✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांगे वडिलांची कीर्ती.....

र
राजघराणं यांनी
Wed, 05/16/2012 - 16:26  ·  लेख
लेख
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे - आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति | सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२|| " क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे. किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे. गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो. हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. आणी समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल. http://en.wikipedia.org/wiki/Tapioca हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे अमुक मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे . समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही. हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम ! आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे | शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
24711 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

घ्या

रमताराम
Wed, 05/16/2012 - 16:53 नवीन
पालथ्या घड्यांवर पाणी ओतण्याची लै हौस ब्वॉ तुम्हाला. उद्ध्वस्त धर्मशाळा मधील कॉम्रेड कुलकर्णी म्हणतो ना तसे 'लिहून बोलून या देशाला जागवता येत नाही.' गोधडीत सुस्त पडून राहणार्‍या नि हात बाहेर कढून कोणत्याही घोषणेला - कोणती ते ऐकण्याची समजून घेण्याची तसदी न घेता थेट - खच्चून 'जय' म्हणण्यापुरती हालचाल करणार्‍यांच्या देशात असे शब्द 'केवळ बापुडे वारा' असतात साहेब. असो. लिखाण आवडले/पटले हे वे. सां. न. ल.
  • Log in or register to post comments

जय

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/17/2012 - 01:34 नवीन
जय राजघराणं, जय रमताराम. आम्ही या दोघांना पूर्वज मानणार आणि त्यांना देव बनवून त्यांचा उदोउदो करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/17/2012 - 12:20 नवीन
श्री. ररा व मा.* अदिती दोघेही जन्मजात संस्कृतीभंजक असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया दुर्लक्षीत केल्या आहेत. *माजोरी भारतीय संस्कृती महान होती, महान आहे आणि महान राहील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एय

रमताराम
गुरुवार, 05/17/2012 - 13:22 नवीन
ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/17/2012 - 16:00 नवीन
ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.
मी काय के. सी. बोकाडीया आहे का ? ;) परिष कणेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कोणाचे पुर्वज ??

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 21:22 नवीन
त्यांच्या रिस्पेक्टीव्ह आयांची पर्मिशन घेऊन ठेवा म्हणजे झालं ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>>समता, न्याय, बंघुभाव,

प्यारे१
Wed, 05/16/2012 - 16:57 नवीन
>>>>समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.<<< हे आवडलं. >>>हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !<<< हॅ हॅ हॅ. कळत नाही असं म्हणायचंय? वळणं महत्त्वाचं माऊली!
  • Log in or register to post comments

चांगला लेख!

पैसा
Wed, 05/16/2012 - 19:42 नवीन
विस्तार आवडला. (फक्त >>"मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे." याबद्दल जरा शंका आहे)
  • Log in or register to post comments

समयोचीत लेख

jaypal
Wed, 05/16/2012 - 21:15 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments

लेख आवडला आणि विचार

टुकुल
गुरुवार, 05/17/2012 - 05:04 नवीन
लेख आवडला आणि विचार पटले. --टुकुल
  • Log in or register to post comments

मी ही विस्तार आवडला असेच

स्पंदना
गुरुवार, 05/17/2012 - 05:13 नवीन
मी ही विस्तार आवडला असेच म्हणेन.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 05/17/2012 - 10:56 नवीन
राजघराणे यांचा अजून एक उत्तम लेख. पूर्णपणे पटला. जर प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीकडून ज्ञान घेऊन त्यात आपली भर टाकून किंवा काळानुरूप सुधारणा करून पुढच्या पिढीकडे ते ज्ञान हस्तांतरीत करत असेल तर याचा अर्थ नव्या पिढीकडे जुन्या पिढीपेक्षा अधिक योग्य आणि अधिक काळानुरूप ज्ञान असते असा त्याचा अर्थ झाला. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. मला वाटते की जर नव्या पिढीकडे जास्त ज्ञान असेल तर जे काही जुने आहे ते by default अयोग्य मानून त्यात जर उपयोगी काही असले तर तेच घ्यावे. by default अयोग्य का? कारण पूर्वी जेव्हा केव्हा त्या गोष्टी तयार केल्या त्यापेक्षा आताच्या पिढीकडे अधिक आणि काळानुरूप ज्ञान आहे तेव्हा पूर्वी लक्षात न आलेल्या काही गोष्टी असतील तर त्या आताच्या पिढीच्या लक्षात यायला जास्त स्कोप आहे.
  • Log in or register to post comments

कस्सं कस्सं !!

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 21:26 नवीन
याला म्हणतात आधुनीक विचार... >>मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. -- इतरत्र जाऊ दे... मिपावरील असले कोण ज्ञानपाषाण आहेत ते कळु दे एकदा... मग बघा काय गदर माजवतो त्यांच्या विरुद्ध !! अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

