Skip to main content

द मरुन रोब

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 01/08/2012 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची तब्येत मधे फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय. प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'आहो, काय झालं? ' तर आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत!'. मला जाम टोटल लागेना, मी प्रश्न रिपीट केला 'काय झालं? ' तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय' 'कसली? ' 'तुम्ही सगळं सोडून जाल' 'कशाबद्दल? ' 'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला? ' अत्यंत भेदक संवाद आणि त्याला भावनेची डूब हे त्यांच्या संभाषण कौशल्याचं मर्म आहे. 'आहो पण इथे मी सी ए केलंय, काय कष्ट उपसलेत ते माझं मला माहिती, आता कुठे बरे दिवस दिसतायत, इतकं सुरेख घर घेतलंय, मी कशाला सोडून जाईन? ' बायकोकडे आपला गडी म्हणून बघतोय तर ती त्यांच्यात कधी सामील झाली ते कळलंच नाही, म्हणाली 'हो यांचा काही भरोसा नाही'. मी परत चाट, आताच पार्टीहून आलोत ते विसरली काय ही? सामना आता "तीन विरुद्ध एक आणि दोन तटस्थ" असा झाला. 'आहो पण बुद्ध शेवटी परत आलाच ना? ' मी त्यातल्या त्यात माझी आध्यात्मिक माहिती कामाला आणली. 'काय परत आला? आल्यावर स्वतःचा मुलगा म्हणाला 'माझ्यासाठी काय आणलं? ' तर त्याच्या हातात भिक्षापात्र दिलं! ' सासूमां सुसाट झाल्या होत्या. मला क्षणभर त्यांच्याकडून संसारदिक्षा घेतली असती तर एव्हाना कुठल्या कुठे पोहोचलो असतो असं वाटायला लागलं. एवढ्यात आमचा मुलगा बाहेरून आला. वातावरणाचं गांभीर्य बघून त्याला मिश्किल हसू येत होतं, म्हणाला 'काय झालं? ' मी प्रसंग सावरण्यासाठी त्याला म्हटलं 'जगातला एकमेव प्रश्न काय आहे? ' प्रसंगाची काहीही कल्पना नसताना देखील तो तितक्याच तप्तरतेनं आणि गंभीरपणे म्हणाला 'आता माझं कसं होणार? ' आम्हाला इतकं कमालीचं हसू आलं की माझे तटस्थ आई वडील देखील त्यात सामील झाले आणि "चार विरुद्ध तीन" असा आम्ही तो सामना जिंकला! _________________________ तीन चार दिवसांनी बायको म्हणाली 'आपण प्रभातकडे केव्हा जायचं?' ( प्रभात वकील आहे), मी म्हणालो 'चल लगेच, पण आता त्याच काय आहे?' तुम्ही कधी बुद्धिबळ खेळला असाल तर निष्णात खेळाडू साधारण सहा चालींची एक स्ट्रॅटजी आखतो आणि त्याचं कौशल्य असं असतं की प्रतिस्पर्ध्याला अजिबात पत्ता न लागू देता त्या सहा चाली तो अशा काही उलट सुलट खेळतो की स्ट्रॅटजी पूर्ण झाल्यावरच प्रतिस्पर्ध्याला काय प्रसंग ओढवलाय ते कळतं. स्त्रियांना ही कला जन्मजातच असते म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा बुद्धिबळाचा सामना जगाच्या इतिहासात बहुदा कधी झाला नाही. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला देखील स्त्रियांची स्ट्रॅटजी लक्षात येणार नाही! (त्यातून या वर्तमानात राहण्याच्या आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे मला भूतकाळ जाम विसरायला होतो). 'मला डायव्होर्स पाहिजे! 'ती म्हणाली 'कुणाकडून? ' मी बावळटासारखा म्हणालो 'उगाच सगळं माहीत असून नसल्यासारखं करू नका, तुमच्याकडून!' तिच्या आवाजातला ठामपणा मला जाणवला. 'अग पण उगाच कशाला डिवोर्स घ्यायचा आपला चांगलं चाललंय की, छान मुलगा आहे, घरात सगळं आबादी आबाद आहे' मी प्रसंग सावरायला लागलो. 'नाही आपण प्रभातकडे जाऊया' ती हट्ट सोडायला तयार नाही. मग मी ट्रॅफिक जॅम मधून गाडी काढायचा प्रयत्न केला, 'त्यापेक्षा आपण छायाकडे जाऊ या' छाया तिची स्त्रीमुक्तिवादी मैत्रीण आणि माझी कॉलेजची कोप्रोफेसर आहे, सॉलिड कौन्सेलिंग वगैरे करते. तिचा नवरा तिला "बाहेर दोरीवर घातलेले कपडे वाळले असतील का? मी आता ते घड्याकरून ठेवू का?" असे प्रश्न विचारून तिनं "हो" म्हटल्या शिवाय काही करत नाही. छाया किती जरी स्त्रीमुक्तिवादी असली तरी माझा बिंधास्तपणा तिला आवडायचा, तिला आपल्या पार्टीत आणू शकीन असं मला वाटत होतं पण आपली स्ट्रॅटजी चालेल तर ना! 'नको, तुम्ही डायव्होर्सचे कागद घेऊन या, मी पुढचं बघते'. तिनं पुन्हा ट्रॅफिक जॅम केला! आता काय बोलणार? मी म्हणालो 'चल फिरायला जाऊ' 'नको तुम्ही क्लायंटकडे जा, माझा मूड नाही' तिनं चेकमेट करून टाकला. ____________________________ मग मला बाहेर जाववेना मी परत घरात आलो, ड्रॉवर उघडला सगळ्या एफ डीज् आणि पासबुक्स बाहेर काढली एक लिस्ट केली आणि तिच्या हातात ठेवली "हे एवढे पैसे आहेत माझ्याकडे ते सगळे तुला घे आणि तुझा मुलात जीव आहे तो पण तू घे" मी इतका भावनाविवश आयुष्यात कधी झालो नव्हतो पण तिच्यासमोर प्रामाणिकपणे सगळा मार्ग मोकळा करून दिला. लिस्टकडे बघून ती विचार करायला लागली. "माझ्याकडे मरेपर्यंत उपयोगी पडेल असं क्वालिफिकेशन आहे पैसे मी कसेही मिळवीन आणि तुला मुलगा हवा आहे मला मंजूर आहे उगाच कशाला कोर्टात जायचं?" ती कसल्याशा विचारात पडली, मी म्हणालो चल फिरून येऊ. बाहेर पडल्यावर मी म्हणालो "तुला हवं तेव्हा तू नीघ पण मला नीट विचार करून सांग कुठे जाणार तू? तुला आता मिळणारी रक्कम मोठी वाटत असली तरी बरेचसे पैसे फ्लॅटमध्ये जातील, मुलगा मनातून दुभंगेल, काय साधशील यातून?" ती एक शब्द बोलली नाही. " एक मार्ग आहे " मी म्हणालो "काय? " "लग्न जशी एक कल्पना आहे तशी डिवोर्स पण एक कल्पना आहे. तू कमालीचा फिटनेस ठेव आणि माझ्यापेक्षा एखादा उमदा नवरा शोध मी तुझं लग्न करून देईन, दरम्यानच्या काळात माझी मैत्रीण म्हणून रहा." "चालेल" ती म्हणाली . तिच्या मनाचा मला जाम पत्ता लागेना पण ही रिलेशनशिप मला मजेशीर वाटायला लागली. "आता मला आईकडे सोडा" तिला माहेरी सोडून मी क्लायंटकडे गेलो. ____________________________ जिथे जातो तिथे रमतो त्यामुळे मी कामात गर्क झालो, वर्षातनं एकदाच प्रत्यक्ष भेटत असल्यानं क्लायंटही वाट बघत असतात. क्लायंट बरोबर जेवण, गप्पा आणि काम यात संध्याकाळ केव्हा झाली कळलं नाही. काम संपवलं तेव्हा लक्षात आलं की बायकोला सकाळी माहेरी सोडलंय, तिला फोन केला. मुलगा मित्रांबरोबर पिक्चरला गेलायं आणि रात्री मित्राकडेच राहणार आहे तीनं सांगितलं. माझे आई वडिल, मेव्हणा गावाला गेल्यामुळे बहिणीकडे रहायला गेले होते. "मग तू इकडे का येत नाहीस, आपण कँपमध्ये फिरु, मलाका स्पाइसला जेवू आणि तू येईपर्यंत मी इ-स्क्वेअरच्या लास्ट शोची तिकीटं पण काढतो". ती म्हणाली "चालेल, मी वेस्टएंडपाशी थांबते". इ-स्क्वेअरला ओळख असल्यानं तिथे फोन केला आणि आमच्यासाठी दोन लास्ट शोची तिकीटं ठेवायला सांगितली. वेस्टएंडपाशी पोहोचलो तर बघतंच राहिलो, तिनं पिंक अँड ग्रे कॉंबीनेशनचा स्टँडकॉलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर पिंक दुपट्टा घेऊन केसात मोगरा माळला होता. मी गाडीचं दार उघडायचं सोडून बघतच राहीलो. ती दार उघडून आत आली आणि आतला सगळा रंगच बदलून गेला. " पहेले वो सितम करते थे तो कयामत थी, अब मेहेरबां हुऐ तो हादसा हो गया"! तिला अर्थ समजला होता पण तरीही म्हणाली : "म्हणजे नक्की काय?" "मला तुझ्याशी पुन्हा लग्न करावसं वाटतंय" साली ही उस्तफूर्तता मला केंव्हा काय बोलायला लावेल याचा नेम नाही; वाटायला लागलं आपण इतक्या चांगल्या मूड मध्ये उगाच पार स्टेडियम बाहेर बॉल मारला, पण वातावरणाचे सूर जुळले असावेत, ती म्हणाली : "मी योगा आणि प्राणायाम करून आता कमालीचा फिटनेस आणि फिगर ठेवणार आहे" "क्या बात है"! मला तिचं कौतुक वाटलं, तिनं परत मूड तयार केला होता. ___________________________ मलाका स्पाईस जवळ एक बाग आहे आम्ही तिथे गेलो. हिरवळीवर स्प्रिंकलर्स चालू होते, मी म्हणालो "चल, मी भिजून घेतो". ट्रॅकवर आम्ही निःशब्द फिरत राहीलो कारण तिची पावलं माझ्या पावलांबरोबर पडत होती आणि हे आत कुठे तरी सूर जुळल्यामुळे होत असावं असं वाटलं. स्वाद ही चव आणि गंध यांनी मिळून होणारी जादू आहे आणि ती मलाका स्पाईसवाले अशी काही जमवतात की जेवणाची मैफल संपूच नाही असं वाटतं. त्यात कॉईन थ्रू ही लिक्यूअर देखील अशी काही भन्नाट आहे की तुम्ही एकाच वेळी कवी, शायर आणि संगीतकार होता. तुमचा रंग असा काही आकाशी होतो की तुम्हाला नवनवीन कल्पना सुचायला लागतात. त्यात अशी मैत्रीण बरोबर मग तर काही विचारायलाच नको. मला एकाच वेळी तिच्यात आणि माझ्यात एक ओढ लावेल असं अंतर आणि निर्भय समन्वय जाणवायला लागला. माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या सार्‍या सीमा ओलांडून तिच्यापर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं. ती काही बोलत नव्हती पण विचार ही करत नव्हती फक्त सगळा विरोध, सगळा विसंवाद संपल्यासारखा वाटत होता. मला वाटायला लागलं बास! या क्षणी हे आयुष्य संपावं! स्त्री ही काय जादूगीरी आहे, एका स्त्रिशी सूर जुळणं सार्‍या अस्तित्वाशी एकरुपता जमण्यासारखं आहे. ________________________________ मला पिक्चरचं प्रचंड आकर्षण आहे. तुम्हाला गुतंवून ठेवणारी विषयाची मांडणी, ती रमणीय स्थळांची, आपण पोहोचू शकणार नाही अशा अँगल मधून घेतलेली दृश्य, रंगांची सुरेख उधळण, पेहेरावांची नजाकत, बेभान करणारं संगीत, परस्परातले संबंध, संवादांची जादू, सौंदर्य, प्रणय आणि अभिनय सगळं एकावेळी हजर असतं! हे पिक्चरवाले कल्पनाच इतक्या सुरेख मांडतात की वास्तव फिकं वाटतं. जगातली सारी बुद्धीमत्ता, सौंदर्य आणि संपत्ती जर तुम्हाला एका जागी पहायची असेल तर एकेका फ्रेमची मजा घेत पिक्चर बघावा. घरी आलो तेंव्हा एक वाजला असावा; घर इतकं शांत आहे की आपण बोललो तरच आवाज त्यामुळे वेळेचा फक्त अंदाज बांधावा लागतो. त्यात घरात आज आम्ही दोघंच आणि जीवनातला 'उद्या' माझ्यासाठी कायमचा संपलेला; असा काही माहौल झाला होता की कॉफी घेत एकमेकांच्या सहवासात शांत बसून रहावं आणि झोप आली की झोपून जावं. तिनी कॉफी केली आणि आम्ही एकमेकांसमोर बसलो. "सत्य म्हणजे नक्की काय हो?" ती म्हणाली. मला तिचा धाडसी स्वभाव आणि कमालीची पारदकर्शता माहिती होती, तिनं इतका खोलवरचा पण इतका उघड प्रश्न विचारला होता की मी शब्द जुळवू शकत नव्हतो. सरळ ऊठलो आणि माझा स्टँडकॉलरचा सिल्कचा अप्रतिम मरून मेडिटेशन रोब घेऊन आलो, तो घातल्या क्षणी तुमचं अंतरंग बदलून जातं. "तू मस्तं वॉश घे आणि हा मरून रोब घालून ये". काहीही न विचारता ती उठली आणि फ्रेश होऊन तो मरून रोब परिधान करून समोर येऊन बसली. त्या रोबमध्ये ती अशी काही लावण्यवती दिसायला लागली की मी सत्य वगैरे सगळं पार विसरून गेलो आणि तिच्याकडे बघतच राहीलो. "सांगा नं सत्य म्हणजे काय? " "सखे खरं सांगू? मला ही नक्की माहिती नाहीये पण आताचा हा जो माहौल आपल्याला जाणवतोयं ना, त्याला बहुदा सत्य म्हणत असावेत". माझ्याकडे पहात अत्यंत शांतपणे ती म्हणाली "सत्य म्हणजे काय ते मला कळलंय". मी सर्दच झालो. "क्या बात है! सुनाइए" "आपण वेगळे होऊ शकत नाही!" मी इतका सद्गदीत झालो की मला शब्दच सुचेनात, "पियू हा रोब मी तुला बहाल करतो! तुला सत्य समजलयं! '. संन्यास्यानी स्वतःचा रोब पत्नीला बहाल केल्याची जगाच्या इतिहासातली ती बहुदा पहिली घटना असावी, तिनं माझे हात हातात घेतले आणि मला मिठी मारली. "मी तुम्हाला समजू शकले नव्हते" कॉईन थ्रू ची नशा अशी काही भन्नाट झाली होती की मला तीच एक रहस्य वाटायला लागली; प्रकृती आणि पुरुष एक कसे याचा मला अचानक उलगडा पण ते रहस्य आता मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21464
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

असं वाटतं तिने कधि डोळे उघडुच नये आणि तिला बघताना माझे डोळे कधि मिटुच नये.
किंचित असहमत. असं वाटतं की तिने डोळे उघडून माझ्याकडेच बघावं आणि बघत रहावं ;) तिला बघताना माझे डोळे कधीच मिटणार नाहीत हे तर सरळच आहे :)

In reply to by बॅटमॅन

आणखी एक शक्यता म्हणजे... ... तिने डोळे उघडून माझ्याकडेच बघावं आणि बघत रहावं, आणि तिला बघताना त्या अथांग सुखात माझे डोळे कायमचे मिटावेत... (कधी कधी अद्वितीय कलाकृती बघताना मला असे वाटून गेलेले आहे)

In reply to by बॅटमॅन

भारी गंमत चाललीये तुम्हा लोकांची. मला तर ती "करून करून भागले आणि अध्यात्माला लागले" अशा प्रकारातली वाटतेय. ;-)

एरिक क्लॅप्टन च्या I feel wonderful tonight गाण्यामधील सौम्यसा,धुंद आणि तरल मूड लिखाणात उतरला आहे. रेसिपी छान जमली आहे.चव चांगली आहेच. फ़क्त एक दोन खडॆ दाताखाली आले.चालायचेच.पण एकूण लेख आवडला..

कथा आवडली आणि प्रतिसाद वाचूनही भरपूर करमणूक होतेय.

कथा आवडली. आधीही एकदा मनोगतावर वाचली होती. साध्याशा प्रसंगाला अध्यात्माची छान डूब दिली आहे. सामान्य माणसाच्याही आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात. नवरा-बायको तडातडा भांडतात. एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. एकमेकांचं तोंड पुन्हा पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली जाते. चार दिवस सोय झाली नाही की वेगळे होणे शक्य नाही हे सत्य सापडते. पण ते प्रसंग अशा रंगतदार खुबीने मांडणे सगळ्यांनाच शक्य नसते.

In reply to by नगरीनिरंजन

सहजीवनात घटस्फोट ही अत्यंत नकारात्मक घटना आहे आणि त्यातनं कुणाचंही भलं होत नाही हे सांगण्याचा कथेत प्रयत्न आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सहजीवनात घटस्फोट ही अत्यंत नकारात्मक घटना आहे आणि त्यातनं कुणाचंही भलं होत नाही हे काही सत्य नाही. एकमेकांषी पटत नाही म्हणून तर घटास्फोटाची सोय कायद्याने दिलेली आहे. मारुनमुटकुन नावडत्या व्यक्तीसोबत रहाण्यापेक्षा वेगळे झालेले बरे ना. एखादा पुरुष बायकोला मारहाण करत असेल अथवा एखादी बायको नवर्‍याचा सदोदीत रागराग करत असेल तर अशा संसाराला काय अर्थ आहे. त्यापेक्षा घटस्फोट घेवुन नवे इनिंग सुरु करता येइल निदान अन्याय सहन करत बसावा लागणार नाही

उत्तम कथा पण खरोखरीच, "सत्य म्हणजे काय?" हा एक मिलीयन डॉलर क्वेच्शन आहे. ज्याला उत्तर मिळाले तो भाग्यवान. पण असा कुणी भाग्यवान पहाण्यात अथवा ऐकीवात नाही.

भगवा विरक्ती दर्शवतो तर मरुन समन्वय
मरुन समन्वय दर्शवतो म्हणजे नक्की कशातला समन्वय? प्रपंच आणि अध्यात्मा मधील समन्वय का? आणि मरुनच का समन्वय दर्शवतो दुसरा कुठला रंग का नाही? ईथे धागा भरकटवण्याचा मुळीच उद्देश नाहीये. मला पडलेले हे प्रामाणिक प्रश्ण आहेत.

>प्रपंच आणि अध्यात्मा मधील समन्वय का? = हो >आणि मरुनच का समन्वय दर्शवतो दुसरा कुठला रंग का नाही? = हे माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित ओशो कम्युनला काही वर्ष साधना केल्यामुळे (ओशोंच्या पश्चात) असेल, तो रंग भगव्या रंगासारखा एकदम विरक्त किंवा भडक वाटत नाही तरी पण इंप्रेसीव वाटतो. विषेशतः सिल्की फॅब्रिकमधे तर तो मिस्टीकल वाटतो (फोटोतल्या युवतीचा रोब पाहा). मोरपंखी ही दुसरी समन्वय दर्शक छटा असावी (कृष्णामुळे) पण तसा पेहेराव शोभेल असं वाटत नाही. श्वेतवस्त्रांचाही उपयोग साधनेत केलाय पण तो फार पवित्र वगैरे वाटतो आणि लगेच मळत असल्यानं सहज वापरण्यासारखा नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मरुन रंगाचा (फॅब इंडिया किंवा तत्सम कंपनीचा) सिल्कचा मरुन टी शर्ट कधी वापरुन पाहा, त्याचा फिल काही तरी वेगळा येतो, तुमचा मूड बदलतो, साधा हँगरला लावलेला शर्ट पण स्वतःच वातावरण तयार करतो.

'अध्यात्म मला कळतं' असा दावा करणं मूर्खपणाचं आहे, असं म्हणतात. त्यातलं खरं-खोटं खरे अध्यात्मिक जाणोत... खरे अध्यात्मिक कोण हे मात्र मला विचारू नका. तर ते असो. कथा वाचली.

माताय या धाग्यापेक्षा धाग्याखालीची गंमाडी जंमत मस्त आहे की. ज्याने कुणी हा धागा वर काढला त्याचे अनंत आभार.

मस्त कथा... आवडली. प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली. प्रतिसादातील छायाचित्र पाहून डोळे निवले.

In reply to by धन्या

प्रतिसाद वाचून माझेही पाणावलेले डोळे एका छायाचित्राने निवले. साला एक छायाचित्र डोळोंको निवा/पेटवा देता है.

अतिषय सुंदर कथा !!