कितीही मोठे झालो तरी कधी कधी मोठ्ठ्या आकाशपाळण्यात बसल्यावर मजा येतेच ना? तस्संच, कितीही कळत असलं तरी कधी कधी काही सिनेमे लॉजिक-फिजीक.. डोकं-बिकं.. समज-बिमज.. बाजूला ठेवून पाहिले ना की सॉल्लिड मज्जा येते बुवा.. "हाउसफुल्ल -२" त्यातलाच एक..!
आजकाल विनोदी सिनेमा म्हटलं की प्रचंड गुंतागुंतीचं कथानक हे एक समीकरणच झालं आहे. इथेही तोच प्रकार आहे.
चिंटू कपूर (ऋषी कपूर) आणि डब्बू कपूर (रणधीर कपूर) हे सावत्र भाऊ. चिंटू 'रिअल सन' आणि डब्बू 'नाजायाझ!' पण त्यांच्या वडिलांनी त्यांची ब्रिटनमधील कंपनी व इतर मिळकत दोघांच्याही नावावर समसमान केली असते. ह्यामुळे 'रिअल सन' चिंटू चा डब्बूवर फार राग असतो. त्याची घृणा असते. आणि अर्थातच दोन्ही कुटुंबात हे वितुष्ट असते. भावजय-भावजय, बहिण-बहिण एकमेकांवर खार खाऊन असतात. असंच एका बाचाबाचीत चिंटू-डब्बू एकमेकांना आव्हान देतात की, "मी माझ्या मुलीचं लग्न ब्रिटनमधील 'सबसे अमीर खानदान में' करीन...!!"
ईन कम्स 'पास्ता'!
खाण्याचा नाही हो! 'आखरी पास्ता' (चंकी पांडे) हा 'लग्न जुळवायची कामं' करत असतो.. हो हो.. वधु-वर सूचन ! 'पास्ता' चिंटूकडे 'जय' (श्रेयस तळपदे)चं स्थळ घेऊन येतो. पण मस्तवाल चिंटू अद्वातद्वा बोलून जयच्या आईवडिलांचा असा काही अपमान करतो की आधीच 'कमजोर दिल के' जयचे वडील हृदयविकाराचा झटका येऊन थेट इस्पितळ गाठतात..
ईन कम्स 'जय'!
वडिलांची ही अवस्था पाहून 'जय' पेटून उठतो. आणि ठरवतो की 'चिंटू'लाही असाच झटका देणार.. चिंटूला अतिश्रीमंत घरचं स्थळ हवं असतं ना? ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंतांपैकी एक 'जे.डी.' (मिथुन) चा मुलगा 'जॉली' (रितेश) त्याचा जिगरी दोस्त असतो. हे दोघे कॉलेजातल्या अस्सल बदमाश दोस्त मॅक्स (जॉन अब्राहम) सोबत मिळून चिंटूला धडा शिकविण्यासाठी एक प्लान आखतात. 'जे.डी.'चा मुलगा अशी ओळख सांगून लग्न ठरवायचं आणि अगदी ऐन वेळी स्वत:ची खरी ओळख सांगायची.. अस्सा झटका की डायरेक्ट हॉस्पिटलातच पोहोचवेल! मॅक्स खोटा 'जॉली - जे.डी.चा मुलगा' आणि जय त्याचा ड्रायव्हर बनतात. पण चुकून चिंटूऐवजी डब्बूकडे पोहोचतात! आता?
ईन कम्स 'सनी' (अक्षय कुमार)!
जय -जॉली चा कॉलेजातला अजून एक बदमाश दोस्त आणि मॅक्सचा जानी दुश्मन.. प्लान तोच.. टार्गेट - चिंटू. सनी खोटा जॉली बनून आणि जॉली त्याचा खोटा अंगरक्षक बनून चिंटूकडे दाखल होतात.
ह्या कहाणीत हळूहळू करत गुंता वाढतच जातो.. खुमासदार संवाद, शाब्दिक कोट्या, यमकायमकी आणि प्रासंगिक विनोदातून हा गुंता तुम्हालाही गुरफटवून टाकतो आणि सरतेशेवटी सगळा गोंधळ कसाबसा उरकून गोड शेवट होतो! इतका पसारा मांडल्यावर अखेरीस घाई-घाईने उरक णं अपेक्षितच होतं.
काही ठिकाणी खो-खो हसवणारा हा सिनेमा काही ठिकाणी रेंगाळला आहेच आणि काही ठिकाणी गुंडाळलाही आहे. एकंदरीत हा विनोदाचा प्रयत्न आधीच्या 'हाउसफुल्ल' पेक्षा तरी बरा जमला आहे. पण मी अजूनही निखळ विनोदी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, जो हृषीकेश मुखर्जी नंतर काही प्रमाणात प्रियदर्शनने केलाय आणि दिबाकर बानर्जीसारख्या अजून काहींनी एखाद सिनेमात (खोसला का घोसला) ती झलक दाखवली. पण साजीद खान कडून दर्जेदार विनोदाची अपेक्षा करणं हे जॉन अब्राहम कडून चांगल्या अभिनयाची अपेक्षा करण्यासारखंच!
संगीताच्या (साजिद-वाजीद) नावाने खरोखरच अक्षरश: बोंबाबोंब आहे. इतकी की शब्दच कळू नयेत. कुठलीच चाल 'ओरिजिनल' वाटत नाही, इतकं हे संगीत घीसं पीटं आहे.
ह्या सिनेमात 'नॉट टू मिस' म्हणावं असं काहीच नाही, पण बघितलाच तर डोकं आपटून घ्याल असाही काहीच नाही. (अपवाद - संगीत) पाचपैकी अडीच तारे देण्यास हरकत नसावी!
https://www.ranjeetparadkar.com/2012/04/review-house-full-2.html
मिसळपाव
प्रतिक्रिया
परीक्षण आवडलं.
डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही!
अनारकली लै भारी......
अनारकली लै भारी...... ;)
+१००, तसेच या गाण्याचे पहिले
In reply to अनारकली लै भारी...... by पक पक पक
+१००, तसेच या गाण्याचे पहिले कडवे हे स्त्री मुक्ती वाल्यांनी संघटन गीत म्हणुन वाजवावे असे आहे, एकुणच पुरुष प्रधान संस्क्रुतीच्या अन्यायकारक जुलुमी बेड्या तोडुन एका मुक्त जगात, जे जत स्त्रीला स्वताच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देते अशा अर्थाचे हे गाणे चांगले जमले आहे.
तुमचा सर्वप्रथम निषेध अहो
तुमचा सर्वप्रथम निषेध
अहो सिनेमातील महिला वर्गाविषयी एकही शब्द नाही.अथवा वर्णन नाही.
मुद्याचे म्हणजे पहिल्या भागात जसा स्कीन शो भरपूर प्रमाणात झाला ह्या भागात ....
नाही म्हणजे साजिद जे करन सोबत कॉफीपान करतांना त्याचा हाउसफुल २ हा ३ इडियट चा विक्रम मोडेल अशी वल्गना केली होती म्हुणुन विचारले.
आता एवढा सिनेमा पहिलाच आहे तर अनारकली आणि मुन्नी ह्यांच्यात तुलना करून............
आता त्यांच्या सिनेमात अभिनेत्रींच्या वाट्याला काम नगण्य असते हे जरी खरे असले तरी जास्त सीन मिळून हिरो काही विशेष उजेड पडत नाहीत. गाण्यांमध्ये हिरवणी शेवटी कामाला येतात.
मुद्याचे म्हणजे पहिल्या भागात
In reply to तुमचा सर्वप्रथम निषेध अहो by निनाद मुक्काम …
मुद्याचे म्हणजे पहिल्या भागात जसा स्कीन शो भरपूर प्रमाणात झाला ह्या भागात ....
नाही
अहो महाराज जे आख्ख्या चित्रपटात नाही ते फक्त एका अनारकली या गाण्यात आहे..... ;)
बरं
झालं :) अजून बघितला नाही ते.आता शक्यच नाही , धन्यवाद
ह्म्म्म...
साजिद खान...ह्म्म्म...



- ( हाउस'डूम्ड -२' असे नाव असावे असे वाटणारा) सोकाजी
कामावरचा ताण
ज्योती कामत म्हणतात तसे डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा एकदा बघायला काहीच हरकत नाही!
रघू सावंत
या रिव्यूमुळे
जरातरी पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आवडले परीक्षण!