'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं. कोचीन, त्रिवेन्द्रम, मुन्नार, अल्लेप्पी, बॅक वॉटर, कन्याकुमारी(तमिळनाडू), पेरियार एकही केरळचा भाग सोडला नाही. दिवसा नाममात्र ट्रेनिंग आणि संध्याकाळी त्रेवेंद्रम दर्शन नंतर जोपण हिंदी सिनेमा लागला असेल तो पाहून उशिरा रात्री हॉटेलला परतणे हाच नियम झाला होता. त्रिवेंद्रमला आल्यापासून पोळी काय असते ते विसरायला झालं होतं, सुरूवातीच्या दिवसात २-३ हॉटेल भटकून 'चपाती'च्या मृगजळाच्या शोधात शेवटी 'परोटा' खाउनच निभावावं लागलं. पुढे पुढे तर पोळिबद्दल विचारणाच सोडली. नारळाच्या तेलात बनविलेल्या अगम्य आणि अद्भुत भाज्या, जाड आणि स्थूल बांध्याचा भात, सोबतीला पोटभर रस्सम व ते पिताना हमखास येणारा ठसका यातच मग स्वर्ग शोधायला लागलो. 'चला एकाच महिन्याचा तर प्रश्न आहे' या एका भाबड्या आशेवर हे सर्व निमूटपणे सहन केलं.
ट्रेनिंग संपायला आलं होतं. नियुक्तीसाठी प्राधन्यक्रमवारीत पूणे व मुंबई हे दोनच पर्याय मी दिले होते. परतीचं पुण्याचं confirm तिकिटपण तयार होतं. शेवटच्या आठवड्यात नियुक्तीच्या ठिकाणांचे यादी लागली आणि अस्मादीकांचे नाव हैद्राबादच्या यादीत बघून काय स्थिती झाली ती शब्दात सांगणे केवळ अशक्य. तासभर HR वाल्यांशी माथापच्ची करून एकच कळलं की पुणे - मुंबईच्या जागा संपल्यात म्हणून दुसरं जवळच ठिकाण म्हणून हैद्राबादला नियुक्ती केली गेली जी पुढील २ वर्षे बदलता येणार नाही. मनातल्या मनात HR आणि देवाला धन्यवाद देऊन मी तलवार म्यान केली. आमच्या २०० जणांच्या बॅचमधे केवळ ४ नशिबवंताना(३ स्व्खुशीनी व उरलेला मी) निझामाच्या मुलखात वास्तव्याची संधी दिली गेली होती. यापूर्वी माझा व दक्षिण भारताचा संबंध केवळ इडली - दोसा व रजनिकांतपुरताच होता. पण या नियुक्तिमूळे आमचे 'दक्षिणायन' सुरू झाले होते.
'सार याहासे किधरकू जानेका?' मी बाहेर डोकावलं पण एक चिटपाखरूसुद्धा न्हवतं. होते नुसते आलिशान बंगले प्रत्येक बंगल्यात कमीत कमी २ माहागड्या गाड्या रस्त्यावर नावालापण दुकान नाही ना ऑटो. मी हैद्राबादच्या उच्चभ्रु अशा फिल्मनगर मध्ये उभा होतो. शेवटी फिरून परत त्याच जागेवर दोनदा आल्यावर ऑटोवाला संतापला 'क्या तोबी बाता करते सार...आज तो पक्का मेरी बारात निकालते तुमे' शेवटी एका चैकीदाराला पत्ता विचारून कसाबसा ऑफिसच्या अतिथीगृहात पोचलो. दुमजली (बंगला)अतिथीगृह एक्दम झकास होते. मला टेरेसची खोली मिळाली दिमतीला खानसामापण होता. टेरेसवर रपारप पडणर्या पावसात कॉफी पीता पीता दुरवर पसरलेले हैद्राबाद अगदी शांत वाटत होतं.
ही अतिथीगृहाची जन्नत केवळ ३ दिसांपूर्तीच होती त्या आधीच काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. पण... हैद्राबादमधे कुणीकुणी ओळखीचं नसल्याने आता काय ह प्रश्न होताच. पण तो सुद्धा मार्गी लागला. थोडीफार फोनाफोनी कररून कळलं की माझ्याच कॉलेजातील एक जण इथे हैद्राबादमधे रूजू झाला होता त्याचा नंबर व पत्ता शोधून काढला. कॉलेजमधे असताना हाय हॅलो व्यतिरीक्त कधीच बोलणं न झालेलं नसल्याने सरळ तुझ्या फ्लॅटवर राहायला येऊका हे विचारायाला जीभ वळत न्हवती पण 'करता क्या न मरता'. थोडे आढे वेढे घेऊन त्यानी होकार दिला आणि आमचा मुक्काम फिल्मनगर मधुन आमीरपेटला हलला.
हैद्राबादची नाडी गवसायला फारसा वेळ लागला नाही. हिन्दी जवळपास सगळ्यांनाच कळत असल्याने सर्वात मोठा भाषेचा प्रश्ना सुटला होता त्याला अपवाद केवळ बिल्डींगचे वॉचमन. आपण जितके हिंदीचे सोपे शब्द वापरून बोलायचा प्रयत्न करावा तितके अस्खलित तेलुगू बोलून समोरच्याला कोंडीत पकडल्याचा आसुरी आनंद मी त्यांच्या चेहर्यावर कित्तेकदा बघितलेला आहे.
स्वतःची गाडी नसल्याने शेअर ऑटोने ऑफीसला जाणे ओघाने आलेच. याच शेअर ऑटोंमधून चालकाच्या शेजारी जीव मुठीत धरून प्रवास करता करता जोरजोरात सुरू असलेली तेलुगू गाणी ऐकून हळूहळू तेलुगू सिनेमाच्या गाण्यांचा फॅन झालो. त्या काळात प्रदर्शीत झालेल्या बहुतांश तेलुगू सिनेमातील फेमस गाणी मी मुखपाठ केली होती.तसेच सगळे हिट तेलुगू सिनेमे बघण्याचा सपाटा लावला.
आंध्रामधे सगळी मजाच मजा.प्रत्येक दुसर्या व्यक्त्तीचे नाव श्रीनीवास(उर्फ स्रिनी), प्रत्येक तिसर्या व्यक्तीचे नाव श्रीकांथ किंवा क्रिष्णा असल्याने ऑफीसात खूप गोंधळ उडायचा. खाण्याच्या पदार्थांची नावे पण विचित्र उदा. पप्पु(फोडणीचे घट्ट वरण), पुनुगुलु, बिसी बिल्ला बाथ, टोमॅटो बाथ, कुबानी का मिठा, शाही टुकडा, पेसारट्टू, मैसूर बोंडा, मिर्चीका सालन वगैरे वगैरे. कोणताही पदार्थ ऑर्डर करण्या आधी पहीले दिखाओ फिर खिलाओ हे सुत्र वापरल्यास चांगले. वस्त्यांची नावे हमखास 'पेट' 'पुर'किंवा 'गुडा' या शब्दांनी संपणारी उदा. आमिरपेट, बेगमपेट, हफिजपेट, बल्कम्पेट, कोत्तापेट, युसुफगुडा, नारायणगुडा, हबसीगुडा, लालागुडा, माधापुर, मियापुर, कोंडापुर. सुरुवातीला इथे बर्याच बायकांची केसांची बॉयकट बघुन इथे स्त्रीवर्ग पुढारलेला आहे असा तर्क केला होता पण नंतर कळले की तिरूपतीला केशदान केल्याने इतक्या विपुल बॉयकट बघायला मिळतात.
हळूहळू मित्रांचा ग्रुप जमला दर विकांताला हैद्राबाद पालथे घालणे व हैद्राबादी व्यंजनांचा आस्वाद लुटणे हे आमचे आद्यकर्तव्य बनले. रामोजी, झू, चारमिनार, सालारजंग, बिर्ला मंदीर, लुंबिनी गार्डन, इट स्ट्रीट, दुर्गम चेरूवू, गोवळकोंडा या सर्व स्थळांचा कैक वार्या झाल्या. काहीच नाही तर चलो हैद्राबाद सेंट्रल... खरेदी, पोटपूजा, नेत्रसुख(मी सिनेमा म्हणतोय बरं काय :-)) सब कुछ एकाच जागी.
नाही म्हणायला थोडा भाषेचा त्रास झालाच. काही जागी तेलुगू नसल्याचे कारण दाखवून घर भाड्याने देणे नाकारले गेले तर कधी कधी तेलुगू शब्दांचे अर्थ न कळल्याने गमती पण घडल्या. ऑफेसमधे मित्रांकडून तर ऑफेसला येता जाता रेडिओ ऐकून तेलुगू शिकायला सुरूवात केली होती. शब्द मजेशीर वाटायचे जसे पेर = नाव तर पेरूगू = दही, पालू=दूध, निलू=पाणी, चत्ता = कचरा, चिकू = झाडणी. एखादा नविन शब्द किंवा वाक्य शिकल्या बरोबर लागलीच त्याचा वाक्यात उपयोग करायची खुमखूमी असायची. एकदा असाच बसने प्रवास करताना कंडक्टरला मोठ्या तोर्यात आवाज दिला 'बाबू ओक्क अमिरपेट कावाली'. म्हतार्या कंडक्टने व इतर प्रवाश्यांनी एकदा माझाकडे निरखून पाहीले. कंडक्टरनी तिकिट दिले. थोड्या वेळाने इतर प्रवाश्यांना तिकीटे देऊन झाल्यावर माझ्याजवळ आला व म्हणाला 'तू हैद्राबाद मधे नविन आलेला दिसतोस' 'होय २-३ महिने झालेत' 'हे बघ बेटा, बाबू हे आपल्यापेक्षा वयानी लहान व्यक्तीला म्हणायचे मोठ्यांना, अन्ना किंवा भैय्या म्हटले तरी लोकं समजुन घेतील आणि हो इथे सगळ्यांना हिंदी कळतं' त्याच्या या हितोपदेशानंतर मी अर्थातच तेलुगू बोलण्याचा नाद काही प्रमाणात कमी केला.
जसजसा वेळ गेला तसतसा ऑफीसात कामाचा व्याप वाढला. कधीकधी विकांतालापण ऑफीसात कळ्फलक बडवावा लागू लागला. मित्रांचा ग्रुप जसा बनला होता तसाच हळूहळू तुटला काही कंपनी सोडून गेले, काहींची बदली झाली ,काही ऑनसाइटला गेले. उरलेल्यांची लग्ने झाल्याने ते आपापल्या संसारात रमू लागले.
या हैद्राबादमधे खूप काही पहिलं वहिलं अनुभवलं. पहिला पगार, पहिली स्वतःच्या पैशाने मित्रांना दिलेली पार्टी, पहिली स्वतःची बाइक, टी.व्ही. आणि बरच काही. बघता बघता कधी ६-७ वर्षे या सुंदर शहरात भुरकन उडून गेली कळलच नाही. नियुक्तीचा आदेश हातात पडल्यावर माझी झालेली स्थिती आठवून अजूनही मला हसायला येतं. एकेकाळी परकं वाटणारं हे निझामी हैद्राबाद कधी मला नकळत आपलसं करून गेलं आणि माझा भाऊचा अण्णा कधी झाला कळलच नाही.
वाचने
7299
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
हैद्राबादेच्या आठवणी ताज्या
क्या यारो पूरा हैड्रबाड खडा
अंग्रेझ
In reply to क्या यारो पूरा हैड्रबाड खडा by बॅटमॅन
आपल्याला इस्माईलभाय.
In reply to अंग्रेझ by अमृत
माझी सर्वात फेव्हरीट पात्रे
In reply to अंग्रेझ by अमृत
मस्त! मजा आली वाचायला.
जुन्या आठवणी. मस्तच! मी
हैद्राबाद.
+१
In reply to हैद्राबाद. by प्रभाकर पेठकर
सुरेल.
In reply to +१ by जे.पी.मॉर्गन
आन्ना
होय
In reply to आन्ना by चौकटराजा
शिनुमाची तिकिटं काढायला
In reply to होय by अमृत
मल्टिप्लेक्समधे
In reply to शिनुमाची तिकिटं काढायला by रेवती
क्रमश: राहिलयं का?.. मस्त
मस्त!
+ २
In reply to मस्त! by पैसा
+३
In reply to + २ by मेघवेडा
ऐसा लगताय अण्ण तुमना खुंदल
मस्त लिहिलंय, या सुट्टीत
अवश्य
In reply to मस्त लिहिलंय, या सुट्टीत by ५० फक्त
लेख आवडला.
लेख आवडला
अमृतराव... छान
हो हो तीच
In reply to अमृतराव... छान by निखिल देशपांडे
मस्त! मजा आली वाचायला. छान
मस्त लेख
सुंदर लेख !!
( कधीकाळी नावं ठेवलेल्या
In reply to सुंदर लेख !! by सूड
सुरेख वर्णन
खूपच सुंदर लिखाण !!!+१
मस्त.
अप्रतिम! बेष्ट! मजा आलीच.
खूपच सुंदर
वा!
आवडेश.