रा.घ. ..ठीक आहे लेख! आपणासी

मृगनयनी
गुरुवार, 05/17/2012 - 23:05 नवीन
रा.घ. ..ठीक आहे लेख! आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे | शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास हे वाक्य आवडले. * पूर्वीच्या काळी उपवासाचे स्वरूप अत्यन्त वेगळे होते. लोकं फलाहार आणि पाणी घ्यायचे. काही लोक निर्जळी उपवास करायचे. मुळात उपवासाचा उद्देश हा 'काही विशिष्ट गोष्टी खाणे' असा नसून अत्यंत जरूरीपुरते कमीतकमी अन्न खाऊन परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करणे हा होय. कमी आणि जरूरीपुरते अन्न घेतल्याने सुस्ती येत नाही. व मन सतर्क राहते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी (शक्य असेल तर फक्त ) लिम्बूपाणी घेणे केव्हाही चान्गले! कारण त्यामुळे माणसाच्या चित्तवृत्ती तर शान्त राहतातच. पण चमचमीत अन्नाच्या योगेकरून बळावलेल्या मानसिक आणि बौद्धिक अर्थहीन तर्क-वितर्कांनाही आळा बसतो. तसेच कोणतेही सन्त-महात्मे कधीच कुणाला उपास करायला सांगत नाही व यापूर्वीही कधी असे कुणा सन्तांनी सांगितलेलेही दिसत नाही. काही खादाड लोकांना 'उपवास' या शब्दाचा अर्थ व महत्व माहित नसल्याने (व कदाचित त्यांच्या बापजाद्यानाही माहित नसल्याने ) त्यांनी उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाटे हे पोर्तुगीजांनी आणलेले पदार्थ चमचमीत पद्धतीने प्रिपेअर करून खायला सुरुवात केली. काही ठिकाणी उपवासाला तान्दूळ खातात. काही ठिकाणी भेंडी चालते.. काही ठिकाणी चालत नाही... बर्‍याच ठिकाणी साबुदाण्याचे पापड, वरईची आमटी, दाण्याची चटणी इ. पदार्थ खाऊन उपवास साजरा केला जातो. त्यामुळे "एकादशी दुप्पट खाशी" होते. व "उपवास" .. उपवास राहत नाही.. काही डॉक्टर लोक कॅलरीज आणि वजन वाढलेल्या लोकांना "उपवास" करायला सांगतात!. पावसाळ्यात हवा, पाणी यातील बदलामुळे वारंवार पोटदुखी, जन्तूसंसर्ग तसेच इतर अनेक रोग इतर ऋतुंपेक्षा जास्त प्रमाणात फैलावतात. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजेच -आषाढ, श्रावण, भाद्रपदात विविध धार्मिक कारणांसाठी उपवास करण्याचे नियम आपल्या खूप जुन्या पूर्वजांनी घालून दिलेले आहेत. श्रावणी सोमवार, मन्गळागौर, नागचतुर्थी, हरतालिका, श्रावणी शुक्रवार.. असे विविध दिवस आपल्या अति जुन्या पूर्वजांनी उपवासासाठी निवडलेत. कारण आरोग्यविषयक कारणे देण्यापेक्षा धार्मिक कारणे दिलीत.. तर लोक त्याचे श्रद्धेने पालन करतात.. हे त्यांना माहित होते. किम्बहुना ती ह्युमन मेन्टॅलिटी आहे. अर्थात या धार्मिक कारणांमागे आपल्या अति जुन्या पूर्वजांची पुढच्या पिढीबद्दलची सद्भावनाच होती. परन्तु आत्ता बदलत्या काळानुसार आपल्या अति जुन्या पूर्वजांचे या विचारांमागचे शास्त्र लक्षात न घेता फक्त कर्मकांडात लोक अडकले. आणि तेच संस्कार त्या कर्मकांडी लोकांनी पुढच्या पिढीवर केले. त्यामुळे उपवास आणि इतरही बर्‍याच धार्मिक गोष्टींमागचे तत्व न समजल्यामुळे 'उपवासा'चा पार बोर्‍या वाजवला गेला. आणि ग्लोबलायझेशनमुळे आणि कर्मकांडामुळे पसरलेल्या व दृढ झालेल्या अर्धवट माहितीमुळे बर्‍याच लोकांना आपल्या अति जुन्या पूर्वजांचे विचार मूर्खपणाचे वाटतात.. असो.. आता अमेरिका किन्वा युरोप मधले शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या या अति जुन्या पूर्वजांच्या सन्शोधनाचा अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष .. पुन्हा स्वतःच्या नावाने नव्या कव्हरमध्ये जगासमोर आणतील.. तेव्हा आपल्या लोकांना त्याचे महत्व कळेल!! त्यामुळे कधी कधी नव्हे बर्‍याचदा "जुने ते सोने" असते... फक्त ते सोने आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी नुसते सोने विकणार्‍यापेक्षा सोने पारखणार्‍याची संगत धरणे केव्हाही उचित ठरेल. :) || जय जय रघुवीर समर्थ || :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा हा... मस्तच!

दादा कोंडके
गुरुवार, 05/17/2012 - 11:54 नवीन
समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत.
खरय. आणि हे सगळं व्हायला आताच्या आणि पुढच्या पिढ्यांत एव्हढी समज येइल की देव, आणि धर्माचं अधिष्ठान की काय म्हणतात त्याची काहिही गरज नाही. उलट आत्तापर्यंत याचा दुष्परिणामच मानवजातीला भोगावे लागले आहेत हे पटेल. अशी आशा आहे. :)
  • Log in or register to post comments

हे सूत्र कशात वापरले जात नसले तरी राजकारणात उत्तम वापरले जाते

सुकामेवा
गुरुवार, 05/17/2012 - 12:27 नवीन
बापानी १० रु चा ब्राष्टाचार केला तर मुलांनी १०० रु चा करायचा
  • Log in or register to post comments

हे

चिरोटा
गुरुवार, 05/17/2012 - 12:52 नवीन
लेख आवडला.
बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते
हे कशावरून ? उपवास न करणार्‍यांना हे माहित असते का? की उपवास करणार्‍या व्यक्ती जुनाट,बुरसटलेल्या विचारांच्या असतात असे आपले मत आहे?
  • Log in or register to post comments

मला वाटते...

