Skip to main content

ईस्टन ए़क्सप्रेस हायवे

लेखक निश
Published on सोमवार, 28/05/2012
स्थळ मुलुंड चेकनाका , रात्रीचे १२ वाजत आले होते. राजु रिक्षा वाला चेंबुरला जाणार कोणी गिर्‍हाइक मिळत का ? ते बघत होता. पावसाळी रात्र त्यात आमावस्या त्यामुळे शेवटचे भाडे मिळाले कि तो ते भाडे चेंबुरला सोडुन परत गोवंडीला घरी जाणार होता. बराच वेळ कोणीच येईना म्हणुन तो एका टपरी वर पान खायला गेला. पान घेउन पानवाल्याकडुन उरलेले पैसे न घेताच परत तो आपल्या रिक्षात यायला निघाला. पाउस थोडा चालु होताच. तेवढ्यात त्याला मागुन कोणी तरी आवाज दिला. त्याने मागे वळुन पाहीले तर एक सुटात असलेला मनुष्य त्याला पैसे पानवाल्याकडे राहीले आहेत ते सांगत होता. राजुच्या लक्षात ती गोष्ट येताच तो तडक पानवाल्याकडे जाउन ते उरलेले पैसे त्याने घेतले तेही पानवाल्याच्या सात पिढ्यांचा उध्दार करुन. तो परत रिक्षा कडे आला. रिक्षात बघतो तर तो मगाचा सुटवाला आधीच रिक्षात बसला होता. त्याला बघताच राजुने त्याचे आधी आभार मानले. त्याला राजुने विचारले," साब किधर जाना है ?" त्यावर तो मनुष्य हसुन म्हणाला "चेंबुर". राजुला एकदम हायस वाटल. चला घरी जायला मोकळे ह्याला चेंबुरला सोडलकी, असा मनातल्या मनात विचार करुन त्यान आलेल्या गिर्‍हाइकाला जरा न्याहाळला. मनुष्य चांगला उंच असावा कारण तो रिक्षातही तिरपा बसला होता. पाय आखडुन तेही. सुट एकदम भारीतला होता. गडी सहा फुटाच्या वर उंच असावा असा अंदाज राजुने बांधला. त्या माणसाच्या दाही बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या एकदम लख लख करणार्‍या. म्हणजे गिर्‍हाइक मालदार आहे असा अंदाज राजुने लावला व आता ह्याच्या कडुन मस्त पैसे उकळुया म्हणुन मनात मांडे खाऊ लागला. जसी राजुची नजर त्याच्या चेहर्‍यावर गेली तसा राजु मनातल्या मनात घाबरला. त्या माणसाचा चेहरा एकदम उग्र व घाबरवणारा होता. त्याच्या चेहर्‍यावर अतिशय जाड मिश्यापण होत्या. राजु निरिक्षण करतो आहे म्हटल्यावर तो माणुस राजुला त्रासिक स्वरात म्हणाला ," ओ राव नेताय की दुसरी रिक्षा बघु." राजु लगेच भानावर आला व त्याने रिक्षा सुरु केली व तो ईस्टन ए़क्सप्रेस हायवेला लागला. तेवढ्यात तो मनुष्य त्याला म्हणाला , " मला लवकर जायच आहे चेंबुरला, जर लवकर म्हंणजे दहा ते पंधरा मिनिटात नेलस तर मी तुला पाचशे रुपये देईन पण दहा ते पंधरा मिनिटात नेलस तरच." राजु त्याची ही ऑफर ऐ़कुन , गिर्‍हाइकाला दारु जास्तच झाली असावी असा विचार करु लागला. पावसाचाही जोर वाढला होता.रस्ता थोडासाच दिसत होता.अश्यात जोरात रिक्षा नेण म्हणजे जीवाशी खेळ होता. रा़जुला माहीत होत की, मुलुंड चेकनाका ते चेंबुरला जायला साधारण ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागायचा. व भाडही साधारण १५० रुपये व्हायचे. हे गिर्‍हाईक तर एकदम ५०० रुपये देत होत. आता मात्र राजुला त्या पैशाची हाव सुटली. तो त्या माणसाला हो म्हणाला व त्याच्या रिक्षाने वेग पकडला. एकदम वेग. त्याने त्या माणसाला विचारले, साहेब एव्हढी काय घाई आहे तुम्हाला? त्यावर तो माणुस अजुनच त्रासिक स्वरात म्हणाला मला माझ काम लवकरात लवकर आटपुन परत माझ्या घरी जायच आहे. तु रिक्षा चालव जास्त माझ डोक खाऊ नकोस. त्याचा तो चिडका आवाज ऐकुन आता राजुचाही रागाचा पारा चढला. त्याने आता भांडुप पार केल होत. तेवढ्यात त्याला रस्याच्या कडेला एक पार चेंदामेंदा झालेली जळकी टाटा सुमो दिसली बहुतेक काही वेळाच्या आधी अपघात झालेला असावा व तोही अतिशय भीषण. राजु ते बघुन आता मात्र अजुनच घाबरला व तो त्याच विचारात आता विक्रोळी पार करुन गेला होता. तेवढ्यात त्याला मागच्या माणसाचा आवाज आला. इथे असे अपघात नेहमीच आमावस्येला घडतात. जवळच स्मश्यान आहे ना. यमाचे दुत आपले सावज हेरत इथेच घिरट्या घालत असतात. तुम्ही लक्ष देऊ नका. ते दुत आमावस्येला त्यांच काम अतिशय चोख करतात व परत जातात. ते ऐकुन आता मात्र राजु एकदमच घाबरला व त्याचा रागाचाही पारा आता मात्र ज्याम भडकला. त्या रागात तो रिक्षा अजुनच वेगात पळवु लागला. वेग, वेग निव्व्ळ वेग. त्या भरात तो मुख्य रस्यावरुन रस्त्याच्या डावी कडुन रिक्षा पळवु लागला. त्याला ते स्मश्यान लवकरात लवकर मागे टाकायच होत. त्यात पाऊसही जोरदार पडत होता व रस्तावरही एकही वाहन दिसत नव्हत. आता तो त्या मागच्या गिर्‍हाईकाने सांगितलेल्या स्मश्यानाजवळ रिक्षा आली. स्मश्यान दिसत का बघाव? म्हणुन त्याने त्याची नजर डाव्या बाजुला वळवली आणी त्याची रिक्षा समोरच पंक्चर होऊन रस्यात उभ्या असलेल्या रिक्षावर जोरात जाउन आदळली. अपघाताचा फार मोठा आवाज झाला. व परत एकदा निस्तब्ध शांतता पसरली. पाऊस अजुनच जोरात बरसु लागला त्या अपघाताचा आवाज त्या पडणार्‍या पावसात विरुन जावा म्हणुन. दुसर्‍या दिवशीच्या पेपरात एक बातमी आली की, " काल रात्री ईस्टन ए़क्सप्रेस हायवेला दोन रिक्षांचा अतिशय भीषण अपघात होऊन त्यात दोन्ही रिक्षांचे चालक ठार झाले आहेत. त्यातील एका रिक्षावाल्याचे नाव राजु असुन दुसर्‍या रिक्षावाल्याचे नाव अजुन समजायचे आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार , तिथे काल रात्री रस्त्याच्या कडेला एका झाडीत बसुन दारु पित असणार्‍या लोकानी हा अपघात बघितला व त्याची माहीती तिथे अपघात स्थळी आलेल्या पोलिसाना दिली. व त्या दोन्ही रिक्षात असलेली दोन्ही गिर्‍हाईक रहस्यमयरीत्या हवेत गायब झाल्याची माहीती पण दिली. ती लोक जास्तच दारु प्यायली असल्यामुळे पोलिसानी त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यानाच फटके मारुन घालवुन दिले व पोलिस त्या रिक्षात असलेल्या त्या दोन गिर्‍हाईकांचा शोध घेत आहेत."
लेखनविषय:

वाचन संख्या 6000
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

निश तुमची ही कथा वाचुन मला पाषाण भेदाची http://www.misalpav.com/node/20756 "कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा म्रुत्यु " या कथेची प्रकर्षाने आठवण झाली ;)

अजिबात जमली नाही. अर्थात, विनोदी म्हणून टाकली असेल तर शब्द मागे घेतो. :)

In reply to by दादा कोंडके

दादा कोंडके साहेब, ह्याच ईस्टन ए़क्सप्रेस हायवे वर माझे दोन नातेवाई एक माझ्या सख्या आतेभावाचा मुलगा व एक माझा सख्खा मावस भाऊ दोन वेगवेगळ्या अपघातात गेले आहेत तेही आमावस्येलाच. एक विक्रोळी ला व एक भांडुपला

In reply to by निश

तुमच्या वैयक्तीक अनुभव, भुतं खरच असतात किंवा नाही या बद्दल नाहीच म्हणत आहे मी. एक भयकथा म्हणून वर्णन, पेपरमधल्या बातमीतला मजकूर वगैरे वाचून फसली आहे वाटलं इतकच. पुभशु! :)

In reply to by स्पा

तुझी मांजर बसव ना रिक्षात.. आणी गान लाव;;; " मरायला जायलाय, उश्शीर व्हायलाय, वात बघतय रिक्षावाला, ग म्यांव माझी, वाट बघतोय रिक्षावाला..

मला वाटले कि, या http://www.esakal.com/esakal/20120528/4685057482651994152.htm गंभीर बातमीबद्दल काहीतरी लिहिले असावे.

In reply to by प्रचेतस

वल्ली साहेब, कथा नक्की च फसली आहे. पण नक्किच त्या ठिकाणी काहीतरी आहे. माझे दोन जवळचे नातेवाईक त्याच हाय वे वर रोड अपघातात गेले. दोन्ही वेळा आमावस्याच होती व वार गुरुवार होता.

In reply to by निश

कथा फसली तरी हरकत नाही. तुमच्या धाग्याचा काही सदस्यांना खरडफळा म्हणून वापर करता आला का नाही ? अहो वाईटात चांगले बघावे आपण.

In reply to by निश

तुमच्या दुखा:त मी सहभागी आहे, आणी तुम्ही तुमच्या भावनांशी प्रामाणीक असल्याने त्यावर मत-प्रदर्शन करायचेही मी टाळतो, पण, असं काही नसतं हो.. घाबरु नका.. घाबरल की अपघात होतात..

In reply to by निश

त्या ठिकाणाबद्दल लिहायचंय, तर मग (शक्य असेल तरच..) जे घडलं ते तसंच लिहा. अनपेक्षित आणि अघटित अशा सत्यघटनांमध्येच चौकटराजा यांनी सांगितलेले घटक कैकदा आढळून येतात. मात्र ते लेखन मग अनुभव या वर्गवारीत जाईल. अवांतर : त्या ठिकाणाहून अनेकवेळा तुम्ही सांगता त्या वेळेला माझं जाणं होतं, पण नोंद व्हावी असं काही कधी आढळलं नाही, आणि ऐकण्यातही नाही. (पण हवा दिसत नाही म्हणून ती असत नाही हे म्हणणं चूक, हे मला मान्य आहे.)

In reply to by शिल्पा ब

पण हवा दिसत नाही म्हणून ती असत नाही हे म्हणणं चूक, हे मला मान्य आहे.
हे गोलमाल वाटले असल्यास, "आढळलेलं किंवा ऐकलेलं नसणं हा अतिमानवी शक्ती नसल्याचा पुरावा आहे, असं मी समजत नाही" असे वाचावे.

निश, एक छोटी कथा म्हणून मला आवडली. कथा लिहिणे हे किती अवघड आहे हे मी अनुभवले आहे. समस्या संघर्ष व नाट्य हा तीन मूलतत्वांचा समावेश कथेत असावा लागतो, एक काही तरी कथ्य् हवे ( न्युज वॅल्यू ) दुसरे त्यात सऱळसोट पणा नसावा व तिसरे शेवट नाट्यपूर्ण व्हावा अशा अपेक्षा शंनानवरे यानी मागे व्यक्त केल्या होत्या कथे बद्द्ल. आतपर्यंत असा प्लॉट असलेली कथा मला जमलेलीच नाही. ( प्रतिभेचा अभाव).तुझ्याकडे कविते प्रमाणेच गद्याचीही काही सामग्री नक्कीच आहे. कथा विनोदी, भय, प्रणय, कशीही असली तरी दीर्घकाल लक्षात रहाण्यासाठी त्यात वरील तीन तत्वे असणे मलाही आवश्यक वाटते. ( मला जमलेले नसले तरी) . एअरफोर्स वन हा चित्रपट आपण पुन्हा पुन्हा का पहातो यात ही तीनही तत्वे आहेत.

"

च्यायला तुम्ही ही कथा छापलीत अन तीन दिवसात इवेला मोठा अपघात झाला, तुमचा कळफलक सिद्धी प्राप्त वगैरे आहे का तपासुन घ्या जरा.