✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पैसा

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 06/22/2012 - 11:46  ·  लेख
लेख
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे. तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित! कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्‍या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील! मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं. हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता. दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते. तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता! चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते. पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही. इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते! मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं! माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
39219 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

योगप्रभू, धन्यवाद..

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 23:10 नवीन
मधे चार-पाच तास माझं मशिन बंद होतं म्हणून लगेच प्रतिसाद देऊ शकलो नाही. पेठकर सरांची अनुमती असेल तर माझे, त्यांचे आणि त्यासंबधित असलेले सदस्यांचे सर्व प्रतिसाद अप्रकाशित केले जावेत अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो
  • Log in or register to post comments

आणि हा घ्या १०० वा प्रतिसाद :-)

Pearl
Tue, 06/26/2012 - 01:17 नवीन
लेख आणि प्रतिसाद वाचते आहे. दोन्ही इंटरेस्टिंग आहे. मला या दोन ओळी आवडल्या. १) श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. २) आयुष्याच रुटीन होऊ देऊ नका, एकच दिवस पुन्हापुन्हा जगू नका
  • Log in or register to post comments

एक मजेशीर प्रसंगा डोळ्यासमोर

वीणा३
Tue, 06/26/2012 - 05:41 नवीन
एक मजेशीर प्रसंगा डोळ्यासमोर आला, रोज मुलाला सांगत असते की कैडबरी चा एकाच टुकड़ा आज खा, उरलेला उद्या नाहीतर दात किडतिल. जर त्याला हा लेख कलू शकला असता तर म्हणाला असता, की आजच दे सगळी कैडबरी उद्या ची चिंता करू नको :प "आणि रात्र शनिवार करा म्हणजे भोगाल तेव्हा मनसोक्त भोगा, उद्याची चिंता करु नका कारण उद्या कधी येत नाही." => हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील. १. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये :). २. माझ्या ओळखीतल्या लोकांपैकी ९०-९५% लोकांच्या आयुष्यात ६०-७० वर्षा पर्यंत रोज उद्या आलाय :प. फारच कमी लोक अकाली गेलेत. त्यामुळे कदाचित धरून चालल्ये कि मला पण ६०-७० वर्ष पर्यंत उद्या ला तोंड द्यावा लागणार आहे. असो, माझ्यासाठी महत्वाच म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन वाचायला मिळाला आणि तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे हा दृष्टीकोन तुमचं आयुष्य सुखी बनवतोय.
  • Log in or register to post comments

मी साठ वर्षांचा होणार नाही असं नाही

संजय क्षीरसागर
Tue, 06/26/2012 - 17:21 नवीन
मुद्दा असाय, मी आज साठ वर्षाचा नाही त्यामुळे साठ ही आज माझ्यासाठी कल्पना आहे, त्या कल्पनेनं आज वाया घालवण्यात अर्थ नाही. जेव्हा साठ झालो हे कळेल तेव्हाही तो कोणता तरी `आजच असेल' आणि त्या दिवशी ही मी उद्याची काळजी न करता त्या आजमधेच जगत असेन कारण तो माझा स्वभाव बनलेला असेल. या विरुद्ध परिस्थिती भविष्यकालीन योजना करणार्‍याची असेल. तुम्हीही आज साठ नाही पण साठीची चिंता करत तुम्ही ती सोय आज लावताय. जेव्हा तुम्ही खरंच साठ व्हाल त्या वेळी तुम्हाला सत्तरची दारुण परिस्थिती चिंताग्रस्त करेल कारण त्या दिवशी देखील तुम्ही पुढची योजना करत असाल! कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही, लोक नाराज होतायत कारण त्यांच्या धारणांना शह बसतोय. तुम्ही फक्त मी जे लिहिलय ते शांतपणे वाचा, एकेका वाक्याची मजा घ्या, लगेच विरोधी विचारांच काहूर मनात उठू देऊ नका. मी शब्दखेळ करत नाहीये, या सहज आणि सोप्या संकल्पनांना जबरदस्त अध्यात्मिक आधार आहे कारण मुळात काल हा भास आहे त्यामुळे `काल किंवा उद्या' असं काही नाही; एवढच नाही तर आज सुद्धा थोडी विस्तृत कल्पना आहे, फक्त `आता' आहे. हा `आता' ही एकमेव अचल स्थिती कायम आहे त्यामुळे कृष्णानं स्वतःला सनातन वर्तमान म्हटलय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

साठ ही आज कुणासाठी कल्पना

बॅटमॅन
Tue, 06/26/2012 - 17:55 नवीन
साठ ही आज कुणासाठी कल्पना असली तरि साठी बुद्धी नाठी ही अख्ख्या जगासाठी रिअ‍ॅलिटी आहे. बाकी प्रतिपादिलेली धारणा झीनोच्या पॅराडॉक्सच्याच मार्गाने जाणार अशी दाट शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>साठी बुद्धी नाठी ही अख्ख्या जगासाठी रिअ‍ॅलिटी आहे , कारण

संजय क्षीरसागर
Tue, 06/26/2012 - 22:58 नवीन
आयुष्याचा मोठा भाग स्थिरस्थावर होण्यात जातो आणि स्थैर्य आल्यावर मग भोगायचं तेव्हा वृद्धापकाळाच्या योजना करण्यात वेळ जातो, आता जरा उसंत मिळेल म्हणेपर्यंत साठी येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संजय साहेब

रणजित चितळे
Wed, 06/27/2012 - 14:25 नवीन
आपले लेख सहसा चुकवत नाही. हे कसे निसटले ते कळले नाही. वाचून काढले. विचार पटले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा