Skip to main content

पाकीट

चावटमेला यांनी या दिवशी प्रकाशित केले.
"मित्रा, ते फाटकं पाकीट कधी बदलतोयेस आता? " "काय रे , काय सिल्वर ज्युबिली साजरी करायलयंस का काय त्या पाकीटाची? " "काय, गिनीज बुकात नोंद करायची आहे का काय? " "तुझा वाढदिवस कधी आहे तेवढा सांग बाबा, आम्ही सगळे एक छानसं पाकीटच गिफ्ट देतो" "वाट मॅन, कुच अँटीक वालेट है क्या वो? " "काय, लक्की पाकीट वाटतं?" "अरे त्यातल्या पैशांचं सोड, तुझं लायसन्स, पॅन कार्ड, डेबिट कार्ड वगैरे त्यातून कधी पडलं तर केवढ्यात पडेल ते. कंजूष कुठचा" माझ्या त्या कळकट्ट, जीर्ण आणि अगदी हॅवेल्स फॅन च्या जाहिरातीतील गलितगात्र झालेल्या राजेश खन्नासारख्या वाटणाऱ्या त्या प्रागैतिहासिक पाकिटाकडे पाहून एक ना अनेक जणांनी हे उद्गार अगणित वेळा काढले असतील. तसं त्यात खोटं काही नव्हतंच म्हणा ना. बाहेरून उसवत आलेले धागे, आतले अगदी चिंध्या झालेले कप्पे, त्यात मधूनच डोकावणाऱ्या नोटा,काही बिनकामाच्या पावत्या, आणि माझ्यापेक्षाही भयानक दिसणारे माझे फोटो मिरवणारी ओळख कार्डं,भस्सकन ते खिशातून बाहेर काढले की समोरच्याला एकदम अंगावर आल्यासारखे होत असे. जुन्या काळी पोस्टात खर्डॅघाशी करत करत घरात खाणाऱ्या दहा बारा तोंडांना पोसता पोसता मेटाकुटीला आलेल्या कारकूना सारखी त्याची अवस्था झाली होती. पण मी मात्र एखाद्या हठयोग्याप्रमाणे कशालाच दाद देत नव्हतो. सगळयांच्या कॉमेंटस केवळ हसण्यावारी नेत, अगदी महाराणा प्रतापांच्या चेतकाप्रमाणे, ते मरणासन्न पाकीट मी खिशाशी बाळगून होतो. तर, नुकतीच आमच्या टीम मध्ये, पुण्यातील एका नामांकीत मॉल्स ची कुपन्स वाटली होती. हो-नाही करत, शेवटी ह्या वीकांताला त्या मॉलमध्ये शिरलो. तसा अशा ठिकाणी खरेदीचा काहीच अनुभव गाठीशी नसल्याने मी भावाला बरोबर घेवून गेलो होतो. मोठा आणि चकचकीत हॉल,सगळीकडे अगदी पद्धतशीरपणे मांडलेल्या विविध ब्रँडेड वस्तू, अगदी ब्रेसलेट,शूज पासून ते शेरवानी पर्यंत सगळाच माल डोळे फिरविणाऱ्या किंमती नाचवत उभा होता. "अरे, हे पाकीट पाहा, छान दिसतंय. ", माझा भाऊ एका पाकिटांच्या स्टँडकडे बोट दाखवत म्हणाला. "हम्म, पण माझ्याकडे पाकीट आहे की ऑलरेडी" "नाही, ते काही कामाचं नाही. हे घेवून टाक, सातशे रुपयांना आहे फक्त, डिस्काउंट मिळून अजून स्वस्तात पडेल. " सातशे रुपये?? मी विचार करू लागलो की सातशे रुपये एका वेळेस कधी मी पाकिटात तरी ठेवतो का? पण नाही, ह्यावेळेस का कुणास ठाऊक, माझा विरोध पूर्णपणे गळून पडला आणि मी मुकाट्याने ते इटालिअन का कसल्या लेदरचे पाकीट विकत घेतलेच. "आता, ते जुनं पाकीट दे फेकून. " भावाने पुस्ती जोडली. मी नुसतंच हम्म करत बिल देवून टाकले. घरी आल्यावर, त्या जुनाट पाकिटातून सामान काढताना मात्र हात चांगलाच जड झाला. माझं मन आपोआप सहा वर्षे मागं गेलं. मला आठवतं, कसंबसं इंजिनिअरिंग संपवून मी नुकताच नोकरीला लागलो होतो. नोकरीचा पहिलाच महिना चालू होता, त्यामुळे साहजिकच पहिला पगार वगैरे काही झालेला नव्हता. रोज, मी आईकडून, फक्त पी एम टी च्या तिकिटाइतके पैसे घेत असे. जेवणासाठी डबा घरून नेत असल्याने त्या पैशांचा प्रश्न सुटला होता. जाताना बस ने जाई, पण येताना ३-४ किलोमीटर चालत येत असे, तेवढेच पैसे वाचायचे. आता रोज तिकिटाचे पैसे घेतल्यानंतर ते पैसे ठेवायला अजून एखादं पाकीट घेणं म्हणजे त्या काळात खरोखर आमच्यासाठी चैन होती. मी खिशात नुसतेच पैसे ठेवायला घाबरायचो, कारण चुकून खिसा फाटका निघाला तर काय? पण त्यावरही मी एक उपाय शोधून काढला. माझा एक मामा नेहमी, घरातील रिकामी दुधाची पिशवी स्वच्छ धुवून, वाळवून, त्यात पैसे ठेवत असे. मीसुद्धा तेच सुरू केलं. मी कात्रज दुधाच्या रिकाम्या पिशवीतून पैसे नेवू लागलो. एकदा माझ्या एका मित्राने मला असे पिशवीतून पैसे काढताना बघितलं. माझी परिस्थिती काही त्याच्यापासून लपलेली नव्हती. त्यानं माझी अडचण ओळखली आणि हळूच म्हणाला की, संध्याकाळी चल माझ्याबरोबर, तुला चांगलं पाकीट मिळवून देतो. मी त्याच्याकडून पैसे अजिबात घेणार नाही हे तर नक्की होतं. मी त्याला स्पष्ट सांगितलं की, बाबा रे, रोज चे बस चे पैसे वाचवून माझ्याकडे फक्त तीस रुपये साठलेले आहेत, आणि तेवढ्यात पाकीट मिळणार आहे का? तेव्हा, अरे तीस काय तुला तीन रुपयांत मिळवून देतो असं त्यानं छातीवर हात ठोकत सांगितलं. संध्याकाळी, तो मला, कर्वे रोडवर, एसएनडीटी च्या ब्रिज खालच्या फूटपाथवर घेवून गेला. तिथे एक म्हातारा बऱ्याच गोष्टी विकत बसला होता, त्यांत पाकिटं सुद्धा होती. "मामा, ते पाकीट कितीला दिलं? " मित्रानं विचारलं. "तीस रुपये. ", गुटख्याची पिंक बाजूला टाकत म्हातारा बोलला. "काय मामा, काय सांगता, पंधरा रुपये देतो बघा. " "नाय वो, तेवडी खरेदी बी नाय. " "असं नाही, बघा पंधरा रुपये देतो, नक्की सांगा" "बरं चला, पंचवीस द्या. " "नाही, पंधरा लास्ट". "हे बगा, वीस लाष्ट, मी आता निगालोय घरी म्हनून देतो, घ्यायाचं असंल तर घ्या नायतर नाय. " म्हातारं आता चांगलंच वैतागलं होतं. मित्राने मला खूण केली. मी वीस रुपये काढून दिले आणि ते पाकीट घेतलं. मित्रानंच दुधाच्या पिशवीतून पैसे काढून पाकिटात कोंबले आणि मला परत केलं. कृतज्ञता, येवढाच भाव माझ्या चेहऱ्यावर होता. "थँक यू. " इतकंच कसंबसं माझ्या तोंडून निघून गेलं. "अरे चल, मोठा आला, उद्या त्याच पाकिटातून पैसे काढून पार्टी घेणार आहे तुझ्याकडून. " आणि, तेव्हापासून ते पाकीट अगदी इमाने इतबारे मला साथ देत राहिले. कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात. खरेतर पाकीट ही एक क्षुल्लक वस्तू वाटू शकते, पण माझ्यासाठी ते पाकीट एक मोठं थँक्स होतं, त्या जुन्या दिवसांना ज्यांनी नुसतंच जगण्याचं बळंच नाही दिलं तर, हे सुद्धा शिकवलं की कशीही परिस्थिती असली तरी आनंदानं आणि समाधानानं जगण्यासाठी मन मोठं असावं लागतं, खिसा नाही. ते पाकीट एक रिमाइंडर होतं, ज्यानं यशाच्या, सुखाच्या अनेक प्रसंगांत कधी उतू मातू दिलं नाही, की अगदी अनेक अपयशांच्या, दुःखाच्या प्रसंगात खचू दिलं नाही. ते पाकीट म्हणजे एक मोठं सॉरी आहे माझ्या त्या मित्राला ज्याच्याशी मी पहिली कंपनी सोडल्यानंतर फारसा टच मध्ये राहू शकलो नाही. खरं तर त्या पाकिटात पैसे, कार्डं असं काही ठेवलंच नव्हतं कधी, ठेवल्या होत्या त्या फक्त आणि फक्त पैशांत कधीच किंमत न करत्या येण्याजोग्या आठवणी...
पैसा

बर्‍याच वस्तूंशी अशा भावना जोडलेल्या असतात. पाकिटाबद्दलची अटॅचमेंट खरं तर त्या हातातून निसटून गेलेल्या भूतकाळामुळे आहे. ते दिवस जरी बिनपैशाचे असले तरी आठवणींमुळे रम्य वाटायला लागलेले आहेत. एकूण छान लिहिलंय!
22/07/2012 - 20:33 Permalink
प्रदीप

In reply to by पैसा

असेच म्हणतो आहे.
कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात.
संपूर्ण सहमत आहे. छान लिहीले आहे. आवडले.
22/07/2012 - 20:50 Permalink
निशदे

In reply to by पैसा

खरे आहे.... माझ्या काकांचा (आत्याचे पती) आणि माझा पत्रव्यवहार बराच काळ चालू होता. सर्वच बाबतीत त्यांचा व्यासंग अफाट असल्याने त्या पत्रव्यवहाराने फार आनंद आणि ज्ञानही दिले. काहीच महिन्यांपूर्वी कॅन्सरने त्यांचे निधन झाले. आता त्या पत्रांमध्ये माझ्यासाठी त्यांच्या आठवणी आहेत. अजूनही वाचताना क्षणभर ते आमच्यात नाहीत हे विसरायला होते.
23/07/2012 - 19:44 Permalink
सचिन कुलकर्णी

लेख आवडला आहे. डोळ्यांच्या कडा ओला करून गेला परंतु अनुभवाने हे शहाणपण मिळाले आहे कि अश्या निर्जीव गोष्टींबाबत सेंटी होऊ नये.. सो कंट्रोल.. आणि प्रत्येक गोष्टीला expiry असतेच नाही का ?
23/07/2012 - 00:41 Permalink
सचिन कुलकर्णी

लेख आवडला आहे. डोळ्यांच्या कडा ओला करून गेला परंतु अनुभवाने हे शहाणपण मिळाले आहे कि अश्या निर्जीव गोष्टींबाबत सेंटी होऊ नये.. सो कंट्रोल.. आणि प्रत्येक गोष्टीला expiry असतेच नाही का ?
23/07/2012 - 00:46 Permalink
प्रभाकर पेठकर

माझही असंच एक जुनं(पुराणं) पाकिट होतं. गेल्याच महिन्यात त्यातील क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सहीत चोरीला गेलं. अजून नवीन घेतले नाहीये. आता मात्र लवकर घेणार आहे.
23/07/2012 - 01:39 Permalink
चौकटराजा

सातशे रुपये?? मी विचार करू लागलो की सातशे रुपये एका वेळेस कधी मी पाकिटात तरी ठेवतो का? चपला बूट ठेवण्याचे कपाट ९००० रूपयाला . त्याला विचारले " सगळ्या पादत्राणांची मिळून किंमत तरी ९००० होते का रे ? "
23/07/2012 - 06:46 Permalink
नेत्रेश

In reply to by चौकटराजा

पाकीट आणी कपाटाची तुलना चुकीची आहे. पैसे पाकीटात, चपला कपाटात. तसेही ब्रांडेड बुट ५००० ते १०००० च्या रेंजमध्ये मीळतात.
23/07/2012 - 09:25 Permalink
अन्या दातार

In reply to by ५० फक्त

पाकिटाची खरेदी झाल्यावर त्यात ठेवायला पॆसे नकोत का? म्हणून अशी काहीतरी रित काढली असावी ;-)
23/07/2012 - 09:40 Permalink
इरसाल

नवं पाकीट चांगल ५/६ महिने कपाटात पडुन होतं शेवटी भावाला देवुन टाकल. आता दुसर घेतलय पण तेही कपाटात पडुन आहे अजुन तरी. सध्या जे वापरतोय ते नवी दिल्ली ठेसनाबाहेरुन फक्त ६० रु.(सॉफ्ट लेदर) २००४ साली घेतले होते. सोडवत नाय. सगळे बोंबलुन थकलेत.
23/07/2012 - 10:42 Permalink
सुहास..

लेख आवडला, पाकिटाशी मानसिक ( आणि आर्थिक ;) ) नाते असते , माझे ही होते आणि आहे :) शाळेत असताना एकदा एक शंभराची नोट वरच्या खिशातुन पडली, बराच दुखी झालो होतो त्यावेळी. ( एक मित्राच्या घराचे पेंटिग करायला मदत केल्याबद्दल मिळाली होती ती.) , त्यानंतर बापाने समजुत काढत पाकिट गिफ्ट दिले होते, ते मी आजवर ( लकी आहे) म्हणुन संभाळुन ठेवले आहे, अर्थात जरा जीर्ण झाले आहे, पण कपाटात अजुन जसेच्या तसे आहे, मागे बंगलोरला असताना च्या रूम मध्ये, रूम पार्टनर ने नजरचुकीने ईकडे तिकडे केले तेव्हा, जाम भडकलो होतो त्याच्यावर ;) , त्या पाकिटात अजुन काही गोष्टी आहे. मैत्रीणीने दिलेली एक दहाची नोट;), राज ठाकरेंच विध्यार्थी सेनेचे कार्ड, डॅडचा तारूण्यातील फोटो आणि अश्याच काही आठवणी, लेखाने उजाळा दिला आठवणींना :)
23/07/2012 - 10:58 Permalink
प्रभाकर पेठकर

In reply to by सुहास..

मैत्रीणीने दिलेली एक दहाची नोट;), राज ठाकरेंच विध्यार्थी सेनेचे कार्ड, डॅडचा तारूण्यातील फोटो आणि अश्याच काही आठवणी अतिमहत्त्वाच्या॑ वस्तू पाकिटात ठेऊ नका. पाकिटाचा, 'हरविण्याकडे' आणि 'मारले जाण्याकडे' फार कल असतो. गेलेले पैसे पुन्हा कमविता येतात पण सुहृदांच्या आठवणींचा अमुल्य ठेवा हरविल्यास फार यातना होतात.
23/07/2012 - 12:43 Permalink
जे.पी.मॉर्गन

