Skip to main content

साध्वाभास

Published on शुक्रवार, 20/07/2012
आटपाट नगर होतं. तिथे एक साधू राहात होता. साधूला लोकांचं आयुष्य सुखकर करण्याची फार तळमळ होती. त्यामुळे राजासुद्धा त्या साधूचा भक्त झालेला होता. त्या साधूचं एक प्रसिद्ध वाक्य होतं 'जय साध्वाभास!' साधु म्हणजे चांगला आणि आभास म्हणजे आभासच, दुसरा काही अर्थ नाही. ह्या त्याच्या प्रसिद्ध वाक्याचं विश्लेषण करणारी काही पुस्तकेही काहींनी लिहिली होती. असो, तर एक दिवस त्या साधूकडे एक बाई आपलं गार्‍हाणं घेऊन गेली. "साधुमहाराज, गेली २-३ वर्षं माझे पाय खूप दुखतात हो. तुम्ही काहीही करा आणि हे दुखणं थांबवा." साधूने तिच्याकडे एकवार पाहिलं. आणि मनातल्या मनात म्हणाला, 'अरेच्या, हिचे पाय तर दिसतच नाहियेत. हिला बहुतेक स्वतःला पाय आहेत हा भास होत असावा.' इतक्यात नमस्कारासाठी म्हणून खाली बसलेली ती बाई ताठ उभी राहिली. साधूला समजले की तिला पाय होते पण उच्चासनावरून ह्याला ते दिसले नव्हते. आता काय उत्तर द्यावे या विचारात साधू गढून गेला...थोड्या वेळाने बोलायला सुरुवात करण्यापूर्वी घसा साफ करून साधू बोलता झाला. बाई पंचप्राण कानात आणून ऐकत होती. "हे पहा बाई, तुम्हाला एक काम करावं लागेल. गावापासून दूर दूर चालत जा." "किती मैल चालावं लागेल महाराज?" "मूढे, आम्ही मैलाचे दगड न मोजता रोज १० मैल चालतो म्हटलं. आमच्यासमोर असले प्रश्न उपस्थित करू नकोस.आधी आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकून घे. वाटल्यास लिहून घे. लिहून घेतलेलं वाच. तुला नक्की समजेल." "क्षमा असावी महाराज" "तर, मी काय म्हणत होतो... हां.. गावापासून दूर दूर चालत जा. गावाला लागून असलेल्या १० गावांपैकी सगळ्यात शेवटच्या म्हणजे दहाव्या गावाची वेसही तुला दिसणार नाही इतक्या दूर चालत जा. मग तुला जाणवेल की....तुला दुखण्यासाठी पायच शिल्लक नाहियेत. जे काही आहे तो भास आहे, नुसता भास नसून 'साध्वाभास आहे' साधु म्हणजे चांगला आणि आभास म्हणजे आभासच. म्हणजेच, तुला पायांचा 'चांगलाच आभास' आहे हे लक्षात येईल. जय साध्वाभास" बाई गोंधळून गेली. गोंधळ ओळखून साधू म्हणाला, 'मी म्हणालो होतो ना, लिहून घे जे सांगतोय ते.'यावर ती बाई म्हणाली 'लिहून घेतलंय हो, पण नक्की काय अर्थ आहे हे कळले नाही.' "वाच, पुन्हा एकदा वाच. आमचा 'जय साध्वाभास' हा मंत्र लक्षात घे. त्यावर श्रद्धा ठेवून वाच. समजेल तुला नक्की.' बाई म्हणाली "ठीक आहे, पण शेजारच्या गावात एक प्रसिद्ध वैद्य आला आहे म्हणून कालच त्याच्याकडून हे तेल आणलंय पायांना लावायला, त्याचं काय करू?" "ते आण इकडे (माझेही गुडघे दुखतात, मी वापरेन ते)" जय साध्वाभास !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2782
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

लहानपणी झालेले भास बहुतेक नंतरच्या जगात प्रोजेक्ट केले म्हणून अशी ही भासंभास झालेली असावी. भासमानसशास्त्रच याचे उत्तर पुरतेपणी देऊ शकेल असे भासानंद भसतगे म्हणतात. या भासाची नाडी एकदा लागली, की "भास की बास" याचे उत्तरदेखील लग्गेच मिळेल असा भास व्हायला हरकत नसावी. भासांतरः विडंबन मात्र "अ"भासी आणि म्हणूनच छान आहे. (भासमॅन)

_/\_

काय भास मारुन रायला बे. लै भारी.... :D

In reply to by संजय क्षीरसागर

हा प्रतिसाद खरा आहे की भासच आहे ? (बाकी संक्षी, आपण प्रतिसाद द्यायला थोSSSSडं थांबायला हवं होतं असं वैयक्तिक मत आहे. ;)) - प्यारे१ चुन चुन के मारुंगा चुन चुन के| - धरम प्यारे. चैतन्य दिक्षित यांनी आपलं 'खरं' रुप दाखवल्यानंतर काय म्हणावं हेच उमगेना! यापुढे कधी एखाद्या रोमँटिक नटाने कॉमेडी केली तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by प्यारे१

ज्यांनी स्वतःचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी व्य. नि. तून मदत मागितली त्यांचे इथे प्रतिसाद पाहून लगोलग मदत केली नाही हे बरोबर केलं हे पटलं, मग म्हटला कशाला उशीर करा!

In reply to by संजय क्षीरसागर

जरा हलकं घ्या हो! वेळेपेक्षा या मिसळपावच्या आ'भासी' जगताला जास्त 'भासमय' म्हणून घेण्याची गरज तुम्हाला आहे असं वाटतंय. तुम्ही एकदम शिक्रेटं फोडायला लागलात की. मिसळपाव वर जर एखादा आयडी आपलंच म्हणणं खरं करायचा प्रयत्न करत असेल (जरी ते खरं असलं, आतून पटलेलं असलं तरी) तर त्याला हमखास डोक्यावर सॉरी टाळूवर आपटायची 'प्रथा' आहे. सो टेक अ चिल्ल पिल्ल अ‍ॅन्ड एन्जॉय ' रियली'...! बाकी आम्ही लहान आहोत. आपण सूज्ञपणे निर्णय घ्या. (वरच्या प्र तिसादांतून थोडं वैयक्तिक झाल्याचा वास आला म्हणोन) आणि हो...! (श्रेयः आणखी कोण? कोदा) हा आमचा शेवटचा होता.

In reply to by प्यारे१

कुणाला तरी फायदा झाला या लिखाणाचा हे छानच झालं :) प्यारे१, हलकं कसं घ्यावं कुणी? जमिनीपासून जितकं दूर जाता तितकं आपलं 'आभासी वजन' वाढतं हे आम्ही ८वी कि ९वी मध्ये शिकलो. (लिफ्ट जर तळमजल्यावरून १०व्या मजल्यावर जात असेल तर आपलं वजन जास्त झाल्याचा भास होतो बघा..) आणि माझ्या 'खर्‍या' रूपाबद्दल म्हणाल तर... ते मी अजून १०-१२ प्रकारे दाखवू शकतो हो.... :)

हा हा हा हा हा हा...लय भारी..हुच्च्यासनावरुन बघायची सवय लागली की सगळं आभासी आभास आहे. मिपा सुद्धा आभास आहे. सर्व मिपाकर (एक सोडुन) आभासी आहेत =)) धनंजय ______________________ जे ढापतो तेच लिहितो

लेख आवडला आणि कळला देखील ! आणि हो ..आणखी एक.. हा मा़झा प्रतिसाद अजिबात ति र क स नाही.... !

बेस्ट !! अवांतर - अशा लेखनाला शाब्दिक असहिष्णूता म्हणता येईल का?

मिपा हा एक भास आहे, चैतन्याचा लेख हा एक भास आहे, त्यावरच्या प्रतिक्रिया या आभासी आहेत आणि आम्ही त्या प्रतिक्रियांसकट लेख् उडवल्याचा भास का बरे होतो आहे मला? ;)