मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कडाई गोश्त

प्रभाकर पेठकर · · पाककृती
Kadai-Gosht
साहित्यः मटण १/२ किलो डालडा तुप २ डाव कांदे ४ नग टोमॅटो ४ नग मीठ चवीनुसार आलं ४ इंच काळीमिरी ७ ते ८ शाहिजीरं १ लहान चमचा (टी स्पून) हळद १ लहान चमचा काश्मिरी मिरची पावडर ३ मोठे चमचे (टे. स्पून) गरम मसाला १ लहान चमचा फेटलेले दही १ वाटी कसूरी मेथी पावडर १ लहान चमचा कोथिंबीर मुठभर. तयारी: कांदे लांब आकारात चिरून घ्या. टोमॅटो लांब आकारात चिरुन घ्या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. आलं काड्यापेटीच्या काडी प्रमाणे चिरुन घ्या. वरील पैकी अर्धे कांदे (२ नग) सोनेरी रंगावर तळून त्याची थोडेपाणी घालून मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्या. कृती: एका मोठ्या कढईत मटण, लांब आकारात चिरलेले कांदे, लांब आकारात चिरलेले टोमॅटो, थोडं सजावटीसाठी ठेवून बाकीचं चिरलेलं आलं, आणि १ वाटी पाणी घालून मध्यम आंचेवर, कढईवर झाकण ठेवून शिजावयास ठेवा. मधे मधे हलवून पाण्याचे प्रमाण तपासत राहा. साधारणपणे अर्धातास ते चाळीस मिनिटांत मटण मऊ शिजेल. आता त्यात मीठ घाला. एखाद्या चिमट्याने (पापडाचा) किंवा काट्याने मटणाचे तुकडे एखाद्या पातेल्यात काढून बाकी कांदा-टोमॅटोचा चोथा गाळून ते गाळलेले पाणी घ्या. चोथा चांगला दाबून सर्व पाणी/रस काढून घ्या. चोथा फेकून द्या. कढई धूवून पुन्हा गॅसवर ठेवा. त्यात २ डाव तुप घालून तुप तापले की त्यात काळीमिरी आणि शाहिजीरे घाला. ते तडतडले की, गॅस बारीक करून, त्यात काश्मिरी तिखट, हळद घालून परता. आता तळलेल्या कांद्याची पेस्ट, फेटलेले दही घालून परता. मसाल्याला तुप सुटायला लागले की मटण आणि मटणाचे पाणी त्यात घाला. आता गॅस मोठा करुन परतत राहा. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर बाजूला ठेवून बाकी सर्व मटणात घाला. पाणी आटून रस्सा दाट झाला, तुपाचा तवंग वर आला की गरममसाला आणि कसूरी मेथी पावडर घालून मिसळा आणि गॅस बंद करा. एका बाऊलमध्ये मटन काढून त्यावर कोथिंबीर आणि आल्याच्या काड्या घालून सजवा. कडाई गोश्त तयार आहे. पोळी, परोठा, तंदूर रोटी, नान किंवा वाफाळणार्‍या भाता बरोबर आस्वाद घ्या. शुभेच्छा....!

वाचने 9692 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sun, 08/26/2012 - 10:38
शाकाहारींनी सालासकट बटाटे, पनीर, नीर फणस किंवा सुरण वापरावा. आणि कांदा+ टोमॅटो+आलं+मीठ वाटीभर पाण्यात शिजवून आणि 'कांदा-टोमॅटोचा चोथा गाळून ते गाळलेले पाणी घ्या. चोथा चांगला दाबून सर्व पाणी/रस काढून घ्या. चोथा फेकून द्या.' इथून पुढची पाककृती वापरावी. अंडी खात असाल तर उकडलेली अंडी वापरून ह्या प्रमाणेच बनवावित.

नगरीनिरंजन Sun, 08/26/2012 - 07:24
समयोचित आणि सणसणीत पाककृती. हीच करून आजचा रविवार सद्कारणी लावावा म्हणतोय!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Sun, 08/26/2012 - 10:26
पण डालड्याऐवजी तूप वापरलं तर? चवीला चांगलंच लागेल. पण तुपाची मात्रा कमी (अर्धी?)करावी. दोन कारणे आहेत, एवढे साजूक तुप पचायला कठीण वाटते आणि तुपाची चव मटणाच्या चवीवर आक्रमण करेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिंतामणी Sun, 08/26/2012 - 11:08
पण "साजूक तुप पचायला कठीण वाटते आणि तुपाची चव मटणाच्या चवीवर आक्रमण करेल" या गोष्टिंशी असहमत. डालडापे़क्षा साजूक तूप कधीही उत्तम. मी स्वत: साजूक तूपात बनवलेले मटन खाल्ले आहे. सुरेख चव लागते. आणि ती वेगळी लागते हे नक्की. त्यात जहालपणा कमी होता. डालडामुळे पदार्थाला एक वेगळा फ्लेवर येतो इतकेच. पण माझ्या माहितीप्रमाणे ते पचायला जास्त कठीण वाटते.

In reply to by चिंतामणी

कडाई गोश्त भन्नाट दिसत आहे :) मस्तचं पेठकर काका :) मला पण साजूक तूपाचा वापर डालड्यापेक्षा जास्त रास्त वाटतो :)

अभ्या.. Sun, 08/26/2012 - 12:59
वाचूनच आवडला. बघून आवडला. करून बघणार आज रात्री. एकाच वेळी दोन्ही (शाका+मांसा)व्हर्जन करणार आहे. धन्यवाद पेठकर काका.

jaypal Sun, 08/26/2012 - 13:09
कसुरी मेथी कधी टाकावी? फोटो + पा. क्रु. एकदम झकास, दिलखुष रेसीपी. नो वाटण नो झंझट एकदम फटाफट

In reply to by jaypal

प्रभाकर पेठकर Sun, 08/26/2012 - 13:35
कसुरी मेथी कधी टाकावी? हम्म्म! तेवढे लिहायचं राहून गेलं होतं. क्षमस्व. आता बदल केला आहे. एक नियम असा आहे की गरम मसाला पावडर आणि कसूरी मेथी पावडर , पदार्थ तयार झाला की उतरवायच्या २ मिनिटे आधी पदार्थात मिसळायचं. दोन्ही मसाल्यांना उच्च उष्णता जास्त वेळ मिळाली की त्यांची चव कमी होते.

इरसाल Sun, 08/26/2012 - 20:00
कलिजा खलास झाला. जबरदस्त...जबदस्त.....जबरदस्त. फक्त पर्सनली मला ते सजावटीसाठीचे टाकलेले आल्याचे काप मला नाय आवडत.

कपिलमुनी Mon, 08/27/2012 - 10:03
तोंपासु .. फोटो अप्रतिम !! एक शंका : अर्धातास ते चाळीस मिनिटांत मटण मऊ शिजेल ??

प्रभाकर पेठकर Wed, 08/29/2012 - 01:22
रेवती, नगरीनिरंजन, सहज, विश्वनाथ मेहेंदळे, पैसा, चिंतामणी, यशोधरा, सानिकास्वप्निल, अप्पा जोगळेकर, नंदन, विनायक प्रभू, जाई., अभिजीत मी नाही, jaypal, पियुशा, वेताळ, इरसाल, कपिलमुनी, गणपा, बॅटमॅन,संदीप चित्रे तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.