एका साध्या गोष्टीबाबतची अ‍ॅटॅचमेंट तितक्याच सहज आणि सोप्या शब्दांत मांडली आहे. >> ते पाकीट एक रिमाइंडर होतं, ज्यानं यशाच्या, सुखाच्या अनेक प्रसंगांत कधी उतू मातू दिलं नाही, की अगदी अनेक अपयशांच्या, दुःखाच्या प्रसंगात खचू दिलं नाही. खूप छान. त्या पकिटाची "प्राईस" नव्हे तर "व्हॅल्यू" महत्त्वाची. ते पाकिट तुमच्या त्या दिवसांचं souvenir म्हणून जपायला हरकत नाही! पुलेशु जे पी
23/07/2012 - 10:59 Permalink
मन१

अगदि मनातलं लिहलत. आवडलं. दुधाच्या पिशव्यावरून किंवा एकूणच लेखावरून आठवलं. आम्ही तेव्हा चप्पल तुटली की चक्क चक्क शिवायला जायचो. जोवर तिचा वापर होतो आहे, तोवर तीच चालवायचो. पेन संपला की घे नवा, असे काही नाही. पेन संपल्यावर नवीन रिफील टाकणे इतकचे आम्ही, वर्षानुवर्षे साहं बॉलपेन जात असे. रिफीलसुद्धा गठ्ठ्यात घेतल्याने डझनामागे दोनेक रुपये स्वस्त पडते म्हणून गठ्ठ्याने घ्यायचो. शाळेच्या स्टाफरूममधून बिनकामाचे प्रिंटाआउट, पाठकोरे कागद टाकून देण्यात येत, ते पाठकोरे कागद वापरून वहीचा खर्च वापरण्याचेही उद्योग झाले. पुस्तके, युनिफॉर्म आणि इतर सर्वच कपडे दहावी-बारावी वगैरे पर्यंत दादाचेच वापरलेत.वगैरे., भारीचा म्हणता यावा असा कपडा घेतला तो पहिल्यांदा कधीतरी बारावीला वगैरे. कधी अभ्यासक्रम बदलला तर मात्र पंचाइत व्हायची, दादाची पुस्तके मला वापरता यायची नाहीत. मुळात त्याच्यासाठी पुस्तके घेतानाच आम्ही सेकंडहँड घ्यायचो. कधीकधी संस्कृतच्या आणि मराठीच्या बाई स्वतः बोलावून पोटभर खाउ घालायच्या.बरं वाटायचं.
23/07/2012 - 11:11 Permalink
मी_आहे_ना

माझीही अशीच भावनिक गुंतवणुक १०वीच्या रिझल्टला मिळालेल्या घड्याळासोबत आहे. 'सचिन कुलकर्णी' म्हणतात त्याप्रमाणे "अश्या निर्जीव गोष्टींबाबत सेंटी होऊ नये"हे कळते हो, पण वळत नाही...
23/07/2012 - 11:09 Permalink
प्रीत-मोहर

अगदी मनापासुनचं लिहिलत. माझीही अशीच अवस्था आहे. परवाच लक्षात आलय की पाकीट फाटायला लागलय्....पण नवं घ्यायच नाही- घेववत नाहीय. पहिल्या नोकरीत पैसे साठवुन घेतलेल पाकीट, भले महागड नाही पण खुप जवळच आहे ते. :)
23/07/2012 - 11:54 Permalink
चैतन्य दीक्षित

लेख अतिशय आवडला. असेच लिहीत रहा.. शुभेच्छा!
23/07/2012 - 15:06 Permalink
अनिवासि

छान लेख. खुप आठवणी जाग्या झाल्या. ६० वर्षापुर्वी- पहिल्या नोकरीत असताना एका खोलीत रहात होतो. तेव्हा टी व्ही नव्हता. आयुष्यातील पहिली मोठी खरेदी- रेडीओ. २५ एक poundला - हप्त्याने घेतला - Pilot कपनीचा. त्यानन्तर आयुष्यात खुप खुप गोष्टी घडल्या- एक वेळ तो रेडीओ विकायला पण काढ्ला पण कोणीच गिर्‍हाईक मिळाले नाही, आज ६० वर्‍षानन्तर तो माझ्या दिवाणखान्यात मानाच्या स्थानावर बसला आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार - त्याच्याबरोबर त्याचा त्या वेळेस मिळालेला circuit digram आहे आणि माळ्यावर कोठेतरि त्याची पावती! तुमचे पाकीट - माझा रेडीओ! त्या नीर्जीव नाहीत!
23/07/2012 - 15:19 Permalink
प्यारे१

>>>कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात. सुप्परलाईक. अवांतर : हल्ली लोक्स फारच लवकर 'नॉस्टाल्जिक' होतात. 'आमच्या वेळी?' १५ -२० वर्षामागचा काळ म्हणजे आमच्या वेळी???? अवघड आहे. तिसरीतल्या मुलानं 'सारी उम्र हम मर मर के जी लिये' म्हणण्यासारखं वाटतंय मला तरी.
23/07/2012 - 17:13 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात. अगदी खरं आहे. -दिलीप बिरुटे
23/07/2012 - 17:35 Permalink
वेताळ

काही जुन्या वस्तु कितीही जिर्ण झाल्यातरी त्यांचा मोह सुटत नाही. मी अजुनतरी कधी पाकिट घेतले नाही किंवा बाळगले नाही .
23/07/2012 - 19:00 Permalink
जयनीत

कुणाचं गिफ्ट म्हणुन मिळालेल्या पाकिटापेक्षा नक्कीच वेगळ्या भावना जुळलेल्या असतील असच वाटत होतं सुरवातीपासुन, एकदम मस्त लिखाण. आवडलं.
23/07/2012 - 19:41 Permalink
स्वाती दिनेश

लेखन आवडले, अशा काही वस्तूंबरोबर आठवणी जुळल्या की त्यात आपोआपच जीव गुंतत जातो. स्वाती
23/07/2012 - 20:01 Permalink
अभ्या..

ले़ख खूप आवड्ला. आतापर्यन्त खूप पाकीटे हरवलीत. आठवणी पण. सध्याच्या पाकीटाशी निगडीत त्याची किम्मत सोडून काही नाही.
24/07/2012 - 00:44 Permalink
दिपक

छान लिहिले आहे.
कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात.
खरं आहे.
24/07/2012 - 13:56 Permalink
स्पा

मस्तच लिहिलं आहेस रे मलाही असंच मिळालेल एक खास पाकीट बदलापूर ला जाताना खोपोली ट्रेन मध्ये मारलं गेलं. बेक्कार जीव जळला होता पाकीट नाही , ते मिळाल्याची आठवण हरवल्याबद्दल :(
25/07/2012 - 17:28 Permalink
चावटमेला

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. खरंच, आज कळालं की, सुख वाटल्याने वाढतं, दु:ख वाटल्यानं कमी होतं आणि अनुभव वाटल्यानं समृध्द होतो.
25/07/2012 - 21:43 Permalink
बन्डु

इतक्यातच एक नविन पाकिट घेतलं, ओन्लाईन ऑर्डर केलं होतं. अगदी मला हवं तसचं मिळालं. अस असुन सुद्धा जुनं कधीच फेकत नाही. :) चपला तर अजुनही शिवून वापरतो. त्यात काही विशेष वाटत नाही.! :)
09/01/2014 - 17:29 Permalink
पिलीयन रायडर

नवर्‍याचं एक पाकीट आणि मी दिलेली प्रेमपत्र एकाच आत्मियतेने नवरोबांनी कपाटात अगदी छानशा बॉक्स मधे घालुन ठेवले आहे. त्यात अजुनही पिक्चरची तिकीटं..एकमेकांना दिलेल्या फुलांच्या पाकळ्या..आणि अजुन काय काय जपुन ठेवलय..!
09/01/2014 - 17:41 Permalink
दिपक.कुवेत

मी सुद्धा माझं पाकिट बरेच वर्ष वापरत होतो. शेवटि नाईलाजस्तव नविन घेतलं ते सुद्धा बायकोने घेउन दिलं.
09/01/2014 - 17:53 Permalink