विकास
गुरुवार, 05/17/2012 - 23:12 नवीन
उपवासाच्या दिवशी "आपल्या" नेहमीच्या गोष्टी खाणे आपण टाळायचे असते. आता बटाटा हा जर परकीय असला तर "आपला" नाही अथवा "नेहमीचा" देखील नाही. म्हणून उपवासास चालत असावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

काका

मी-सौरभ
Fri, 05/18/2012 - 13:27 नवीन
बटाटा हे नेहमीच खाणं नाही??? असा विनोद तुमच्यासारख्यांकडून अपेक्षित नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

>>हल्लीची पिढी एकदम चुकार

बॅटमॅन
गुरुवार, 05/17/2012 - 13:57 नवीन
>>हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - असे नुकतेच अ‍ॅडमने ईव्हला म्हटल्याचे वाचनात आले असे पुलंच्या पुस्तकात वाचल्याचे आठवले.
  • Log in or register to post comments

राजेहो

रमताराम
गुरुवार, 05/17/2012 - 16:19 नवीन
तुमच्यासाठी आमचा एक आवडत्या कथेतील छोटा भाग... अर्थात जीएंचा. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडचा सम्राट ही कोरड्या झालेल्या म्हातार्‍या बायकांची भाकडकथा आहे! तुमची नृत्य वेडगळपणाची आहेत! निसर्गाचं चक्र अविरतपणे फिरत असतं. पावसाळा येतो तो तुमच्या नृत्यांनी खूष होऊन नव्हे; किंवा तो येतो ते तुम्ही अत्यंत सद्गुणी, निसर्गाचे लाडके आहात म्हणून नव्हे. तुम्ही केवळ पावसाचा उपयोग करता इतकंच. तुम्ही तुमची आडदांड नृत्यं थांबवलीत किंवा तुम्ही सारेच नष्ट होऊन गेलात तरी पावसाळ्यात पाऊस हा निर्विकारपणे पडत राहिलंच! पण एका बाबतीत मात्र मी चुकलो. मला वाटलं होतं या अदृष्य बेड्या हातावरून पडताच निदान एकाला तरी मुक्त वाटेल. मला त्याबद्दल कृतज्ञता नको होती, कारण आता मी त्यापलिकडे गेलो आहे. कृतज्ञता नव्हे तर निदान एकाला तरी मुक्त केल्याचा आनंद मला हवा होता. पण हातापायात या अवजड बेड्या शतकानुशतके घालून तुम्ही इतके अपंग झाला आहात की आता त्यांच्याशिवाय चालणं तुम्हाला अशक्यच वाटतं. तुमच्या झापडी काढून मी तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला. एकंदरीने मुक्तता अशी बाहेरून देता येत नाही हेच खरं. त्यासाठी आतूनच उकळी यावी लागते. मी तुमची प्रतारणा केली याचं खरं म्हणजे तुम्हाला दु:ख नाही, तर ती प्रतारणा आहे हे दाखवण्याचं धैर्य मी दाखवलं याचा तुम्हाला संताप आहे. तुम्ही अज्ञ आहातच पण आपण अज्ञ आहोत हे जाणण्याचं पहिलं पाऊलदेखील तुम्हाला उचलता येत नाही इतके तुम्ही अपंग, क्षुद्र होऊन बसला आहात! मी तुम्हाला काही शिकवू शकलो नाही, पण ही एक गोष्ट मात्र मी स्वत: या क्षणी शिकलो! -कळसूत्र (काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी) >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडील सम्राट हे एक रूपक आहे हे वेगळे सांगायला नकोच. :)
  • Log in or register to post comments

+/-

विकास
गुरुवार, 05/17/2012 - 19:52 नवीन
लेख - मुक्तक म्हणून आवडले आणि प्रामाणिक वाटले. (बाकी आपल्या मिपाआयडीवरून आपण वाडवडीलांची किर्ती तर सांगत नसता असे वाटले. ;) ह.घ्या.). मात्र आपले प्रामाणिक विचार संपूर्णपणे पटले असे म्हणणार नाही. कारण बर्‍याचदा अशा विषयांचे प्रामाणिकपणे केलेले विस्तार हे समाजात चाललेल्या अथवा स्वतः निरीक्षण केलेल्या अनुचितीत गोष्टींना/प्रथांना प्रतिक्रीया म्हणून असतात म्हणून लंबक दुसर्‍या टोकाला जातो... त्यामुळेच y=mx+c अशा साध्या समिकरणाने मांडलेले असतात आणि वास्तव तसे नसते. संतमंडळींपासून अगदी अधुनिक साहीत्यिकांपर्यंत अनेकांनी मांडलेले अनेक चपखल विचार मला आवडतात. ते केवळ मराठी, हिंदी भारतीयच असतात असे नाही, तर इंग्रजीतले पण असू शकतात. अनेकदा असे वाचलेले ऐनवेळेस आपोआप आठवते आणि मार्गदर्शक अथवा समुपदेशक ठरते, अर्थात तसे घेण्याची तयारी आणि इच्छा असली तर... "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये | " असेच काहीसे. समर्थांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे त्यातलेच आहेत. रामदासांनी दासबोधाच्या ज्या दशकात, "आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥" असे लिहीले त्याच दशकात नंतरच्या (दहाव्या) समासात, "समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥" असे देखील म्हणलेले आहे. अर्थात हे (म्हणजे पढतमुर्खाचे लक्षण) आपल्यासाठी म्हणलेले नाही हे स्पष्ट करतो! तसा गैरसमज नसावा. पण असे महाभाग बर्‍याचदा जालावर आणि वास्तवात देखील दिसतात-भेटतात इतकेच म्हणेन. पण स्वतः तंगड्या वर करून बसायचे आणि बापजाद्यांच्या किर्तीबद्दल बोलायचे, हे जसे मूर्खपणाचे लक्षण आहे, तसेच केवळ जुने आहे वगैरे म्हणत तुच्छ लेखायचे कारण देखील नसते...दुर्दैवाने तसे बर्‍याचदा घडताना दिसते. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " यांचा खरेच विचार करायचा असेल तर तो आपल्या स्थलकालपरीस्थितीस योग्य असा करावा का फ्रान्समधे अठराव्या शतकात मांडले म्हणून ते घटनाकारांनी १९५० साली तसे लिहून ठेवले म्हणून (पक्षी: परत भूतकाळाची किर्ती) करावा ह्याचा देखील विचार करायला हवा. जे स्वदेशी विपत्ती भोगत वडीलांची किर्ती करणारे असतात त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे हे निश्चित... कारण समर्थानी सांगितले आहेच. :-) पण जे तसे वागत नाहीत ते नक्की "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे स्वतःपुरतेच मर्यादीत ठेवतात का सर्वांसाठी आणि सर्वांच्या नजरेतून त्याचा विचार करतात हे महत्वाचे आहे. सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही. "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे" असेच काहीसे... जे चैतन्य / सचेतन असते ते तसे असे पर्यंत कालातीतच असते. केव्ळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही... म्हणूनच विचारात समतोल आणि सारासार विवेकबुद्धी असणे देखील महत्वाचे आहे असे वाटते... नाहीतर केवळ पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय (ट्रेडीशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी) तयार करण्याची स्फुर्ती देणार्‍या माशेलकरांना आणि त्यांच्या शास्त्रज्ञ चमूला देखील आपण हकनाक दासबोधातील दशक दहावा, समास पहिला (मुर्खांची लक्षणे) मध्ये वर्गिकृत करू...
  • Log in or register to post comments

चला !!!

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 21:40 नवीन
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

:-)

विकास
गुरुवार, 05/17/2012 - 22:08 नवीन
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... ऑ? मी लपलो कधी होतो? उगाचच संशोधक असल्याचे क्रेडीट घेण्याचा प्रकार आहे.. ;) तुमच्या आधीच्या प्रतिसादातील खालील वाक्याचा "धर्ममार्तंड" सापडण्याशी संबंध आहे असे समजतो. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. "जे काही जुने आहे ते by default योग्य मानणे" जसे अयोग्य तसेच "एखादी गोष्ट योग्य मानणारे, ती गोष्ट केवळ जुनी आहे म्हणजे "सगळेच जुने by default योग्य मानतात" असे समजून त्यांना धर्ममार्तंड मानणे देखील अयोग्यच. :-) पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अहो महाराज, असे गुडबुक वगैरे ठेवायचे नसते. पटले तर पटले, नाही पटले तर नाही पटले म्हणायचे, आणि बरळत आहे असे वाटले तर टिका करायची... तसे नाही केले तर आमचा पण बुवा/बाबा करून टाकाल तुम्ही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बुवा/बाबा

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 22:40 नवीन
मित्रा... आजघडीला त्यासारखा बेस्ट बिझनेस नाहि ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

-१

दादा कोंडके
गुरुवार, 05/17/2012 - 23:53 नवीन
सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही.
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खरय !!

अर्धवटराव
Fri, 05/18/2012 - 00:13 नवीन
>>खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. -- एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर कुठल्याच लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

युक्तिवाद नव्हे

विकास
Fri, 05/18/2012 - 00:56 नवीन
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. हा युक्तीवाद नसून वास्तव आहे. आंधळा अभिमान नको म्हणताना लाज वाटते असे सांगणे बर्‍याचदा ऐकतो-वाचतो. म्हणूनच आधीच्या प्रतिसादात, "केवळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही..." असे देखील म्हणले होते... खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. हेच तर म्हणणे आहे. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? कोणी समर्थांच्या ओव्यांचे उदाहरण दिले अथवा कोणी पुलंनी केलेली संस्कृतीची व्याख्या सांगितली तर त्यात व्यक्तीपूजा शोधायची का? रामदासांना कालचे म्हणून हिणवायचे असेल तर मग जीए तरी आजचे कुठे आहेत? ते पण आता कालचेच आहेत की? मग त्यांचे विचार सांगणे म्हणजे काय व्यक्तीपूजा समजायची? हे मी रमताराम यांना उद्देशून लिहीलेले नाही. त्यांनी दिलेल्या उदाहरणात मला काही गैर वाटत नाही जितके मला रामदासांचे अथवा इतर कुणाचे नाव घेणे गैर वाटत नाही. जी ए अथवा पुलच कशाला मिर्झा गालीब चे शेर सुनावत त्याचे विचार ऐकवणारे किती असतात? एखाद्याला एखाद्याचे लेखन, विचार, सांगायची पद्धत अपील होते तर एखाद्याला त्याच व्यक्तीची न होता दुसर्‍या कुणाची तरी होते... त्या दोन्ही व्यक्ती काही व्यक्तीपूजा करत नसतात तर निव्वळ कुणाचे तरी अ‍ॅप्रिशिएट करत असतात. तात्पर्य: तुमच्या प्रश्नातले "व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय" हे मला १०० काय १०००% मान्य आहे. मात्र त्याला जबाबदार असलेली व्यक्तीपूजा वेगळीच आहे असे वाटते: उदाहरणादाखलः (२००९ च्या विदा प्रमाणे) ५२ केंद्रसरकार प्रकल्प, ५२ (विविध्)राज्य सरकार प्रकल्प, ९८ शैक्षणिक संस्था, ६ विमानतळे/बंदरे, ९३ रुग्णालये, ७४ रस्ते, इमारती, स्थाने, आणि १५ राष्ट्रीय उद्याने ही एकट्या राजीव गांधींच्या नावावर आहेत. तेच इतर अनेक राजकीय नेत्यांचे दिसेल. बरं हे सगळे करदात्याच्या पैशाने परत पैसे खात खात... अजून बरेच काही असे लिहीता येईल. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. तसे वाटत नाही. "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे जर माझ्या टर्म अँड कंडीशनवर चालले असेल तरच मी त्या बाबतीत प्रगल्भ राहीन असा रोख बर्‍याचदा समाजात दिसतो त्यामुळेच तर सामाजीक प्रश्न तयार होतात, झालेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

लेख आवडला.

स्वाती दिनेश
गुरुवार, 05/17/2012 - 20:10 नवीन
लेख - मुक्तक म्हणून आवडले आणि प्रामाणिक वाटले. स्वाती
  • Log in or register to post comments

रामदास हे एकच शहाणे जगात

यकु
गुरुवार, 05/17/2012 - 21:08 नवीन
रामदास हे एकच शहाणे जगात होऊन गेले, आणि त्यानंतर शहाणपणा, मूर्खपणाची व्याख्याच कुणाला करता येणार नाही असा राजघराणं यांचा समज दिसतो. स्वतः लग्न टाळून* रामदास
संसार करावा नेटका
असा उपदेश करु शकतात याला तुम्ही काय म्हणाल? *टाळून म्हणतोय, लग्नाच्या बोहल्यावरुन पळून म्हणत नाहीय याची नोंद घ्यावी, परवा कुरुंदकरांच्या एका व्याख्यानात बोहल्यावरुन पळून जाण्याच्या दंतकथेबद्दल पटेल असा विचार ऐकला
  • Log in or register to post comments

त्यांना ते जमलं !!!

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 21:44 नवीन
इतरांनी उगाच भावनेच्या भरात/क्षणीक तावातावाने वा एखाद्या उसण्या झपाटलेपणाने भारुन जाऊन संसाराकडे पाठ फिरऊ नये.. इतकच ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

युजींचं याविषयावर काय मत आहे?

शिल्पा ब
गुरुवार, 05/17/2012 - 21:48 नवीन
युजींचं याविषयावर काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

युजींचं याविषयावर काय मत

यकु
गुरुवार, 05/17/2012 - 21:51 नवीन
युजींचं याविषयावर काय मत आहे?
कोण युजी? धन्यवाद :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बस्स का ....

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 22:45 नवीन
>>कोण युजी? -- यु = तुम्ही, जी=आदरर्थी वगैरे काय लावायचं असतं ते.. म्हणे बाबाजी, नेताजी, भाऊजी, रावजी वगैरे... शिल्पा मॅडम तुमचेच मौलीक विचार विस्ताराने मांडायची विनंती करताहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद

विकास
गुरुवार, 05/17/2012 - 22:50 नवीन
दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण मधील पहीलाच श्लोक/वचन/ओवी जे काही म्हणायचे आहे, ते असे आहे: पहीला श्लोक तुम्ही (संसार करा नेटका) म्हणालात तो आहे तर उर्वरीत अजून संदर्भ लागण्यासाठी देत आहे:
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
रामदासांनी दासबोधाच्या पहील्याच समासात या ग्रंथाचे काय वर्णन केले आहे?
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
एका अर्थी मानवी विचार आणि त्याने प्रभावीत होणारे आचार या संदर्भातला हा एक संदर्भग्रंथ आहे. विविध समासांमध्ये विविध वृत्ती-प्रवृत्तींची लक्षणे आणि त्यासंदर्भातील वर्तन देखील सांगितली आहे. अर्थात काळ लक्षात घेतला तर त्यास भक्तिमार्ग म्हणले आहे, पण तो जास्त करून व्यावहारीक ग्रंथ आहे असे एकूण वाचल्यावर वाटते. ते काही प्रत्येकाला आधी प्रपंच करा म्हणून सांगत नाहीत तर प्रापंचिक माणसाने काय करावे हे सांगत आहेत. आधी जी संसाराची जबाबदारी घेतली आहे ती नीट पाळा आणि मग लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जा. :-) तसे केले नसल्याने काय झाले ह्याचे मोठे उदाहरण त्यांच्या आधी काही शतके "विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचे" होतेच पण त्या व्यतिरीक्त देखील अनेकदा घडलेले असू शकते. संदर्भग्रंथ लेखक हे निरीक्षणाधारीत संकलन करतो. तेच रामदासांनी येथे केले आहे. नाहीतर उद्या म्हणाल स्वतःला पोरे न होता,
लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली । बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥ लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं । ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥
असे कसे ते म्हणू शकतात? :-) संदर्भ ग्रंथातील अनेक गोष्टी या इतरांनी पण इतरत्र मांडलेल्या असू शकतात. रामदासांनी त्या ओवीबद्ध करून चपखल शब्दात सांगत समाजाला त्यांच्या पद्धतीने जागृक आणि व्यावहारीक करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते अनेकदा सांगितले जाते. नाहीतर "मूर्ख" या शब्दाच्या डिक्शनरी अर्थावरून चर्चा कशी होऊ शकेल? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकुशी सहमत आहे.

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/18/2012 - 11:32 नवीन
रामदास हे औरंगजेबाचे हेर होते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आलं

रमताराम
Fri, 05/18/2012 - 12:02 नवीन
आलं तिच्यायला काड्या सारायला. अवांतर: 'परा' हाच 'परशुराम' आहे असे आम्हाला आतल्या गोटातून समजले. त्याच्या परशुचे पाणी करून त्याने कळफलकाला पाजले आहे नि त्यामुळे त्याच्या कळफलकाने भल्याभल्या क्षत्रियांची दाणादाण उडवण्याचे कार्य अवलंबलेले दिसते. (आठवा कालच केलेली 'नि:सदस्य मिपा करण्याची घोषणा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

झालं

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/18/2012 - 12:22 नवीन
प्रतिवाद करता आला नाही की वैयक्तिक चिखलफेकीला सुरुवात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

खी: खी: खी:

रमताराम
Fri, 05/18/2012 - 12:38 नवीन
चांगलं तुला विष्णूचा अवतार म्हणतोय तर म्हणे चिखलफेक. चांगलं समुद्र सारून (कुठे? असला हलकट प्रश्न विचारू नकोस) भूमी निर्माण केल्याचे श्रेय दिले तुला तर म्हणे प्रतिवाद करता येत नाही. छ्या: जाउं द्या झालं. ज्याचं करायला जाव भलं... (स्वगतः आणि मला वाटलं होतं खूष होऊन त्या कोणशाशा राजाच्या जसं राज्य स्वाधीन केलेस तसे आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन

नाना चेंगट
Fri, 05/18/2012 - 12:39 नवीन
>>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.) सौदर्यफुफाट्याचा मोह पडला वाटतं म्हातार्‍याला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ह्म्म

रमताराम
Fri, 05/18/2012 - 13:47 नवीन
चोराच्या वाटा चोराला ठाऊक. उघड आहे हे. पर्‍याच्या क्याफेचा मोह पडायला दुसरे काय कारण असणार, ते शेजारचं दांडगं कुत्र? पण हे हितं झाईर करायची काय गरज होती? तुला पार्टनरशिप देणार होतोच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

चांगला लेख. आपल्या वडलांची

कवितानागेश
गुरुवार, 05/17/2012 - 23:09 नवीन
चांगला लेख. आपल्या वडलांची किंवा ज्यांचे वाक्य न वाक्य प्रमाण मानले जाते अश्या कुठल्याही बाबांची किर्ती सांगता न बसता स्वतः काहीतरी पराक्रम करावा असे समर्थ रामदासांना सांगायचय असे मला वाटते. किर्ती सांगू नये याचा अर्थ वृथा अभिमान बाळगू नये आणि तो लोकांवर लादू नये असा होतो, पण त्यांच्याबद्दल अजिबातच आदर/ आपलेपणा ठेवू नये आणि जुने ते सगळे फेकूनच द्यावे असाही होत नाही, हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! :)
  • Log in or register to post comments

योग्य मुद्दा

रमताराम
Fri, 05/18/2012 - 10:12 नवीन
हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. किंचित दुरुस्ती. 'कुणीच' दिसत नाही हे खरे नाही. असे लोक असतातच, फक्त ते अल्पमतात असतात. हे लोक सारासारविवेकाचा आधार घेत असल्याने ते नेहमीच आपल्या बाजूला असतील याची खात्री दोन्ही बाजूकडच्यांना नसते. त्यामुळे एक मत विरोधात व्यक्त केले त्यांनी की लगेच त्यांच्यावर 'तिकडचा' असा शिक्का मारून मोकळे होतात. असा शिक्का दोन्हीकडून पडल्याने त्यांचा तिसराच पंथ होतो. मूलत: सामाजिक प्राणी असल्याने माणसाला जमावाचा भाग असणे अधिक सुरक्षित वाटते. अल्पमतात राहण्यातली असुरक्षितता सहन न होऊन त्यातील भावनिकदृष्ट्या कमकुवत लोक निरूपायाने हा नाहीतर तो झेंडा खांद्यावर घेऊन जमावात सामील होतात. तिसरा गट आणखीनच अल्पमतात जातो. आणखी एक म्हणजे विचारहीन लोकांना हे लोक आज एका बाजूने बोलतात नि उद्या दुसर्‍या बाजूने एवढेच दिसते. त्यावरून हे दुटप्पी आहेत असा आक्षेप घेतला जातो. यात आपली समज कमी पडत असेल नि वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी त्या विसंगत नाहीत अशी शंकादेखील जमावात राहून फाजील आत्मविश्वास कमावलेल्यांना येत नाही. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, आपण त्यांची दखल घेत नाही इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>>त्यामुळे मला हल्ली फक्त

प्यारे१
Fri, 05/18/2012 - 10:26 नवीन
>>>त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! मला याबरोबर च 'कल्याण करी रामराया' देखील आठवतं! अपराधी जन चुकतचि गेले| .... कोठे जावे काय करावे|....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आपल्यातल्या जुन्या आणि

मृत्युन्जय
Fri, 05/18/2012 - 10:27 नवीन
आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे. बाकी या विषयावर या आधीच इतके लिहिले आहे की परत घसा (किंवा कळफलक) खरवडावा असे अजिबात वाटत नाही. दळण चालु द्यावे.
  • Log in or register to post comments

रेफरन्स फ्रेम

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 05/18/2012 - 12:17 नवीन
आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे
"असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी उत्तर देणार नाही असे जे

मृत्युन्जय
Fri, 05/18/2012 - 14:09 नवीन
मी उत्तर देणार नाही असे जे आपल्याला वाटते ते अतिशय बरोबरच आहे. मी उत्तर देणारही नव्हतो. पण आम्ही पडलो ररांचे फ्यान. त्यांच्यासारखेच " काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही" असे म्हणुन आम्ही एकदा शेवटचे उत्तर देतो. त्याला तुम्ही तेच तेच शिळ्या कढीला ऊत आणणारे प्रतिवाद करणार हे ही माहिती आहे . मग मीही माझ्या शिळ्या कढीला ऊत आणायला जावे अशी तुमची इच्छा असणार त्याला मी अर्थातच उत्तर देणार नाही कारण हा या विषयावरचा शेवटचाच प्रतिसाद आहे. "असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? सचिन तेंडुलकर हा आजघडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे हे वक्तव्य करताना "असे मला वाटते" असे लिहायची गरज नसते. त्याच्यावर आक्षेप घेणारेही काही लोक असतातच. त्यांना हे मत पटायचे नाहीच पण म्हणुन सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम मानणार्‍यांनी "असे मला वाटते" असे म्हणायची गरज नाही. असेही ९९% वक्तव्य हे " असे मला वाटते" या प्रकारातच मोडले पाहिजे. स्वतः आईनस्टाईन ने (शास्त्रीय) पुराव्यानिशी साबित केलेले काही सिंद्धांतही नंतर म्हणे खोटे ठरले. तो जिवंत असला असता बिचारा तर आज तुम्ही त्यालाही त्याच्या प्रत्येक सिद्धांतानंतर "असे मला वाटते" असे म्हणायला लावले असते. तुमची इच्छा अशीही असु शकते की प्रत्येक बापाने त्याच्या मुलांबद्दल " ही माझी मुले आहेत" असे म्हणल्यानंतर "असे मला वाटते" हे शब्द जोडावेत. त्याचीही खात्री कोण देउ शकते ना कारण? एक प्रकारे ते ही मतच असते. तर मित्रा प्रत्येक मत हे " असे मला वाटते" सदरातच मोडते. प्रत्येक वेळेस " मला असे वाटते" असे म्हणणे केवळ अयोग्य नाही तर हास्यास्पद ठरेल. मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे (अरे तुरे केलेले चालेल ना. नसेल तर कृपया इथे किंवा खरडवहीत तसे सांग.) म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. मी / आपण / आपला हा संदर्भ व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, घटनासापेक्ष आणी अजुन बराच काही सापेक्ष आहे. तर तो असा व्याख्येत बसवु पाहणे वेडगळपणाचे ठरेल. त्या त्या वेळी जे योग्य ठरेल तसा निर्णय घेणे योग्य ठरेल. मी / आपण / माझा ही आपली आयडेंटिटी झाली. ती काही एका फ्रेम मध्ये बसवता येणार नाही. वेळप्रसंगानुसार त्याचा आकार कमी जास्त करणे महत्वाचे. "मी " इतर काहीही असलो तरी एक सजीव माणूस नक्की असतो. ( माणूस किंवा सजीव असे तुम्ही का म्हटले असावे? सगळे सजीव हे मानव नसतात हे मान्य पण म्हणुन मनुष्याची ऐवजी मी स्वतःला सजीव समजले तर काही फरक पडेल काय?). मला वाटते आपल्या इतर सगळ्या आयडेंटिटीज त्याच्या खालच्या. म्हणजे असे बघा. एकाच वेळेस मी ब्राह्मण / मराठा / मागसवर्गीय ही असू शकतो. हिंदी / मराठी / बंगालीही असू शकतो. महाराष्ट्रीयन / बिहारी / बंगालीही असू शकतो भारतीय / इंग्रज / फ्रेंच / स्विसही असू शकतो , हिंदु / ज्यु / ख्रिश्चनही असू शकतो. मी जर महाराष्ट्रीयन मराठी ब्राह्मणा भारतीय असेन तर मला या सगळ्यांचा अभिमान असण्यात नक्की काय गैर आहे हे कळत नाही. जर मी यापैकी काहीही म्हणुन जन्म घेतला यात माझे कर्तुत्व काहीही नाही तसेच मी माणूस असण्यातही माझे कर्तुत्व काहीच नाही. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी स्वतःला मनुष्याच्या फ्रेममध्ये जरी बसवले आणी इतर फ्रेम्स जरी झुगारुन दिल्या तरी त्या मुळे नक्की फरक काय पडतो (काहीच पडत नाही) दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. परत तेच म्मित्रा. मी बेसिकातला गोंधळ दूर करु शकत नाही................ तु एखादा शब्दकोष बघावास हे उत्तम . एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. अभिमान आपल्या गोष्टींचा वाटतो. इतरांबद्दल फारतर कौतुक वाटु शकते. तुमचा मुलाने * कुठल्याही क्षेत्रात उत्तम यश मिळाले तर तो वाटतो तो आनंद + अभिमान. दूसर्‍याच्या मुलाने तेच यश मिळवले तर (जर असूय / द्वेष वगैरे वाटला नाही तर) हे वाटते ते कौतुक. कुठलीही गोष्ट आपली मानली की त्याचा अभिमान वाटतो इतके साधे समीकरण आहे. या केसमध्ये सचिन मराठी म्हणुन त्याचा अभिमान न वाटता मला वाटते तो भारतीय म्हणुन लोकांना त्याचा अभिमान वाटतो. तो भारतीय असण्याबरोबरच मराठीही आहे हा बोनस असू शकतो आणि सीकेपी लोकांसाठी तो कायस्थ आहे हा अजुन एक अभिमानाचा मुद्दा असू शकतो. त्यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे हा प्रश्न वेगळा पण अभिमान वाटत असेल तर काय प्रॉब्लेम आहे हा मुख्य प्रश्न आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आंबेडकरांचे घ्या. ते स्वतः मागासवर्गीय होते आणी त्यांनी समाजात एक उच्च स्थान स्वतःसाठी बनवले या गोष्टीतुन प्रेरणा घेउनच आज लाखो मागसवर्गीयांनी स्वत:चा उत्कर्ष साधला आहे. इथे आंबेडकरांचेही त्यांच्यासारखेच मागसवर्गीय असणे त्या लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरले, अजुनही ठरते आहे. मागासवर्गीयांनी इतिहासाच्या त्या पानावरुन प्रेरणा घेतली. तसेच जगातल्या प्रत्येक समाजातील लोक इतिहासातील कुठल्यातरी गोष्तीवरुन प्रेरणा घेउ शकतात. मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला त्या अभिमानाचे प्रेरणेत रुपांतर करता येते की नाही. पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही. त्यामुळेच आपल्या (सॉरी सॉरी आमच्या. तुम्ही वेगळे नाही का. विश्वचि माझे घर वगैरे वगैरे) तर आमच्या पुर्वजांचा आमच्या लोकांना अभिमान असला पाहिजे . उत्कर्ष साधण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे (तो एकच नाही हे मात्र नमूद करु इच्छितो. तुमच्यासारख्या काही लोकांना त्या टीच भर आणि फुटकळ इतिहासाचा शष्प अभिमान नसूनसुद्धा तुम्ही उत्कर्ष साधला आहेच की. त्याशिवाय याचीही नोंद घेतली पाहिजे की इतिहासाचा वृथा अभिमान असणारे आमच्यासारखे काही लोक किडे मकोडीकी जिंदगी जी रहे है) लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो: I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in the country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation." आता हा विचार त्या बिचार्‍या (स्वतःच्याच शब्दावर आक्षेप घ्यावासा वाटतो आहे पण ते नंतर कधीतरी) मॅकॉलेच्या नावावर फुकाचा खपवला जातो ही गोष्ट वेगळी पण जे लिहिले आहे ते (म्हणजे विचार) चुकीचे आहे असे 'मला तरी वाटत नाही'. थोडक्यात बोलायचे झाले तर अभिमान वाटणे हे "आपलेपणा" वाटण्याचे द्योतक आहे आणि या आपलेपणातूनच राष्ट्रनिर्मिती होते. नाहितर मला माझ्या भारतीय असण्याचा अभिमान वाटणार नाही आणि मग भारत काय पाकिस्तान काय एकच असा विचारही चुकीचा ठरणार नाही. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. बायस बायस म्हणातात तो हाच काय? मला या मुर्खपणाचा आणि प्रतिवादीकडुन केल्या जाणार्‍या त्याच त्याच प्रतिवादाचा कंटाळा आला आहे हे बरोब्बर ओळखले म्हणुन तुम्ही असे लिहिले असेल तर मात्र मला तुमचा अभिमान वाटतो बर का. ;) पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा. मी नक्कीच विचार केलेला आहे. पण त्या गोष्टी तुम्हालाच नीटश्या कळल्या नसल्याने (असे तुम्हीच म्हणालात हे मी इथे नम्रपणे नमूद करु इच्छितो) तुमचा थोडा गोधळ उडालेला असू शकतो. तरी पुढच्या वेळेस या किंवा श्या प्रकारच्या वक्तव्यांवर आक्षेप घेण्यापुर्वी या दोन गोष्टींचा तुम्हीच नीटसा विचार करावा असा सल्ला देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

अरे वा !

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/18/2012 - 14:11 नवीन
तू पण टंचनीका ठेवलीस का रे ? येतो संध्याकाळी भेटायला. बरेच दिवस झाले भेटून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गीता पाठ दिसते हं लब्बाडाची.

नाना चेंगट
Fri, 05/18/2012 - 14:13 नवीन
गीता पाठ दिसते हं लब्बाडाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हा प्रतिसाद सगळ्याच

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 05/18/2012 - 15:28 नवीन
हा प्रतिसाद सगळ्याच अभिमान्यांना उद्देशून आहे. तुमच्यासारख्या अभिमान्यांना subjective आणि objective मधला फरक माहित नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सचिन तेंडुलकर हा आघाडीचा फलंदाज आहे हे दिलेले उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. सचिनने १०० शतके केली, ३०-३२ हजार रन्स काढल्या आणि तितकी शतके/धावा इतर कोणाही फलंदाजाने काढलेल्या नाहीत हे कोणालाही सहजपणे पडताळून बघता येईल. तेव्हा सचिन हा धावा/शतके या बाबतीत आघाडीचा फलंदाज आहे हे झाले objective statement. आईनस्टाईनने किंवा कोणाही शास्त्रज्ञाने मांडलेली समीकरणे त्या विषयाची पाहिजे तेवढी माहिती असलेल्या कोणालाही पडताळून बघता येतील. आणि ती चुकीची असली तर ती नाकारताही येतील. तेव्हा ही समीकरणे ही objective statement असतात. पण सचिन सर्वात "तंत्रशुध्द" फलंदाज आहे असे कोणी म्हटले तर ते झाले subjective statement. कारण नक्की कोणाला तंत्रशुध्द म्हणावे याविषयीचा एक ठोकताळा नक्कीच नाही आणि म्हणून कोणी सचिनला तंत्रशुध्द म्हणेल कोणी म्हणणार नाही. तेव्हा कोणत्याही subjective statement ला "माझ्या मते" हे qualification असतेच. त्याच धर्तीवर तुमचे न्यूनगंडावरील वाक्य झाले. अर्थात हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले डोळे झाकून स्विकारणाऱ्यांना असे काहीतरी लिहिलेलेच objective वाटत असल्यामुळे एवढा साधा फरकही तुम्हाला कळला नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही.
हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे
माझ्या बेसिकमध्ये कसलाही गोंधळ नाही (तसा गोंधळ माझ्यात आहे असे तुम्हा अभिमान्यांना वाटत असले तर मी योग्य मार्गावर आहे याचे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक आहे ते माझ्यासाठी). आणि इतरांना माझ्यात वाटत असलेले "बेसिक गोंधळ" दूर करण्यापेक्षा इतर अनंत पटीने अधिक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे आहेत आणि मी त्या करतोही.
पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही.
अजिबात नाही.मला स्वत:ला मला काही न करता on platter मिळालेल्या एकाही गोष्टीचा अभिमान नाही तरीही कोणत्याही प्रेरणेत मी कमी आहे असे कोणी म्हणत असेल तर अशा गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. साध्या शब्दात म्हणायचे तर मुळातल्या अनाठायी अभिमानाचे समर्थन करण्यासाठी त्या अभिमान्यांनी "अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हे निखालस धाधांत खोटे वारंवार ठासून सांगितले आहे. मुळात माणूस गुहेतून बाहेर आला आणि शेती करायला लागला तेव्हा आपले पोट भरणे आणि सुरक्षितता या प्रेरणा त्याच्याकडे होत्याच की. तेव्हा कसला अभिमान होता त्याच्याकडे? धर्म-जाती-परंपरा या सगळ्या नंतरच्या काळातला अर्थात गुहेतून बाहेर येताना माणसाला त्या गोष्टींचा "अभिमान" नव्हता. तरीही माणसाने प्रगती केलीच ना? तेव्हा "मुळात अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हा मुद्दा पूर्णपणे बाद.
लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो
आता अभिमान्यांना का एका इंग्रजाने म्हटलेल्या वाक्याचा आधार घ्यावा लागत आहे? (धर्म-जात आणि फालतूचे अभिमान याच्या अनंतपट पुढे निघून गेलेले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा