✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आभासी उपकरणन-३

न
नरेंद्र गोळे यांनी
गुरुवार, 05/03/2012 - 09:44  ·  लेख
लेख
आभासी उपकरणन: संकल्पना आजकाल निरंतर संकेत, अंकित संकेतांच्या मानाने चांगले मानले जात नाहीत. ह्याची दोन कारणे आहेत. एक तर दर्शनाचे दृष्टीने सापेक्षपृथकता, आणि दुसरं म्हणजे संस्करणसुलभता. निरंतर संकेतांची दर्शनाचे दृष्टीने सापेक्षपृथकता सीमित असते. उदाहरणार्थ: निरंतर संकेतात एकदशलक्षांश सापेक्षपृथकता मिळवण्यासाठी एक किलोमीटर लांबीची मापनपट्टी लागेल तर अंकित संकेतात तेव्हढीच सापेक्षपृथकता मिळवण्यासाठी फक्त सहा आकडी अंकित-संकेत-दर्शक पुरेसा ठरेल. अलीकडेच उपलब्ध झालेल्या दृतगती (फास्ट), कार्यक्षम (एफिशियंट) आणि यथातथ्य (अक्युरेट) संस्करण क्षमतेमुळे अंकित संकेतांचा उपयोग आणखीनच सुलभ झाला आहे. याशिवाय, आवृत्ती-जनक (फ्रिक्वेन्सी आऊटपुट) संवेदकांचा (जसे: चक्रवर्ती प्रवाह मापक- व्होर्टेक्स फ्लो मीटर) विकासही अंकित संकेतांचा पक्षधर राहीला आहे. पारंपारिक उपकरणे, मुळात सहा वेगवेगळ्या प्रकारे अधिगृहित माहितीचे प्रदर्शन वा नियंत्रण, चालकास उपलब्ध करून देतात. ते आहेत: १. निरंतर संकेत दर्शक, अंकित संकेत दर्शक, अंकदर्शक २. य-क्ष आरेखक, य-समय आरेखक, पट्टरूप आरेखक (स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर), गोलाकार आरेखक ३. चालू-बंद निदर्शक, मापनसीमापार लक्षवेधक (अलार्म इंडिकेटर), स्थितिनिदर्शक (स्टेटस इंडिकेटर) ४. माहितीसूची (डाटा लिस्टस), माहिती तालिका (डाटा टेबल्स) ५. उभे व आडवे दंडदर्शक (बार टाईप इंडीकेटर्स), गोलाकार हिस्सा दर्शक (पाय टाईप इंडीकेटर्स) ६. नियंत्रण खिटया (कंट्रोल नॉब्स), दाबकळा (पुश बटन्स), खटकें (स्विचेस), अविरत चक्रनियंत्रक (कंटिन्युअस रोटेटिंग नॉब्स), अंगुष्ठवर्तित चक्र (थम्ब व्हिल्स) हे सारे प्रकार संगणकाच्या पडद्यावर सहज साकार करता येतात. म्हणून प्राय: सगळी उपकरणे संगणकावर साकारता येतात. इथे, एक आकृतिकल्पन (कॉन्फिगरेशन) दिले आहे. यात एक सर्वसाधारण, औद्योगिक-स्वीय-संगणन-चलित पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती अधिग्रहण प्रणाली दिसून येते. ३२ संवेदकांकडून प्राप्त होणारे संकेत, एका तारांतका (टर्मिनेशन) वर आणलेले आहेत. अशा चार तारांतकांना, चार वेगवेगळ्या चयनकांशी जोडलेले आहे. चार चार चयनक प्रत्येक डब्यात दाखवलेले आहेत. असे दोन डबे, ६८ तारांच्या तारगुच्छाद्वारे, एकसर जोडलेले आहेत आणि त्या तारगुच्छद्वारेच औद्योगिक-स्वीय-संगणकाशी जोडलेले आहेत. औद्योगिक-स्वीय-संगणक, वर्धित तापमानावर, अविरत चालण्याची क्षमता राखतात. ते औद्योगिक स्पंदनांसाठी अबाधित राखले जातात. धूळ आणि प्रदूषणांपासूनही मुक्त राखण्यासाठी व शीतनासाठी गाळणीवाटे वायुवीजनाची वेगळी व्यवस्था असते. एरव्ही, हे साधारण स्वीय-संगणकच असतात. आभासी उपकरणनाच्या विविध कार्यप्रणाली, संगणकाकडून चयनकाद्वारा कोणत्याही एका वेळी, आळीपाळीने एकेका वाहिनीची निवड करून, त्याद्वारे मिळणार्‍या संकेतांचे अंकन व संग्रहण करण्याची क्षमता ठेवतात. आभासी उपकरणनाचे फायदे रचनासहज, संस्करणसुलभ, लवचिक कार्यप्रणाली-लेखन आणि दोन्ही अक्षांमध्ये अधिगृहित अंतिम माहिती घटकापर्यंत दर्शन करविण्याची विस्तार/संकोच सुलभता, आभासी उपकरणनाची प्रमुख उपलब्धी आहे. आभासी उपकरणन, नियंत्रण कक्षांत चालकास संयंत्रस्थितीचे सम्यक दर्शन करवते, आणि अधिगृहित माहितीचे संस्करण सोपे बनवते. खुली प्रणाली अनुबंध (ओपन सिस्टिम इंटरकनेक्ट) आधुनिक विजकविद्या (इलेक्ट्रॉनिक्स) आणि उपकरणन यांचा आवश्यक गुण आहे. खुल्या विशिष्टतेमुळे निर्माता आपल्या पसंतीचे उपकरण बनवून त्यास दुसर्‍या निर्मात्यांच्या उपकरणांशी परस्परानुकूल (कॉम्पॅटिबल) राखू शकतो. उपभोक्त्याला परस्परपुरकता (कॉम्पॅटिबिलिटी) पारखण्याची गरज राहत नाही. आभासी उपकरणन खुली प्रणाली अनुबंध स्वीकारते. त्यामुळे आभासी उपकरणनात, उपभोक्ता स्वत:ला आवश्यक असलेली सामुग्री आणि कार्यप्रणाली अखंड नियंत्रण प्रणालीमध्ये वापरू शकतो. आभासी उपकरणनामध्ये चयनक (मल्टिप्लेक्सर) आणि संकेत स्थितिनिवारक (सिग्नल कंडिशनर) यांना संवेदकाजवळ ठेवतात. त्यामुळे शेकडो चलांची संकेत-माहिती एकाच तारगुच्छावर मुख्य संगणकापर्यंत आणली जाऊ शकते. परिणामत: संदेशवहन तारांचा खर्च बराच कमी होतो. याव्यतिरिक्त आभासी उपकरणनाचा आणखीही एक फायदा होऊ शकतो. तो म्हणजे सुटसुटीत (पोर्टेबल) नियंत्रण कक्ष. मुख्य संगणक सुटसुटीत असल्याने, विविध प्रयोगांना लागणारी साधनसामग्री तयार ठेवून, प्रयोग मुख्य संगणकास आळीपाळीने जोडून आणि त्यात संबंधित कार्यप्रणाली चालवून संशोधन साधता येते. यामुळे पारंपारिक ग्राहक-उपकरणांवर होणारा विनिवेश मोठया प्रमाणावर कमी केला जाऊ शकतो. माहिती (डाटा/इन्फॉर्मेशन)-प्रवाह चित्रनिर्भर कार्यप्रणाली लेखन कुठल्याही सामान्य संकेत-अधिग्रहण-वाहिनीचे घटक असतात संवेदक, पारेषक, निरंतर-संकेत-अंकक आणि मुख्य संगणक. यांना पारंपारिक दृष्टीने 'घटक' (ब्लॉक्स) म्हणतात. संपूर्ण वाहिनी, घटकांच्या माहितीग्रहण समयानुरूप, यथास्थान जोडून तयार होते. अशा नकाशाला 'घटकचित्र' (ब्लॉक डायग्राम) म्हणतात. घटकचित्र बनवणे फारच सोपे असते. जर वाहिनीची कार्यप्रणाली लिहिण्याचे काम घटकचित्र लिहिण्याएव्हढे सोपे असते तर उपभोक्ते हे काम स्वत:च करू शकतील आणि त्यासाठी कुणा विशेष लेखकाची जरूर राहणार नाही. पण घटकचित्रांची कार्यप्रणाली लिहिणे केवळ विशेषज्ञांनाच शक्य असते. म्हणून घटकचित्रांचे कार्यप्रणाली-लेखन विशेषज्ञ करतात, तर घटकांपासून घटकचित्रे बनविण्याचे सोपे काम उपभोक्ते, आवश्यकतेनुसार घटकांची जोडतोड करून करतात. माहिती-विनिमय-तारगुच्छ (इन्फॉर्मेशन एक्स्चेंज बस-माविता) अंकित-संकेत-संस्करण सुलभ असते. सर्व पारंपारिक उपकरणे संगणक पडद्यांवर साकार होऊ शकतात. मात्र जर संकेत अधिग्रहण वा पारेषण दृतगती नसेल तरीही आभासी उपकरणन एक स्वप्नच राहील. आज संकेत-अधिग्रहण १ लाख एकके प्रती सेकंद आणि पारेषण १० कोटी एकके प्रती सेकंद या गतीनी होऊ शकते. म्हणून शेकडो चलांची अद्यतन स्थिती मुख्य संगणकच्या पडद्यावर एकाच वेळी उपलब्ध होते. यामुळे आभासी उपकरणन शक्य झाले आहे. त्याचे रहस्य प्रगत `माविता' आहे, ज्याच्या असण्याने दृतगती पारेषण शक्य झालेले आहे. आभासी उपकरणन कार्यप्रणालींचा परिचय हल्ली आभासी उपकरणनाच्या सार्‍या कार्यप्रणाली रोमन लिपीमधेच लिहिल्या जातात. म्हणून संगणन पडद्यावरील जी चित्रे इथे दर्शवलेली आहेत ती सर्व रोमन लिपीतच जशीच्या तशी ठेवलेली आहेत. पण त्याव्यतिरिक्त जे विवरण इथे दिलेले आहे ते देवनागरीत लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. लॅबव्ह्यू-६.१ (लॅबव्ह्यू-६.१-लॅबोरेटोरी व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरींग वर्कबेंच अथवा प्रयोगशालेय आभासी उपकरणन-योग्य अभियांत्रिकी कार्यमंच-६.१) हे नॅशनल इन्सट्रुमेंटस यु.एस.ए. द्वारा विकसित, उपभोक्तासुलभ, उपायोजन कार्यप्रणाली लेखन-योग्य, विकसन-पर्यावरण (डेव्हलपमेंट एन्विरॉनमेंट) आहे. यात चित्रनिर्भर कार्यप्रणाली लेखनामुळे सामान्य उपभोक्त्यांसाठी, मापन आणि स्वयंचलन-उपायोजन-प्रणाली-लेखन, सुलभ झाले आहे. लॅबव्ह्यू, रुंद-पल्ला (वाईड रेंज) साधन-सामुग्री व कार्यप्रणालींच्या आकृतिकल्पनासठी (कॉन्फिगरेशन) रुपकसाधने (फिचर्स) उपलब्ध करून देते. लॅबव्ह्यू मध्ये बनवलेली प्राथमिक संचिका (फाईल) `आभासी उपकरण म्हणविली जाते. तिचा विस्तार असतो .vi, उदाहरणार्थ `basic.vi' या .vi विस्ताराची संचिका लॅबव्ह्यू मध्येच उघडते. या प्रकारच्या संचिकेचे तीन आविष्कार असतात. एक `अग्रपटल', दुसरा `घटकचित्र' व तिसरा `प्रकटनचिन्ह व संबंधन'. संचिका उघडल्यावर पहिले दोन आविष्कार संकलित व संपादित करता येतात. तिसरा आविष्कार, ही संचिका जेंव्हा दुसऱ्या संचिकेमध्ये वापरल्या जात असेल, तेंव्हा त्यात हिचे अस्तित्व दाखवण्यासाठी उपयोगात आणतात. हेच आकृती क्र.१ मध्ये दर्शवलेले आहे. Sketch मुख्य प्रसूची पट्टी, अग्रपटल व घटकचित्र यांच्या पडद्यांवर शिरोरेखेगत राहते. यात विविध, रूपके उपलब्ध केली जातात. ज्यांमुळे प्रणालीलेखन सुलभ होते. हेच आकृती क्र.२ मध्ये दर्शविलेले आहे. F-1 अवजार तबक, अग्रपटल व घटकचित्र या दोन्ही पडद्यांवर हजर असतं. यात दहा अवजारांची प्रकटन चिन्ह दिसतात. अवजार, मूषकसुईचे एक विशेष कार्यकारी रूप असते. सुई, निवडलेल्या अवजाराचे प्रकटन चिन्ह धारण करते. ही अवजारे अग्रपटल व घटकचित्रांच्या संपादन तसेच कार्यप्रवण करण्याच्या कामी येतात. जर स्वयं-अवजार-निवडीचा पर्याय स्वीकारलेला असेल तर सुई घटकचित्रातील कोणत्याही वस्तूवर ठेवण्याचा अवकाश, लॅबव्ह्यू आपोआप अवजार-तबकातील संबंधित अवजार उचलून घेते. हातासारखे दिसणारे पहिले अवजार पकडून मूषकाद्वारे चलांचे मूल्य बदलता येते. बाणासारखे दुसरे अवजार घटकचित्रे निवडण्यासाठी वापरतात. A सारखे तिसरे अवजार लिखित संदेशांच्या संपादनाचे कामी येते. चौथे अवजार तारेच्या वलयासारखे दिसते. आणि त्याने परस्परानुकूल घटकचित्रें जोडता येतात. याप्रकारे अन्य अवजारेही नीट समजून घेऊन वेवेगळ्या प्रकारे वापरता येतील. अवजार तबक आकृती क्र.३ मध्ये दर्शवलेले आहे. F-2 अग्रपटलाची निर्मिती जरूरी नियंत्रक व दर्शकांना जवळ जवळ ठेवून व जोडून देवून करतात. नियंत्रक, अग्रपटलावरील एक वस्तू असते जिचेद्वारा वापरकर्ता आभासी उपकरणासोबत देवाणघेवाण करू शकतो. नियंत्रकाची सरळ उदाहरणं म्हणजे, खटके आणि लिखित संदेश. दर्शक, अग्रपटलावरील ती वस्तू आहे जी उपभोक्त्यास दर्शन करवते. उदाहरणार्थ आरेखक, तापमापक आणि अन्य दर्शक. जेंव्हा अग्रपटलावर नियंत्रक वा दर्शक ठेवतात तेंव्हा घटकचित्रावर संबंधित अंतक आपोआप दिसू लागतात. नियंत्रक तबक आकृती क्र.४ मध्ये दर्शवलेले आहे. F-3 F-4 प्रकार्य तबक आकृती क्र.५ मध्ये दर्शवलेले आहे. अग्रपटलावर नियंत्रक वा दर्शक ठेवल्यास घटकचित्रात त्यांचे जोड दिसू लागतात. त्या जोडांना उचित तारांनी जोडून घटकचित्र बनवले जाते. घटकचित्रावर दुसर्‍या अन्य .vi संचिका, प्रकार्यचित्रे, ढाचें, प्रकार्य तबकातून उचलून ठेवता येतात आणि त्यांनाही घटकचित्रावरील अन्य वस्तुंसोबत समुचित तारांनी जोडले जाऊ शकतं. ढाचे, प्रकार्य आणि दुसर्‍या अन्य .vi संचिका, प्रकार्य तबकावर राहणारी `केंद्रके' म्हणवतात. ही केंद्रके या तबकास प्रकार्य क्षमता देतात. एक पूर्ण घटकचित्र, प्रवाहचित्रासारखे दिसते. F-5 अग्रपटल निर्माण अग्रपटल, .vi संचिकेचे उपभोक्त्याशी समन्वयन करवते. अग्रपटल नियंत्रक आणि दर्शकांपासून बनते, जी .vi संचिकेची आवागमन द्वारे असतात. नियंत्रक; खुंटया, दाबकळा आणि अन्य नियंत्रण-माहिती स्वीकार-साधनांच्या स्वरूपात असतात. दर्शक; आरेखक, प्रकाशोर्त्सजक एकदिशा-प्रवर्तक आणि अन्य दर्शन साधने असतात. नियंत्रक; .vi संचिकेच्या घटकचित्रास माहिती पुरवठा करतात. दर्शक माहिती दर्शवतात, जी घटकचित्रात स्वीकारली अथवा उपलब्ध केली जाते. प्रत्येक नियंत्रक वा दर्शकास एक स्वल्प प्रसूची असते जी त्यांच्या अंतर्गत पर्याय निवडण्याचे अथवा त्यांचे स्वरूप बदलण्याचे कामी येते. नियंत्रक वा दर्शक अग्रपटलावर ठेवताच, संबंधित जोड घटकचित्रावर दिसू लागतात. घटकचित्र निर्माण अग्रपटल निर्माण केल्यावर अग्रपटलावर स्थित वस्तूंचे नियंत्रण करण्यासाठी घटकचित्रावर प्रकार्य प्रकटनचित्र ठेऊन आणि जोडून प्रणाली संपन्न करता येते. नियंत्रक वा दर्शक अग्रपटलावर ठेवताच, संबंधित जोड घटकचित्रावर दिसू लागतात. उदाहरणस्वरूप सेल्शिअस ते फ़ॅरनहीट प्रवर्तक आभासी उपकरण. F-6 समजा आपल्याला एक .vi संचिका बनवायची आहे, जी तापमानास सेल्शिअस मध्ये स्वीकार करून फ़ॅरनहीट मध्ये परिवर्तीत करून दाखवेल. यासाठी अग्रपटल उघडा, सेल्शिअस नियंत्रक आणि फ़ॅरनहीट दर्शक त्यावर ठेवा. हेच आकृती क्र.६ मध्ये दर्शवलेले आहे. या दोन्हीचा जोड घटकचित्रा वर दिसून येतो. घटकचित्रावर प्रकार्य तबकातून एक गुणक व एक समायोजक आणून ठेवा. F-7 घटकचित्रावरच ह्या सर्व वस्तू आकृती क्र.७ नुसार जोडून मग अग्रपटलावर जाऊन ही प्रणाली चालवल्यास, तो नियंत्रक त्यावर लावलेला आकडा प्रक्रमित करून फ़ॅरनहीट दर्शकावर दर्शवतो. आता नियंत्रकात वेगवेगळे आकडे टाकून दर्शक ठीक दाखवतो आहे, हे पारखून घ्या. आहे न किती सोपं, एक `आभासी उपकरण' तयार करणे? समारोप आभासी उपकरणनाची संकल्पना, त्याचे फायदे, त्याची साधनसामग्री (हार्डवेअर), कार्यप्रणाली (सॉफ्टवेअर), माहिती-विनिमय-तारगुच्छ, या सार्‍यांचा परिचय ह्या लेखात करून दिलेला आहे. सामान्य माणसास जर आभासी उपकरणनाबाबत प्राथमिक माहिती ह्या लेखाद्वारे मिळू शकली तर त्याचे प्रयोजन सफल होईल. --- समाप्त --- http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Book traversal links for आभासी उपकरणन-३

  • ‹ आभासी उपकरणन-२
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
तंत्र
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
माहिती
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
5677 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

एक विनंती

रणजित चितळे
गुरुवार, 05/03/2012 - 11:20 नवीन
लेख चांगला आहे विषय पण चांगला आहे. पण दोन लेखांमध्ये थोडा वेळ दिलात तर लेख वाचून, मनन करता येईल. ही एक विनंती आहे. लेख वाचत आहे पहिला झाला आहे, अजून दोन वाचायचे आहेत.
  • Log in or register to post comments

चितळे साहेब सावकाश वाचा! घाई नाही!!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 16:06 नवीन
लेख चांगला आहे विषय पण चांगला आहे. पण दोन लेखांमध्ये थोडा वेळ दिलात तर लेख वाचून, मनन करता येईल. ही एक विनंती आहे.>>>> कबूल आहे. अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

माफ करा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/03/2012 - 11:22 नवीन
पण ह्या लेखाचा सुगम मराठी अनुवाद कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments

माफ करता येणार नाही!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 16:10 नवीन
पण ह्या लेखाचा सुगम मराठी अनुवाद कुठे मिळेल ?>>>मिळवून दिलात तर उचित बक्षिस मिळेल! सुगम लिहिलेला कठीण विषय, इंग्रजीतही समजून घेताच की. मग मराठीत समजावून न घेणार्‍यास माफी काय म्हणून करायची? तरीही "आपला" नसलेल्या विषयात रुची घेतलीत, हीच खरे तर आनंदाची गोष्ट आहे. त्याखातर धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिळवून दिलात तर उचित बक्षिस

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/03/2012 - 16:16 नवीन
मिळवून दिलात तर उचित बक्षिस मिळेल!
म्हणून तर तुम्हाला विचारले. मराठी अनुवादात तुमचा हात धरणारा कोणी नाही आज आंतरजालावरती.
सुगम लिहिलेला कठीण विषय, इंग्रजीतही समजून घेताच की. मग मराठीत समजावून न घेणार्‍यास माफी काय म्हणून करायची?
पण तुम्ही ज्या भाषेत लिहिले आहेत ती आम्हाला मराठी वाटतच नसेल तर ? मराठीचा अभिमान आणि मराठीचा दुराग्रह ह्यात थोडे अंतर असावे असे आपले आमचे प्रामाणिक मत आहे. तुम्ही जे काही लिहिले आहेत ते स्वांतसुखाय नक्कीच नाही. तसे असते तर तुम्ही डायरीत लिहिले असते, मिपाच्या बोर्डावरती नाही. आता इथे लिहिले आहेत म्हणजे सदस्यांनी वाचावे म्हणून लिहिले आहेत हे नक्की. मग जे काय लिहिले आहेत ते सदस्यांना समजून देखील यावे असे तुम्हाला वाटत नाही का ?
तरीही "आपला" नसलेल्या विषयात रुची घेतलीत, हीच खरे तर आनंदाची गोष्ट आहे. त्याखातर धन्यवाद.
हा विषय आमचा नाही हे आपण कशावरुन ठरवलेत ? एकदा भेटा की निवांत, तुम्हाला आमचे विषय आणि त्यातले ज्ञान सगळे समजेल. ;) आपलाच नम्र विषयासक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

साधते आहे असे वाटू लागले आहे......

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 16:35 नवीन
मराठी अनुवादात तुमचा हात धरणारा कोणी नाही आज आंतरजालावरती.>>>> हे तुम्हाला कोणी सांगितले? पण तुम्ही ज्या भाषेत लिहिले आहेत ती आम्हाला मराठी वाटतच नसेल तर ? >>> शक्य आहे. तोच विषय, तुमच्या मराठीत आपल्या लहानग्यांना समजावून सांगा. जी भाषा बोलाल तीही चालेल! मराठीचा अभिमान आणि मराठीचा दुराग्रह ह्यात थोडे अंतर असावे असे आपले आमचे प्रामाणिक मत आहे.>>>> सहमत आहे. तुम्ही जे काही लिहिले आहेत ते स्वांतसुखाय नक्कीच नाही. तसे असते तर तुम्ही डायरीत लिहिले असते, मिपाच्या बोर्डावरती नाही. आता इथे लिहिले आहेत म्हणजे सदस्यांनी वाचावे म्हणून लिहिले आहेत हे नक्की. मग जे काय लिहिले आहेत ते सदस्यांना समजून देखील यावे असे तुम्हाला वाटत नाही का ? >>>> हो वाटते ना. मात्र हा विषय इंग्रजीत शिकवत असतात तेव्हाही पूर्व-अर्हतेची अट असते. खरे तर मराठीतील त्याच्या अभिव्यक्तीकरताही ती असायलाच हवी. मात्र माझ्या मते, कितीही कठीण विषय असला आणि जाणण्यास उत्सुक सामान्य माणसास जर आपण मायबोलीत सांगून त्याला समजला तर, मायबोलीतले वर्णन साध्य झाले आहे, असे मानता येईल. म्हणून त्या पूर्व-अर्हतेच्या अटींकडे दुर्लक्ष करून खुल्या मंचावर प्रस्तुत करण्याचा हा एक प्रयोग आहे. त्याचे यश संवादास खुल्या असलेल्या वाचकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. साधते आहे असे वाटू लागले आहे...... हा विषय आमचा नाही हे आपण कशावरुन ठरवलेत ? >>>> आमचे ज्ञान सीमित आहे. सीमित विषयांपुरते मर्यादित आहे. म्हणून असेल कदाचित. पण त्यामुळेच असे ठरवले खरे. एकदा भेटा की निवांत, तुम्हाला आमचे विषय आणि त्यातले ज्ञान सगळे समजेल. >>> अवश्य. आंधळा मागतो एक डोळा. देव देतो दोन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

-१ @ परा

स्पा
Fri, 05/04/2012 - 16:16 नवीन
गोळे काका तुम्ही लिहित राहा.. एवढ काही कठीण वाटत नाही.. माझा १० मिनिटात लेख वाचून झाला.. टीका करणारे करत राहतात.. तुम्ही देत असलेल ज्ञान महत्वाच आहे -- निर्गुण मन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खीक !

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/04/2012 - 18:02 नवीन
माझा १० मिनिटात लेख वाचून झाला..
असो... ब्लडी इंडियन्स ! हिरव्याकथेतील डॉलरकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

होय, आम्ही तर रक्तानेच भारतीय आहोत. इतरांची कल्पना नाही....

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 18:25 नवीन
तुमच्या राज्यातही फेरी मारतोच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कोणीतरी

तिमा
गुरुवार, 05/03/2012 - 21:06 नवीन
या सुगम मराठी लेखांचा इंग्रजी अनुवाद करेल का ? म्हणजे काय होईल की आम्हाला ते वाचता येईल. 'समजणे' ही त्यापुढील पायरी मग आमच्या दृष्टीपथात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एखाद्या इंग्रजी संकेतस्थळावर मुक्त विहार करा!

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 08:41 नवीन
तिरशिंगराव इथे तुम्ही चुकीने आलेले दिसता, एखाद्या इंग्रजी संकेतस्थळावर मुक्त विहार करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

लेखनविषय उत्तम आहे पण

गवि
गुरुवार, 05/03/2012 - 11:47 नवीन
लेखनविषय उत्तम आहे पण त्यामधील शब्दांनी माझ्या मस्तिष्कातील अनुप्रस्थ महासंयोजी पिंडात अग्निरथआवकजावकसूचकताम्रहरितवर्णपट्टिकेच्या दिव्यांच्या उघडझापीसारखी चमचम व्हायला लागली. हळूहळू तो परिणाम प्रतिदीप्त प्रकाशाप्रमाणे व्हायला लागून नेत्रपटलाच्या मागील भागातल्या शंक्वाकृती वर्णस्वीकारक पेशी असंवेदनशील होऊन रंगांधत्वाची आभासनिर्मिती झाली.. सॉरी.. सॉरी.. निव्वळ गंमत करतोय.. अत्यंत हलके घ्यावे.. उत्तम लेख.. असे लेख मराठीत रुढ होत जावोत अशी इच्छा... :)
  • Log in or register to post comments

हे तरी किती लोक करतात हो! त्याखातर धन्यवाद.

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 16:13 नवीन
लेखनविषय उत्तम आहे पण ..... सॉरी.. सॉरी.. निव्वळ गंमत करतोय.. अत्यंत हलके घ्यावे..>>>>> अनोळखी विषयाचे पान उघडून पाहिलेत. हे तरी किती लोक करतात हो! त्याखातर धन्यवाद. उत्तम लेख.. असे लेख मराठीत रुढ होत जावोत अशी इच्छा...>>>> तथास्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

महोदय, सदर लेख लिहीण्यात

पाषाणभेद
गुरुवार, 05/03/2012 - 22:08 नवीन
महोदय, सदर लेख लिहीण्यात भरपुर मेहनत घेतल्याचे जाणवते आहे. आता वेळ जरी नसला तरी नंतर निवांत वाचेल ही खात्री बाळगा. आधीच्या लेखाचा दुवा दिलात तर तो देखील लेख वाचता येईल व मी आपला आभारी असेन. विषय अधिक समजून घेण्यासाठी निरंतर संकेताची एकदोन उदाहरणे दिलीत तर बरे पडेल. बरेच दिवसांनी अस्सल मराठीतील लेख पाहून खुप खुप आनंद झाला. अशा प्रकारे लेखन करून एक नवीन पायंडा पाडीत असल्यामुळे आपले अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 08:49 नवीन
दिवस-रात्र, चालू-बंद, आहे-नाही इत्यादी संकेत मुळातच अंकित संकेत आहेत. दिवसाचे तापमान सतत बदलत असते, घड्याळातील वेळ सतत बदलती असते, हे आहेत निरंतर संकेत. मात्र घड्याळात जे आकडे असतात, त्यांच्याद्वारे आपण निरंतर संकेतांचे अंकीकरण करत असतो, आपल्या सुलभ आकलनाकरता. त्यामुळे ते संकेत मग अंकित संकेत म्हटले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

बाबौ!

दादा कोंडके
गुरुवार, 05/03/2012 - 23:20 नवीन
चित्रं ओळखीची दिसतायत पण लिहिलेले काहिही कळलं नाही. मराठीत नवनवीन शब्द तयार व्हायला पाहिजेत, रुळले पाहिजेत असं मलाही वाटतं, त्याबद्दल तुमच्या मेहनतीबद्दल आदर आहे. बट-परंतू-लेकीन-किंतू, हे इतर क्षेत्रामध्ये शक्य आहे जसं की राजकारण वगैरे. शास्त्र आणि तंत्रज्ञानातले शब्द वाढवायचे असतील तर त्याबद्दलचे शोध निबंध, प्रबंध मराठीत लिहावे लागतील. दुसर्‍याकुणीतरी शब्दशः भाषांतर करून किंवा कधीकधी ओढून ताणून तयार केलेली शब्द (उदा. माउसला मुषक) रूळणे अवघड आहे. एखाद्या मराठी शास्त्रज्ञानं किंवा अभियंत्यानं शोध निबंध मराठीत प्रसिद्ध करणं आतातरी शक्यच नाहिये. एक उदाहरण म्हणून जर्मन भाषेचं देता येइल. परमाणूअभियांत्रिकी मधला प्रत्येक इंग्रजी टेक्निकल शब्दाला जर्मन भाषेत शब्द आहे. याचं कारण म्हणजे कितीतरी शोधच जर्मन शास्त्रज्ञानी लावले आहे आणि मूळ शोध निबंधच जर्मन भाषेतून आहेत.
  • Log in or register to post comments

अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 08:59 नवीन
चित्रं ओळखीची दिसतायत पण लिहिलेले काहिही कळलं नाही.>>> नाही एखाद्याला कळत! त्यात काय एवढे मोठेसे. मराठीत नवनवीन शब्द तयार व्हायला पाहिजेत, रुळले पाहिजेत असं मलाही वाटतं, त्याबद्दल तुमच्या मेहनतीबद्दल आदर आहे.>>> धन्यवाद! बट-परंतू-लेकीन-किंतू, हे इतर क्षेत्रामध्ये शक्य आहे जसं की राजकारण वगैरे. शास्त्र आणि तंत्रज्ञानातले शब्द वाढवायचे असतील तर त्याबद्दलचे शोध निबंध, प्रबंध मराठीत लिहावे लागतील. दुसर्‍याकुणीतरी शब्दशः भाषांतर करून >>> छे हो! माझ्याच लेखाचा मी स्वतः अनुवाद केलेला आहे. किंवा कधीकधी ओढून ताणून तयार केलेली शब्द (उदा. माउसला मुषक) रूळणे अवघड आहे. >>>> "मूषक" हा शब्द ओढून ताणून तयार केलेला आहे असे मला वाटत नाही. एखाद्या मराठी शास्त्रज्ञानं किंवा अभियंत्यानं शोध निबंध मराठीत प्रसिद्ध करणं आतातरी शक्यच नाहिये. >>>> मी मराठी आहे. मी शास्त्रज्ञ आहे. हा शोध निबंधच आहे. प्रत्यक्षातच इथे हजर आहे. तेव्हा असे तुम्ही का म्हणत आहात ते मला समजत नाही. एक उदाहरण म्हणून जर्मन भाषेचं देता येइल. परमाणूअभियांत्रिकी मधला प्रत्येक इंग्रजी टेक्निकल शब्दाला जर्मन भाषेत शब्द आहे. >>> असेल. तसाच मराठीतही असायला हवा म्हणूनच हा प्रयास आहे. तुम्ही फक्त तथास्तु म्हणा! याचं कारण म्हणजे कितीतरी शोधच जर्मन शास्त्रज्ञानी लावले आहे आणि मूळ शोध निबंधच जर्मन भाषेतून आहेत.>>>> नाही हे ह्याचे कारण नाही. कारण हे आहे की जर्मन लोक प्रत्येक शोधाची (मग ते शोध इंग्रजांनी का लावलेले असेनात) चर्चा जर्मन भाषेत कायमच करत आलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आता माझा टोला

दादा कोंडके
Fri, 05/04/2012 - 22:15 नवीन
नाही एखाद्याला कळत! त्यात काय एवढे मोठेसे.
हा हा.. खरं आहे.
धन्यवाद!
धन्यवादाबद्दल धन्यवाद
छे हो! माझ्याच लेखाचा मी स्वतः अनुवाद केलेला आहे.
मी शोध निबंध म्हणालो, मला जेव्हडं हे कळलं त्यावरून हा शोध निबंध वाटत नाहिये.
"मूषक" हा शब्द ओढून ताणून तयार केलेला आहे असे मला वाटत नाही.
इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कनेक्टर आणि त्याच्या जोडीला (इंग्रजीत मेल-फिमेल) मेटींग पार्ट म्हणतात. पुण्यात असताना आमचा अस्सल गावरान शॉप मॅनेजर मेटींग साठी "XXण्या" हा शव्द वापरायचा त्याची आठवण झाली! :)
मी मराठी आहे. मी शास्त्रज्ञ आहे. हा शोध निबंधच आहे. प्रत्यक्षातच इथे हजर आहे. तेव्हा असे तुम्ही का म्हणत आहात ते मला समजत नाही.
अब बस कर मामू, रुलायेगा क्या?
नाही हे ह्याचे कारण नाही. कारण हे आहे की जर्मन लोक प्रत्येक शोधाची (मग ते शोध इंग्रजांनी का लावलेले असेनात) चर्चा जर्मन भाषेत कायमच करत आलेले आहेत.
मग, जर्मन भाषेत इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल मधले शब्द आहेत पण त्या मानाने सॉफ्टवेअर मधले खूप शब्द ते जसे त्या तसे का वापरतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

गोळे साहेब

चौकटराजा
Fri, 05/04/2012 - 09:07 नवीन
अनेक वेताळ आपल्याला भंडावून सोडतील पण विक्रमार्काप्रमाणे "लगे रहो " हे धोरण ठेवा. प्रत्येक बाळ जन्मताना प्रसूतिवेदना होतात ना तसेच शब्दांचे पण असते. उदा . आरक्षण हा शब्द आता रूढ झाला आहे पण नवा आला त्यावेळी लोक हसतच असत .
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौरा!

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 09:16 नवीन
विक्रमार्क नसलो म्हणून काय झाले, त्याचाच नागरिक शोभेन मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

लेख वाचला

रणजित चितळे
Fri, 05/04/2012 - 16:09 नवीन
discrete and analog ह्या वरची आपली माहिती आवडली. जर्मन, इस्राईल, फ्रांस, रशीया हे प्रगत देश त्यांच्या त्यांच्या भाषेत लिहितात, नविन शब्द विकसीत करतात व वापरतात. आपल्या कडे इंग्रजी आले पाहिजे व ते सुद्धा इंग्रज बोलतात तसेच आले पाहिजे - नाहीतर गवार, कॉन्व्हेन्ट मधला न शिकलेला, लल्लू, असे समजले जाते. साहेब आपला लेख चांगला आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद चितळेसाहेब! आपल्या प्रतिसादाचे आम्हाला अप्रूप आहे.

नरेंद्र गोळे
Fri, 05/04/2012 - 18:31 नवीन
आपल्या कडे इंग्रजी आले पाहिजे व ते सुद्धा इंग्रज बोलतात तसेच आले पाहिजे - नाहीतर गवार, कॉन्व्हेन्ट मधला न शिकलेला, लल्लू, असे समजले जाते. >>>>> मीही कॉन्व्हेन्टमध्ये न शिकलेलाच आहे. हे लिहिलेले सर्वच इंग्रजीतच होते. तिथूनच आणलेले आहे. ज्ञान अस्सल आहे. आपलेसे करा एवढेच म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा