Skip to main content

अळुवडी ( क्रिस्पी -कुरकुरी )

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/05/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अळूवडी ( क्रिस्पी) साहित्य : १) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम ) २) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते ) ३) हिरव्या मिरच्या ७-८. ४) लसूण पाकळ्या ७-८. ५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा . ६) गुळ १ छोटा चमचा (किसून) ७) चिंचेचा कोळ १ चमचा . ८) मीठ चवीनुसार . ९ )तळण्यासाठी तेल . १० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल). कृती :- अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या . अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ कापून घ्या . आता हिरव्या मिरच्या अन लसूण याच वाटण करून घ्या . एका बाउलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या ,मिश्रण जास्ती पातळ नको जास्ती घट्ट नको ,मध्यम ठेवा आता एक पान घ्या ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या आता त्यावर पुन्हा एक पण ठेवा ,परत सेम कृती करा ,असे कमीतकमी ३-४ पानाच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या नंतर ह्या पानाचा अलगद गुंडाळी करा एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा चाळण फिट्ट बसेल अशा आकाराचे एक पातेले घ्या त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा साधारण १०-१५ मिनिट वड्या उकडून घ्या सुरी खुपसून पहा जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली समजावी आता ह्या उकडलेल्या वड्या थोड्या थंड होऊ द्या. आता वड्याचे काप करा ,जर तुम्हाला वड्या क्रिस्पी अन कुरकुरीत हव्या असतील तर काप पातळ करा अन जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या थोड्याश्या लालसर होईपर्यंत !! क्रिस्पी अळूवड्या तयार आहेत . आमच्याकडे सर्वाना कुरकुरीत वड्या आवडतात .म्हणुन मी शक्यतो कुरकुरीत होइस्तोवर तळते ,तुम्हाला जर ओलसर ह्व्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही :) ( * अळूची पाने मोठी असतील तर त्यामुळे हमखास घसा खवखवतो म्हणूनच पाने छोटी अन कोवळी वापरावीत. अन नाहीच मिळाली तरी चिंचेचा कोळ अन गुळ घातल्यामुळे घसा खवखवत नाही ) ( अन हो .....मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) ;) धन्यवाद :)

वाचने 26929
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

सुंदर.

पिवडे, मस्त, यम्मी, टेम्प्टींग, छानच..! आता खरं खरं सांगायचं... अळूवड्या कुणी केल्यात?

सुगरण आहे हो पोरगी. पुढच्यावेळी कोंथीबीरीच्या वड्या येऊ द्या. बाकी ह्या वड्या चकण्याला फारच अप्रतिम.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुन्हा चालू केलेस की काय. ;) बाकी "सुगरण आहे हो पोरगी" या वाक्याबद्दल प्रत्यक्ष भेटीत बोलण्यात येइल.

In reply to by चिंतामणी

पुन्हा चालू केलेस की काय.
असे काय नाय. आठवड्यातून एखादी हजेरी होते असे गणीत आहे सध्या.
बाकी "सुगरण आहे हो पोरगी" या वाक्याबद्दल प्रत्यक्ष भेटीत बोलण्यात येइल.
अप्रत्यक्ष भेटीत बोलले तरी हरकत नाही. पियुशा सुगरण आहे हा आमचा 'अनुभव' आहे. फटू बघून दिलेले मत नाही. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

पियुशा सुगरण आहे हा आमचा 'अनुभव' आहे. हे ऐकुन बरेच काही समजले. :D उरलेले भेटीअंती समजावुन घेइन.

In reply to by प्रचेतस

काकासाहेब गाडगीळ पुलावरुन उतरुन गाडी न वळवता सरळ जंगली महाराज रस्त्यावर ज्या दुकानात शिराल ते सोहम... स्प्राइट वे (सिधी बात, नो बकवास) : डेक्कन साइडने झेड ब्रिज उतरुन डायरेक्ट ज्या घरात जाल ते सोहम...

In reply to by वपाडाव

म्हणजे गाडी पार्किंग पण दुकानातच आहे काय, वा काय सोय आहे. धन्यवाद माहितीसाठी. सोहम, दुकान आहे की घर ? काकासाहेब गाङगीळ पुल म्हणजे कुठला ? कोणी व कुठुन पराभुत होउन परत येण्यासाठी हा पुल बांधला होता?

In reply to by चिंतामणी

नाही हो, म्या पामराकडुन हा अपराध घडला खरा, आता त्याचे प्रायश्चित घ्यावे हेच बरे. कधी जावे बरे या तीर्थक्षेत्री, आपण सुद्धा याल सोबत तर उत्तम होईल.

In reply to by चिंतामणी

कुणाला सांगताय हे, चिंतामणी काका? आधीच ग्यास पेटवायचा कसा हे म्हैत नै, अन त्यात हे दिव्य... उगाच ह्या वयात मजाक शोभतो का?

In reply to by वपाडाव

ह्म्म. काकांनी नसल तरी काकुंनी झालच तर धम्या, बिका इ. नी आमच्या पाकृ चे फटु पाह्यलेत . त्यामुळे वरील खोचक प्रतिसाद बाद

In reply to by प्रीत-मोहर

एक साक्षीची म्हण आठौली आहे पण प्रतिसादाला पंख लागण्याच्या भयाखातर देत नाही... तरीही समझदार को इशारा वेग्रे वेग्रे आहेच...

In reply to by चिंतामणी

गपा हो. कित्ती काम असतात ना मला? हापिसात मर मर काम करा, घरीसुद्धा येउन राबा. कुणी सांगितलय ते? त्यापेक्षा सोहम/ मथुरा महाराष्ट्रियन/ गिरीजा / बापट ब्येश्ट

In reply to by प्रीत-मोहर

बापट म्हणजे बाजीराव रोडनजीकचेच का? आहा काय ठिकाण आहे.. सर्वत्र सूचना , इशारे आणि सुविचार .. आणि फक्कड चव आहे सर्व पदार्थांची. खाणे संपूच नये असं वाटतं तिथे.. मेथीचे पराठे / आलू पराठे एकदम घरी असतात तसे तव्यावरचे गरम आणि लोण्यासहित. शिवाय खिचडी मिसळी आणि अन्य पदार्थांविषयीही काय बोलावे... एकदम परफेक्ट..

In reply to by वपाडाव

पुण्यातले अ‍ॅड्रेस डीटेलमधे सांगणं आमच्या शक्तीबाहेरचं आहे. कारण आम्ही दोनेक वर्षेच पुणेकर होतो.. बाजीराव रोडवरुन जवळ आहे इतकं माहीत आहे. वाहन घेऊन किंवा चालत जातो नेहमी. नेमका रस्ता सांगण्याबाबत मी एकूणच एकदम अधू आहे. तिथे आलो तर घेऊन जाऊ शकेन. जवळ कोणतेसे संग्रहालय आहे चूभूदेघे.

In reply to by गवि

केळकर संग्रहालय आहे त्या बाजुला. अतिशय सुंदर आहे ते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत तिथे इतिहास कालीन . तिथेच जवळ्च आहे बापट .

In reply to by वपाडाव

हॉटेल खैबरचे शेजारी. काकासाहेब गाडगीळ (उर्फ प्रेमळ जोडप्यांचा (वाय) झेड) पूलाचे समोर. स्टेट बँकेशेजारी.

In reply to by चिंतामणी

"बापट" हे जंम रस्त्यावर आहे? आँ? नाही मग मी वर्णन केलेलं सुविचारस्थळ वेगळं.. ते निश्चित बाजीराव रोडनजीक आहे.

In reply to by गवि

बापट बाजीराव रोड ला. गिरीजा टिळक रोड ला./ कर्वे रोड ला. सोहम मथुरा महाराष्ट्रीयन जं. म रोड ला

In reply to by गवि

वरती बापटांचा पत्ता आला होताच. सोहमची चर्चा चालू होती. त्यामुळे मला असे वाटले की तुम्हाला सुध्दा सोहमचा पत्ता पाहीजे आहे.

In reply to by चिंतामणी

मागची २ वर्षे अविरत जंम रस्त्यावर फिरतो आहे. हे "बापट" तेथे असणे नाही... आपली ज्याम गफलत झाली असावी... खैबरच्या बाजुला सोहम आहे...

In reply to by वपाडाव

बाजीराव रोडवर जा आणि केळकरांच संग्रहालय विचार.....शेंबड पोर सुद्धा सांगेल, मग २-३ तास तो संग्रह बघ आणि मग शेजारीच बापट आहे, भुक लागली असेल तर......

In reply to by मनराव

बाजीराव रोडवर शेंबड पोर न मिळाल्यास काय करावं ते पण सांगा. बाकी संग्रहायलातले अडकित्ते तेवढे लक्षात आहेत, पण हल्ली ते काढुन ठेवले आहेत असं समजलं झिग्रेडी सारे.

In reply to by ५० फक्त

>>बाजीराव रोडवर शेंबड पोर न मिळाल्यास काय करावं ते पण सांगा. एकुणच पुण्यात काही कमी नसावी , म्हटले आहे ना "पुणे तिथे......" ;-)

In reply to by प्रीत-मोहर

मला म्हणत असशील तर तुला उत्तर देतो. अग हलकट मुली, ती तुझी लाडकी मैत्रीण पियूषासुध्दा काम करते ना. त्यानंतरच तीने हे बनवले आहे. अर्थात आय.टी. म्हणल्यावर................................. बादवे. राग कशाचा आला नक्की??????? कर म्हणल्याचा की .............:D

जियो.. एकच शंका : तळाव्यात असे लिहून फटू मात्र तव्यावर भाजतानाचा दाखवला आहे. शॅलो फ्राय करायचे असल्यास जाडसर ठेवाव्या असे म्हणून संभ्रम आणखी वाढला आहे. शॅलो फ्राय म्हणजे माझ्या मते तव्यावर अथवा पॅनमधे थोड्या तेलावर परतणे. अशा वेळी जाडसर ठेवणे योग्य ठरणार नाही. डीप फ्राय म्हणजे तळणे या बाबतीत जाडसर ठेवलेल्या चालाव्यात असं वाटतं. शिवाय या तळायच्या की तव्यावर परतायच्या हे स्पष्ट होत नाहीये? की दोन्हीपैकी काहीही चालेल? इकडे पात्रा या नावाने दुकानात तयार मिळणार्‍या अळूवड्या नुसत्याच उकडलेल्या असतात की काय अशी शंका येते. बेचव नुसत्या.

In reply to by गवि

अगदी असंच माझ्याही मनात आलेलं.
जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील
आणि
आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या थोड्याश्या लालसर होईपर्यंत !!
अशा ठिकाणी काही संपादन करता यावं असं वाटतं. बाकी
तुम्हाला जर ओलसर ह्व्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही
अळूच्या वडीच्या ओलेपणाचा लालसरपणाशी असलेला संबंध काही कळला नै ब्वॉ..... ;-) पियु बैंची पाककृती छानच आहे. (दिसायला तरी) आवडली. :-) चला आता ते हिरा बेसन इथे शोधणे आले..... ;-)

In reply to by गवि

@ गवि ,अन प्रास एकच शंका : तळाव्यात असे लिहून फटू मात्र तव्यावर भाजतानाचा दाखवला आहे. गवि तो तवा नाहिये ,पोळपाट आहे तो काळा कडप्प्याचा :) त्यावर कापल्यात वड्या मी . शॅलो फ्राय करायचे असल्यास जाडसर ठेवाव्या असे म्हणून संभ्रम आणखी वाढला आहे. शॅलो फ्राय म्हणजे माझ्या मते तव्यावर अथवा पॅनमधे थोड्या तेलावर परतणे. अशा वेळी जाडसर ठेवणे योग्य ठरणार नाही. मी बर्याच जणांकडे अशा जाडसर वड्या नुसत्या तेलात शॅलो फ्राय करुन वरुन खोबर किसुन घालतात हे पाहिल आहे .अन वड्या खाल्ल्ल्याही आहेत ,पण आमच्याकडे शॅलो फ्राय करत नाहित बहुधा उकडीचा ओलसरपणा रहावा म्हणुन थोड्या जाड काप शॅलो फ्राय करत असतील असा माझा अंदाज आहे :) डीप फ्राय म्हणजे तळणे या बाबतीत जाडसर ठेवलेल्या चालाव्यात असं वाटतं. जाडसर ठेवलेल्या वड्या लवकर कुरकुरीत होत नाही ,एकतर त्या आतुन कच्च्या राहत्तात नाही तर क्रिस्पि होण्याकरीता खुप तळाव्या लागतात . त्यापेक्षा काप पातळ असतील तर क्रिस्पि होतील अन वेळ्ही वाचेल. शिवाय या तळायच्या की तव्यावर परतायच्या हे स्पष्ट होत नाहीये? की दोन्हीपैकी काहीही चालेल? दोन्हीही प्रकार चालतील .युवर चॉइस :)

मस्त ग, जमल्या की तुला! आता ढोकळ्याचा नंबर !! :)

अळुवड्या म्हणजे आपला वीक पाँईट.. च्यायला आणि तेच दाखवल्यावर जीभ चाळवणारच ना.. - (अळुवड्याप्रेमी) पिंगू

दोन शंका दूर कर. पाने छोटी असतील तर खाजरी नसतील कशावरून? खाजरी आहेत की नाहीत हे घेताना कसे कळते? फोटो छान आहेत. पण ती क्रिस्पी -कुरकुरी झाली की नाही खाल्ल्याशीवय कसे कळणार? तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. नगरला येण्या अगोदर फोन करतो. वड्या खाउन मग क्रिस्पी आहेत की नाही हे लिहीतो. ;)

धो धो पावसात ही अशी गरमा गरम आळुवडी किंवा खेकडा कांदा भजी + तळलेल्या मीरच्या मीठ टाकुन आणि सोबत आवडीच पेय (गवती/ आले चहा, फेसाळणारी कॉफी पासुन स्कॉच ते रम पर्यंत काहीही...... जे मिळेल ते) व नसंपणा-या गप्पांची मैफल .............म्हणुनच या जगण्यावर शतदा प्रेम करावे . एका सुग्रणी कडी अशीच अविट चविची आळुवडी हादडली होती. तीच्या म्हणण्यानुसार थोडी तांदळाची पीठी कोणत्याही तळणातील बॅटर मधे वापरल्यास पदार्थ अजुन कुरकुरीत होतात. काही जण वाफवलेल्या वड्यावंर ढोकळ्या प्रमाणे वरुन फोडणी पण देतात. ह्या वड्यांसोबत चिंच,खजुर्,गुळाची आंबट गोडचट्णी मस्तच लागते

, उगा सॉस मध्येच कुठून? - ठिक आहे हा प्रश्न विचारत नाही, पण मग अळुवड्यांच्या ट्रे मध्ये ती कोथिंबिरीची काडी का ठेवली / पड्ली / टाकली आहे, असा प्रश्न चालेल काय ? आणि ते पोळपाटाचं सांगितलंत बरं झालं, उगा घोळ नसता. बाकी, अजुन काय म्हणताय, हे उन्हाळ्यात गप वाटी दोन वाटी रस पिउन झोपायचं सोडुन हे असलं बरं सुचतं ओ तुम्हाला.

लै भारी ग पिवशे... अश्या कुरकुरीत अळुवड्या संध्याकाळच्या आले आणि गवती चहा घातलेल्या चहा सोबत पुढ्यात आल्या तर क्या केहने. पण जेवणात असताना मात्र मला नारळाच्या दाट दुधात आटवुन केलेल्या अळुवड्याच जास्त आवडतात. :) चला लवकरच अळुवड्या करणे आले.

In reply to by गणपा

हे मी प्रथमच ऐकतो आहे. गंपा दादा लवकर शिकवा आम्हाला. खुप दिवसात तुम्ही मुदपाकखान्यात पाउल ठेवलेले नाही.

In reply to by गणपा

नारळाच्या दुधातल्या वड्यांची पाकृ द्यावी ही विनंती. आजकाल फार विनंत्या वै. कराव्या लागतात हां गणपा. बिनसलय काहीतरी या बुवाचं.

In reply to by रेवती

हल्ली आयत ताट हातात मिळतय तर का जावं म्हणतो किचन मध्ये? ;) इथे सध्या अळुवडीची पानं मिळत नहियेत. पण परवाच दुकानात अळुवडीचा टिन मिळाला. लवकरच नारळाच्या दुधातल्या अळुवड्यांचा फटु इथेच अपडेट करण्यात येतील असे आश्वासन देतो. :)

चला, आता पियुशा शोधणे आले! ;)

In reply to by कवितानागेश

असेच म्हणते :)

पिवशी अगदी सुगरण झाली हो :) माझ्या आवडीच्या अळूवड्यांची पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद! वड्या अगदी टॅम्टिंग दिसत आहे. मलाही डिप फ्राय केलेल्या क्रिस्पी वड्याच आवडतात. आता इकडे अळूची कोवळी पाने शोधणे आले ;)

वड्या कमीत कमी तेलावर लालसर रंगावर परताव्यात. छान कुरकुरीत होतात. नंतर त्यावर मोहरीची फोडणी देऊन किसलेला ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सजवावे. अशा वड्या घट्ट दह्या बरोबर झकास लागतात असा अनुभव आहे. अवांतरः कडप्पाच्या काळ्या पोळपाटा शेजारी ती २-३ चॉकलेटं पडली आहेत का?

सहीच ग.. आता हुरडा पार्टीला भेटू तेंव्हा.. अळूवड्या पण कर सोबत काय ५०? ;)

मस्त गं पिवशे!.... फोटो आणि पा.कृ. दोन्ही मस्त आहेत!!!!!! :) .मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) Wink धन्यवाद हे वाक्य आवडल्या गेले आहे!! :)

मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ?
हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे असावे अशी शंका येतेय. सॉसबरोबर वडी खायला आवडते .......... ह्यापेक्षा .......... वडीबरोबर सॉस खायला आवडतो.......... हे वाक्य जास्त शोभुन दिसले असते नै का?

In reply to by वपाडाव

पेठकरकाका जरा नजर फिरवा बघु. कशाला उगीच भरीस पाडता आहात? मिपावर आमचा व्याकरणाचा सुंभ कधीच जळला आहे आता पिळ जायची वाट पाहतो आहे. तुम्ही म्हणता म्हणून होSS. मला तरी वाक्य योग्य वाटते आहे. वड्या खाणे मुख्य आहे, सॉस बरोबर की दह्या बरोबर हे दुय्यम आहे. सॉस कशा बरोबर खायला आवडतो हा मुद्दा नसून वड्या कशाबरोबर खायला आवडतात हा मुद्दा आहे. असो.