Skip to main content

War Horse

Published on बुधवार, 25/04/2012
ऑफीस मध्ये खितपत पडणारी bandwidth नेहमीच मला बघवत नाही, त्यातूनच ती सत्कारणी लागावी अशी माझी मनोमन इच्छा असते, मग काहीतरी साधारण काहीतरी point असणारी चित्रपटांची नाव यादीतून शोधून ती डाऊनलोड करतो. काहीवेळा अपेक्षाभंग होतो तर काहीवेळा खरंच त्या वेळेचे चीज होते. त्यातूनच "war horse" चित्रपट आंतरजालावरून लॅपटॉपवर उतरवण्यात आला. तो बघितला , आणि वाटलं की मिपाकरांसमोर हा चित्रपट उलगडावा. प्लॉट सांगण्याअगोदर चित्रपटाची थोडी पार्श्वभूमी सांगतो. 1 मायकल मोर्पुर्गो नावाच्या एका ब्रिटीश लेखकाने पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या अनुभवावरून , तिथल्या लोकांची परिस्थिती अनुभवून ह्यावर एक लिहिलेली war horse नावाची एक कादंबरी. ह्या कादंबरीवर चित्रपट करायचा ह्या ध्यासापायी मायकलने तब्बल ५ वर्षे खर्ची घातली पण हाती निराशाच लागली. पुढे जाऊन काहींनी ह्या कथानकावर पपेट शो देखील सादर केले . २००९ मध्ये कॅथलीन केनेडी नावाच्या चित्रपट निर्मातीचा काही कारणास्तव war horse production शी संबंध आला, ती कथा ऐकल्यानंतर अजून ह्या कथेचे हक्क कोणी घेतले कसे नाहीत ह्यावर आश्चर्य व्यक्त करत ती कथा थेट all time great स्टीव्हन स्पिलबर्गच्या कानावर घातली गेली, 16 डिसेंबर २००९ रोजी DreamWorks सारख्या मातब्बर कंपनीने कथेचे सर्व हक्क विकत घेतले. तेव्हा स्टीव्हन एवढेच म्हणाला "From the moment I read Michael Morpurgo's novel War Horse, I knew this was a film I wanted DreamWorks to make. Its heart and its message provide a story that can be felt in every country." इथून पुढे मायकलच्या ड्रिम बद्दल वर्क व्हायला सुरुवात होणार होती. very well, so lets go with the plot. Light, sound, Camera and Action ! 7 चित्रपट सुरु होतो तो इंग्लंड मधल्या परगण्यातील अतुलनीय सौंदर्याच्या फ्रेम्सनी. नितळ आभाळ , कुठेतरी शुभ्र रंगात गडद किनार घेऊन गाल फुगवून बसलेला ढग, त्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश, सभोवताली हिरवळ, माफक चढाव असलेल्या छोट्याश्या टेकड्या, ती कुरणे, रुंजी घालत असणारे हमिंग बर्डस, खळखळ करत वाहणारे ओढे, टुमदार कौलारू दगडी घरे like kind of faire tales . ह्या सगळ्यातून कॅमेरा pan होत एका शेतापाशी येतो, नुकतीच एक घोडी बाळंत होणार असते, तीन वृद्ध तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत तिच्या कलाने घेत असतात , पाहता पाहता ती एका शिंगरूला जन्म देते. गवतात लोळून टुणकन उडी मारुन चार पाय पसरत शिंगरू उभे राहते, आणि समांतर तिरक्या रेषेत आई आणि तिचे शिंगरू त्या कुरणातून खुली दौड घेतात, हे सगळे कुंपणाच्या आडून पाहत असतो तो आपला अल्बर्ट नेरकॉट ( Jeremy Irvine ). त्या कुरणात आपल्या आईभोवती दुडूदुडू चालणारे शिंगरू पाहणे हाच अल्बर्टचा उद्योग झालेला असतो. त्या शिंगरुशी मैत्री करावी असा अल्बर्टचा प्रयत्न असतो पण आईच्या सानिध्यात ते शिंगरू अल्बर्टला फार यशाला घालत नाही. ते शिंगरू आता थोडेसे मोठे होते, बाळंतपणात मदत करणारे तीन वृद्ध हे परोपकाराचा परमार्थ साधत नसून त्या पिल्लाला थोडे वाढवून त्याचा पुढे सौदा करून नफा मिळवण्याचा स्वार्थ साधत असतात हे एव्हाना कळते, त्या शिंगरुला बाजारात नेऊन आईपासून वेगळे करून लिलावासाठी नेताना आईपोराची ताटातूट बघताना थोडे वाईट वाटते पण ही तर खरी सुरुवात होती. लिलावात टेड ( peter mullan ) भरीस पडुन ते शिंगरू विकत घेतो , घरी आल्यावर रोझ (Emily Watson ) त्याचा "दुष्काळात तेरावा महिना" ह्या सबबीखाली उद्धार करते, पण ते शिंगरू चक्क अल्बर्टच्याच घरात आलेले असते, मी ह्याला शिकवून शेतीसाठी वापरेन आणि आपल्याला उत्पन्न मिळेल असे वचन देऊन अल्बर्ट त्याच्या आईकडून सदर अश्वासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र मिळवतो. 2 मग घोड्याला खाणे भरवणे, त्याला हळूहळू प्रशिक्षण देणे हे प्रसंग अतिशय सुरेखरीत्या दाखवले गेलेत. अल्बर्ट त्या घोड्याचे नाव जोय असे ठेवतो. अल्बर्ट आणि जोय मधली समज, जोय च्या डोळ्यात दिसणारा अल्बर्ट बद्दलचा विश्वास , आणि जोय आपल्याला मान खाली घालायला लावणार नाही हे व्यक्त करणारे अल्बर्टचे डोळे टिपणे म्हणजे सिनेमॅटोग्राफी कशी असावी ह्याचे उत्तम उदाहरण. टेडने लिलावात ज्याला हरवून जोयला विकत घेतलेले असते तो लिओन टेडचा घरमालक असतो, भाडे पूर्ण भर अन्यथा शेतजमीन जप्त करेन अशी धमकी टेडला लिओनकडून मिळते. टेड हा पूर्वाश्रमीचा war hero असतो, पदकांनी भूषवला गेलेला आणि एका पायाने अधू झालेला टेड दारूच्या गर्तेत बुडून जे काही युद्धात घडले त्याबद्दल तिरस्कार बाळगत असतो, त्याच्या वागण्यातून निराशा झाकत असते. नंतर जोयला घेऊन अल्बर्टने शेत नांगरणीसाठी केलेली धडपड बघण्यासारखी आहे , ह्या सगळ्यात डेव्हिड नावाच्या एका बदकाने काही क्षणापुरती धमाल उडवली आहे ते पडद्यावरच बघणे मजेशीर ठरेल. धो धो पाऊस कोसळून शेतात घेतलेले ट्युर्नीपचे पिक फुकट जाते पण शेत वाचवायचे असेल तर पैसे उभे करावेच लागणार होते. इतक्यात पहिल्या महायुद्धाचा बिगुल वाजतो आणि भरतीला सुरुवात होते, टेड पैश्यांसाठी जोयला तिथे नेऊन कॅप्टन जेम्स निकोलस (Tom Hiddlestone) ला विकतो, अल्बर्ट कॅप्टनला जोयला परत करण्यासाठी विनवतो, पण जोयची मी तुझ्याप्रमाणेच काळजी घेईन असे अल्बर्टला कॅप्टन आश्वासन देतो आणि इथून जोयचा खडतर प्रवास सुरु होतो. 3 तिकडे कॅम्पमध्ये जोयला सैनिकी प्रशिक्षण देऊन अजून बळकट बनवतात. इंग्रज सैन्याला फ्रांसमध्ये आघाडीवर जर्मनीविरुद्ध लढायचे असते त्यामुळे कॅप्टन व त्यांचे सारे घोडदळ तिकडे कूच करतात, पण जर्मन्सच्या तत्कालीन अत्याधुनिक मशीनगन्सच्या मार्यासमोर पारंपारिक घोडदळ कितपत टिकाव धरणार ? तिथे एका मशीनगनच्या गोळीबाराला कॅप्टन बळी पडतात आणि जोय जर्मन शिपायांच्या तावडीत सापडतो. मायकल आणि गन्थर नावाचे दोन किशोरवयीन भाऊ, हे जर्मन फौजेत भरती झालेले असतात , हे दोघेजण जोय आणि त्याच्याबरोबर पकडलेला अजून एक टॉपथॉर्न नावाची कला घोडा घेऊन जर्मन अधिकार्यांचा आदेश झुगारत जंगल, झाडे, झुडपे इत्यादीचा आधार घेत ते पळ काढतात. एका फार्महाउस जवळ असलेल्या windmill मध्ये ते एक रात्र आसरा घेतात, जर्मन्स त्यांना शोधून काढून मारतात, पण घोडे आत राहिल्याने बचावतात. ते windmill असते एमिलि ( Celine Buckens) नावाच्या मुलीचे आणि तिच्या आजोबांचे. ती गोड मुलगी त्या घोड्यांची एवढी छान काळजी घेत त्यांच्याशी बोलत असते की ही जर लाड करणार असेल तर आता आपण अश्वरुपात कायापालट करून वारजेतून थेट फ्रान्स गाठून हिच्याकडून आंजारून गोंजारून घ्यावे असे क्षणभर वाटते. 4 ती एकदिवस जोयवरून रपेट मारत असताना जर्मन सैनिक तिला घेरतात आणि जोय, टॉपथॉर्नला जड आर्टिलरी तोफा ओढण्यासाठी घेऊन जातात, तेव्हा आजोबा त्यांना एक प्रश्न विचारतात की ह्या घोड्यांचे काय होईल? तो अधिकारी थंडपणे सिगारेटचा झुरका घेत " तोफा ओढून मरेपर्यंत घोडे वापरले जातील " असं वाक्य टाकत जातो आणि आजोबा, नातीच्या डोळ्यातला हताशपणा बघणे फार अपराधीपणाचे वाटते. इथून पुढे जोयचे काय होते हे स्वतः बघणेच जास्त इष्ट ठरेल. 6 युद्ध म्हटले की तिथल्या नागरिकांना कितीकाय सहन करावे लागते ह्याचा चटका देखील हा चित्रपट लाऊन जातो. एरवी सैनिकाचा एक हात जरी दुखावला तरी त्यावर सर्व उपचार केले जातात पण घोड्यांना सरळ गोळी घातली जाते. युद्ध जिंकण्याच्या हव्यासापोटी आणि क्रुरतेपायी घोड्यांच्या जीवाला कुठे किंमतच दिली गेली नाही ह्याचे वैषम्य वाटत राहते. बाकी हा चित्रपट अप्रतिम म्हणजे निव्वळ अप्रतिम, ह्या चित्रपटाची स्तुती करण्यासाठी खरेच शब्द नाही आहेत. कथा, कलाकार, चित्रीकरण स्थळे, दिग्दर्शन, छायाचित्रीकरण, पार्श्वसंगीत ह्यात काहीच म्हणून एका टक्क्याची सुद्धा उणीव काढता येऊ शकत नाही. ह्या चित्रपटात जे काही आहे ते सगळेच जमेत धरावे लागेल. दिग्दर्शन केले आहे ते स्टीव्हन स्पीलबर्ग या मिडास टच असलेल्या दिग्दर्शकाने. नेमके काय टिपायचे आहे ह्याची जाण असलेल्या विख्यात सिनेमॅटोग्राफर Kamiński ने इतक्या प्रगल्भतेने फ्रेम्स घेतलेल्या आहेत ते डोळ्याचे पारणे फेडते आणि आशयाची परिणामकारकता देखील वाढते. तब्बल ६ प्रकारातून 2012 च्या ऑस्कर साठी निवडण्यात आलेला हा चित्रपट प्रत्येकाने अगदी आवर्जून बघावा असेच म्हणेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2671
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

'वॉर हॉर्स' चित्रपटाची छान माहिती करून दिलेली आहे. जरूर पाहिला जाईल. धन्यवाद!

सुरेख चित्रपट आहे खूप आवडला :) सुंदर परिक्षण

In reply to by संजय क्षीरसागर

लिहिताना जिथे फोटो हवा आहे तिथे cursor ने क्लिक करून ठेवायचे, text area च्या वरच्या toolbox मध्ये image चा icon दिसतो. त्यावर क्लिक करा. इमेज चा URL टाकावा, किती resolution हवे ते टाकावे आणि OK वर क्लिक करा. एका tag मध्ये फोटोचा समावेश झालेला दिसेल,

अप्रतिम सिनेमा आहे हा... खूप खूप आवडला :) :) अवांतर - मी ह्या सिनेमाचं परीक्षण लिहिणार होतो, पण आता हे परीक्षण वाचले आणि आवरतो :) :)

परीक्षण आवडले. फक्त या वाक्याचा अर्थ लागला नाही. " त्याच्या वागण्यातून निराशा झाकत असते." म्हणजे नक्की काय????