Skip to main content

घरचं जेवण

लेखक मन१ यांनी रविवार, 02/09/2012 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पेठकरांचा इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे आधीच हरवून बसलोय; ते घालवलय ह्याची जाणीव झाली. तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं. परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं. एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली. . गप्पा मारताना प्रथमच मला जाणवलं की "तिखट कांडायला कधी घेतेस" हे माझ्या आज्जीचं वाक्य आता दुर्मिळ होणार होतं. गरम मसाल्याचा तिखट्-तेलकट वास पुन्हा नाकात शिरणार नव्हता. माझी आई तिखट घरी बनवायची.(ते वाळक्या लाल मिरच्या आणून स्वतः दळून घेणं वगैरे.) पण अर्थातच माझी आजी आम्ही कसे मुसळानी गावाकडे हातानी कुटत असू मिरच्या(तुमच्यासारखं गिरणीतून आणत नाही) हे ऐकवायची. ते दगडफूल का तमालपत्र का काहीतरी म्हणतात ते मसाल्याचं पान घरात आणून आम्ही "काळा मसाला" घरातच बनवायचो. . हळकुंड आणून घरगुती हळदही बनवली जायची. . अजून एक कुठलं तरी काहीतरी आणून आई औषधी म्हणून ठेवायची आंबेहळ्द म्हणे. नक्की कशासाठी वापरातात ठाउक नाही. पण घरात एका छोट्या बाटलीत तो प्रकार भरुन ठेवलेला असायचा. थोडंफार मध असायचं.(हे मात्र बहुतांशी हवाबंद असलेलं खरेदी केलेलच.) . आईच्या हातच्या साध्या फोडणीलाही आणि साधे वरणालाही स्वर्गीय चव. तृप्ती मिळालीच पाहिजे खाल्ल्यावर. फोडणीही कोणती? तर नेहमी मोहरीचीच असे नाही, कधी जिर्‍याचीही असायची. क्वचित तुपाची फोडणी होइ. आई कधी मुगाची खिचडी (दाल खिचडी) करी. त्यावर नुसतं चमचाभर तूप आणि सार. व्वा. हे आनंदी जीवनाचं सार. . मागची पाचेक वर्षे दाल फ्राय खातोय. तक्रर अशी नाही. तेही अन्नपूर्णेचच दान. पण अचानक कधी घरच्या वरणाची आठवण होते. चिंचगुळाचं वरण आंबट गोड, गुळमट चवीचं वरण. कधी साधे वरणाला नुसती जिर्‍याची फोडाणी आणि हल्काशी मीठ- मिरे मिश्रण भुरभुरलेलं. टॉमॅटोचं आंबट वरण म्हणजे आमचा जीव की प्राण. . कधीकधी नुसतं "मुद्दा वरण", मुद्दा वरण म्हणजे हाटलेलं घट्ट वरण. आणी त्यावर घरी बनवलेला "काळा मसाला" मी हट्टाने घ्यायचो. तिखट लागायचं पण खायचोच. कधी कधी कच्च्या तेलासोबत मस्त लागायचं. पण हे घरी आवडायचं नाही. . लोणचं ही सुद्धा "विकत आणायची वस्तू " नव्हती. लोणचं ही "मुरवायची" कला होती. . लोणी-तूप हे विकत आणायचं असतं हे रूम वर राहू लागल्यापासून समजलं,. तोवर पिवळ्या रंगाचं "बटर" लोणी समजून खाल्लं नव्हतं. आई सायीचं दही लावायची. घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो. आम्ही सायीचं दही घुसळून लोणी काढायचो. लोणी "कढवून" तूप काढायचो. तूप कढत असतानाही, कच्चं असतानाही त्यात चमचा बुडवून खायची आमची दांडगी हौस. त्याबद्दल धपाटेही खाल्लेत. तूप बनल्यावर खाली उरते ती "बेरी" खरवडून खायची. मस्त गुळासोबत टाकलीत तर क्या केहने! माझी आवड पाहून शेजारच्या किनीकर अन वैद्य काकूही त्यांच्याकडे तूप- लोणी बनू लागलं की मला आवर्जून बोलवत. "हल्ली आमच्याकडं असं आवडिनं खाणारं कुणीच नाही" असं काहीतरी काकू म्हणायच्या. "घरी दोन दिवस कुठला जिन्नस टिकू देइल तर शपथ" असं उलट आई म्हणायची. आईचा वैताग काकूंना आनंद वाटायचा. ह्या काकूंच्या आदरातिथ्याच्या बदल्यात बाजारातून येताना त्याचं एखादं पत्र टाकणं, लगे हाथ आमच्या सामनासोबत त्यांचय खातेदारीवर त्यांचं सामान उचलणं अशी कामं करावी लागायची. घरगुती चविष्ट प्रकारांच्या मोबदल्यात ही कामं काहीच नवह्ती. . सणांना मजा असायची. पुरणाचे कणकेत उकडून तयार केलेले "दिंडे" नागपंचमीस मिळायचे. झोप येइस्तोवर हादडायचो. गौरे-गणपतीतही खाणे हे स्वर्गसुख. . चैत्र महिन्याच्या आसपास कधीतरी कैरी आणि डाळ ह्यांचं आईच्या हातून जमलेलं ओलसर मिश्रण म्हणजे यंव रे यंव. . कधी कांद्याच्या पातीचा घोलाणा होइ. कच्च्या पाती कापून त्यावर थोडीफार फोडणी आणि मीठ. बस्स. मस्त लागाय्चं. . कधी कांद्य्चाच्या पातीची "भरडा भाजी " मिळे, तर कधी ढोबळा मिरचीचा भरडा. कुठलीही भरडा भाजी खावी तर दह्यासोबतच हे माझं तेव्हापासून तत्वच ठरलं. अमराठी रुम मेट्सच्या घरातही ह्यासदृश प्रकार बनत असावा. पण त्यांना ती वस्तू explain करताना मला नाकी नौ आले होते. डाळीचे पीठ आणि इतर भाज्या ह्यांचे मुळात कॉम्बिनेशन करावेच कशाल हेच तो विचारित राहिला. मला कधीच धड त्याला सम्जावता आले नाही. . पालक, मेथी, चुका, अंबाडी ह्यातली कुठलीही भाजी किंव तशी इतर कुठलीही रानभाजी पाअनात पडली तर पूर्वी चेहरा वाकडा होइ. पण नक्की हा प्रकार कधी आवडायला लागला ते सांगता येणार नाही. परवा जाणवलेली गोष्ट म्हणजे मी चक्क चक्क अळूची भाजी आवडिने, मिटक्या मारत खात होतो! काय होतो मी, काय झालो मी. . बाहेरच्या कोशिंबीरिच्या चवीबद्दल सुरुवातीस माझी तक्रार होती. काहीतरी खटकत होतं. नंतर जाण्वलं मला ज्या कोशिंबिरीची सवय आहे, त्यात डाळ आणि दही दोन्हीही वापरलेले असतात. हाटेलात बहुतांश ठिकाणी दहि + काकडी/टोमॅटो/कांदा ह्यास कोशिंबीर म्हणतात. म्हणून मला त्रास होइ. नंतर अर्थातच त्यचीही सवय झाली. . कधी कधी मला आवडतो म्हणून भात कुकरमध्ये न करता भांड्यात शिजवला जाइ.(steam rice न करता boiled rice बने. आजही बहुसंख्य दाक्षिणाट्यांत घरी boiled riceच बनतो हे नंतर सहकार्‍याकडून समजले.) भांड्याला लागलेली खालची भाताची "खरवड" सुध्हा चविष्टच. . संक्रांतीला बाजरीच्या भाकर्‍या होत. दूध आणि गुळासोबत मस्त लागत. कधी आळूचेसुद्धा भजे बनवले जात. मला आवडत. . हल्ली हळद, तिखट्,मसाला, लोणचे,लोणी(यलो बटर),तूप सगळं खरेदीच होताना दिसतं. त्यामुळे कामातही सुटसुटितपणा येतो असा मुद्दा सहकार्‍यांशी गप्पा मारताना निघाला. . पिठलं बाहेरचं खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी दोन्ही प्रकारचं पिठलं पूर्वीपासून बने. साधं (पुण्यातल्या काही मराठी हाटेलात मिळतं; मला आवडतं) तसं आणि दुसरं म्हणजे तव्यावरचं, दह्यातलं पिठलं. ह्याचीही खरवड मस्त लागाय्ची. आख्खा तवा खरवडून फस्त केला जायचा. पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. . कढी...पिवळी कढी नि पांढरी कढी. वरती लिहिलेलं लोणी काढल्यावर उरतं ना त्या ताकाचीही कढी व्हायची. भरगच्च होइस्तोवर तीही हाणली जायची. बाहेर पडल्यावरही गुजराती-राजस्थानी थालीच्या निमित्ताने हा माझा आवडता पदार्ध मात्र मला कायम मनासारखा मिळत आला. . गह्री बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.आठवतय तेव्हापासून जेव्हा केव्हा खायला मिळालं तेव्हा साधसंच पण छान असं मिळालेलं. आता परत गेलो की भरडा भाजी, कढवलेलं तूप नि गरमागरम कढी ह्यावर तुटून पडायचं आहे. "व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते ; कधी त्याला वैविध्यपूर्ण घरचं व्हेज जेवण मिळालं नस्सावं ह्या अंदाजाने वाईटही वाटतं.

वाचने 62388
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

सरळ मनातुन आलेला ओघवता.. किंचीत नॉस्टॅल्जीक करणारा लेख आवडला रे मनोबा. आमच्याकडे अजुनही मसाले, पापड, कुरड्या, तुप घरच्या घरी बनवले जातात. पण हे करणारी ती शेवटची पिढी असावी. हल्लीच्या इंस्टंट आणि धावपळीच्या जगात आम्ही हे कितपत टिकवून ठेवू शंकाच आहे.

गणपा व प्यारे दोघांशी बाडीस. मी जेंव्हा घरी जातो तेंव्हा आई विचारते, काय स्पेशल बनवू? माझे एकच उत्तर असते: तु नेहमीचेच कर. मला सध्या तेच विशेष आहे.

हळवे करणारा लेख.

छानच लिहिले आहे घरच्या, आईच्या हातच्या जेवणाला तोडचं नाही ...

आमच्या मागच्या पिढीने हे सर्व केले आहे. घरच्या घरी सर्व पदार्थ बनविणं, वाळवणं करणं, वर्षभराची बेगमी करून ठेवणं वगैरे वगैरे सर्व आमच्या घरच्या महिलांनी केले आहे. ताकदीची/घरसफाईची कामे पुरुषांकडे असायची. जाडे मीठ आणून ते पाट्यावर वाटून बारीक करून घेणे, नारळ फोडून देणे, वाळवणावर लक्ष ठेवणे इ.इ. कामे मीही केल्याची मला आठवतात. पापडाच्या लाट्या कच्च्या तेलात बुडवून खाणे. उडदाच्या पापडाच्या लाट्या मला खुप आवडायच्या (पचायच्या नाहीत, ते वेगळे), तादूळाच्या पापडाचे उकडलेले पीठ, कुरडयांचे सत्व इ.इ. तेलात बुडवून खायचो. कैरीचे लोणचे, लिंबांचे लोणचे, मिरच्यांचे लोणचे, मुरंबा, छुंदा हे उन्हाळ्यातील पदार्थ. तर दिवाळीला सगळा साग्रसंगित फराळ घरी तयार व्हायचा. चकल्या पाडायला मीच पुढे असायचो. (बहिणही असायची पण पुरुषांत मी एकटाच), अनारसे तळताना म्हणे हसायचे नाही नाहीतर ते हमखास फुटतात. मला तर उगीचच हसू यायचे. मग आई, मला स्वयंपाकघराबाहेर पिटाळून लावायची. दूसर्‍या दिवसांच्या भाज्या निवडायला रात्री आम्ही सर्वजणं कंदिलाच्या प्रकाशात बसायचो. कधी कधी मोड आलेले वाल सोलायचे, तर कधी गवार. त्याहून जीवाला हुरहुर लागते ती दिवाळीच्या आठवणींनी. अंगणात मी किल्ला बनवायचो. त्यावर मेथी पेरून शेती व्ह्यायची. अंगणात शेणसडाही करायला लागायचा. ते ही पहाटेच्या थंडीत. गाई शोधून त्यांचे शेण गोळा करून आणायचे. पाणी घालून मिसळायचे आणि तांब्याने सडा घालायचा. सडा घालून झाला की आई नाहीतर ताई मस्त रांगोळी काढायची. आणि माझं दरवर्षीचे ठरावीक काम. पणत्यांमध्ये तेल भरून, वाती लावून त्या पेटवायच्या आणि सर्व पणत्या (जवळ जवळ ३०-३५ असायच्या.) व्हरांड्याच्या कडेकडेने लावायच्या, मागच्या दारी पायर्‍यांवर ठेवायच्या. आंघोळीला मोती साबण आणि डोक्याला लावायला टाटाचे सुवासिक कॅस्टर ऑइल. उटण्याचा वास. आंघोळ करताना बहिणीने ओवाळलेली फुलबाजी. त्याची फुलं अंगावर उडायची त्याचे ते सुखकारक चटके. आंघोळी नंतर नवेकोरे (कोरेपणाच्या वास आणि स्पर्शासहित) कपडे लेऊन कानात अत्त्तराचा फाया वगैरे. मग सर्वांचा एकत्र फराळ आणि मी फटाके उडवायला मोकळा. हल्ली तशी थंडी पडत नाही. बाहेरून आणलेल्या फराळाबद्दल प्रेम वाटत नाही. फ्लॅट संस्कृतीत अंगणच उरलं नाही तर सडा काय टाकणार आणि सारवणार काय. आठवायला बसलो तर एक स्वतंत्र धागा होईल. पण खुप दिवसांनी जुन्या स्मृती जाग्या झाल्या. बरं वाटलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी अगदी ! आठवणींना उजाळा देऊ तशा त्या घरच्या ताकच्या लोण्यासारख्या वरवर येतात . माझी आजी दिवाळीत शेणाचे 'पांडव'बनवायची. अजून कोल्हापूरच्या आसपास बनवतात. त्यात श्रीकृष्ण अन एक बळीरामही असायचा. त्यांना नैवैद्य द्यायचा शेवयांचा. साजुक तुपात खमंग भाजलेल्या अन दुधात शिजलेल्या त्या शेवयांची चव अजून मनात आहे...!

In reply to by मस्त कलंदर

व्वा, कलंदर, फोटू मस्त टाकलात. आजीच्या पांडवांची सय आली... पण तो ढेरपोट्या आडवा पडलेला बळीराजा नाही दिसत त्यात. अन ज्वारीच्या दाण्यांचे डोळे पांडवांचे.

In reply to by सस्नेह

हो ना! अन जो पेंद्या असतो त्याच्या बेंबीत झेंडुच फुल. अजुनही अवेळी कोणी आडव पसरलेल दिसल की "तु काय बेंबीत झेंडुच फुल लावायची वाट पहातोयस/पहातेस?' अस म्हणतो आम्ही. दरवेळी खुसखुस हसु येत अन मग जो कोणी अस्ताव्यस्त पसरलेला असेल तो बिचारा उठुन बसतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

गावचे अनुभव अगदी असेच! सगळ्यात जास्त आठवतात ते म्हणजे किल्ले. एका वर्षी आम्ही भावंडानी खूप काडेपेट्या गोळा केल्या होत्या . दिवाळीत किल्ला बांधून झाल्यावर उरलेली माती या काडेपेट्यात भरून, पानचुलीत टाकल्या. दुपारी चूल विझल्यानंतर भरपूर विटा मिळाल्या. मग किल्याला खरोखरची तटबंदी तयार केली. मजा आली. .. गावी दिवाळी पेक्षा जास्त मजा यायची ती मे महिन्यात. आम्ही बच्चा पार्टी सकाळी उठून छोट्या छोट्या पिशव्या घेऊन, आजोबांबरोबर गुरांकडे जात असू. त्याचबरोबर आंबे / काजू गोळा करत असू. पिशव्या भरून घरी परत आल्यावर फणस नाहीतर आंबे हा नाश्ता ठरलेला. आई-आजीची उन्हाळ्याची कामं - फणस / आंबा पोळी, आमसुलं, कोकम सरबत, तळलेले गरे - चालू असायची. नाश्त्यानंतर आम्हा पोरांची कामं ठरलेली - अंगणात पत्ते खेळणे आणि बाहेरच्या वाळवाणावर लक्ष ठेवणे. खाण्यात आणि खेळण्यात कधी महिना संपायचा ते कळायचा देखील नाही!

घरच्या अन्नाची आवड बाळगणारी पिढीसुद्धा हळूहळू नामशेष होत आहे. नुसते 'चान चान' म्हणून न थांबता घरच्या जेवणाची संस्कृति टिकवण्यासाठी उपाय सुचवावेत. उदा. संध्याकाळी बाहेरचे चमचमीत खाणे कंपल्सरी वर्ज्य. फक्त घरचेच. मग वरणभात का असेना.

In reply to by सस्नेह

संध्याकाळी बाहेरचे चमचमीत खाणे कंपल्सरी वर्ज्य. फक्त घरचेच. काय हो... आमच्या पोटावर पाय आणताय जणू.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाही हो काका ! शनिवार-रविवारची संध्याकाळ तुमच्याच ताब्यात की हो ! जिभेची चैनी...!

छान लिहिलंय... पेठकर काकांचा प्रतिसाद पण मस्त

हळवे करणारे लेखन. अशा आठवणी प्र्त्येकानेच जपलेल्या असतात. माझ्या मुलांना यापैकी फक्त घरच्या जेवणाच्या आठवणी मी देऊ शकते. १२ महिने नोकरी असल्यावर घरी हळद तिखट मसाले पापड करणे अशक्यच आहे. शिवाय पूर्वी पापड करताना शेजारच्या बायका हमखास मदतीला यायच्या. आता शेजारीण माझ्यापेक्षा जास्त वेळ बाहेर असते. महिना महिना तिच तोंड सुद्धा दिसत नाही मग मदत कसली! आणि मीही तिला परत मदत करू शकणार नाही. चालायचंच. पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला.

पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. आमची आईसुध्दा दही घालून मस्त पिठलं बनवते. आणि हो, आईच्या हातचं थालीपीठ म्हणजे तर माझा जीव की प्राण. आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का?

In reply to by चावटमेला

आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का? चविष्ट पदार्थ कधीच नामशेष होणार नाहीत. फरक इतकाच की भाजणी घरी करण्याचे दिवस मागे पडत चालले आहेत. भाजणी सरळ तयार आणि विकतची वापरली जाते. अगदी त्याचीही आवश्यकता नाही. काही काही उपहारगृहांमधून तयार थालीपीठ मिळतं. येत्या ६ महिन्यात, खमंग थालीपीठ, मस्कतमध्येही मिळायला लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

थालीपिठांवरून आठवलं, एकदा ऑफिसमधला एक पाकिस्तानी मित्र सहकुटूंब आला होता. त्याला थालीपिठ खिलवलं होतं. ही आमची पेशल डेलिकसी आहे म्हटलं. अजूनही कधी कधी त्याची आठवण काढत असतो ! बाकी लेखात म्हटल्याप्रमाणे घरात बनवण्याच्या कित्येक गोष्टी आता सर्रास बाजारातून आणतात .. आणाव्या लागतात. माझ्या आजीच्या पिढीत गहू विकत आणून घरी कांडून पिठ केलं जाई, आईच्या जमान्यात बाजारातून गहू आणून मग गिरणीतून दळण आणलं जायचं, आम्ही बाजारातून गहू न आणता पिठ आणतो, आमचे चिरंजीव बाजारातून डायरेक्ट पोळ्याच आणणार.. कालाय तस्मै नमः । शेवटी औटसोर्सिंगचा जमाना आहे. दुसरं काय!

माझ्याही लहाणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही आम्ही तिखट व मसाला घरीच करतो. घरी दळणे वगैरे करण्यापेक्षा मसाल्याचे घटक आणून, त्यांना तेलात भाजून कांडप यंत्रावर दळूण आणले की मसाला तयार. फार काही कष्ट लागत नाहीत. अडचण एकच आहे, खात्रीशीर मिरच्या मिळत नाहीत (योग्य तिखटपणा व रंग असलेल्या), हल्ली निरनिराळ्या जातींच्या मिरच्या विकण्यासाठी एकत्र केल्या जातात. तयार मसाल्यातील रंग व भेसळ आणि किंमतीतला मोठा फरक यामुळे तिखट व मसाला घरीच करण्याला आई प्राधान्य देते.

मला उगाचच "आयटी वाईफ आणि स्वयंपाक" हा धागा आठवतोय ;-)

अत्यंत "मनापासूनचा" धागा. वरील पदार्थांत मी हच्चिद्द आवलक्की ऊर्फ दडपे पोहे, मांडे, डिंक / हळीवाचे लाडू, थालीपीठ आणि तोक्कु, सप्पिन सारु ऊर्फ थिक रसम , चटणीपुडी , ठेचा ऊर्फ रंजका, तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे हे पदार्थ अ‍ॅड करू इच्छितो. बाकी साधे कैतरी करण्याची फर्माईश करण्याबद्दल दातारशेठशी बाडीस. अस्लं कै ना कै आठवतंय च्यायला जातोच घरला लौकर.

In reply to by मोदक

त्याचा मूळचा प्रतिसाद भारी आहे. पण मोदकानं षटकार मारलाय.

In reply to by मोदक

@ हळीवाचे लाडू...>>> ख्याक :D @ पण मोदकानं षटकार मारलाय. >>>> काय आहे मनोबा,मोदक हल्ली असे विषय निघाले की हळवा होतो. ;)

In reply to by बॅटमॅन

डिंक हळीवाचे लाडू.. तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे.. अस्लं कै ना कै आठवून घरला लौकर जाणार्‍याची काळजी घे.. ;-)

हम्म्म आता ती पुण्याची थंडी राहिली नाही. मुंबईची व्हिक्टोरिया ट्राम, एखाद्या संग्रहालयातच पाहायला मिळते. असे लिहून लोकाना हळवे बनविण्याचा प्यीयेलना छंद होता.त्याचा झटका मनोबाला आलेला दिसतोय ! बाकी महाराष्ट्रीयन माणसाने खरोखरच गर्वसे कहो असे म्हणावे यात " जेवण- खाण " हा मुद्दा वरच्या क्रमांकावर. मी गेले ९ वर्षे काही उद्यम न करता घरीच आहे. कंपनीत जेवण मिळत असे पण आंबट दही , वाटणाच्या उसळी व फडफडीत भात असल्या प्रकाराला तिलांजली मिळाली. आता पैसा कमी आहे. पण साधेवरण भात , तूप लिंबु हे कंटाळा न येता गेले ९ वर्षे खात आहे व मस्त मजेत आहे. सांगायचे तात्पर्य की आपण मराठी लोक जगातील सर्वोत्तम मेनू आपल्या जेवणात घेत असतो. मर्यादित प्रमाणात तेलकट तुपकट तिखट आंबट असा हा सैपाक ! .मनोबा , तू केनीच्या पानाची भजी कधी खाल्ल्येस का? ( ही पाने श्रावणात आघाड्याच्या जोडीने कुठेही उगवतात ) तशी मायाळूच्या पानाची भजीही मस्त लागतात.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा साहेब, मायाळुची भजी अप्रतिम लागतात. त्याच बरोबर शेवरांची भाजी, करटुलाचि भाजी, भारंगाची भाजी, हादग्याच्या फुलांची भजी, कुलुचि भाजी, सुरणाच्या पाल्याचि भाजी व भोपळ्याच्या फुलांची भाजी अप्रतिम लागतात माजी आई आजही ह्या भाज्या करते. आणि सगळ्यात अवी ट जेवण ते म्हंजे, वरण भात तुप लिंबु,मेतकुट, तळलेली भरलेली मिरचि किंवा मिरचिच लोणच. लिहुनच सणसणित भुक लागली परत.

In reply to by निश

रविवारीच गावाहून करटुली आणली. एकदम वेलीवरुन तोडलेली कवळी कवळी. :) रानभाज्यांची आठवण काढलीच आहे तर मग चिऊची भाजी (ऑफिसटाईमच्या झुडुपाच्या पानांसारखी छोटीछोटी पानं आणि मातकट वास) हीदेखील यात जोडतो. याला अधिक प्रचलित नाव काही आहे का? भज्यांचं नाव काढलंच आहेत तर ओव्याच्या पानांची भजी आणि गिलक्याची भजी अ‍ॅडवा..

In reply to by गवि

गविसाहेब, एकदम भन्नाट नाव घेतलित. ओव्याच्या पानाची भाजी एकदम भन्नाट. गिलक्याची भजी म्हंजे जबरदस्त मऊ मऊ हिरवे गिलके गोल गोल कापुन केलेली भजी एकदम तोंडात वीरघ़ळते. अप्रतिम . चिउचि भाजी माझि आ़जी करायची ति असताना आम्ही गावाला गेलो कि त्यावे़ळी ति आम्हाला चिऊची भाजी म्हणुनच ती लहानपणी भ्ररवायची आता आजी ही नाही व तिची ती अप्रतिम चविची भाजी ही नाही.

प्रचंड प्रतिसाद लिहीता येईल पण रडू येईल, आवंढा दाटेल वगैरे कारणांनी थांबतो. आवंढ्याने घशात दुखण्याचा त्रास होतो. उत्तम लेख. भिडला..

ह्म्म.... आता न घर राहिलं ना आई. कधी अधे मधे मावश्या-काकवा-आत्या-मामी यांना आमचा पुळका आला तर मिळेल असं घरचं खायला कधीतरी आता... :)

छ्या.. स्साला हा मराठी माणूस आय टेल यू.. फारच डाऊन विथ नॉस्टॅल्जिया ब्वॉ! ;) मनातून उतरलेलं उत्तम लिखाण. आवडलंच. :)

तुमच्या आठवणी आमच्या आठवणींशी ताडून बघितल्या. बर्‍याचशा मिळत्या-जुळत्या आहेत. पण आम्ही मागच्या पिढीतले असल्याने अजून आमची 'ही' आमच्या आईचा वारसा चालवत आहे. त्यामुळे मरेस्तोवर फारसे हळवे व्हायची वेळ येणार नाही.

"व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते >>> अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... :)

In reply to by उदय के'सागर

अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... १०० % सहमत.

In reply to by बॅटमॅन

सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं वाक्य आहे हे की व्हेजमधे व्हरायटी नसते?.. जनरल फेकवाक्य असेल तर त्यामागचा उद्देश चूक आहे. पण .. ते मूळ वाक्य योग्य काँटेक्स्टमधे टाकून खाली लिहीतो म्हणजे त्यात तथ्य येईल. आणि या संदर्भात ते सत्य आहे असं यापूर्वी कोणी म्हटलंय ते माहीत नाही पण आता मी म्हणतो: व्हेज पदार्थांमधली व्हरायटी सर्वत्र* सहजपणे चाखायला उपलब्ध होत नाही. *सर्वत्र या शब्दात नारायण पेठ / सदाशिव / विलेपार्ले (पू)/नौपाडा ठाणे/दादर वगैरे एवढाच परीघ न घेता खवय्याच्या नजरेतून भारतातल्या आणि जगातल्याही विविध भागातली हॉटेले, रिसॉर्टस, रेस्टॉरंट्स -- विशेषत: खास क्विझिन बेस्ड रेस्टॉरंट्स(गुजराती वगळता) --, आंतरराष्ट्रीय लोकेशन्स, फूड फेस्टिव्हल्स, खाऊगल्ल्या असा मोठा खाद्यतीर्थक्षेत्रांचा परीघ घेतला पाहिजे.. सर्वांनाच पानगी, पातोळे, घावन, सांदण यांचा लाभ देणारी घरं /आज्या उपलब्ध असतातच असं नाही. जनरली उपलब्ध असतात ती हॉटेल्स. आणि उपरिनिर्दिष्ट परिसरातली ठराविक हॉटेलं सोडली तर हे सर्वत्र मिळत नाही. इथेही सर्व मिळत असेल असं नाही. जे मिळेल त्यातही "संपले"च्या पाट्याच जास्त. आता जनरल वेगळाल्या व्हरायटीच्या हॉटेलांमधेही सर्व क्विझिन्समधे (चायनीज, लेबनीज, मोरक्कन, कोल्हापुरी, मालवणी, कायस्थी, मेंगलोरी, केरळी, कर्नाटकी, थाई, मलाय, बंगाली) कोणते ना कोणते शाकाहारी पदार्थ असतातच, नाही असं नाही पण एकुणात उपलब्धी मांसाहारावर जास्त भर देणारी असते. अर्थातच याचा अर्थ शाकाहारात मुळातच कमी व्हरायटी बनवण्याचा स्कोप आहे असा नसून कमर्शियली म्हणा मागणी-पुरवठा तत्वाच्या किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, शाकाहारी ऑप्शन्स मेन्यूकार्डावर तुलनेत बर्‍याच कमी संख्येने असतात. उदा. मालवणी कोंकणी हॉटेल. तिसर्‍या मसाला, कोंबडी वडे, कासव मटण सागुती,सोड्याचे कालवण आणि अन्य माश्याखेकड्यांच्या भरपूर ऑप्शन्समधे खोबरं लावलेली उसळ, सोलकडी असे शाकाहारी ऑप्शन्सही असतात पण ते निश्चित मेन अ‍ॅट्रॅक्षन /खास पेशकश वगैरेमधे नसतात. कोल्हापुरी स्पेशालिटी: तांबडा - पांढरा रस्सा, वजडी, खिमा, सुके आणि अनेक मटणाचे प्रकार हा याचा मुख्य आत्मा आहे. त्याच भागात आख्खे मसूर आणि नेहमीच्या भाज्या कोल्हापुरी मसाला लावून करतात आणि चांगल्याही असतात पण त्या मुख्य कोल्हापुरी स्पेशालिटी म्हणून विकल्या किंवा खाल्ल्या जात नाहीत. त्यांची संख्याही मांसाहारी डिशेसपेक्षा कमी असते. असंच कोणत्याही (शुद्ध शाकाहारी ठिकाण वगळता) वर्ल्ड क्विझिनविषयी म्हणता येईल. पट्टीचा खाणारा हा फक्त तांबे आरोग्यभुवनात अडकून पडत नाही. त्याला दोन्ही ऑप्शन्स चाखून पाहण्याची सोय असल्याने /मानसिक आठकाठी नसल्याने मांसाहारीमधे बरीच व्हरायटी मिळते असं उपलब्धता या दृष्टीने तो म्हणू शकतो. शुद्ध शाकाहारी ठिकाणांमधेही बाहेर खाताना काय ऑप्शन्स असतात हो? एखादं दादर पार्ल्यातलं किंवा टि़ळक रोडचं सन्माननीय घरगुती हॉटेल वाढतं डाळिंबी पुरी किंवा पालक पचडी. त्याखेरीज इतरत्र डोसा, इडली, दाल फ्राय, फारफारतर व्हेज हंडी, हैदराबादी आणि जालफ्रेझीशिवाय काय असतं जगावेगळं? या धाग्यात उल्लेखलेले पदार्थ देणारी व्यावसायिक ठिकाणं नगण्य आहेत. शाकाहारीमधले उत्तमोत्तम ऑप्शन्स पुढे आणून कोणी हॉटेल काढलं आणि ते चाललं तर आनंदच आहे. ते चालण्यास आमचा सर्वाहारी खाद्यशौकिनांचा प्रथम हातभार असेल हे नमूद करतो.

In reply to by गवि

गवि, मीदेखील सर्वाहारीच आहे. तुम्ही उल्लेखिलेली कारणे बरोबर आहेत; शंकाच नाही. पण सरसकट असे विधान करणारे लोक काही एक्स्प्लोअर करत नाहीत हे स्वतः पाहिले आहे. ठरीव ठशाची हाटेले सोडली तर हे लोक कुठे म्हणून जात नाहीत, शिवाय खाण्यापेक्षा बाह्यरूपाकडे जास्त लक्ष देतात. त्या लोकांचे असे शेरे ऐकून सटकणार नाही तर काय? भलेही त्यांच्या घरी जास्त काही बनत नसेल, पण बाहेर तरी एक्स्प्लोअर करावे की नाही? पण ते नाही. अनास्था आणि आळस यांतून जन्मलेल्या अज्ञानाचा परिपाक म्हणजे हे विधान असल्याने डोक्यात जाते. अशा लोकांत उत्तर भारतीयांचा भरणा जास्त असतो हे पाहिले आहे. बरं मेन नॉनव्हेज खाणार्‍यांत बंगाल्यांचा नंबर कदाचित भारतात तरी अव्वल असावा. पण त्यांच्यात व्हेजचे पदार्थ देखील बरेच असतात. ते लोक असे विधान जास्त करत नाहीत.

In reply to by गवि

सकारात्मक उत्तर पुणेकराच्या चष्म्यातून द्यायचा प्रयत्न करेन.(माझ्या माहितीतील पर्याय) मी जी लिस्ट देतो आहे; ती माझी आवडती ठिकाणे आहेत. मागे मित्रमंडळींत उल्लेख केला असता त्यातील काही ठिकाणे त्यांच्या मते "काहीच्या काही महाग आहेत" अशा क्याटेगरीत होती. १.उत्तम दाक्षिणात्य सात्विक(अळणी चवीसाठी) वाडेश्वर कडे जा. FC ROAD, गुडलक चौकातच आहे. पदार्थ :- सर्वच माझ्या आवडीचे आहेत. त्यातल्या त्यात इडली-मेदु वडा वगैरे आलेच(भरपूर चटणीसह). पण "सेट दोसा" अवश्य घ्या. तिखट्,मीठ, मसाला फार नसला तरी चविष्ट लागणार्‍या पदार्थापैकी हा एक जिन्नस.(थोडा जाड आहे, तुपात घोळलेला आहे थोडा.) "फ्राइड इडली" भंगार आहे. कॉर्न पॅटिसही चांगले. . २. समुद्रा. नळ स्टोपच्या सिग्नलच्या मागेच.(म्हात्रे पुलाकडे जाताना) दिसायला टिपिकल साधे पंजाबी आयटम मिलायचे एसी ठिकाण. प्रत्यक्षात त्याच्याकडे मिळणारी दाल खिचडी, दाल खिचडी कढी हे सुरेख, अप्रतिम, भन्नाट वगैरे वगैरे आहे. . ३. स्वीकार. समुद्राच्याच शंभर मीटर पुढे, पाडळे पॅलेसच्या समोर. मेसच्या थालीसारखी(रोज खायची) थाली मिळते. ती "बरी" ते "चांगली" ह्या क्याटेगरिपर्यंत असते. . ४. मराठी पिठलं भाकरी-भरीत भाकरी हवय? :- एस एन डी टी हून नळस्टॉप कडे येताना डाव्याबाजूला, मेन रोडवरच "गिरिजा"ची शाखा आहे. थालीपीठ उत्तम. भोपला घारगे(भोपळ्याचे थालीपीठ) झकास. पिठले मस्तच(अर्थातच बिनदह्याचे पिठले, सोबत स्वतंत्र दह्याचे मडके. आणि गरम भाकरी). भरीत ठिक ठाक(वांगे कमी, कांदा फार.) थाली आजवर एकदाही आवडली नाही. "बरी" सुद्धा वाटली नाही. गिरिजाच्या इतरत्रही पेठांमध्ये शाखा आहेत.(बहुतेक एस पी कॉलेजजवळ एक आहे.) . ५. चितपरिचित जे एम रोडवरील "मथुरा". गिरिजाप्रमाणेच सर्व. शिवाय कोथिंबिर वडी भन्नाट. हिरवागार मिरच्याचा ठेचा भारीच. . ६. "मथुरा" च्या शे-दोनशे मीटर दूर, झेड ब्रिजला जे एम कडून जाताना लागणारं "सोहम" मथुराप्रमाणेच सर्व काही, पण "पुरणपोळी" उपलब्ध. अगदि घरी बनवतो तितकी भारी नाही; पण एकदा खाउन पाहिलीत तरी चालेल. . ७.आशा डायनिंग हॉळ. अप्रतिम, सात्विक, अळणी, ब्राह्मणी चवीची म्हणता येइल अशी थाळी. जे एम ऱोडच्या मागे आपटे रोड आहे, तिथेच. शिवाय इतर सर्वांपेक्षा हे थोडे "पॉश" ठिकाण वाटते. घरच्यांना घेउन गेलात तर जन्मभर दुवा देतील. शिवाय स्वतःची "gud boy" अशी इमेज घरच्यांच्या समोर बनवायची असेल तर एकदाच इथे घेउन जा आणि इथलं जेवण मला फार्फार आवडतं हे सांगा, आई-बाबा इंप्रेस्स झालेच पाहिजेत. ( ज्या पोरीला पटवायचे आहे, तिच्या आई बापलाही एकदा इथे घेउन यावे, तुमच्याबद्दल चांगले मत होइल, एक opposition party गपगार होइल.) काय मिळते ? :- थाली म्हणजे घडीची पोळी, भरपूर शंगदाण्याची चटाणी, भरपूर कोशिंबीर्,वांगे-गवार्-पालक- वालाच्या शेंगा अशा टाइपची भाजी. मागाहून घरी बनतं त्या धाटणीचं साधं वरण भात नि वरून तूप. १९४८ पासून हा त्यांचा परंपरागत व्यवसाय सुरु आहे म्हणे. . ८. आशाच्याही शंभरपट चांगले म्हणजे "बादशाही डायनिंग हॉल". हॉल कसला, मेसच म्हणा ना. पण मेस/खानावळ म्हटल्यावर जी टिपिकल प्रतिक्रिया येते, ती देउ नका. ही एक उत्तम जागा आहे. उगाच नाही इतकी गर्दी होत. उभे रहायलाही जागा मिलणार नाही,. निदान वीस्-तीस मिनिटे तरी वेटिंग होणारच. सध्या रुमाल टाकतोय. वेज मध्ये ऑप्शन नाहित म्हणणार्‍यांची कीव करणे हा लेखाचा उद्देश नाही. ओघवतं लिहिताना एक वाक्य आलं; बस्स.

In reply to by मन१

एक 'सोहम' वगळता सर्व ठिकाणांना भेट देऊन झालेली आहे. ब्राह्मणी चवीला 'अळणी' हे विशेषण पटले नाही. बाकी प्रतिसादाशी सहमत.

In reply to by मन१

वा वा.. येऊ द्या आणखी उपयुक्त माहिती. बुकमार्क करतो. (एकेकाळचा बादशाही मेंबर आणि चेंज म्हणून दोन दिवसा आड डेक्कन, जंम आणि फ र्ग्युररस्ता विं चरणारा पुणेकर) गवि

In reply to by मन१

वाईच अ‍ॅडिशन्स.... संभाजी पुतळ्याजवळच पहिल्या मजल्यावरती जनसेवा भोजनालय-मस्त. जंम रोडवरच संभाजी उद्यानाच्या लायनीत त्याच्या जरा पुढे मयूर आहे ते कसे आहे? मायला कधीच नै गेलो. बाकी पुण्यात सर्वोत्तम दाक्षिणात्य चव मिळणारी २ ठिकाणे-जंम रोडवर दक्षिणायन (क्वांटिटीवरून शिव्या घालणार्या समस्त पब्लिकने प्लीऽ ऽज क्वालिटीकडे लक्ष देऊन मग सांगावे. ) आणि युनिव्हर्सिटी रोडवर साऊथ इंडीज. साऊथ इंडीजमध्ये दर अजून जास्त आहेत. हायफाय टाईपचे हॉटेल आहे. पण क्वालिटी तिथेपण मस्त आहे. फिशसाठी टिळक रोडवरती मासेमारी बेष्ट. स्वयं लालन सारंग यांनी चालवलेले एक नंबर हॉटेल. बाकी पण आहेतच अर्थात. नॉनव्हेज कुत्र्यासारखे तुटून पडून खायचे असेल तर बार्बेक्यू नेशन एक नंबर !! ६००-७०० रुपये काय ते एकदाचे द्या आणि सुरू व्हा तेच्यायला. बाकी एसपीज बिर्यानी, शाहजीज पराठा हाऊस ही स्टार ठिकाणे आहेतच पण मी नै गेलो स्वतः सबब त्यांवर भाष्य नै करत. बादशाहीबद्दल तर कोटिशः सहमत. बेलबाग चौकात त्या पद्धतीचे एक हॉटेल आहे असे ऐकलेय-बहुतेक पुणे बोर्डिंग- मी चुकतही असेन तरी चूक दुरुस्त करावी. कोरेगाव पार्कात मरकेश नामक मिडल ईस्टर्न नॉनव्हेज आणि इन जनरल नॉनव्हेज साठी उत्तम हॉटेल आहे. केएफसी वैग्रे मला बिल्कुल नै आवडत. पण फासोस नामक जी चेन आहे तिथला चिकन ऑन बासमती हा प्रकार एकदम भन्नाट असतो. एका मोठ्या वाडग्यात चिकन विथ ग्रेव्ही आणि दुसर्‍या तशाच एका वाडग्यात भरून भात. दोन्ही एकदम गरमागरम. चव तर काय सांगू मस्तच असते एकदम. सर्दीबिर्दी झाल्याचा संशय आला किंवा झणझणीत खाण्याची लहर आली तर जरूर जावे. मला माहिती असलेल्या शाखा म्हंजे मगरपट्ट्यातली आणि कोरेगाव पार्कातली. रुबी हॉल पासून अदमासे १ किमी दूर असलेले (मेनलँड चायनाला लागूनच असलेले) "ओह! कोलकाता" देखील मस्त आहे. बंगाली डिशेस लै छान मिळतात , पण ओव्हरप्राईस्ड. फिश फ्राय, भेकटी/भेट्की माछेर करी , इ. सर्व प्रकार मस्त. कोळंबीची मलई करी पण आहे "चिंगडी माछेर मलाई करी" या नावाने, पण ग्रेव्ही गोडसर असते. बंगाल्यांना जरा तसे गोड लागतेच म्हणा. स्मोक्ड हिलसादेखील छान. हिलसा म्हटले की बंगाली मरतात एकदम. पण किंमत आणि क्वांटिटी एकदम मिसम्याच बरं का. बाकी पार्टी वैग्रेसाठी आदर्श असे एक हॉटेल म्हंजे अटलांटिस-वानवडीत आहे. क्यांपातील क्वालिटी हॉटेल(कयानी बेकरिच्या शेजारी) तेही मस्त आहे-तिथले चिकन रारा, खीमा, तंदुरी चिकन हे आयटम लै झकास आहेत.

In reply to by बॅटमॅन

पण फासोस नामक जी चेन आहे तिथला चिकन ऑन बासमती हा प्रकार एकदम भन्नाट असतो. एका मोठ्या वाडग्यात चिकन विथ ग्रेव्ही आणि दुसर्‍या तशाच एका वाडग्यात भरून भात. दोन्ही एकदम गरमागरम. चव तर काय सांगू मस्तच असते एकदम. अगदी, अगदी :) ओह कॅलकता मात्र नाही आवडले बुवा :( . कदाचित त्यादिवशीचा मेन्यु गंडला असेल.

In reply to by चावटमेला

फासोसच्या दारात पदार्थांची चित्रे असतात... तसेच मिळतात का ? कलिना विद्यापीठाच्या दारात आहे... एकदा जाइन

In reply to by बॅटमॅन

प्रथम चिकन ऑन भानामती असे वाचण्यात आले. नॉनव्हेज पदार्थांशी तसा बघून स्तुती करण्यापलीकडे संबंध नाही. उपरोल्लेखित सर्व खादाडीपैकी जनासेवाच ब्येष्ट! पुणे बोर्डिंग हाउस पेरूगेट चौकी शेजारी (बादशाही पासून अगदी १० मिनिटावर).

In reply to by गवि

@ ब्याटमन साऊथ इंडीजमध्ये हे सांगताना अत्यंत न्यूनगंड येतो आहे की अजूनही ह्या ठिकाणी मी जाउ शकलो नाही. :( . निस्ते हॉटेले नको सांगू बे. कशासाठी फेमस्/आवडते ते ही सांग की. दक्षिणायन पोंगल हा इथला अत्युत्तम. हा महाराष्त्रात कमी ठिकाणी सपडतो हाटेलात. विशेष प्रकारची मसाले ,लालमिरची,तेल न वापरता केलेली खिचडीही चविष्ट कशी लागू शकते(निव्वळ काळे मिर्‍याच्या जोरावर) हे पाहायचं तर पोंगल खावे. मला इथला आवडला. पण दोन्-तीन चमचे खाण्यासाठी शंभरच्या वर रुपये मोजावे लागतील. . जनसेवा भोजनालय थाली वॉव. यमयम. आशा डायनिंग हॉल आणि जनसेवा दोन्ही एकाच जातकुळीतले वाटतात. वरती आठ जागा दिल्या होत्या, यादी पुढे नेत आहे. पुणे बोर्डिंग ९.पुणे बोर्डिंगला शंभर वेळेस गेलोय; एकदाही यादीतील इतर ठिकाणांइतके आवडले नाही. त्यापेक्षा मला आवडले ते "सात्विक थाळी" बादशाहीच्याच समोरच्या गल्लीत; सदाशिव पेठेकडे जाताना. काय खाल? :- आशा डाय्निंग हॉलसारखी थाळी. आई-बाबा ह्यांना इंप्रेस करायला चांगले ठिकाण. . . १०.शाहजीज पराठा हाऊस वल्ली, ५०फक्त्,सूड्,धन्या ह्या सर्वांची माफी मागून स्पष्टपणे सांगतो. मला शाहजीपेक्षा चैतन्य पराठा जास्त आवडतं. पण तिथं काय खाल? पंचवीस्-तीस प्रकारचे पराठे आहेत. सगळे खात बसू नका. आधी मी सांगतो ते प्राधान्यानं टेस्ट करा. पालक पराठा, मेथी पराठा, गोबी पराठा(थोडा मसालेदार्,तिखट असेल हा), हरियाली पराठा. आलुअप्राठा सहासा सगळीकडेच बरा मिलतो, त्यामुळे इथला रेकमंड(वैशिष्ट्य म्हणून) करत नाही. इथे स्टफिंग इतकं असतं पराठ्यात की एकाच पराठ्यात भलेभले ढेर होतात. फ्रेशर असताना, पुण्यात नवीन असताना माझा आहार दांडगा होता. तरीही कसाबसा दोनच पराठे खाउ शके. आमची मित्रमंडळी दोघांत एक असे खातात. अत्यंत चविष्ट, पण आत्यंतिक तेलकट प्रकार. शिवाय वरुन अमूल चे बटर देणार ढीगभर. . ११. "नंदूज् पराठा" हे अत्यंत भारी ठिकाण. पुणे स्टेशनची शिवाजीनगरकडली बाजू आहे(प्लॅटफॉर्म आहे) तिथून पुढे जाउन डावीकडे वळा. अत्यंत जबरदस्त पराठे. मुख्य म्हणजे बनवण्याची पद्धत ही चैतन्य पेक्षा फारच वेगळी आहे. अगदि पाहिल्याबरोबर दोन्ही अगदि भिन्न भिन्न आहेत हे दिसते. चैतन्य बद्दल माझी तक्रार होती की हा एका पराठ्यात वाटीभर तेल-तूप टाकतो; इतकं नाय जात बॉ. तर नंदूज् मध्ये गेल्यावर समजलं, नंदूज् वाला एका पराठ्यात बाटलीभर तेल तूप टाकतो!! पण चवीला छान. . १२. कोथरुड डेपोजवळ, वनाज कंपनीच्या समोर खान्देशी हॉटेल. काय खाल? अत्यंत टपरीछप हॉटेल. हायजिन कॉन्शस लोकांनी न गेलेलच बरं. पुन्हा वर वेजच्या शेजारी नॉन वेज ठेवणार. पण हे सर्व झेलून तिथे जाणंही माझं सार्थकी लागलं. अत्यंत सुरेख अशी बाजरीची भाकरी, खास खान्देशी भरीत(ज्यात वांगी असते, गिरिजासारखा कच्च्या तेलकट कांद्याचा भडिमार नाही). फक्त जाताना दोन चार बाटल्या थंडगार पाणी घेउन जा. ह्याहून तिखट पदार्थ मी भूतलावर आजवर खाल्लेले नाहित. . १३.खान्देशी जुनी सांगवी पेट्रोल पंप जवळ ह्याचे सात दिवसात सात वेगळे आयटम असतात्.त्यातला चटणी-भाकरी हा माझा सर्वात आवडता. पण पुन्हा तेच, अत्य्म्त गलिच्छ वाटनारे वातावरण. बॅचलर पोरेच जाउ शकतील. फ्यामिलीवाले नाहीच. . १४. ह्या सर्वांहून चवीला चांगले, खायला स्वच्छ; वाजवी किमतीत :- बापट उपहार गृह केळकर संग्रहालयाच्या खाली. सदाशिव पेठ. काय खालः- पिठलं भाकरी. वाम्ग्याची भाजी भाकरी. इथली दाल्खिचडी "समुद्र" च्याच तोडीची. ह्यात डावं- उजवं करणं कठीण आहे. उपासाच्या दिवशी इथे बाकी काहीच मिलत नाही, फक्त उपासाचे जिन्नस. त्यातही एक एक तास वेटिंग असते. उपासाचे दिवस कुठले? आषाढी कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र. काय खाल? साबुदाण्याची खिचडी? छे हो. ती कुठेही मिळेलच की! पण "भगर " हा आयटम चविष्ट असतो हे पटत नसेल तर एकदा इथे उपासाच्या दिवशी जाच. भगरीवर मस्त तूप,लिंबू आणि दाण्याच्या कुटाची आमटी. वा... झकास. नुसत्या आठवणीने दिल खुश झाला आमचा. . १५. मेस टाइप , एकदा जाउन पहायल हरकत नाही व जिथे ९९% हिंजवडीवाले गेले असतील असे ठिकाण. इन्फि फेज१ जवळ आंध्रा मेस आहे. थाली स्टाइल मिळते. पोळी-भाअजी-भात -वरण्-दही. ठिक ठाक. खूप असे ग्रेट नाही; पण बरे आहे. . १६. नळ स्टॉप; स्वामी समुद्रा सारखेच एसी रेस्टॉरंट. काय खाल? :- पंजाबी मेन्यु असतो, पनीर्-रोटी वगैरे त्याच स्टायलीत आहे. पण " पनीर बिरबली " आवर्जून खा. तो पालक पनीर चा भाउच असणारा, ग्रीन ग्रेवी वाला आयटम आहे;पण खूपच छान. . १७. नेहमीचेच यशस्वी असणारे दुर्वांकुर "शाही " प्रकरातली थाली खायची आहे? त्याही शाही थालीला राजस्थानी कीम्वा गुजराती टाच न ठेवता, मराठी टच ठेवायचा आहे? इथे अवश्य भेट द्या. थाली मध्ये कोशिंबीर, भाक्री, चपाती दोन्-तीन भाज्या हे सर्व अनलिमिटेड असेलच. शिवाय उन्हाळ्यात आमरस उत्तम. एरवीही मुगाचा शिरा वगैरे उत्तमात उत्तम इथेच्.शिवाय थालीमध्येच थालीपीठ देखील! मागाहून साधीवरण भात किंवा खिचडी ; दोन्ही वर तूप. चवीला छान. जेवल्यावर झोप येणे हा इथला साइअड इफेक्ट. अनेकदा गेलोय. पण हे दीपक मानकर ह्यांचे आहे असे नंतर ऐकण्यात आले. मग जायला कसेसेच होउ लागले. . १८. नेहमीचेच यशस्वी पुरेपूर कोल्हापूर नॉनव्हेज कोल्हापूरी थाली साठी प्रसिद्ध्.पण मल अवेज थालीही आवडते.पण दोन्ही मर्यादित आहेत, त्यामानने थोदॅस्से महागही आहे. पण एकदा तरी जावे असे,. अनेक शाखा आहेत, त्यातली एक वेज अभिषेक च्या शेजारी, मंगेशकर हॉस्पिटलच्या जवळ, म्हात्रे पूल एरियात. . अजून खूप जागा आहेत्,पण आता काही महिने झालेत पुण्याहून निघून आणि अतिकामाने मेंदु शिणलाय. काही काही गोष्टी पूर्ण आठवत नाहीएत. .

In reply to by मन१

पुण्यात गेल्यावर इथं जायचं, तिथं जायचं असं नुसतं ठरवते आणि गेल्या अनेक वर्षात कधीच जाणं होत नाही सबब हा धागा वाचनखूण म्हणून साठवत नाही. :) नुसतं ग्राहकपेठेत वस्तू खरेदीला जायचं म्हटलं तरी बराच वेळ जातो. असो. सगळे प्रतिसाद चांगले आलेत.

In reply to by रेवती

त्यापेक्षा वेळात वेळ काढून जा. कंपनी नसेल मिळत तर मला घेउन जा सोबत तै. तसेही आम्ही भटेंच. तुम्हास ब्राह्मणभोजनाचे पुण्यही लाभेल. मी "कुठली ठिकाणं चांगली" हे सांगितलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी मला काय काय आवडलं, हे नेमकं सांगायचा प्रयत्न केलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्राधान्यक्रम ठरवू शकता.(उदा:- प्राठे नको, पिठलं भाकरी वाल्या जागा हव्या. किम्वा पंजाबी आयटम नको, थाली शोधूया, अशा प्रकरचे) . . भोजनाभिलाषी भटजी

In reply to by मन१

नंदूज पराठा आणि खान्देशी हे दोन वेगळे स्पॉट्स कळाले यातून. धन्यवाद मनोबा. चैतन्य आपलादेखील आवडता पराठा आहे, पण अलीकडे ते ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे पूर्वीसारखे जात नाहीत ब्वॉ. आणि दुर्वांकुरात मुगाचा शिरा आणि कधी देतात हो ? थाळी रेट १०० असल्यापासून , म्हंजे २००६ पासून जेवतोय, कधी नै पाहिला तो तिथे. तो मान सुकांताचा. पण या दोन्ही ठिकाणांची क्वालिटी तितकी राहिली नाही असे वाटते. म्हंजे लै काय फरक नै, पण कुछ तो है मिसिंग. बाकी फर्गसन रोडवरः गुडलक कॅफे- बस नाम ही काफी है. हॉर्न ओके प्लीज-उत्तम पंजाबी जेवण. बाय द वे- नॉनव्हेज, विशेषतः चिकन-मस्त मिळते. एकूणात जरा हायफाय. बापट आणि सात्विक हे दोन्हीही छान आहेत. बापटची व्हरायटी आणि क्वालिटी खास आहे. सात्विकच्या समोर १) रस्सा जसा हवा तस्सा २) रस्सा मंडळ ही दोन हॉटेले आहेत. पहिले बकवास आहे. रस्सा मंडळ छोटे पण छान आहे. त्यांची मुख्य शाखा सिंहगड रोडवर आहे म्हणे. कुठेय काय माहिती. रस्सा मंडळ मध्ये चिकन मालवणी छान वाटले. तिथे तितर पक्ष्याचे मांसदेखील मिळते, पिंजर्‍यात ते पक्षी ठेवलेले असतात. काहीवेळेस ससेदेखील पाहिले आहेत. अर्थातच खाण्याचा धीर झाला नाही हेवेसांनल. बाकी सदाशिव पेठेतच, आबाचा ढाबा म्हणून एक आहे तेदेखील बरे आहे असे ऐकलेय. जंम रोडवरच एक लै मस्त हॉटेल होते फॅट काँग म्हणून, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी लै वेळेस जायचो. सालं बंद पडलं :( रच्याकने: पुण्याचे भाग पाडून त्या त्या भागातली प्रकारवाईज चांगली हॉटेल्स असा धागा काढला तर मस्त लेखमाला होईल की नै?

In reply to by बॅटमॅन

लिस्ट भारी बनते आहे. ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे ??? आणि दुर्वांकुरात मुगाचा शिरा आणि कधी देतात हो ? आम्हास दोन तीन वेळेस मिळालेला, बहुत करुन दुपारी वर्किंग डे मध्ये लंच ला. मी २००७- २००८ मध्ये लै वेला गेलोय. सुकांता उल्लेखनीय वाटलं नाही.(उत्तर भारतीय त्याचा नको तितका गवगवा करतात; त्यामानाने मला ते तितकं आव्डलं नाही. अर्थात, ते आणि हल्ली उघ्डलेलं डहाणूकर चौकातलं "थाटबाट" उत्तमच आहे. पण मला दुर्वांकुर थोडंसं ज्यास्त आवडायचं.(उत्तर भारतीय "येह कौनसी जगह है" असं विचारायचे, कधी यायची नाहीत दुर्वांकुरला.)) . . म्हंजे लै काय फरक नै, पण कुछ तो है मिसिंग. हे बर्‍याच जणांन्कडून ऐकलय. मी अशात गेलो नाहीये. तिथे जावेसे वाटत नाही. . बापटची व्हरायटी आणि क्वालिटी खास आहे. सात्विकच्या समोर +१.प्रश्नच नाही. . १) रस्सा जसा हवा तस्सा २) रस्सा मंडळ हे नवीनच. . बाकी सदाशिव पेठेतच, आबाचा ढाबा म्हणून एक आहे तेदेखील बरे आहे असे ऐकलेय. ते पुरेपूर कोल्हापूरचेच भावंड वाटते शैलीवरून. दोन्-तीनदा गेलो आहे. पण तितके अपील नाही झाले.(पुरेपूर्ला अनेकदा गेलोय. त्याच्या क्याटेगरीत्,त्याच्या जॉनरमध्ये ते चांगलेच आहे.) . जंम रोडवरच एक लै मस्त हॉटेल होते फॅट काँग म्हणून, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी लै वेळेस जायचो. सालं बंद पडलं तरी सांगत होतो इंजिनिअरिंग सोडू नका म्हणून. पण तुम्हाला चार वर्षातच सोडायची घाई फार. . रच्याकने: पुण्याचे भाग पाडून त्या त्या भागातली प्रकारवाईज चांगली हॉटेल्स असा धागा काढला तर मस्त लेखमाला होईल की नै? अरे यह पी एस पी ओ नही जानता.................................. मिपावर काही विषय कसे कितीही वेळेस काढले तरी हिट्ट असतात, त्यात सर्वात वर ह्या विषयाचच नाव आहे. जरा जुने धागे बघा की. गांधी-नेहरु-काँग्रेस्-संघवाले, भारत्-पाक, स्फोट्,हिंदु-मुस्लिम्,**ण आणि **णेतर ,मिपा आणि मिपाकर,विडंबने कसे पुन्हा पुन्हा येत राहतात; कधीही न थकता पब्लिक कशी त्यावर perpetual गप्पा मारते, वाद घालते; तसाच, किंवा त्याहून अधिक चर्चित विषय म्हणजे खादाडीची ठिकाणे. नेमके सगळे हा धागा पाहूनच बिळात बसलेत. नाय तर सुरु झाले सगळे एकसाथ तर चार्-पाचशे प्रतिसाद तर कुठेच नाय गेले.

In reply to by मन१

ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे ???
लिलिपुट आणि ब्रॉब्डिङ्नॅग हो. पण खरा श्रेयअव्हेर जातो तो बिग बँग मधील शेल्डन कूपरला. राज कुथ्रपल्लीने शेल्डनच्या ऑफिसात मुद्दाम खोडी काढण्याकरिता म्हणून एक भलेमोठे टेबल ठेवलेले असते त्याचा उल्लेख तो "व्हॉट इज धिस ब्रॉब्डिङ्नॅगिअन मॉन्स्ट्रॉसिटी?" असा करतो. तो शब्दप्रयोग लैच आवडला, सबब चोरल्या गेला आहे.
आम्हास दोन तीन वेळेस मिळालेला, बहुत करुन दुपारी वर्किंग डे मध्ये लंच ला.
असेल. मी लंच कधी नाही केले तिथे, सबब माहिती नाही.
सुकांता उल्लेखनीय वाटलं नाही.(उत्तर भारतीय त्याचा नको तितका गवगवा करतात; त्यामानाने मला ते तितकं आव्डलं नाही. अर्थात, ते आणि हल्ली उघ्डलेलं डहाणूकर चौकातलं "थाटबाट" उत्तमच आहे. पण मला दुर्वांकुर थोडंसं ज्यास्त आवडायचं.(उत्तर भारतीय "येह कौनसी जगह है" असं विचारायचे, कधी यायची नाहीत दुर्वांकुरला.)) .
थाटबाट नवीनच कळाले. मी ज्या उत्तर भारतीयांबरोबर राहिलो, त्यांना दुर्वांकुर मात्र मस्त आवडले होते. सुकांताला अजून नेले नाहीये. बघू मग तौलनिक रिअ‍ॅक्शन.
अरे यह पी एस पी ओ नही जानता..................................
नै ना भौ म्हूनच तर म्हंतोय :) पाहतो आता जुने धागे, पण विभागवार केल्यास उत्तम होईल असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

नागपूर हे एक चविष्ठ सामिष हाटेल होते भर सदशिवात ! भिंतीकडे (तोंड लपवून) मस्त हाणता येत असे ! कुणाच्याच यादीत त्याचा संदर्भ नाही . बंद झाले की काय ?

In reply to by बॅटमॅन

सुगरण जवळ आहे ते. आणि ब्याम्या.. तू ससा खाल्ला नाहीस..? एकदा खावून बघ! लुसलुशीत आणि आतून गोडवा असलेले एकदा ट्राय करूनच बघ.. फक्त जेवताना / नंतर ससा डोळ्यासमोर आणायचा नाही, घास घशात अडकतो रे त्या गोंडस प्राण्याला आठवले की. :-(

In reply to by मन१

मागल्यावर्षी आख्खी भारतवारी संपत आली आणि लक्षात आले की एकदाही बाहेर जेवायला गेलो नाहिये. रात्री जरा उशिरानेच डोक्यात प्रकाश पडल्याने लक्षुमी रस्त्यावरचं ते भगतचंद की कायसे जेवणाचे ठिकाण मिळाले. चांगले होते जेवण. मला तरी खूपच आवडले. फार वाट पहायला लावली पण. आता काय उरलंसुरलं तरी देतात की नाही अशी शंका आली. ;) तुला बरोबर घेऊन जाणे हा पर्याय मला आवडला. चालताबोलता ज्ञानकोशच तू! ;) शिवाय ते पुण्याचं विसरू नकोस रे भटा!

In reply to by मन१

चैतन्य पराठा मला देखील खूप आवडले (येथील इटालियन पराठा हा प्रकार भल्या भल्या पिझ्झ्याना धूळ चारेल!). परंतु अजून शाजी ला गेलो नाहीये तेव्हा पास!