मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उभ्या उभ्या विनोद.

रेवती · · जनातलं, मनातलं
मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपला मिपाकर मित्र संदीप चित्रेची इमेल आली. त्यात तो आणि त्याचे मित्रमंडळ शिकागो महाराष्ट्र मंडळासाठी 'उभ्या उभ्या विनोद' (उउवि) हा कार्यक्रम सादर करणार असल्याबद्दल लिहिले होते. निमित्त होते गुढी पाडव्याचे. ३१ मार्चच्या कार्यक्रमाला जाण्याचे नक्की करून आम्ही ऑनलाईन नावनोंदणी केली. ते ठिकाण आमच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर वॉरनव्हिल येथे होते. संदीपचा कार्यक्रम बघायला मिळणार होता, शिवाय त्याला व्य. नि. करून आमच्याबरोबर घरी येण्याचे आमंत्रण दिले. मंडळात त्या दिवशी सत्यनारायण पूजा, गुढीपाडव्यावर आधारीत लहान मुलांनी केलेले एक नाटुकले आणि दोन तासांचा हसवणारा कार्यक्रम होता. कार्यक्रमाआधी संदीप आणि त्याचे मित्र विनय देसाई यांनी भेटून गप्पा मारल्या. Image removed.Image removed. संदीपबरोबरच शुभदा कामेरकर, विनय देसाई आणि कौस्तुभ सोमण हेही सादरीकरणात सामिल झालेले होते. Image removed.Image removed. नंतर त्यांच्या यावेळी भाग न घेतलेल्या कलाकारांबद्दल संदीप बोलत होता. २००६ साली उउवि कार्यक्रम सुरु केला असल्याचे समजले. आतापर्यंत अनेक मराठी मंडळांमध्ये या मंडळींना सादरीकरणासाठी आमंत्रणे आलेली आहेत. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात व इतर ठिकाणीही उउवि हा कार्यक्रम लोकप्रीय झालेला आहे तो केवळ सर्व कलाकारांच्या वेगवेगळ्या शैलीतील सादरीकरणामुळेच. विविध वयोगटातील प्रेक्षकांना सतत हसवत ठेवण्याचे काम तशाच विविध वयातील हे कलाकार करत असतात. कौस्तुभ सोमण यांचे लग्न ठरवणे ते शुभदाताईंच्या लग्नाला झालेली पंचवीस वर्षे असा सगळा काळ या कार्यक्रमाने 'कव्हर' केला आहे. कौस्तुभ यांनी प्रेयसीने प्रियकराला बोलावताना असलेल्या मराठी आणि हिंदी गाण्यांची उदाहरणे देत मजा आणली. बहुतेक हिंदी गाण्यांमध्ये प्रियकराला थांबण्याच्या विनवण्या असतात तर मराठी गाण्यांमध्ये प्रियकराकडे जाणे टाळण्याकडे कल असतो. "अभी ना जाओ छोडकर" हे गाणं आणि "असा बेभान हा वारा...........कशी येऊ" आणि "त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियाचे झोपडे" (म्हणजे मी उठून तिथे जाणार नाही या अर्थी.) अशा गाण्यांची उदाहरणे दिल्यावर सगळेजण खी खी करून हसत होते. आपल्याला ही तुलना कधी करावी अशी कल्पनाही मनात आली नाही हे मी आणि माझ्या नवर्‍याने कबूल करून टाकले. संदीपने त्याच्या उउवि मध्ये लग्नकार्यात बेसनाचा टाळूला चिकटलेला लाडू बोटाने सोडवताना व्हिडीओग्राफर नेमका त्याचवेळी येतो असे म्हटल्याबरोबर माझ्या मागे बसलेले एक महाशय हसण्याचे थांबेचनात. मला त्यावेळी ऐकू न आलेले विनोद संदीपने पुन्हा ऐकवावेत असे त्याला सांगणे आहे. शुभदाताईंनी त्यांच्या सादरीकरणात कोटी करताना मैत्रिणी या नणंदेसारख्या असतात, लगेच पार्टी बदलतात असे म्हटले. माझ्या मेंदूला त्याचा नक्की अर्थ समजून हसेपर्यंत माझ्या समोरच्या रांगेत बसलेल्या दोघी नणंदा-भावजया (त्यांच्या) पोटात दुखेपर्यंत हसत होत्या, इतके की मला त्यांच्याकडे पाहूनच हसू यायला लागले. विनय देसाईंनी गाडी चालवतानाचे त्यांचे व इतरांचे किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली. लहान मोठ्यांना दोन तास सलग हसवणार्‍या या चमूला पुढील अनेक कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

वाचन 6637 प्रतिक्रिया 0