✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पैसा

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 06/22/2012 - 11:46  ·  लेख
लेख
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे. तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित! कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्‍या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील! मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं. हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता. दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते. तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता! चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते. पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही. इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते! मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं! माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
39218 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

देअर इज नथिंग एक्स्ट्रॉर्डनरी ...

अर्धवटराव
Sat, 06/23/2012 - 09:20 नवीन
जीवन सध्या ज्याकाहि स्वरुपात चाललय ते कसं इम्प्लिमेंट झालय याला तसही काहि महत्व नाहि. सूर्य, पृथ्वी, वातावरण, बहुपेशीय जीव, शरिरातील श्वसन, चयापचय इ. संस्था... हे जर असं नसतं तर इतर दुसर्‍या कुठल्या पद्धतीत असतं. पृथ्वीवर जो पहिला माय्क्रोओर्गॅनिझम उल्कापाताने आला, वा इथेच तयार झाला तो श्वास घेत नव्हता. आजही समुद्र तळातील जीव श्वास घेत नाहि. श्वसन हि केवळ उर्जेच्या ज्वलनासाठी ऑक्सीजन सप्लाय करणारी व्यवस्था आहे बस्स. त्यात रहस्यमय असं काहि नाहि. उद्या जर विद्युतचुंबकीय बलाने लोह धातुचे विघटन होऊन उर्जा वहन करणारे जीव सापडले तर आश्चर्य वाटायला नको. मग अश्या जीवांना बुद्धाचे तत्वज्ञान कधिच उमजणार नाहि.. ते त्यांच्या कामाचेच नाहि. हा सृष्टीचा उपद्व्याप असाच निरंतर चालु राहिल, वा मानववंश असाच अगणीत काळासाठी पृथ्वीवर वावरेल अश्या भ्रमात कोणि नाहि. लाखो वर्षे पृथ्वीवर राज्य करणारे डायनासोर जर ५० वर्षात आपले अस्तित्व गमाऊन बसले तर मानव का नाहि... पृथ्वीवर एखादा ग्रह आदळेल आणि इथलं जीवन नष्ट होईल कि नाहि हा प्रश्नच नाहि.. ते केंव्हा होईल हाच काय प्रश्न. थोडक्यात काय, तर जीवनाची क्षणभंगुरता माणुस जन्मल्यापासुन आपल्या खिश्यात घेऊन फिरतो. त्यात काहि रहस्य वगैरे नाहि. रहस्य असेलच तर हे कि अक्षय, अखंड, निराकार वगैरे जे जीवन आहे त्याने कुठल्याही क्षणभंगुर देहाच्या माध्यमातुन प्रगटच का व्हावे? जर ते तसं झालय तर त्या सत्याचा स्विकार का करु नये? कुठल्यातरी देहाच्या माध्यमातुन जर संवेदना, चेतना आवर्तने घेतेय , आणि ते देखील स्वतःच्या मर्जीने... तर त्याच माध्यमातुन तिला का स्विकारु नये? राहिला प्रश्न पैश्याचा... तर त्याला कितपत महत्व द्यावे यासाठी आपल्या गरजेची समज असली म्हणजे पुरे. पोट भरेपर्यंत अन्नाच्या क्वांटिटीचे महत्व. त्यानंतर शांतपणे तृप्त होऊन विडा चघळायचा. सो सिंपल. पैशाची कारण मिमांसा इथेच संपते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पैसा काय किंवा श्वास काय

विजुभाऊ
Sat, 06/23/2012 - 11:26 नवीन
पैसा काय किंवा श्वास काय दोन्ही नश्वर. हॉस्पिटल मध्ये दाखल करुन घेतले नाही म्हणून फारसे काही बिघडत नाही. कदाचित त्यामुळे वेदनायमय जगणे लवकर आटोपेल. मेले तरी फारसे बिघडत नाही ( खरेतर काहीच बिघडत नाही). आपण जगायलाच हवे हातरी अट्टाहास कशाला. ( हे विधान सरकॅस्टिक किंवा अतीखरे .अशा कोणत्याही अर्थाने घेतले तरी चालेल)
  • Log in or register to post comments

कल्ट कुठाये? मी फक्त वस्तुस्थिती मांडतोय

संजय क्षीरसागर
Sat, 06/23/2012 - 11:40 नवीन
मी जगतो तेच बरोबर असा रोख नाहीये, लिहिण्याच्या शैलीमुळे तसं वाटत असावं, जगण्याचा एक वेगळा अँगल सांगून पाहतोय. आणि मजा म्हणजे तो कल्पनाविलास नाहीये, पराकोटीच्या श्रीमंतांबरोबर (ज्यांच्या पुढल्या पिढीलाही पैश्यासाठी काही करायची गरज नाही) उठबस असतांना, मनात कोणतीही इर्ष्या न ठेवता, त्यांचे आर्थिक व्यवहार अत्यंत जवळून पाहून, त्यांच्याशी हार्दिक संवाद साधल्यावर, त्यांना ही जे मंजूर आहे पण साधता येत नाहीये ते सांगतोय. विरोधी विचारांचा समावेश त्यात झालाय त्यामुळे त्या विचारसरणीला मी समजावून घेतलं नाहीये असं नाही. ज्यांना पटत नाहीये त्यांना पटावं हा उद्देश नाहीये, ज्यांना पटलय त्यांना साहस लाभावं म्हणून लिहिलय. आता पुन्हा मी स्वतः फकिर नाही की फकिरी शिकवत नाही, पैसा काय चिज आहे याचा पुरेपूर अंदाज आहे आणि वाचकांच्या आर्थिक परिस्थितीचाही अंदाज आहे, त्यामुळे ज्यांना जमवायची इच्छा आहे अश्यांना जमावं म्हणून हा प्रपंच आहे. अध्यात्मात आजवर असं घडलं नाहीये, एकतर एकांगी विचार केला गेलाय किंवा मग इतकी ऐयाशी केली गेलीये की सामान्याला स्वच्छंद अप्राप्य भासतोय पण वास्तविकात तो आपल्या प्रत्येकाला गवसू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

पैसा तो खुदा नही मगर खुदासे

नाना चेंगट
Sat, 06/23/2012 - 11:38 नवीन
पैसा तो खुदा नही मगर खुदासे कम नही ! शिकले सवरलेले लोकं म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते ! आपण पुराणमतवादी, त्यात वयाने लहान असल्याचे नुकतेच सर्टीफिकेट मिळाले आहे :) आम्हाला पृथ्वी पैशाभोवतीच फिरतांनाच आजवर दिसली आहे. पोट जेव्हा भरलेले असते तेव्हा तत्वज्ञान सुचते असे आमचे प्रामाणिक मत आहे. कुणीही असो त्याला पैशाशिवाय जगणे अवघड आहे. कुणी स्वत:च्या पैशावर जगतो कुणी दुसर्‍याच्या ! पैशाशिवाय जगायचे तर वैदिक ( ;) ) काळात जावे लागेल. ते शक्य आज दिसत नाही. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. आपण आज काय आहे ते पाहू. आज पैसा लागतो. आणि तो पुरेसा लागतो. पुरेसा म्हणजे किती हे प्रत्येकाचे अनुमान वेगळे. ना बाप बडा ना भय्या !! सबसे बडा रुपय्या !!! असो.
  • Log in or register to post comments

नानाश्री,

संजय क्षीरसागर
Sat, 06/23/2012 - 11:43 नवीन
>पोट जेव्हा भरलेले असते तेव्हा तत्वज्ञान सुचते असे आमचे प्रामाणिक मत आहे = येस, पोट भरलेल्या लोकांशीच बोलतोय याची पुरेपूर खात्रीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

नानबा

sneharani
Sat, 06/23/2012 - 11:47 नवीन
+१ प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

कुणी स्वत:च्या पैशावर जगतो

कवितानागेश
Sat, 06/23/2012 - 12:49 नवीन
कुणी स्वत:च्या पैशावर जगतो कुणी दुसर्‍याच्या !>> एकदम ढळढळीत वैदिक... आपले ते हे,.. वैश्विक सत्य! :) मला असं वाटते की खरं तर आधीच पैसा भरपूर असावा. मग तो कसा महत्त्वाचा नाही हे नीट कळते. तोपर्यंत कळतच नाही. असो. पैशाचे सोंग आणण्याबद्दल कुणी मर्गदर्शन करेल काय? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन..

निश
Sat, 06/23/2012 - 12:15 नवीन
संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन आज मधे करत असतो. आता हे बघा पैसा महत्वाचा नसता तर तुम्ही आंतरजालावर लिहित झालाच नसता कारण आंतरजाल चालु ठेवण्यासाठि पण पैसाच लागतो. आज मध्ये जगण्याच्या हव्यासापायीच युरोप, अमेरीकेत वित्तिय संकट आली आहेत. तिथे भविष्यकालीन तरतुदींचा फारसा विचार केला गेला नव्हता हे आज उघड सत्य आहे. तशीच काहीशी आपल्या कडे दशा आहे. आज मध्ये जगण्याच्या नादात सरकारने भविष्यकालिन येणार्‍या वित्तिय संकटांमधुन बाहेर पडण्यासाठि तरतुद करण्यात फारस लक्ष दिल नाही व त्याचा परिणाम आजचि भिषण महागाई. त्यामुळे उद्याचा विचार हा करावाच लागणार आणि त्याच मुळे आज मध्ये जगताना पैशाचा विचार न करता मनसोक्त आनंदी जगण कठिण आहे.
  • Log in or register to post comments

नाही हो, आपण आजमधे जगत नाही, उद्याचा विचार करतो किंवा

संजय क्षीरसागर
Sat, 06/23/2012 - 13:17 नवीन
कालचं स्मरण करतो. मी पैसा महत्त्वाचा नाहीये आणि मिळवू नका असं कधीही म्हटलेलं नाही, तो दुसर्‍या स्थानावर आहे, तुम्ही प्रथम आहात इतकंच सांगतोय. पैसा मानवी कल्पना आहे, तो निव्वळ कन्विनियंस आहे, तुम्ही सार्थ आहात आणि ही इतकी उघड गोष्ट आहे की यावर विवाद कसा होईल? तुम्ही पैश्यामागे ओढले जाऊ नका, ती तुमच्या जगण्याची महत्त्वाची दिशा होऊ देऊ नका. आनंद ही दिशा करा कारण अस्तित्वाला पैसा काय आहे ते माहिती नाही, ते आनंदाच्या दिशेकडे उन्मुख आहे, स्वच्छंद हा त्याचा स्वभाव आहे. आणि स्वच्छंद म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही, ते फक्त प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण..

निश
Sat, 06/23/2012 - 13:37 नवीन
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण.. मुळात ज्याना हे सांसारीक पाश आहेत ती लोक उत्कट पणे स्वच्छंदपणे नाही जगु शकत. त्यातही एखाद्यावेळी पुरुष जगु शकतीलही, तसे ते जगत असतीलही पण घरातील स्त्रि असे आयुष्य नाही जगु शकणार. आपला समाज त्याना तस जगुच देणार नाही. पैसा कीती महत्वाचा असतो ते हॉस्पिटल मध्ये उपचाराविना पडुन असलेल्या लोकाना विचार त्याना विचारल तर ते सांगतिल पैसाच महत्वाचा कारण पैशाच मोल त्याना कळलेल असत. पैसा असेलच तर प्राण वाचणार असतो. श्वास टिकणार असतो. प्रत्येक युगाची एक गरज असते ह्या युगाची गरज पैसा हाच आहे. पैसा किती महत्वाचा ते पैशा अभावी लग्न मोडलेल्या मुलींच्या आईवडिलाना विचारा ते सांगतिल पैशाच मोल. तुम्ही रिक्षावाल्याच उदाहरण दिल आहेत वर एका प्रतिसादात तोच रिक्षावाला तुमच्याकडे पैशे आहेत म्हणुन तुम्हाला रिक्षात बसवतो आहे हे विसरु नका. वर पेठकर सर म्हणाले तसे ए़खाच्याची गरज ती कदाचीत दुसर्‍याची चैन असु शकेल.
  • Log in or register to post comments

आहो दादा, परत तेचते चाललय!

संजय क्षीरसागर
Sat, 06/23/2012 - 14:56 नवीन
आता आहे का कुणी धारातिर्थी? तुम्ही प्रसंग बघा, जवळचे पैसे बघा आणि घाला मेळ, बस इतकंच. नसतील पैसे तर पर्याय शोधा कारण तुम्ही कितीही जमवले तरी ऐनवेळी ते पुरेसे असतीलच असं नाही आणि आता आहेत ते सुद्धा उद्याच्या काळजीनं आपण मनसोक्त वापरतोय कुठे ? शिल्लक पैसा फक्त दिलासा आहे मग ते कुणाकडे कितीयेत यानं काय फरक पडतो? मी उधळा म्हणत नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका अर्थानं न वापरलेला पैसा व्यर्थ आहे. असो, अजून थोडं सांगायचं तर अस्तित्वाची मर्जी आपल्याकडे असलेल्या पैश्यापेक्षा कधीही जास्त पॉवरफुल आहे आणि प्रत्येक घटना समग्र अस्तित्वाच्या सर्व घटकांचा वर्तमानात घडलेला परिणाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

संजय क्षीरसागर साहेब , परत तेच नाही चाललय.

निश
Sat, 06/23/2012 - 15:14 नवीन
संजय क्षीरसागर साहेब , परत तेच नाही चाललय. तुम्हाला माझा मुद्दा कळलाच नाही आहे. तुमच मत हे सांगायला ऐकायला बर वाटत पण जेव्हा पोटाला भ्रांत पडते तेव्हा हे जगणच ओझ वाटु लागत. मुळात हे अस वागल पाहीजे ते तस वागल पाहीजे हे सांगण बरोबर आहे पण तस वागण महा कठीण आहे. कारण तस करण बर्‍याच वेळा दुसर्‍याला त्रासदायक असु शकत. देहाचे भोग हे सुटत नाहीत कधीच.एक करुन बघा ह्या पावसात एकदम भारि पावसात छत्री न घेता बाहेर पडा खिशात एक मोबाईल फोन व १०० रुपयाची नोट असु द्या. बघा काय होत ते पावसात भिजण्याचा आनंद लुटण्याऐवजी तुम्ही भिजणार्‍या १०० रुपयाच्या नोटेची व मोबाईल फोनची काळजी करत बसाल. करुनच हे बघा ह्या पावसात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पैश्यांच्या मागे लागत नाही

गोंधळी
Sat, 06/23/2012 - 15:49 नवीन
पैश्यांच्या मागे लागत नाही म्हणुनच मराठी माणुस श्रीमंतां मधे व उद्योगांमधे मागे आहे. असे वाटत नाही का? जास्त पैसा कमवणे हा गुन्हा आहे का? तुम्ही टिपीकल मराठी माणसा सारखे बोलत आहात. च्यामारी तो काल्चा धोनी आमच्या सचिनच्या पुढे गेला.खुप जळ्जळ झाली.
  • Log in or register to post comments

@ निश आणि गोंधळी

संजय क्षीरसागर
Sun, 06/24/2012 - 00:15 नवीन
निशसर, मी सेलफोन वापरत नाही आणि पाऊस आला तर कोणीही प्रथम नोटांची काळजी घेईल पण मुद्दा तो नाहीये. तुम्हाला आणि गोंधळींना उपयोगी होईल असा एक जोक सांगतो. एकदा एक हार्टपेशंट डॉक्टरकडे जाऊन येतो आणि अत्यंत खिन्न होऊन बायकोला सांगतो : `डॉक हॅज आस्क्ड मी टू जॉग अँड किप वेट अंडर कंट्रोल, ही गेव्ह युजूअल डाएट टिप्स अँड ऑल दॅट इज ओके, बट वन थींग इज वेरी डिसापॉइंटींग फॉर यू' `वॉट इज दॅट?' बायको विचारते `ही हॅज आस्क्ड मी टू रिड्यूस आवर सेक्स लाईफ टू हाफ' `वीच हाफ डिअर, ...थींकींग ऑर टॉकिंग?' असय ते! विषयाचं चिंतन आणि मनन कमालीच्या बाहेर आहे पण तीनशे पासष्ठ दिवसातला लिटरल डूइंग पार्ट काढला तर तो चोवीस तास भरेल की नाही शंकाय. जस्ट सी फॉर योरसेल्फ, शुचिच्या `तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते, ची द्विशतकाकडे वाटचाल चालूये! आणि तीच कथा पैश्याचीये, पैशामागे दुनिया इतकीये आणि पुढे लागणार्‍या पैशाच्या इतक्या बेफाम कल्पना आहेत की बोलता सोय नाही पण रोजच्याला लागणारा पैसा अत्यंत माफक आहे आणि आपण इंटरनेटवर आहोत याचा अर्थच त्याची सोय झालेली आहे. मी एका शब्दानं पैसे कमावू नका म्हटलं नाहीये, फक्त ती जीवनाची मुख्य दिशा होऊ देऊ नका आणि स्वतःला पैश्यावर तोलू नका इतकंच सांगतोय, त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. जस्ट गिव अप ऑल ऑफ दॅट थींकींग ऑर टॉकिंग पार्ट ऑफ मनी, दॅट इज ऑल!
  • Log in or register to post comments

कैच्या कै! माझ्या पाहण्यात

शिल्पा ब
Sun, 06/24/2012 - 00:29 नवीन
कैच्या कै! माझ्या पाहण्यात तरी २४/७ पैशाचा विचार करणारे लोकं अजुन आलेले नाहीत. ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय. लोकं आयुष्य छान व्यतित करतात. ज्यांना आवड आहे ते भटकतात, खातात, पितात, वाचतात, चांगल्या दर्जाचे सिनेमे पाहतात. इ. ज्यांना दोनवेळच्या खायची भ्रांत आहे ते पैशाचा विचार करणारंच! तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही वरचे प्रतिसाद न वाचता सल्ला दिलाय

संजय क्षीरसागर
Sun, 06/24/2012 - 00:48 नवीन
पुन्हा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझ्या मते ८०% मराठी माणसे

गोंधळी
Sun, 06/24/2012 - 14:39 नवीन
माझ्या मते ८०% मराठी माणसे तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणेच जगत आहेत.(चाकोरीबध्द जीवन) मग तुम्ही सांगत आहात त्यात नवीन काय आहे.? मी मराठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत बरोबर असल तरी .......

निश
Mon, 06/25/2012 - 18:49 नवीन
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत बरोबर असल तरी प्रत्यक्ष्य आचरणात आणण कठीण आहे. मी मागे म्ह्टल तस ज्याला प्रपंच आहे तो अस आनंदी ताणरहीत आयुष्य नाही जगु शकत. तुम्ही तस जगतही असाल पण प्रत्येकाला तस जगण नाही झेपणार ही वस्तुस्थिती आहे. कारण माणसाची गरज बदलत्या कालानुरुप बदलत गेली आहे. जेव्हा पैसा हा वापरात फार कमी होता तेव्हा माणसही त्याच्या मागे कमी लागत होती. (BARTER SYSTEM). आता जेव्हा माणसाची गरजा वाढल्या तस पैशाला महत्व आल. जे संत हल्ली च्या काळात जगायच कस , माया मोह सोडा अस सांगतात तेच हल्लीचे संत पैशाच्या मागे लागले आहेत हे ही त्रिवार सत्य आहे. लोकाना पैसा दुय्यम मानुन आनंदात जगायला सांगणारे हे हल्लीचे संत पैसा असला तरच भक्ताला बोध देतात हे खरच आहे. पैसा दुय्यम मानुन चालणारच नाही कारण आज ह्याच पैश्यावर दानी लो़कांकडून समाजाची चांगली सेवा घडते आहे. मी आ़जही म्हणतोय ह्या युगाची गरज ही पैसाच आहे. त्यामुळे मनुष्य पैसा दुय्यम मानुन निखळ जगायचा आनंद घेउच शकणार नाही. आणि पैश्याच्या मागे लागुनही निखळ आनंदाने जगता येतच की त्याच पैश्याने जेव्हा अडलेल्या माणसाला मदत करता येते व जेव्हा त्या अडलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर आनंद बघुन जगता येतच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजय! तुम्ही बरोबर आहात...

योगप्रभू
Sun, 06/24/2012 - 03:30 नवीन
संजय, तुम्ही छान आणि बरोबर लिहिलंय. मथितार्थाचा खोलवर विचार केला तर ते नक्कीच पटण्यासारखे आहे. जर तुम्ही स्पष्ट शब्दात सांगताय, की 'मी एका शब्दानं पैसे कमावू नका म्हटलं नाहीये, फक्त ती जीवनाची मुख्य दिशा होऊ देऊ नका आणि स्वतःला पैश्यावर तोलू नका इतकंच सांगतोय, त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही' आणि तरीही ते काहींना पटणारे नसेल तर समजावत बसू नका कारण हा थोडासा अनुभूतीचा भाग आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात हा टप्पा येतोच, असे नाही. कदाचित अनेकजण पैसा हे एकमेव ध्येय मानून जीवनभर त्याच्यामागे पळत राहातात. थोडेसे वेगळे उदाहरण - समजा हजारो भक्तगण कुण्या बाबा/बुवा/बापूंच्या मागे मुक्ती/मनःशांतीसाठी धावताहेत आणि त्यांना एखादा शहाणा माणूस सांगू लागला, की 'मित्रांनो! तुकाराम महाराज सांगून गेलेत, की 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण' एक मनाचा तळ विवेकाच्या आधारावर खोल खरवडलात तर तुम्हाला कुणा व्यक्तीकडून मुक्तीची अपेक्षाच उरणार नाही, तरीही भक्तगण त्या व्यक्तीलाच कवटाळून बसतात. तसेच काहीसे पैशाबाबत होते. पैसा खुदा नही, लेकिन खुदासे कम भी नही, हा गलका वाढत जातो. 'पैसा हे साध्य नसून साधन आहे', हे सत्य बाजूलाच पडते. तुम्ही अत्यंत सुंदर असे भारतीय तत्त्वज्ञान पुन्हा मांडत आहात. पैसा मिळवायला आपल्या संतांनी कधीच विरोध केलेला नाही. एकट्या शंकराचार्यांनी मात्र आपल्या चर्पटपंजरीमध्ये 'अर्थमनर्थ भावयनित्यं, नास्तितेषः सुखलेश सत्यम' या वचनात 'पैसा हा सर्व अनर्थाचे मूळ' असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. नामभक्तीत लीन झालेले आणि संसारही विसरलेले तुकाराम महाराज सर्वसामान्यांना एक महान अर्थशास्त्रीय सत्य सांगून गेले. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी' तेच समर्थ रामदासांबद्दल. स्वतः प्रपंचापासून पळून गेलेला हा माणूस संसारी लोकांना सांगतो 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' आणि 'आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थविवेका' असेच मूलगामी विवेचन अधिक येऊ देत.
  • Log in or register to post comments

चांगला विषय, मुळ लेख सुद्धा

५० फक्त
Sun, 06/24/2012 - 09:31 नवीन
चांगला विषय, मुळ लेख सुद्धा चांगला अन प्रतिसाद, प्रतिवाद देखील. पैसा महत्वाचाच, पण आपल्या लोकांपेक्षा जास्त नाही, हे एकच सत्य स्विकारुन सध्या जगतो आहे किंवा जगण्याचा प्रयत्न करतो आहे, जास्तीत जास्त कधीपर्यंत जगायचं ठरवलेलं आहेच त्यामुळं हा आटापिटा किंवा कधी कधी नाटक कधीपर्यंत चालु ठेवायचं आहे हे माहित आहे त्यामुळं काळजीचा एक बराच मोठा भाग कमी झालेला आहे. तरी देखील काळजी संपत नाही, संपलेली नाही पण ती पैशामुळं आहे किंवा पैशामुळं संपेल अशी नाही, आणि हे समजतं देखील आहे पण जसं परीक्षेला बसल्यावर पुस्तकातली काही वाक्यं दिसतात अन नंतरची दिसतच नाहीत होतं तसं होतं.
  • Log in or register to post comments

निळी अन्टीक्युटी =३००.०० वेज

अविनाशकुलकर्णी
Sun, 06/24/2012 - 12:27 नवीन
निळी अन्टीक्युटी =३००.०० वेज मचुरियन =७५.०० आठवड्यातुन वा पन्धरवाड्यातुन १ वेळा तरी हविच .. बाकि दुनिया गेली तेल लावत
  • Log in or register to post comments

शिल्पा>तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 00:31 नवीन
प्रथम शिल्पाचे आभार मानतो कारण, >माझ्या पाहण्यात तरी २४/७ पैशाचा विचार करणारे लोकं अजुन आलेले नाहीत. ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय. या वाक्यामुळे वस्तुस्थिती आणि लेखाचा उद्देश पुन्हा मांडायची संधी मिळालीये. ओशोंचं एक विधान क्वोट करतो पण त्यापूर्वी सांगतो की ज्याज्या वेळी मी ओशो क्वोट करिन त्यात्या वेळी फक्त त्या आणि त्याच विधानापुरती चर्चा व्हावी. मी त्यांच्या इतर विधानांशी सहमत असीन असं नाही आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनाला किंवा इतर काँट्रावर्सिजसाठी मला वेठीला धरु नये. ओशोंनी म्हटलय `यू आर युजींग योर लाइफ जस्ट टू टर्न टाईम इन्टू मनी' आपल्या दिवसाच्या चोवीस तासांपैकी अत्यंत प्राईम असा आठ तासांचा वेळ आपण पैसे मिळवण्यात घालवतो आणि उरलेले जागेपणीचे तास त्या आठतासांच भान ठेवून घालवतो. आयुष्याचा सगळ्यात उमेदीचा काळ अशा प्रकारे गेल्यावर एकूण मनसोक्त जगायला मिळालेले तास संपूर्ण आयुष्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य ठरतात. या दृष्टीनं मी म्हटलय की आपल्या आयुष्याची मुख्य दिशा स्वच्छंद नाही तर पैसा असते. शिल्पानं म्हटलय > `ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय', नाही ती वस्तुस्थिती आहे. पुढे तीनं म्हटलय >ज्यांना आवड आहे ते भटकतात, खातात, पितात, वाचतात, चांगल्या दर्जाचे सिनेमे पाहतात. इ. = स्वच्छंदचा अर्थ स्वतःच्या मर्जीनं जगणं, प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे. फावल्या वेळात भटकणं, कधी तरी मनसोक्त खाणं-पीणं, सिनेमा-नाटक बघणं, झोपण्यापूर्वी टीवी बघणं किंवा वाचन करणं आणि वर्षातून दोन वेळा रजा घेऊन सहली करणं नाही, ते तुमच्या `दिवसाचं काँपोझिशन' बदलणं आहे . तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा अ‍ॅटिट्यूड बदलणं आहे. स्वच्छंद हे साहस आहे (पुन्हा सांगतो मी देखील पैसे मिळवतो आणि प्रसंगाच तारतम्य बघूनच जगतो, तुम्हाला पैसे मिळवू नका असं सांगत नाहीये) पण आनंद ही जीवनाची मुख्य दिशा आहे. पैसा का आनंद हा सवाल ज्याज्या वेळी आलाय त्या वेळी आनंदाला पहिलं स्थान दिलय आणि तरीही कधीही नुकसानीतला सौदा झाला नाहीये ( आणि हे एक सीए म्हणतोय!) हे सांगायला हा लेख लिहिलाय
  • Log in or register to post comments

मला समजलंय ते असं (फक्त वरचा

शिल्पा ब
Mon, 06/25/2012 - 01:00 नवीन
मला समजलंय ते असं (फक्त वरचा प्रतिसाद गृहीत धरुन) : लोकं आनंदाने जगत नाही. कधीमधी स्वच्छंद जगतात. - दिवसाचं काँपोझिशन बदलणं. अहो, पण प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगळी असते. एखाद्याला जर हायकींग करण्यात आनंद असेल तर तो वेळात वेळ काढुन करणारच...नव्हे करतात. तसंच इतर बाबतीत सुद्धा. एखाद्या जवळ नसेल पैसा, पण ती व्यक्तीसुद्धा स्वतःला - कुटुंबाला आनंददायक काहीतरी करतंच असणार की. तुम्ही म्हणताय तसं आनंदाला मुख्य स्थान देउन जगणारे आहेतच...अन जे स्वत: पैसा पैसा करत जगतात त्यांना बाकी कशालाच वेळ मिळत नाही. बाकी उगाच डोकं भंजाळुन घ्यायचं नाही कारण माझं आनंदात चाललंय...म्हणुन रजा. तरी तुमचे प्रतिसाद वाचायला आवडतील. जर अगदी वाटलंच तर लिहेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वेळात वेळ काढुन नाही पहिल्यांदा! आणि प्रत्येक वेळी पहिल्यांदा!

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 01:09 नवीन
इतकीच आनंदाला मुख्य स्थान देण्याची व्याख्या आहे. >बाकी उगाच डोकं भंजाळुन घ्यायचं नाही कारण माझं आनंदात चाललंय...म्हणुन रजा. = धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चर्वितचरण...

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 01:15 नवीन
'ह्या विषयावर बरेच चर्वितचरण झाले आहे आणि आता हा धागा वाचनमात्र करावा' असे ज्यांना ज्यांना वाटते आहे त्यांनी त्यांनी हात वर करावा....
  • Log in or register to post comments

वीथ ड्यू रिस्पेक्ट सर,

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 01:27 नवीन
प्रतिसाद देऊन झाले असतील तर पोस्टवर न येणं हा सोपा पर्याय निवडावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

काय सांगता....

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 01:30 नवीन
काय सांगता................धन्यवाद. (वरील उपदेशाची सर्वानींच नोंद घ्यावी ही विनंती).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपण नोंद घेतलीत हे काय कमीये

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 01:35 नवीन
त्याबद्दल आपलेही धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नवी नोंद.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 09:21 नवीन
आपण नोंद घेतलीत हे काय कमीये वरील चर्चा प्रस्तावातून, प्रतिसादांमधून काय नोंदी घ्यायच्या त्या मी घेतल्याच आहेत. नेहमीच घेत असतो. मुद्दे संपल्यावर आपण वैयक्तीक शेरे बाजीवर उतरला आहात. ह्यावरूनही एक नवी नोंद घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>`हा धागा वाचनमात्र करावा'

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 11:10 नवीन
या आपल्या व्यक्तिगत प्रतिसादापासून सुरुवात आहे आणि नंतरचे सर्व प्रतिसाद हे त्या अनुषंगानं आलेले उपप्रतिसाद आहेत. मला वैयक्तिक शेरेबाजीत स्वारस्य नाही पण माझ्याकडे प्रत्येक प्रतिसादाचं उत्तर आहे आणि मी अत्यंत सामान्य माणूस आहे तथाकथित अध्यात्मिक संत वगैरे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कलीयुग.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 12:05 नवीन
'हा धागा वाचनमात्र करावा' असे मी संपादक मंडळास कळविलेले नाही. माझ्या प्रतिसादातील आपणास सोयिस्कर असा अर्धवट भाग आपण उद्घृत करीत आहात. माझा संपूर्ण प्रतिसाद, 'ह्या विषयावर बरेच चर्वितचरण झाले आहे आणि आता हा धागा वाचनमात्र करावा' असे ज्यांना ज्यांना वाटते आहे त्यांनी त्यांनी हात वर करावा....' असा आहे. त्यात मी, माझे जे मत बनले आहे (बरेच चर्वितचरण) तेच इतरांचेही बनले आहे का? ह्यावर त्यांची मते मागविली आहेत. त्यात व्यक्तिगत काय आहे? हे धाग्यासंबंधी आहे, हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. आणि तो धागाही 'उडवून टाकवा' असे मी मत प्रदर्शन केले नाही. उलट, तो 'वाचनमात्र' ठेऊन आपले अमुल्य मार्गदर्शन सर्व मिपाकारांच्या नजरेसमोर राहावे हा उदात्त विचारच मांडला आहे. त्यावर, 'प्रतिसाद देऊन झाले असतील तर पोस्टवर न येणं हा सोपा पर्याय निवडावा' हा अनाहूत सल्ला आपण व्यक्तीशः मला दिलेला आहे. तो सर्व सदस्यांसाठी नाही. कारण शीर्षकात 'विथ ड्यू रिस्पेक्ट सर' अशा दांभिक शब्दयोजनेतून तो एका व्यक्तिला, 'मला' दिलेला आहे. तरीही राग्/अवमान न मानता काय सांगता................धन्यवाद. (वरील उपदेशाची सर्वानींच नोंद घ्यावी ही विनंती). ह्या माझ्या उपप्रतिसादात आपला 'वैयक्तिक सल्ला' मी 'सार्वजनिक' केला आहे. तरीही पुन्हा 'आपण नोंद घेतलीत हे काय कमीये' असे म्हणत आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात. वारंवार वैयक्तिक पातळीवर उतरून पुन्हा वर 'मला वैयक्तिक शेरेबाजीत स्वारस्य नाही' असेही विधान करता. कलीयुग कलीयुग म्हणतात ते हेच असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 14:12 नवीन
आणि अजूनही तो आदर आहेच. जिथे चर्चा व्यर्थ आणि निरर्थक होते, सदस्यात व्यक्तीगत शेरेबाजी होऊन चांगल्या पोस्टची वाट लागण्याची शक्यता निर्माण होते तिथेच ती पोस्ट वाचनमात्र केली जाते हे मला सांगायला लागू नये. ही पोस्ट निस्सारित होणं अशक्य आहे तस्मात आपण तशी विनंती करुन उपयोग नाही पोस्टवर अजून अत्यंत विधायक प्रतिसाद येतायत आणि विचारणा होतेय यात तिचं महत्त्व अधोरेखित आहे माझ्या दृष्टीनं प्रत्येक युग सुवर्णयुग आहे आणि ते माझ्या चाहत्यांसाठीही व्हावं या प्रामाणिक इच्छेनं लिहितोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

>>माझ्या दृष्टीनं प्रत्येक

बॅटमॅन
Mon, 06/25/2012 - 14:29 नवीन
>>माझ्या दृष्टीनं प्रत्येक युग सुवर्णयुग आहे आणि ते माझ्या चाहत्यांसाठीही व्हावं या प्रामाणिक इच्छेनं लिहितोय. हे कोण लोक ब्वॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ज्यांना हे कलियुग आहे असं वाटत नाही ते सर्व!

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 14:38 नवीन
किंवा इतर जरी कलियुग आहे असं म्हणत असले तरी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो असा विश्वास असणारे सर्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्म्म..असो.

बॅटमॅन
Mon, 06/25/2012 - 14:42 नवीन
ह्म्म..असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

??

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 15:06 नवीन
वयाचा मान राखण्याचा प्रश्न येतोच कोठे? मुद्यांना धरून बोला म्हणजे झाले. आणि तसेही वयाचा मान राखताना आपल्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीस (तुम्ही म्हणता म्हणून) आपण लहान असताना (तुम्ही सुचविता आहात म्हणून) काय सुचविता आहात? मिपावर वावरायचा सोपा पर्याय? तुमचे शब्द आणि भावना ह्यात जमिन्-अस्मानाचा फरक आहे. जिथे चर्चा व्यर्थ आणि निरर्थक होते, सदस्यात व्यक्तीगत शेरेबाजी होऊन चांगल्या पोस्टची वाट लागण्याची शक्यता निर्माण होते तिथेच ती पोस्ट वाचनमात्र केली जाते हे मला सांगायला लागू नये. जिथे मुद्दे संपतात आणि शाब्दिक कोलांट्या उड्या सुरु होतात तिथेही धागा वाचनमात्र करावा अन्यथा इतर सदस्यांचा मुल्यवान वेळ वाया जातो. ही पोस्ट निस्सारित होणं अशक्य आहे तस्मात आपण तशी विनंती करुन उपयोग नाही माझे प्रतिसाद पुन्हा वाचा. मी अशी कोणालाही विनंती केलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही एक नक्की ठरवा

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 15:25 नवीन
>इतर सदस्यांचा मुल्यवान वेळ वाया जातो. = ज्याचा मूल्यवान वेळ वाया जात असेल तो पोस्टकडे दुर्लक्ष करतो आणि इतरांचा वेळ मी घेतोय असं अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्सना वाटेल तेव्हा ते सदस्यांचा सल्ला मागणार नाहीत. वयाचा मान राखावा असं माझं मत आहे कारण शब्दांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे आणि लेखनापुरतं बोलायच झालं तर मी माझ्या सर्व लेखनाची जवाबदारी घेऊन प्रतिसाद देतो आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तुम्ही वरती एका प्रतिसादात

वीणा३
Mon, 06/25/2012 - 04:11 नवीन
तुम्ही वरती एका प्रतिसादात म्हटलंय १. प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे. - थोडीशी असहमत. मला असं वाटत कि सोमवार ते शुक्रवार कामाला जायला लागतं म्हणून शनिवार रविवार मजेचे वाटतात. मी काही वैयक्तिक कारणामुळे नोकरी सोडली. सोडल्यावर खरोखर रोजच रविवार होता. १ महिना मजा आली, नंतर खूपच कंटाळा आला. मला वाटतं कि पैसा हे एक खूपच चांगलं ध्येय (motivation ) आहे, ज्याने तुमच्या आयुष्याला दिशा मिळते. तुम्हाला जर थ्री idiots movie सारखा संदेश द्यायचा असेल कि पैशाच्या मागे लागू नका आपल्या आवडीचं (स्वछंदी जगणं) काम करत राहा म्हंजे पैसे मिळतीलच तर ठीक आहे. पण कामच करू नका (शनिवार-रविवार) आणि पैशाचा विचार पण करू नका तर जरा विचित्र वाटतंय.
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्य आणि स्वच्छंद

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 12:24 नवीन
वीणा, प्रथम चर्चेला पूर्णतः नवीन परिमाण दिल्याबद्दल आभार. स्वातंत्र्य मिळवणं एक वेळ सोपय पण उपभोगणं दुष्पुर आहे. ज्यांच्याकडे पुरेशी सधनता आहे त्यांना स्वच्छंद नकोय असं नाही, त्यांच्याकडे जीव रमवण्याचे पर्यायच नाहीत. आपल्या स्वच्छंद जगण्याच्या बहुतेक कल्पना परावलंबी आहेत कारण स्वावलंबी होण्यातच आयुष्याचा इतका मोठा वेळ गेलाय की स्वतःला त्या दिशेनं डिवेलप करता आलेलं नाहीये. सहलीला गेलो तर आपल्याला पोहता येत नाही, टेबलटेनिस टेबल असतं पण आपल्याला खेळता येत नाही, कराओके विथ हायटेक साऊंड सिस्टम असते पण गाता येत नाही, तिथे सिंथेसायजर असला तर वाजवता येत नाही, देखणी योगा प्लेस असते, एकसोएक गॅजेटस असतात पण आपल्याला योगात रस नसतो, आपण ट्रेडमिलवर घामाघूम होऊ स्तोवर धावायला उत्सुक नसतो, आपण रुममधे येतो आणि टीवी लावतो किंवा मग घरनं आणलेलं पुस्तक वाचायला काढतो आणि मग पुन्हा हुरुप येण्यासाठी इकडेतिकडे फोन करायला लागतो. आपण कुठेही गेलो तरी तेच असतो त्यामुळे इथलेच कार्यक्रम तिथे राबवतो. तुम्ही महिन्यात कंटाळलात याला दोन कारणं आहेत, तुमच्याकडे स्वतःला रमवायला स्वावलंबी असं काही नसेल आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकांगी पर्याय निवडला, कामाचा पर्याय बाद केलात. मी दिवस रविवार करा म्हणतो म्हणजे सकाळी उठून कार्योन्मुख होऊ नका, सॉलिड उत्साह असेल आणि संधी असेल तर बॉसला रितसर फोन करुन, कुणाची खरंच गैरसोय होत नाही हे बघून, मनसोक्त औटींगला जा. प्रत्येक दिवस सप्राइज ठेवा, आयुष्याच रुटीन होऊ देऊ नका, एकच दिवस पुन्हापुन्हा जगू नका. एक साहस तुम्हाला देतो, स्वच्छंद जगण्यानं काम टाळण्याची सवय लागत नाही उलट त्या आनंदातून निर्माण झालेल्या उत्साहामुळे काम सहज वाटतं, मजेत होतं. आणि रात्र शनिवार करा म्हणजे भोगाल तेव्हा मनसोक्त भोगा, उद्याची चिंता करु नका कारण उद्या कधी येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि

गवि
Mon, 06/25/2012 - 12:11 नवीन
सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि पुन्हापुन्हा चारपाचवेळा मूळ धागा वाचून मला जे मनात येतंय ते लिहितो: संजय यांचा मुद्दा तात्विक आहे आणि त्यात निश्चित तथ्य आहे. पण मांडणीमुळे आणि वाचकांच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हजमुळे त्याला वेगळे फाटे फुटताहेत. नेमकं कुठे आम्ही वाचक गोंधळतोय ते शोधायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की "पैसा दुय्यम आणि तुम्ही (आपण स्वतः) प्रथम" हा साधा सोपा सरळ मुद्दा यात आहे आणि तो तितकाच आहे. मात्र, त्याची मांडणी करताना जे जनरलायझेशन झालंय ते कंपन्यांच्या मॅनेजमेंट प्रशिक्षणातल्यासारखं झालंय. म्हणजे काय तर एसी क्लासरुममधे बसून तत्व पटतंय पण आपल्या कार्यालयातला कोणताही सिनारिओ प्रत्यक्षात (प्रॅक्टिकल) त्यामधे बसवून बघता येत नाहीये. उत्तम थिअरी मांडणीमधे उदाहरणं घेता आली तर फार चांगलं असतं पण इथे तसं करता येत नाहीये. ही मर्यादा लेखनाची की वाचकाची हे मला सांगता येणार नाही पण लेखकाचा मूळ मुद्दा खरोखर उत्तम आहे म्हणून हे काथ्या कुटणं. मी संजय यांनी दिलेल्या त्या चार गोष्टी घेतो आणि त्या उदाहरणांमधे बसवण्याचा प्रयत्न करतो. मग कदाचित गोंधळ लक्षात येईल आणि संजय यांच्या मनात वाचकांची गोची शिरकाव करु शकेल.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
उदाहरण घेऊन तत्वाचा कसा उपयोग होईल ते पाहण्याचा प्रयत्न : समजा माझा आजच पगार झाला. मी संध्याकाळी नेहमीची खरेदी करायला मॉलमधे गेलो. मला पीएसथ्री गेमिंग सिस्टीम दिसली. मी पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो. ती २३००० ची आहे आणि नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं. आता साक्षात्कारपूर्व स्थितीत मी मन मारुन म्हणा किंवा आणि काही म्हणा.. तो पीएसथ्री घेतला नसता. इथेही पैसा आणि प्रसंग एकदम समोरासमोर आले होते. मी गरीब नव्हतो. त्याक्षणी माझ्या खात्यात २३००० हून जास्त रक्कम होती. पण मी "नाही" असा निर्णय घेतला. माझ्याकडचे पैसे कमी होतील आणि पुढे हवे तेव्हा ते शिल्लक नसतील अशा "पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती" या पद्धतीने मी ते खर्च केले नाहीत. बहुतांश सामान्य लोक हेच करत असतील. आता अशा स्थितीत साक्षात्कारानंतरच्या स्थितीत (साक्षात्कार हा शब्द अतिशयोक्त नाही) मनुष्याने कसं वागावं? पी एसथ्री घेऊन टाकावा ? आज या क्षणात आनंद मिळाला ना?कल को मारो गोली.? असं का आणि काही? केवळ स्पष्टता येण्यासाठी प्रश्नरूपात विचारतोय. विरोध म्हणून नव्हे.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहणं आणि आधार म्हणून पाहणं या काही विरुद्धार्थी गोष्टी नव्हेत. "उपयोगी वस्तू" ही कोणत्या क्षणी "गरजेत" रुपांतरित होईल हे सांगता येत नाही. उदा. अन्न या प्रकाराकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहिलं किंवा गरजेची वस्तू किंवा आधार म्हणून पाहिलं तरी त्यावर आपण अवलंबून नाही असं म्हणणं धाडसाचंच आहे. पैशावर अवलंबून न राहणे ही गोष्ट समाजात राहणार्‍या कोणाला शक्य आहे असं वाटत नाही. मग अशा वेळी ती संपण्याची नाहीशी होण्याची रास्त भीती किंवा कमी पडण्याची काळजी ही नाण्याची दुसरी बाजू आपोआपच बनणार. एकच बाजू असलेलं नाणं सामान्य माणूस वापरु शकत नाही. त्यामुळे तो इथेही गोंधळात पडतो.
तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
पैसा समोर असलेल्या कारणासाठी "योग्य प्रकारे वापरणं" यातल्या "योग्य प्रकारे" या निकषात फारच जनरलायझेशन आहे. योग्य काय ते ठरवताना अपरिहार्यपणे त्याचे "परिणाम" पहावे लागतात. परिणाम या शब्दातच "भविष्यकाळ" आहे. म्हणजे निव्वळ आजच्या दिवसाचा विचार करुन असेही आपण पैशाच्या "योग्य" विनिमयाचे निर्णय घेऊन शकत नाही. वस्तुनिष्ठ निर्णय म्हणजे काय? किंमत आणि परिणामांचा /पुढे मिळणार्‍या लाभाचा (रिटर्नचा) विचार करुन घेतलेला निर्णय? म्हणजे पुन्हा संपूर्ण सव्यापसव्यानंतर आपली जुनी भविष्यकालीन "चिंता"च पुढे आली की..!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
हा मुद्दा एक तत्व म्हणून पटण्यासारखाच आहे पण तो पटवून घेण्यात एक वाक्य उगीच कन्फ्युजन वाढवतं आहे.. "पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहो" असं शाब्दिक दृष्ट्या योग्य असलं तरी पैसा की एक "कल्पना"नाही. ते एक माध्यम जरुर आहे पण कल्पना नाही...कल्पना या शब्दात एक "अस्तित्वात नसलेली" असा अर्थ आहे. "कर्ज", "करार","नोकरी" याही संकल्पनाच आहेत पण त्या "वस्तुस्थिती" नाहीत असं म्हणता येत नाही. मी वस्तुस्थिती आहे तसाच पैसा ही देखील वस्तुस्थिती असलेली संकल्पना आहे. बाकी वाक्यांबाबतही अशा रितीने कसं (वाचकाचं) कन्फ्युजन होतंय ते दाखवता येईल. पण मला वाटतं चांगल्या मुद्द्याला फाटे फुटण्याचं मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केलाय.
  • Log in or register to post comments

येस गवि

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 14:33 नवीन
>मला पीएसथ्री गेमिंग सिस्टीम दिसली. मी पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो. ती २३००० ची आहे आणि नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं. पी एसथ्री घेऊन टाकावा ? कल को मारो गोली? असं का आणि काही? = मी वीणाला प्रतिसाद देताना म्हटलय की आपल्या स्वच्छंदाच्या कल्पना परावलंबी आहेत. मला गेमिंग सिस्टीम काय असते माहिती नाही पण `नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं' याचा अर्थ तुम्ही दुसर्‍यावर अवलंबून राहणार, तुमची स्वतःची ग्रोथ होणार नाही. गेमींग सॉफ्टवेअर बनवणं हे माझं स्वप्न असेल, अफलातून गेम्स बनविन अशी माझी आंतरिक इच्छा असेल आणि त्या अभ्यासासाठी जर ती सिस्टम घेणार असीन तर माझ्या अयुष्याची दिशाच बदलेल मग तेवीस हजार विषेश नाहीत, मी माझ्या जीवनाचा रंग बदलतोय. पण घेतानाच धसका वाटतो कारण तुमचा इंटरेस्ट पहिला गेम खेळताखेळताच संपू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, मग ती सिस्टम घेण्यात अर्थ नाही, खेळावस वाटेल तेव्हा गेमिंग फॅसिलिटी असेल तिथे जाऊन मनसोक्त खेळणं योग्य होईल. पोहायचय तर घरात स्विमींग पूल कशाला? > पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहणं आणि आधार म्हणून पाहणं या काही विरुद्धार्थी गोष्टी नव्हेत. "उपयोगी वस्तू" ही कोणत्या क्षणी "गरजेत" रुपांतरित होईल हे सांगता येत नाही. उदा. अन्न या प्रकाराकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहिलं किंवा गरजेची वस्तू किंवा आधार म्हणून पाहिलं तरी त्यावर आपण अवलंबून नाही असं म्हणणं धाडसाचंच आहे. = आधार आणि अवलंबून राहणं एकच आहे पण उपयुक्तता ही सर्वस्वी भिन्न गोष्ट आहे. अन्न काय आणि पैसा काय दोन्ही बाबतीत ते आगदी तंतोतंत सारखच आहे. आयुष्यभर जेवायला लागणार म्हणून मी आजच सगळं जेवत नाही भले उद्या जेवायला मिळेल की नाही हा माझा आजचा आणिनेहमीचा अत्यंत वॅलिड प्रश्न आहे. पैश्याचं आगदी तसंच आहे पण तो वारेमाप साठवता येतो, तिथे फिजिकल लिमीटेशन नाही म्हणून आपण तसा विचार करत नाही पण तसाच विचार करा इतकंच सांगतोय. >पैसा समोर असलेल्या कारणासाठी "योग्य प्रकारे वापरणं" यातल्या "योग्य प्रकारे" या निकषात फारच जनरलायझेशन आहे = हे प्रतिसादाच्या पहिल्या भागात आलय. >मी वस्तुस्थिती आहे तसाच पैसा ही देखील वस्तुस्थिती असलेली संकल्पना आहे. = तुम्ही प्रथम आहात आणि तुमचं असणं निव्वळ पैश्यावर अवलंबून नाही (श्वासावर ते अत्यंत मोठ्याप्रमाणावर अवलंबून आहे पण ते आपल्याला जाणवत नाही). पैसा ही तुमचं जगणं सोयीचं व्हावं म्हणून निर्माण केलेली कल्पना आहे पण तुम्ही स्वतः कल्पना नाही हा फरक कायमचा लक्षात ठेवला की पैश्याचं अवास्तव डायमेंशन योग्य प्रपोर्शन मधे येतं. तुझ्या अत्यंत विधायक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविज् बॅक, आय से..... छान

प्रास
Mon, 06/25/2012 - 12:41 नवीन
गविज् बॅक, आय से..... छान निरुपण प्रयत्न. अर्थात संजयजी यावर अधिक विस्तृतपणे लिहीतीलच. आज छान जेवलोय, संध्याकाळचं संध्याकाळचं संध्याकाळी......
  • Log in or register to post comments

गरज आणि हव्यास..

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 13:25 नवीन
श्री. गवि साहेब, 'गरज' आणि 'हव्यास' ह्यात फरक करता आला पाहिजे. आणि तो आवश्यक आहे असे मत मी माझ्या एका प्रतिसादात मांडले आहे. तसेच, प्रत्येकाची 'गरज' स्थल, काल, आर्थिकपरिस्थिती इत्यादी नुसार बदलते. थंड प्रदेशात एसीची गरज नसते पण आखातासारख्या उष्ण प्रदेशात ती 'गरज' असते. चैन नाही. कालानुरुप गरजा बदलतात. पूर्वी माणसे जंगलातून लाकडे तोडून आणून स्वयंपाक करायची, आज कुकींग गॅस ही 'गरज' बनली आहे. तर आर्थिक परिस्थितीनुसारही गरजा बदलतात. झोपडीत राहण्यार्‍याला अंग झाकण्यापुरते कपडे पुरतात तर ज्याची ऐपत आहे त्याला कपड्याच्या ४ जोड्या जास्त लागतात. पैशाचा 'हव्यास' नसावा, आवश्यकते इतका पैसा जरूर कमवावा/साठवावा. मग आयुष्यात तुम्ही पहिले आहात, पैसा दुय्यम आहे, आजचा क्षण खरा, 'उद्या' ही कल्पना आहे, अस्तित्व म्हणजे काय?, काल हा भूतकाळ आहे वगैरे वगैरे भरल्यापोटीचे शब्दच्छल आहेत. पैशा अभावी मुलींचे लग्न न होणं ही काय समस्या असते ते ज्यांच्या मुलींच वय वाढतं आहे त्यांना माहित असते, इस्पितळात मरणाच्या घटका मोजणारा स्वकिय असला की समजतं पैशाचं महत्त्व. के.ई.एम. मध्ये माझे वडिल अ‍ॅडमिट असताना त्याच वॉर्डातली एक १७-१८ वर्षाची मुलगी वारली. तिचे आई-वडील खेडेगावातून आले होते. इस्पितळातच राहायचे, तिथेच आंघोळ करायचे, दोन जोड्या धुवून धवून वापरायचे, पदरचे पैशे संपत आले तेंव्हा मुलीच्या उपचारासाठी (औषधांसाठी) पैसे पुरावेत म्हणून तो खेडूत आणि त्याची पत्नी चहात पाव बुडवून 'जेवत' होते, कधी कधी तर नुसता कोरडा पाव आणि वरून घटाघटा पाणी प्यायचे. स्वाभिमानी होते. कोणी दिले काही खायला तर विनम्रतेने नाकारायचे. त्यांची मुलगी गेली तेंव्हा तिचे प्रेत त्यांना गावी न्यायचे होते पण वाहन करायला पैसे नव्हते. मुंबईसारख्या अक्राळविक्राळ शहरात कोणी ओळखिचं नाही. अत्यंत दु:खी कष्टी अशा त्या जीवाने (बापाने) पोटच्या पोरीचे प्रेत गावी न्यायला हवे म्हणून सर्वासमोर आपला फाटका रुमाल पसरला. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं. मुलगी गेल्याचं दु:ख होतंच. चारलोकात गरीबी उघडी पडली हे दु:खही जोडीला होतं. सर्वांनी मदत केली. आल्या प्रसंगासाठी थोडाफार पैसा उभा राहिला पण त्या मानी माणसाला सर्व अनोळखी माणसांसमोर रुमाल पसरावा लागला. त्या रुमालावर पडणार्‍या प्रत्येक नाण्या/नोटे बरोबर त्या मातापित्यांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहात होते. लोकांच्या नजरेला नजर न देऊ शकणार्‍या त्या गरीबाचे जोडलेले, थरथरणारे हात आणि गदगदणारे कृश शरीर नजरेसमोरून हटत नाही. गविसाहेब, आजही त्या दृष्याच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या माणसाला काय सांगणार आपण? काल भूतकाळ होता, आजचा क्षण सत्य आहे आणि भविष्य ही नुसती कल्पना आहे? पैसा हे सर्वस्व नसलं तरी पैशाची ताकद नाकारून चालणारच नाही. पैशा मागे धावू नका, पैशापेक्षा आनंद, स्वच्छंद जीवन महत्त्वाचे आहे (स्वतःला) सांगण्या आधी पुरेशा पैशांची सोय करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तेवढी सोय होई पर्यंत त्या मागे धावावेच लागते. एकदा तेवढे जमले की स्वच्छंद आनंद लुटा नं! कोणी नाही म्हंटलय? कोणाला आवडणार नाही?
  • Log in or register to post comments

>`भरल्यापोटीचे शब्दच्छल' या शब्दाला आक्षेप नोंदवतो

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 14:29 नवीन
आणि ही व्यक्तिगत शेरेबाजी आहे हे निदर्शनास आणून देतो. इतर सर्व प्रतिसाद `वर्तमानात असलेली काल्पनिक भयभीतता दर्शवते' हे मानवी मनाच्या अत्यंत सखोल अभ्यासावरुन कोणत्याही प्रकारे व्यक्तीगत रोख न ठेवता नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हरकत नाही.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 14:43 नवीन
आयुष्यात तुम्ही पहिले आहात, पैसा दुय्यम आहे, आजचा क्षण खरा, 'उद्या' ही कल्पना आहे, अस्तित्व म्हणजे काय?, काल हा भूतकाळ आहे वगैरे वगैरे भरल्यापोटीचे शब्दच्छल आहेत. ह्या शब्दांना दुषणं दिली आहेत तुम्हाला नाही. आणि असेही तुम्हाला ते व्यक्तिगत वाटले असेल तर हरकत नाही सुरुवात तुम्हीच केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संकेतस्थळावर प्रत्येक जण भरल्या पोटीच येतो

संजय क्षीरसागर
Mon, 06/25/2012 - 15:38 नवीन
ही वस्तुस्थिती पुन्हा नम्रपणे नमूद करतो, शिवाय शब्दांना पोट नसते त्यामुळे भरल्यापोटी हा व्यक्तीनिर्देश आहे असे सुचवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

उदय
Fri, 03/17/2017 - 09:45 नवीन
पेठकरकाकांशी सहमत. व्यक्तिगत शेरेबाजी हा कांगावा बघून गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

समाप्त.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/25/2012 - 15:54 नवीन
माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून, श्री. संजय क्षीरसागर ह्यांच्या कोणत्याही प्रतिसादांचे वाचन आणि प्रत्युत्तर मी थांबविले आहे.
  • Log in or register to post comments

हा वाद दुर्दैवी...

योगप्रभू
Mon, 06/25/2012 - 17:57 नवीन
संजय क्षीरसागर व प्रभाकर पेठकर यांच्यातील हे वाक्युद्ध निश्चितच दुर्दैवी आहे. पेठकरजी! आपण एक अनुभवी व्यावसायिक आहात आणि उद्योजकीय अर्थव्यवस्थापन हे थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल मार्गाने करत आहात त्यामुळे खरे तर आपले माहितीपूर्ण प्रतिसाद येथे अपेक्षित होते. इथली चर्चा उत्सुकतेने वाचणारा एक मिपाकर इतक्याच नात्याने मी सांगू इच्छितो (आपल्या वयाचा आदर आहे, पण वस्तुस्थितीही डावलता येत नाही), की 'ज्यांना हा धागा वाचनमात्र व्हावा, असे वाटते त्यांनी हात वर करावा,' हे आपले वाक्य खरोखर अप्रस्तुत होते. या धाग्यावर श्री. क्लिंटन यांच्यासारख्या अभ्यासू सदस्यांचे प्रतिसाद वाचायला मिळावेत, यासाठी मी टपून बसलोय :) (क्लिंटन यांच्या उल्लेखाचे कारण ते रिस्क मॅनेजमेंट विषयातील व्यावसायिक आहेत आणि 'पैसा व जोखीम' यातील नातेसंबंध उलगडतील.) संजय! तुम्ही वैयक्तिक प्रत्युत्तरांमध्ये गुंतण्यापेक्षा तसेच 'माझ्या चाहत्यांसाठी' असे हास्यास्पद शब्दप्रयोग करण्यापेक्षा मुद्याला धरुन राहावेत, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

अर्धवटराव
Mon, 06/25/2012 - 22:16 नवीन
आपली शिष्टाई सफल होवो :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा