एक टुमदार गाव - माझे माधवनगर
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी)
माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे.
पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार.
बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व. वसंतराव दादा पाटीलांच्या प्रेरणेने दिमाखात चाललेला साखऱ कारखाना. गावात विजेवर चालणाऱ्या मागावर धोतरांची निर्मिती करणारे गल्लोगल्ली अनेक छोटेछोटे कारखाने. रेल्वे मार्गाला लागून शेंगदाणातेलाची गिरणी. तर दुसऱ्या बाजूला वीजनिर्मितीचा कारखाना. भोंग्यांच्या शिस्तीत व मागांच्या खडखडाटात रमलेले गाव उद्योजकांचे आवडते होते तर जकात मर्यादेपलिकडील म्हणून मंगलोरी कौले व बांधकामाचे साहित्याच्या, साखर व धान्यांच्या गोडऊनचे माहेर घर.
गावाला आखीव सात पेठा. सांगलीकडून येताना रविवार पेठ पहिली लागे. नंतर वारांच्या संगतीप्रमाणे शनिवार पेठ रेर्ल्वे मार्गामुळे अर्ध्यावर तुटक झालेली. पेठांच्या मधोमध सांगलीहून तासगाव, विटयाकडे जाणारा एकमेव डांबरी रस्ता. प्रत्येक पेठेला दोन्ही बाजूंना दोन चौक. दोन पेठांच्या मध्यात एक बोळवजा सडक, मुख्यतः मैलावहन करणाऱ्या रेड्याच्या गाडीला वा अन्य वाममार्गीयांना लपतछपत जाण्याला सोईची वाट. मागल्यावाटेला शेंडाच्या झाडांचे कुंपण. तर पुढल्या कुंपणांना कोयनेलच्या रेखीव झुडुपांची तटबंदी. प्रत्येक घराला पुढेमागे अंगण त्यात छोटीशी बाग, श्रीमंतीची झलक दाखवणारी. म्हणतात, बुधगावकर संस्थानिकांनी १९२०-३० सालच्या सुमारास आखणीकरून तयार केलेली ही कॉलनी त्या काळातील आदर्श होती. शिवाय कापडपेठवाले आठवले-शहाडे व अन्य श्रीमंत मुंबईकरांच्या आकर्षक बंगल्यांनी सजलेली होती.
माधवनगरला पाण्याची (गैर)सोय फार मजेची होती. प्रत्येक घराच्या समोर एक खड्डा करुन त्यात ग्रामपंचायतीचे पाणी तास-दोन तास येत असे. ते घरात भरून ठेवणे काम असे. शिवाय उरलेले पाणी झाडांना तर कधी वाहनांना धुवायला लागे. दर आठवड्याला तो पाण्याचा हौद साफ करणे एक काम असे.
नातू शेठजींच्या कॉटन मिलमधे ब्राह्मण कामकऱ्यांचा जास्त भरणा होता. साखरकारखान्यात लालबावट्याचा दबाव होता. अनेक मारवाडी कापडव्यापारात व मागांच्या कारखानदारीत जम बसवून होते. चारमागांची किफायती युनिटे चालवून अनेक मंडळी निवृत्तीचे शांत जीवन आक्रमित होती. गावाला सुखवस्तू राहणीची छबी होती.
महिला मंडळे, भजनाचे क्लास, भिशीच्या चावड्या, हळदीकुंकु, नवरात्रीची धामधूम आदि धार्मिक समारंभ गावातील महिला वर्गाला खुष ठेवीत असे. घरच्यांच्या प्रोत्साहनाने गोडबोले, भिडे व ओक महिला कीर्तनकार म्हणून नाव मिळवून होत्या. गणेशचतुर्थीच्या काळात कॉटनमिल व साखरकारखान्यातील नाटके व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. शिवाय दसऱ्याच्या काळातील रात्री रामलीलात रंगून जायच्या. सांगलीला नाटकांना जाणे मोठा समारंभ असे. भारी साड्या, उठावदार दागिने व गजरे, वेण्यांचा सुगंधी दरवळवाल्या दर्दी सांगलीकर रसिकांचा आनंद, नाटकाची खुमारी द्विगुणित करत असे. शिव शाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांची भाषणमाला असो वा पुना ओकांच्या ताजमहलावरील व्याख्याने, माधवनगरकर धाऊन धाऊन आस्वाद घेत असत.
माधवनगरला कल्पक उद्योजक, मेहनती कामगार व भांडवल बाळगून असलेल्यांची जोवर कमतरता नव्हती तोवर त्याची भरभराट होत गेली. त्यात भिडे परिवारातील फॅक्टरीज, पापशेठजींची जिनिंग व वीव्हींग मिल, शहांची शेंगदाणातेलाची मिल, मधुकरभाईं प्रतापांची जिनिंग मिल, हळिंगळ्यांच्या, रानड्यांच्या, सांगल्यांच्या, नातूंच्या मोठ्या लूम्स होत्या. गोखल्यांची हॅचरी होती, बाळासाहेब कुलकर्ण्यांची मॉडर्न मिल, देवकरण मालूशेठ, जाखोटियाशेठ, बेदमुथा, मर्दां सारखे भांडवलदार होते, कॉटन मिलचे केळकर व गोरे, मुकुंदराव परांजपेंसारखे परिपक्व व्यवस्थापक होते. ग. म. पांडे, चंदरराव जॉबर कामगार पुढारी, साखरकारखान्यात वसंतरावदादांचे लोकप्रिय नेतृत्व होते. त्यांच्या एका शब्दावर जीव टाकणारे कामगार होते.
रेल्वे स्टेशन माधवनगरची शान होती. फाटका जवळच्या आनंद भुवन मधील शिरापुरी तर समोरच्या हाटेलातील चटकदार मिसळ, शेजारच्या शहांच्या दुकानातील गोलगोल हॅन्डल फिरवून बनलेल्या व कुईई करुन फुटणाऱ्या बाटलीतील फसफसणारा सोडावॉटर. रेल्वे स्टेशनवर भिडे समूहाच्या फाटकासमोर जनता हाटेलातील सुरळी केलेली चार आणेवाली कडक अंबोळी. बुधवार पेठेतील मनोहरांची खाणावळ. पठाणचे इस्त्रीचे दुकान इतर बऱ्याच कामाकरिता गर्दी करुन असे. पुर्वीच्या बंद पडलेल्या लक्ष्मी थिएटरचे नाव बदलून अनंत झाले. माधवनगरकरांना मनोरंजनासाठी सांगलीला जायला लागेनासे झाले.
साखरगाळपाच्या काळात उसाच्या बैलगाड्यातून ओढून ऊस चोरायची मजा न्यारीच होती. एरव्ही सायकल आरामात चालवत सांगलीला जाऊन येताना फार दमल्यासारखे वाटायचे नाही. सिटीबसमधे घाईच्यावेळा सोडता आरामात बसायला मिळे. सायंकाळी रेल्वेफलाटावरून पुढे जात सिग्नल केबीनपर्यंत फिरण्याचा छंद तरुणतरुणींचा होता. संध्याकाळची एक्सप्रेस जाईपर्यंत गप्पाटप्पांना ऊत येई. पुढे जाऊन वडाच्या झाडांच्या पारंब्यांना लोबकळताना मजा येई, तर कधी तेथे मॅट टाकून कुमार हळींगळे व हरीष प्रतापच्या टीमच्या क्रिकेटच्या मॅचेस रंगत असे. त्यातील बाळ्या कुलकर्णी, अंक्या कणेगावकर, पाप्या कुलकर्णी, अव्या रानडे नंबरी गडी होते. पाटणकरांचा जयंता संघाच्या मैदानावर ‘दक्ष-आरम’ करताना दिसे तर ओकांच्याकडे रिंगचा खेळ रंगे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्यांच्या डावाचे फड लागत. कधी ३०४, नॉटेटठोम (नॉट एट होम), चॅलेंज तर कधी रमी, बदामसात, तीन पत्तीमधे रंग भरे. गुरुवारपेठेत कॉटन मिलच्या चाळीपासून केळकरांच्या घरापर्यंत गल्लीटाईप आबादाबी, गलोऱ्या, विटीदांडू, क्रिकेट, फुटबॉल खेळात प्रत्येक पेठ रमत असे.
माधवनगरला आणखी एक परंपरा होती. सुखवस्तू राहाणी, व आस्थेवाईक भेटीमुळे प्रेम प्रकरणांना भरपूर वाव होता. पुढे चालू...
।। कालाय तस्मै नमः।।
वर्गीकरण
छान
In reply to छान by बिपिन कार्यकर्ते
असेच
In reply to असेच by प्रदीप
+१
बरोबर.
एक विनंती....
सगळंच वर्णन छान आहे.
In reply to सगळंच वर्णन छान आहे. by कवितानागेश
+१
महाराष्ट अन टुमदार स्वच्छ गावे
In reply to महाराष्ट अन टुमदार स्वच्छ गावे by चौकटराजा
असहमत...
In reply to असहमत... by मोदक
वानगी दाखल नावे दिलेली आहेतच
In reply to वानगी दाखल नावे दिलेली आहेतच by चौकटराजा
बरीच आहेत..
In reply to बरीच आहेत.. by मोदक
संपूर्ण महाराष्ट्रावर शिक्का
In reply to वानगी दाखल नावे दिलेली आहेतच by चौकटराजा
आवं आत्ता पैठण लय सुधारलंय.
गावात विजेवर चालणाऱ्या मागावर
In reply to गावात विजेवर चालणाऱ्या मागावर by आनंदी गोपाळ
शिवाय..
In reply to शिवाय.. by गवि
एकदम बरोबर. अन पावरलूमाच्या
-
गावाचं वर्णन आवडलं. माझा या
माधवनगर मधील बालपणाची तीन वर्षे
विठ्ठल मंदिरातील प्रवचने