✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेल्समन भाग - ३

म
मराठमोळा यांनी
Wed, 07/04/2012 - 08:54  ·  लेख
लेख
भाग १ भाग २ संध्याकाळ कुणी कुणाशी न बोलता निघून जाते. पालकची नावडती भाजी तक्रार न करता राहुल जेवणात घेतो आणि गुपचुप झोपी जातो. पुढे.. महिन्याभरात आप्पांचा राग निवळून जातो. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागतो. लेक्चर सुटले की मित्रांची वाट बघणे, त्यांच्याबरोबर कँटीनमधे गप्पा ठोकणे हा त्याचा नित्यक्रम होऊन बसतो. पण बाकीचे कॉलेजात असताना आपण बाहेर फिरतोय हा सल त्याच्या मनात कायम असतो. माई: "अहो, मी काय म्हणते, राहुलला काहीतरी कामधंदा करायला सांगा, चार पैसे घरात येतील आणि त्याचं हे रिकामं फिरणंही बंद होईल, नुसतच पेट्रोल जाळत फिरतो आणि बाहेरचं खाऊन पैसे उडवतो. महागाई किती वाढलीये आणि तुमचा पगारही पुरत नाही आता." आप्पा: "अगं अजुन लहान आहे तो. आणि हेच वय आहे त्याचं मजा मस्ती करण्याचं, मी आतापासून त्याच्यावर जबाबदारीचं ओझं नाही टाकणार. आनी कुणास ठाऊक कामधंद्याच्या नादात अभ्यास कायमचाच विसरला म्हणजे? नाही नाही.. कमीत कमी स्वतःच्या बरोबरीच्या मुलांबरोबर जातोय ना, आज उद्या त्यांच्या नादाने का होईना व्यवस्थित शिक्षण पुर्ण केलं म्हणजे झालं." माई: "नाही हो, मला तर असं वाटतय की आता त्याच्याकडून काही शिक्षण होणार नाही, हॉटेलात कपबश्या धुण्याचं काम मिळालं तरी चालेल मी तर म्हणते" आप्पा: "बास.. अजुन काही बोललीस तर याद राख. मी समर्थ आहे अजून घर चालवायला. या विषयावर आणखी काही बोलु नकोस आणि राहुलला तर अजिबात नाही. माझंच स्वाभिमानी रक्त आहे त्याच्यात." तो दिवसही निघून जातो. एक दिवस राहुल आणि त्याचे मित्र २ दिवसाच्या पिकनिकला जायचा प्लॅन करतात. प्रत्येकी ५००-६०० रुपये खर्च येणार. राहुल आनंदात हो म्हणून बसतो पण नंतर आप्पांना कसं विचारणार याची धास्ती घेऊन बसतो. पिकनिक एक आठवड्यावर आली असताना तो आप्पांना न विचारता माईला विचारुन बघावं असं त्याच्या मनात येतं आणि तो माईकडे आप्पा घरी नसताना धीर करून ५०० रुपयांची मागणी करतो. माईचा इतक्या दिवसांपासून दाटलेला राग या निमित्तानं बाहेर पडतो. माइ त्याच्या कानाखाली जाळ काढते. तास दोन तास त्याला अद्वातद्वा बोलते. पाच रुपये कमवुन दाखव आणि मग पाचशे माग असंही म्हणते. पाच रुपयाचं वाक्य राहुलला भलतंच सलतं. मित्रांना पिकनिकला यायला जमणार नाही असं सांगून राहुल कॉलेजला जायचंही बंद करतो. खरंच मी पाच रुपये कमवायच्या लायकीचा नाही का? आणि आप्पा आपल्यावर किती खर्च करतात असाही विचार त्याच्या मनात येऊ लागतो, त्याला स्वत:ची लाज वाटु लागते आणि एक दिवस काहीतरी नोकरी करायची असा मनाशी ठाम निश्चय करतो. नोकरी कशी करतात किंवा कशी शोधतात हेही माहित नसल्याने राहुल गोंधळून जातो. वर्तमानपत्रातल्या जाहीराती बघावं तर सगळीकडे शिक्षण, अनुभव आणि वयाची अट. अचानक त्याला विक्रमची आठवण होते. विक्रम हा त्याच्याच कॉलेजातला अधून मधून फुटबॉल खेळायला येण्यामुळे ओळख झालेला मित्र. तो फुल टाइम नोकरी करुन एमबीए करणारा म्हणजे कॉलेज न करता फक्त परीक्षेला हजेरी लावणारा, राहुलपेक्षा वयाने मोठा आणि राहुलच्या मनात त्याच्या व्यक्तीमत्वाची छाप सोडणारा एक तरूण. राहुल त्याचा नंबर मिळवतो आणि त्याला भेटायचे ठरवतो. विक्रमला भेटल्यावर राहुल त्याला नोकरी करण्याची ईच्छा बोलून दाखवतो आणि त्याच्या मार्गदर्शनाची मदत मागतो. थोडासा गोंधळलेला विक्रम राहुलच्या डोळ्यातली चमक पाहुन हलकेच स्मित करतो. राहुलचा आत्मविश्वास त्याला चकीत करुन सोडतो. विक्रमः "मी जिथे नोकरी करतो तिथे पदवीधर लोकांनाच नोकरी देतात. मी ट्रॅक्टर विकणार्‍या कंपनीत मार्केटींगची नोकरी करतो. तुझं शिक्षण अशा प्रकारच्या नोकरीसाठी कमी आहे. पण माझा एक मित्र आहे तो तुला नक्की मदत करु शकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव. नोकरी आता कितीही पैसे देणारी असली तरी शिक्षण अपुर्ण ठेवु नकोस." विक्रमकरवी रितेशची भेट होते. रितेश जिथे नोकरी करतो तिथे सेल्स मधे नोकरी आहे असे राहुला कळते. रितेश राहुलला सोमवारी सकाळी ब्रँच मॅनेजरला भेटायला आणि मुलाखतीसाठी येण्यास सांगतो. त्याआधी रितेश त्याचा नोकरीसाठीचा अर्ज तयार करुन देतो आणि फॉर्मल शर्ट पँट आणि जमल्यास टाय लावून येण्यास सांगतो. राहुल डोक्याला हात लावतो. कारण त्याच्याकडे टाय तर लांबच पण फॉर्मल कपडे देखील नसतात. म्हणायला १-२ शर्ट आहेत पण पँट.. सगळ्या जीन्स वापरणारा कॉलेजतरूण तो. नविन कपडे घ्यावेत तर पैसे लागणार आणि शिवुन घ्यायला देखील ३-४ दिवस. त्याच्याकडे दोनच दिवस शिल्लक असतात. माईचे शब्द त्याच्या डोक्यात घर करुन बसले होते. माई किंवा आप्पांकडे पैसे न मागता त्याने जाड्याकडे मदत मागायचे ठरवतो पण आता पैसे कुणाकडेच मागायचे नाहीत असाही निश्चय तो करतो. जाड्या त्याला पैसे देऊ करतो पण राहुल ते नाकरतो. त्याऐवजी जाड्याची एखादी वापरात नसलेली फॉर्मल पँट तो मागतो. जाड्या राहुलचाहा अवतार पाहून थोडा दु:खी आणि थोडा आश्चर्यचकीत होतो. जाड्याची पँट नीट बसत नसली तरी बेल्ट लावून एक दोन घड्या पडून का होईना पण तशीच वापरायचे राहुल ठरवतो. राहुलचं नक्की काय चाल्लय हे माई आणि आप्पांना विचित्र वाटत असलं तरी 'असेल काहीतरी उपद्व्याप चालू' असे म्हणून सोडून देतात. रविवार रात्र, 'टाय नाहीये', 'उद्या काय होईल' असे अनेक प्रश्न, विचार, भिती, दडपण घेऊन राहुल रात्रभर कुस बदलत जागाच रहातो. क्रमशः विनंती: वाचकांनी कथेत आणि व्याकरनात काही चुका असल्या तर त्या माफ कराव्यात :)

Book traversal links for सेल्समन भाग - ३

  • ‹ सेल्समन भाग - २
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3038 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व्याकरण घाल चुलीत! भाग जरा

शिल्पा ब
Wed, 07/04/2012 - 09:04 नवीन
व्याकरण घाल चुलीत! भाग जरा मोठे टाक नैतर सगळं लिहुन मगच टाक. |(
  • Log in or register to post comments

याला म्हणतात प्रतिक्रीया..

शैलेन्द्र
Wed, 07/04/2012 - 09:11 नवीन
याला म्हणतात प्रतिक्रीया.. जाम्म सहमत्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ममो, कथा आवडली. कथानकाच्या

प्रचेतस
Wed, 07/04/2012 - 09:11 नवीन
ममो, कथा आवडली. कथानकाच्या शैलीत थोडा बदल केलात तर अधिक वाचनीय होईल. जसे.
महिन्याभरात आप्पांचा राग निवळून जातो. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागतो.
महिन्याभरात आप्पांचा राग निवळून गेला. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागला. अर्थात ही फक्त सूचनाच. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

सुचनेला अनुमोदन

अमृत
Wed, 07/04/2012 - 11:07 नवीन
जातो, लागतो हे वाचताना थोडं खटकतच. बघा वल्लींची सूचना पटते काय. अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कथा रोचक होत चालली आहे..

श्रीरंग_जोशी
Wed, 07/04/2012 - 09:31 नवीन
ममो -बरेच दिवसांनी नवा भाग वाचूनही लिंक तुटल्यासारखे वाटले नाही. पण खालील वाक्याने तर दिलच तोडला.... ;-). तुम्ही असे लिहू लागल्यावर आम्ही कुणाकडे बघायचे? >> विनंती: वाचकांनी कथेत आणि व्याकरनात काही चुका असल्या तर त्या माफ कराव्यात
  • Log in or register to post comments

ब-याच दिवसांनी आला राहुल,

५० फक्त
Wed, 07/04/2012 - 10:38 नवीन
ब-याच दिवसांनी आला राहुल, लवकर लवकर टाका भाग म्हणजे मजा येईल.
  • Log in or register to post comments

सहमत.

मृत्युन्जय
Wed, 07/04/2012 - 11:19 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments

छानच लिहिलीय--- येऊदेत लवकर

निवेदिता-ताई
Wed, 07/04/2012 - 11:19 नवीन
छानच लिहिलीय--- येऊदेत लवकर पुढील...
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे..

मुक्त विहारि
Wed, 07/04/2012 - 11:21 नवीन
वाचत आहे.. जमेल तसे लिहा आणि पूर्ण करा..
  • Log in or register to post comments

वचतोय

jaypal
Wed, 07/04/2012 - 11:39 नवीन
पुढिल भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

येउद्या कि पुढील भाग लवकर

RUPALI POYEKAR
Wed, 07/04/2012 - 12:42 नवीन
येउद्या कि पुढील भाग लवकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा