Skip to main content

मृत्यु

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 04/06/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु. जीवनातील एक सत्य. कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय? पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो? कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते. मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21075
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

कैलासवासी , वैकुंठवासी, बुद्धवासी, पैगंबरवासी, ख्रिस्तवासी, वाहे गुरु वासी.... आणखी काही असतं का? नाना यायचं का? स्वगतः च्यायचं ह्या नान्याच्या! स्वतः उभा राहून मजा बघत बसला असेल. म्हणजे खरंच 'बसला ' असेल!

अनिवासी ... (किंवा वनवासी सुद्धा!)! आता लेखकाचं काय म्हणणंय ते वाचायला आवडेल

मृत्यु हा परमोच्च उत्सर्ग असू शकेल, नाहीतर भ्रमिष्ट झाल्यावर किंवा अंथरूण धरलेल्या आणि बेड सोअर्स वगैरे झालेल्या अवस्थेत खंगत खंगत झालेला अटळ शेवट. या गोष्टी कुणाच्या हातात नसतात, त्यामुळे मृत्युबद्दल कल्पनाविलास करणे मला तरी निरर्थक वाटते. धन्यवाद.

नान्या आणि डी. के. शेट ह्यांच्या वयात किती अंतर आहे ते कुणास ठाउक आहे का?

In reply to by विनायक प्रभू

बोस डी. के. ?

नान्या दोस्त असल्यामुळे त्याला भाग म्हणता येत नाही. नाइलाज आहे.

मेलो... ;-)

चर्चा सत्र आवडले...! श्री. सन्जय क्षीरसागर यांची प्रतिक्रिया एकदम आवडली. मृत्युची भिती हे अज्ञान आहे.. या अज्ञानामुळे मृत्युची भिती वाटते . आणि आपली सुखे भोगण्याची संधी संपली म्हणून भिती वाटते . जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करणे म्हणजे मृत्यु हे तर सार्यांना माहितच आहे , आणि खरे तर तेच सत्य आहे .. ते तितकेच सहज आहे . श्री. सन्जय क्षीरसागर यांनी म्हटल्याप्रमाणे .. आपली प्रमाणाबाहेरिल गुंतवणूक आपल्या दु:खाला आणि तदानुषंगिक भितीला कारणीभूत आहे ! There is joy in giving up ! आपण आगगाडीने प्रवास करतो .. सोबतच्या प्रवाश्यांच्या बरोबर आपला स्नेह निर्माण होतो .. खाद्यपदार्थांची देवाण -घेवाण होते.. गाडी घाटांतून जाताना आपण तो आनंद एकत्र लुटतो... अचानक क्रोसिंग साठी गाडी थांबली एकत्रच वैतागतो .. पण म्हणून त्याच्या स्थानक आल्यावर आपण दु:खी होतो का ?आपले ही स्थानक येणार आहेच की ! समर्थांनी म्हटले आहे .............. तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती | स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||दासबोध ३-१० -५१|| कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं | तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||दासबोध ३-१० -५२|| भिती वाटते .. ती या सहयोग्यांचा वियोग होईल .. साहचर्य संपेल ... म्हणून ! किती व्यर्थ आहे ते ? खरे तर मृत्यु "येत" वगैरे नाही.. तो आपल्या बरोबर आपल्या जन्मापासून च असतो ... आपण गाडीत चढल्यापासून आपण उतरेपर्यंत आपले तिकिट आपल्या बरोबर असते ना ? तसेच ! तेव्हा आपले स्थानक आले की .. सहप्रवाशांना हसून निरोप द्यावा.. उतर्वून घेण्यासाठी आलेल्या मंडळींच्या आनंदात सहभागी व्हावे ! आपल्या रिकाम्या जागेवर पुढचा प्रवाशी येणारच आहे ! तो कदाचित नवा चढेल किंवा जुनाच प्रवासी येऊन बसेल .. फार तर काही काळ रिकामी राहील ! गाडी सर्व प्रवाशांना गन्तंव्य स्थळी सोडणार च आहे ! आपण चिंता का करायची? भितीचे आणखी एक कारण म्हणजे आपण केलली दुष्क्रुत्ये /पापे ! अचानक त्याची आठवण होते .. खरे तर ती सतत बरोबर असतेच ! आपण नेमके कसे वागलो याची प्रत्येकाला जाणीव असते .. आपल्या मनात आपला लेखा- जोखा तयारच असतो .. त्यात पापचे पारडे जड असेल तर .... भिती वाटणे स्वाभाविक आहे ! कारण वाईटाचा परिणाम वाईट हे आपल्याला पक्के माहित असते ! परमेश्वर दयाळू नाही .. न्यायी आहे याची ती भिती असते ! ( अर्थात हे सर्वांच्याच बाबतीत खरे असेल असे नाही ! There are always exceptions ! ) आणि म्हणून ..बाबांनो .. पापायं पर पीडनं ...कोणाला दुखवू नका .. त्रास देऊ नका .. " बरवेपण " राखा ! म्हणजे गाडीतून उतरताना भिती अथवा दु:ख वाटणार नाही ! आणि उतरण्यासाठी कायम तयार रहा ! आपले गाठिडे बांधून तयार रहा ! उतरा म्हंटले की दोन पावले पुढे असायला हवे .. अजिबात मागे न रेंगाळता .! आपणास आहे मरण| म्हणौन राखावें बरेंपण | कठिण आहे लक्षण| विवेकाचें ||दासबोध १२. २. २६|| - विटेकर

In reply to by विटेकर

पण तुम्हाला जे सांगायचय तो माझ्या प्रतिसादाचा अर्थ नाही. मी वस्तुस्थिती सांगतोय दिलासा देत नाहीये. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे आपण मरत नाही आणि हे सर्वांच्या बाबतीत सारखंय त्याचा वर्तणुकीशी संबंध नाही. थोडक्यात आपण गाडीत बसतच नाही (शरीर गाडीत बसतं किंवा शरीर हीच गाडी आहे) त्यामुळे उतरायचा वगैरे प्रश्नच येत नाही. पाप, पुण्य, देव या मानवनिर्मित कल्पनांना माझ्या लेखी थारा नाही, याचा अर्थ मी बेबंद वागतो असा नाही तर समयोचित वागतो आणि त्यामुळे मला कधीही मागे पहावं लागत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

गोखलेंची एक चारोळी आठवली.... मरण दाराशी आल्यावर म्हणलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.. मरण देखील चाट पडलं.. म्हणालं, काय मनुष्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

श्री. संजयजी, तुमचा प्रतिसाद आवडला इतकच आणि ए व ढच माझं म्हण्ण आहे .. विशेषत: तो सोडून देण्याबद्दलचा मुद्दा ! बाकीचे माझे मुद्दे हे माझेच आहेत , त्यात तुमचे म्हणणे पुन्हा उकलून सांगण्याचे प्रयोजन अजिबात नाही. अस्तु . >>>> आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे आपण मरत नाही आणि हे सर्वांच्या बाबतीत सारखंय त्याचा वर्तणुकीशी संबंध नाही. >>>>> आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे तर खरच आणि "आपण " मरत नाही हे ही खरे ! पण त्याचा वर्तणुकीशी जरुर संबंध आहे .. तसे असेल तर आपण कर्म विपाकाचा सिद्धांत ( आणि न्यूटनचा २ रा नियम ) नाकारता आहात असे होईल. आपल्याला मिळणारा जन्म अथवा पुनर्जन्म .. जन्माच्या दरम्यान असणार्या जरा .. व्याधी .. भोग .. सुख .. दु:ख हे सारे आपल्याच वर्तणुकीशी स्म्बंधीत आहे ! . >>>>>थोडक्यात आपण गाडीत बसतच नाही (शरीर गाडीत बसतं किंवा शरीर हीच गाडी आहे) त्यामुळे उतरायचा वगैरे प्रश्नच येत नाही. पाप, पुण्य, देव या मानवनिर्मित कल्पनांना माझ्या लेखी थारा >>>>>>>> आपण गाडीत बसत नाही? जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी .. म्हणजे शरीर सोडल्यावर ज्या शिल्लक वासना आत्म्याला चिकटून आत्म्याबरोबर येतात त्यामुळे जन्म घ्यावा लागतो.. आणि जोपर्यंत वासना क्षय होत नाही तोपर्यन्त पुनरपि जननं ..पुनरपि मरणं .. ! तेव्हा शरिराचा ( मग योनी कोणतिही असो .. ) जन्म वासनेमुळे आणि वासना ह्या आत्म्याच्या बरोबर आत्म्याला चिकटून असतात( जरी त्या आत्म्याला मलीन करीत नसल्या तरिही.. जसे की स्वच्छ शरिरावर घाणेरडे कपडे ) . फक्त "विदेही " अवस्थेत च ( जी केवळ अत्त्युच्च साधनेमुळे योग्यांनाच केवळ साध्य होते ) आत्मा हा जिवंत शरिराबाहेर असतो. पाप , पुण्य या सम्कल्पना तर सोडा शरिर च मानवनिर्मित आहे ! ते नाकारले तर या सार्या संकल्पना नाकरता येतील , जोपर्यंत शरिर आहे तो पर्यंत शरिर धर्म आहे आणि तोपर्ञंत समाजाने धारण केलेले नियमही लागू आहेत .. वेदांत सांगितले म्हणून (विद्याविनय्स्म्पन्ने , ब्राह्मणे गवि हस्तिनी| शुनि चैव श्वपाकेच , पंण्डिता: समदर्शिन:|| गीता ५-१८ ||) आपण श्वानाला कवटाळायला जात नाही ! संतानी सांगितल्या प्रमाणे .. निर्गुणाकडे जाण्याचा सोपा मार्ग सगुणाकडूनच आहे .. म्हणून तर ऋग्वेदकालीन हिरण्यगर्भ ब्राह्मण कालात आणि पुराणात कधी विष्णु , शिव तर कधी शक्ती स्वरुपात प्रगट झाले. माझी भूमिका स्पष्ट आहे ..भारतीय पूर्वसुरिंनी या सार्याचा सुसुत्र आणि सुसंगत विचार केला आहे आणि त्याप्रमाणेच ( धर्म -अर्थ- काम - मोक्ष ) वागण्यात शहाणपणा आहे ! उगाच फ्याशन म्हणून मी त्यातील काहीही नाकारत नाही.

In reply to by विटेकर

ज्याचा जन्मच होत नाही त्याला मरण कसलं? तस्मात माझा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे : आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!! याच्याशी मी असहमत आहे

In reply to by संजय क्षीरसागर

आत्म्याला जरी जन्म आणि मरण नसले तरी मिपावर ज्ञानोत्सर्ग करणार्‍याला आहे. त्यामुळे आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!! हे बरोबर वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

याचा अर्थ मी बेबंद वागतो असा नाही तर समयोचित वागतो आणि त्यामुळे मला कधीही मागे पहावं लागत नाही.
बेबंद का वागत नाही? समयोचित वागता म्हणजे नक्की कसे वागता?

In reply to by स्वानन्द

समयोचित वागता म्हणजे नक्की कसे वागता? या सगळ्या एकातेक गोष्टी आहेत म्हणजे आपण निराकार आहोत हा अनुभव झाल्यापासनं जीवनात एक "मोकळीक आणि तोल" दोन्ही एकदम आलेत. मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता येतं आणि तोल नेहमी स्वत:शी कनेक्टेड ठेवतो, जरा कुठे बोलण्यात, वागण्यात, प्रसंगात, खाण्या-पिण्यात, व्यक्तीगत संबंधात किंवा कृत्यात काही वावगं व्ह्यायला लागलं की लगेच तो फिल येतो आणि लगोलग करेक्शन होऊन पुन्हा स्वत:शी संलग्नता साधते आणि तोल सावरला जातो.

In reply to by संजय क्षीरसागर

मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता येतं
म्हणजे नेमकं कसं? मनात येईल ते काहीही? नैतीक असो वा अनैतीक, काहीही? की त्यावर काही फिल्टर असतो? असलाच तर त्याचा निकष कोणता व का? विचारण्याचे कारण: आपण निराकार आहोत, आणि आपण अबाधित आहोत हा तुमचा बोध. मग एखादं कृत्य हे वावगं का ठरावं? कुठल्या निकषावर हे ठरवता? परीणामांची चिंता का?

In reply to by स्वानन्द

सर्व प्रकटीकरण द्वैतात आहे म्हणजे आकार आणि निराकार मिळून अस्तित्व आहे. आपण विदेह आहोत हा अनुभव असला तरी `देह आहे' ही जाणीव देखील आहे त्यामुळे स्वरुपानं अबाधित असलो तरी देहावर परिणाम होणार याची दखल आहे आणि मन हा देहाचाच एकसंध भाग असल्यानं प्रत्येक घटनेचा मनावर परिणाम होणार याचीही कल्पना आहे. आता या परिस्थितीत निती-अनिती सारखे बाह्यनिकष व्यर्थ आहेत तरीही शरीराला अपाय होईल किंवा निष्कारण क्लेश होईल अशा प्रसंगाची लगेच जाणीव होते आणि त्यातून प्रत्येक वेळी उत्स्फूर्त निर्णय घेतले जातात त्यामुळे मागे पहावं लागत नाही आणि असं क्षणोक्षणी जगण्याची मजा येते.

In reply to by संजय क्षीरसागर

एकदा आपण 'विदेह' आहोत हा 'बोध' झाल्या नंतर 'शरीराला अपाय होईल' ही चिंता कशाला? आणि क्लेश असोत वा आनंद, कुठलीही गोष्ट 'निष्कारण' कशी? नीती-अनीती हे 'निकष' कशावरुन, आणि 'बाह्य' कसे काय? नीती-अनिती 'बाहेर' असेल तर 'आत' मध्ये फक्त निर्लज्जपणा/ कोरडेपणा असतो का?

In reply to by कवितानागेश

मला गवसलेलं अध्यात्म लौकिकाच्या (किंवा संसाराच्या) विरोधात नाही. जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंत निराकार आणि आकार दोन्ही सार्थ आहेत. >एकदा आपण 'विदेह' आहोत हा 'बोध' झाल्या नंतर 'शरीराला अपाय होईल' ही चिंता कशाला? = सत्य गवसलेल्याचा देह आणि तो बोध नसलेल्याचा देह यात फरक नसतो. फ्रॅक्चर झालं तर `मी मूळात विदेह आहे' हा बोध वेदना संपवत नाही, तो फक्त ` वेदना देहाला आहे आणि मला समजतय' इतपत अंतर निर्माण करतो. वेदनेच निराकरण वैद्यकीय इलाजानंच करावं लागतं अशा परिस्थितीत निष्कारण वेदना कोण ओढवून घेईल? >आणि क्लेश असोत वा आनंद, कुठलीही गोष्ट 'निष्कारण' कशी? = क्लेशाचं उत्तर वरच्या सारखंच आहे, निष्कारण वाद घालण्यापेक्षा समन्वय विधायक नाही का? >नीती-अनीती हे 'निकष' कशावरुन, आणि 'बाह्य' कसे काय? = नीती-अनीती हे 'निकष' मॉरल पोलिसिंग वरुन आलेत म्हणजे `हत्या अनैतिक' म्हटलं की पोलिसांचं काम कमी होतं आणि 'बाह्य' अशासाठी की `हत्येची व्याख्या' संदिग्ध आहे, युद्ध ही सर्वात निघृण आणि जाणूनबुजून केलेली हत्या आहे आणि तरीही आपल्याला ती मंजूर आहे. >नीती-अनिती 'बाहेर' असेल तर 'आत' मध्ये फक्त निर्लज्जपणा/ कोरडेपणा असतो का? = नाही, कमालीची संवेदनक्षमता असते आणि सर्व निर्णय अनाहूतपणे सार्‍या संबधीतांच हित ध्यानात ठेवून घेतले जातात.

In reply to by संजय क्षीरसागर

थोडक्यात गडबडगुंडा करुन लिहिलं / बोललं की लोकं आपल्याला "लय हुशार मानुस" समजतात (असा. सगळ्यांचा गैरसमज का आ हे हेच्च कळत नाही..)

आम्हाला वाटलं मागच्यावेळेप्रमाणे नाना पुन्हा जालीय आत्महत्येचा विचार करताहेत म्हणून. ;-)

....मरण दाराशी आल्यावर म्हणलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.. माझे एक अतिशय प्रिय, आनंदी वृत्तीचे, अभ्यासू नातेवाइक, सुमारे ऐंशी वर्षांचे आयुष्य अतिशय समरसून, रसिकतेने जगलेले, अनेक देशी -विदेशी भाषांचे तज्ञ, अनेकांना त्यांच्या आयुष्यात मोलाची मदत करणारे ...शेवटी वृद्धाश्रमात वर्षानुवर्षे मृत्यूची एकेक दिवस वाट बघत जगत असताना बघून काय वाटले, ते शब्दात मांडणे अशक्य आहे. दररोज किमान दोन तास पायी चालण्याचा छंद ज्यांनी ऐंशीव्या वर्षापर्यन्त जोपासला, त्यांना शेवटी पलंगावरून उठून उभे रहाणे अशक्य होते. शरीरधर्माचे भान नाहिसे झाले होते. माणसे ओळखत पण बोलता येत नव्हते... भिती वा काळजी वाटते, ती मृत्युची नव्हे, तर असले काही होण्याची.

In reply to by चित्रगुप्त

आहो! आपण विदेह आहोत आणि मी तुम्हाला उगीच दिलासा देत नाही की एकाही संताचं वचन उधृत करत नाहीये. स्वत: वेरिफाय करुन आहे ती वस्तुस्थिती सांगतोय. माझा त्यात काही स्वार्थ नाही, हे शेअरिंग आहे. तुम्ही इतरांचे दारुण दाखले दिल्यानं (ते वास्तविक असले तरी) तुमची (आणि इतरांची देखील) मानसिकता विषण्ण होईल आणि मूळ मुद्दा हुकेल. जे गेले ते कसे गेले हा प्रश्न नाही तुम्ही मृत्यूकडे कसं पहावं ते सांगायचा प्रयत्न करतोय

ज्यावेळी या भूतलावर पहिला जीव जन्माला आला तेव्हाच मृत्युचाही उगम झाला. मृत्युच नसता तर आज जगात १००० चा एफएसआय सुध्दा पुरला नसता आणि म्हणुनच जन्माबरोबरच मृत्युची सांगता असावी. अर्थात या विषयावर विचार करावयास लागले कि मती कुंठीत होऊन जाते हेही सत्यच आहे. विषयाला फक्त फाटेच फुटत जातात. पुर्वी मृत्यु स्वस्त होता तेव्हा अनेकाना क्रिकेट टिम एवढी मुले होऊनही भारताची लोकसंख्या ३३ कोटीपेक्षा जास्त झाली नव्हती (संदर्भ १९२० ची जनगणना) कारण युध्दे, पटकी, देवी सारख्या साथी, प्रगत वैद्यकीय उपचारांचा अभाव इ. आज मृत्यु महागच झाला आहे, भारताचे सरासरी आयुर्मान ७५ पेक्षा जास्त झाले आहे. हल्लीच वाचनात आले की लवकरच माणुस १५० वर्षांपेक्षा जास्त जगू शकेल असे वैद्यकशास्त्र मानू लागले आहे. खरच असे झाले तर ३००० साली भारताची लोकसंख्या दहा हजार कोटीची सीमाही ओलांडून जाईल. (सद्या साधारणपणे दर ६० वर्षानी लोकसंख्या दुप्पट होत आहे - हा वेगही वाढेलच). एवढ्या लोकांना अन्न पाणी सोडा हवा तरी पुरेल काय? जाने दो यार. शेवटी आप मरे सारे जग मरे. आहे ते जीवन मौज मस्तीत जगुया. संध्याकाळ झालीच आहे, त्यात आज बुधवार म्हणजे हक्काचा वार. चलो ऐश करते है.

हल्लीच ड्रॉप डेड डीव्हा नावाची मालिका बघाला घेतलीये. त्यात मुख्य पात्र मरतं अन स्वर्गात एस्कलेटरने जातं (म्हणजे आत्मा जातो) अन तिथे तिला कस्टमर केअर मधे तिचा पाप पुण्य हिशेब द्यायच्या ठीकाणी (जो कम्प्युटरवर असतो) जो माणुस (पुढे तिचा गार्डीयन एंजल) असतो त्याच्याशी थोडा वाद होउन ति त्याच्या परवानगीशिवाय रीटर्न बटन दाबुन परत पृथ्वीवर येते अन दुसर्‍याच एका मेलेल्या बॉडीत शिरते. एक मात्र खरं - वेळेप्रमाणे स्वर्ग - नरकही बदलत असणार. नाहीतर कायम अश्मयुगीत स्वर्ग वगैरे असल्यावर कीती कन्फ्युजन होईल नै का?