Skip to main content

घरचं जेवण

लेखक मन१ यांनी रविवार, 02/09/2012 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पेठकरांचा इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे आधीच हरवून बसलोय; ते घालवलय ह्याची जाणीव झाली. तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं. परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं. एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली. . गप्पा मारताना प्रथमच मला जाणवलं की "तिखट कांडायला कधी घेतेस" हे माझ्या आज्जीचं वाक्य आता दुर्मिळ होणार होतं. गरम मसाल्याचा तिखट्-तेलकट वास पुन्हा नाकात शिरणार नव्हता. माझी आई तिखट घरी बनवायची.(ते वाळक्या लाल मिरच्या आणून स्वतः दळून घेणं वगैरे.) पण अर्थातच माझी आजी आम्ही कसे मुसळानी गावाकडे हातानी कुटत असू मिरच्या(तुमच्यासारखं गिरणीतून आणत नाही) हे ऐकवायची. ते दगडफूल का तमालपत्र का काहीतरी म्हणतात ते मसाल्याचं पान घरात आणून आम्ही "काळा मसाला" घरातच बनवायचो. . हळकुंड आणून घरगुती हळदही बनवली जायची. . अजून एक कुठलं तरी काहीतरी आणून आई औषधी म्हणून ठेवायची आंबेहळ्द म्हणे. नक्की कशासाठी वापरातात ठाउक नाही. पण घरात एका छोट्या बाटलीत तो प्रकार भरुन ठेवलेला असायचा. थोडंफार मध असायचं.(हे मात्र बहुतांशी हवाबंद असलेलं खरेदी केलेलच.) . आईच्या हातच्या साध्या फोडणीलाही आणि साधे वरणालाही स्वर्गीय चव. तृप्ती मिळालीच पाहिजे खाल्ल्यावर. फोडणीही कोणती? तर नेहमी मोहरीचीच असे नाही, कधी जिर्‍याचीही असायची. क्वचित तुपाची फोडणी होइ. आई कधी मुगाची खिचडी (दाल खिचडी) करी. त्यावर नुसतं चमचाभर तूप आणि सार. व्वा. हे आनंदी जीवनाचं सार. . मागची पाचेक वर्षे दाल फ्राय खातोय. तक्रर अशी नाही. तेही अन्नपूर्णेचच दान. पण अचानक कधी घरच्या वरणाची आठवण होते. चिंचगुळाचं वरण आंबट गोड, गुळमट चवीचं वरण. कधी साधे वरणाला नुसती जिर्‍याची फोडाणी आणि हल्काशी मीठ- मिरे मिश्रण भुरभुरलेलं. टॉमॅटोचं आंबट वरण म्हणजे आमचा जीव की प्राण. . कधीकधी नुसतं "मुद्दा वरण", मुद्दा वरण म्हणजे हाटलेलं घट्ट वरण. आणी त्यावर घरी बनवलेला "काळा मसाला" मी हट्टाने घ्यायचो. तिखट लागायचं पण खायचोच. कधी कधी कच्च्या तेलासोबत मस्त लागायचं. पण हे घरी आवडायचं नाही. . लोणचं ही सुद्धा "विकत आणायची वस्तू " नव्हती. लोणचं ही "मुरवायची" कला होती. . लोणी-तूप हे विकत आणायचं असतं हे रूम वर राहू लागल्यापासून समजलं,. तोवर पिवळ्या रंगाचं "बटर" लोणी समजून खाल्लं नव्हतं. आई सायीचं दही लावायची. घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो. आम्ही सायीचं दही घुसळून लोणी काढायचो. लोणी "कढवून" तूप काढायचो. तूप कढत असतानाही, कच्चं असतानाही त्यात चमचा बुडवून खायची आमची दांडगी हौस. त्याबद्दल धपाटेही खाल्लेत. तूप बनल्यावर खाली उरते ती "बेरी" खरवडून खायची. मस्त गुळासोबत टाकलीत तर क्या केहने! माझी आवड पाहून शेजारच्या किनीकर अन वैद्य काकूही त्यांच्याकडे तूप- लोणी बनू लागलं की मला आवर्जून बोलवत. "हल्ली आमच्याकडं असं आवडिनं खाणारं कुणीच नाही" असं काहीतरी काकू म्हणायच्या. "घरी दोन दिवस कुठला जिन्नस टिकू देइल तर शपथ" असं उलट आई म्हणायची. आईचा वैताग काकूंना आनंद वाटायचा. ह्या काकूंच्या आदरातिथ्याच्या बदल्यात बाजारातून येताना त्याचं एखादं पत्र टाकणं, लगे हाथ आमच्या सामनासोबत त्यांचय खातेदारीवर त्यांचं सामान उचलणं अशी कामं करावी लागायची. घरगुती चविष्ट प्रकारांच्या मोबदल्यात ही कामं काहीच नवह्ती. . सणांना मजा असायची. पुरणाचे कणकेत उकडून तयार केलेले "दिंडे" नागपंचमीस मिळायचे. झोप येइस्तोवर हादडायचो. गौरे-गणपतीतही खाणे हे स्वर्गसुख. . चैत्र महिन्याच्या आसपास कधीतरी कैरी आणि डाळ ह्यांचं आईच्या हातून जमलेलं ओलसर मिश्रण म्हणजे यंव रे यंव. . कधी कांद्याच्या पातीचा घोलाणा होइ. कच्च्या पाती कापून त्यावर थोडीफार फोडणी आणि मीठ. बस्स. मस्त लागाय्चं. . कधी कांद्य्चाच्या पातीची "भरडा भाजी " मिळे, तर कधी ढोबळा मिरचीचा भरडा. कुठलीही भरडा भाजी खावी तर दह्यासोबतच हे माझं तेव्हापासून तत्वच ठरलं. अमराठी रुम मेट्सच्या घरातही ह्यासदृश प्रकार बनत असावा. पण त्यांना ती वस्तू explain करताना मला नाकी नौ आले होते. डाळीचे पीठ आणि इतर भाज्या ह्यांचे मुळात कॉम्बिनेशन करावेच कशाल हेच तो विचारित राहिला. मला कधीच धड त्याला सम्जावता आले नाही. . पालक, मेथी, चुका, अंबाडी ह्यातली कुठलीही भाजी किंव तशी इतर कुठलीही रानभाजी पाअनात पडली तर पूर्वी चेहरा वाकडा होइ. पण नक्की हा प्रकार कधी आवडायला लागला ते सांगता येणार नाही. परवा जाणवलेली गोष्ट म्हणजे मी चक्क चक्क अळूची भाजी आवडिने, मिटक्या मारत खात होतो! काय होतो मी, काय झालो मी. . बाहेरच्या कोशिंबीरिच्या चवीबद्दल सुरुवातीस माझी तक्रार होती. काहीतरी खटकत होतं. नंतर जाण्वलं मला ज्या कोशिंबिरीची सवय आहे, त्यात डाळ आणि दही दोन्हीही वापरलेले असतात. हाटेलात बहुतांश ठिकाणी दहि + काकडी/टोमॅटो/कांदा ह्यास कोशिंबीर म्हणतात. म्हणून मला त्रास होइ. नंतर अर्थातच त्यचीही सवय झाली. . कधी कधी मला आवडतो म्हणून भात कुकरमध्ये न करता भांड्यात शिजवला जाइ.(steam rice न करता boiled rice बने. आजही बहुसंख्य दाक्षिणाट्यांत घरी boiled riceच बनतो हे नंतर सहकार्‍याकडून समजले.) भांड्याला लागलेली खालची भाताची "खरवड" सुध्हा चविष्टच. . संक्रांतीला बाजरीच्या भाकर्‍या होत. दूध आणि गुळासोबत मस्त लागत. कधी आळूचेसुद्धा भजे बनवले जात. मला आवडत. . हल्ली हळद, तिखट्,मसाला, लोणचे,लोणी(यलो बटर),तूप सगळं खरेदीच होताना दिसतं. त्यामुळे कामातही सुटसुटितपणा येतो असा मुद्दा सहकार्‍यांशी गप्पा मारताना निघाला. . पिठलं बाहेरचं खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी दोन्ही प्रकारचं पिठलं पूर्वीपासून बने. साधं (पुण्यातल्या काही मराठी हाटेलात मिळतं; मला आवडतं) तसं आणि दुसरं म्हणजे तव्यावरचं, दह्यातलं पिठलं. ह्याचीही खरवड मस्त लागाय्ची. आख्खा तवा खरवडून फस्त केला जायचा. पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. . कढी...पिवळी कढी नि पांढरी कढी. वरती लिहिलेलं लोणी काढल्यावर उरतं ना त्या ताकाचीही कढी व्हायची. भरगच्च होइस्तोवर तीही हाणली जायची. बाहेर पडल्यावरही गुजराती-राजस्थानी थालीच्या निमित्ताने हा माझा आवडता पदार्ध मात्र मला कायम मनासारखा मिळत आला. . गह्री बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.आठवतय तेव्हापासून जेव्हा केव्हा खायला मिळालं तेव्हा साधसंच पण छान असं मिळालेलं. आता परत गेलो की भरडा भाजी, कढवलेलं तूप नि गरमागरम कढी ह्यावर तुटून पडायचं आहे. "व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते ; कधी त्याला वैविध्यपूर्ण घरचं व्हेज जेवण मिळालं नस्सावं ह्या अंदाजाने वाईटही वाटतं.

वाचने 62392
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by गवि

गवि, आता वरची लिस्ट पहा.(लिस्ट अजून अपूर्णच आहे.) पुण्यात चार चार वर्षे राहूनही पब्लिकला हे इथे आहे हेच ठाउक नाही. मग म्हटले जाते की "वेज मध्ये ऑप्शन्स नाहीत." माझ्या पुण्यातील परिचितांत हे वाक्य म्हणनार्‍यातले ९०% लोक अशा थिकाणांपासून अनभिज्ञ होते. जवळच्या मित्रांपैकी कुणी असे म्हटल्यास मी शक्य्तो मित्रांना ही ठिकाणे दाखवतो. त्यांनाही ती आवडतात. मग त्यांना आवडेल त्या दिवशी ते हवे तिथे जातात, पण बहुतांशी ते वाक्य कमी होते/बंद होते. शाकाहार काय अन मांसाहार काय, दोन्ही आवडिने त्यांचा सुरु राहतो. अर्थात ही सर्व ठिकाणे पाहूनही कुणा पट्टीच्या खवय्यास ऑप्शन्स नाहित असे वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे; पण ते त्याच्या खाद्य भटकंतीमुळे. आणि "ऑप्शन्स नाहित " असे म्हणण्यापेक्षा इतरांनी "ऑप्शन्स दिसत नाहित" असे म्हटलेले उचित वाटेल. अर्थात , कुनी काय म्हटलेले उचित ठरेल हे ठरवनारा मी कोण हाही प्रश्न आहेच्.कुनी आक्षेप घ्यायच्या आत मीच ते विधान मागं घ्यावं का काय?

In reply to by बॅटमॅन

हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं >>> लई वेळा सहमत ! मनोबा , खाण्याचा लेखा जोखा महाप्रचंड आवडेश रे ! आजकाल स्साल ते विलायती आणि हायब्रीड पिकांनी पण अक्षरशः चव घालविली ..ही काल परवाची गोष्ट , दर आठवडा दर रविवारी बाजारात जात असतो मला गेले चार आठवडे गावरान गवार हवी होती ..स्साला बाजारात पत्ता नाही ... ईथे नाशकात त्यादिवशी नाशीक रोड ला पुण्याकडे जाताना जरा पुलाखालच्या बाजारात घुटमाळलो ...अर्धा किलो भर विकत घेतली . सकाळी नाष्ट्यापासुन ते रात्रीच्या जेवणापर्यंत हादडली .. साधी तव्यावर तळुन जरा मीठ घातलेली पण चवदार लागत होती . अगदीच जुन्या कालावधीत जन्माला आलो नसलो तरी काही लहाणपणी जिभेवर तरळणार्‍या चवी अजुन जश्याच्या तश्या आहेत. तुझा लेख त्याच लहाणपणातल्या खाद्य प्रवासा कडे घेवुन गेला ...ईथे मिपावर आवडते खाद्य मध्ये मी लिहीले होते, ते अजुन जिवंत ठेवले आहे ..." आईच्या हातचे सर्व काही "

लेख वाचला आणि सर्वांप्रमाणेच भूतकाळात गेलो. जेवण म्हटलं की स्वयंपाकघर, आई आणि 'शिकताय ते बरंय. उद्या गरज पडली तर कुणाची वाट बघत बसावी नाही लागणार, हाताने बनवून खाल' असं तिचं आम्हा दोन्ही भावांना सांगणं, रेसिप्या सांगायची तिची विशिष्ट पद्धत सगळंच आठवलं. आज ती नाही पण कधी 'अमुक पदार्थ खावासा वाटतोय, काय करावं?' असा प्रश्न पडला नाही. ज्याअर्थी तिने आम्हाला स्वयंपाक शिकू दिला त्याअर्थी तिला पुढे घडणार्‍या गोष्टी आधीच कळल्या असाव्यात असं कधी कधी वाटून जातं. तिच्या आशीर्वादाने खाण्याची आबाळ अजूनपर्यंत झालेली नाही.

डाळिंब्याची उसळ आळूचं फतफतं उडदाच्या पापडाच्या लाट्या पोह्याचे भाजलेले पापड (हे अलीकडे पार गायब झालेत) कुरडया आणि चिकवड्या सोर्‍यातून पाडलेल्या चकल्या, हाताने वळलेले बेसनाचे लाडू आणि चिरांट फोडल्यावर बालमनाला होणारा आनंद हात दुखेपर्यंत वाटलेलं पुरणयंत्रातलं पुरण दही टांगून बनवलेला चक्का घरगुती मडक्यात फर्मेंट केलेली सुंदर वाईन सध्या तरी इतकेच आठवते आहे. सुंदर आठवणींना उजाळा दिल्याबद्दल लेखकाचे आभार.

मी अजुनही घरी तिखट मिसळते. अर्थात तिखट पावडर विकतची पण बाकी सारा मसाला मी घरी बनवुन मग तो तिखटात मिसळते. मग कांदा मिसळलेल चवीसाठी म्हणुन बाजुला काढायच वगैरे उद्योग होतात, पण हल्ली ते बाजुला काढलेल तसच पडुन रहात. एक मात्र आहे, माझा स्वयंपाक अजुनही बावनकशी कोल्हापुरीच असतो. अगदी परवा व्हायरलन लागोपाठ दोनदा आजारी पडले पण उठुन भाकरी केल्या न खाल्ल्या त्या दिवशी बरं वाटल. चपातीचा वासही नको होता तेंव्हा. मी अजुन इतक बनवते म्हंटल्यावर कदाचीत हा र्‍हास एकपिढी पुढे सरकेल अस वाटतय. मनोबा लेखाबद्दल काय बोलायच? माझ्या घरी मोठी रवी आहे. आता धुळ खातेय, पण ती खांबाला बांधुन 'खुळ्ळक्क खुळ्ळक्क' ताक घुसळण्याचा धंदा अगदी आवडीन केलाय. अन ते त्यावर येणार लोणी .... तो तुप कढवण्याचा वास्...मी अजुनही घरीच कढवते, पण लोणी बाहेरच्..अनसाल्टेड..

हे लोक आजकाल अगदी प्रत्येकाच्या मनातुन खणुन काढल्याप्रमाणे लिहीत आहेत. कशाला स्मरणरंजनात अडकवत असतील ?

In reply to by इरसाल

अगदी हेच टंकणार होतो... मनोबा.... फारच 'नॉस्टॅल्जिक' करणारा लेख!

मी न्याहारीला गुरगुट्या मऊभात, ताकातली फक्कड उकड, धिरडं, आंबोळी हे पदार्थ बनवते म्हटल्यावर हापिसातले लोक्स आश्चर्याने बघतात.... बर्याच जणांना हे पदार्थ माहित नाहित..

In reply to by प्रेरणा पित्रे

गुरगुट्या मऊभात आणि नाचणीची आंबिल या दोन अतिपोषक पण जेवणेच्छा मारक पदार्थांनी आमचे शैशव ठार करपवून टाकले बघा. :( बाकी उकड , धिरडं, आंबोळी इ. शी सहमत. :)

मी बदलत्या काळासोबतही खूष आहे. अर्थातच जुनं आठवून दाटून येणं हे "आता तो काळ गेला" अशा अर्थाने असतं. तो काळ परत यावा अशी इच्छा नाही. पुलंनी म्हटलंच आहे ना की सकाळी आम्हाला ओव्या ऐकायला मिळाव्यात म्हणून तू कंबर मोडून जात्यावर दळण दळत बस अशी अपेक्षा करणं चूक आहे. (दळल्याने व्यायाम होत असेलही. इथे उल्लेख फक्त सोयीबाबत आहे.) आता गिरणीच. तरीही आवंढा आवरुन गंमत म्हणून एक यादी तयार करतो. यापूर्वी इतर प्रतिसादांमधे हे पदार्थ आले असतील किंवा नसतील तरी: १. पानगी २.पातोळे ३. पोह्याचं डांगर ४. घारगे ५. फणसाचं सांदण ६. पंचामृत (आमटीचा प्रकार, दूधदह्याचं नव्हे.) ७. गोळ्याचं सांबार. ८. बिरड्यांची उसळ ९. कुळथाचं पिठलं १०. उकडीचे मोदक ११. सांजोरी / साटोरी १२. घावन / घाटले १३. फणसाची भाजी १४. कैरीची डाळ १५. कोयाडं १६. पेरुचा कायरस १७. तंबिटाचे लाडू (पाकृ पेंडिंग फ्रॉम रेवतीकाकू) १८. राघवदासाचे लाडू १९. सांडगे २०. कुरडया २१. गव्हाचा चीक २२. तांदळाची उकड २३. गव्हल्याची ख्रीर २४. केळफुलाची भाजी २५. जिर्‍यामिर्‍याचा भात २६. दडपे पोहे

In reply to by गवि

सॉरी गवि! एकदा केले होते पण माझ्याकडच्या त्यावेळच्या मिक्सरमध्ये पीठ नीट झाले नव्हते. आता नवीन मिक्सरमध्ये करून बघते. कळवण्यास विसरले, क्षमस्व.

सर्व वाचकांचे आभार. गवि,ब्याटमन , बल्लवाचार्य पेठकर काका आणि इतर काहींचे प्रतिसाद प्रचंड भावले. वेळेअभावी सध्या फक्त रुमाल टाकून ठेवतोय. सोल्कढी, पूडचटणी, हातकुटीची(खलबत्त्यात कुटलेली) शेंगदाणे आणि लसणाची चटाणी(मिक्सरीकृतचटणीहून शंभरपट चविष्ट असते.), मुळ्याची तिखट कडवट भाजी, मुगाच्या रव्याचा शिरा/सांजा, सत्यनारायणाचा केळी, केश्सर, काजू बदाम घालून केलेला शिरा. सातूचं दुधात कालवलेलं चविष्ट, पौष्टिक पीठ, लाह्याचं पीठ. नाचणी सत्व सालीच्या लाह्या, बत्तासे. चुरमुर्‍याचा सुशीला(ह्याचा आधीच कुणीतरी उल्लेख केलाय वर) . .अपूर्ण

मुद्दा वरण!!!! जीव की प्राण! त्या नंतर पुढचं वाचायला लागायला १० मिनिटे लागली! :) लेख मस्तच आहे. खूप खूप आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे मसाले, पापड, लोणची, सांडगे, कुर्डया, चिंचा वाळवणे वगैरे प्रकार आख्ख्या बिल्डिंगचे एकत्रच व्हायचे. उन्हाळ्यात सुट्टीत राखण बसणे हा एक मोठा प्रकार असायचा. ते सगळं आठवतं आता आणि मग निमूट दुकानातून घेऊन येतो सगळं!

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात ह्याला मुख्य कारण जे 'शाकाहारी' (सर्वाहारी नाही) असतात ते, ज्या भटारखान्यात मांसाहारी पदार्थ शिजवले जातात अशा उपहागृहात जात नाहीत. शाकाहारी उत्तम जेवण/पदार्थ बनविण्यासाठी स्वयंपाकी मिळत नाहीत. कारण अशा स्वयंपाक्याला नोकरी मिळण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध असतात. मांसाहारी आणि सर्वहारींची संख्या शुद्ध शाकाहारींपेक्षा जास्त असल्याने असे पदार्थ बनविणारे स्वयंपाकीच तयार होतात. जे उत्तम शाकाहारी स्वयंपाक करतात ते शाकाहारी वैशिष्ट्य असलेल्या उपहारगृहातच नोकरी करीत असतात. शुद्ध शाकाहारी गिर्‍हाईक मांसाहारी उपहारगृहाकडे फिरकत नसल्याने शाकाहारी वैशिष्ट्यांची उपहारगृहे वेगळी असतात. जसे पुरोहित, मामा काणे (एकेकाळी होते), कामत, उडप्यांची उपहारगृहे, गुजराथ्यांची उपहारगृहे, एखाद्या कुटुंबाने चालविलेले शाकाहारी उपहारगृह, कुठलेही अल्पोपहाराचे उपहारगृह, पावभाजी उपहारगृहे इ.इ.इ. अनेक पर्याय शाकाहारींसाठीही उपलब्ध असतात. परदेशात शाकाहारी पर्याय कमी उपलब्ध असतात असा माझाही अनुभव आहे. पण भारता व्यतिरिक्त शाकाहारींचे प्रमाणही इतरत्र कमी आढळते. जिथे जे विकले जाते तिथे तिथे ते बनविले जाते. टंड्रा प्रदेशात एअर कंडीशनर्स विकायचे दुकान कोण टाकणार? शाकाहारी जेवणात विविधता नाही असे म्हणणार्‍याला स्वयंपाकाचा अनुभव नसावा. भारतात तरी मांसाहार म्हंटले की अंडे, कोंबडी, मासे, मटण, डुक्कर, गोमांस ह्यांचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मसाल्यांनी त्यात वैविध्य आणून बनविले जातात. तर शाकाहारीं मध्ये भाज्या हा पर्याय घेतला तरी फळभाजी, पालेभाजी, मुळं, शेंगा असे अनेक प्रकार आहेत. त्यांचे कोरडी भाजी, पीठ पेरून भाजी, रस्सा भाजी, डाळ मिसळून केलेली भाजी, मिश्र भाजी असे विविध प्रकार आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने (कोल्हापुरी, मालवणी, पंजाबी, गुजराथी, ब्राह्मणी, कायस्थांची, सिंधी, राजस्थानी इ..इ.इ.) बनविण्याच्या पाककृती असतात. पोळ्या तर किती प्रकारच्या साधी पोळी, घडीची पोळी, परोठा, फुलका, रोटी, नान, कुलचा, स्टफ्ड परोठा, गोडाच्या पोळ्या, पुर्‍या, भटूरे, धीरडी, डोसे, आंबोळ्या, ठेपले (अगदी फोडणीची पोळी, पोळीचे लाडू) असे अनेकविध प्रकार आहेत. भातांचे प्रकारही अनंत आहेत. साधा भात, मसाले भात, बिरड्यांचा भात, वांगी भात, पुलाव (मुळचा मांसाहारी पण आता शाकाहारातही समाविष्ट), टोमॅटो, पालक भात, खिचडी, बिशी ब्याळी, वडा भात, फोडणीचा भात, दही बुत्ती, अनेकानेक प्रकार आहेत. आमट्या- तुरीच्या डाळीची,मुगाच्या डाळीची, डाळ ढोकळी, चण्याच्या डाळीची, सर्व उसळी, मोड आलेली कडधान्ये, विविध भाज्या वापरून पातळ भाज्या ह्यातही गुजराथी खासियत, दाक्षिणात्य पद्धती, पंजाबी तडके इ.इ.इ. लोणची, कोशिंबीरी, पापड, कुरडया, पापड्या, सांडगे, डांगर, पचडी, पंचांमृत, दही घालून, बिन दह्याची. चटण्या - ओल्या आणि कोरड्या असंख्य आहेत. गोडाचे पदार्थ- श्रीखंड बासुंदी पासून यादी करायला घेतली तर पन्नास एक सहज नांवे निघतील. तेच उपहाराचे. पोहे, बटाटे वडे, डोसे, उत्तपा, सांजा, उपमा, ढोकळा, शेव, चिवडा, पापड्या, फाफडा, कचोर्‍या, पॅटीस अंतहीन यादी तयार होईल. अजून वरील यादीच्या चौपट पदार्थ शाकाहारीच्या छत्राखाली येतात. पण सध्या एवढेच पुरे. हे सर्व पदार्थ भारतात वेगवेगळ्या उपहारगृहात मिळतात. प्रत्येक उपहारगृहाची एक खासियत असते. कोल्हापुरी, मालवणी, गोवन खासियत असलेल्या उपहारगृहात आपण शाकाहारी पदार्थ खायला जात नाही. तसेच गुजराथी उपहारगृहात आपण मटण बिर्याणी खायला जात नाही. मांसाहारी उपहारगृहात शाकाहारी पदार्थांचे वैविध्य दिसून येत नाही तर तिथे मांसाहारी वैविध्य तरी कुठे असते? पंजाबी मांसाहारी उपहारगृहात मालवणी, आणि मालवणी उपहारगृहात लखनवी बिर्याणी मिळत नाही. एखाद्याने ठेवली तरी नुसते मेनू मधील एक नांव असते. तो त्या जागेचा अस्सलपणा त्यात नसतो. 'मालवणी चिकन', 'दम बिर्याणी', 'फिश कोळीवाडा' 'मटण कोल्हापुरी' वगैरे वगैरे वगैरे मेनू मधली नांवे असतात. रंग, रुप आणि चवीच्या नांवाने अगदी बोंब असते. सर्व एकाच उपहारगृहात करायचे म्हंटले तर तसे त्या त्या क्षेत्रातले तज्ञ कारागिर लागतात. तसे आणले तर बाहेरच्या गिर्‍हाईकांपेक्षा भटारखान्यात कर्मचारीवर्ग जास्त होईल. त्यांचे वेतन, राहण्याची, जेवण्या-खाण्याची सोय इ.इ.इ. पाहता कुणा मालकाला परवडणार नाही. शिवाय, प्रत्येक भटारखान्याचे आकारमान, सामानाची उपलब्धता, नगरपालिकेचे नियम इत्यादीं गोष्टी त्या त्या भटारखान्याची उत्पादन क्षमता ठरवत असतो. कुठल्याही भटारखान्यातून अमर्यात उत्पादन शक्य नसतं. त्यामुळे आपल्या मर्यादा जाणून मेनू आणि वैशिष्ट्य ठरवावे लागते. सर्व एका ठिकाणी अपेक्षिण्यापेक्षा त्या त्या वैशिष्ट्यांच्या उपहारगृहांना भेटी द्याव्यात. कोल्हापुरीसाठी 'पुरेपुर कोल्हापुर, मालवणीसाठी 'कोकण दर्शन', पंजाबी साठी 'ग्रेट पंजाब', मराठी थाळीसाठी 'श्रुती डायनिंग हॉल' गुजराथी जेवणासाठी एखादे गुजराथी उपहारगृह इ.इ.इ. शाकाहारी पदार्थात वैविध्य नाही किंवा निदान भारतात तरी, बाहेर कुठे मिळत नाही असे मला वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

अनुभव आणि व्यावहारिकता ह्यांचे भक्कम पाठबळ असलेल्या प्रतिसादास दंडवत. "श्रुती " नाव gud books मध्ये पाहून कसेसेच झाले. पुण्यातले श्रुती म्हणत असाल तर त्याहून आशा, श्रेयस व इतर शेकडो चांगली ठिकाणे आहेत. वरती "सकारात्मक प्रतिसाद देतो" म्हणून गविंच्या प्रतिसादाखाली रुमाल टाकलाय तो हेच enlist करायला. मी नुसती ठिकाणे लक्षात ठेवत नाही, जमेल तितके कुठल्या ठिकाणे काय काय चांगले मिळते ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो.

In reply to by मन१

मी दिलेली नांवे 'सर्वोत्तम' नाहीत. एक उदाहरण म्हणून, शास्त्रापुरती घेतली, आहेत. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या उपहारगृहांकडे पाय वळवावेत, ही विनंती. पुण्या - मुंबईत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

दंडवत. _/\_ किमान भारतात तरी हा शाकाहाराभाव कुठेच अनुभवायला मिळत नाही- अपवाद बंगालचा. मागे एका प्रतिसादात मी म्हटले होते की बंगाली व्हेज डिशेस देखील बर्‍याच असतात, पण कोलकात्यात सर्वसामान्य हाटेलांची अवस्था लै दारूण आहे. तशी साधीसुधी हाटेले आय मीन मध्यमवर्गीय जवळपास नाहीतच म्हटले तरी चालेल. प्यूर व्हेजवाले लै गंडतात तिथे. मी सर्वाहारी असल्याने प्राब्ळम नै आला पण चिकनं लै खाऊन खाऊन नंतर वात आला. (कोलकात्यात २ वर्षे काढलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

अजून दुसरी एक समस्या असते. जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो. एखादा पदार्थ शिकताना आपल्याला त्याची मनापासून आवड असायला लागते. शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो. दाक्षिणात्य स्वयंपाक्याला मराठी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना अडचणी येतात. त्याला मुळात स्वयंपाकाची आवड असेल तर जसे सांगितले तसेच्या तसे तो करू शकतो पण त्यात ती आत्मियता नसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

हां हे बाकी खराय!! हा मुद्दा लक्षातच आला नव्हता. पण एक सांगा,
जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो.
आणि
शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो.
ही तफावत का? बाकी पेठकरकाका हॉटेल बिझनेसबद्दल आपण इथे काही आधी लिहिलेले आहे काय? नसल्यास ते लिहावे अशी या निमित्ताने नम्र विनंती. प्रत्यक्ष हॉटेल व्यावसायिकाकडून त्या व्यवसायाशी संबंधित वाचायला मिळणे म्हणजे पर्वणि असेल. जर लिहिले असेल तर कृपया लिंक्स द्याल का प्लीज?

In reply to by बॅटमॅन

जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो. आणि शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो. कदाचित, मांसाहारी कुटुंबात जन्मलेल्या मांसाहारी व्यक्तीची 'नाळ' मांसाहाराला जुळलेली असते आणि शाकाहारी कुटुंबात जन्मलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी किंवा मिश्रहारी झाला तरी त्याची 'नाळ' शाकाहाराशीच जुळलेली राहते. हे सर्वसाधारण निरिक्षण आहे. ह्याला अपवादही असू शकतील. हॉटेल बिझनेसबद्दल आपण इथे काही आधी लिहिलेले आहे काय? नाही. अजून काही लिहीले नाही. कारण हा व्यवसाय मीच अजून शिकतो आहे. त्यावर काही लिहावे इतका माझा अधिकार नाही. हं! आजवरचे जे अनुभव आहेत, जी निरिक्षणं आहेत ती मांडेन कधीतरी सर्वांसमोर. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

हम्म्म पटेश :)
आजवरचे जे अनुभव आहेत, जी निरिक्षणं आहेत ती मांडेन कधीतरी सर्वांसमोर.
वाट पाहणे सुरू:)

अरे, खायला जायच्या ठिकाणांच्या लिस्टा काय काढताय, च्यायला फोनं करुन बोलावलं तर एकजण येत नाही, उगा गप्पा मारताय इथं, असो. आजी- आजोबांचा सहवास न लाभल्यानं अनवट, अनोळखी पदार्थांची आपली काही ओळख जास्त नाही,आणि त्यातुन येणारा नॉस्टॅलिजिया पण नाही, ह्याचं वाईट वाटतंच कधीतरी पण त्याचवेळी पुढं जाताना मागं अडकवुन ठेवणारा एक दोरखंड कमी आहे याचा आनंद पण आहे. तर दुर्मिळतेच्या बाबतीत वर्षातुन एकदा होणारी पडवळाची भजी हीच काय ती दुर्मिळता, बाकी पोळी, भाजी, वरण, भात हा शाकाहार ओळखीचा. खाण्याबद्दल खाली स्वाक्षरीत लिहिलेलं आहे, आणि गेल्या दोन वर्षात स्वाक्षरी बदललेली नाही यावरुन काय ते समजुन घ्या. पुण्यातल्या खादाडीबद्दल -- पराठे - बॅटमॅनशी चैत्यन बद्दल सहमत, शाजीला पर्याय नाही, हल्ली आम्ही सहा सहा चुरचुर नान खाउन येतो हा भाग अलहिदा. - उत्तर भारतीय - हॉर्न ओके - जरा उच्चवर्गीय , भगतचंद ताराचंद हे सुद्धा उच्चवर्गीय, क्वालिटि कॅम्प - जरा जास्तच उच्चवर्गीय, दिल्ली किचन् मॉडेल कॉलनी ( वपाडावच्या रुममागे ) गावात आणि बाहेर एक्स्प्रेस वे वर रंगला पंजाब, - हे एकदम आँथेटिक पंजाबी. सोलापुर रोडला यवत जवळ कांचन - शामसवेरा ही भाजी आणि गोडसर असणारी लखनवी बिर्याणी - (अतृप्त आत्मा तृप्त झाला तर तुमची आमची काय टाप आहे) मराठी घरगुती - बादशाही - जनसेवा - सात्विक - दुर्वांकुर - श्रेयस - पिठलं भाकरी - खेड शिवापुरला कैलास गार्डन आणि मोराची चिंचोळीला थोपटेंच्या घरी (किटलीनं शुद्ध तुप वाढणे हा माज इथंच अनुभवा शकता ) मिसळपाव - हेमंतची गाडी कर्वे रोड, मामा मंगला टॉकिज्च्या बाहेर, ज्योती भिगवण, वैद्य रविवार पेठ, खासबाग मिसळ सिंहगड रोड, नारायणगाव, मंचर (संदर्भ - विनोद बाणखेले), दिपक पौड गाव (संदर्भ - वल्ली ), कांचन सुद्धा चांगलं आहे. नाष्टा - बिपिन सह्याद्री हॉस्पिटलच्या बाहेर कर्वे रोड, पेठेतले बरेच छोटे स्टॉल, वडापाव - सहकार नगर मधलं हॉटेल, नाव नक्की आठवत नाही. दक्षिण भारतीय - रास्ता पेठेतल्या दोन मेस, भवानी आणि आंध्रा मेस, बजेटमध्ये उत्तम जेवण. दक्षिणायन क्वालिटिबद्दल उत्तम पण उपासमार निश्चित (थोडक्यात होंडा ब्रायो), हैदराबादी बिर्याणी - कोयला एफसी रोडच्या शेवटी चायनीज - सुदित्सु डहाणुकर कॉलनी, अजुन एक आहे पण वल्लीला मुहुर्त मिळत नाहीय म्हणुन राहिलंय तिथं जायचं. बार्बेक्यु - सरुटॉबाने, कबाब - कबाब फॅक्टरी रॅडिसन खराडी (बहुतेक) पाणीपुरी - वारजे जकात नाक्याजवळ, रुणवालच्या गेट समोर आणि इतर अनेक, आईस्क्रिम - नॅचरल सगळेच , ट्रॉपिकाना कॅम्प मधलं सिझलर - दि प्लेस कॅम्प, याना, ढोले पाटिल रोडवर एक, नाव आठवत नाही योको बहुदा. बंगाली - ओह कलकत्ता, अतिच्च उच्च पण क्वालिटि आणि क्वांटिटि पण तेवढीच उच्च, इतरवेळी गणेशखिंड मधली दोन हॉटेल ग्रेट. अजुन अ‍ॅडवत राहिनच, बाकी अजुन सोलापुरातले टाकायचे राहिलेत असो.

In reply to by ५० फक्त

तुमचीच वाट पाहत होतो. अपेक्षेप्रमाणेच प्रतिसाद. एकच शंका: टिपिकल नॉर्थ इंडियन स्टाईल पाणीपुरी पुण्यात तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मिळते??????असेल तर सांगा जरूर. कोलकात्यातली पाणीपुरी जगात एक नंबर आहे. त्या तुलनेत इथली म्हंजे ऐरावतापुढे तट्टाणी.

In reply to by बॅटमॅन

कँपमध्ये एम जी रोडवर अरोरा टॉवर्सच्या दिशेने उलटे चालत आले (कारण वाहनांना नो एंट्री आहे!) उजवीकडून तिसरी गल्ली. चौथे दुकान. दही सामोसा आणि चाट हे प्रकार - मस्ट ट्राय. तुला जळवण्यासाठी.. सध्या इंदूर मध्ये आहे. कालच पाणीपुरीवर ताव मारला... (टोटल ७ फ्लेवरचे पाणी होते - खट्टामीठा, तीखा, कैरी, लेमन, लसूण, हिंग, जीरा) जबरा प्रकार होता!!! उद्या, शुक्रवारी आणि शनिवारी परत परत जाणार आहेच! :-D

In reply to by ५० फक्त

५० फक्त साहेब, मला ओह कलकत्ता चा पत्ता मिळेल का? एक मित्र मागे पुण्याला आला होता काही कामा निमित्त तेव्हा तिथे गेला होता. त्याला नक्की आठवत नाही आहे पत्ता तो ऐव्हढच म्हणाला होता की जंगली महाराज रोडवर आहे.

In reply to by निश

ओह कलकत्त्ता, जेएम रोडवर नाही, ते बंडगार्डन / ढोले पाटिल रोडवर आहे , सिटि पॉइंट नावाच्या इमारतीत, जहांगीर हॉस्पिटलकडुन जो रोड येरवड्याकडे जातो तिथे.,

मनोबांनी एकदम अंतःकरणाजवळच्या विषयाला हात घातला. प्रस्तुत लेख व त्यावरील विविध प्रतिक्रियाही जोरदार. आजकालच्या बर्‍याच भाज्या संकरित वाणाच्या असल्याने पूर्वीसारखी चव मिळत नाही. वर विषयांतर झालेच आहेत तर माझेही एक निरीक्षण नोंदवतो. काही महिन्यांपूर्वी काश्मीर सहलीला गेलो होतो तर जागोजाग १००% शुद्ध शाकाहारी भोजनालयांचे प्रमाण इतके होते की आपल्याकडे कुठेही आढळणार नाही. याबद्दल चौकशी केल्यावर कळले की बरेच लोक वैष्णव देवी ची यात्रा व काश्मीर सहल एकत्र करतात अन यात्रेदरम्यान मांसाहार टाळतात (जे सर्वाहारी असतील ते). अन दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश पदार्थ आपल्याकडील पदार्थांप्रमाणे बनवले होते जसे फुलके, रस्सा भाज्या इत्यादी. पंजाबी प्रभाव जाणवला नाही. परदेशात जागोजाग विविध देशांच्या पदार्थांची फास्ट फूड साखळी उपाहारगृहे आढळतात पण त्या प्रकारचे भारतीय उपाहारगृह नसल्याने मन खट्टू होते. कल्पना करा असे काही उपाहारगृह असावे जेथे सकाळी पोहे, उपमा, इडली, पराठे, व इतर वेळी कचोरी, समोसे, उतप्पे, साबुदाणा वडे या प्रकारचे पदार्थ मिळतील. कसली धमाल होईल नं? पण कदाचित भारतीय पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच चवीचे बनवणे अशक्य असल्याने कुणी त्यासाठी फ्रंचायझी संकल्पना राबविली नसावी.

एकत्र कुटुंब असल्याने अजूनही आईच्या हातचे असे अनेक पदार्थ खायला मिळतात. बाकी लेख मस्तच. (तर्री साठी नवीन माहीती: मी एकत्र कुटुंबात राहतो.) ;)

यायचे तेव्हढे प्रतिसाद येऊन झालेले आहेत, धागा मुखपृष्ठावरून हटण्याच्या बेतात आहे. आता आणखी सांगण्यासारखं फारसं काही नाही. तरी एकदोन गोष्टी लिहाव्याशा वाटतात. यात काहींच्या दृष्टीने दुर्मीळ अशा बर्‍याचशा पालेभाज्यांचे उल्लेख आले आहेत. पुण्यात किंवा परदेशात या भाज्या दुर्मीळ असतीलही पण निदान मुंबईत तरी त्या अजिबात दुर्मीळ नाहीत. दादर, माटुंगा रोड आणि माटुंगा, गिरगाव-बनाम लेन,गावदेवी,फोर्ट मार्केट, कुलाबा-कोळीवाडा,भायखळा,परळ, चिंचपोकळी,भांडुप,मुळुंद,ठाणे,डोंबिवली,पार्ले,अंधेरी,गोरेगाव,बोरिवली इ. ठिकाणी त्या हंगामात मुबलक मिळतात.यात उल्लेख न झालेले असे भोपळ्याचे कळे,टोकाकडचे कोवळे तणावे(बोखे),चवळीच्या लांब शेंगांच्या वेलाचेही कोवळे तणावे,चंदनबटवा,करडई,मोहरीचा पाला,सुरणाचा पाला,असे बरेच काहीबाही असते. केवळ वांग्याचेच आठ-दहा प्रकार तरी असतात. कंटोळी/करटुली सुद्धा खूप असतात. फक्त या भाज्या आणून साफ करणे कुणाला जिकीरीचे वाटू शकत असेल म्हणून त्या आणल्या जात नसतील. त्यामुळे यात स्मरणरंजकताही जाणवली नाही. आणखी म्हणजे यात हळवेपणाने लिहिल्या गेलेल्या टाकळा,पोकळा, तेरं कुर्डू या भाज्या अक्षरशः कुठेही उगवतात, बहुतेककरून रस्त्याच्या कडेने किंवा उकिरड्यावर. टाकळा तर मी पुण्यात बाणेर,पाषाण,सूस रोड्,सांगवी,सोलापुर रोडवर पुणे सोडून जरासं पुढे अशा नवीन विकसित होणार्‍या भागातल्या मोकळ्या जागेत आणि रस्त्याच्या कडेने अमाप पाहिला आहे. आताशी तो जून होऊन त्याच्या पिवळ्या फुलातून शेंगा धरल्या आहेत. पानेही पिवळसर झाली आहेत. या पिवळ्या रंगामुळे तो पट्कन उठून दिसतो. रस्त्यांवरून वर्दळ असल्यामुळे/नसल्यामुळे थुंकणे व इतर पुढचे प्रकार बिनधास्त चालतात. शहराच्या इतक्या जवळ जर या भाज्या उगवत असतील तर आडरानातून कापून आणण्याचे श्रम कोण कशाला करील? आमच्या घरी टाकळा तर अजिबात आणू नये अशी सर्वांना सक्त ताकीद आहे. या धाग्याचे उरलेसुरले जे कोणी वाचक असतील, त्यांनी स्मरणरंजनाच्या भावुकतेत वाहून न जाता सध्याच्या वास्तवाचा विचार करावा इतकंच. तशाही सर्वच पालेभाज्या शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुणे,मिठाच्या किंवा पोटॅशिअम पर मँगनेट्च्या पाण्यात बुडवून ठेवणे वगैरे काळज्या लोक घेतच असतात, पण तरीही हे सांगणं उचित वाटलं.

In reply to by राही

ग्रेट. या भाज्यांचा उल्लेख नसलेला मलाही जाणवला पण 'इतकं कोण करत बसणार?' अशी (घाईगर्दीवाल्यांचं एक ठीक आहे)मानसिकता असल्यानं "अय्या! तुम्ही चंदनबटव्याची भाजी खाता?" (चंदबटव्याच्या जागी आणखी कोणतीही पालेभाजी कल्पावी). याचं उत्तर दिल्यानंतरही अविश्वासानं पाहिलं जातं. एकांनी तर चक्क "गरीबं आहात का पालेभाजी खायला?" असं विचारून बुचकळ्यात पाडलं होतं. बाकी केनीकुर्डूची भाजी वगैरे श्रावणात उगवतात एवढे माहित होते. टाकळ्याबद्दल सहमत. विचारही नको वाटतो तो!

लेख "ताजा" होता तेव्हाही वाचला होता आणी आवडला होता. आता तर लेख "मुरलाय" . परत वाचला आणी प्रचंड आवडला.

पुन्हा एकदा पोथी वाचल्यासारखा हा लेख वाचला. २०१२ला आपण काय प्रतिसाद दिले होते (किंवा मिपासदस्य झाल्यापासून) हे सगळं पहायला मिळतं. गंमत वाटते. काही बाबतीत आपण बदलत जातो. आधी गोडा मसाला, गरम मसाला घरी करतच होते पण मागील वर्षी कैरीचे लोणचे शिकून घेतलेय व आता दुसर्‍यांदा केले. विकतचे आता खाववत नाही. आधीच बाहेर खाण्याचा आनंद होता आता आणखीनच नको वाटते. मुलाला आवडते म्हणून जाणे होते. भाजणी घरी केलेलीच लागायची. तो हट्ट सोडला. आता आईला तेवढे करणे होत नाही. तिखट, हळद यांचा वहिनीकडे मोठा व्यवसाय असल्याने उत्तम दर्जाचे जिन्नस घरात अजून तरी येतायत पण त्यामुळे कंपनीचा शिक्का असलेले घ्यायला नको वाटते. त्यांच्याकडे मागायलाही नको वाटते. जवळजवळ पाचेक वर्षांनी आत्ता पहिल्यांदा तिखट रामदेव प्रकारातले आणले आहे. भारतभेटी कमी झाल्यात पण येथे काही गोष्तींची उपलब्धता आहे म्हणून बरे वाटतेय.

करते सगळं घरीच. कारण मलाच आवडतं करायला. शिवाय एकदा एक लेख वाचला होता की विकतच्या मसाल्यांमध्ये भेसळ म्हणून काय काय घालतात. मग अगदीच शिसारी आली. म्हणून जाणीवपूर्वक वेळ काढून घरीच करते. आई तर नाहीये सांगायला पण मग ओगले आजी आहेत ना :) रुचिरा झिंदाबाद. तिखट, हळद पण आणते दळून. पण वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मिरची नाही ओळखता आली. मग मागच्या वर्षी झाली होती फजिती. अगगीच तिखट नाही.तेव्हा मात्र विकत आणलं होतं. आता रामदेव बाबांचं आणून पहावं की काय असं चाललंय. हा लेख मात्र भन्नाट आहे. वाचायचा राहून गेला होता. आणि हो, पुण्यातलीच कितीतरी ठिकाणं खरंच माहीतही नाहीत मला:(

आवडला लेख, बाहेरचं कधीतरी बरं वाटतं पण घरच्या जेवणाची सर कशालाच नाही. आमच्याकडेही बर्‍याच गोष्टी, तिखट, मसाला, लोणचे, लोणी, तूप सगळं घरीच बनतं.

आवडला, तेव्हाही आवडला होताच. परत परत वाचला.. आणि स्मरणरंजनात दंग झाले. स्वाती

दोन चार वर्षं उलटली. कॅलेंडरं बदलली. माझ्या विविध समजुती, श्रद्धा बदलल्या. नवे अनुभवही आले. थोडंफार शहाणपण देउन गेले. दुनियेकडे पहायचा चष्मा अलवार बदलत चालला. पण आजही काही मूळ आवडीनिवडी जशाला तशा आहेत. अगदि खोल आतवर असाव्यात तशा. नवे पदार्थ, नवे जिन्नस ट्राय केले. आवडले. कक्षा विस्तारल्या. पण आधी जे आवडत होतं, त्यांची अजगा नव्या पदार्थांनी घेतली असं झालं नाही. पूर्वीचेही आवडतात; आणि आता नव्यांनाही सामावून घेतलय. . . दोन चार वर्षांत अधून मधून हा धागा वर आलेला दिसतो. कित्येकदा तर मी मिपावर ऑल्मोस्ट निष्क्रिय असतानाही हा धागा वरती येउन गेल्याचं दिसतय. का होत असावं असं? माझा अंदाज -- आपण सगळे वेगळे आहोत. सगळ्याच्या स्वतःच्या अशा आवडी वेगळ्या. ज्याची त्याची घरं वेगळी, वातावरणं, संस्कृती वेगळी. कुणी चाळीतला, कुणी फ्लॅटवाला, कुणी झोपडितला, कुणी गावातल्या वाड्यात राहणारा....ज्याचे त्याचे भाव विश्व वेगळे. कदाचित काही मूल्यंही वेगळी. त्याच सोबतीनं आवडीही वेगळ्या. म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती.... लाखो प्रकारची माणसं.... हे सगळं खरं. हे नेहमी बोललं जातच.पण.... आपण खूपसे वेगळे असतो, म्हणेज पूर्णच वेगळे असतो असं नाही. किंबहुना "आपण वेगळे आहोत" हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं; कारण आपल्यात कुठेतरी समानत्व आहे ह्याची ऑपॉप/ इम्प्लिसिटली एक जाणीव मनात असते. म्हणजे.... अ‍ॅट रॅण्डम जर आपण विविध पातळीवर "आपल्यासारखे" लोक शोधू लागलो, तर परफेक्ट तीच आवड सर्व बाबतींत आपल्यासारखे असणारे मुश्किल. चित्रपट, संगीत, खाणं, मौज करण्याची कल्पना, रिकाम्या वेळेचा उपयोग करण्याच्या कल्पना, आवडते काम, खेळ , सुम्दरतेच्या आपल्यक्लल्पना..... असे सगळे निकष लिहिले तर कोणत्या न कोणत्या बाबींत कुठलीही दोन व्यक्तिमत्वं काही प्रमाणात तरी वेगळी असणार. म्हणून आपण म्हणतो की "आपण सगळे वेगळे ,स्वतंत्र" . . पण हे चित्र अपूर्ण आहे. आपण काही निकषांत वेगळे असलो, तरी कित्येक निकषांत आपल्यात काही समान आवडीहीए असतीलच की. भिन्नता आप्ल्या व्यक्त होण्यात असेल. कुणाला एखाद्या संगीतानं नॉस्टॅल्जिक व्हायला होत असेल, किंवा कुनाला काही खास अशा चवीएंमुळे. पण खाल्ल्यानंतरच्या क्षणांत किम्वा संगीत कानात पोचून मेंदूत डिकोड झाल्यानंतरच्या क्षणांत "नॉस्टॅल्जिया" चा जो अनुभव येतो; तो दोघांचा थोडाबहुत सारखाच असणार. म्हणजे तेवढ्या अनुभूतींबाबत तरी आपण समान असणार. . . हा धागा बहुतेक त्या काही समान असणार्‍या जाणिवांपर्यंत पोचतोय असं वाटतं. त्यामुळे वर्षं उलटली तरी लोकं दखल घेतात. प्रतिसाद देतात. मला दह्यातलं पिठलं घरची आठवण करुन देतं, कुणाला माशाचं कालवण करुन देत असेल. पदार्थ वेगळे असले तरी त्या पदर्थां 'नंतर' होणारी त्याची आणि माझी मनाची अवस्था बरीचशी सारखीच असेल. आपण खूपसे वेगळे असतो. बरेचसे सारखेही असतो.