यम न करता घरीच आहे. कंपनीत जेवण मिळत असे पण आंबट दही , वाटणाच्या उसळी व फडफडीत भात असल्या प्रकाराला तिलांजली मिळाली. आता पैसा कमी आहे. पण साधेवरण भात , तूप लिंबु हे कंटाळा न येता गेले ९ वर्षे खात आहे व मस्त मजेत आहे. सांगायचे तात्पर्य की आपण मराठी लोक जगातील सर्वोत्तम मेनू आपल्या जेवणात घेत असतो. मर्यादित प्रमाणात तेलकट तुपकट तिखट आंबट असा हा सैपाक ! .मनोबा , तू केनीच्या पानाची भजी कधी खाल्ल्येस का? ( ही पाने श्रावणात आघाड्याच्या जोडीने कुठेही उगवतात ) तशी मायाळूच्या पानाची भजीही मस्त लागतात.
  • Log in or register to post comments

चौकटराजा साहेब, मायाळुची भजी अप्रतिम लागतात.

निश
Tue, 09/04/2012 - 13:40 नवीन
चौकटराजा साहेब, मायाळुची भजी अप्रतिम लागतात. त्याच बरोबर शेवरांची भाजी, करटुलाचि भाजी, भारंगाची भाजी, हादग्याच्या फुलांची भजी, कुलुचि भाजी, सुरणाच्या पाल्याचि भाजी व भोपळ्याच्या फुलांची भाजी अप्रतिम लागतात माजी आई आजही ह्या भाज्या करते. आणि सगळ्यात अवी ट जेवण ते म्हंजे, वरण भात तुप लिंबु,मेतकुट, तळलेली भरलेली मिरचि किंवा मिरचिच लोणच. लिहुनच सणसणित भुक लागली परत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

रविवारीच गावाहून करटुली आणली.

गवि
Tue, 09/04/2012 - 13:48 नवीन
रविवारीच गावाहून करटुली आणली. एकदम वेलीवरुन तोडलेली कवळी कवळी. :) रानभाज्यांची आठवण काढलीच आहे तर मग चिऊची भाजी (ऑफिसटाईमच्या झुडुपाच्या पानांसारखी छोटीछोटी पानं आणि मातकट वास) हीदेखील यात जोडतो. याला अधिक प्रचलित नाव काही आहे का? भज्यांचं नाव काढलंच आहेत तर ओव्याच्या पानांची भजी आणि गिलक्याची भजी अ‍ॅडवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गविसाहेब, एकदम भन्नाट नाव घेतलित.

निश
Tue, 09/04/2012 - 14:02 नवीन
गविसाहेब, एकदम भन्नाट नाव घेतलित. ओव्याच्या पानाची भाजी एकदम भन्नाट. गिलक्याची भजी म्हंजे जबरदस्त मऊ मऊ हिरवे गिलके गोल गोल कापुन केलेली भजी एकदम तोंडात वीरघ़ळते. अप्रतिम . चिउचि भाजी माझि आ़जी करायची ति असताना आम्ही गावाला गेलो कि त्यावे़ळी ति आम्हाला चिऊची भाजी म्हणुनच ती लहानपणी भ्ररवायची आता आजी ही नाही व तिची ती अप्रतिम चविची भाजी ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्मृतीरंजनात रमलेला लेख

यशोधरा
Mon, 09/03/2012 - 09:04 नवीन
स्मृतीरंजनात रमलेला लेख आवडला.
  • Log in or register to post comments

प्रचंड प्रतिसाद लिहीता येईल

गवि
Mon, 09/03/2012 - 10:33 नवीन
प्रचंड प्रतिसाद लिहीता येईल पण रडू येईल, आवंढा दाटेल वगैरे कारणांनी थांबतो. आवंढ्याने घशात दुखण्याचा त्रास होतो. उत्तम लेख. भिडला..
  • Log in or register to post comments

मन १ साहेब, तुम्हाला माझा नमस्कार.

निश
Mon, 09/03/2012 - 11:08 नवीन
मन १ साहेब, तुम्हाला माझा नमस्कार. नितांत सुंदर लेख झाला आहे.
  • Log in or register to post comments

ह्म्म.... आता न घर राहिलं ना

प्रभो
Mon, 09/03/2012 - 12:39 नवीन
ह्म्म.... आता न घर राहिलं ना आई. कधी अधे मधे मावश्या-काकवा-आत्या-मामी यांना आमचा पुळका आला तर मिळेल असं घरचं खायला कधीतरी आता... :)
  • Log in or register to post comments

(No subject)

इष्टुर फाकडा
Mon, 09/03/2012 - 17:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

णॉस्टॅल्जिया

मेघवेडा
Mon, 09/03/2012 - 17:01 नवीन
छ्या.. स्साला हा मराठी माणूस आय टेल यू.. फारच डाऊन विथ नॉस्टॅल्जिया ब्वॉ! ;) मनातून उतरलेलं उत्तम लिखाण. आवडलंच. :)
  • Log in or register to post comments

आठवणी

तिमा
Mon, 09/03/2012 - 19:33 नवीन
तुमच्या आठवणी आमच्या आठवणींशी ताडून बघितल्या. बर्‍याचशा मिळत्या-जुळत्या आहेत. पण आम्ही मागच्या पिढीतले असल्याने अजून आमची 'ही' आमच्या आईचा वारसा चालवत आहे. त्यामुळे मरेस्तोवर फारसे हळवे व्हायची वेळ येणार नाही.
  • Log in or register to post comments

मस्त लेख. आमच्या घरातल्या

मराठी_माणूस
Mon, 09/03/2012 - 20:12 नवीन
मस्त लेख. आमच्या घरातल्या सदस्यानेच लिहले असे वाटते इतके मिळतेजुळते आहे.
  • Log in or register to post comments

"व्हेज मध्ये व्हरायटी नाही"

उदय के'सागर
Mon, 09/03/2012 - 20:41 नवीन
"व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते >>> अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... :)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी .... हे माझंही असंच

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/04/2012 - 13:22 नवीन
अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... १०० % सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

१००००००% सहमत. आधी संताप

बॅटमॅन
Tue, 09/04/2012 - 15:03 नवीन
१००००००% सहमत. आधी संताप यायचा, पण सध्या मात्र कीव आणि हसू येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा